स्थळ : पुण्यातील रेसकोर्स
काळ : १९७१-७२ दरम्यानचा एक दिवस
प्रसंग : भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची जाहीर सभा
त्यावेळी मी शालेय विद्यार्थी होतो. १९७१ च्या भारत-पाक युद्धात आपण विजयी झाल्यानंतर काही काळाने इंदिराजींची जाहीर सभा तेथे आयोजित केली होती. आपल्या पंतप्रधानांना पाहणे हे एक जनतेचे जबरदस्त आकर्षण असते. त्यामुळे सभेला तोबा गर्दी झालेली. एवढी प्रचंड गर्दी अनुभवण्याचा तो माझ्या आयुष्यातील पहिला प्रसंग होता. त्या गर्दीत आम्ही लहान भावंडे एकमेकांची बोटे घट्ट धरून आमच्या पालकांसमवेत तेथे वावरत होतो. सुमारे तीन तास आम्ही तेथे घालवले असावेत. त्या प्रसंगाची आठवण आता पुसट झालेली आहे. तुटक तुटक काही आठवते आहे.
सभेचे व्यासपीठ आणि सामान्य जनता यांच्यामध्ये खूप अंतर ठेवलेले होते. सर्वत्र प्रचंड धूळ उडत होती. आमच्या पालकांनी आम्हाला उंच उचलून घेऊन व्यासपीठ दाखवण्याचा प्रयत्न केला. पण, आम्हाला तरी इंदिराजी काही दिसल्या नाहीत. एकीकडे त्यांचे भाषण ध्वनिवर्धकातून ऐकू येत होते. तेव्हा त्या बोलताहेत म्हणजे व्यासपीठावर कुठेतरी असणार असे आम्ही समजून घेतले.
नंतर त्यांचे भाषण संपल्यावर नागरिकांनी शिस्तीत हळूहळू कसे बाहेर पडावे याच्या सूचना दिल्या जात होत्या. परंतु, आपले नागरिक मात्र अत्यंत बेशिस्तीत वागत होते. सर्वत्र कमालीचा गोंधळ होता. त्यात उडणाऱ्या धुळीने सर्वांनाच हैराण केले होते. माणसांचे लोंढे एकमेकांवर आदळत होते. सर्वात चीड आणणारा प्रकार म्हणजे काही जण आपल्यापुढे लांब अंतरावर असणाऱ्याना चक्क दगड फेकून मारत होते. आमच्याही अगदी जवळून काही दगड गेले. त्यामुळे आता जीव मुठीत धरून एकमेकाला सांभाळून सुखरूप बाहेर पडणे एवढेच ध्येय आमच्यापुढे होते.
ज्या लोकांना त्या दगडांचा प्रसाद मिळाला, त्यांनी संतापून त्या मारणाऱ्याना शिव्या घातल्या. त्यापैकी कोणाच्या तोंडून तरी मी ‘bastard’ हा शब्द आयुष्यात प्रथम ऐकला, जेव्हा त्याचा अर्थही कळत नव्हता.
सुमारे तासाभराने कसेबसे तिथून बाहेर पडल्यावर अगदी हायसे वाटले. आमचे पालक तसेच इतर काही सुबुद्ध नागरिक आता एका मतावर ठाम झाले होते, ते म्हणजे आता पुढच्या आयुष्यात कधीही आपल्या कुठल्याही पंतप्रधानांच्या सभेला जायचे नाही. मी स्वतःही मोठे झाल्यावर हा निर्णय आजपावेतो अमलात आणला आहे व यापुढेही तो कायम ठेवणार आहे. किंबहुना त्या सभेच्या संदर्भात आपला पाकवरील विजय, त्या तडफदार पंतप्रधान वगैरे आठवणी माझ्या विस्मरणात गेल्या. पण, कायमचे चांगले लक्षात काय राहिले तर त्या दिवशीची प्रचंड गर्दी, नागरिकांची कमालीची बेशिस्त, चेंगराचेंगरी, ती अमानुष दगडफेक आणि दगड वर्मी लागलेले व तळतळून शिव्या देणारे लोक.
... आज इतक्या वर्षांनी तो कटू प्रसंग का आठवतोय? विन्स्टन चर्चिल या माजी ब्रिटीश पंतप्रधानांनी भारताबाबत अनेक विधाने केलेली आहेत. जरी ती उपरोधिक वगैरे असली, तरी त्यातली काही अतिशय विचारपूर्वक केली आहेत यात शंका नाही. अधूनमधून आपल्यातले काही विचारवंत त्या विधानांचा दाखला देत असतात. ती विधाने अगदी मार्मिक आहेत. जरी त्या अहंगंड व्यक्तीबद्दल आपल्याला आदर नसला तरीही त्याची ती विधाने आपण आत्मपरीक्षण करावीत अशी आहेत.
परवा असा एक लेख वाचताना चर्चिलच्या ‘त्या’ विधानाची उजळणी झाली आणि ते म्हणजे, “India is not a nation, it is only population”. अर्थात, ‘’भारत हा समाज नाही, ही निव्वळ गर्दी आहे!’’ अशा या ‘गर्दी’चा वरील अनुभव मी शालेय वयात घेतला. संस्कारक्षम वयात झालेला हा एक मोठ्ठा भारतीय संस्कार !
