स्थळ : पुण्यातील रेसकोर्स
काळ : १९७१-७२ दरम्यानचा एक दिवस
प्रसंग : भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची जाहीर सभा
त्यावेळी मी शालेय विद्यार्थी होतो. १९७१ च्या भारत-पाक युद्धात आपण विजयी झाल्यानंतर काही काळाने इंदिराजींची जाहीर सभा तेथे आयोजित केली होती. आपल्या पंतप्रधानांना पाहणे हे एक जनतेचे जबरदस्त आकर्षण असते. त्यामुळे सभेला तोबा गर्दी झालेली. एवढी प्रचंड गर्दी अनुभवण्याचा तो माझ्या आयुष्यातील पहिला प्रसंग होता. त्या गर्दीत आम्ही लहान भावंडे एकमेकांची बोटे घट्ट धरून आमच्या पालकांसमवेत तेथे वावरत होतो. सुमारे तीन तास आम्ही तेथे घालवले असावेत. त्या प्रसंगाची आठवण आता पुसट झालेली आहे. तुटक तुटक काही आठवते आहे.
सभेचे व्यासपीठ आणि सामान्य जनता यांच्यामध्ये खूप अंतर ठेवलेले होते. सर्वत्र प्रचंड धूळ उडत होती. आमच्या पालकांनी आम्हाला उंच उचलून घेऊन व्यासपीठ दाखवण्याचा प्रयत्न केला. पण, आम्हाला तरी इंदिराजी काही दिसल्या नाहीत. एकीकडे त्यांचे भाषण ध्वनिवर्धकातून ऐकू येत होते. तेव्हा त्या बोलताहेत म्हणजे व्यासपीठावर कुठेतरी असणार असे आम्ही समजून घेतले.
नंतर त्यांचे भाषण संपल्यावर नागरिकांनी शिस्तीत हळूहळू कसे बाहेर पडावे याच्या सूचना दिल्या जात होत्या. परंतु, आपले नागरिक मात्र अत्यंत बेशिस्तीत वागत होते. सर्वत्र कमालीचा गोंधळ होता. त्यात उडणाऱ्या धुळीने सर्वांनाच हैराण केले होते. माणसांचे लोंढे एकमेकांवर आदळत होते. सर्वात चीड आणणारा प्रकार म्हणजे काही जण आपल्यापुढे लांब अंतरावर असणाऱ्याना चक्क दगड फेकून मारत होते. आमच्याही अगदी जवळून काही दगड गेले. त्यामुळे आता जीव मुठीत धरून एकमेकाला सांभाळून सुखरूप बाहेर पडणे एवढेच ध्येय आमच्यापुढे होते.
ज्या लोकांना त्या दगडांचा प्रसाद मिळाला, त्यांनी संतापून त्या मारणाऱ्याना शिव्या घातल्या. त्यापैकी कोणाच्या तोंडून तरी मी ‘bastard’ हा शब्द आयुष्यात प्रथम ऐकला, जेव्हा त्याचा अर्थही कळत नव्हता.
सुमारे तासाभराने कसेबसे तिथून बाहेर पडल्यावर अगदी हायसे वाटले. आमचे पालक तसेच इतर काही सुबुद्ध नागरिक आता एका मतावर ठाम झाले होते, ते म्हणजे आता पुढच्या आयुष्यात कधीही आपल्या कुठल्याही पंतप्रधानांच्या सभेला जायचे नाही. मी स्वतःही मोठे झाल्यावर हा निर्णय आजपावेतो अमलात आणला आहे व यापुढेही तो कायम ठेवणार आहे. किंबहुना त्या सभेच्या संदर्भात आपला पाकवरील विजय, त्या तडफदार पंतप्रधान वगैरे आठवणी माझ्या विस्मरणात गेल्या. पण, कायमचे चांगले लक्षात काय राहिले तर त्या दिवशीची प्रचंड गर्दी, नागरिकांची कमालीची बेशिस्त, चेंगराचेंगरी, ती अमानुष दगडफेक आणि दगड वर्मी लागलेले व तळतळून शिव्या देणारे लोक.
