स्थळ : पुण्यातील रेसकोर्स
काळ : १९७१-७२ दरम्यानचा एक दिवस
प्रसंग : भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची जाहीर सभा
त्यावेळी मी शालेय विद्यार्थी होतो. १९७१ च्या भारत-पाक युद्धात आपण विजयी झाल्यानंतर काही काळाने इंदिराजींची जाहीर सभा तेथे आयोजित केली होती. आपल्या पंतप्रधानांना पाहणे हे एक जनतेचे जबरदस्त आकर्षण असते. त्यामुळे सभेला तोबा गर्दी झालेली. एवढी प्रचंड गर्दी अनुभवण्याचा तो माझ्या आयुष्यातील पहिला प्रसंग होता. त्या गर्दीत आम्ही लहान भावंडे एकमेकांची बोटे घट्ट धरून आमच्या पालकांसमवेत तेथे वावरत होतो. सुमारे तीन तास आम्ही तेथे घालवले असावेत. त्या प्रसंगाची आठवण आता पुसट झालेली आहे. तुटक तुटक काही आठवते आहे.
सभेचे व्यासपीठ आणि सामान्य जनता यांच्यामध्ये खूप अंतर ठेवलेले होते. सर्वत्र प्रचंड धूळ उडत होती. आमच्या पालकांनी आम्हाला उंच उचलून घेऊन व्यासपीठ दाखवण्याचा प्रयत्न केला. पण, आम्हाला तरी इंदिराजी काही दिसल्या नाहीत. एकीकडे त्यांचे भाषण ध्वनिवर्धकातून ऐकू येत होते. तेव्हा त्या बोलताहेत म्हणजे व्यासपीठावर कुठेतरी असणार असे आम्ही समजून घेतले.
नंतर त्यांचे भाषण संपल्यावर नागरिकांनी शिस्तीत हळूहळू कसे बाहेर पडावे याच्या सूचना दिल्या जात होत्या. परंतु, आपले नागरिक मात्र अत्यंत बेशिस्तीत वागत होते. सर्वत्र कमालीचा गोंधळ होता. त्यात उडणाऱ्या धुळीने सर्वांनाच हैराण केले होते. माणसांचे लोंढे एकमेकांवर आदळत होते. सर्वात चीड आणणारा प्रकार म्हणजे काही जण आपल्यापुढे लांब अंतरावर असणाऱ्याना चक्क दगड फेकून मारत होते. आमच्याही अगदी जवळून काही दगड गेले. त्यामुळे आता जीव मुठीत धरून एकमेकाला सांभाळून सुखरूप बाहेर पडणे एवढेच ध्येय आमच्यापुढे होते.
ज्या लोकांना त्या दगडांचा प्रसाद मिळाला, त्यांनी संतापून त्या मारणाऱ्याना शिव्या घातल्या. त्यापैकी कोणाच्या तोंडून तरी मी ‘bastard’ हा शब्द आयुष्यात प्रथम ऐकला, जेव्हा त्याचा अर्थही कळत नव्हता.
सुमारे तासाभराने कसेबसे तिथून बाहेर पडल्यावर अगदी हायसे वाटले. आमचे पालक तसेच इतर काही सुबुद्ध नागरिक आता एका मतावर ठाम झाले होते, ते म्हणजे आता पुढच्या आयुष्यात कधीही आपल्या कुठल्याही पंतप्रधानांच्या सभेला जायचे नाही. मी स्वतःही मोठे झाल्यावर हा निर्णय आजपावेतो अमलात आणला आहे व यापुढेही तो कायम ठेवणार आहे. किंबहुना त्या सभेच्या संदर्भात आपला पाकवरील विजय, त्या तडफदार पंतप्रधान वगैरे आठवणी माझ्या विस्मरणात गेल्या. पण, कायमचे चांगले लक्षात काय राहिले तर त्या दिवशीची प्रचंड गर्दी, नागरिकांची कमालीची बेशिस्त, चेंगराचेंगरी, ती अमानुष दगडफेक आणि दगड वर्मी लागलेले व तळतळून शिव्या देणारे लोक.
... आज इतक्या वर्षांनी तो कटू प्रसंग का आठवतोय? विन्स्टन चर्चिल या माजी ब्रिटीश पंतप्रधानांनी भारताबाबत अनेक विधाने केलेली आहेत. जरी ती उपरोधिक वगैरे असली, तरी त्यातली काही अतिशय विचारपूर्वक केली आहेत यात शंका नाही. अधूनमधून आपल्यातले काही विचारवंत त्या विधानांचा दाखला देत असतात. ती विधाने अगदी मार्मिक आहेत. जरी त्या अहंगंड व्यक्तीबद्दल आपल्याला आदर नसला तरीही त्याची ती विधाने आपण आत्मपरीक्षण करावीत अशी आहेत.
परवा असा एक लेख वाचताना चर्चिलच्या ‘त्या’ विधानाची उजळणी झाली आणि ते म्हणजे, “India is not a nation, it is only population”. अर्थात, ‘’भारत हा समाज नाही, ही निव्वळ गर्दी आहे!’’ अशा या ‘गर्दी’चा वरील अनुभव मी शालेय वयात घेतला. संस्कारक्षम वयात झालेला हा एक मोठ्ठा भारतीय संस्कार !
