बाळांचा खाऊ

Submitted by दिनेश. on 19 August, 2011 - 10:00
लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

खालीलप्रमाणे :-

क्रमवार पाककृती: 

लहान मूलांचा आहार हा अनेक आयांसाठी (आईचे अनेकवचन) डोकेदुखीचा भाग असतो. प्रत्येक मूल वेगळे, आवडीनिवडी वेगळ्या आणि गरजाही वेगळ्या.

आता मी काय खाऊ, असे विचारणारी गुणी बाळे अगदीच विरळा. बाळ पुढे धावतय, आई कालवलेला भात घेऊन मागे धावतेय, कार्टूनच बघत खाणार असा हट्ट करणारी बाळं, शाळेतला डबा जसाच्या तसा परत आणणारी बाळं, हेच नेहमी दिसतं.

मी आधी प्रसंगानुरुप बरेच लेखन इथे केले होते. आता ते पदार्थ बहुतेक विसरलोही. पण ते पदार्थ करुन बाळांना भरवल्याचा आठवणी, इथे अजून काही सभासद काढत असतात. काही जणी फोनवर विचारत असतात.

माझ्या परिचयात काही गुणी बाळं आहेत. ती जेवताना मी कौतूकाने बघत बसतो. त्या बाळांना मोठे करण्यात माझा किंचीत हातभार होता. त्यांनी मला जे शिकवलं, ते इथे मांडायचा प्रयत्न करतोय.

शक्यतो आहारदृष्ट्या योग्य असे पदार्थ सूचवीन, पण एखादा पदार्थ अयोग्य वाटला तर अवश्य कळवा. मी कुणी आहारतज्ञ नाही, त्यामूळे शास्त्रीय माहितीचे स्वागतच आहे.

तसेच हे पदार्थ लिहिण्याआधी यासंदर्भात काही मुद्दे लिहिले, तर ते अस्थानी वाटू नयेत अशी अपेक्षा करतो.

१) बाळाच्या गरजा
वाढत्या वयात चौरस आहार लहान मूलांना देणे आवश्यक असते. त्यासाठी आपल्या घरातच सर्व पदार्थ होत आहेत कि नाही, याकडे बघितले पाहिजे. बाळाला हळुहळु मोठ्या माणसांसोबत जेवायची सवय लावली पाहिजे, आणि घरात जे पदार्थ केले जातात ते सर्व त्याने खाल्लेच पाहिजेत, याकडे कटाक्षाने पाहिले पाहिजे.
बाळासाठी वेगळे जेवण, सहसा करुच नये. जर बाळाला काहि पदार्थ फार तिखट वाटत असतील, तर घरातील सर्वांनी थोडे कमी तिखट खाल्ले पाहिजे.

लहान मूलांना अनेक प्रकारची ऍलर्जी असू शकते. शेंगदाणे, चीज, मश्रुम, यीस्ट, काही प्रकारचे मासे. असे पदार्थ खाण्यात आल्यास त्यांच्या अंगावर पुरळ उठणे, खाज येणे, धाप लागणे अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. अशावेळी डॉक्टरांना बाळाने काय खाल्ले होते, ते आवर्जून सांगावे. आणि ते पदार्थ बाळाच्या खाण्यात येणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. ते पदार्थ टाळणे, हाच बहुदा सर्वोत्तम उपाय असतो.

२) मॅगी

बाळांसाठी मॅगी हा शत्रु नंबर एक, असे मी मानतो. एकवेळ कणकेच्या मॅगी मी समजू शकतो, पण बाकीच्या प्रकारातल्या मैदा, तीव्र रसायने आणि वनस्पति तूप, बाळांसाठी निश्चितच योग्य नाही. आकाराने चौकोनी असणार्‍या नूडल्सही एकवेळ ठिक पण गोल असणार्‍या नूडल्स तर चक्क तळलेल्या असतात
(म्हणूनच तर त्या २ मिनिटात शिजतात )
जाहिरातीत दाखवल्या प्रमाणे घरोघरी मॅगी शिजवताना, त्यात क्वचितच भाज्या घातल्या जातात. (इथे मी मॅगी हा शब्द सर्वनाम म्हणून वापरलाय.)
नूडल्स सारखेरच दिसणारे पण जास्त योग्य पदार्थ सूचवतोच.

३) जंक फूड

अनावश्यक प्रमाणात तळलेले पदार्थ, चिप्स, क्रिस्प हे बाळाचे नुकसानच करत असतात. खरे तर बटाटा अजिबात वाईट नाही, पण तळलेल्या रुपात त्याचा काहिही फायदा होत नाही. बटाट्याचेही काही पदार्थ सूचवतोच.

कोलासारखी एअरेटेड पेये पण अजिबात नकोच. बाळाच्या नाजूक पचनसंस्थेचे ती नुकसान तर करतातच शिवाय त्यातून अनावश्यक साखरेशिवाय, दुसरे काहीही मिळत नाही.
बाळांना पेये आवडतात, म्हणून तशी काही पेये पण सुचवतोच.

४) टिव्ही

टीव्हीकडे एकटक बघत बसणारी लहान मुले बघून मला त्यांच्याबद्दल खुप वाईट वाटते. डिस्ने सारखी दर्जेदार कार्टून्स फ़ारच थोडी. त्यातले मनमोहक रंग, सुंदर कथानक बाकिच्या कार्टून्समधे क्वचितच दिसते.
डिस्ने एकेका सेंकदासाठी अनेक चित्रे काढून वापरत असे, बाकिच्या कार्टूनमधे एकाच चित्रावर भागवले जाते ( पात्रे जागच्या जागी उड्या मारताहेत, निव्वळ ओठ हलताहेत..) त्यातले चेहरे भयानक असतात आणि कथानकही.

निव्वळ मूल गप्प बसतय ना मग दे कार्टून लावून, अशी सुरवात होते. आणि आपणच त्यांचे नुकसान करतो. याबाबतीत सुरवातीपासुनच कठोरपणे वागावे लागते. कार्टून बघायला न मिळाल्याने हिंसक होणारी मूले मी बघितली आहेत.
आपण जरी कामात असलो तरी बाळाला आपल्या शेजारी बसवून, त्याच्याशी गप्पा मारल्यास बराच फ़ायदा होतो. शक्यतर बाळालाही कामात मदत करु द्यावी.

