'अ‍ॅक्वा सेरेनिटी' केस

Submitted by हायझेनबर्ग on 8 June, 2017 - 20:43

टुरिस्ट लोकांनी कायमच ओसंडून वाहणार्‍या वर्दळीच्या गोव्यापासून पाऊण तासभर तरी लांब अरबी समुद्राच्या किनार्‍याला लागून 'अ‍ॅक्वा सेरेनिटी' दिमाखात ऊभी होती.. बिल्डिंगपासून केवळ ३० मीटर वर असलेल्या बीचवर समुद्राची गाज आणि समुद्रीपक्षांच्या आवाजाशिवाय ईतर मानवनिर्मित आवाज फार क्वचितंच ऐकायला मिळत. बिल्डिंगमधल्या बारा सूपर लक्झ्युरियस आणि अतिप्रशस्तं अपार्टमेंट मध्ये राहणारे अतिश्रीमंत रिटायरी कपल्स सोडून चार पाच मैलांच्या परिसरात दुसरा मानवी निवारा नव्हता. हा पूर्ण ८० एकरचा बीच एरिया 'गॅलॅक्सी डिवेलपर्स' नावाच्या मोठ्या कन्स्ट्रक्शन ग्रूपने विकत घेतल्याने भविष्यातही तिथे 'गॅलॅक्सी बीच सिटी' अंतर्गत 'अ‍ॅक्वा सेरेनिटी' सारख्याच अजून सूपर लक्झ्युरियस बिल्डिंग बांधण्याचा ग्रूपचा मानस होता. त्यांच्या पहिल्याच प्रोजेक्ट 'गॅलॅक्सी बीच सिटी- अ‍ॅक्वा सेरेनिटी' ला अपेक्षापेक्षा खूप जबरदस्तं प्रतिसाद मिळाला होता आणि पुढच्या बिल्डिंगची बुकिंग कधी सुरू होणार ह्याची देश विदेशातून प्रॉस्पेक्टिव क्लायंट्सकडून सातत्याने विचारणा होत होती.

तीन वर्षांपूर्वी ज्यावेळी ह्या प्रोजेक्टचे पहिले प्रपोजल/प्रेझेंटेशन 'गॅलॅक्सी डिवेलपर्स' च्या टॉप एक्झेक्युटिव्ज समोर झाले तेव्हा कंपनीचा भविष्यकाळ ह्या प्रोजेक्टमुळे किती ऊज्ज्वल असू शकतो हे ऊमगायला ग्रूप सीईओ 'राजपत गांधींना' ११ वा मिनिट देखील लागला नाही. प्रेझेंटेशन देणार्‍या ज्या व्यक्तीने आपल्या परिपूर्ण ज्ञान आणि कौशल्याच्या जोरावर पहिल्या दहा मिनिटांतच सगळ्या एक्झेक्युटिव्जना खिशात घातले होते ती असामी होती 'नरीन मिस्त्री'. आय आय एम मधली पदवी, देश विदेशातल्या कंपनीतल्या ऊच्चपदावरच्या अधिकार्‍यांबरोबर कामाचा अनुभव आणि प्रचंड मोठे प्रोफेशनल सर्कल ह्यामुळे नरीन मिस्त्रींचे नाव गॅलॅक्सी ग्रूप ला अपरिचित निश्चितंच नव्हते. मिस्त्रींनी आजवर नवीन अनएक्स्प्लोर्ड पण प्रॉमिसिंग ठिकाणी लँड अ‍ॅक्विझिशन पासून कंपन्यांचे युनिट्स सेट करण्यापर्यंतच्या कामांसाठे अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांसाठी कन्सल्टिंग केले होते, पण कधीच कुठल्या कंपनीची एम्प्लॉयमेंट मात्रं घेतली नव्हती. तसे करणे त्यांना कधीच रूचले नाही आणि जमले तर आजिबातंच नसते. 'रिअल ईस्टेट ग्रूप' ह्या 'जमाती'शी मिस्त्रींचा संबंध पहिल्यांदाच आला होता आणि हे कदाचित त्यांचे दुर्दैवच असावे.

आज वयाच्या ६५ व्या वर्षीही त्यांच्या कामाला प्रचंड डिमांड होती आणि त्यांचा ऊत्साहही २५ वर्षाच्या तरूणाला लाजवेल असा होता. एक My way or Highway असा प्रचंड हेकेखोर स्वभाव सोडला तर ५ फुट १० ईंच आणि ७५ किलो वजनाची त्यांची पर्सनॅलिटी अतिशय इंप्रेसिव आणि ईन्फ्ल्युएन्सिंग होती. मिस्त्री लाईफ लाँग रनर होते रोज सकाळी पूर्ण बीचला ते या वयातही ६० मिनिटांची फेरी मारत आणि वीकेंडलाही बर्‍याचदा अनेक ठिकाणी मॅरॅथॉन ही पळत. त्यांच्या कायम धाड्सी स्वभावाने त्यांना नेचर अ‍ॅडवेंचररही बनवले नसते तर नवलच. अफ्रिका, अ‍ॅमेझॉन आणि ऑस्ट्रेलियातली कैक जंगलात त्यांनी एकट्याने भटकंती केली होती . आपल्या अनुभवाबद्दल 'नेचर्स अ‍ॅडवेंचर्स' मासिकांत त्यांचे एक दोन लेख देखील प्रकाशित झाले होते. हौशी लोकांनाही ते अश्या मोहिमांत जीव सुखरूप कसा ठेवावा ह्याचे मार्दर्शन त्यांच्या ब्लॉग द्वारे करीत.

परंतू मागच्या सहा महिन्यांपासून गॅलॅक्सी ग्रूप खासकरून सीईओ राजपत गांधी व सीएफओ रतन पारीख आणि नरीन मिस्त्रींमध्ये शीतयुद्ध चालू होते. झाले असे होते की मिस्त्रींनी 'गॅलॅक्सी बीच सिटी' प्रोजेक्ट च्या आधी कन्सल्टिंग सोडून त्यांच्या 'आर्ट्स डीलर' बनण्याच्या लाँग टाईम पॅशनला नवा पेशा म्हणून स्वीकारले होते. 'गॅलॅक्सी बीच सिटी'ला भारताची आर्ट आणि अँटिक कॅपिटल बनवण्याचे त्यांचे भव्यदिव्य स्वप्नं होते. त्यांच्या ३५ वर्षांच्या करियर मध्ये त्यांनी अतिशय दुर्मिळ पेंटिंग्स, पुरातन कला वस्तू पासून तर अँटिक फर्निचर, नामशेष होत चाललेले पण कायदेशीर मार्गाने टॅक्सिडर्म केलेले प्राणी, जुनी शस्त्रे असे काय अन काय जमा केले होते. आपली आयुष्याची कमाई कॅपिटल मार्केट मध्ये ईनवेस्ट न करता त्यांनी अश्या आर्ट्स कलेक्शन मध्येच गुंतवली होती. आज जर त्यांनी त्यांचे कलेकशन लिक्विडेट केले असते तर गेल्या ३५ वर्षात कुठल्याही कॅपिटल मार्केटने दिला असता त्याच्या ३ ते ४ पट परतावा त्यांच्या कलेक्शन ने त्यांना मिळवून दिला असता. आपल्या कलेक्शनसाठी लागणार्‍या श्रीमंत आणि दर्दी क्लायंट्सना टॅप करण्यासाठी देशोदेशी न हिंडता 'गॅलॅक्सी बीच सिटी' च्या रुपाने असा क्लायंट बेसच तयार करण्याचा मास्टर प्लान त्यांनी गॅलॅक्सी ग्रूपला हाताशी धरून अंमलात आणण्याचा घाट घातला होता. शेवटी मिस्त्री हे एक प्रचंड हुषार आणि महत्वाकांक्षी रसायन होते आणि अश्या मोठ्या गोष्टी घडवून आणाण्याचा पेशंस आणि अनुभव त्यांनी पूर्ण ऊमेद खर्चून कमावला होताच.