... आज इतक्या वर्षांनी तो कटू प्रसंग का आठवतोय? विन्स्टन चर्चिल या माजी ब्रिटीश पंतप्रधानांनी भारताबाबत अनेक विधाने केलेली आहेत. जरी ती उपरोधिक वगैरे असली, तरी त्यातली काही अतिशय विचारपूर्वक केली आहेत यात शंका नाही. अधूनमधून आपल्यातले काही विचारवंत त्या विधानांचा दाखला देत असतात. ती विधाने अगदी मार्मिक आहेत. जरी त्या अहंगंड व्यक्तीबद्दल आपल्याला आदर नसला तरीही त्याची ती विधाने आपण आत्मपरीक्षण करावीत अशी आहेत.
परवा असा एक लेख वाचताना चर्चिलच्या ‘त्या’ विधानाची उजळणी झाली आणि ते म्हणजे, “India is not a nation, it is only population”. अर्थात, ‘’भारत हा समाज नाही, ही निव्वळ गर्दी आहे!’’ अशा या ‘गर्दी’चा वरील अनुभव मी शालेय वयात घेतला. संस्कारक्षम वयात झालेला हा एक मोठ्ठा भारतीय संस्कार !
अशा या गर्दी व चेंगराचेंगरीचे संस्कार आपण भारतीय एकमेकांवर पदोपदी करत असतो. तर बघूया आपल्याकडील काही ठरलेल्या गर्दींची झलक.
हे आहे एखादे सरकारी कार्यालय. इथे ठराविक नमुन्यातील अर्ज घेणे, मग तो भरणे, त्यावर अधिकाऱ्याची सही घेणे आणि त्यानंतर पैसे भरणे अशा क्रमाने आपल्याला कामे करायची असतात. हे कार्यालय उघडल्यानंतर तासाभरातच तिथल्या सर्व खिडक्यांसमोर भल्या मोठ्या रांगा दिसू लागतात. अजून थोड्या वेळाने एखाद्या रांगेतले दृश्य पाहूयात. कुठलीही रांग ही पूर्णपणे सरळ कधीच राहत नाही. खिडकीपाशी त्या रांगेला दोन्ही बाजूंनी फाटे फुटतात. मग या फाट्यावर वाढणाऱ्या उपरांगा मूळ रांगेतील शिस्तप्रिय लोकांना त्रस्त करू लागतात. आता कोलाहल माजतो. खिडकीच्या तोंडाशी धुमश्चक्री चालू होते. त्याचा प्रचंड ताण आतील कर्मचाऱ्यावर पडतो. साहजिकच तोही वैतागतो, उभा राहतो, हातातील एखादी वस्तू टेबलावर आपटतो आणि काम थांबवतो.
कधीकधी तर रांगेत धुडगूस घालणाऱ्याना वठणीवर आणण्यासाठी दंडुकेधारी पोलीसही आणावे लागतात. कार्यालयात ‘’रांगेचा फायदा सर्वांना’’ अशा लावलेल्या पाट्या गंजून गेलेल्या असतात व बेशिस्तांचे वागणे पाहून जणू केविलवाण्या झालेल्या दिसतात. जरा आठवून पाहा. ४ वर्षांपूर्वी जेव्हा ‘आधार’ कार्ड काढायच्या रांगा लागत होत्या तेव्हा अनेकांनी या अनागोन्दीचा पुरेपूर अनुभव घेतला होता आणि त्यांना अगदी ‘निराधार’ झाल्यासारखे वाटले होते !
या सर्व अनागोंदीचे मूळ आपल्या बेशिस्तीत आहे. रांगेचा आदर न करता सतत पुढे घुसण्याची प्रवृत्ती आपल्या हाडीमाशी खिळली आहे. या संदर्भात आठवते ते अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटातील त्यांच्या तोंडी असलेले एक चपखल वाक्य, ‘’ हम जहां खडे होते है, लाईन वहीसे शुरू होती है’’. स्वतःला असे ‘बच्चन’ समजणाऱ्यांची संख्या आपल्याकडे भरपूर आहे.