अशा या गर्दी व चेंगराचेंगरीचे संस्कार आपण भारतीय एकमेकांवर पदोपदी करत असतो. तर बघूया आपल्याकडील काही ठरलेल्या गर्दींची झलक.
हे आहे एखादे सरकारी कार्यालय. इथे ठराविक नमुन्यातील अर्ज घेणे, मग तो भरणे, त्यावर अधिकाऱ्याची सही घेणे आणि त्यानंतर पैसे भरणे अशा क्रमाने आपल्याला कामे करायची असतात. हे कार्यालय उघडल्यानंतर तासाभरातच तिथल्या सर्व खिडक्यांसमोर भल्या मोठ्या रांगा दिसू लागतात. अजून थोड्या वेळाने एखाद्या रांगेतले दृश्य पाहूयात. कुठलीही रांग ही पूर्णपणे सरळ कधीच राहत नाही. खिडकीपाशी त्या रांगेला दोन्ही बाजूंनी फाटे फुटतात. मग या फाट्यावर वाढणाऱ्या उपरांगा मूळ रांगेतील शिस्तप्रिय लोकांना त्रस्त करू लागतात. आता कोलाहल माजतो. खिडकीच्या तोंडाशी धुमश्चक्री चालू होते. त्याचा प्रचंड ताण आतील कर्मचाऱ्यावर पडतो. साहजिकच तोही वैतागतो, उभा राहतो, हातातील एखादी वस्तू टेबलावर आपटतो आणि काम थांबवतो.
कधीकधी तर रांगेत धुडगूस घालणाऱ्याना वठणीवर आणण्यासाठी दंडुकेधारी पोलीसही आणावे लागतात. कार्यालयात ‘’रांगेचा फायदा सर्वांना’’ अशा लावलेल्या पाट्या गंजून गेलेल्या असतात व बेशिस्तांचे वागणे पाहून जणू केविलवाण्या झालेल्या दिसतात. जरा आठवून पाहा. ४ वर्षांपूर्वी जेव्हा ‘आधार’ कार्ड काढायच्या रांगा लागत होत्या तेव्हा अनेकांनी या अनागोन्दीचा पुरेपूर अनुभव घेतला होता आणि त्यांना अगदी ‘निराधार’ झाल्यासारखे वाटले होते !
या सर्व अनागोंदीचे मूळ आपल्या बेशिस्तीत आहे. रांगेचा आदर न करता सतत पुढे घुसण्याची प्रवृत्ती आपल्या हाडीमाशी खिळली आहे. या संदर्भात आठवते ते अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटातील त्यांच्या तोंडी असलेले एक चपखल वाक्य, ‘’ हम जहां खडे होते है, लाईन वहीसे शुरू होती है’’. स्वतःला असे ‘बच्चन’ समजणाऱ्यांची संख्या आपल्याकडे भरपूर आहे.
गर्दीचा प्रचंड त्रास होण्याची अजून महत्वाची ठिकाणे म्हणजे रेल्वे व बसस्थानके. आपल्याकडे उन्हाळी व दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान तर या स्थानकांवर गर्दीचा महापूर असतो. रेल्वे हे प्रवासाचे स्वस्त व मस्त साधन असल्याने तिच्या स्थानकावरील झुंबड तर गर्दीच्या सर्व मर्यादा ओलांडते. आता बघूयात एखाद्या महानगरी रेल्वेस्थानकावरील या सुट्यांच्या काळातील दृश्य.
ज्या प्रवाशांची गाडी प्लॅटफॉर्म क्र. एकवर येणार असते ते अत्यंत भाग्यवान ! आता बाकीचे कमनशिबी प्रवासी मात्र पुढील हालअपेष्टाना तोंड द्यायला सज्ज होतात. बहुतांश स्थानकांवर प्लॅटफॉर्म क्र. दोन व त्यापुढील सर्व प्लॅटफॉर्मवर जायचे म्हणजे पादचारी पुलावरून जाणे आले. या पुलावरून एका वेळेस शेकडो प्रवासी तरी ये-जा करत असतात. प्रवासास निघालेले आणि प्रवासाहून परतलेले असे दोन्ही प्रकारचे प्रवासी त्यांच्या भरपूर सामानासहित या पुलावर भिडतात. जाणारे व येणारे यांची चालण्याची बाजू (डावी – उजवी) तरी वेगळी असावी, हा मूलभूत नियम आपल्याला नीट समजायला अजून एक शतक तरी जावे लागेल, अशी सध्या स्थिती आहे.
त्यामुळे या पुलावरून जाताना आपल्याला प्रचंड रेटारेटी, गुदमरणे, घुसमटणे, चेंगरणे आणि कधीतरी तुडवले जाणे अशा सर्व यातनांचा अनुभव येतो. या अग्निदिव्यातून बाहेर पडल्यावर प्रवासी एकदाचा आपल्या इच्छित प्लाटफॉर्मवर येतो. आता पुढचा टप्पा असतो तो म्हणजे गाडी आल्यावर त्यात शिरायचा. आपली बहुसंख्य जनता दुसऱ्या वर्गाच्या डब्याने प्रवास करते. आता बघूया अशा प्रवाशाची गाडीत शिरताना होणारी घुसमट.