अशा या गर्दी व चेंगराचेंगरीचे संस्कार आपण भारतीय एकमेकांवर पदोपदी करत असतो. तर बघूया आपल्याकडील काही ठरलेल्या गर्दींची झलक.
हे आहे एखादे सरकारी कार्यालय. इथे ठराविक नमुन्यातील अर्ज घेणे, मग तो भरणे, त्यावर अधिकाऱ्याची सही घेणे आणि त्यानंतर पैसे भरणे अशा क्रमाने आपल्याला कामे करायची असतात. हे कार्यालय उघडल्यानंतर तासाभरातच तिथल्या सर्व खिडक्यांसमोर भल्या मोठ्या रांगा दिसू लागतात. अजून थोड्या वेळाने एखाद्या रांगेतले दृश्य पाहूयात. कुठलीही रांग ही पूर्णपणे सरळ कधीच राहत नाही. खिडकीपाशी त्या रांगेला दोन्ही बाजूंनी फाटे फुटतात. मग या फाट्यावर वाढणाऱ्या उपरांगा मूळ रांगेतील शिस्तप्रिय लोकांना त्रस्त करू लागतात. आता कोलाहल माजतो. खिडकीच्या तोंडाशी धुमश्चक्री चालू होते. त्याचा प्रचंड ताण आतील कर्मचाऱ्यावर पडतो. साहजिकच तोही वैतागतो, उभा राहतो, हातातील एखादी वस्तू टेबलावर आपटतो आणि काम थांबवतो.
कधीकधी तर रांगेत धुडगूस घालणाऱ्याना वठणीवर आणण्यासाठी दंडुकेधारी पोलीसही आणावे लागतात. कार्यालयात ‘’रांगेचा फायदा सर्वांना’’ अशा लावलेल्या पाट्या गंजून गेलेल्या असतात व बेशिस्तांचे वागणे पाहून जणू केविलवाण्या झालेल्या दिसतात. जरा आठवून पाहा. ४ वर्षांपूर्वी जेव्हा ‘आधार’ कार्ड काढायच्या रांगा लागत होत्या तेव्हा अनेकांनी या अनागोन्दीचा पुरेपूर अनुभव घेतला होता आणि त्यांना अगदी ‘निराधार’ झाल्यासारखे वाटले होते !
या सर्व अनागोंदीचे मूळ आपल्या बेशिस्तीत आहे. रांगेचा आदर न करता सतत पुढे घुसण्याची प्रवृत्ती आपल्या हाडीमाशी खिळली आहे. या संदर्भात आठवते ते अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटातील त्यांच्या तोंडी असलेले एक चपखल वाक्य, ‘’ हम जहां खडे होते है, लाईन वहीसे शुरू होती है’’. स्वतःला असे ‘बच्चन’ समजणाऱ्यांची संख्या आपल्याकडे भरपूर आहे.
गर्दीचा प्रचंड त्रास होण्याची अजून महत्वाची ठिकाणे म्हणजे रेल्वे व बसस्थानके. आपल्याकडे उन्हाळी व दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान तर या स्थानकांवर गर्दीचा महापूर असतो. रेल्वे हे प्रवासाचे स्वस्त व मस्त साधन असल्याने तिच्या स्थानकावरील झुंबड तर गर्दीच्या सर्व मर्यादा ओलांडते. आता बघूयात एखाद्या महानगरी रेल्वेस्थानकावरील या सुट्यांच्या काळातील दृश्य.
ज्या प्रवाशांची गाडी प्लॅटफॉर्म क्र. एकवर येणार असते ते अत्यंत भाग्यवान ! आता बाकीचे कमनशिबी प्रवासी मात्र पुढील हालअपेष्टाना तोंड द्यायला सज्ज होतात. बहुतांश स्थानकांवर प्लॅटफॉर्म क्र. दोन व त्यापुढील सर्व प्लॅटफॉर्मवर जायचे म्हणजे पादचारी पुलावरून जाणे आले. या पुलावरून एका वेळेस शेकडो प्रवासी तरी ये-जा करत असतात. प्रवासास निघालेले आणि प्रवासाहून परतलेले असे दोन्ही प्रकारचे प्रवासी त्यांच्या भरपूर सामानासहित या पुलावर भिडतात. जाणारे व येणारे यांची चालण्याची बाजू (डावी – उजवी) तरी वेगळी असावी, हा मूलभूत नियम आपल्याला नीट समजायला अजून एक शतक तरी जावे लागेल, अशी सध्या स्थिती आहे.
त्यामुळे या पुलावरून जाताना आपल्याला प्रचंड रेटारेटी, गुदमरणे, घुसमटणे, चेंगरणे आणि कधीतरी तुडवले जाणे अशा सर्व यातनांचा अनुभव येतो. या अग्निदिव्यातून बाहेर पडल्यावर प्रवासी एकदाचा आपल्या इच्छित प्लाटफॉर्मवर येतो. आता पुढचा टप्पा असतो तो म्हणजे गाडी आल्यावर त्यात शिरायचा. आपली बहुसंख्य जनता दुसऱ्या वर्गाच्या डब्याने प्रवास करते. आता बघूया अशा प्रवाशाची गाडीत शिरताना होणारी घुसमट.