५) भूक न लागणे

बाळाला भूकच न लागणे हि कायमची समस्या. डॉक्टर अशावेळी पुर्वी बाळ नीट खेळतोय ना, मग काळजी करु नका, असे सांगत असत. पण आता पालक हट्टच करत असल्याने नाईलाजाने एखादे टॉनिक लिहून देतात.
क्वचितच एखदया मूलाला तशी गरज असते. दुसरे म्हणजे टॉनिकमधले घटकपदार्थ सगळेच्या सगळे शरीराला उपलब्ध होत नाहीत, आणि तेच घटक जर आहारातून मिळाले, तर जास्त फ़ायदेशीर ठरतात.

भूक न लागण्याची इतरही कारणे असू शकतात. अपचन, जंत हिदेखील कारणे असू शकतात. खाण्याच्या वेळा पाळणे, अधलेमधले अरबट चरबट खाणे बंद करणे, आणि बाळ भरपूर खेळेल याकडे लक्ष दिले तर बाळाला नक्कीच भूक लागेल.

लिंबाचा रस त्यात तितकाच आल्याचा पाणी न घातलेला रस, त्यात चवीपुरते काळे मीठ आणि साखर घालून केलेले पाचक, जेवायच्या आधी अर्धा चमचा बाळाला दिले तर नक्कीच भूक लागते. पण हा प्रयोग रोज करु नये.
पोषक आहार नाही, म्हणून पचनशक्ती कमी, म्हणून भूक कमी, असे दुष्टचक्र असेल तर ते मोडावेच लागेल.

६) खाण्याविषयी नावड

भूक तर असते पण समोर आलेला पदार्थ आवडता नसतो, म्हणून खाल्ला जात नाही, असेही अनेकवेळा होते.
प्रत्येक लहान मूलाच्या स्वत:च्या आवडीनिवडी असतात. पदार्थ नव्या रुपात आलेला त्यांना आवडतो. त्यामुळे सतत काहितरी नवनवीन द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आवडणारे पदार्थ हेरुन ते जास्तीत जास्त पोषक कसे होतील ते बघितले पाहिजे

कधी कधी निव्वळ आपण नाही म्हणू शकतो, याचा प्रयोग आईवर होत असतो. त्याला खास असे कारणही नसते. लक्ष वेधून घ्यायचाही प्रयत्न असतो. अशावेळी कधीतरी त्या खेळाला प्रतिसाद देत तर कधीतरी डाव
उलटत कार्यभाग साधायचा. म्हणजे एखादे दिवशी खायला नकार दिल्यावर, आग्रहच सोडून द्यायचा. थोड्या वेळाने भूक लागल्यावर बरोबर गाडं रुळावर येतं.

७) ह्ट्ट

कधी कधी अमूकच पदार्थ हवा असा हट्ट असतो. शक्य असेल तर तो हट्ट पुरवायचा पण प्रत्येकवेळी नाही. तसेच तो पदार्थ आरोग्याला घातक नाही ना, याचा पण विचार करायला पाहिजे.
कधी कधी तर चक्क, अटी घालायच्या. म्हणजे नीट जेवलास / जेवलीस तरच आइसक्रीम मिळेल, वगैरे. काहि दिल्याशिवाय काही मिळत नाही, हा धडा लहान मूल जितक्या लवकर शिकेल, तितके चांगले.

बाळासाठी काय करायचे, हा प्रश्न चक्क त्याच्याच मदतीने सोडवायचा. उद्या काय करु असे विचारत रहायचे. कधी कधी अफ़लातून कल्पना सुचवल्या जातात. शिवाय आपले मत विचारले जातेय, याचाही आनंद असतोच.

मला वाटतं इतकं बास, नाही का ? इथले अनुभवी पालक आपल्या परीने यात भर घालतीलच.

आता काही पदार्थ बघू या.

१) गुळपापडी

अगदी नुकत्याच दात येत असलेल्या बाळापासून वाढत्या वयातल्या मूलांना देता येण्यासारखा हा प्रकार आहे. यासाठी पाकच करायला पाहिजे असे नाही. आवडीप्रमाणे कणीक, बेसन, नाचणीचे पिठ, सोयाबीनचे पिठ यांचे मिश्रण घ्यावे.
पण हि पिठे आधी एकत्र न करता, वेगवेगळी भाजावी. या मिश्रणाच्या निम्मा ते पाऊणपट गूळ, आधीच बारिक चिरुन तयार ठेवावा. तेवढीच लिसा (म्हणजेच ब्राऊन)साखर घेतली तरी चालेल.
पिठे वेगवेगळी तूपावर भाजून मग एकत्र करावी. त्यात थोडे भाजलेले तीळ मिसळावेत. ज्या भांड्यात भाजले त्याच भांड्यात पिठे व तीळ एकत्र करावेत. आणि भांडे गरम असतानाच त्यात गूळ वा साखर घालून मिश्रण भरभर एकत्र करावे. त्या उष्णतेने गूळ पातळ होतो. मग मिश्रण तेल लावलेल्या ताटात पसरावे, आणि वड्या कापाव्यात. वासासाठी वेलची वापरावी. अगदी कधीही तोंडात टाकायला आणि चघळायला मस्त पदार्थ.

२) चपातीचा लाडू

चपात्या मिक्सरमधून काढून घ्याव्यात. त्यात गरम केलेले तूप आणि गूळ वा साखर घालावी. आवडीप्रमाणे बेदाणे घालावेत आणि त्याचे लाडू वळावेत. चपाती न खाणारी मूले पण हे लाडू आवडीने खातात.

३) नाचणी किंवा बाजरीच्या वड्या

नाचणी किंवा बाजरी रात्रभर भिजत घालावी. मग सकाळी मिक्सरमधे बारीक वाटावी.
मग ती जरा जास्त पाण्यात खळबळावी आणि ते मिश्रण गाळून घ्यावे.गाळलेले मिश्रण तसेच ठेवावे दोन चार तासानी त्याचा साका खाली बसेल, मग वरचे पाणी अलगद ओतून टाकावे.
आता या साक्यात निम्मे नारळाचे दूध आणि पाऊणपट साखर घालावी. दोन कप मिश्रणाला चमचाभर तूप घालून जाड बूडाच्या पातेल्यात ते शिजत ठेवावे.
सतत ढवळून घट्ट करावे. मग ताटात ओतून त्याच्या वड्या कापाव्यात. हवे तर वरुन काजू घालावेत. जरा जास्तच घट्ट शिजवले तर या वड्या दोन तीन दिवस फ़्रिजमधे राहतील. नाचणीच्या वड्यात थोडी कोको पावडरही घालता येईल.