तर गांधी-पारीख आणि मिस्त्री मधल्या शीतयुद्धाचे कारण होते 'गॅलॅक्सी बीच सिटी' मधली 'अ‍ॅक्वा सेरेनिटीला' लागून असलेली ३ एकर जागा. ह्या जागेवर 'गॅलॅक्सी ग्रूप' मिस्त्रींची कन्सल्टिंग फी म्हणून तीन वर्षापूर्वी झालेल्या करारानुसार मिस्त्रींना एक तीन मजली आर्ट गॅलरी बांधून देण्यास बांधील होता आणि त्यासोबतच सहा मजल्यांच्या 'अ‍ॅक्वा सेरेनेटी' मधल्या टॉप फ्लोअरवरच्या दोन पैकी एक सी फेसिंग फ्लॅट '६०२' देण्यासाठी सुद्धा. परंतू 'अ‍ॅक्वा सेरेनेटी' च्या जबरदस्तं यशानंतर आणि पुढच्या स्कीमसाठी अपेक्षेपेक्षाही कितीतरी जास्तं किंमत मोजण्यास तयार असणार्‍या क्लायंटस मुळे गांधी-पारीखना आर्ट गॅलरीची मोक्याची जागा मिस्त्रींना देण्यास प्रचंड जिवावर आले होते. ते आता मिस्त्रींना सेरेनिटीपासून लांब गॅलॅक्सी बीच सिटीची एका कोपर्‍यातली जागा घेण्यास मनधरणी करत होते. गांधी-पारीखांची ऊफाळलेली लालसा आणि मिस्त्रींचा प्रचंड हेकेखोर स्वभाव ह्यामुळे ही मनधरणी, मनभेद आणि अविश्वासापर्यंत पोचायला महिनाभरही लागला नाही. ठरलेल्या जागेवर आर्ट गॅलरीचे काम सुरू करण्यास मुद्दाम केला जाणारा ऊशीर आणि जागेबाबत कुठलीही तडजोड न स्वीकारण्याचा हेका त्यामुळे मिस्त्रींनी गांधींना कोर्टात खेचण्याची आणि पूर्ण बीच सिटीवरच स्टे आणण्याची धमकी दिली तेव्हा गांधी, पारीखांचे धाबे जोरदार दणाणले. आपली मोक्याची जागा वाचवण्याचा शेवटचा 'दाम-भेद' ऊपाय म्हणून गांधी-पारीखांनी मिस्त्रीं च्या आर्ट्स कलेक्शनचे कस्टोडियन आणि मॅनेजर कुणाल भरूचांना मिस्त्रींचे मन वळवण्यासाठी चार कोटी रुपयांची लाच क्लॉबॅक क्लॉजसहित दिली (क्लॉबॅक म्हणजे जर भरूचा मिस्त्रींचे मन वळवण्यात अपयशी ठरले तर चार कोटी रुपये त्यांना गांधींना परत करावे लागतील). हा ही ऊपाय न चालल्यास मिस्त्रींवर 'दंड' ऊपाय करून त्यांना 'कायमचे' हटवण्याचीही गांधी-पारीखांची तयारी होतीच.

पण मिस्त्रींना कुठूनतरी भरूचांनी चार कोटी रुपये लाच स्वीकारल्याची बातमी कळालीच. त्यांनी लगोलग भरूच्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या ईतर क्लायंट समोरच विश्वासघात केल्याचा आरोप ठेवत त्यांना मानहानीकारक बोल लावले. भरूच्यांच्या जागी लवकरच दुसरा कस्टोडियन नेमणार अशी धमकीही दिली. भरूचांबरोबर तीन महिन्यांत एक्स्पायर होणारे काँट्रॅक्ट रिन्यू न करता मिस्त्रींनी त्यांच्या कलेक्शनमधले काही छोटे मोठे आर्टिफॅक्ट्स आपल्या अ‍ॅक्वा सेरेनिटी मधल्या प्रशस्तं फ्लॅट मध्ये ट्र्रान्सपोर्ट करण्यास सुरूवात केली. (असे करण्यामागे आर्ट गॅलरीला लागत असलेल्या ऊशीरा मुळे क्लायंट्सना घरीच बोलावून आपले कलेक्शन दाखवण्याचाही त्यांचा अंतर्गत हेतू होता) भरूचा मिस्त्रींच्या कलेक्शनच्या सेफ किपिंगसाठी कायदेशीर रित्या बांधील होते त्यामुळे मिस्त्रींना अजून तीन महिने काही चिंता नव्हती पण भरूचांवर अजून विश्वास ठेवण्याचीही मिस्त्रींची ईच्छा नव्हती.
मिस्त्री १५ वर्षांची मैत्री आणि संबंध अश्या अपमानकारक रित्या तोडून गेल्याचा भरूचांना प्रचंड राग आला. मिस्त्रींच्या आरोपानंतर समोर बसलेले क्लायंट्स ऊठून गेल्याने मिस्त्रींमुळे आपले आता कमीत कमी ८-१२ कोटींचे नुकसान होणार समजल्याने त्यांनी मनोमन मिस्त्रींचा बदला घेण्याचा चंगच बांधला. गांधी-पारीख बरोबर मिस्त्रींच्या जीवावर ऊठलेल्या लोकांच्या यादीमध्ये भरूचांचेही नाव अ‍ॅड झाले.

पण ही यादी ईथेच संपत नाही.

डिमांड्मध्ये असलेले कंन्सल्टींगचे करियर सोडून तीन वर्षांपूर्वी गोव्यातच सेटल होण्याचे मिस्त्रींनी ठरवले त्याला कारण होते त्यांची एकुलती एक मुलगी 'पेरिजाद' आणि तिचा अडीच वर्षांचा मुलगा 'दानिश'. जगातल्या सर्व सुखसोयींनी युक्त कॉलेज/हॉस्टेल्स मध्ये का वाढली असेना पण लहानपणापासूनच वडिलांपासून लांब आणि आईविना वाढलेल्या पेरिजाद ने जेव्हा 'कैझाद दोर्दीशी' लग्नं करायचे ठरवले तेव्हा देशाबाहेर असलेल्या मिस्त्रींना तिने केवळ औपचारिकता म्हणूनच दोन दिवस आधी लग्नाची तारीख कळवली. आपल्या बिझी आयुष्याने आपल्या मुलीला आपल्यापासून किती लांब लोटले ह्याची जाणीव मिस्त्रींना झाली आणि आयुष्यात कधीही तडकाफडकी निर्णय न घेणारे मिस्त्री हातातले काम सोडून लगोलग गोव्यात दाखल झाले. कौटुंबिक सुखासाठी आसुसलेली मलूल चेहर्‍याची पेरिजाद पाहून त्यांच्या जीवाची कोण घालमेल झाली. त्यांनी पेरिजादकडे तिच्या नातं जपण्यात अपयशी ठरलेल्या बापाला माफ करण्यासाठी हात पसरले. पेरिजादनेही मोठ्या मनाने त्यांना माफ केले आणि मिस्त्रींनी आनंदाने गोव्याला आपले घर बनवले. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. कैझादच्या अल्कोहोलिक, बाहेरख्याली आणि वायोलंट वागण्याला कंटाळून आयुष्यात कायम प्रेमाची वानवाच नशिबी आलेल्या पेरिजाद ने दानिश च्या जन्मानंतर दीड वर्षांतच मिस्त्रींना पत्रं पाठवून दानिशची काळजी घेण्याची श्यपथ घालून आपली जीवनयात्रा संपवली. खचलेल्या मिस्त्रींनी पेरिजाद बाबत झालेल्या चुकीचं प्रायश्चित्तं म्हणून दानिशची कस्टडी मिळवून कैझादला पेरीजादच्या आत्महत्येसाठी दोषी ठरवून कायदेशीर शिक्षा करण्याचं ठरवलं. हॉटेलिंगच्या मोठा बिझनेस असलेली कैझादची फॅमिलीही पैसा आणि काँटॅक्ट्सच्या बाबतीत कमी नसल्याने दानिशची लीगल कस्टडी मिळावण्यात मिस्त्रींना खूपच कष्टाची कायदेशीर लढाई करावी लागली. पण आयुष्यात आजवर कधीच हार न मानलेले मिस्त्री ही लढाईदेखील मागच्याच आठवड्यात जिंकले. कैझादला शिक्षा झाली नाही पण आठवड्याभरात दानिशचा ताबा मिस्त्रींकडे देण्याचे अपील कोर्टाने मंजूर केले. पुढच्या आठवड्यात दानिशला घरी घेवून येणार ह्या आनंदात मिस्त्रींनी आजिबात वेळ न दवडता अ‍ॅक्वा सेरेनिटी मधली एक बेडरूम दानिशसाठी तयार करण्याचे काँट्रॅक्ट पेरिजादची जवळची मैत्रिण 'अलमिरा ईराणी' च्या फर्निचर आणि डेकॉरला दिले.

