पुळण - भाग ६

Submitted by मॅगी on 17 July, 2017 - 02:24

भाग ५

"विठोबा, आलास होय तू.. हम्म हि तुझी चाय! चार चमचे साखर घातली आहे. नाहीतर म्हणशीssल सुरेशनाना कंजूष!" आजोबा बाहेर येत म्हणाले. "आणि दारातसा उभा राहिलास? येऊन बस त्या बाकावर."

"हि बारकी कधी आली नाना? पयल्यानंच बघितली, हुबेहूब आजीस सारकी दिसते, नाssय?" विठोबा चहाची फुरकी मारून जरा तरतरीत झाला.

"बारकी आली चार दिवसांपूर्वी, सुटीत पाठवलंनी आजोबाकडे. हिते आजोबा एकटा, तिथे आईवडिलांना वेळच नाही. पण ऱ्हायल्ये मजेत!" आजोबा कौतुकाने समिपाकडे बघत म्हणाले. "चला आता कामाला सुरुवात करा, बारकी येईल नारळ मोजायला."

विठोबा उठून तरातरा बागेत निघाला, समिपाही वही पेन घेऊन त्याच्या मागे मागे बागेत पोहोचली. बाग संपताच पुढे वाळू आणि दूरवर उन्हात समुद्र चमचमत होता.

पायात सुंभ अडकवून विठोबा एखाद्या खारीसारखा माडाला चिकटून बेडुकउड्या मारत वर पोहोचला. एकामागोमाग एक नारळ पडत होते, वहीत नोंद होत होती.

पंधरा माडांचे नारळ पाडून झाल्यावर विठोबा तिच्याजवळ आला, "तुजं नाव काय ग बारके?"

"समिपा." तिने उत्तर दिलं.

"चांगला नाव हाय, तुला कुणी सांगलाय काय म्हाइत नाय पन तू एकदम तुज्या आजीसारकी दिसते. तुजी आजी नि मी एकदमच शालेत होतांव!

"हो आजोबा, मला सगळेच म्हणतात तू सेम आजीसारखी दिसतेस म्हणून" समिपा म्हणाली.

"तुज्यावाटना दोन शाळी पन पाडली, खोबरा आवडतां ना?" नारळ गोळा करून हाऱ्यात भरता भरता विठोबा म्हणाला.

होss ओरडत समिपा उड्या मारत त्याच्या मागे निघाली. विहिरीजवळ धुणं धुवायच्या धोंड्यावर बसून विठोबाने पाणी लावून दगडावर कोयता परजून लखलखीत केला. शहाळे हातात घेऊन कोयत्याचे सट सट वार करून सोलू लागला. समिपा त्याच्या हातातल्या खालीवर होणाऱ्या चमकणाऱ्या कोयत्याकडे भान विसरून पहात होती.. तोच..

विठोबाच्या पायाजवळ एक टम्म फुगलेला विंचू अचानक बाहेर आला. त्याच्या वर उचललेल्या शेपटीचा एक-एक भरीव तांबूस मणी उन्हात चमकत होता. अचानक विठोबाचे लक्ष तिकडे गेले आणि घाबरून वर उचललेल्या कोयत्याचा घाव डाव्या हातावर पडला.. सगळीकडे सांडलेले रक्त पाहून समिपा आबाsss आबाsss किंचाळून पळू लागली आणि विहिरीच्या कठड्याला धडकली.

कठड्यावर हात ठेवून दम टाकत तिच्या छातीचा भाता खालीवर होत होता. कपाळावर घाबरून घाम डवरला होता आणि हाताने पुसताना घामाचा थेंब विहिरीत पडताना त्यामागोमाग तिची नजर विहिरीत गेली.. तळाशी पडलेली एक कळशी आणि दोन तीन पितळी लोटे चमकत होते. अचानक पाण्यात कुठून तरी लाल रंग पसरू लागला.. हळूहळू सगळे पाणी लाल होऊन भोवऱ्यात फिरत बुडबुडे फुटू लागले आणि लगेच सगळे रक्ताळून लाल झालेले पाणी एखादी लाट उठावी तसे मध्यातून जोरात वर येऊ लागले आणि त्यात.. लाखो विंचू वळवळत होते.