प्लॅटफॉर्मवर गाडी येते. आता डब्यातून उतरणारे व चढणारे प्रवासी यांची धुमश्चक्री होते. आधी आतील प्रवाशांना पूर्ण उतरू द्यावे, त्यानंतरच आत जागा होईल व मग बाहेरच्यांनी चढावे, ही किमान समज अजूनही आपल्याला नाही. हल्ली काही निर्लज्ज मंडळी तर गाडी यायच्या आधीच रुळांवर उतरून प्लॅटफॉर्म च्या विरुद्ध बाजूला थांबतात आणि गाडीत तिकडून घुसून दादागिरी करतात. अशा झुंडशाहीमुळे आजकाल दुसऱ्या वर्गाच्या आरक्षित डब्यांनाही सामान्य अनारक्षित डब्यांचे स्वरूप आलेले आहे.
प्रवासासंबंधी एक संस्कृत वचन असे आहे ,’’किं सुखं प्रवासगमनं”. मला आठवते, की आमच्या शाळेतील संस्कृतच्या शिक्षकानी ते आम्हाला सांगताना आपल्याकडील वास्तव जाणवून दिले होते. ते असे, ’’किं सुखं अप्रवासगमनं” ! खरेय, आपल्या देशात प्रवास करणे ही खरोखरीच सुखाची गोष्ट राहिलेली नाही.
निरनिराळ्या सार्वजनिक ठिकाणी विविध प्रसंगी गर्दी करण्याची प्रवृत्ती ही आपल्या समाजात खोलवर मुरलेली आहे. ती इतकी घट्ट मुरलीय की जणू काही ती आपल्या जनुकांचा(genes) भाग होऊन बसली आहे. एक सर्वसाधारण समज असा आहे, की गर्दी करणारी मंडळी ही आपल्या समाजाच्या आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ स्तरातील असतात. या (गैर)समजातून उच्च व मध्यमवर्ग कायम त्यांच्यावर टीका करतो आणि मग सरकारी कारभार, लोकसंख्या, नियोजन इत्यादींच्या नावाने बोटे मोडतो. परंतु, या समजाला छेद देणारा अनुभव मला हैदराबादच्या ‘रामोजी फिल्म सिटी’ मध्ये ७ वर्षांपूर्वी आला.
हा प्रकल्प म्हणजे चित्रपटाच्या चित्रीकरणविषयक सर्व बाबींचे एक भव्य सुंदर प्रदर्शन आहे. ते पाहण्याची तेव्हाची प्रवेश फी होती माणशी पाचशे रुपये. याचा अर्थ सरळ आहे. एवढे तिकीट काढणारा माणूस हा आर्थिक सुस्थितीतला असतो. प्रदर्शनाच्या एका टप्प्यात, चित्रपटात निरनिराळी दृश्ये चित्रित झाल्यावर त्यांमध्ये वेगवेगळे आवाज, भासदृश्ये वगैरे कशी घातली जातात याचे सुरेख प्रात्यक्षिक दाखवले जाते. त्यासाठी ओळीने तीन खोल्यांची रचना केली आहे.
प्रत्येक खोलीत ५० जणांची बसायची सोय आहे. हे लक्षात घेऊनच संयोजक मोजून ५० प्रेक्षकांना पहिल्या खोलीत सोडतात. तेथील भाग बघून झाल्यावर त्या ५० जणांनी क्रमाने दुसऱ्या व तिसऱ्या खोलीत जायचे असते. आता इतके सगळे व्यवस्थित नियोजन केले असल्यावर तेथे गर्दी व्हायचे काही कारण नाही. पण छे! गर्दी केले नाही तर आपण भारतीय कसले?
आमचा पहिल्या खोलीतील कार्यक्रम उरकल्यावर त्यांनी आम्हाला दुसऱ्या खोलीत पाठवले. तिथे व्यवस्थित बाके होती. आमच्यातील बरेच जण तिथे शिरताना अत्यंत उतावीळपणे धावत पळत बाकांवरून चप्पलबुटासह पाय देत जागा पकडत होते. तसेच तेथे बसल्यावर आपापले हात पसरून त्यांच्या मित्रांसाठी जागा अडवून ठेवत होते. हाच अनुभव पुन्हा दुसऱ्यावरून तिसऱ्या खोलीत जाताना आला. सर्वांना बसायची व्यवस्थित सोय असतानाही जी झुंडशाही तिथे दिसून आली, ती मन विषण्ण करणारी होती.
निष्कर्ष काय, तर सतत पुढे पुढे घुसणे आणि विनाकारण गर्दी करून सभ्यतेचे सर्व संकेत तुडवणे हे गुण बहुतेक भारतीयांच्या अंगी भिनलेले आहेत. आर्थिक समृद्धी व शिस्त यांचा एकमेकाशी फारसा संबंध दिसत नाही. असाच अनुभव विमानात बसताना ‘बोर्डिंग’ च्या वेळेस येत असतो. तेथे विमानातल्या आसनसंख्येपेक्षा एकाही जादा बोर्डिंग पास दिलेला नसतो. तरीसुद्धा प्रत्यक्ष विमानात चढण्यासाठी जेव्हा रांग करायला सांगतात, तेव्हा घाईने शिरण्यासाठी जी अहमहमिका चालते ती पाहून कीव करावीशी वाटते.