प्लॅटफॉर्मवर गाडी येते. आता डब्यातून उतरणारे व चढणारे प्रवासी यांची धुमश्चक्री होते. आधी आतील प्रवाशांना पूर्ण उतरू द्यावे, त्यानंतरच आत जागा होईल व मग बाहेरच्यांनी चढावे, ही किमान समज अजूनही आपल्याला नाही. हल्ली काही निर्लज्ज मंडळी तर गाडी यायच्या आधीच रुळांवर उतरून प्लॅटफॉर्म च्या विरुद्ध बाजूला थांबतात आणि गाडीत तिकडून घुसून दादागिरी करतात. अशा झुंडशाहीमुळे आजकाल दुसऱ्या वर्गाच्या आरक्षित डब्यांनाही सामान्य अनारक्षित डब्यांचे स्वरूप आलेले आहे.
प्रवासासंबंधी एक संस्कृत वचन असे आहे ,’’किं सुखं प्रवासगमनं”. मला आठवते, की आमच्या शाळेतील संस्कृतच्या शिक्षकानी ते आम्हाला सांगताना आपल्याकडील वास्तव जाणवून दिले होते. ते असे, ’’किं सुखं अप्रवासगमनं” ! खरेय, आपल्या देशात प्रवास करणे ही खरोखरीच सुखाची गोष्ट राहिलेली नाही.
निरनिराळ्या सार्वजनिक ठिकाणी विविध प्रसंगी गर्दी करण्याची प्रवृत्ती ही आपल्या समाजात खोलवर मुरलेली आहे. ती इतकी घट्ट मुरलीय की जणू काही ती आपल्या जनुकांचा(genes) भाग होऊन बसली आहे. एक सर्वसाधारण समज असा आहे, की गर्दी करणारी मंडळी ही आपल्या समाजाच्या आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ स्तरातील असतात. या (गैर)समजातून उच्च व मध्यमवर्ग कायम त्यांच्यावर टीका करतो आणि मग सरकारी कारभार, लोकसंख्या, नियोजन इत्यादींच्या नावाने बोटे मोडतो. परंतु, या समजाला छेद देणारा अनुभव मला हैदराबादच्या ‘रामोजी फिल्म सिटी’ मध्ये ७ वर्षांपूर्वी आला.
हा प्रकल्प म्हणजे चित्रपटाच्या चित्रीकरणविषयक सर्व बाबींचे एक भव्य सुंदर प्रदर्शन आहे. ते पाहण्याची तेव्हाची प्रवेश फी होती माणशी पाचशे रुपये. याचा अर्थ सरळ आहे. एवढे तिकीट काढणारा माणूस हा आर्थिक सुस्थितीतला असतो. प्रदर्शनाच्या एका टप्प्यात, चित्रपटात निरनिराळी दृश्ये चित्रित झाल्यावर त्यांमध्ये वेगवेगळे आवाज, भासदृश्ये वगैरे कशी घातली जातात याचे सुरेख प्रात्यक्षिक दाखवले जाते. त्यासाठी ओळीने तीन खोल्यांची रचना केली आहे.
प्रत्येक खोलीत ५० जणांची बसायची सोय आहे. हे लक्षात घेऊनच संयोजक मोजून ५० प्रेक्षकांना पहिल्या खोलीत सोडतात. तेथील भाग बघून झाल्यावर त्या ५० जणांनी क्रमाने दुसऱ्या व तिसऱ्या खोलीत जायचे असते. आता इतके सगळे व्यवस्थित नियोजन केले असल्यावर तेथे गर्दी व्हायचे काही कारण नाही. पण छे! गर्दी केले नाही तर आपण भारतीय कसले?
आमचा पहिल्या खोलीतील कार्यक्रम उरकल्यावर त्यांनी आम्हाला दुसऱ्या खोलीत पाठवले. तिथे व्यवस्थित बाके होती. आमच्यातील बरेच जण तिथे शिरताना अत्यंत उतावीळपणे धावत पळत बाकांवरून चप्पलबुटासह पाय देत जागा पकडत होते. तसेच तेथे बसल्यावर आपापले हात पसरून त्यांच्या मित्रांसाठी जागा अडवून ठेवत होते. हाच अनुभव पुन्हा दुसऱ्यावरून तिसऱ्या खोलीत जाताना आला. सर्वांना बसायची व्यवस्थित सोय असतानाही जी झुंडशाही तिथे दिसून आली, ती मन विषण्ण करणारी होती.
निष्कर्ष काय, तर सतत पुढे पुढे घुसणे आणि विनाकारण गर्दी करून सभ्यतेचे सर्व संकेत तुडवणे हे गुण बहुतेक भारतीयांच्या अंगी भिनलेले आहेत. आर्थिक समृद्धी व शिस्त यांचा एकमेकाशी फारसा संबंध दिसत नाही. असाच अनुभव विमानात बसताना ‘बोर्डिंग’ च्या वेळेस येत असतो. तेथे विमानातल्या आसनसंख्येपेक्षा एकाही जादा बोर्डिंग पास दिलेला नसतो. तरीसुद्धा प्रत्यक्ष विमानात चढण्यासाठी जेव्हा रांग करायला सांगतात, तेव्हा घाईने शिरण्यासाठी जी अहमहमिका चालते ती पाहून कीव करावीशी वाटते.