४) चपातीच्या नुडल्स

चपात्या घेऊन त्याच्या घड्या घालाव्यात. मग कात्रीने तिचे लांबलांब तूकडे करावेत.
लांब कापलेला कोबी, गाजर आदी भाज्या तेलावर परताव्यात. त्या शिजल्या कि त्यावर हे तूकडे घालून भरभर परतावे. आवडीप्रमाणे केचप, सोया सॉस वगैरे घालावे. नूडल्स साठी हा सोपा आणि आरोग्यपूर्ण पर्याय आहे.

५) एग नूडल्स

एक अंडे फ़ोडून त्यात मीठ व थोडे तेल घालून त्यात घट्ट भिजेल तेवढी कणीक भिजवावी. मग त्याच्या पातळ चपात्या लाटून जरा वा-यावर सुकू द्याव्यात. मग धारदार सुरीने त्याच्या वरीलप्रमाणे पट्ट्या कापाव्यात. त्या आवडीप्रमाणे कमी जास्त जाडीच्या करता येतील. मग भरपूर पाणी उकळत ठेवून त्यात थोडे मीठ व तेल घालावे. पाण्याला उकळी फुटली की त्यात या नूडल्स पसरुन घालाव्या. अंड्यामूळे त्या विरघळत नाहीत. त्या शिजल्या कि वर तरंगतात. मग त्या झार्‍याने निथळून घ्याव्यात.
आवडीप्रमाणे सॉस वा सुप करुन त्यात या नूडल्स घालून द्याव्यात. यांना आवडीप्रमाणे आकारही देता येतो. सूपमधे भाज्या असतील, याकडे लक्ष द्यावे.

६) आलू चाट

लहान मूलांना बटाट्याची साले, कोथिंबीर वगैरे खायची सवय लावावी. बटाटे सालीसकट उकडून किंवा मावेमधे भाजून घ्यावेत. मग त्याचे सालीसकटच तूकडे करुन त्यावर चाट मसाला, कोथिंबीर व थोडे तेल टाकावे. कोथिंबीर अगदीच चालत नसेल तर मिरची कोथिंबिरीची चटणी वाटावी. त्यात पुदीना व आलेही घालावे. लिंबाचा रस घालावा व हे सगळे एकत्र करुन खायला द्यावे. वरुन थोडा मध किंवा चिंच खजूराची चटणी घालावी. बटाट्याबरोवर रताळी पण घेता येतील.

७) चना मसाला

काबुली चणे रात्रभर भिजवून त्यात मीठ व थोडे मिरिदाणे घालून कूकरमधे शिजवून घ्यावेत.
पाणी निथळून त्यावर चाट मसाला घालावा. थोडे केचप घालावे व लिंबू पिळावा. लगेच खायचे असेल तर त्यावर कांदा, टोमॅटो बारिक कापून घालावा.

असेच चण्याच्या डाळीचेही करता येते. पण चण्याची डाळ रात्रभर भिजवायची गरज नाही. आणि ती शिजवताना, हळद आणि हिंग अवश्य घालावा.

८) मिनी इडली.

आता कॉकटेल ईडल्यांचे स्टॅंड मिळतात. त्यात ईडल्या करणे जरा कटकटीचे असते खरे पण मूलांना अशा इडल्या खुपच आवडतात. त्यात त्या जरा रंगीत केल्या तर आणखी छान. रंगीत करण्यासाठी त्यात गाजराचा किस, पालक + मेथी, बीटाचा थोडा रस असे वापरता येईल. ईडलीच्या पिठातच थोडे खोबरे घालायचे.
बरोबर खोबर्‍याची चटणी डब्यात देता यायची नाही. त्यासाठी कोरडी चटणी, ज्यात डाळे, शेंगदाणे, तेलात परतलेला कढीपत्ता, मीठ व हिंग घेऊन कोरडे़च भरड वाटावे आणि ते थोड्या तेलात वा तूपात मिसळून द्यावे.

९) वाफ़वलेली फ़रसबी

शक्यतो कोवळी फ़रसबी घ्यावी. आणि ती ऊभी ऊभी बारिक कापावी. भरपूर पाणी उकळून त्यात ते तूकडे दिड मिनिटच शिजवून घ्यावे. मग निथळून घ्यावेत. थोड्या लोण्यावर ते तूकडे जरा परतावेत. मग त्यावर पावाचा वा चपातीचा चुरा टाकावा. मीठ मिरपुड टाकावी. मग यावर उकडलेल्या अंड्याचा चुरा टाकून खायला द्यावे.

१० ) वाफवलेली गाजरे.

गाजराचे सारख्या आकाराचे लांबट तूकडे करावेत. त्यात चवीप्रमाणे मीठ, साखर, मिरपुड व थोडे तूप टाकून पॅनमधे, मंद गॅसवर ठेवावे. वर झाकण ठेवावे. थोड्यावेळाने झाकण काढून सूटलेले पाणी आटू द्यावे. तूप दिसू लागले कि त्यात थोडी कणीक घालून परतावे.

११ ) डाळ्याचे लाडू

पंढरपुरी डाळॆ आणून ते किंचीत गरम करावे. मग मिक्सरवर त्याची बारीक पूड करावी. त्यात थोडे तूप, पिठीसाखर आणि वेलचीपूड टाकून त्याचे लाडू वळावेत.

१२ ) कुरमुरे

कुरमुर्‍यांचा चिवडा करता आला तर छानच नाहीतर नुसते कुरमूरे घेऊन त्यात भरपूर चणे, शेंगदाणे घालावेत. त्यात थोड्या ज्वारीच्या व साळीच्या लाह्या मिसळाव्यात. त्यात थोडे खारकेचे तूकडे मिसळावेत. हा खाऊ पण येता जाता खायला छान.
बाळाला वेळ असेल तर त्यातच कैरी, कांदा, टोमॅटो यांचे तूकडे, चिंच खजुराची चटणी, शिजवलेली उसळ घालून द्यावे.