------------------------------------------------

"समीss समीss उठ बाळा.. बरं वाटतंय का तुला" आबांचा प्रेमळ आवाज आणि डोक्यावर फिरणाऱ्या सुरकुतलेल्या हळुवार हाताची जाणीव झाल्यावर समिपाने हळूच डोळे उघडून इकडेतिकडे पाहिले..

"आबा.. ते विठोबा आजोबा.. त्यांना कोयता लागला.. रक्त.. रक्त.. खूप रक्त आलं. लवकर डॉक्टराना बोलवा" समीपा घाईघाईत बोलू लागली..

"हो बरंच लागलं बिचाऱ्याला. पण डॉक्टरांनी बँडेज बांधलं त्याच्या हाताला. खूप खोल नव्हती जखम, लवक्कर बरा होईल तो." आजोबा म्हणाले. "पण तुला चक्कर कशी आली बयो? घाबरलीस का लागलेलं बघून? आणि विहिरीजवळ कशी गेलीस?" त्यांनी पुन्हा काळजीने विचारले.

"अं.. मी.. मी घाबरून पळत सुटले तुम्हाला बोलवायला.. पण मी विहिरीकडे कडेच जात होते.. मला कोणीतरी बोलावलं.. मला नाही आठवत आता.." समिपा डोळे चोळत म्हणाली. तिच्या अंगात थोडा तापही वाटत होता.

"देवा! लक्ष ठेव रे.." पुटपुटत आजोबांनी जोरात हाक मारली, "मंगलss जरा मीठ-मोहोरी आणून पोरीची द्रीष्ट काढ गो.. मग जा जेवायला"

"हो नानानू, येतंय.. पोरगी विहिरीकडे गेली तेव्हाच घाबरली होती मी. थोडक्यात बचावली" म्हणत घाईघाईने खोचलेला ओचा सोडत मंगलने येऊन समिपाच्या तोंडासमोर मीठमोहोरी ओवाळून चुलीत फेकली आणि मोठे डोळे करत, कुजबुजत म्हणाली "बघा कसली वाईट नजर हाय, म्होरी ताडताड वाजली. आता भाएर नका सोडू तिला आजाबात. तुमचां जेवण करून ठेवलाय. मी येताय हा घरी जाऊन".. म्हणून ती जेवायला घरी गेली.

आजोबांनी समिपाला मऊभात आणि तूप कालवून जेऊ घातले पण त्यांची जेवणावरून इच्छाच उडाली होती. बळंबळंच थोडा वरणभात जेऊन ते उठले. हात धुवूून पुन्हा एकदा आंघोळ केली आणि देवघरात शिरले. तीन फूट उंचीचा काळा शिसवी देव्हारा बल्बच्या पिवळट उजेडात चमकत होता. त्यात भल्यामोठ्या ताम्हनात ठेवलेल्या स्वच्छ चांदी आणि पितळेच्या भरपूर मूर्ती प्रसन्न दिसत होत्या. सकाळी पूजा करताना वाहिलेली दारची तगर, गोकर्ण, जास्वंदीची फुले अजून टवटवीत दिसत होती.

जांभळ्या रंगाचा रेशमी कद नेसून आजोबांनी तूप घालून निरंजन पेटवले. पाटावर बसून देवांसमोर उदबत्तीचा वळसा फिरवून सगळीकडे चंदनाचा सुगंध पसरला. धीरोदात्त मुद्रेने आजोबांनी खड्या आवाजात व्यंकटेश स्तोत्राचा एकवीस पैकी पहिला पाठ सुरू केला..

"श्री गणेशाय नमः
श्री व्यंकटेशाय नमः
ओम नमो जी हेरंबा। सकळादि तू प्रारंभा।।"

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Khup chhan...pan thode mothe bhag taka please kharch khilavun thevat tumch likhan....next part lavkar upload kara