“कार" पुराण भाग-1

Submitted by भागवत on 4 June, 2017 - 09:46

मध्यमवर्गीय लोकांना एखादी वस्तु खरेदी करताना तिचे फायदे आणि तोटे स्वत: जाणून घेतल्या शिवाय करमत नाही. मला एखादी वस्तू घेताना चांगला सल्ला दिला तरी मी माझी पडताळणी करतो आणि वस्तु का चांगली यांची शहानिशा करतो. वस्तुचे विशेष गुण आणि मूल्य आपल्याला अंदाजपत्रकात बसतेय का ह्याची सुद्धा गुण पडताळणी करणे गरजेची असते. अश्या प्रकारे कधी-कधी २ वस्तु पैकी एक खरेदी करताना खुप सावळा गोंधळ उडतो. वस्तुचे एखादे गुण विशेष आपल्या गरजेचे आहे का ऐषाआरामा साठी आहे हे ठरवताना गोंधळ उडतो.

कार घेताना मी मित्रावर प्रश्नाची तोफ डागली. नवीन का जुनी गाडी? हॅचबॅक का सेदान? सरासरी का लक्झरी? मारुती, होंडा, टाटा, का हुंदाई? स्वस्त का महाग? कोणाचे परिक्षण तर कोणाचे निरीक्षण? त्यांचा अनुभव... कोणाची नामांकित संस्थेवर विश्वास... नवीन प्रकटन, उदघाटन होणार्‍या कारची उत्सुकता... कट्टावर बसल्यावर आमचे ह्याच विषयावर ऊहापोह आणि नवीन गाड्यांची मीमांसा होत राहिली. आमची चर्चा आणि विचारविनिमय ऐकून कोणाला वाटायचे आम्ही सगळे एकदाच कार खरेदी करतोय की का? पण तसे काही नसल्यामुळे काही जण नाराज झाले. भरपूर खल झाल्यावर एका मित्राने मला सांगीतले कार सोडून त्याची आवडती नवीन मूल्यवर्धित दुचाकी विकत घ्यायला. मी कारचा विचार सोडून आता त्याची समजूत कशी काढायची या विचारत मग्न झालो.

पडताळणी आणि माहिती गोळा करण्याची सुरुवात मा‍झ्या मित्रा पासून केली. त्यांना काही विचारण्या आधी मा‍झ्या मित्रांनी मला सांगीतले की कार घेण्या अगोदर तू योगा वर्गाला नाव नोंदवुन घे. कारण स्वत:ची चूक नसताना कोणीही तुमच्या गाडीला ओरखडा करून जातो. त्या वेळेस डोक्यावर बर्फ ठेवून राग आटोक्यात आणून शांत ठेवावा लागतो. न मागताच बऱ्याच जणांनी माहिती पुरविली. त्याची स्वत:ची कार कशी चांगली आहे त्याचे साग्रसंगीत वर्णन ऐकून माझे किटले होते. प्रत्येक जण आपल्या-आपल्या गाडीची तारीफ करण्यात इतके मग्न झाले की आवाजाची पातळी वाढल्यानंतर मीच काढता पाय घेतला. न जाणो शब्दाचे आणि बळाचे प्रदर्शन कुठ वर लांबले असते माहित नाही. आजवर कधी न ऐकलेले शब्द ऐकून माझी उत्सुकता जागृत झाली. मी काही गाडीच्या चाचणी फेऱ्या घेतल्या. पण मी नवीन असल्यामुळे आणि सावध वाहनचालक असल्यामुळे त्या चाचण्या मध्ये सर्व गाड्या सारख्याच वाटल्या. मग मी मा‍झ्या काही मुरब्बी आणि निष्णात वाहनचालक मित्रांना निमंत्रित केले आणि माझे डोळे उघडले. पट्टीच्या वाहनचालकांनी कडक चाचण्या घेऊन गाडीच्या विविध वैशिष्ठाचे दर्शन घडवले. त्यामुळे तज्ञ लोकांशी मैत्री कधीही कामाला येते या मा‍झ्या मतावर शिक्कामोर्तब झाले. एका मित्राने तर त्याचा करारी स्वभावाने त्याचा वाहन कंपनी सोबत दोन हात करून कार मधली समस्या दूर केली होती याचे साग्रसंगीत वर्णन त्याने मसाला चित्रपटाची कथा सांगावी असे वर्णन केले.