१३) फ़ुलवलेले पोहे

एका वेळी खायचे असतील तेवढे पोहे घेऊन ते साजूक तूपात जरा परतावेत. खायला देताना त्यात थोडी पिठीसाखर आणि स्वादासाठी खालीलपैकी काहीतरी एकच घालायचे. (वेलची, जायफ़ळ, केशर, दालचिनी, लवंग, सुंठ आदी) किंवा मीठ घालून स्वादासाठी यापैकी एकच (सुंठ, मिरपूड, हिंग, जिरेपूड, ओवापूड)
असा एकच स्वाद घातल्याने मूलांचे नाक तीक्ष्ण होते आणि त्यांना स्वादाची ओळख पटते.

१४) मेतकूट

मेतकुट हा आपला पारंपारीक पण सध्या विस्मरणात गेलेला पदार्थ. बाजारात मिळतोच पण जरा मेहनत घेऊन घरी केला तर भरपूर होतो. मेतकुट अनेक प्रकारे वापरता येते. तूपभात मेतकूट, ज्वारीची भाकरी आणि मेतकूट, टोस्ट ब्रेड आणि मेतकूट हे पदार्थ खुपच रुचकर लागतात.

मेतकूटाचे अनेक प्रकार प्रचलित होते असे दुर्गाबाई भागवतांनी लिहून ठेवले आहे.
कधीकाळी ते फक्त मेथीचे पिठ असावे पण आता त्यात नावालाही मेथी उरलेली नाही
सर्वसाधारण प्रमाण असे.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/105396.html?1160916387

१५) कुरड्यांचा उपमा

गव्हाच्या कुरड्या आपल्याला माहितच आहेत. या कुरड्या करण्यासाठी खुप खटपट असते, पण शहरात त्या तयार मिळतात. त्याचे तूकडे करुन ते कोमट पाण्यात भिजत ठेवावेत. मग निथळून घ्यावेत. तेलाची हिंग, मोहरी, मिरची, कढीपत्ता घालून फ़ोडणी करावी, त्यावर हे तूकडे परतावेत. त्यावर मीठ, साखर व ओले खोबरे टाकावे.

१६) शेव नजाकती

हा पदार्थ मी अलिकडेच सविस्तर लिहिला आहे.

१७) पराठे / थालिपिठ

वेगळी भाजी बघून अनेक मुले नाक मुरडतात. अशावेळी भाज्या पराठ्याच्या पिठातच बारिक चिरुन घातल्या तर त्यांच्या लक्षात येत नाही. जरुर वाटली तर भाज्या शिजवून कुस्करुन मिसळाव्यात.
अनेक फ़ळांचेही पराठे करता येतात. साधारण पणे गर असलेली फळे (आंबा, पपई, फणस, चिकू, अवाकाडो, टरबूज, केळे, पेरू, अननस आदी ) घेऊन त्यांचा गर काढायचा. त्यात साखर घालून भिजेल एवढीच कणीक मिसळायची. पाणी अजिबात वापरायचे नाही.

१८) आइसक्रीम

वेगवेगळ्या फ़ळांचेच नाही तर भाज्यांचेही छान आइसक्रीम होते. लाल भोपळा, गाजर, कोहळा, बटाटा, कॉलिफ़्लॉवर, कोनफ़ळ आदी गर असणा-या भाज्यांचे उकडून गर घ्यावेत. ते थोड्या तूपावर परतून घ्यावेत. मग त्यात आटवलेले दूध, साखर आणि आवडीचा इसेन्स घालायचा. आणि नेहमीप्रमाणे फ़्रीज / बीट करत आईसक्रीम करायचे. कुणाच्या लक्षातही येत नाही.

१९) आस्पिक

आवडत्या जेलीचे किंवा अनफ़्लेव्हर्ड जिलेटीनचे पाकिट आणावे. अनफ़्लेव्हर्ड असेल तर टोमॅटोच्या पातळ रसात जेली करावी. या जेलीमधे वेगवेगळ्या भाज्या थोड्या शिजवून घालाव्यात. मग नेहमीप्रमाणे जेली सेट करावी. खायला देताना काकडी, सलाद ग्रीन आदींनी सजवून द्यावे.
आपल्याकडे पुर्वी जेलीमधे जिलेटीन वापरलेले असायचे ते प्राण्यांच्या हाडापासून केलेले असायचे.
आता समुद्री वनस्पतीपासून केलेला शाकाहारी पर्यायच वापरला जातो. (चायना ग्रास, अगर अगर,
कार्गीनान ) अगर अगर नुसते लांब लांब काड्यांच्या रुपातही मिळते. ते वापरुन खर्वस, मिल्क
जेली सारखे प्रकार करता येतात.
आस्पिक साठी ताजे टोमॅटो उकळत्या पाण्यात टाकून सोलून कुस्करुन घ्यावे. शक्यतो मिक्सर
वापरु नये. तारेच्या गाळणीवर रगडून रस काढावा. तो जरा गरम करुन त्यात बारिक चिरलेले
चायनाग्रास घालावे. त्यात चवीप्रमाणे, तिखट, मीठ, साखर वगैरे घालावे. मग गोठवावे.

अश्या प्रकारे कुळलेही सरबतही गोठवता येते. लिंबूफ़ूल वापरून लिंबाचे सरबत केले तर
मिश्रण काचेसारखे पारदर्शक होते.
आत घालण्यासाठी पांढरा कोबी, गाजर आदी भाज्या किंचीत वाफ़वून घ्याव्यात. जेलीचे मिश्रण
थोडावेळ फ़्रिजमधे ठेवावे. ते अर्धवट सेट झाले कि त्यात भाज्या मिसळून पूर्ण सेट करावे.
आयत्यावेळी डिशमधे मोल्ड उपडा करुन, काकडीच्या चकत्या, पातीचा कांदा, सलाद ग्रीन यांनी
सजवावे.

२०) फळे

सर्व प्रकारची मोसमी फळे मूलांना आवर्जून खायला लावावीत. यामधे आपल्याकडे मिळणारी जांभळे, करवंदे, बोरे, आवळे यांचा आवर्जून समावेश करावा. शक्यतो ज्यूस पिण्यापेक्षा चावून फ़ळे खाण्याचा आग्रह धरावा.

