ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन!

Submitted by मार्गी on 19 April, 2017 - 10:51

नमस्कार. काही गोष्टी बोलाव्याशा वाटल्या. म्हणून हे आधी लिहिलेलं पत्र नावं व किरकोळ संदर्भ बदलून आपल्यासोबत शेअर करतो आहे. आपल्या आयुष्यातले ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन!

दि. ३ जुलै २०१६
प्रिय लोकेश आणि तेजश्री वहिनी!

तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आज सकाळी उठल्यापासूनच लोकेशशी बोलणं सुरू होतं. तेव्हा म्हंटलं चला थोडं सविस्तर बोलू. त्या दिवशी आम्ही भेटलो असतानाही भेटायचं चाललं होतं. तेव्हा आता इथे पत्रातूनच भेटावं म्हंटलं. आणि मला पत्रातून भेटायला खूप आवडतं. जेव्हा प्रत्यक्ष भेटतो; तेव्हा खूप वेळ फॉर्मल बोलण्यात- हाय हॅलोमध्ये जातो किंवा जनरल बोलण्यात जातो. त्यापेक्षा इथे आपण जास्त डीपली भेटू शकतो. ख-याखु-या गप्पा मारू शकतो. मनातलं थेट बोलू शकतो. लोकेश! तुम्हांला बीडमध्ये पाठवलेलं पत्र आठवतं का? बघा आता.

******

लोकेश आणि तेजश्री वहिनी! खरं तर पत्र लिहिणं मला आवडत असलं तरी खूप अवघड जातं. कारण इतक्या गोष्टी मनात येतात. आणि खरं तर त्या लिहूनही बोलता येत नाहीत इतक्या जीवंत असतात. भावना इतक्या असतात की शब्द कमी पडतात! आणि खरंच जिथे मनं जास्त कनेक्टेड असतात; तिथे शब्दांचीही गरज पडत नाही; उलट शब्दही नको वाटतात. मागचं पत्र तुम्हांला चांगलं वाटलं म्हणून अजून काही गोष्टी शेअर कराव्याशा वाटल्या. त्या दिवशी माझं व लोकेशचं बोलणं झालं होतं. दोन दिवसांमध्ये थोडा थोडा वेळ अशा गप्पा झाल्या. त्या संदर्भात थोडं बोलतो.

कुठून सुरू करावं कळत नाहीय. आत्ता नुकत्याच उत्तराखंडमधल्या पूराच्या बातम्या आहेत. दोन वर्षांपूर्वी माळीण गावामध्ये दुर्घटना घडली होती तशा परत घडू शकतात असा पाऊस पडतोय. मी ह्या विषयावर ब्लॉगवर लेखमाला लिहितोय. लोकेशने कदाचित फेस बूक पोस्ट बघितली असेल. आज मानवाने पर्यावरणावर इतकं आक्रमण केलं आहे की, अक्षरश: पर्यावरणाचा समतोल कोलॅप्स होतोय. लोकेश शाश्वत विकासाचं एक ५ जे मॉडेल आहे ना- जल, जंगल, जमीन, जानवर आणि जन- ते पूर्ण कॉलॅप्स होतंय. माणसाने जमीन गिळंकृत केली, जंगलं तोडली, मग पाणीही गायब झालं किंवा आलं ते पूर घेऊन आणि सगळी हानी सुरू झाली. आज मानवाचं निसर्गावर असलेलं बर्डन प्रचंड वाढलंय. आणि त्यामुळे साहजिक मानवाला निसर्गाचा फटका बसतोय. त्यातून क्लाएमेट चेंज; ग्लोबल वॉर्मिंग, दुष्काळ- महापूर ढगफुटी हे सगळं येतं.

लोकेश, तुम्ही विकसित देशांबद्दल थोडं वाचलं असेल. युरोप किंवा अमेरिका- ऑस्ट्रेलियासारखे देश. त्या सगळ्या देशांबद्दल एक गोष्ट समान आढळते- तिथे निसर्ग संपदा मोठ्या प्रमाणात असते आणि मानवी लोकसंख्या तुलनेने अतिशय कमी असते. दर किलोमीटरमध्ये लोकसंख्येची घनता अतिशय थोडी म्हणजे शंभरपेक्षा कमी असते. इंग्लंड- जर्मनीसारखे नाही; पण पर्यावरणामध्ये पुढे असलेले युरोपातले इतर देश- स्वीडन, स्विट्झर्लंड, फिनलँड किंवा अगदी जपानसुद्धा. ह्या देशांच्या ह्या विकसित स्थितीचं किंवा श्रीमंतीचं एक कारण त्यांच्या तुलनेने जास्त असलेल्या निसर्ग संपदेवर कमी असलेलं मानवी बर्डन हेसुद्धा आहे. कारण मानव निसर्गाच्या जितक्या जास्त जवळ असेल आणि निसर्गावर जितका कमी ताण देतो, तितका निसर्गसुद्धा मानवावर जास्त कृपा करतो. किंबहुना मानवाच्या सर्व बेसिक गरजा निसर्गात आपोआपच पूर्ण होतात. आपल्याकडेही पूर्वी जेव्हा समृद्ध शेती होती- पंचवीस- तीस वर्षांपूर्वीपर्यंत तेव्हा शेतक-याला सगळं शेतातच मिळायचं. पण आता लोकसंख्या अपार वाढली; जमिनीचे तुकडे झाले; झाडांची जंगलं जाऊन काँक्रीटची जंगलं आली आणि सगळंच बदललं. पूर्वी ज्या गोष्टी निसर्गात आपोआप मिळायच्या; त्या आता गळाकाटू स्पर्धेमध्ये विकत घ्याव्या लागतात. लोकेश साहेब तुमच्या मुंबईची गंमत पाहा ना- पूर्वी जेव्हा मुंबईची लोकसंख्या कमी होती; तेव्हा पाणी पुरेसं होतं आणि पावसाळ्यामध्ये पाण्याचा निचराही आपोआप व्हायचा. आता पाणीही हजार जुगाड करून आणावं लागतं आणि पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी पंपही लावावे लागतात! काय गंमत आहे!