आणि तशातच ३१ डिसेंबरची ती रात्रं ऊजाडली. अ‍ॅक्वा सेरेनिटीच्या बीचवर ३१ डिसेंबरचे फायरवर्क सेलिब्रेशन करून रात्री १ च्या ठोक्याला परतणार्‍या सेरेनिटीच्या रिटायरी कपल्सना कॅक्टस बेडमध्ये मिस्त्रींचा मृतदेह दिसला आणि त्यांच्या किंकाळ्या ऐकून फ्रंट एंट्र्रन्सवरचे दोन्ही गार्ड्स धावतपळत बॅक एंट्र्न्सला आले.

पोलिस फायलीतल्या काही नोंदी.

पोस्टमॉर्टेम / मेडिकल रिपोर्ट
-मृत्यू ३१ डिसेंबर रात्री ११:३० ते १२:०० च्या दरम्यान झाला असावा. विक्टिमच्या हातातले घड्याळ रात्री ११:४० ला बंद पडले.
-ऊंचावरून फोर्स ने पडतांना नेमके डोके कॅक्टस बेडच्या (निवडुंगाचे ताटवे) कॉक्रीट बॉर्डरवर आपटून स्कल ब्रेक झाले.
-अंगाखाली कॅक्टस बेड असल्याने शरीरात शेकडो ठिकाणी कॅक्टसचे काटे घुसले.
-डोके आपटले नसते तर डेन्स कॅक्टस बेड मुळे कदाचित प्राण वाचू शकले असते.
-पडण्यापूर्वी विक्टिमला सफोकेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता,
-कॅक्टसच्या काट्यांबरोबरच काचांमुळे झालेल्या जखमा आणि काचांचे बारीक तुकडेही शरीरात व चेहर्‍यावर घुसल्याचे मिळाले
-पोटात थोडेफार पचलेले अन्न, वाईन आणि काही माईल्ड स्लीप मेडिकेशन मिळाले. विक्टिम हे मेडिकेशन बराच काळापासून घेत असावा.
-जखमा आणि फ्रॅक्चर्स ऊंचावरून पडतांनाशी कन्सिस्टंट आहे.
- सापडलेल्या बाटलीतील २९ गोळ्या जेन्यूईन स्लीप मेडिकेशन आहे.
-कॉज ऑफ डेथ - आत्महत्या किंवा खून नक्की अनुमान लावणे कठीण आहे.

टाईमलाईन
----------------
३१ डिसेंबर
-दुपारी ४:१० - नरीन मिस्त्री एलेवेटरने फ्लॅट मध्ये दाखल
-दुपारी ४:२१ - दोन कार्गो सर्विस एम्प्लॉईजची मिस्त्रींच्या घरात १२ बॉक्सेस पैकी पहिल्या बॉक्सची डिलीवरी
-दुपारी ४:५७ - कार्गो सर्विस एम्प्लॉईजची मिस्त्रींच्या घरात १२ बॉक्सेस पैकी शेवटच्या बॉक्सची डिलीवरी
-संध्या ५:२० - दोन कार्गो सर्विस एम्प्लॉईजची मिस्त्रींच्या घरात रूम फर्निचर आणि डेकॉर बॉक्सेसची पहिली डिलिवरी
-संध्या ६:५१ - कार्गो सर्विस एम्प्लॉईजची मिस्त्रींच्या घरात रूम फर्निचर आणि डेकॉर बॉक्सेसची शेवटची डिलिवरी
-रात्री ९:४० - नरीन मिस्त्रींची अ‍ॅक्वा सेरेनिटीच्या 'बीच न्यू ईयर सेलिब्रेशन' पार्टीत जाण्यासाठी एलेवेटरने एक्झिट
-रात्र १०:०१ - एक मध्यम चणीची हुडेड व्यक्ती(काळी जीन्स पँट , काळा हुडेड स्वेट शर्ट, हातात बॅग) जिन्यातून सहाव्या मजल्यावर दाखल आणि फ्लॅट नं ६०१ चा दरवाजा ऊघडून आत गेली.
-रात्री १०:३४ - नरीन मिस्त्रींची अ‍ॅक्वा सेरेनिटीच्या 'बीच न्यू ईयर सेलिब्रेशन पार्टी'तून एलेवेटरने फ्लॅट मध्ये एंट्री
-रात्री १०:४० - तीच हुडेड व्यक्ती फ्लॅट नं ६०१ चा दरवाजा ऊघडून बाहेर आली आणि जिन्यावाटे अतिशय घाईघाईने निघून गेली. पाठीवर एक बॅग.
-रात्री ११:५५ एक ऊंच, अंगापिंडाने मजबूत आणि रुबाबदार व्यक्ती (ऊंची पार्टी सुट, हातमोजे, चेहरा आजिबात दिसणार नाही अशी टोपी) जिन्यातून सहाव्या मजल्यावर दाखल आणि फ्लॅट नं ६०१ चा दरवाजा ऊघडून आत गेली.

१ जानेवारी (३१ डिसेंबरचीच रात्रं पुढे चालू पण तारीख बदलली)
-रात्री १२:०४ तीच ऊंची पार्टी सुट घातलेली व्यक्ती ६०१ चा दरवाजा ऊघडून बाहेर आली आणि शांतपणे जिन्यावाटे निघून गेली.
-रात्री १:०४ सेरेनिटीचे दोन सिक्यूरिटी गार्डस एलेवेटरने फ्लॅट नंबर ६०१ च्या दरवाज्यासमोर दाखल
-रात्री १:१० सेरेनिटीमधील बर्‍याच राहिवाशांची सहाव्या मजल्यावर गर्दी
-रात्री १:१८ गार्डसने मास्टर की ने पोलिसांसमोर दरवाजा ऊघडून पोलिसांचा फ्लॅट मध्ये प्रवेश.
-रात्री १:२५ आत येवू पाहणार्‍या गर्दीला पोलिसांनी ६ व्या मजल्यावरून खाली हुसकावले.