मा‍झ्या कडे गाडीची भरपूर माहिती गोळा झाली. कार खरेदी करायची असल्याने मी रस्त्यावर कारचे निरीक्षण करायला लागलो. थोड्या दिवसात मला कार कडे बघून मला कोणत्या कंपनीची कार आहे हे ओळखता येऊ लागले. कारची भरपूर माहिती गोळा झाल्यामुळे आता मला लहान वाहन, हॅचबॅक, सेदान, विशेष उपयुक्तता वाहन, मूल्यवर्धित हॅचबॅक, बहुआयामी उपयुक्तता वाहन, सहजपणे ओळखता येऊ लागले.

मला मित्रांनी सांगीतले की “मुलगी पाठवणी वेळेस बापाला जेवढं दु:ख होत त्यापेक्षा जास्त दु:ख गाडीवर साधा ओरखडा आला तर होत.” रागावर जर नियंत्रण ठेवायचा असेल तर योगा पेक्षा गाडी खरेदी जालीम उपाय आहे. कारण तुमची चुक नसताना दुसरे जण येऊन गाडीला खराब करतात आणि तुम्ही रागावर नियंत्रण मिळवू दुसर्‍या सोबत मांडवली करता. आणखी उद्दामपण आणि चिडचिडेपणा यावर मात करायची असेल तर कार वापरणे बंधन कारक आहे. तुमच्यात उद्दामपण असेल तर तुम्हाला तुमचा उद्दामपण जिरवायला कोणी तरी कार वाला गाडी पुढे दामटून गेलेला नक्कीच भेटेल. तुम्ही रस्त्यावर वाहतुकीला किंवा रेल्वे गेट क्रॉसिंगला थांबल्यावर चिडचिडेपणा आपोआप कमी होईल.

गाडीचा प्रतीक्षा काळ हा गर्भवती स्त्रियांचा प्रसूती काळा प्रमाणे असतो. तारीख माहित असते पण प्रतीक्षा करवत नाही. आणि प्रसूती मागे पुढे कधीही होऊ शकते. त्याप्रमाणे कारची प्रसुती वस्तूदर्शनालय मधून कधीही तुमच्या घरी होऊ शकते.

@ वित्तसंस्था
डोक्यावर एसीचा थडथड आवाज येतोय. पंखा आहे का एसी हेच कळत नाही. पहिल्या मजल्यावर बसलोय. ऑफिस भर फाइलीचे बंडल पसरलेले आहे. सकाळी-सकाळी आई ने विचारले बेटा जेवण करून जा. मी कधी नाही ते नाही म्हटले होते. आता त्याचे खुप वाईट वाटतंय. अडीच तासाच्या प्रवासा नंतर मी देशाच्या एका मोठ्या सरकारी वित्तसंस्थेच्या प्रसिद्ध शाखेच्या गुहेमध्ये प्रवेश केला. माझी फाइल समोर पडली आहे. एका खुर्चीवर बसून प्रतीक्षा करतोय. पण तेथील कर्मचार्‍याला मा‍झ्या निरागस चेहर्‍याची दया आली नाही. तो बाजूच्या बसलेल्या अधिकार्‍यांशी बोलत होता. त्याचे बढतीची “ई-टपाल” येणार होती. त्यामुळे त्याचे कामकाजात जरा कमीच लक्ष होत. "संस्थेचे राजकारण, विलीनीकरण आणि त्यातून होणार त्रास, ग्राहकाच्या समस्या आणि सेवा इत्यादी-इत्यादी" याबद्दल त्याचे बोलणे चालू होते. नाही-नाही "समोसा, जेवण, चित्रपट, बढती, संस्थेचे राजकारण, विलीनीकरण आणि त्यातून होणार त्रास, इत्यादी-इत्यादी" याबद्दल त्याचे बोलणे चालु होते. "सिस्टम स्लो है" हे त्यांचे पालुपद चालू होते. त्यात अधिकार्‍याला मैत्रिणीचा फोन आला. तो मग सुरू झाला. तो रात्रीचे जेवण किती सुग्रास होत हे रंगवून सांगत होता. तिकडे ती कल्पना करून उसासे सोडत होती. अखेर रात्रीचे भोजन एका नामांकित हॉटेल मध्ये ठरवून फोन ठेवला त्याने. मी मात्र तोंडात घास अडकल्या सारखा एकदा इकडे एकदा तिकडे बघत होतो. शेवटी माझी अवस्था बघून त्यातला एक जण जेवायला गेला. तेव्हा थोडी शांतता होती. त्याचे पालुपद एवढे डोक्यात फिट बसले की मीच दर ५ मिनिटाला "सिस्टम स्लो है" म्हणून स्वत:ला दिलासा देत होतो आणि त्याची म्हणण्याची कसर भरून काढत होतो.