आपल्याकडे निरनिराळे उत्सव, मेळे, मेळावे, यात्रा, जत्रा, मिरवणुका अन निवडणुका अशा अनेक प्रसंगी गर्दीचे महापूर लोटतात. त्यामध्ये प्रचंड गर्दीच्या जोडीला फटाके व कर्कश संगीत कानठळ्या बसवायला असतातच. गर्दीप्रेमींना प्रिय असणाऱ्या या गोष्टी सामान्यजनांना मात्र उपद्रवकारक ठरतात. अशा प्रसंगी सार्वजनिक शांतता व वाहतूक यांचे तीन-तेरा वाजतात. काही वेळा तर महानगरांमधील महत्वाचे रस्ते २४ तासांपेक्षा अधिक काळ सुद्धा अडवून ठेवले जातात. त्यामुळे कित्येक जणांचे काही ना काही नुकसान होत असते हे कळण्याची कुवत गर्दी करणार्यांकडे अजिबात नसते. बंद केलेल्या रस्त्यांमुळे एखादी आणीबाणीची परिस्थिती उद्भवू शकते, याची तर त्यांना पर्वाच नसते.
गेल्या दोन दशकांमध्ये वाढत्या औद्योगिकरणामुळे आपण माणसांच्या जोडीला वाहनांची गर्दीही बेसुमार वाढवली आहे. त्यात वाहतुकीचे मूलभूत नियम तर आपण केव्हाच धाब्यावर बसवले आहेत. शहरी जीवनातील नेहमीचे दृश्य काय आहे? माणसांच्या झुंडी, वाहनांच्या प्रचंड रांगा, अधूनमधून थेट हमरस्त्यावर आलेले जनावरांचे कळप, पदपथांवर अतिक्रमण केलेले विक्रेते व सर्रास लावून ठेवलेली वाहने आणि जीव मुठीत धरून चालणारे पादचारी. अलीकडे तर उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांनी उच्छाद मांडला आहे. पदपथ हे अतिक्रमणवाल्यांनी कायमचे बळकावल्याने पादचाऱ्यांना आता रस्त्यावर उतरून चालायचीच सवय लागली आहे.
या सगळ्यातून जरा मोकळा श्वास घ्यावा म्हणून पर्यटनास शहराबाहेर पडावे, तर पुढे लगेचच लागतात पथकर नाक्यांवरच्या मोठमोठ्या बेशिस्त वाहनरांगा. महामार्गावरून जाऊन जरा लहान गावात प्रवेश करतोय, तोच आपले स्वागत करतात ‘वसुली’साठी थांबवलेल्या ट्रक्सच्या रांगा. कधीकधी तर अशा रांगांची लांबी किलोमीटर्समध्ये मोजावी लागते. अपघातांच्या निमित्ताने होणारी बघ्यांची गर्दी हा अजून एक कटकटीचा विषय.
हुश्श ! थोडक्यात काय, तर कुठल्या ना कुठल्या गर्दीपासून आपली कधीही सुटका नाही. सतत गर्दी होण्यामागे आपली अवाढव्य लोकसंख्या हे एक कारण असेलही; पण त्याहीपेक्षा महत्वाचे कारण म्हणजे आपल्यामध्ये खोलवर मुरलेली बेशिस्त. आवाक्याबाहेर गेलेल्या या सामाजिक बेशिस्तीचा मूठभर शिस्तप्रिय नागरिकांवर एवढा दबाव पडतो, की वेळप्रसंगी तेही शिस्त मोडायला प्रवृत्त होतात. ढासळती शिस्त पाहून त्यांचा सात्विक संताप वारंवार उफाळून येतो अन हताशपणे तो निवळूनही जातो.
एकंदरीत पाहता ‘ ही निव्वळ गर्दी आहे ’ हे चर्चिलचे विधान आपण शब्दशः आणि लाक्षणिक अशा दोन्ही अर्थांनी खरे केले आहे, असे राहून राहून वाटते. अशा या निव्वळ गर्दीतून भविष्यात कधीतरी शांतता व शिस्तप्रिय समाज निर्माण होऊ शकेल का, यावर जर आपण सखोल विचार करू लागलो तर मग आपल्याही डोक्यात होऊ लागते विचारांची गर्दी !
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक)
<<<<मागे एकदा न्यूयॉर्क च्या
<<<<मागे एकदा न्यूयॉर्क च्या विमानतळावरून............................उतरताना सुद्धा घाई करून पुढे घुसणारी लोकं कमी नसतात.>>>
हे फक्त भारतीयच नव्हे तर इतर देशातले लोकहि करतात. विमानप्रवास हा वेगळाच विषय. त्यात भारतीय वैशिष्ठ्य फारसे नाही.
<<<मूळात सर्वांना हवे ते मिळेल.. असा विश्वासच कधी आपल्याला मिळू शकला नाही.. आणि बळाच्या, अरेरावीच्या
जोरावर काहीही मिळवता येते.. असा विश्वास मात्र मिळाला.>>> अनुमोदन. नि त्याच्या जोडीला लाच देणे - लवकर नंबर लागावा, नियम पळलेले नसले तरी चालेल असे सगळे काही लाच दिली की जमते.