प्रासंगिक माहिती
क्राईम सीन
-मिस्त्रींच्या ६०२ नंबरच्या सी-फेसिंग फ्लॅटची सी-साईड बेडरूमची भिंत जमिनी पासून ८ फूट ऊंच आण १५ फूट रूंद अश्या स्टँडर्ड जाडीच्या काचेची बनलेली आहे.
-मिस्त्रींनी काचा बंद असतांनाच खाली ऊडी मारली वा त्यांना बाहेर फेकले गेले.
-बेड अस्ताव्यस्त अवस्थेत. बेडवर स्ट्रगल झाल्याचे दिसून येते.
-बेडरूमला लागून असलेल्या टेरेसचा दरवाजा आतून (बेडरूममधून) बंद होता.
-बेडच्या डोक्याकडच्या भिंतीत (जी फ्लॅट नं ६०१ ला कॉमन वॉल आहे) एक आरपार बुलेट होल मिळाले , आणि तीन २८ mm कॅलिबरच्या गोळ्या
जिथे साधारणतः झोपले असतांना मिस्त्रींची छाती असली असती तिथे मॅट्रेस मध्ये अडकलेल्या मिळाल्या
-फ्लॅट नं ६०१ मध्ये बुलेट होल असलेल्या कॉमन वॉल वर भिंतीवर गन पावडर रेसेड्यू
-साईड टेबलवर कमी पावरचे (माईल्ड) स्लीप मेडिकेशन सापडले. ३० पैकी २९ गोळ्या बाटलीमध्ये आहेत.
- चष्मा, पुस्तंक, वाईन चा रिकामा ग्लास आणि अजूनही चालू असलेला नाईट लँप खाली जमिनीवर पडलेले होते
-किचन सिंक खालच्या कॅबिनेटला भिंतितून आरपार केलेले ३५० मिमि चे होल सापडले जे बाजूच्या रिकाम्या फ्लॅट नं ६०१ च्या किचन सिंक खालच्या कॅबिनेट मध्ये ऊघडते. भिंतीचा कट केलेला पीस बाजूच्या फ्लॅट मध्ये सापडला. एखादा अ‍ॅथलेटिक मनुष्य ह्या होल मधून जाऊ शकतो.

फ्लॅट नं ६०१
- सहाव्या मजल्यावर जिन्याचा दरवाजा बरोबर फ्लॅट नं ६०१ च्या दरवाज्यासमोरच आहे.
- महिन्यापूर्वीच ग्राहकाने खरेदी रद्द केल्याने फ्लॅट नं ६०१ अजूनही विकला नव्हता. पझेशन देण्याची डेड लाईन नसल्याने त्याचे ईंटेरियर डेकोरशन व रंगरंगोटीचे काम अजूनही अतिशय संथगतीने चालू होते. फ्लॅटमध्ये ठिकठिकाणी सामान विखुरलेले होते.
- ह्या फ्लॅट साठी क्लायंट मिळवण्याचे काँट्रॅक्ट मिळालेली रिअल ईस्टेट एजंसी 'फॉन्सेका प्रॉपर्टीज' वीकेंडला फ्लॅट चे 'ओपन हाऊस' शोईंग्ज करते. ह्या शोईंग्ज मध्ये अ‍ॅक्वा सेरेनिटी बिल्डींग चा टूर ही समाविष्टं असतो. अपॉईंटमेंट घेवून फ्लॅट बघायला येणार्‍यांच्या आयडेंटिटीच्या प्रतीची कॉपी करू ठेवली जात असली तरी क्लायंटला नाराज होऊ नये ह्या हेतूने बर्‍याच वेळा आयडी प्रुफ आणायला विसरलेल्यां क्लायंट्सनाही फ्लॅट आणि बिल्डिंग दाखवल्याचे फॉन्सेका च्या सेल्स एजंट्सनी मान्य केले आहे.

अ‍ॅक्वा सेरेनिटी बिल्डिंग
-फ्रंट एंट्र्न्स ने बिल्डिंग मध्ये प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती कॅमेरामध्ये कैद होते आणि २४ तास हजर असलेले सिक्युरिटी गार्डस ती व्यक्ती राहिवासी नसल्यास, राहिवाश्यांनी खाली येवून त्यांना एस्कॉर्ट करेपर्यंत लॉबीमध्येच बसवून ठेवतात.
-एलिवेटर्स, फ्लॅटचा एंट्रन्स आणि कॉरिडोर कॅमेराने ईक्विप्ड आहेत आणि कॅमेरात कॅप्चर न होता फ्लॅट मध्ये जाणे अशक्य आहे.
-बिल्डिंगला एक जिना असून तो प्रत्येक मजल्यावर ऊघडतो, पण जिन्यामध्ये कुठलाही कॅमेरा नाही

मिस्त्रींचे घर
- बिल्डिंगच्या आऊटर भिंती काँक्रीटच्या पण आतल्या वुडन आहेत. फ्लोअर ही वुडन आहे.
-मिस्त्रींचे आर्ट आणि अँटिक गोष्टींसाठीचे प्रेम घरात ठिकठिकाणी दिसत होते. एखाद्या अतिशय कलात्मकतेने सजवलेल्या आर्ट म्युझियम पेक्षा फार वेगळं नसावं त्यांचं घर. भिंतीवर ठिकठिकाणी मोठमोठ्या तस्वीरी, नाना प्रकारचे फर्निचर/अलमार्‍या, देशविदेशातल्या भिन्न रंगारुपाच्या आणि कालखंडातल्या वाटाव्यात अश्या कलाकुसरीच्या वस्तू, राजघराण्यातली वाटावी अशी झुंबरं, फुलदाण्या, शोभेची श्स्त्रास्त्रं असे बरेच काही.
-पूर्ण घरभर अँटिक आणि आर्ट्स सामानाचे छोटे मोठे अकूण १२ लाकडी बॉक्सेस ठेवलेले आहेत. सर्वात मोठा बॉक्स ६ x ८ x २ आणि सर्वात लहान बॉक्स बॉक्स ३ x ३ x २ फूट डायमेन्शन्सचा आहे.
-अँटिक आणि आर्ट्स पीसेसचे सगळे १२ बॉक्सेस ऊघडलेले आहेत. त्यातल्या लहान ३ x ३ x २ च्या बॉक्समधली मधली वस्तू गायब आहे.
- बॉक्स मधल्या वस्तू वगळता घरातल्या ईतर वस्तू केवळ शोभेच्या असाव्यात आणि त्यांना काही अँटिक वॅल्यू नसावी असे प्रथमदर्शनी वाटते.
-एका बेडरूममध्ये लहान मुलाच्या फर्निचर आणि डेकॉरच्या सामानाचे मोठे बॉक्सेस. बॉक्सेस ऊघडले असता आत काही आक्षेपार्ह सापडले नाही.
-लहान मुलांच्या 'कार्स' सिनेमावर आधारीत बेडरूम सेट अर्धवट लावून सोडून देण्यात आला आहे तो पूर्ण करण्यासाठी लागणारी ५ x ४ x ४ ची कार फ्रेम मागे ठेवलेल्या बेडरूम सेटच्या रिकाम्या मोठ्या बॉक्स मध्ये मिळाली नाही
-'ती' कार फ्रेम आमच्या शोरूम मध्ये फ्रंटला लावलेली असल्याने गोडाऊनमधून डिलिवरी नेणारे बॉईज ती नेण्यास विसरून गेले असा जबाब अलमीरा ईराणींनी दिला. डिलिवरी बॉईजनी ती फ्रेम दुसर्‍यादिवशी आणून लावण्याची हमी मिस्त्रींना दिली होती. डिलिवरी बॉईजनेही असेच झाले असल्याचे सांगितले.
-मिस्त्री आणि सेरेनिटी मधल्या ईतर कुठल्याही राहिवाश्याचा कोणत्याही प्रकारचा कधी संबंध आल्याचे पुरावे मिळाले नाहीत. सर्व जण त्यांना एक दर्दी आर्ट डीलर म्हणूनच चेहेर्‍याने ओळखत होता.

