पुळण - भाग ११

Submitted by मॅगी on 25 July, 2017 - 03:05

भाग १०

"होय! तो श्रावण म्हणजे सावण्या तुझ्या आजीचा सख्खा भाऊ होता. तिच्यापेक्षा साधारण पाच वर्षांनी मोठा होता. तो लहानपणापासून लोकांना त्रास देत असे. कुठे प्राण्यांना हाल हाल करून मार, लोकांच्या वस्तूंची तोडफोड, एकदा तर त्याने कुणाच्या तरी गोठ्याला आग लावली तेव्हा रात्री वडीलानी त्याला खूप झोडपून काढला."

"सकाळी तो घर सोडून कायमचा निघून गेलेला होता. तेव्हा तुझी आजी १४-१५ वर्षांचीच होती. त्यानंतर चार पाच वर्षे तो कातकऱ्यांच्यात होता बहुतेक, नंतर हे लुटीचं सत्र सुरू झालं. पण सावण्याने कायम आपला चेहरा लपवला होता. शेवटपर्यंत तो श्रावण म्हणजेच लुटारू सावण्या हे कोणालाच कळले नव्हते."

"तर त्या रात्री तिथे हे घडल्यानंतर आजीची मनस्थिती काय होती हे कुणालाच समजू शकत नाही. पण तिचे मन इतके गोठून गेले होते की कशाचीही पर्वा न करता ती रात्रीतच पडत, धडपडत, चिखल, झाडोरा, वाऱ्यापावसातून वाट फुटेल तशी पळत, चालत, रांगत कशीबशी घरी पोचली. तेव्हा तिला स्वतःच्या कपड्यांची आणि फुटलेल्या हातापायांची जाणीवच राहिली नव्हती."

तुझ्या आजोबांनी बरेच दिवस खूप प्रयत्न आणि सेवा करून तिला या सगळ्यातून बाहेर काढलं पण तिच्या मनाची फुटलेली काच कधी सांधलीच नाही. तिला त्या रात्रीचा खूप धक्का बसला होता. वेळीअवेळी ती विहिरीच्या कठड्यावर आतले पाणी न्याहाळत बसत असे. आपण एका जिवंत माणसाची हत्या केली हे विचार तिच्या मनाला कुरतडत होते. सुरी वगैरे सापडली की ती स्वतःच्या हाताना इजा करून घेई. रात्र व्हायला लागली की किंचाळत सुटे. सावण्याला मारल्याचे समाधान आणि स्वतःच्या भावाला मारल्याचा अपराधीपणा याचे काहीतरी वेगळेच रसायन तिच्या मेंदूत तयार झाले होते."

"त्या वेडातून ती कधी उभीच राहिली नाही. अशीच एका झटक्यात ती चालत चालत बुडत्या सूर्याच्या दिशेने सरळ समुद्रात आत आत गेली. विठोबाने माडावरून तिची आकृती पहिली आणि तो उतरून पळत तिला थांबवायला जाईपर्यंत ती नाहीशी झाली होती." शुभु बोलायची थांबली. समिपाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं.

"पण तिच्यामुळे दोन्ही गावातले लोक सुखी झाले. लोक खूप मानतात तीला. तो बैलगाडीवाला कोण होता माहितीये? विठोबा! नारळ पाडायला येतो तो. तो अजून स्वतःला दोष देत असतो पुळणीतून पळून गेल्याबद्दल. पण तेव्हा परिस्थितीच अशी होती की तो थांबला असता तर अजून भयंकर काहीतरी घडले असते.. नलुआजी तर तिला देवीच मानते. पण या सगळ्यात तिच्या बिचारीच्या जीवाला किती यातना झाल्या, तीच जाणे" शुभुचाही बोलताना घसा दाटून आला होता.

पुढे कुणालाच काय बोलावे सुचेना म्हणून दोघी पांघरूण ओढून झोपून गेल्या. त्याच रात्री समिपाला पुळणीचे पहिले स्वप्न पडले.