वित्तसंस्थेत जाणे म्हणजे डोक्याला ताप. मला तर खूप गहिवरून आले जेव्हा एका कर्मचार्‍याने खुर्ची वरची फाइल खाली टाकून मला बसायला जागा दिली. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी एका खुर्ची बसलो. माझी फाईल आणि मी एका मेजा वरून दुसर्‍या वर आणि शेवटी तिसर्‍या वर गेलो. शेवटी ३.३० तासाच्या चित्रपटा नंतर आणि अगणित सही केल्या नंतर माझी सुटका झाली. त्या नंतर सहज मी पेपर तपासले. त्यात माझा भ्रमणध्वनी आणि पत्ता चुकला होता. मी परत माझी याचिका घेऊन मेज क्रमांक एकला गेलो. त्यांनी सांगीतले फाइल मध्ये सुधारणा करतो. आणखी तरी मला “लहान माहिती सेवा” किंवा “आंतरदेशीय” पेक्षा चित्याच्या वेगाने जाणारी “ई-टपाल” आले नाही. आत्ता वाट पाहतोय “कायअप्पा” वर. काही असुविधा असल्या तरी मी त्याचा कडे मुद्दाम जातो कारण त्याचे छुपे आकार नसतात आणि सगळे दस्तऐवज व्यवस्थित तपासणी करतात. “वेळ लागला तरी चालेल पण (एसटी)बसने जाईन” त्याप्रमाणे “वेळ लागला तरी चालेल पण त्याच वित्तसंस्थेत जाईन” हे वाक्य मनात फिट्ट बसलेले आहे.

अश्या प्रकारे कार १ जून १७ ला मारुती वस्तूदर्शनालय मधून घरी आणली.

अस्वीकृती - "कार" पुराण हा ब्लॉग हा निखळ मनोरंजना साठी लिहिलेला आहे. त्यात कोणाला दुखावण्याचा हेतु नाही.

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वित्तसंस्थेत जाण्याची फारशी गरज भासत नाही .. कार शोरूम मध्ये वित्तसंस्थेचे प्रतिनिधी असतात .. तेथेच काम होते ...

धन्यवाद अमर!!!
वित्तसंस्थेत जाण्याची फारशी गरज भासत नाही .. कार शोरूम मध्ये वित्तसंस्थेचे प्रतिनिधी असतात >> +१
मी फक्त एकदा गेलोय.

कारण स्वत:ची चूक नसताना कोणीही तुमच्या गाडीला ओरखडा करून जातो >> +१
रस्त्याच्या कडेला व्यवस्थित पार्क केलेल्या गाडीवर ओरखडे मारत जाण्यात कसं काय आनंद मिळतो कळत नाही.

रस्त्याच्या कडेला व्यवस्थित पार्क केलेल्या गाडीवर ओरखडे मारत जाण्यात कसं काय आनंद मिळतो कळत नाही. >> +१ काहींना असुरी आनंद मिळतो.
प्रतिसादा साठी धन्यवाद चैत्रगंधा!!! आपला प्रतिसाद मला उत्तम लिखाणासाठी प्रेरित करेल!!!