२१ ) सरबत

बाजारातील तयार सरबते देण्यापेक्षा घरगुति ताजी सरबते देणे कधीही चांगले. आपल्याकडे सरबतात लिंबाचे, कैरीचे, कोकमाचे, बेलफळाचे, भोकराचे, चिंचेचे, फ़ालसांचे असे अनेक प्रकार आहेत. हि सर्वच सरबते आरोग्यपूर्ण अशी असतात. मूलांना शाळेतही अशी घरगुति सरबते देता येतील.

२२ ) थालिपिठ

थालिपिठ हा पण आपल्याकडचा एक आदर्श प्रकार. नुसते करण्यापेक्षा त्यात एखादी भाजी चिरून घातली तर आणखी छान. भाजणी असली तर उत्तमच, ती नसेल तर घरी असतील ती सर्व पिठे मिसळून घ्यावीत. त्यात कच्च्या वा शिजवलेल्या भाज्या घालाव्यात. वरण घातले तरी चालते. मग त्याचे थालिपिठ लावावे.

२३ ) फ्रॅंकी रोल्स

अंड्याचे पातळ ऑमलेट करुन ते शिजायच्या आधीच त्यावर एक तयार चपाती टाकावी मग उलटून चपाती भाजून घ्यावी. त्यावर भाज्यांचे लांबट तूकडे, भानोल्याचे लांबट तूकडे, केचप वगैरे घालून रोल करावा. चिकनचे तूकडे पण वापरता येतील. अंडे चालत नसेल तर बेसनाचा पोळाही वापरता येईल.

२४) उकडलेल्या भाज्या
तुरीच्या शेंगा, भुईमूगाच्या शेंगा, फ़रसबी, पावट्याच्या शेंगा, बीट, बटाटे अशा काही भाज्या नुसत्या उकडून, मीठ मिरपुड घालून खाता येतात. डब्यात द्यायच्या असतील तर दाणे काढून आणि बाकीच्या भाज्या थोड्या लोण्यात परतून देता येतील. काही धान्येदेखील (ज्वारी, मका) अशी उकडून घेऊन खाता येतात.

२५) खिचडा

बाजरी घेऊन ती पाण्याचा हात लावून जरा भरडायची. मग ती भिजत घालून कुकरमधे मऊ शिजवायची. त्यात सोबतीने तांदळाच्या कण्या, लापशी, चण्याची डाळ, दाणे पण वापरता येतील. हे सगळे मऊ शिजले कि त्यात तूप आणि मीठ घालून खायचे.

२६) मोमोज
ओली फेणी किंवा सालपापडी या नावाने आपल्याकडे हा प्रकार होत असे. आता त्याला मोमो
नाव दिले तर मूले आनंदाने खातील.
सारण म्हणून लांब चिरलेली कोबी, गाजर, मॅश केलेले स्वीट कॉर्न, मश्रुम, सोया मिन्स (भिजवून
आणि निथळून) असे सगळे कोरडे शिजवून घ्या. फक्त मीठ घाला. चिकन श्रेड्स पण चालतील.
(चिकन पाण्यात शिजवून त्याचे लांबट तूकडे करायचे. पाणी स्टॉक म्हणून वापरायचे.)
एक कप तांदुळ आणि एक टेबलस्पून गहू तीन दिवस एकत्र भिजत ठेवा. रोज पाणी बदला.
करायच्या दिवशी मिक्सरवर बारिक वाटा. थोडे पाणी वापरा पण तयार मिश्रण बासुंदीएवढे
दाट ठेवा. हे मिश्रण गाळून घ्या. त्यात मीठ घाला व थोडी खसखस घाला.
मोदकपात्र वापरा किंवा एका मोठ्या भांड्यात पाणी उकळत ठेवा व त्यात अधांतरी एक
चाळणी ठेवा. त्यात बसतील अशा दोनतीन ताटल्या, तेलाचा हात लावून तयार ठेवा.
वरील पिठ अर्धा डाव भरुन ताटलीत टाका आणि ताटली गोल फिरवून मिश्रण ताटलीभर
पसरवा. मग ताटली मोदकपात्रात ठेवून २/३ मिनिटे झाकण ठेवून वाफवा. त्यावर भाज्यांचे
मिश्रण घालून रोल करा. सोबत सोया सॉस, केचप द्या. आपल्याकडे हा प्रकार कच्चे तेल
व तिखट घालून खात असत.

२७) दूध मोगरा

कपभर सुवासिक तांदळाची पिठी घेऊन ती कपभर कोमट दूधात भिजवायची.
त्यातच दोन चमचे दही घालून रात्री विरजण लावायचे. सकाळी त्यात चमचाभर
पातळ तूप घालायचे. आवडीप्रमाणे यात साखर घालायची, किंवा मिरचीचे वाटण
आणि किसलेली एखादी भाजी घालायची. त्यात फ़्रूटसॉल्ट घालून ढोकळ्याप्रमाणे
वाफ़वायचे. अत्यंत चवदार पदार्थ तयार होतो.

२८) रव्याचे रुमझुम
रव्यामधे ताक घालून तो थोडावेळ भिजवून ठेवायचा. मग त्यात साखर, वेलची तूप आणि किंचीत
खायचा सोडा घालून जाडसर पॅनकेक करायचे.

२९ ) टोमॅटो ऑमलेट
टोमॅटो ऑमलेट हाही थोडासा विस्मरणात गेलेला प्रकार आहे. हे करताना बेसनाच्या पिठाबरोबर
थोडी कणीक आणि तांदळाचे पिठ अवश्य घ्यावे. पिठात केचप आणि कोथिंबीरपण घालावी.
डोश्याच्या पिठाचा वापर करुन देखील टोमॅटो ऑमलेट करता येते. कोथिंबीरीबरोबरच एखादी
पालेभाजी पण ढकलावी. कच्चे पिठ चाखून बघावे, ते चविष्ठ झाले तर ऑमलेट पण छान
चवदार होतात.

३०) फोडणीची मूगाची डाळ.
मूगाची डाळ भिजवून फोडणीला टाकून खायला फ़ार रुचकर लागते. यात टोमॅटो, मिरच्या
खोबरे वगैरे घालायचे. भिजवलेली असेल तर पटकन शिजते. यात भरीला म्हणून एखादी
भाजी (भोपळा, दुधी, पडवळ, मूळा वगैरे) किसून टाकावे. पडवळ, मूळा तर शिजवायचीही
गरज नाही.