३१ डिसेंबरची बीच पार्टी
-३१ डिसेंबरला गॅलॅक्सी ग्रूप-सेरेनिटीने मोठी बीच पार्टी आयोजित केली असल्याने ६०१ चे क्लायंट शोईंग करण्यास फॉन्सेकाला मनाई करण्यात आली होती.
-बिल्डिंगमधील राहिवासी आणि त्यांच्या पाहुण्यांना बिल्डिंगला वळसा घालून बीच पार्टीला जावे लागू नये म्हणून त्यांच्या सोयीसाठी बिल्डिंगच्या बॅक साईडला (जी बीच सईड आहे) ऊघडणारे जिन्याचे दार (जे ईतरवेळी कायम बंद असते आणि ऊघडल्यास अलार्म वाजतो) रात्री ९ वाजल्यापासूनच अलार्म डिझेबल करून ऊघडेच ठेवण्यात आले होते.
-३१ डिसेंबर रात्री ९ पूर्वी बिल्डिंगचे बॅक डोर महिन्याभरात आजिबात ऊघडले गेले नव्हते.
-बॅक डोर मधून आत येणारा वा जाणारा कॅमेरामध्ये कैद होतो पण ३१ डिसेंबरच्या रात्री कैक सेरेनिटीचे राहिवासी आणि त्यांचे विजिटर्स अनेक वेळा घोळक्याने आत व बाहेर करत असल्याने त्यातून नेमकी संशयित व्यक्ती शोधणे अशक्य आहे.
-बीच पार्टीला सेरेनिटीच्या सध्याच्या राहिवाशांबरोबरच त्यांच्याकडच्या पाहुण्यांची आणि अनेक प्रॉस्पेक्टिव क्लायंटसची ऊपस्थिती होती.
-गॅलॅक्सी ग्रूपने आयोजित केलेल्या या बीच पार्टीचे ईवेंट मॅनेजमेंट गोव्यातल्या नावाजलेल्या आणि अतिशय महागड्या 'मूनलाईट असोसिएट्सला' देण्यात आले होते.
-मिस्त्रींच्या बीच फेसिंग फ्लॅट मधून पार्टीची जागा, बीचकडून बिल्डिंगकडे येणारी ४० मीटरची पायवाट आणि चालणारी व्यक्ती स्पष्टं दिसते.

खबरींकडून कळालेली माहिती
-अलमीरा ईराणीच्या 'फर्निचर & डेकॉर स्टोर' मध्ये आणि खाजगी आयुष्यातही 'कैझाद दोर्दी' सिक्रेट स्लीपींग पार्टनर आहे अशी वदंता आहे.
-मुलाची कस्टडी गेल्याने कैझाद दोर्दी मिस्त्रींवर फार खवळलेला आहे. त्याच्या फॅमिलीचे त्यांच्या हॉटेल बिझनेसच्या माध्यमातून गुन्हेगारी वर्तुळात काँटॅक्ट्स असण्याची खूप शक्यता आहे.

**************************************************

कसा झाला असेल नरीन मिस्त्रींचा करूण अंत? काही घातपात असण्याचा संभव आहे की त्यांनी अचानक अशी खिडकीतून ऊडी मारून आत्महत्या केली? मॅट्रेस मध्ये गोळ्या कुठून आल्या? मिस्त्रींची आत्महत्या नसून खून असेल तर कोणी केला आणि कसा?

घटना सोडून वरती मिस्त्रींबद्दल मी जी लांबड लावली आहे ती फक्तं मिस्त्री आणि त्यांचे 'हितचिंतक' Wink एक व्यक्ती म्हणून कसे आहेत हे सांगण्यासाठीच. एकदा एकेकाचे कॅरिकेचर समजले की ती माहिती पुन्हा पुन्हा वाचण्याची गरज पडू नये. घटनाक्रम आणि ईतर डीटेल्स
वर्क-आऊट करूनच खुनी ( जर हा खूनच आहे असा तुमचा विश्वास असल्यास) आणि त्यांची पद्धत समजू शकते. मान्य आहे माहिती खूप दिली आहे पण ऊलट त्याचा ऊपयोग अ‍ॅम्बिग्विटी टाळून स्ट्रीमलाईन्ड थिंकिंगसाठीच होईल असे वाटते.

*बीच पार्टी म्हणजे केवळ बीचवर झालेले ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन अपेक्षित आहे. बिकिनी,रेव वगैरे तसले काही नाही. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणजे ज्याने खून प्लॅन केला त्याने रस्ता बनवण्यासाठी चोरी प्लॅन केली
(वरती कोणीतरी म्हणालाय हे)
हुडोबा ने खाली जाऊन सुटोबा ला सांगितले असेल की ते झोपलेत, म्हणून याने न बघता 3 गोळ्या चालवल्या, पण तेव्हा नेमके मिस्त्री पलंगावर नव्हते म्हणून बचावले.
ते मेलेत का बघायला सुटोबा 602 मध्ये गेला तेव्हा ते जागेच दिसले मग झटापट आणि खून किंवा बचावासाठी त्यांची उडी >>>>
नाही नाही .. एका माण्साच्या कामाला दोन जणांना जुंपण्यासारखे झाले हे. जर ऑलरेडी घरात एंट्री मिळवली आहे आणि मिस्त्री बाहेरून आत येणार आहे तर शूट तर हुडोबालाही करता येईल आणि नंतर आरामात चोरी सुद्धा... त्यात सुटोबाला आणण्याचे काहीच कारण नाहीये
हुडोबा आणि सुटोबा मध्ये कनेक्शन जोडायला मला तरी काही सॉलिड कारण दिसत नाहीये.
हुडोबा ने होल केले असेल आणि सुटोबाला सांगितले असेल तर भिंतितून गोळ्या मारण्याचे काय कारण... सरळ आत घुसूनच शूट केले असते ना?

भरूचाचं कारस्थान आणि त्याने फॉनसिकाकडनं चावी मिळवली हे तर मी पण म्हणतेय.

मुळात पेरिझाद आणि कैझादची ओळख करून देण्यातही भरूचाचा हात असावा. तो नातलग असेल कैझादचा

फॉनसिकाकडनं चावी मिळवली हे तर मी पण म्हणतेय. >> कोणीतरी फॉनसेका कडून चावी मिळवली हे नक्की. ६०१ फ्लॅटचे शोईंग्ज, आयडी प्रुफ नीट न तपासणं, बिल्डिंङ टूर आणि बिल्डिंगची डिटेल माहिती मिळवून कोणी तरी प्लान केला हेही नक्की.

मुळात पेरिझाद आणि कैझादची ओळख करून देण्यातही भरूचाचा हात असावा. >> तसे असते तर खबरींच्या माहिती मध्ये आले असते. जसे कैझाद आणि अलमीरा बद्दल कळाले. त्या ४ कोटींच्या प्रकरणानंतर भरूचा बिथरले अन्यथ ते मिस्त्रींचे मित्रंच होते हे स्पष्टं आले आहे वर.

हाब, गेल्या पानावर माझी शेवटची तीन पोस्ट्स आहेत, त्यात रायगडचा तर्क पुढे चालवून ते कसे मेले आणि त्यांना नंतर मारायची गरज का होती ते लिहिलंय

हुडी - फक्त चोरी हा उद्देश
धिप्पाड - professional assasin, पार्टी कपडे म्हणजे बीच पार्टीत वेगळे दिसायला नको म्हणून. याने फक्त गोळ्या झाडल्या पण मिस्त्री आधीच मेलेले होते, खाली पडलेले होते.
खून तिसर्‍या व्यक्तीने केलेला आहे जी तिथे उपस्थित होती. ती कशी आणि नंतर कशी गायब झाली हे उमगलं की case solved!

खून हुडी आणि धिप्पाड दोघांनीही केलेला नाही. >> बरोब्बर चीकू . पण तुम्हाला कारण सांगावं लागेल. बाकीच्यांनाही तो ट्रॅक समजायला हवा. खरेतर अमितने हे आधीच डीड्यूस केले होते पण बहुधा त्याने क्लीअरली लिहिले नाही.
त्याचा आणि रायगडचा प्रतिसाद दुर्लक्षित करू नका.