गर्दीचा प्रचंड त्रास होण्याची अजून महत्वाची ठिकाणे म्हणजे रेल्वे व बसस्थानके. आपल्याकडे उन्हाळी व दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान तर या स्थानकांवर गर्दीचा महापूर असतो. रेल्वे हे प्रवासाचे स्वस्त व मस्त साधन असल्याने तिच्या स्थानकावरील झुंबड तर गर्दीच्या सर्व मर्यादा ओलांडते. आता बघूयात एखाद्या महानगरी रेल्वेस्थानकावरील या सुट्यांच्या काळातील दृश्य.
ज्या प्रवाशांची गाडी प्लॅटफॉर्म क्र. एकवर येणार असते ते अत्यंत भाग्यवान ! आता बाकीचे कमनशिबी प्रवासी मात्र पुढील हालअपेष्टाना तोंड द्यायला सज्ज होतात. बहुतांश स्थानकांवर प्लॅटफॉर्म क्र. दोन व त्यापुढील सर्व प्लॅटफॉर्मवर जायचे म्हणजे पादचारी पुलावरून जाणे आले. या पुलावरून एका वेळेस शेकडो प्रवासी तरी ये-जा करत असतात. प्रवासास निघालेले आणि प्रवासाहून परतलेले असे दोन्ही प्रकारचे प्रवासी त्यांच्या भरपूर सामानासहित या पुलावर भिडतात. जाणारे व येणारे यांची चालण्याची बाजू (डावी – उजवी) तरी वेगळी असावी, हा मूलभूत नियम आपल्याला नीट समजायला अजून एक शतक तरी जावे लागेल, अशी सध्या स्थिती आहे.
त्यामुळे या पुलावरून जाताना आपल्याला प्रचंड रेटारेटी, गुदमरणे, घुसमटणे, चेंगरणे आणि कधीतरी तुडवले जाणे अशा सर्व यातनांचा अनुभव येतो. या अग्निदिव्यातून बाहेर पडल्यावर प्रवासी एकदाचा आपल्या इच्छित प्लाटफॉर्मवर येतो. आता पुढचा टप्पा असतो तो म्हणजे गाडी आल्यावर त्यात शिरायचा. आपली बहुसंख्य जनता दुसऱ्या वर्गाच्या डब्याने प्रवास करते. आता बघूया अशा प्रवाशाची गाडीत शिरताना होणारी घुसमट.
प्लॅटफॉर्मवर गाडी येते. आता डब्यातून उतरणारे व चढणारे प्रवासी यांची धुमश्चक्री होते. आधी आतील प्रवाशांना पूर्ण उतरू द्यावे, त्यानंतरच आत जागा होईल व मग बाहेरच्यांनी चढावे, ही किमान समज अजूनही आपल्याला नाही. हल्ली काही निर्लज्ज मंडळी तर गाडी यायच्या आधीच रुळांवर उतरून प्लॅटफॉर्म च्या विरुद्ध बाजूला थांबतात आणि गाडीत तिकडून घुसून दादागिरी करतात. अशा झुंडशाहीमुळे आजकाल दुसऱ्या वर्गाच्या आरक्षित डब्यांनाही सामान्य अनारक्षित डब्यांचे स्वरूप आलेले आहे.
प्रवासासंबंधी एक संस्कृत वचन असे आहे ,’’किं सुखं प्रवासगमनं”. मला आठवते, की आमच्या शाळेतील संस्कृतच्या शिक्षकानी ते आम्हाला सांगताना आपल्याकडील वास्तव जाणवून दिले होते. ते असे, ’’किं सुखं अप्रवासगमनं” ! खरेय, आपल्या देशात प्रवास करणे ही खरोखरीच सुखाची गोष्ट राहिलेली नाही.
निरनिराळ्या सार्वजनिक ठिकाणी विविध प्रसंगी गर्दी करण्याची प्रवृत्ती ही आपल्या समाजात खोलवर मुरलेली आहे. ती इतकी घट्ट मुरलीय की जणू काही ती आपल्या जनुकांचा(genes) भाग होऊन बसली आहे. एक सर्वसाधारण समज असा आहे, की गर्दी करणारी मंडळी ही आपल्या समाजाच्या आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ स्तरातील असतात. या (गैर)समजातून उच्च व मध्यमवर्ग कायम त्यांच्यावर टीका करतो आणि मग सरकारी कारभार, लोकसंख्या, नियोजन इत्यादींच्या नावाने बोटे मोडतो. परंतु, या समजाला छेद देणारा अनुभव मला हैदराबादच्या ‘रामोजी फिल्म सिटी’ मध्ये ७ वर्षांपूर्वी आला.