३१) खमंग काकडी
हा पण एक रुचकर प्रकार. यासाठी काकडी किसून न घेता, कोचवूनच घ्यावी. कोचवल्यावर
थोडी निथळून घ्यावी आणि त्यात थोडेसे साजूक तूप टाकावे तसेच दह्याच्या ऐवजी चक्का
वापरावा, म्हणजे फार पाणी सुटत नाही. दाण्याचे कूट, मिरची, कोथिंबीर, मीठ व साखर
घालावी.

३२) खजूराचे रोल
जागूने नुकतेच खजूराचे लाडू लिहिले आहेत ते किंवा, खजूराचा लगदा मंद आचेवर मऊ
करुन घ्यायचा आणि तो प्लॅस्टीकच्या कागदावर जाडसर थापायच्या, त्यावर भाजलेले
तीळ आणि दाणे किंवा काजू किंवा आक्रोडाचे भरड कूट पसरून हाताने दाबायचे.
आणि मग त्याचा रोल करुन चकत्या करायच्या.

३३) भाजलेल्या भाज्या

बटाटा, रताळे, लाल भोपळा, सिमला मिरच्या, कांदे असे सगळे बार्बेक्यू करुन,
किंवा चकत्या करुन लोखंडी तव्यावर मंद आचेवर भाजून खाता येते, भाजून
झाल्यावर थोडे तेल व चाट मसाला टाकायचा. हे सगळे तयार करण्यात मुलांचा
हातभार लागला, तर त्यांना फ़ार आनंद होतो.

३४) लापशीची खिचडी

रोज चपातीच खायला हवी असे काही नाही. रव्यापेक्षा लापशी वापरणे चांगले.
प्रेशरपॅनमधे ती तूपावर परतून त्यात दूध वा पाणी घालून शिजवावी. मग
साखर घालून जरा आठवावे.
किंवा लापशी व थोडे शेंगदाणे एकत्र भिजवत ठेवावे. दोन तासानी ते कूकरमधे
वाफ़वून घ्यावे. मग तूपाची जिरे व हिरवी मिरची घालून फ़ोडणी करुन त्यावर
हे मिश्रण परतून कोरडे करावे. मीठ, साखर व ओले खोबरे घालावे. हा प्रकार
साबुदाण्याच्या खिचडीसारखाच लागतो, पण त्यापेक्षा बराच आरोग्यदायी.

३५) उकडपेंडी

तेलावर हिंग, हळद मोहरीची फ़ोडणी करावी, त्यात बारिक चिरलेला कांदा
परतावा. मग जाडसर कणीक परतावी. त्यात मीठ व साखर घालावी. मग
चिंचेचे पातळ पाणी थोडे थोडे घालून परतत रहावे (असे केल्याने कणकेचा
गोळा होत नाही.) कोरडे रवाळ मिश्रण झाले पाहिजे.
चपातीच्या उठाठेवीपेक्षा कमी श्रमात होणारा पर्यायी पदार्थ आहे.
मोकळ भाजणी पण अशीच करता येईल.

३६ ) केळी टोमॅटो

राजेळी केळी आणि लाल घट्ट टोमॅटो किसून एकत्र करावे. त्यात निम्मी साखर
घालावी. आणि थोडे तूप टाकून मिश्रण शिजवावे. हवे तर यात ओले खोबरेही घालता
येईल. चपातीबरोबर खाण्यासाठी एक रुचकर प्रकार होतो.
साधी पण जरा कमी पिकलेली केळी वापरली तरी चालतील. किसणे जमणार नसेल
तर केळ्याच्या चकत्या आणि बारिक चिरलेला टोमॅटो एकत्र करुन शिजवायचा.

३७ ) टोमॅटोची भाजी.
आपण शक्यतो टोमॅटो पूरक म्हणूनच वापरतो. त्याची भाजीही रुचकर होते. तूपाची
जिरे घालून फ़ोडणी करुन त्यावर टोमॅटोच्या फ़ोडी टाकून शिजवाव्या. मग मीठ, साखर
आणि लाल तिखट घालावे. यातच ओले खोबरे किंवा पनीरचा चुरा घालावा.

कांदा लोण्यात परतून त्यावर टोमॅटो परतून, त्यावर थोडे क्रीम किंवा मिल्क पावडर
घालून मलाईका सागही करता येईल. या दोन्ही भाज्या मुलांना आवडतात.

३८) कडधान्यांची मिसळ

घरातील सर्व कडधाने (वाल सोडून) भिजत घाला व त्यांना चांगले मोड येऊ द्या.
मग प्रेशरपॅनमधे ती, हिंग, हळद, गोडा मसाला, लाल तिखट व थोडी चिंच घालून
शिजवून घ्या. मीठ घाला.
या उसळीवर उकडलेल्या बटाट्याचे तूकडे, बारिक चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर,
टोमॅटो आदी घालून खा. शक्यतो फ़रसाण वापरु नका. त्याजागी भाजलेला पापड
घ्या. या दिवशी नेहमीचे जेवण घेतले नाही तरी चालेल.

३९) बटाट्याचा पिझ्झा

बटाटे उकडून मॅश करुन घ्या. कांदा किसून घट्ट पिळून त्यात मिसळा. त्यात थोडासा
शेपू किंवा मेथी मिसळा. मग त्यात मिश्रणाच्या पावपट कणीक मिसळा म मऊसर मिश्रण
करा. नॉन स्टिक पॅनला तेलाचा पुसट हात लावून त्यावर हे मिश्रण अलगद पसरा. दाबू नका
मंद गॅसवर एका बाजूने भाजा. दुसरे पॅन घेऊन त्यावर हे उपडे करा. वरुन हवे ते टॉपिंग
घाला (चिकन, मश्रुम, भुर्जी, पनीर, कॉर्न, सिमला मिरची ) चीज किसून टाका, आणि परत
भाजा. पिझ्झाला हा एक चांगला पर्याय आहे.