<<<पण त्याहीपेक्षा महत्वाचे कारण म्हणजे आपल्यामध्ये खोलवर मुरलेली बेशिस्त.>>> +१
<<<<तिकडे भारतीय पिक्चर/ मराठी मंडळ पिक्चर हाउसफुल असेल तर रुमाल टाकून शीटा अडवून लोकं वात आणतात.>>>>
हे इथल्याहि चित्रपट्गृहात बघितले आहे, फरक एव्हढाच पाहिला की इथे फार तर एक किंवा दोन जागा अडवतात, भारतीय लोक दहा बारा जागा अडवतात - अगदी प्लॅनिंग करून - फक्त तुम्ही दोघे पुढे जा नि जागा अडवा , आम्ही दहाबाराजण मागून येतो, किंवा बाहेर उभे राहून गप्पा मारतो!
जाउ दे झाले! जोपर्यंत भारतीयांशी संबंध येत नाही तोपर्यंत एव्हढा त्रास होत नाही.
यावरून एका ब्रिटिश
यावरून एका ब्रिटिश चित्रपटातील एक प्रसंग आठवला. चित्रपट अजिबात लक्षात रहाण्याजोगा नाही पण एक सीन मात्र चाळीस वर्षांनी सुद्धा आठवतो. १९०० सालापूर्वीच्या भारतातील गोष्ट सिनेमात दाखवली आहे. एक नवीन ब्रिटिश अधिकारी भारतात येतो. त्याच्याबरोबर भारतात बरीच वर्षे राहिलेला एक ब्रिटिश अधिकारी असतो. दोघेहि देवळासमोरच्या गर्दीवर नियंत्रण करायला घोड्यावरून येतात. जुना अधिकारी सरसकट सर्वांना चाबकाचे फटकारे मारून क्यू, क्यू करून ओरडत असतो. नवीन अधिकारी म्हणतो, अरे यात या समाजातले काही विद्वान, श्रीमंत, वयाने वृद्ध असेहि लोक आहेत, त्यांच्याशी जरा अदबीने बोल, चाबकाने काय मारतोस?
तो जुना अधिकारी म्हणतो - विद्वान, श्रीमंत, वयाने वृद्ध असो किंवा गरीब असो, शिस्त कुणालाच नाही. यांना फक्त चाबूक मारलेला कळतो!
हे पाहून तेंव्हा अतिशय राग आला होता ब्रिटिशांचा. पण चार पाच वर्षांपूर्वी बालगंधर्वला नाटक पहायला गेलो होतो तिथेहि असे विद्वान, श्रीमंत, वयाने वृद्ध लोक मेंढरांसारखे घोळका करून दारातून आत घुसायला बघत होते - तरी बर सीट नंबर दिलेले होते!
पण आपल्यामध्ये खोलवर मुरलेली बेशिस्त! करणार काय?
भारतीय हे असे - असे म्हणायचे नि सोडून द्यायचे, डोक्याला ताप नको. तसे पाहिले तर अमेरिकन, ब्रिटिश सगळ्या लोकांबद्दलहि असेच काही काही लिहीता येईल, रांगेत उभे रहाणे करत असतील, पण बाकीच्या अनेक गोष्टी सांगता येतील.
नंदया, आभार. तो प्रसंग
नंदया, आभार. तो प्रसंग समर्पक आहे.
सहमत.
मी २ महिन्यांपूर्वी तेथे गेलो
मी २ महिन्यांपूर्वी तेथे गेलो होतो. आता तिकीट ११०० रु. आहे. पण, अनुभव अगदी अस्साच. >>
वाचताना अगदी अगदी झाले. एकूण आपण सुधारू शकत नाही असे खेदाने म्हणतो.
माझ्या हाफीसात गेले 4 5
माझ्या हाफीसात गेले 4 5 वर्षे फॅमिली डे साजरा होतो. पहिल्या वर्षी एम्प्लॉयीसोबत किती लोक यावेत यावर बंधन नव्हते. 3 दिवस डे साजरा केलेला. मी पहिल्या दिवशी गेलेले. लोकांनी फूड स्टॉल्स वर अगदी झुंबड उडवून दिली आणि अन्न वाढून घ्यायला इतकी खेचाखेची केली की जणू महिनाभर अन्नाचा कणही मिळाला नसावा. आईसक्रीमच्या स्टॉलवर तर मोठा थाळ भरून कप ठेवलेले अर्ध्या मिनिटात गायब. इतकी खेचाखेची की उभे राहायलाही नीट जागा नाही तिथे एक वृद्ध जोडपे हातात एक कप व अजून एक कप दुमडलेल्या कोपरावर ठेवलेला अशा अवस्थेत आईसक्रिम खात होते. मी नुसते फिरून पाहत होते, दोन तास टंगळ मंगळ करून मग जेवले. खरेतर फॅमिली डे हा आपल्या ऑफिसच्या लोकांशी फॅमिलीशी ओळख करून घ्यायची/द्यायची, ज्या बॉस मुळे बाबा नेहमी लेट येतात त्यांना प्रत्यक्ष भेटायची संधी मिळावी यासाठी आखलेला वगैरे वगैरे... सगळे एम्प्लॉयी व त्यांच्यात फॅमिलीज सहभोजनाचा आनंद घेत एकमेकांशी गप्पा मारतील ही अपेक्षा. पण तसे काहीही न घडता लोकांनी अन्नासाठी नुसती ढकलाढकली केली. आणि वर इतकी मारामारी करून मिळवलेल्या अन्नातले अर्ध्याहून जास्त अन्न टाकून दिले. कारण वाढून घेताना परत मिळणार नाही या भयाने खाता येईल त्यापेक्षा दुप्पट अन्न वाढून घेतलेले. आयोजक स्टाफ मधले लोक हताश होऊन हे सगळे पाहत होते. नंतरच्या वर्षी शहाणे झाले ते आणि बरोबर चाप लावला लोकांना.