ती अजेंसीं होऊस टूर अरेंज करते
ती कलायन्ट ला किल्ली देत नाही,
तेव्हा शाह पारेख कडे असणारी किल्ली वापरली गेली असेल

हाब, गेल्या पानावर माझी शेवटची तीन पोस्ट्स आहेत, त्यात रायगडचा तर्क पुढे चालवून ते कसे मेले आणि त्यांना नंतर मारायची गरज का होती ते लिहिलंय >>> त्या पोस्ट देणार का ईथे श्रद्धा पुन्हा प्लीज.... त्या नेमक्या हुडकणं मला अवघड जाईल

हुडी - फक्त चोरी हा उद्देश
धिप्पाड - professional assasin, पार्टी कपडे म्हणजे बीच पार्टीत वेगळे दिसायला नको म्हणून. याने फक्त गोळ्या झाडल्या पण मिस्त्री आधीच मेलेले होते, खाली पडलेले होते.
खून तिसर्‍या व्यक्तीने केलेला आहे जी तिथे उपस्थित होती. ती कशी आणि नंतर कशी गायब झाली हे उमगलं की case solved! >>>> यू गॉट ईट.

हुडी आणि धिप्पाड दोघंही खुनी नसतील तर तिसरी व्यक्ती त्या पोराच्या बेडरूममधल्या कपाटात होती का?

ज्या कंपनीने इव्हेन्ट आयोजित केला त्यांचे आणि कैझादचे नक्कीच कॉन्टॅक्ट असणार. त्याद्वारे इव्हेंटमध्ये काम करणाऱ्या लोकांचा युनिफॉर्म घालून खुनी आला. हा फ्लॅट टॉप फ्लोअर आहे. त्याची आणि मिस्त्रीची झटापट झाली व स्वतःला वाचव्हायला उडी मारून मिस्त्री मेल्यावर मे बी खुनी टेरेसवर चढला असेल. मग जिन्याने राजरोस खाली निघून गेला. इव्हेन्टमध्ये युनिफॉर्ममधले अनेक कर्मचारी असताना एखादा काही काळ मिसिंग असल्याचे लक्षात येणार नाही.

मिस्त्रींनी कदाचित धिप्पाडला मागल्या दारानी बिल्डिंगमधे शिरताना पाहिलं असावं.
कदाचित त्यांना काहितरी संशयास्पद जाणवलं असावं म्हणून ते खाली उडी मारायच्या तयारीत थांबले असावेत.
६०१ मधून गोळी आल्याचं कळताच त्यांनी उडी मारली असावी, पण ती चुकली नी त्यांचा अंत झाला असावा.

बिल्डिंगला अ‍ॅक्सेसिबल टेरेस असते तर ऊल्लेख आला असता.
इव्हेन्टमध्ये युनिफॉर्ममधले अनेक कर्मचारी असताना एखादा काही काळ मिसिंग असल्याचे लक्षात येणार नाही.>> मला हे मिस्त्री पार्टीमध्ये आल्याबरोबर वर आलेल्या चोराला चपखल लागु पडेल असे वाटते.
कपाटामध्ये असता तर गेला कसा?

मग ते पटकन एलेव्हेटरने खाली निघून गेले नसते का? स्वतःचा जीव वाचवायला. नाहीतरी धिप्पाडला जिन्याने यायला वेळ लागणारच होता

खुनी व्यक्ती त्या कारच्या box मधून येऊ शकते. अलमिराने मुद्दामूनच ती फ्रेम दुकानात लावली. डिलीव्हरी बॉय फक्त डिलीव्हरी करून निघून गेले. मिस्त्रींनी सेट लावला का? मग तो box त्यांनी तसाच ठेवला की तो उघडायला गेले असता खुनी व्यक्ती बाहेर आली? पण मग तेव्हाच खून का नाही केला? का मिस्त्री बाहेर गेल्यावरच ती व्यक्ती बाहेर तयारीत राहिली? ते परत आल्यावर झोपल्यावर गळा आवळून खून करायचा बेत होता. पण मिस्त्री वाचत बसले होते. खुनी व्यक्ती ला लवकरात लवकर आटपायचं होतं म्हणून शेवटी मिस्त्रींवर हल्ला केला. पण त्यांनी झटापट केली, त्यात घड्याळ बंद पडले, शेवटी त्यांनी बाहेर उडी घेतली, cactus bed खाली आहेत हे माहिती होतं, जीव वाचवण्याचा तो उपाय होता पण दुर्दैवाने ते मरण पावले. खुनी व्यक्ती फुटलेल्या काचेतून पसार होउ शकते, दोर वगैरे आणलेला असू शकतो

आलेल्या अँटिक वस्तूंमध्ये सगळ्यात मोठ्या खोक्यात ग्रँडफादर क्लॉक होते का एखादे, ज्याच्या पोकळीत माणूस लपू शकतो? अलमीराच असेल, कारण नावच almirah. Happy

चीकु नाही. डिलिवरी बॉईज बेड ईन्स्टॉल करून गेले म्हणून तर मिसिंग कार बॉनेट ची माहिती त्यांना होती

हाब, 100 च्या वर पोस्ट्स होऊन गेली. सॉलिड क्लु द्या आता एखादा. >> ११:४० ला जसे मिस्त्री पडले तसा त्यांचा अ‍ॅटॅकरही पडला असावा अशी
एकं शक्यता तुम्ही विचार केली का? म्हणूनच तो कॅमेरातून बाहेर जातंना दिसला नाही. पण अ‍ॅटॅकर आत कसा आला हे अजून तुम्ही सोडवलेले नाही

ही आत्महत्या आहे. >> नातवाच्या आगमनाने खुषीत असलेले का करतील मिस्त्री आत्महत्या

अल्मिरा इराणी हिचा संबंध कैझाद बरोबर फार पुर्वीपासुन होता. कैझादने पेरिजाद बरोबर लग्न करून सुध्दा त्याचे संबंध तिच्या सोबत होते. पेरिजाद ही जास्त पजेसिव्ह असल्याने कैझादला तिच्याबरोबर कंटाळा आला तिचा पिच्छा सुटावा म्हणून त्याने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. अल्मिरा ही तिची मैत्रिण बनून दानिश बरोबर तिने एक चांगले संबंध जुळवले त्यामुळे पेरिजाद नंतर दानिशची जवाबदारी मिस्त्रींनी हसत तिच्याकडे सोपवली परंतू मिस्त्रींना अल्मिरा आणि कैझाद यांचे संबंध माहिती नव्हते. ते नेमके ३१ ला रात्री कळले असतील त्या वेळी कैझाद नववर्षानिमित्ताने स्वतःच्या मुलाला भेटण्यासाठी मिस्त्रींकडे आला असेल. परंतु हट्टी मिस्त्रींनी परवाणगी दिली नसेल. त्यात त्यांचे वाद झाले असतील प्रसंगी मारहाण सुध्दा अल्मिरा तिथेच दानिश बरोबर असल्याने बहुदा दानिशने कैझाद ची बाजु घेतली असेल (अल्मिराने शिकवले असेलच काही) हा धक्का मिस्त्रींना सहन झाला नसेल. त्यांनी आत्महत्या करायचा विचार केला पण जाताना बदला म्हणून कैझादला कसे अडकवले जाऊ शकेल या पध्दतींनी त्यांनी सगळा प्लॅन तयार केला. मगच त्यांनी उडी मारून आत्महत्या केली.

मृतदेहाच्या शेजारी उभे राहून किंचाळी मारल्यावर गार्ड्स येऊ शकतात तर कोणी जर मिस्त्रींना फेकून दिले तर ते नक्कीच ओरडतील मग त्या अवाजाने तर गार्ड आधीच यायला हवे होते. याचा अर्थ एक तर त्यांना ठार मारून मग सावकाश फेकले अथवा त्यांनी स्वतः उडी मारली असा होऊ शकतो.