४०) भाज्या घातलेले ऑम्लेट

ऑम्लेट करताना ते नुसते करु नका, त्यासोबत भाज्या अवश्य वापरा. कांदा, बटाटा, कोबी,
गाजर, सिमला मिर्ची, मुंबई मेथी, पातीचा कांदा, पातीचा लसूण, सेलरी, फ़रसबी, मश्रुम
आदी भाज्या लोण्यात परतून पॅनमधे पसरुन घ्या. त्यावर फ़ेटलेले अंडे पसरुन टाका,
आणि सगळे सेट झाले कि परता. यातच ब्रेडचे चौकोनी तूकडेही घालता येतील.

आणखी या पदार्थात इथे भर घातली जाईलच. याशिवाय चिक्की, गाजराचा केक, केळ्याचा केक, उकडलेले रताळे, उकडलेले राजेळी केळे, कणीस असे अनेक पदार्थ लहान मूलांना आवडण्यासारखे आहेत.

वाढणी/प्रमाण: 
एका बाळासाठी
अधिक टिपा: 

या बीबीवर प्रतिसादात पण अनेक पदार्थ सुचवले आहेत, तेही अवश्य वाचावेत.

http://www.loksatta.com/chaturang-news/preventing-obesity-in-children-86...

इथे डॉ. संपदा तांबोळकर यांचा एक छान लेख आहे, अवश्य वाचा.

माहितीचा स्रोत: 
माझे छोटे सवंगडी !
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा छान माहिती Happy

माझी लेक डाळीचं वरण अजिब्बात खात नाही.... सगळ्या डाळींचे सगळे प्रकार करुन झाले.. आता शेवटी पराठ्यात घालं, धिरड्यात ढकल असे प्रयोग चालु आहेत माझे Proud

खुप छान आहेत क्रूती.... मोठ्यांच्या टिफिनसाठी/ मधल्या वेळाच्या खाण्यासाठीही उपयुक्त आहेत.

खुप छान आणि उपयुक्त अशी माहीती आहे ही दिनेशदा Happy

<<<तेवढीच लिसा साखर घेतली तरी चालेल.>>>> लिसा साखर म्ह्णजे?

धन्यवाद दिनेशदा.
मस्त माहिती Happy माझ्या निवडक १० मध्ये.
गुळ पापडी साठी मल्टी ग्रेन आटा मिळतो तो चालेल का? आंणी लिसा साखर म्हणजे काय ?\

२ दिवसा पूर्वी लेकीला कच्च्या बिटाच्या पुर्‍या करुन दिल्या होत्या. मी पुर्‍या करताना कुकीज करण्यासाठी वेगवेगळे शेप्स मिळतात ते वापरते तिच्या आवडीचे आकार असले की पुर्‍या (पालक, बिट, गवार अश्या कोणत्याही भाजीच्या दिल्या तर डबा आवडीने संपतो Happy
सारखी तळणी नको म्हणून महिन्यातुन १ दा आणी छोट्या आकारात असल्याने कढल्यात तिच्यापुरत्या तळुन देता येतात.

शाळेतून आल्यावर द्यायला एक रेसिपी - २ चमचे नाचणी सत्व (तयार), १ चमचा कोको पावडर, १ चमचा साखर, १/२ वाटी दुध
कोको सोडून सगळे पदार्थ एकत्र करून ५ मिनीटे शिजवा. गॅस बन्द करून कोको पावडर मिसळा आणि गरम खायला.
लेकीकडून आता चक्क फर्माईश येते
थालिपीठ, दडपे पोहे, कान्दे पोहे, राईस शेवई एकदम हिट
दिनेशदा, अजून नूडल्स घरी केल्या नाहीत आता नक्की करून बघेन, श्रावण सम्पला की, धन्यवाद

खुप छान आणि उपयुक्त अशी माहीती आहे थॅक्यू दिनेशदा.कर्र्ह्यातील नवे प्रकार करून बघते, मुलीन खल्ले तर माझा मोठठा प्रश्न सुटेल.

खुप छान माहिती आणि सर्व रेसिपीज.. धन्यवाद...
प्लीज मला मेटकुट ची रेसीपी हवी दिनेशदा..आजपर्यत कधी केली नाही आणि खाल्ली पण नाही..

किती उपयोगी माहिती आहे. धन्यवाद दिनेशदा. चपात्यांच्या नूडल्स, कुरडयांचा उपमा आणि आस्पिक या आयडिया एकदमच आवडल्या.

शिवाय ब्राऊन ब्रेडमध्ये केलेली उकडलेला बटाटा आणि चीज, काकडी-टोमॅटो, चीज्-टोमॅटो अशी सँडविचेसही मुलं आवडीनं खातात.

मेतकूट, तूप्-मीठ आणि गरमागरम गुरगुट्या भात हे माझ्या लेकीचं अल्टिमेट कम्फर्ट फूड आहे.

वा! मस्त माहिती देताय दिनेशदा!
ह्यात आणखी काही पदार्थांची भर :

१] वेगवेगळ्या लाह्या, तुपावर भाजून मीठ लावून / तेल-जिरे-हळद-कढीपत्त्याच्या फोडणीत परतून - वरून भाजलेले दाणे, खोबर्‍याचे काप घालून चिवडा अशा रूपात पण देता येतात. किंवा लाह्या / लाह्यांचे पीठ दूध + गूळ घालून / ताक + मीठ + भाजकी जिरेपूड + मिरची + कोथिंबीर घालून देता येते. राजगिरा, साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या बेस्ट!

२] सातूचे पीठ गरम पाण्यात / गरम दुधात कालवून त्याची खीर. किंवा तूप + गूळ / साखर घालून लाडू.

३] भाजलेल्या भुट्ट्याचे (मक्याचे कणीस / स्वीट कॉर्न कणीस) दाणे काढून त्यात चिरलेला टोमॅटो + कांदा + कोथिंबीर + लिंबूरस + चाट मसाला + मीठ / सैंधव घालून मुलांना देता येते.

४] पोह्यांचे विविध प्रकार = कोळ घालून केलेले पोहे, दडपे पोहे, फोडणीचे पोहे, मेतकूट लावून केलेले पोहे, दूध साखर/गूळ पोहे, दही पोहे, दाक्षिणात्य पध्दतीने केलेले अवलक्की पोहे इत्यादी.