हा प्रकल्प म्हणजे चित्रपटाच्या चित्रीकरणविषयक सर्व बाबींचे एक भव्य सुंदर प्रदर्शन आहे. ते पाहण्याची तेव्हाची प्रवेश फी होती माणशी पाचशे रुपये. याचा अर्थ सरळ आहे. एवढे तिकीट काढणारा माणूस हा आर्थिक सुस्थितीतला असतो. प्रदर्शनाच्या एका टप्प्यात, चित्रपटात निरनिराळी दृश्ये चित्रित झाल्यावर त्यांमध्ये वेगवेगळे आवाज, भासदृश्ये वगैरे कशी घातली जातात याचे सुरेख प्रात्यक्षिक दाखवले जाते. त्यासाठी ओळीने तीन खोल्यांची रचना केली आहे.
प्रत्येक खोलीत ५० जणांची बसायची सोय आहे. हे लक्षात घेऊनच संयोजक मोजून ५० प्रेक्षकांना पहिल्या खोलीत सोडतात. तेथील भाग बघून झाल्यावर त्या ५० जणांनी क्रमाने दुसऱ्या व तिसऱ्या खोलीत जायचे असते. आता इतके सगळे व्यवस्थित नियोजन केले असल्यावर तेथे गर्दी व्हायचे काही कारण नाही. पण छे! गर्दी केले नाही तर आपण भारतीय कसले?
आमचा पहिल्या खोलीतील कार्यक्रम उरकल्यावर त्यांनी आम्हाला दुसऱ्या खोलीत पाठवले. तिथे व्यवस्थित बाके होती. आमच्यातील बरेच जण तिथे शिरताना अत्यंत उतावीळपणे धावत पळत बाकांवरून चप्पलबुटासह पाय देत जागा पकडत होते. तसेच तेथे बसल्यावर आपापले हात पसरून त्यांच्या मित्रांसाठी जागा अडवून ठेवत होते. हाच अनुभव पुन्हा दुसऱ्यावरून तिसऱ्या खोलीत जाताना आला. सर्वांना बसायची व्यवस्थित सोय असतानाही जी झुंडशाही तिथे दिसून आली, ती मन विषण्ण करणारी होती.
निष्कर्ष काय, तर सतत पुढे पुढे घुसणे आणि विनाकारण गर्दी करून सभ्यतेचे सर्व संकेत तुडवणे हे गुण बहुतेक भारतीयांच्या अंगी भिनलेले आहेत. आर्थिक समृद्धी व शिस्त यांचा एकमेकाशी फारसा संबंध दिसत नाही. असाच अनुभव विमानात बसताना ‘बोर्डिंग’ च्या वेळेस येत असतो. तेथे विमानातल्या आसनसंख्येपेक्षा एकाही जादा बोर्डिंग पास दिलेला नसतो. तरीसुद्धा प्रत्यक्ष विमानात चढण्यासाठी जेव्हा रांग करायला सांगतात, तेव्हा घाईने शिरण्यासाठी जी अहमहमिका चालते ती पाहून कीव करावीशी वाटते.
आपल्याकडे निरनिराळे उत्सव, मेळे, मेळावे, यात्रा, जत्रा, मिरवणुका अन निवडणुका अशा अनेक प्रसंगी गर्दीचे महापूर लोटतात. त्यामध्ये प्रचंड गर्दीच्या जोडीला फटाके व कर्कश संगीत कानठळ्या बसवायला असतातच. गर्दीप्रेमींना प्रिय असणाऱ्या या गोष्टी सामान्यजनांना मात्र उपद्रवकारक ठरतात. अशा प्रसंगी सार्वजनिक शांतता व वाहतूक यांचे तीन-तेरा वाजतात. काही वेळा तर महानगरांमधील महत्वाचे रस्ते २४ तासांपेक्षा अधिक काळ सुद्धा अडवून ठेवले जातात. त्यामुळे कित्येक जणांचे काही ना काही नुकसान होत असते हे कळण्याची कुवत गर्दी करणार्यांकडे अजिबात नसते. बंद केलेल्या रस्त्यांमुळे एखादी आणीबाणीची परिस्थिती उद्भवू शकते, याची तर त्यांना पर्वाच नसते.