ऑफिस मधल्या स्टोर मध्ये इलेक्ट्रॉनिकस वस्तूंचा सेल लावलेला तेव्हा इतकी प्रचंड गर्दी उसळली की दुकान 1 तास आधी उघडावे लागले. लोकांनी आत घुसून हेड फोन , मोबाईल वगैरेंचे वरचे पॅकिंग तोडून देऊन वस्तू खिशात टाकल्या. दुकानही आपले, सेलही आपलाच व लोकही आपलेच. कोणी बाहेरचे नाही. तरीही ही अशी वृत्ती का असावी?
साधना, ह्या प्रकारात आपल्या
साधना, ह्या प्रकारात आपल्या आधी कोणी येऊन घेऊन जाईल आणि मग आपल्याला मिळणार नाही हा फोबिया मनात असतो .सगळं आपल्यालाच मिळाल पाहिजे ही वृत्तीही
नवीन प्रतिसादकांचे आभार.
नवीन प्रतिसादकांचे आभार.
फिरून फिरून एकच म्हणावेसे वाटते, की आपल्यामध्ये खोलवर मुरलेली बेशिस्त ही खरोखर जनुकीय पातळीला जाउन बसली आहे.
आपण मूठभर लोक शिस्तीत वागायचा जरूर प्रयत्न करतो. पण, आजूबाजूस बघून नैराश्य येतेच.
आपण मूठभर लोक शिस्तीत वागायचा
आपण मूठभर लोक शिस्तीत वागायचा जरूर प्रयत्न करतो. पण, आजूबाजूस बघून नैराश्य येतेच>>>>>
मी येऊ देत नाही. लोक माझ्या पातळीवर येत नाहीत तर मी का माझी पातळी सोडून खाली उतरू?
मस्त लिहिलं आहे .
मस्त लिहिलं आहे .
विमान ,ट्रेन, बस, बँक इथे घुसाघुशी केली जातेच पण साध्या वाण्याकडे किंवा भाजी वाल्या कडे ही केली जाते . आपण भाजी घेत असतो मागून कोणीतरी येतो ह्यात स्त्रिया ,पुरुष, तरुण, वयस्कर ,गरीब, सधन सगळेच . आणि एक किलो कांदे बटाटे मिरच्या असं ऑर्डर करतो . हल्ली मी सांगते माझं घेणं चालू आहे ना माझं झालं की घ्या तुम्ही .
कालचाच प्रसंग . मी रिक्षासाठी जिथे नेहमी रिक्षा मिळतात तिथे उभी होते माझ्या मागून एक जण आले , आलेल्या रिक्षात बसले निघून गेले मी तिथेच . नंतर दोन जण आले पण त्याना मी सांगितले मी तुमच्या आधी आले आहे जरी ती रिक्षा तुमच्या पुढ्यात थांबली तरी मीच घेणार नंतर ची तुम्ही घ्या म्हणून .
पण ह्या सगळ्यात किती त्रास होतो .
मनीमोहोर, आभार. एकूण 'नागरी
मनीमोहोर, आभार. एकूण 'नागरी जाणीव' च कमी आहे आपल्या कडे
चित्रपटगृहात जाऊन शांतपणे
चित्रपटगृहात जाऊन शांतपणे चित्रपट पाहणे हे सुख सुद्धा हल्ली मिळत नाही.
काय काय शिकवायचे आहे आपल्या जनतेला ??
हे दोन अनुभव वाचा :
https://www.loksatta.com/manoranjan/menace-of-popcorns-chats-movie-theat...
बंद केलेल्या रस्त्यांमुळे
बंद केलेल्या रस्त्यांमुळे एखादी आणीबाणीची परिस्थिती उद्भवू शकते, याची तर त्यांना पर्वाच नसते.>>
मागच्या महिन्यात माझ्या समोरच्या बिल्डिंग मध्ये लग्न होतं. आमच्या दोन्ही बिल्डिंग चे गेट समोरासमोर आहेत. मी संध्याकाळी गाडी काढायला गेले, तेव्हा लक्षात आलं, समोरच्यांनी त्यांचा मांडव आमच्या बंद गेट वर असा बांधून ठेवला होता, की गेट उघडता येणं शक्यच नव्हतं. सध्या आमच्या बिल्डिंग मध्ये माझ्या व्यतिरिक्त आणखीन एकच कुटुंब आहे. त्यांची गाडी सकाळीच बाहेर काढल्या गेली होती म्हणून ते गप्प.. आणी भर लग्न घरात वाद नको म्हणून नाईलाजाने मी (चडफडत.. संतापून.. ) गप्प. (नाहीतर पुढे कधीतरी, ‘एवढं काय..? एक दिवस करावं की अॅडजस्ट..’ हे ऐकायचं. किंवा .. ‘आमच्या समोर एक भांडकुदळ काकू रहायच्या..’ ही त्या घरातली आठवण होणार.)
पण त्याहीपेक्षा महत्वाचे कारण म्हणजे आपल्यामध्ये खोलवर मुरलेली बेशिस्त. >>> आता ही सगळी बेशिस्त ट्रॅफिक मध्ये दिसते. सिग्नल च्या दिव्यांना तर शोभेचे दिवे समजतात लोकं. (हे अजूनही माझा सुजलेला पाय बोलतोय.)
