दऱ्या-खोर्यातुनी भटकायचा तो

Submitted by सुप्रिया जाधव. on 22 April, 2017 - 09:55

दऱ्या-खोर्यातुनी भटकायचा तो
प्रसंगी झाडसुध्दा व्हायचा तो

असावा मागचा पारा उडाला
मनाचा आरसा दडवायचा तो

कधी गवसायचा गर्दीतसुध्दा
स्वतःमध्ये कधी हरवायचा तो

हवे ते खेळणे हातात असुनी
नवे दिसताक्षणी भाळायचा तो

कधी गाळातुनी बाहेर काढी
कधी वणव्यातही ढकलायचा तो

धुक्याचा दाट पडदा व्हायचे मी
कवडश्यासारखा प्रगटायचा तो

कुठे बोलायचा जे पाहिजे ते
हवे त्याला तसे वागायचा तो

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर गझल! शेवटचे चार शेर खूप आवडले,त्यातही

>>>हवे ते खेळणे हातात असुनी
नवे दिसताक्षणी भाळायचा तो>>>लाजवाब!