गेल्या दोन दशकांमध्ये वाढत्या औद्योगिकरणामुळे आपण माणसांच्या जोडीला वाहनांची गर्दीही बेसुमार वाढवली आहे. त्यात वाहतुकीचे मूलभूत नियम तर आपण केव्हाच धाब्यावर बसवले आहेत. शहरी जीवनातील नेहमीचे दृश्य काय आहे? माणसांच्या झुंडी, वाहनांच्या प्रचंड रांगा, अधूनमधून थेट हमरस्त्यावर आलेले जनावरांचे कळप, पदपथांवर अतिक्रमण केलेले विक्रेते व सर्रास लावून ठेवलेली वाहने आणि जीव मुठीत धरून चालणारे पादचारी. अलीकडे तर उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांनी उच्छाद मांडला आहे. पदपथ हे अतिक्रमणवाल्यांनी कायमचे बळकावल्याने पादचाऱ्यांना आता रस्त्यावर उतरून चालायचीच सवय लागली आहे.
या सगळ्यातून जरा मोकळा श्वास घ्यावा म्हणून पर्यटनास शहराबाहेर पडावे, तर पुढे लगेचच लागतात पथकर नाक्यांवरच्या मोठमोठ्या बेशिस्त वाहनरांगा. महामार्गावरून जाऊन जरा लहान गावात प्रवेश करतोय, तोच आपले स्वागत करतात ‘वसुली’साठी थांबवलेल्या ट्रक्सच्या रांगा. कधीकधी तर अशा रांगांची लांबी किलोमीटर्समध्ये मोजावी लागते. अपघातांच्या निमित्ताने होणारी बघ्यांची गर्दी हा अजून एक कटकटीचा विषय.
हुश्श ! थोडक्यात काय, तर कुठल्या ना कुठल्या गर्दीपासून आपली कधीही सुटका नाही. सतत गर्दी होण्यामागे आपली अवाढव्य लोकसंख्या हे एक कारण असेलही; पण त्याहीपेक्षा महत्वाचे कारण म्हणजे आपल्यामध्ये खोलवर मुरलेली बेशिस्त. आवाक्याबाहेर गेलेल्या या सामाजिक बेशिस्तीचा मूठभर शिस्तप्रिय नागरिकांवर एवढा दबाव पडतो, की वेळप्रसंगी तेही शिस्त मोडायला प्रवृत्त होतात. ढासळती शिस्त पाहून त्यांचा सात्विक संताप वारंवार उफाळून येतो अन हताशपणे तो निवळूनही जातो.
एकंदरीत पाहता ‘ ही निव्वळ गर्दी आहे ’ हे चर्चिलचे विधान आपण शब्दशः आणि लाक्षणिक अशा दोन्ही अर्थांनी खरे केले आहे, असे राहून राहून वाटते. अशा या निव्वळ गर्दीतून भविष्यात कधीतरी शांतता व शिस्तप्रिय समाज निर्माण होऊ शकेल का, यावर जर आपण सखोल विचार करू लागलो तर मग आपल्याही डोक्यात होऊ लागते विचारांची गर्दी !
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक)
*India is a functioning
*India is a functioning anarchy.* -
खालील संदर्भ या चर्चेत चपखल बसतात का माहीत नाही, तरी पण -
1) नोटबंदीच्या काळात नोटा बदलीसाठीच्या वेळेच्या बंधनाचा प्रचंड दबाव असूनही, भारतात अगणित ठिकाणच्या केंद्रांवर लांबलांब रांगा अतिशय शिस्तीत कार्यरत होत्या;
2). दर 8-१५ दिवसांतून एकदा तरी कुणी माथेफिरूने शाळेत, मॉलमध्ये , रस्त्यात गोळीबार करून अनेक बळी घेतल्याची बातमी अमेरिकेतून येतेच. पण त्यामूळेच अमेरिकन हे माथेफिरूच आहेत असं कुणी म्हटल्याचं ऐकिवात नाही.