आपल्याकडे निरनिराळे उत्सव, मेळे, मेळावे, यात्रा, जत्रा, मिरवणुका अन निवडणुका अशा अनेक प्रसंगी गर्दीचे महापूर लोटतात. त्यामध्ये प्रचंड गर्दीच्या जोडीला फटाके व कर्कश संगीत कानठळ्या बसवायला असतातच. गर्दीप्रेमींना प्रिय असणाऱ्या या गोष्टी सामान्यजनांना मात्र उपद्रवकारक ठरतात. अशा प्रसंगी सार्वजनिक शांतता व वाहतूक यांचे तीन-तेरा वाजतात. काही वेळा तर महानगरांमधील महत्वाचे रस्ते २४ तासांपेक्षा अधिक काळ सुद्धा अडवून ठेवले जातात. त्यामुळे कित्येक जणांचे काही ना काही नुकसान होत असते हे कळण्याची कुवत गर्दी करणार्यांकडे अजिबात नसते. बंद केलेल्या रस्त्यांमुळे एखादी आणीबाणीची परिस्थिती उद्भवू शकते, याची तर त्यांना पर्वाच नसते.
गेल्या दोन दशकांमध्ये वाढत्या औद्योगिकरणामुळे आपण माणसांच्या जोडीला वाहनांची गर्दीही बेसुमार वाढवली आहे. त्यात वाहतुकीचे मूलभूत नियम तर आपण केव्हाच धाब्यावर बसवले आहेत. शहरी जीवनातील नेहमीचे दृश्य काय आहे? माणसांच्या झुंडी, वाहनांच्या प्रचंड रांगा, अधूनमधून थेट हमरस्त्यावर आलेले जनावरांचे कळप, पदपथांवर अतिक्रमण केलेले विक्रेते व सर्रास लावून ठेवलेली वाहने आणि जीव मुठीत धरून चालणारे पादचारी. अलीकडे तर उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांनी उच्छाद मांडला आहे. पदपथ हे अतिक्रमणवाल्यांनी कायमचे बळकावल्याने पादचाऱ्यांना आता रस्त्यावर उतरून चालायचीच सवय लागली आहे.
या सगळ्यातून जरा मोकळा श्वास घ्यावा म्हणून पर्यटनास शहराबाहेर पडावे, तर पुढे लगेचच लागतात पथकर नाक्यांवरच्या मोठमोठ्या बेशिस्त वाहनरांगा. महामार्गावरून जाऊन जरा लहान गावात प्रवेश करतोय, तोच आपले स्वागत करतात ‘वसुली’साठी थांबवलेल्या ट्रक्सच्या रांगा. कधीकधी तर अशा रांगांची लांबी किलोमीटर्समध्ये मोजावी लागते. अपघातांच्या निमित्ताने होणारी बघ्यांची गर्दी हा अजून एक कटकटीचा विषय.
हुश्श ! थोडक्यात काय, तर कुठल्या ना कुठल्या गर्दीपासून आपली कधीही सुटका नाही. सतत गर्दी होण्यामागे आपली अवाढव्य लोकसंख्या हे एक कारण असेलही; पण त्याहीपेक्षा महत्वाचे कारण म्हणजे आपल्यामध्ये खोलवर मुरलेली बेशिस्त. आवाक्याबाहेर गेलेल्या या सामाजिक बेशिस्तीचा मूठभर शिस्तप्रिय नागरिकांवर एवढा दबाव पडतो, की वेळप्रसंगी तेही शिस्त मोडायला प्रवृत्त होतात. ढासळती शिस्त पाहून त्यांचा सात्विक संताप वारंवार उफाळून येतो अन हताशपणे तो निवळूनही जातो.
एकंदरीत पाहता ‘ ही निव्वळ गर्दी आहे ’ हे चर्चिलचे विधान आपण शब्दशः आणि लाक्षणिक अशा दोन्ही अर्थांनी खरे केले आहे, असे राहून राहून वाटते. अशा या निव्वळ गर्दीतून भविष्यात कधीतरी शांतता व शिस्तप्रिय समाज निर्माण होऊ शकेल का, यावर जर आपण सखोल विचार करू लागलो तर मग आपल्याही डोक्यात होऊ लागते विचारांची गर्दी !
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक)
पटलं!
पटलं!
खर आहे... रांगेवरुन, सिग्नल
खर आहे... रांगेवरुन, सिग्नल वरच्या गोंधळावरुन कितीदा तरी भांडणे झाली आहेत, लाज वाटते अशा लोकांची...
वावे आणि स्वधा :
वावे आणि स्वधा : प्रतिसादाबद्दल आभार.
मागे एकदा न्यूयॉर्क च्या
मागे एकदा न्यूयॉर्क च्या विमानतळावरून मुंबईच्या विमानात बोर्डिंग सुरू व्हायच्या आधी त्या विमानकंपनी च्या प्रतिनिधी ने 'बोर्डिंग तिकीटावर छापलेल्या ग्रूप नंबर प्रमाणे होईल, तेव्हा दारापाशी गर्दी करू नका' असं दोन-तीन वेळा सांगितल्यावर मला ते अपमानास्पद वाटलं होतं, पण बोर्डिंग सुरू झाल्या झाल्या त्या अपमानास्पद टोन मागचं कारण लोकांनी दाखवून दिलं. विमानातून उतरताना सुद्धा घाई करून पुढे घुसणारी लोकं कमी नसतात.
