अंडा भुर्जी आवडली नाही, हे एखाद्याला कसे सांगावे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 May, 2017 - 15:54

मी एक मध्यमवर्गीय माणूस आहे. थोडी काटकसर करतो. थोडी जीवाची चैन करतो. मध्यमवर्गीय असलो म्हणून काय झाले, थोडे पैसे खर्च करून सुख मिळवायचा अधिकार मलाही आहे.

तर मला मांसाहार करायला फार आवडते. त्यात सहज उपलब्ध होणारे चटकमटक अंडे तर माझ्या खास आवडीचे. नेहमी घरीच खाणे होते. पण बाहेरची भुर्जी पाव जरा जास्त आवडते. अर्थातच त्याला पैसे जास्त पडतात. तरी नाक्यावरच्या गाडीवर तुलनेत स्वस्त पडते म्हणून पंधरावीस दिवसांनी एक चक्कर असतेच.

तर नुकतेच आमच्या मोहल्ल्यात एक नवीन रापचिक हॉटेल उघडलेय. ही अशी डोळे दिपवणारी लायटींग आणि चकाचक प्लेटसमध्ये वाढले जाणारे, डोळ्यांना लुभावणारे अन्न! काही दिवस येता जाता ऊसासे सोडले. एक हात मनावर होता तर एक हात पाकिटावर.. दोन्ही हात आपापले काम चोख बजावत होते.

पण आज नेमके दारावर लटकवलेल्या पाटीवर नजर पडली ..
आमची स्पेशालिटी - अंडा भुर्जी पाव !

नक्कीच गाडीपेक्षा महाग असणार. दुपटीने की तिपटीने? हा प्रश्न होताच.
पण चवही असेल का तशी? हा देखील प्रश्न होता.

पण चव चाखल्याशिवाय कळणार कशी? गेलो मग आज हिंमत करून आत ..

पहिल्याच घासाला समजले, पैसे गंगेत न्हाले आहेत .. बाकी सारं ठिक होते, पण टोमेटो ईतका होता की वेचून वेचून काढला तरी त्याच्या गोडआंबट रसाने अंड्याचा जीव घेतला होता. पण करतो काय, गिळली मुकाट. एकवेळ अन्नाची नासाडी मी करू शकतो पण पैश्याची नाही..
पैसेही ना दुप्पट होते ना तिप्पट होते.. तर अडीचपट होते. पण चव मात्र अर्ध्यानेही नव्हती. माझाच दिड शहाणपणा मला नडला होता.

यापेक्षा आज घरीच अंडे उकडून खाल्ले असते तर परवडले असते, असे कैकदा वाटले. पण गेलेली वेळ पुन्हा येत नाही आणि फुटलेले अंडे पुन्हा जोडले जात नाही. पण आता हा फुटक्या नशीबाचा अनुभव कोणाशी तरी शेअर करायची प्रबळ ईच्छा होत आहे.

यामागे दोन सुप्त हेतू आहेत

1) तेवढेच चार लोकांना सांगितल्याने आपला त्रास कमी होईल. एक ते असते ना मानसिक समाधान..

2) जर ती भुर्जी मला का आवडली नाही आणि माझ्या आवडीचे त्यात काय नव्हते हे मी व्यवस्थितपणे आणि प्रामाणिकपणे शेअर केले तर त्या आवडीशी मिळती जुळती व्यक्ती सावध होईल आणि तिचा संभावित मनस्ताप टळेल.
बाकी माझ्यावर विश्वास ठेवून जावे न जावे हा निर्णय तिचाच राहील.

....

तर सांगावे का हे मी माझ्या जवळपासच्या, ओळखीच्या लोकांना फेसबूक, व्हॉटसप, मायबोली सारख्या सोशल साईटसवरून ?

काही अनुभव वाईट आहेत म्हणून ईथे सल्ला विचारत आहे.
साधारण अश्या प्रतिक्रिया येतात ज्यांची भिती वाटते..

........

1) स्वत:ला शहाणे समजायचे सोडा. तुम्हाला आवडते तीच भुर्जी चांगली आणि बाकीच्या फालतू का?

2) एवढ्या लोकांना आवडते. ते मुर्ख आहेत का?

3) आमच्या घरच्यांना तर आवडली. आईला तर आज्जी करत असलेल्या भुर्जीपावची आठवण झाली.

4) तुम्हाला कशी आवडणार? तुम्हाला त्या टोपीवाल्या मामू भाईजानच्या गाडीवरचीच आवडणार.

5) वरच्या पोस्टला एक व्हायसे वर्साही असतोच.

6) केवढी ही पोटदुखी आणि जळजळ? ईनो घ्या ..

7),निदान काहीतरी आवडले असेल. पाव, कांदा, लोणचं, पाणी. खूपच एकांगी मत बनवले आहे. जे आवडले ते देखील लिहायला हवे होते.

8) नका खाऊ. आम्हाला काय. तसेही आम्ही भुर्जीच खात नाही.
(फक्त तिच्यावर होणारया चर्चा तेवढ्या चवीने वाचतो)

9) गाढवाला गुळाची चव काय?