3) रांगेत आपसांत भांडले तरी भारतीयांनी इतर देशांत जावून तिथल्या मूळ स्थानिकांच्या जमिनी बळकावल्या नाहीत की लाखो युवकांचे बळी घेणारी महायुद्ध जगावर लादली नाहीत.
तात्पर्य - रांगेत शिस्तीत उभं रहाणं हा सुसंस्कृतपणाचा एकमेव निकष नसावा व तसं न उभं रहाणं हा असुसंस्कृतपणाचा एकमेव निकष नसावा !
*एकमेव निकष नसावा ! >> +१.
*एकमेव निकष नसावा !
>> +१.
सहमत. धागा एकूण नागरी जाणीव (
सहमत. धागा एकूण नागरी जाणीव ( फार सुंदर शब्द. आभार कुमार१) आणि सामाजिक बेशिस्त ह्याविषयी आहे. अर्थात हेही सुसंकृत असण्याचे एक अंग आहे, पण हे अंग असणे म्हणजे पूर्ण सुसंस्कृतता, असे नसावे.
नागरी जाणीव असणे हे सुसंस्कृत
नागरी जाणीव असणे हे सुसंस्कृत असण्याचे सर्वोत्तम दृश्यरूप आहे.
(असे माझे मत)
फक्त सर्वांनी रांगेत शिस्तित
रांगेची शिस्त पाळणे हे जर नागरी जाणीव व त्यामुळें सुसंस्कृतपणाच लक्षण असेल, तर नोटबंदी व सार्वत्रिक निवडणुका यावेळच्या जागतिक विक्रमी ठरतील इतक्या प्रचंड रांगांची शिस्त दुर्लक्षून फुटकळ विमानतळ, संगितसभा ई. इथल्या रांगातील बेशिस्तीवरून समस्त देशालाच दोष कां द्यायचा !!
कुठल्याही एकाच निकषावरून
कुठल्याही एकाच निकषावरून संपूर्ण समाजावर शिक्का मारण्याचा अजिबात हेतू नाही.
तरीसुद्धा हे अस्वस्थ करतेच......
माझा भारतीय ट्रेनने बऱ्यापैकी प्रवास होतो. (सर्व स्तरातील) बहुसंख्य भारतीयांमध्ये नागरी जाणीव नसल्याची प्रवासातली ही काही दृश्य मी नेहमी पाहतो :
१. प्रवास करताना मोबाईलवर गाणी/ किंचाळी बातम्या मोठ्या आवाजात लावणे. किंबहुना इअरफोन्स जवळ बाळगायचे असतात याचा बहुसंख्यांना गंध सुद्धा नाही.
२ अ. ) चेअरकार पद्धतीच्या डब्यांमध्ये विमान प्रवासातल्या आकाराइतकी मोठी बॅग घेऊन चढणे आणि मग ती वरच्या कप्प्यामध्ये बसत नसल्यामुळे कडेच्या सीटला लागूनच ठेवणे. त्यामुळे दोन रांगांच्या मधली मार्गिका तीन चतुर्थांश बंद होते.
२. ब ) वातानुकूलित डब्यांमध्ये आपले खाणे पिणे झाल्यानंतर उठण्याचे अजिबात कष्ट नकोत म्हणून खरकटे कप आणि कागदी किंवा प्लास्टिकच्या ताटल्या पुढच्या सीटच्या मागे असलेल्या जाळीत खोचून ठेवणे.
३. शयनयान पद्धतीच्या डब्यांमध्ये जेव्हा आपण बसलेले असतो, तेव्हा समोरचे सीट थोडेसे रिकामे दिसताच मोठ्या माणसांनी त्यावर चप्पल बुटांसकट पाय टेकवून ताणणे. ही सवय लहानपणापासूनच लागू नये यासाठी स्वतःच्या मुलांना बजावण्याची फिकीर नसणे. काहीजण तर वरच्या बर्थवर चढताना देखील बुटांसकट चढतात.
असो.
या बाबतीत सुधारणा अत्यावश्यक
या बाबतीत सुधारणा अत्यावश्यक आहे, यावर दुमतच नाहीं. पण, अशी कुठे तरी बेशिस्त बघून " धरणीमाते, दुभंगुन मला पोटात घे " इतकी आपल्या देशवासीयांची लाज वाटण्याची गरज नसावी, इतकंच.