ह्या सगळ्याचं कारण scarcity मधे असावं का? रांगेत उभं राहीलो तर आपला नंबर येईपर्यंत मिळाणारी गोष्ट संपून जाईल ह्या अनुभवातून, तयार झालेल्या भयगंडातून तयार होणारी सवय, गर्दीची मानसिकता असेल का? मी जस्टीफिकेशन देत नाहीये, कारण शोधतोय.
ह्या सगळ्याचं कारण scarcity
ह्या सगळ्याचं कारण scarcity मधे असावं का? रांगेत उभं राहीलो तर आपला नंबर येईपर्यंत मिळाणारी गोष्ट संपून जाईल ह्या अनुभवातून, तयार झालेल्या भयगंडातून तयार होणारी सवय, गर्दीची मानसिकता असेल का? >>>
फेरफटका, मला बरोबर वाटते तुमचे. एक प्रकारची अनिश्चितता कायम आपल्या मानगुटीवर बसल्यासारखी वाटते. पण त्यात भर ही आपल्या अंगभूत बेशिस्तीने पडते.
ही बेशिस्त आपल्या बहुसंख्य लोकांमध्ये पिढ्यानपिढ्या चालू राहिलेली दिसते. याचे मनोमन दुख् होते.
ह्या सगळ्याचं कारण scarcity
ह्या सगळ्याचं कारण scarcity मधे असावं का? रांगेत उभं राहीलो तर आपला नंबर येईपर्यंत मिळाणारी गोष्ट संपून जाईल ह्या अनुभवातून, तयार झालेल्या भयगंडातून तयार होणारी सवय, गर्दीची मानसिकता असेल का? >> मलाही असंच वाटतं.
खरं म्हणजे विमानातून उतरताना धक्काबुक्की करायची काय गरज? मी सर्कास्टिक मुडमध्ये असले तर कधीकधी लोकांना म्हनतेही की डोंट वरी, इट विल नॉट फ्लाय विथ यु. म
मूळात सर्वांना हवे ते मिळेल..
मूळात सर्वांना हवे ते मिळेल.. असा विश्वासच कधी आपल्याला मिळू शकला नाही.. आणि बळाच्या, अरेरावीच्या
जोरावर काहीही मिळवता येते.. असा विश्वास मात्र मिळाला.
"मूळात सर्वांना हवे ते मिळेल.
"मूळात सर्वांना हवे ते मिळेल.. असा विश्वासच कधी आपल्याला मिळू शकला नाही.. आणि बळाच्या, अरेरावीच्या
जोरावर काहीही मिळवता येते.. असा विश्वास मात्र मिळाला." - सहमत दिनेशदा. त्यातुनच बरचसं त्यागाच्या उदात्तीकरणाचं तत्वज्ञान उदयाला आलय असंही मला वाटतं, पण उगाच विषयाला फाटे फोडत नाही आता.
@ दिनेश., मूळात सर्वांना हवे
@ दिनेश., मूळात सर्वांना हवे ते मिळेल.. असा विश्वासच कधी आपल्याला मिळू शकला नाही.. आणि बळाच्या, अरेरावीच्या जोरावर काहीही मिळवता येते.. असा विश्वास मात्र मिळाला.>>> सुंदर वाक्य लिहिलंत.
जेव्हा एखाद्या प्लॅटफॉर्मवर
जेव्हा एखाद्या प्लॅटफॉर्मवर दोन ट्रेन एकत्र येतात तेव्हा तिथून बाहेर पडणारे ब्रिज तुडुंब भरून जातात. लोकं मुंगी पावलांनी एकमेकांना चिकटत ब्रिजवर चढत असतात. अश्यावेळी मी खिश्यातून मोबाईल काढून त्यावर टाईमपास करत दोन ते तीन मिनिटे थांबून घेतो. अजूनही पुढची ट्रेन यायला काही मिनिटांचा अवकाश असतो. आणि त्या मधल्या काळात त्या ब्रिजवर ये-जा करणारे चिटपाखरूही नसते. घरी पोहोचायला तेवढा दोन ते तीन मिनिटे उशीर होतो याने. पण घामेजलेल्या गर्दीत भरडले न जाता आरामात बाहेर पडता येते. असा विचार करणारे चार टक्के का होईन लोकं असतात. ते तेवढेच सोबत असतात.
एक मात्र आहे, गर्दीचीही एक आपलीच मजा आहे. मी मुंबईचा आहे. कुठे गर्दी नसलेल्या ठिकाणी चार दिवस एकांत निरव शांतता वगैरे अनुभवायला ठिक वाटते. मात्र चार दिवसांनी गर्दी नसेल आसपास तर करमेनासे होते. अगदी त्या पुष्पक मधील कमल हसन सारखे ज्याला कबूतरांच्या आवाजाशिवाय झोप येत नव्हती
पाश्च्यात्य चित्रपटग्रुहात
पाश्च्यात्य चित्रपटग्रुहात आसन क्रमांक नसतात. तिकडे भारतीय पिक्चर/ मराठी मंडळ पिक्चर हाउसफुल असेल तर रुमाल टाकून शीटा अडवून लोकं वात आणतात.