10) तुला खायची अक्कल नाही रे. त्यात लिंबू पिळून खाऊन बघ एकदा आणि मग मला सांग.

11) अगदी अगदी.. मलाही आवडली नव्हती. एकदम थर्डक्लास. लोकांना स्वत:ची अक्कल नसते. सगळ्यांना आवडली मग आपल्यालाही आवडलीच पाहिजे. मेंढरं नुसती..
(ही पोस्ट वरवर जरी आपल्या समर्थनार्थ वाटली तरी त्या धाग्यावरचे आपले विरोधक वाढवणारी असते. देव असे हितचिंतक अहितचिंतकांनाही न देओ)

11) ह्ममम.. बर्र.. चान चान .. ईत्यादी ईत्यादी..

........

हे असे असताना एखाद्याने आपले प्रामाणिक नकारात्मक मत व्यक्त करायचे तरी कसे ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माननीय ऋन्मेऽऽषजी शेठ साहेब (हो! नाहीतर आयडी उडायचा :फिदी:).
>>>>>
अरे काय हे.. मास्तरांनी नियम कडक करून माझी गोची केलीय. लोकं माझी टिण्गलटवाळी नाही करणार तर माझे दुकान कसे चालणार.. लोकंहो, नियमात राहूनही चिडवा हो मला ..

@अमितव, माझे फेसबूकवर अतिरीक्त अकाऊण्ट नाहीये. एकाचेच काय करायचे समजत नाही तिथे आणखी कुठे.. आपलेच फोटो शेअर करत आपणच लाईक करत बसायचे का..

@ च्रप्स, नाही हो. तिथेच पुन्हा नाही जाणार. तो आत्मघात, आत्मद्रोह आणि आत्मविटंबना ठरेल. पण असे चकाचक प्लेटसमध्ये भुर्जी देणारे कैक हॉटेल्स आहेत. त्यातले जिथे चांगली मिळते तिथला फोटो टिपेन.

@ अदिती, मी ही समस्या माझ्यासाठी मांडली नाही. अश्या प्रतिक्रियांना घाबरून ईतर धागाकर्त्याँनी आपले प्रामाणिक नकारात्मक मत मांडताना कच खाऊ नये म्हणून त्यांचे धैर्य वाढवायला हा धागा आहे.

एखाद्या वस्तु वा व्यक्ती विषयी जर कोणी नकारात्मक सांगत असेल तर ते कसे सांगीतले यासोबत ते कुणी सांगीतले यावर बर्याचदा समोरुन येणार्या प्रतिक्रीया अवलंबुन असतात असे मला वाटते.

मेहनत काय कोंबडीच करते? कोंबड्याच्या मेहनतीचे काय?

कोंबड्याच्या मेहनतीने अंडे तयार होत नाही. कोंबडा नसला तरी अंडे देण्यापासून कोंबडीला कोणीही रोखू शकत नाही,फक्त त्या अंड्यात जीव नसेल.
जीव असलेले अंडे महाग असते त्यामुळे भुर्जीसाठी हॉटेलवाले ते नक्कीच वापरणार नाही.
अंडा भुर्जीत टोमॅटोचा अतिरेक मलाही आवडत नाही.

ईथेही स्त्री पुरुष असमानता?
मेहनत काय कोंबडीच करते? कोंबड्याच्या मेहनतीचे काय?>>>

बुर्जी ऑम्लेट बनविण्याच्या अंड्यांसाठी कोंबड्याची गरज नाही लागत म्हणतात! कोंबडी बिचारी इमाने इतबारे ही अंडी देत असते.

हॅचेबल अंड्यासाठी (ज्यातुन पिलु जन्माला येते जे चिकन म्हणून खाण्यासाठी वापरतात) कोंबड्याची आवश्यकता असते. आणि ते ही दुरुनच कोंबडीच्या जवळ नाही जाऊ देत बिच्चार्‍याला. पोल्ट्री फार्म मध्ये SAP इम्प्लेमेन्टेशन साठी गेलो तेंव्हा पाहिले ते बिच्चारे कोंबडे... १ कोंबड्याच्या नशिबी २५-३० कोंबड्या पण काही उपयोग नाही! Wink

कोणीतरी या कोंबड्यांच्या प्रजोत्पादनावर आणि अंडेनिर्मिती उद्योगधंद्यावर नवीन धागा काढेल का?
जर कोंबंडा किंवा कोंबडी काही न वापरता घरच्या घरी अंडी बनवायचा काही उपाय असेल तर तो सुद्धा त्यात सांगा.
तसेच देशी आणि ईंग्लिश अंड्यांमधील फरकही सांगा.

अंडी आणि चिकन हा संपूर्ण आहार आहे... जबरा प्रोटीन..
प्रत्येकाने खाल्ले पाहिजे...
मोड आलेल्या कडधान्यात जीव नसतो का जे अंडी आणि चिकन खांनार्यांना नावे ठेवतात...

Pages