वरील चर्चेतून सखोल विचार
वरील चर्चेतून सखोल विचार केल्यावर मला असे वाटते की सुसंस्कृतपणा हा खूप व्यापक शब्द आहे. त्या तुलनेत नागरी जाणीव अंगी बाणवणे ही सहज गोष्ट आहे.
या दोन मुद्द्यांकडे स्वतंत्रपणे पाहिल्यास अधिक बरे होईल. एक उदाहरण देतो.
समजा,एखाद्या शिस्तबद्ध देशातला माणूस मद्यपी आहे आणि तो मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक वाहनात (बस, ट्रेन) बसलाय. तरीसुद्धा तो स्वतःचा मोबाईल मोठ्याने लावणार नाही व खिशातला इयरफोन लगेच काढून तो कानात घालेल. म्हणजे या उदाहरणात तो काहीसा ‘असंस्कृत’ असला तरी त्याची नागरी जाणीव चांगली आहे. (‘असंस्कृत’ म्हणण्याचे कारण म्हणजे सार्वजनिक वाहनात धुंद होण्याइतके मद्यपान केलेले नसावे ही अपेक्षा. भारतात तरी बस व ट्रेनमध्ये मद्यपानास परवानगी नाही; इतर देशांमध्ये कल्पना नाही).
भारतीय मद्यपी वरील दोन्ही बाबींमध्ये उणेपणा दाखवेल. याखेरीज तो सर्वांच्या देखत स्टायलीत हातावर तंबाखू- चुना सुद्धा मळू शकेल, असे माझे निरीक्षण.
"नागरी जाणीव असणे हे
"नागरी जाणीव असणे हे सुसंस्कृत असण्याचे सर्वोत्तम दृश्यरूप आहे."
(असे माझे मत) . अनिंद्य + ११११
आपल्या देशवासीयांची लाज
आपल्या देशवासीयांची लाज वाटण्याची गरज नसावी, >>> +१११
माझ्यापुरते सांगतो, मला लाज बिलकुल वाटत नाही. लेखातून मी अधिकतर सात्विक संताप व्यक्त केला आहे.
नागरी जाणीवेच्या बाबतीत सरासरी समाज म्हणून आपण कुठेतरी उणे १00 अशा गुणांवर आहोत. त्यात सुधारणा होत होत निदान पुढच्या पन्नास वर्षात तरी शून्यावर यावे आणि मग त्याच्या पुढच्या पिढ्यांमध्ये हळूहळू अधिक (+) बाजूचे गुण मिळवावेत असं मला मनापासून राहून राहून वाटते.
*नागरी जाणीवेच्या बाबतीत
*नागरी जाणीवेच्या बाबतीत सरासरी समाज म्हणून आपण कुठेतरी उणे १00 अशा गुणांवर आहोत.* -
वागण्यात Sophistication चां अभाव असेल, रांगडेपणा, अडाणीपणाचां पगडा असेल, पण मुलभूत नागरी जाणीव नक्कीच उणे गुणवारीत नाहीं. कारण, तसं असतं तर मुंबईचं जीवन केंव्हाच साफ कोलमडून पडलं असतं . जीवघेण्या घाईगर्दीतही लोक इतरांना समजून, सांभाळून घेताना मी आयुष्यभर बघत आलो आहे !
भाऊ,
भाऊ,
तुमचा मूलभूत जाणीव हा मुद्दा नक्कीच विचार करण्याजोगा आहे आणि तो चर्चेला एक वेगळा आयाम देतो.
मी माझे मत भारतात पाहिलेल्या असंख्य दृश्यांवरुन बनवले आहे. त्या दृश्यांची लांबलचक यादी करण्यात काहीच मतलब नाही. त्यातली काही दृश्य तर इतकी हिडीस स्वरूपाची होती की ते इथे लिहायला शरम वाटेल.
ओंगळपणा आणि बेशिस्तीच्या बाबतीत महानगरांच्या आणि लहान गावांच्या तऱ्हा वेगवेगळ्या.
सार्वजनिक शांततेचे तीनतेरा याबाबतीत मात्र सगळीकडेच समानता दिसते. या संदर्भात मी फक्त गप्प न बसता काय कृती केली आणि त्याचे काय सरकारी अनुभव आले हे नंतर वेगळ्या प्रतिसादात लिहीन.