ओके. म्हणजे मिस्त्री आणि खुनी यांच्यात झटापट झाली त्याच्यात ते दोघेही काच फुटून खाली पडले. मिस्त्री डोकं आपटून मेले पण खुनी cactus bed वर त्याच्या सुदैवाने पडला आणि वाचला.

car box red herring आहे. मिस्त्रींच्या घरातील कलाकुसर याचा कुठेतरी संबंध आहे Happy

अरे पण जीव वाचला तरी त्या खुन्याला भरपूर लागेल असे पडल्यावर. अशी व्यक्ती फार चपळाईने तिथून गायब कशी होईल?

मी विचारलय ग्रँडफादर क्लॉकबद्दल

-दुपारी ४:२१ - दोन कार्गो सर्विस एम्प्लॉईजची मिस्त्रींच्या घरात १२ बॉक्सेस पैकी पहिल्या बॉक्सची डिलीवरी
-दुपारी ४:५७ - कार्गो सर्विस एम्प्लॉईजची मिस्त्रींच्या घरात १२ बॉक्सेस पैकी शेवटच्या बॉक्सची डिलीवरी
-संध्या ५:२० - दोन कार्गो सर्विस एम्प्लॉईजची मिस्त्रींच्या घरात रूम फर्निचर आणि डेकॉर बॉक्सेसची पहिली डिलिवरी
-संध्या ६:५१ - कार्गो सर्विस एम्प्लॉईजची मिस्त्रींच्या घरात रूम फर्निचर आणि डेकॉर बॉक्सेसची शेवटची डिलिवरी

पहिली १२ बॉक्सेस ची डिलीव्हरी ३६ मिनिटात झाली (६ बाय ८ बाय २ चा बॉक्स असूनही), दुसर्‍या डिलीव्हरीला ९१ मिनिटं का लागली असावीत?

जर पुढची फ्रेम जास्तित जास्त ५ फुटी आहे, तर बेडची रूंदीही त्याहून अधिक नसणार. लांबी ७ फूट पकडली तरीही मोठ्या बॉक्सपेक्षा कमीच. लहान मुलाचा बेड असल्यानी ही लांबीही जास्तीच असेल.
म्हणजे नक्कीच कुठलीतरी जड / अवजड वस्तू नेली असावी) अथवा काहितरी खूप काळजीपूर्वक नेलं असावं.

नक्कीच खुनी या बॉक्सेसमधून शिरला.

ग्रँड्फादर क्लॉक >>>> नाही

ओके. म्हणजे मिस्त्री आणि खुनी यांच्यात झटापट झाली त्याच्यात ते दोघेही काच फुटून खाली पडले. मिस्त्री डोकं आपटून मेले पण खुनी cactus bed वर त्याच्या सुदैवाने पडला आणि वाचला. >> हो असं होण्याची शक्यता आहे अन्यथा कसा जाणार बाहेर.

अरे पण जीव वाचला तरी त्या खुन्याला भरपूर लागेल असे पडल्यावर. अशी व्यक्ती फार चपळाईने तिथून गायब कशी होईल? >> हो एकदा ही शक्यता गृहीत धरली की पुढच्या प्र्श्नांची ऊत्तरं तर द्यावीच लागणार.

मृत्यू ३१ डिसेंबर रात्री ११:३० ते १२:०० च्या दरम्यान झाला असावा. विक्टिमच्या हातातले घड्याळ रात्री ११:४० ला बंद पडले.
-ऊंचावरून फोर्स ने पडतांना नेमके डोके कॅक्टस बेडच्या (निवडुंगाचे ताटवे) कॉक्रीट बॉर्डरवर आपटून स्कल ब्रेक झाले.
-अंगाखाली कॅक्टस बेड असल्याने शरीरात शेकडो ठिकाणी कॅक्टसचे काटे घुसले.
-डोके आपटले नसते तर डेन्स कॅक्टस बेड मुळे कदाचित प्राण वाचू शकले असते.
-पडण्यापूर्वी विक्टिमला सफोकेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता,
-कॅक्टसच्या काट्यांबरोबरच काचांमुळे झालेल्या जखमा आणि काचांचे बारीक तुकडेही शरीरात व चेहर्‍यावर घुसल्याचे मिळाले
-पोटात थोडेफार पचलेले अन्न, वाईन आणि काही माईल्ड स्लीप मेडिकेशन मिळाले. विक्टिम हे मेडिकेशन बराच काळापासून घेत असावा.
-जखमा आणि फ्रॅक्चर्स ऊंचावरून पडतांनाशी कन्सिस्टंट आहे.
- सापडलेल्या बाटलीतील २९ गोळ्या जेन्यूईन स्लीप मेडिकेशन आहे.
-कॉज ऑफ डेथ - आत्महत्या किंवा खून नक्की अनुमान लावणे कठीण आहे.
--------------------------
वरील बाबींमधे एक स्पष्ट होत आहे की खुन / आत्महत्या ही गोळी झाडून केली नाही. डोक्यात काही घालून केली असण्याची शक्यता आहे. कारण डोक नेमके काँक्रिटवर आपटल्याने ते आधीच फुटलेले होते की आपटल्याने फुटले ही कंन्फर्मेशन मिळणार नाही ( आंखे चित्रपटातला परेश रावलचा मृत्यु)
पडाण्यापुर्वी हातापाई झाली होती पण त्या हातापाईमुळे मृत्यु झाला असेल अशी शक्यता नाही.
माईल्ड स्लीप मेडीकेशन मधे गुंगी येते एक प्रकारची नशा असते त्यातच त्यांनी वाईन सुध्दा घेतली होती. अशा मधे नशेत माणूस काय करतोय हे त्याला भान नसेल.

मुख्य गोष्ट व्हिक्टम उंचावरुन पडताना अजिबात ओरडला नाही.

पहिली १२ बॉक्सेस ची डिलीव्हरी ३६ मिनिटात झाली (६ बाय ८ बाय २ चा बॉक्स असूनही), दुसर्‍या डिलीव्हरीला ९१ मिनिटं का लागली असावीत? >> कारण त्यात बेडला लागलेला असेंब्ली टाईम सुद्धा आहे

नक्कीच खुनी या बॉक्सेसमधून शिरला. >> असू शकतो. कारचे बॉनेट विसरल्याने तेवढी जागा तर होतीच म्हणूनच तशी नोंद आली आहे.

गजोधर तुमचा पहिला 'कहानी घर घर की ' वाला प्रतिसाद सोडला तर तुम्ही व्योमकेश बक्षीचीही झलक दाखवली आहे. Lol

अरे पण जीव वाचला तरी त्या खुन्याला भरपूर लागेल असे पडल्यावर. अशी व्यक्ती फार चपळाईने तिथून गायब कशी होईल? >> हो एकदा ही शक्यता गृहीत धरली की पुढच्या प्र्श्नांची ऊत्तरं तर द्यावीच लागणार.>>>

११:४० ला दोघे खाली पडले. खुनी भरपूर जखमी झाला पण जिवंत होता. १ च्या सुमारास मिस्त्रींचे प्रेत सापडले. तर मधे त्याला निसटून जायला तसा बराच वेळ आहे, तो जखमी अवस्थेत असला तरी.

कैझादचे अल्मिरा बरोबर संबंध होते. यानंतरच कहानी घर घर की एपिसोड सुरु होईल ना Happy तसे नसते तर आश्चर्य वाटले असते कारण मग अल्मिरा कडे दुर्लक्ष केले गेले असते. पण संबंध असल्याने तिच्याकडे आधी दृष्टी जाते,
३१ तारखेला काय असे नेमके झाले ज्याने गांधी पारेख यांना त्याचा खुन करावा लागला ? मारायचे असेल तर त्या आधीही त्यांना मारता आले असतेच ना. एकदम मुहुर्त काढून ते ही ३१ तारीख जेव्हा सगळे लोक जमलेली असताना खुन करायचा प्लॅन कोणी करेल का? मी खुनी असलो असतो तर अशी गजबजाटीची रात्र मी कधीच नक्की केली नसती. (मला गर्दीचे असे ही वावडे आहे) त्यामुळे ३१ ला काहीतरी आकस्मात घडले असेल असा माझा निष्कर्ष आहे. माझ्या मते गांधी आणि पारिख यांचा हात नाही.