ती करमणूक चालू रहावी वाटत होतं मात्र.
विमानातून बाहेर येणं अजुन धड जमलेलं नाही पण सामानाच्या पट्ट्यावरुन हल्ली सामान चांगलं काढतात. पुर्वी मुंबईला बॅग दिसली की धावत पट्ट्यावर चढलेली लोकं बघितली आहेत.
पुर्वी मुंबईला बॅग दिसली की
पुर्वी मुंबईला बॅग दिसली की धावत पट्ट्यावर चढलेली लोकं बघितली आहेत. Lol ती करमणूक चालू रहावी वाटत होतं मात्र. >>
एकदम सही! ही करमणूक बघायचे भाग्य नाही हो लाभले कधी मला.......
लेखात वर्णन केलेल्या इं. गांधींच्या सभेला इथल्यापैकी कोणी हजर होते का? एक उत्सुकता आहे जाणून घेण्याची.
<लेखात वर्णन केलेल्या इं.
<लेखात वर्णन केलेल्या इं. गांधींच्या सभेला इथल्यापैकी कोणी हजर होते का? एक उत्सुकता आहे जाणून घेण्याची.>
लेखात वर्णन केलेल्या इंदिरा गांधींच्या सभेच्या वेळी इथल्यापैकी किती लोक जन्मलेले होते असा प्रश्न आधी विचारा.
(म्हणजे सभेच्या वेळी जन्मले असे नव्हे हां)
मी मुंबईत्, इंदिरा गांधीना
मी मुंबईत्, इंदिरा गांधीना जवळून बघितलं आहे. त्या काळात बहुदा ट्रक पाठवून पब्लिक
जमवायची पद्धत नव्हती ( गरज नव्हती म्हणा ) त्यांच्या व्यक्तीमत्वाचे वलयच तसे होते.
पहिल्या वहिल्या रांगा आठवताहेत त्या रेशन दुकानावरच्या आणि दूध सेंटर वरच्या.
रॉकेल आलंय असे समजले कि लोक डबा, बाटल्या घेऊन धावत असत आणि ते नेहमीच
अर्धी रांग संपता संपता, संपूनही जात असे. मग रेशनवाला मागच्या दाराने, काळ्या बाजारात ते
विकतो, असे समजायचे.
दूधासाठी तर लोक रात्रीपासूनच दगड लावून ठेवायचे. तेपण सर्वाना मिळत नसे.
आणि त्या काळात रॉकेल किंवा दूध, बाहेर मिळत नसे.
शोले वगैरे सिनेमांच्या तिकिटासाठी पण अश्याच रांगा लागत. दो का पाच, दो का
पाच म्हणणारी लोक्,उघडपणे फिरत असत.
पुर्वी एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज च्या बाहेरही अश्याच रांगा लागत.
पण तरीही रांगेत उभ्या असणार्या प्रत्येकाला न्याय मिळेल, अशी परिस्थिती क्वचितच
होती. पुर्वी बेस्ट च्या बसेस कमी असत. पहिल्या स्टॉपवर काय ती शिस्तीत रांग असे.
अधल्या मधल्या स्टॉपवर नुसती हुल्लड्बाजी. बेस्टने मग काही स्वयंसेवकही नेमले
होते.
एअर डेक्कन ही एक लो कॉस्ट एअरलाईन होती. तिचेही सीट नंबर देत नसत.
मग पब्लिक त्या विमानतळावरच्या बस मधेही दाराजवळ खेटून उभे असे.
विमानाजवळ बस गेली हि नुसती शर्यत. मला नेहमीच शेवटची सीट आवडत
असल्याने, हि गंमत मला कायम बघायला मिळत असे आणि तरी माझी आवडती
सीट मला मिळतच असे.
विमानाचे झोन वाइज बोर्डींग असते तरी लोक एकाच ठिकाणी गर्दी करतात.
ही बेशिस्त मी बहुतेक एअरपोर्टवर, अगदी दुबई सिंगापूरलाही बघितली.
अपवाद फक्त बाली चा. अगदी छोटा एअरपोर्ट असूनही, अगदी शिस्तबद्ध
बोर्डींग झाले. मूळात रांगाच झोन वाईज लावल्या होत्या. पासपोर्ट तपासणी
रांगेतच झाली. आता पासपोर्ट बॅगेत ठेवा, परत लागणार नाहीत असे सांगितले.
मग झोनवाईजच रांगा उघडल्या.
मलाही इंदिरा गांधींना माझ्या
मलाही इंदिरा गांधींना माझ्या लहानपणी पाहिल्याचे आठवते. मुंबईत सायन येथील मेनरोडवर त्यांना पाहिले होते. अर्थात त्या जीपमध्ये होत्या. आंम्ही शाळेची मुले रस्त्याच्याकडेला फुटपाथवर उभे होतो. आम्हाला टाटा करीत त्या गेल्या. त्यांच्या गाडीचा ताफा अगदी सुसाट गेल्याचे आठवते. इंदिरा गांधींची फक्त झलक तेव्हढी दिसली होती.