देवदर्शनासाठी देऊळातली गर्दी >>> सुदैवाने मला आणी आमच्या घरात इतर कुणालाही देवळात नं गेल्या मुळे काही बिघडतं असं वाटत नाही. तेवढीच आमची गर्दी कमी.
सिग्नल च्या दिव्यांना तर
सिग्नल च्या दिव्यांना तर शोभेचे दिवे समजतात लोकं >>> अ ग दी !
पूर्ण प्रतिसादाशी सहमत...
छान लेख आहे कुमारदादा !
छान लेख आहे कुमारदादा ! तुम्ही म्हणताय तसं हे जनुकीय असावं . पुण्यात राहून PMT ने कित्येक वर्ष प्रवास केल्याचे संस्कार म्हणून कि काय पण इथे आल्यावर बस दिसली कि धावत जाऊन त्यात बसून घेई पर्यंत जीवाला थंडावा मिळत नसे. हळूहळू लक्षात आलं कि खूप बसेस आहेत, खूप frequency आहे आणि मुख्य म्हणजे सहप्रवासी बस मिळेल कि नाही ह्याच्या विवंचनेत नसून त्यांना खात्री आहे कि त्यांना बस मिळणार आहे! पुढे मग आई-बाबा इथे भेटीला आल्यावर त्यांची बसमध्ये चढायची लगबग बघून आणि एकंदरच गोष्टी सगळ्यांसाठी आहेत आणि उपलब्ध आहेत, तुम्ही घाई नाही केलीत तर तुम्ही अनुभवाला मुकणार असे नाही हि गोष्ट पचनी पडायला वेळ गेला हेच खरं
आभार ! तुम्ही घाई नाही केलीत
आभार !
तुम्ही घाई नाही केलीत तर तुम्ही अनुभवाला मुकणार असे नाही हि गोष्ट पचनी पडायला वेळ गेला हेच खरं
>>>> अगदी अगदी ! पटेश...
वंदे भारत मधील प्रवास :
वंदे भारत मधील प्रवास :
हेडफोन्सच्या चोऱ्या.. प्रवाशांचे असभ्यपणे बसणे आणि वागणे.. गाडीतील अस्वच्छता आणि.. गाडीवर दगडफेक ..
https://www.msn.com/en-in/travel/news/vande-bharats-win-hearts-but-do-we...
आपली लायकी नाही हेच खरे !
वंदे भारत मधील प्रवास :>>>
वंदे भारत मधील प्रवास :>>> शासन व दंड करणारी यंत्रणा जर कार्यरत नसेल तर हे असेच होणार आपल्या देशात
आपली लायकी नाही हेच खरे !....
आपली लायकी नाही हेच खरे !...... अगदी अगदी!
अरेरे
अरेरे
>>>शासन व दंड करणारी यंत्रणा
>>>शासन व दंड करणारी यंत्रणा जर कार्यरत नसेल तर हे असेच होणार आपल्या देशात>>>
+999
तेजस एक्सप्रेसच्या बाबतीतही
तेजस एक्सप्रेसच्या बाबतीतही असाच प्रकार झाला होता. पहिल्या दिवशी प्रवास मोफत किंवा अत्यल्प किंमतीत असा काहीतरी होता. अत्यंत सुंदर आणि सुसज्ज ट्रेन शेवटच्या स्टेशनला पोहोचेपर्यंत पार ओरबाडून निघाली होती. त्यात बसवलेले स्क्रिन्स, हेडफोन्स तर लोकांनी तोडून चोरलेच पण मागे बाटल्या, पॅकेट्स्, कागद इ. कचरा सोडायला विसरले नव्हते ते सजग प्रवाशी.
शिस्त लागायला शतकं जातात आणि बेशिस्त क्षणात अंगात संचारते. इथे खरं तर तो शिस्तीचा बडगा का काय तो उगारायला हवा.
खरे आहे.
खरे आहे.
वाईट इतिहासाची वारंवार पुनरावृत्ती होत राहते आहे
सर्वांशी सहमत.
बुवाबाजी, अंधश्रद्धा
बुवाबाजी, अंधश्रद्धा बोकाळण्यामागे असलेलं कारणच इथेही लागू होतं, असं मला वाटतं. बारीक सारीक बाबतीतही स्वतः विचार करून निर्णय घेणं यापेक्षा सगळे जाताहेत त्या दिशेने जाणं, हा सोपा मार्ग आपण पूर्वापार आपल्या जीवनाचा महामार्ग बनवून ठेवला आहे. याचं बोलकं उदाहरण वरतीच कुणीतरी दीलेलंच आहे -
*...टाईमपास करत दोन ते तीन मिनिटे थांबून घेतो. अजूनही पुढची ट्रेन यायला काही मिनिटांचा अवकाश असतो. आणि त्या मधल्या काळात त्या ब्रिजवर ये-जा करणारे चिटपाखरूही नसते. घरी पोहोचायला तेवढा दोन ते तीन मिनिटे उशीर होतो याने. पण घामेजलेल्या गर्दीत भरडले न जाता आरामात बाहेर पडता येते. असा विचार करणारे चार टक्के का होईन लोकं असतात. ते तेवढेच सोबत असतात.*
<< आपली लायकी नाही हेच खरे !