११:४० ला दोघे खाली पडले. खुनी भरपूर जखमी झाला पण जिवंत होता. १ च्या सुमारास मिस्त्रींचे प्रेत सापडले. तर मधे त्याला निसटून जायला तसा बराच वेळ आहे, तो जखमी अवस्थेत असला तरी. >>
अहो पण दोघे मुके नाही आहे. दोघे ओरडले तर गार्ड्स यांना ऐकायला कसे गेले नाही ?

car box मधून खुनी आला. delivery boys त्याला सामील आहेत. त्यांनी assembly करताना मिस्त्रींचं लक्ष दुसरीकडे वेधून अथवा ते दुसर्‍या खोलीत असताना खुन्याला बाहेर काढले, खुनी तिथे कुठेही लपून बसलेला असू शकतो. मिस्त्री संध्याकाळी पार्टीला जाणार होते हे त्याला माहिती असू शकेल त्यामुळे त्याआधी मिस्त्रींना मारणे संशयास्पद ठरू शकते. त्यामुळे मिस्त्री परत येइपर्यंत तो थांबला.

car box मधून खुनी आला. delivery boys त्याला सामील आहेत. त्यांनी assembly करताना मिस्त्रींचं लक्ष दुसरीकडे वेधून अथवा ते दुसर्‍या खोलीत असताना खुन्याला बाहेर काढले, खुनी तिथे कुठेही लपून बसलेला असू शकतो. मिस्त्री संध्याकाळी पार्टीला जाणार होते हे त्याला माहिती असू शकेल त्यामुळे त्याआधी मिस्त्रींना मारणे संशयास्पद ठरू शकते. त्यामुळे मिस्त्री परत येइपर्यंत तो थांबला. >> होऊ शकते पण मग तो गेला कसा असता?
मिस्त्रींबरोबर खाली ऊडी मारण्याची तर नक्कीच त्याची एक्झिट स्ट्रॅटेजी नसणार ?

हुडी गाय - भरूचांनी पाठवलेला, वस्तू चोरण्यासाठी
धिप्पाड - गांधी/पारीख यांनी पाठवलेला professional assasin, मिस्त्रींचा काटा काढण्यासाठी
खुनी - कैझादशी संबंधित

कैझादचे अल्मिरा बरोबर संबंध होते. यानंतरच कहानी घर घर की एपिसोड सुरु होईल ना Happy तसे नसते तर आश्चर्य वाटले असते कारण मग अल्मिरा कडे दुर्लक्ष केले गेले असते. पण संबंध असल्याने तिच्याकडे आधी दृष्टी जाते,
३१ तारखेला काय असे नेमके झाले ज्याने गांधी पारेख यांना त्याचा खुन करावा लागला ? मारायचे असेल तर त्या आधीही त्यांना मारता आले असतेच ना. एकदम मुहुर्त काढून ते ही ३१ तारीख जेव्हा सगळे लोक जमलेली असताना खुन करायचा प्लॅन कोणी करेल का? मी खुनी असलो असतो तर अशी गजबजाटीची रात्र मी कधीच नक्की केली नसती. (मला गर्दीचे असे ही वावडे आहे) त्यामुळे ३१ ला काहीतरी आकस्मात घडले असेल असा माझा निष्कर्ष आहे. माझ्या मते गांधी आणि पारिख यांचा हात नाही. >> आपण एक्स-पोस्ट (घडून गेल्यानंतर ) अ‍ॅनालिसिस करतो आहोत एक्स-अँटी (घडण्याआधी) अ‍ॅनालिसिस करून केस कशी सॉल्व होणार?

हुडी गाय - भरूचांनी पाठवलेला, वस्तू चोरण्यासाठी
धिप्पाड - गांधी/पारीख यांनी पाठवलेला professional assasin, मिस्त्रींचा काटा काढण्यासाठी
खुनी - कैझादशी संबंधित
>>>
हो असू शकते.

खुनी एक माणूस आहे असं धरून चाललोय आपण सगळे.
जनावरही असू शकेल, जे पाहून घाबरून पॅनिक मधे मिस्त्रींनी काच फोडून बाहेर उडी मारली. पण स्लीपिंग पिलमुळे अ‍ॅक्शन अन अंदाज चुकला.

जनावर जर साप असेल असं समजलं तर तो ओपनिंगमधून सरपटत बाहेर निघून गेला असं म्हणता येईल.
तो पाठवला असणार नक्कीच अँटीक्स च्या बॉक्स मधून भरूचा नी.
जेणेकरून जेंव्हा केंव्हा मिस्त्री तो बोक्स उघडेल, साप चाऊन मरेल.

जनावर हा ट्रेन्ड शिकारी कुत्रा / मांजर ही असू शकतो, ज्याच्यासोबत झटापट होऊ शकते. कुत्र्याच्या नखांचे निशाण काचा अन कॅक्टसमुळे कळले नसावेत.

त्यामुळे मिस्त्री परत येइपर्यंत तो थांबला. >> होऊ शकते पण मग तो गेला कसा असता?
मिस्त्रींबरोबर खाली ऊडी मारण्याची तर नक्कीच त्याची एक्झिट स्ट्रॅटेजी नसणार ?>>>

बरोबर आहे. पण खून करण्याच्या आधी नकळत प्रवेश मिळवणे मुख्य असणार त्यामुळे तो बॉक्स मधून आला. एकदा खून झाल्यावर तो चेहरा लपवून, हुड ओढून अथवा काही वेगळी वेषभूषा करून सरळ मेन दरवाज्याने बाहेर पडू शकतो. camera आहे तिथे पण चेहराच झाकलेला असल्यावर कोण ते कसं कळणार?

हे बघा. खुन अथवा आत्महत्या झाली घटना घडून गेली जर केस सोल्व करायची असेल तर त्या आधीच्या घटनांना तुम्ही अ‍ॅनॅलिसिस करणार ना. की घडून गेल्यानंतरच्या गोष्टी?
मला दोन ठिकाणी खटकत आहे की गार्ड जर आपापल्य जागी होते तर आवाज का आला नाही ओरडण्याचा आपटण्याचा (कवटी फुटण्याचा आवाज जास्त असतो) ?
जर आवाज आला आहे पण त्यांनी दुर्लक्ष केले असे होते का ?
फायनली आपल्याला खुनी पकडायचा आहे पण त्याच बरोबर खुन का केला आहे त्याबद्दल पण सांगावे लागेलच ना.

जनावर जर साप असेल असं समजलं तर तो ओपनिंगमधून सरपटत बाहेर निघून गेला असं म्हणता येईल.
तो पाठवला असणार नक्कीच अँटीक्स च्या बॉक्स मधून भरूचा नी.
जेणेकरून जेंव्हा केंव्हा मिस्त्री तो बोक्स उघडेल, साप चाऊन मरेल.>>>>

speckled band ची आठवण झाली Happy

हुडेड चोरानी अन्य काही चोरलं असावं अन ३ बाय २ बाय ३ च्या बॉक्समधे "नामशेष होत चाललेले पण कायदेशीर मार्गाने टॅक्सिडर्म केलेले प्राणी" ऐवजी खरा प्राणी असावा.

हुडेड चोरानी अन्य काही चोरलं असावं अन ३ बाय २ बाय ३ च्या बॉक्समधे "नामशेष होत चाललेले पण कायदेशीर मार्गाने टॅक्सिडर्म केलेले प्राणी" ऐवजी खरा प्राणी असावा.<<<<<
यो गेस मने करेक्ट लागे से.

कुठल्यातरी प्रजातीचं मांजर असेल. मिस्त्रीबरोबर मांजर पण पडलं पण ते बरोबर चार पायांवर पडलं आणि निघून गेलं. मिस्त्री गेला. Lol

Pages