तेव्हापासून समिपा अगदी त्या काळात असल्यासारखी कल्पना करू लागली, आपण आजीच्या जागी असतो तर काय केलं असता या विचाराने तिच्या मनाला क्षणोक्षणी टोचणी लागून रहायची. आपण आजीसारख्या दिसतो म्हणजे आपणही पुळणीत जाऊन शांत बसून पाहू कदाचित मन शांत होईल वगैरे ठरवून ती पुळणीत जाऊ लागली. जेव्हा जेव्हा ती आजोबांच्या घरी जायची तेव्हा दिवसच्या दिवस पुळणीवर घालवू लागली. त्या केवड्याच्या झुडपांमध्ये जाऊन बसल्यावर मनाला एक वेगळाच थंडावा वाटत असे.

-----------------------------------------------------

"समीss अग उठss किती वेळ हाका मारतेय तुला.. संध्याकाळ झाली, डास चावायला लागतील आता. उठ, चल लवकर खाली" म्हणून आईने तिला हात धरून टेरेसवरून जवळजवळ ओढतच खाली आणले.

बाबा ऑडिटसाठी दिल्लीला गेल्यामुळे आईने समिपाचा आवडता smoked चिकन पिझ्झा ऑर्डर करून ठेवला आणि स्वतःच्या डाएटसाठी ग्रीक सॅलड बनवले होते. आवडीचे जेवण असल्यामुळे समिपा खूप दिवसांनी आईबरोबर भरपूर गप्पा मारत जेवली. डिशेस वगैरे आवरून आईला तिच्या कामाचे काही कॉल्स करायचे होते.

म्हणून तीला गुड नाईट करून समीपा स्वतःच्या खोलीत झोपायला गेली. बेडशेजारच्या खिडकीचा समुद्री निळसर रंगाचा पडदा वाऱ्याने जोरात फडफडत होता, त्याच्यावरचे बारीक बारीक शंख-शिंपल्यांचे मोटिफ चंद्रप्रकाशात चमकत होते. "ओह नो, खिडकी उघडी राहिली" ओरडत तिने पळत जाऊन खिडकीची काच सरकवली. खिडकी बंद करूनही शांततेत बाहेरच्या विंड चाईम्सचा वाऱ्यावर होणारा खळखळाट ऐकू येत होता. तिने जीन्स बदलून तिचा आवडता 'Drama Queen' लिहिलेला डिझनीचा लॉंग टीशर्ट घालून दिवे बंद केले. बटन बंद करून वळते तोच..

भिंतीवरून टुपकन एक पालीचे पिल्लू तिच्या खांद्यावर पडले. त्याच्या पायांचा गार, गिळगीळीत स्पर्श झाल्याक्षणी तिने किंचाळून हातातला मोबाईल खाली टाकला आणि त्या पालीला झटकू लागली. पाल लगेच पळून गेली पण मोबाईल घरंगळून बेडखाली गेला. परत दिवे लावून बेडसमोर झोपून खाली मोबाईल कुठे आहे बघायचा तिने प्रयत्न केला पण अंधारात काहीच दिसत नव्हते.

थंडगार फरशीवर झोपल्यामुळे अंगात शिरशिरी लहरून गेली. ती हळूहळू बेडखाली हात सरकवून मोबाईल साठी बोटांनी पुढे-पुढे चाचपडू लागली. आता कोपरापर्यंत हात आत गेला होता. अचानक कोणीतरी तिचा हात पकडला.. आणि आत खेचू लागले. समिपा जीवाच्या आकांताने ओरडत हात बाहेर खेचू लागली.. बराच वेळ खेचल्यावर अचानक ती पकड सुटली आणि हात बाहेर आला. तिने धापा टाकत हाताकडे पाहिले. मनगटावर लांबलचक नखांच्या ओरखड्यांतून रक्त ठिबकत होते आणि..
बोटांच्या टोकाला ओली वाळू बरबटली होती..

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा भाग फारच लहान झाला इतर भागापेक्षा....लिहिता उत्तम पण थोडे मोठे भाग टाका हीच विनंती पहिल्या भागापासून करत आहे....