५] पेसरट्टू, अडाई, धिरडी, डोसे, घावन, पॅनकेक्स इत्यादी समस्त धिरडी वर्गातील प्रकार. ह्यांत वेगवेगळ्या डाळी, तांदूळ, रवा, पोहे, भात, मोड आलेले मूग वगैरे व वेगवेगळ्या भाज्या, मसाले / वाटण वापरून वैविध्य आणता येते. गोडाची किंवा तिखटाची घावने.

६ ] डाळी धुवून वाळवून, भाजून त्यांचा भरडा काढून त्यापासून विविध खाद्यप्रकार. उपमा, भाज्यांत मिसळून वाफवून त्याचे भानवले, इडल्या इत्यादी. इडली प्रकारातही मूग डाळ + उडीद डाळ + तांदळाची इडली. भाज्या घालून वाफवलेली, पिठात फोडणी दिलेली इडली. ढोकळा. बेसनाच्या पाटवड्या.

वाह दिनेशदा... खुपच सुंदर माहिती तीही एकाच ठिकाणी... Happy
गव्हाच्या पीठात हळद, मीठ, जाडसर वाटलेले जिरे, तिखटासाठी गरजेनुसार मसाला मिसळून पातळ पोळी लाटून शंकरपाळीसारखे आकार कापून तळलेला पदार्थ मी तरी चिप्सच्या नावावर खपवते, आणि खपतोदेखील...
आणखी आहे, सवडीने लिहते.

वा दिनेश...

अहो फक्त बाळालाच का, त्याच्या आई, मावशी, आत्या, बहिण, आजी इ.इ. सगळ्यांनाच चालणारा आहार आहे हो हा...

ऋजुता दिवेकरच्या पुस्तकात लिहिलंय की 'दर दोन तासांनी काहीतरी पौष्टीक चघळावे.' तुम्ही दिलेल्या पदार्थातले निम्मे पदार्थ चालतील या 'दर दोन तासांनी काहीतरी चघळण्याच्या' यादीत. माझा मोठा प्रश्न सोडवलात तुम्ही. मला शेंगदाण्याशिवाय दुसरे काहीच सुचत नव्हते आणि शेंगदाणे खाल्ले की माझे पोट गच्च होते त्यामुळे खाववत नाही.

deepac तुझीही आयडिया मस्त आहे. माझ्या लेकीला अजुनही नाचणीसत्व खुप आवडते. पण विकतचे आणण्याऐवजी मी नाचणी भिजवुन ते बनवते. त्यात कोको पावडर घातली तर ती आनंदाने मलाच उचलुन नाचेल यात शंका नाही Happy

अनफ़्लेव्हर्ड असेल तर टोमॅटोच्या पातळ रसात जेली करावी

हे कसे करायचे ते सांगा ना...

साधना, मला आठवतंय ते असं की जेलीसाठी उकळलेले मिश्रण जरा थंड होऊ लागले की त्यात हलक्या हाताने टोमॅटोचा रस घालायचा. (की ह्या उलट करायचे... टो च्या रसात जेलीचे मिश्रण घालायचे?)

वा दिनेशदा! मस्त माहिती! शिवाय सोबतच्या पाककृती सगळ्यानाच आवडतील, आणि पटकन होतील अशा आहेत. खूप धन्यवाद!

मी वरचा लेख घरी गेल्यावर आणखी विस्तारतो.
आस्पिकबद्दल पण सविस्तर लिहिन.
आणखी काही शंका असल्यास जरुर लिहा. मी शक्यतो तळणे टाळलेल्या कृति लिहिल्यात.
असे प्रकार माझ्या जेवणात असतात. पण अगदी साधे प्रकार ते काय इथे लिहायचे म्हणून टाळत होतो, पण अनु, अन्जलि आदी मंडळींच्या आग्रहावरुन परत लिहितोय.

दिनेशदा... वेगवेगळ्या सुपबद्द्लपण लिहा ना...
चिक्की , भडंग हेही चालेलच ना.. तेही लिहा.
मालती कारावरांचे 'वंशवेल' पुस्तक पण खुप उपयोगी आहे.
दिनेशदा, तुम्ही लिहलेले, नाचणीचे लाडू, जागूताईंने लिहलेले खजुराचे लाडू आणि ईतरही यांची लिंक ईथे दिली तर चालेल का?

परत लहान व्हावंसं वाटतंय.
१२ कुरमुरे : यात बाळाला वेळ असेल तर , हे आईला वेळ असेल तर असे हवे का?

माझी लहानपणची पुस्तक वाचायची पद्धत. दोन उशा पाठीशी ठेवून लोळायचे. पुस्तक पोटावर, डाव्या हाताने धरलेले. उजव्या हाताशी स्टीलच्या डब्यात कुरमुरे+ फरसाण, किंवा फुलवलेले पोहे+ साखर किंवा भाजलेले शेंगदाणे किंवा कच्चे पोहे + कच्चे शेंगदाणे.

वाफवलेल्या गाजरांसारखीच ग्लेझड कॅरट्स पण छान लागतील ना? बटरवर परतुन, वर साखरेऐवजी मध.

त्यातले चेहरे भयानक असतात आणि कथानकही.>>> Rofl

बाळासाठी काय करायचे, हा प्रश्न चक्क त्याच्याच मदतीने सोडवायचा. उद्या काय करु असे विचारत रहायचे. कधी कधी अफ़लातून कल्पना सुचवल्या जातात. शिवाय आपले मत विचारले जातेय, याचाही आनंद असतोच. >>> प्रचंड सहमत... Happy

खाउ तर मस्तच..... Happy

मी वर आणखी काही पदार्थांची भर घातलीय.
भरत कधीकधी बाळांना अजिबात धीर निघत नाही. (हत्तीएवढी भूक लागलेली
असते.)
जुयी, बाळांना सुप आजारातून उठतानाच दिलेली बरी. एरवी नुसते सुप पिऊनच
त्यांचे पोट भरते आणि मग जेवण जात नाही. परत थोड्या वेळाने भूक लागते.

दिनेशदा तुम्ही समस्त मायबोलीकर आयांचा काय खायला करु हा प्रश्ण सोडवत आहात Happy
इतरही बर्‍याच जणी भर घातलतच आहेत.हा धागा खूपच सही होणार अस दिसतय.

माझ्या लेकीला सॅन्डविच करुन हवे आहेत.. भाज्या घालुन पण मऊ होणार नाहीत असे कोणते सॅन्डविच देता येतिल?

Pages