*सार्वजनिक शांततेचे तीनतेरा
*सार्वजनिक शांततेचे तीनतेरा याबाबतीत मात्र सगळीकडेच समानता दिसते*. - 100% सहमत . सुधारणेला खूप वाव आहे व त्याची निकडही आहे, हे तर मान्यच आहे. सात्विक संतापही सहज समजण्याजोगा आहे. पण केवळ या एका बाबिवरून संपूर्ण देशाच्या संपूर्ण वागणुकीवर व कुवतीवरच घृणा व्यक्त करणं नाहीं पटत.
लेखात व्यक्त झालेल्या भावनेशी
लेखात व्यक्त झालेल्या भावनेशी बहुतांशी सहमत आहे.
आमच्या शाळेत रोजची शाळा सुटल्यावर एकेका वर्गाला क्रमाने सोडले जाई आणि मुले भराभर बाहेर पडत. तिथे कधी चेंगराचेंगरी पडापडी होत नसे. पण तेच आमच्या उपनग रातल्याच एका शाळेत शाळा सुटल्यावर जिन्यांत चेंगराचेंगरी होऊन अपघात झाल्याची बातमी आली होती. दहावीला ती शाळा मला परीक्षा केंद्र होती तेव्हा तिथले जिने किती अरुंद होते ते कळले.
आमच्या शाळेत काही कार्यक्रमानिमित्त सगळ्या वर्गातल्या मुलांना एकत्र सभागृहात किंवा गच्चीवर जमावे लागे. कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांना रांगेनेच खाली सोडले जाई. पण रोज शिस्तीत जाणारी मुले यावेळी मात्र आपला क्रम यायच्या आधीच पुढच्या मुलांना ढकलू लागत. शेवटी होणार्या या ढकलाढकली, चेंगराचेंगरीचा मला चक्क ताण येत असे, हे आता जाणवते.
विमान लँड झालं की बाहेर पडायला बराच अवकाश असतो. तिथेही भारतीय लोक उगाच आधी उठून उभे राहत पुढे पुढे जायचा प्रयत्न करत असतात.
मुंबईच्या लोकल ट्रेनच्या गर्दीचे वेगळेच नियम असतात. तुम्ही शेवटच्या किंवा त्या आधीच्या स्टेशनवर उतरणार असाल तर आधी चढणार्यांना चढू द्यायचं असतं. मग आपण सावकाश उतरायचं.
एखाद स्थानकावर ट्रेनमध्ये चढायला रांगा लावायचा प्रयोग केल्याची बातमी होती. स्थानकांवर तिकिट खिडक्यांसमोरच्या रांगा बहुतांशी पाळल्या जातात. काही नग तिथे मध्ये घुसू पाहतातच.
बस थांब्यावर बस येईतो रांग असते. बस येताक्षणी ती मोडते. गेल्या काही वर्षांत बसस्थानके सुखकर बनल्यावर प्रवासी नसलेले लोक तिथे गप्पा मारायला वा वेळ घालवायला बसलेले असतात. आणि बस थांब्यातून रांग लागलेली असली तरी काही लोक रस्त्यावर रांगेत राहिल्यासारखे दाखवत उभे असतात. यात स्त्रियांचे प्रमाण अधिक असते.
स्वानुभवकथन, विविध
स्वानुभवकथन, विविध मतप्रदर्शन आणि साधकबाधक चर्चेबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद !
रेल्वे प्रवासात मोबाईलच्या
रेल्वे प्रवासात मोबाईलच्या आवाजाबाबत रेल्वे मंत्रालयाने नवीन नियम जाहीर केलेले आहेत: https://www.google.com/amp/s/www.india.com/business/irctc-latset-news-5-...
प्रश्न आहे तो अंमलबजावणीचा.
मुं बईच्या बेस्टमध्ये मोबाईल
मुं बईच्या बेस्टमध्ये मोबाईल ऐकायचा तर हेडफोन लावून असा नियम नुकताच आला आहे.
अरे वा ! नियम चांगला आहे.
अरे वा !
नियम चांगला आहे.
विचार करायला लावणारा लेख.
विचार करायला लावणारा लेख.
Pages