भारत पाकिस्तान युद्धही आठवते. तेव्हा आम्ही सायनला रहायचो. तेव्हा शत्रूची विमाने मुंबईवर आली की सगळीकडून जोराने सायरन वाजायचे. घरातून सर्व लोक बाहेर पडून मैदानात जमायची. रात्र असली की ब्लॅक आउट केला जायचा. म्हणजे संपूर्ण मुंबईची लाईट घालवायचे. शत्रूच्या विमानांना दिशाभूल करण्याकरिता सगळीकडे अंधार केला जायचा. सगळ्यांनी आपल्या घराच्या खिडक्यांच्या काचांना ब्राऊन पेपर लावायची ऑर्डर निघाली होती. आम्ही घरात समयीच्या प्रकाशात बसायचो. एवढं करूनही रस्त्यावरून कोणाच्या घरात प्रकाश दिसला तर लोकं आरडा ओरडा करून घरावर दगडफेक करायची.
एकदा आठवतं सायरन वाजले, ब्लॅक आउट झाला, आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो. सगळ्यांना भीती आता काय होतंय? आणि मग मागच्या ट्रॉम्बे, BARC येथून शत्रूच्या विमानावर गोळाफेक चालू झाली. एकामागोमाग एक, दहा वीस लालबुंद प्रकाशमान बॉम्ब गोळ्यांची माळ शत्रूच्या विमानाचा वेध घ्यायला आकाशात उडू लागली. लोकं बोलायला लागली, बॉम्ब कडे पाहू नका, आंधळे व्हाल. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये शत्रूची दोन विमाने पाडल्याची छायाचित्रे छापून आली होती.
लाईन लावण्याचे प्रकार तर बरेच आठवतात. राशनकरीता, दूध केंद्रावर, ट्रँक कॉल करायला पोस्ट ऑफिस मध्ये, std बूथवर. सकाळी सहालाच दूध केंद्र उघडायचं. दूध आणायचं काम माझ्याकडे असायचं. एखाद्या दिवशी मला उठायला उशीर झाला की दूध संपायचे. मग रिकाम्या हाती घरी गेलो की मार हा ठरलेलाच असायचा.
अशा लाईनी मध्ये बऱ्याच तरुणी तरुणांचे सूत जुळत असे.
पण त्याहीपेक्षा महत्वाचे कारण
पण त्याहीपेक्षा महत्वाचे कारण म्हणजे आपल्यामध्ये खोलवर मुरलेली बेशिस्त. >>> + १००
संपुर्ण लेख पटला.आवडला
भारत पाकिस्तान युद्धही आठवते.
भारत पाकिस्तान युद्धही आठवते. तेव्हा आम्ही सायनला रहायचो. तेव्हा शत्रूची विमाने मुंबईवर आली की सगळीकडून जोराने सायरन वाजायचे. घरातून सर्व लोक बाहेर पडून मैदानात जमायची. रात्र असली की ब्लॅक आउट केला जायचा. >>>
बरोबर. हे मलाही आठवते. आम्ही मुले 'ब्लॅक आउट' चा भाग म्हणून खिडक्यांच्या काचांना आतून काळे कागद चिकटवत असू.
रस्त्यावरून कोणाच्या घरात प्रकाश दिसला तर लोकं आरडा ओरडा करून घरावर दगडफेक करायची. >> हेच तर खरे आपले दुखणे आहे. या वृत्तीचा सदैव त्रास होतो.
अंकु, आभारी आहे.
अजून एक मनापासून लिहिलेला
अजून एक मनापासून लिहिलेला आणि विचार करायला लावणारा लेख.
अजून एक मनापासून लिहिलेला आणि
अजून एक मनापासून लिहिलेला आणि विचार करायला लावणारा लेख. >>>
दक्षिणा, आभार ! तुमच्या प्रतिसादामुळे लेख लिहील्याचे चीज झाले.
मूळात सर्वांना हवे ते मिळेल..
मूळात सर्वांना हवे ते मिळेल.. असा विश्वासच कधी आपल्याला मिळू शकला नाही.. आणि बळाच्या, अरेरावीच्या
जोरावर काहीही मिळवता येते.. असा विश्वास मात्र मिळाला." - सहमत दिनेशदा.
त्यासोबतच त्याग करुन नुकसान पदरी पाडून घेण्यात काही मोठेपणा नाही हा ही धडा मिळाल्यामुळे बेमुर्वतपणा आहेच.
पाश्च्यात्य चित्रपटग्रुहात
पाश्च्यात्य चित्रपटग्रुहात आसन क्रमांक नसतात. >>>
याचे कारण समजू शकेल का?
आसन क्र. असणे हा एक शिस्तीचा भाग नाही का? का असे आहे की तिथले लोक इतके शिस्त प्रिय आहेत की आसन क्र. ची गरज भासत नाही ?
देवदर्शनासाठी देवळातली गर्दी
देवदर्शनासाठी देऊळातली गर्दी
देवदर्शनासाठी देऊळातली गर्दी
देवदर्शनासाठी देऊळातली गर्दी >>> खरे आहे.
एखाद्या सर्वजनिक कार्यक्रमात जर नट्/नटी येणार असेल तर मग काय विचारायलाच नको. ती गर्दी तर अगदी डोक्यात जाते. अशा गर्दीच्या बाबतीत प्रगत देशांत काय परिस्थिती असते ? कोणी सांगेल?