<< आपली लायकी नाही हेच खरे ! >>
भारतातील लोकांनीच हे म्हटले आहे, ते बरे झाले. साधारण अनुभव असा आहे की इतरांनी जराही काही म्हणले की आवडत नाही.
भारतात असताना अशीच गर्दी
भारतात असताना अशीच गर्दी अनेकवेळा अनुभवली आहे.
अमेरिकेत सामान्यतः वेगळा अनुभव येतो. लोक रांगेचा आणि इतरांचा आदर करतात असे अनुभवास येते.
असे असून भारताला बाहेरच्या देशात राहून उगाच नावे ठेवण्याची लाज वाटते म्हणून अधिक खोलात जाऊन विचार केला तेव्हा लक्षात आलेले काही मुद्दे!
भारताचे आणि अमेरिकेचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या यांचा विचार केल्यास, भारतात साधारण पणे ९ व्यक्तींना मिळणाऱ्या जागेत अमेरिकेत एक व्यक्ती राहते. अर्थात संसाधने मिळवण्यासाठी भारतात जास्त संघर्ष करावा लागतो. आणि याच कारणामुळे आपली व्यवस्था (सरकार, आणि इतर संस्था) आपल्या लोकसंख्येच्या गरजेला पुऱ्या पडत नाहीत. व्यवस्थेच्या अभावात, संघर्षाचा जगन्मान्य मार्ग म्हणजे दादागिरी. म्हणून मुळात भारतात दादागिरी जास्त आहे असं वाटत.
हे म्हणत असतानाच अमेरिकेत मोठमोठाली वादळं होऊन अनेकदा अभावाची परिस्थिती निर्माण होते. त्या परिस्थितीची तुलना जर भारतात घडलेल्या अशा नैसर्गिक संकटांच्या परिस्थितीशी केली तर बरोबर उलट चित्र पुस्तकातून आणि इतर ठिकाणाहून वाचायला मिळालं. सामान्यतः प्रत्येक पुस्तकात, लेखात अमेरिकन मनुष्यावर जेव्हा उपासमारीची आणि संकटांची वेळ येते, तेव्हा तो दुसऱ्याच हिसकावून घ्यायला सुद्धा कमी करत नाही. आणि त्याच वेळी त्याच परिसरात असणाऱ्या इतर समृद्ध अमेरिकन व्यक्तींना आपल्या बांधवांची पर्वा नसते. (तशी पर्वा कुणी केल्याचं माझ्या वाचनात आलं नाही. कदाचित माझ वाचं कमी पडलं असेल).
पण भारतात नैसर्गिक संकटांमुळे अभावाची परिस्थिती जेव्हा जेव्हा निर्माण झाली तेव्हा प्रत्येक मनुष्य आपल्या परीने इतरांसाठी जे शक्य होईल ते सगळं करत असल्याचं वारंवार वाचायला मिळत. २००५ सालच्या मुंबईच्या पावसात ते मी स्वतः अनुभवलं आहे. आणि असे २-४ दिवस मदत करणारे अनेक लोक तर आहेतच पण पाणी फाउंडेशन सारखी श्रमदानातून उभी राहिलेली संघटना हे भारतीयांच्या माणुसकीच प्रत्यक्ष उदाहरण आहे.
म्हणून मला असं जाणवलं, कि जरी वरकरणी भारतीय लोक बेशिस्त आणि दादागिरी करणारे वाटत असले तरी व्यवस्थेच्या अभावात भारतीय लोकांची काम चालू ठेवण्याची आणि पुढे नेण्याची पद्धत बाकी जगात अभावानेच आढळून येते. भारतात सदासर्वकाळ व्यवस्थेचा अभाव असल्याचा हा एक चांगला परिणाम म्हणावा का?
चांगली चर्चा.
चांगली चर्चा.
भारतीय आणि अन्य देशातील लोक यांची तुलना करणारे विश्लेषण आवडले.
*भारतीय आणि अन्य देशातील लोक
*भारतीय आणि अन्य देशातील लोक यांची तुलना करणारे विश्लेषण आवडले.* +१ !
माझाही एक अनुभव...२
माझाही एक अनुभव...२ महिन्यांपूर्वी बालगंधर्व ला नाटक पाहायचा योग आला. घरापासून बरच लांब असल्यामुळे लवकर निघून १५ मिन .आधी पोचलो..ऑनलाईन तिकीट ज्यांनी बुक केली होती त्यांच्याकरता तिकीटाची हार्ड कॉपी देण्यासाठी वेगळी लाईन होती. तिथे झुंबड उडाली होती... तिथला माणूस ओरडून सांगत होता की ऑनलाईन booking confirm असेल तर इथे तिकीट मिळेल...गर्दी करू नका...ओळीने या..एकेकाची ४ किंवा ५ तिकीट होती...पण शपत्त्त कोणी एकेल तर...प्रत्येक जण पुढे घुसायला बघत होता...तीच गत आत शिरताना...सगळ्यांचे सीट नंबर confirm ahet तरी एवढी ढकलाढकली का?
आत मध्ये परत बालगंधर्वांच्या दोन्ही फोटो समोर सेल्फी काढायची गर्दी...
खग्या, प्रतिसाद आवडला.
खग्या, प्रतिसाद आवडला.
India is a functioning
India is a functioning anarchy.
कोणी म्हटलंय बरं!
Pages