इंटरनेट मुळे आता अनेक ठिकाणची
इंटरनेट मुळे आता अनेक ठिकाणची गर्दी कमी झाली आहे. परिक्शेचे निकाल, बुकिंग, बँकिंग वगैरे. जिथे प्रत्यक्ष देहाने हजर असणे आवश्यक आहे त्या ठिकाणी पर्याय नसतो. गर्दी असली तरी जर शिस्त असेल तर गर्दीचा त्रास होत नाही. पण तसे होत नाही.
>>मूळात सर्वांना हवे ते मिळेल.. असा विश्वासच कधी आपल्याला मिळू शकला नाही.. आणि बळाच्या, अरेरावीच्या
जोरावर काहीही मिळवता येते.. असा विश्वास मात्र मिळाला.<<
दिनेश अगदी पटले.
आता देवळात असणारी गर्दी ला जर आपण सांगितले की अहो परमेश्वर जळी स्थळी काष्ठी पाषाणी आहे गर्दी करु नका! तर काय परिणाम होईल? विशेषतः आषाढी एकादशीला पंढरपूरला होणारी गर्दी
कण कणमें है भगवान अशी
कण कणमें है भगवान अशी आपल्याकडे शिकवण असतांनाही मंदीरात होणारी गर्दी हा प्रश्न मानसशास्त्राच्या दृष्टीतून बघायला हवा...
खरं तर अनेक फिलासाफिकल गोष्टी फक्त दुसर्यांच्या तोंडावर फेकायला वापरल्या जातात, प्रत्यक्षात कोणी त्याचे पालन करत नसतो. त्यातलेच हे एक. कण कण मे है भगवान.
परमेश्वर जळी स्थळी काष्ठी
परमेश्वर जळी स्थळी काष्ठी पाषाणी आहे गर्दी करु नका!
कण कण मे है भगवान. >>>>>.
अशी मानसिकता असती तर किती बरे झाले असते !
पण ती समाजात रुजवणे अशक्य गोष्ट आहे.
>>कण कणमें है भगवान अशी
>>कण कणमें है भगवान अशी आपल्याकडे शिकवण असतांनाही मंदीरात होणारी गर्दी हा प्रश्न मानसशास्त्राच्या दृष्टीतून बघायला हवा... <<
अगदी करेक्ट. निर्गुण निराकार परमेश्वर हा कल्पायला अवघड म्हणून तो सगुण साकार झाला. पुढे तेवढाही तो मानवी मनाच्या स्वास्थ्याला पुरेनासा झाला म्हणून तो भक्तवत्सल करुणा घन झाला. कणाकणात भगवान असून जर त्याचा मला जगणे सुलभ करण्यासाठी काही उपयोग नसेल तर काय त्या भगवानाचा उपयोग? त्याने दुष्टाचा संहार व सुष्टांचे संरक्षण केले पाहिजे. मुख्य मुद्दा जो स्थान महात्म्याचा कि ज्यामुळे विशिष्ट ठिकाणीच जास्त गर्दी होते पंढरपूरला होणारी वारकर्यांची गर्दी व दाभोलकरांच्या स्मृती जतन करण्यासाठी व गुन्ह्याचा तपास लागण्यासाठी बालगंधर्व पुलावर दर २० तारखेला होणारी गर्दी यात तसा फरक नाही. काही लोक याला तुम्ही दाभोलकरांचे मासिक श्राद्ध घालता असे ही म्हणतात. मुद्दा कुठेतरी मेंदुतील असोसिएशनशी आहे. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे त्यामुळे त्याला समूहाची गरज लागते.
मनुष्य हा समाजशील प्राणी आहे
मनुष्य हा समाजशील प्राणी आहे त्यामुळे त्याला समूहाची गरज लागते. >>>>
बरोबर. समूहाची प्रमाणाबाहेर गेलेली बेशिस्त हा आपला कटकटीचा विषय आहे.
समूहाची प्रमाणाबाहेर गेलेली
समूहाची प्रमाणाबाहेर गेलेली बेशिस्त हा आपला कटकटीचा विषय आहे.<<
गणेशोत्सवात ही सामूहिक बेशिस्त दिसते.टिळकांनी सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सावाचा हेतु समाज जागृती व समाजप्रबोधनाचा होता.आज ते स्वरुप दुर्दैवाने राहिले नाही. केवळ धार्मिकतेच्या नावाखाली केलेला समूहउन्माद अशा स्वरुपात आज ते दिसते आहे. समूह उन्मादात सारासार विवेक व विचार नष्ट झालेला असतो.समूह उन्माद हा नेहमी गुन्हेगारीला निमंत्रण देतो.
परंतु, या समजाला छेद देणारा
परंतु, या समजाला छेद देणारा अनुभव मला हैदराबादच्या ‘रामोजी फिल्म सिटी’ मध्ये ७ वर्षांपूर्वी आला. >>> मी २ महिन्यांपूर्वी तेथे गेलो होतो. आता तिकीट ११०० रु. आहे. पण, अनुभव अगदी अस्साच.
म्हणूनच,
आर्थिक समृद्धी व शिस्त यांचा एकमेकाशी फारसा संबंध दिसत नाही. >>>> याला + १०००.
Pages