लोकेश- वहिनी, मुद्दा हा आहे की, निसर्गावर इतकं बर्डन केल्यामुळे निसर्गाकडून माणसाला मिळत होत्या त्या गोष्टी तर कमीच झाल्या; पण माणसा- माणसांमध्येही प्रचंड तणाव निर्माण झाला. लोकेश, पूर्वी आपल्या लहानपणी जीवन साधं असलं व गरिबी असली तरी त्या गरिबीततही एक समृद्धी होती- संपन्नता होती. पण आता सगळं बदलत जातंय. आणि ह्याचा परिणाम आपण सगळे भोगतोय. कारण आपल्याही रोजच्या आयुष्यात त्यामुळे असंख्य ताण निर्माण झाले आहेत. गावच्या गायीचं ताजं दुध- दही आणि आजचं युरिया असलेलं पिशवीतलं दुध! किंवा गावातली शुद्ध हवा आणि आता इथलं प्रदूषण! असो, ह्या विषयावर अनेक गोष्टी आहेत. तुम्हांला इंटरेस्ट असेल तर माझा ब्लॉग वाचाल.

मला असं म्हणायचं आहे की, आपण हे सगळ्या प्रकारे झालेले ताण समजून घ्यायला हवेत. आणि अशा जीवनशैलीतून आपल्यावर होणारे अन्य कितीतरी परिणामसुद्धा बघायला हवेत. अशा काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. नुसती आपली जीवनशैलीच नाही तर आपल्या आजूबाजूला असलेला समाजसुद्धा सतत आपल्यावर परिणाम करत असतो. त्यातून अनेक ताण निर्माण होतात. आणि आपली अवस्था एका गरम पाण्याच्या भांड्यात असलेल्या बेडकासारखी होते. जेव्हा पाणी नॉर्मल टेंपरेचरचं असतं तेव्हा बेडूक आनंदात असतं. हळु हळु पाणी गरम होतं. बेडकाला आधी तर कळत नाही. जेव्हा कळतं तेव्हा बेडूक म्हणतं थोडंच तर गरम झालं आहे. चलत असतं यार! हळु हळु पाणी अजून गरम होत जातं. बेडकाला जाणीव होत जाते. पण आळस आणि बेपर्वाईची वृत्ती त्यामुळे ते तसंच बसतं. पाणी गरम होत जातं आणि शेवटी पाणी उकळायला येतं आणि बेडकाला बाहेर उडीही मारण्याची फुरसत राहात नाही! आपलाही प्रवास त्याच दिशेने होतोय. हा प्रवास थांबवायचा असेल तर डोळे उघडून सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत; समजून घेतल्या पाहिजेत. नाण्याला दोन बाजू असतात. एकावेळी आपण एकच बाजू बघू शकतो. आपल्या जीवनाचं- रोजच्या गोष्टींचंही असंच आहे. आपल्याला फक्त ५०% बाजू दिसत असते. पण प्रत्यक्षात जितकं दिसतं तितकंच न दिसणारंही असतं. म्हणून ते समजून घ्यायला हवं.

लहान बाळ जेव्हा रडतं तेव्हा त्याला सारखी सवय लावली जाते की, रडू नकोस. वारंवार असं सांगण्याचा परिणाम म्हणून शेवटी ते रडणंच थांबवतं. रडू आलं की‌ ते दाबतं. ह्याचे फार वाईट परिणाम होतात. कारण मग असं बाळ पुढे पूर्ण हसूही शकत नाही. कारण मनामध्ये ब्लॉकेज तयार झालेले असतात. आपण मोठे होत जातो, तसे अनेक ब्लॉकेजेस सतत निर्माण होत जातात. आणि हे फक्त मनातले किंवा इमोशनल ब्लॉकेजेस नसतात; त्यांचा शरीरावरही तितकाच परिणाम होतो. जेव्हा मुलांना रडू दिलं जात नाही; तेव्हा ते रडणं आवरण्यासाठी त्यांचा श्वास उथळ होतो. अगदी लहान मुलं पूर्ण पोटभर श्वास घेतात. पण रडणं थांबवल्यामुळे श्वासही उथळ होतो. मनामध्ये एक प्रकारची अस्वस्थता तयार होते. anxiety वाढते. आणि श्वास पूर्ण पोटभर न घेतल्यामुळे श्वासातून शरीराल जी ऊर्जा मिळते; तीही कमी होते. असं मूल दडपणाखाली वावरतं. त्याचा आत्मविश्वास कमी होतो. आपण सगळे अशाच परिस्थितीत वाढलेलो आहोत. आरोग्य कमकुवत होतं. कारण पूर्ण श्वास हा ताजेपणा देतो; रिचार्ज करतो. पण डोळे उघडून बघितलं तर कळतं की, आपण जो श्वास घेतो तो फार उथळ राहतो.

शिवाय सतत आपल्याला सांगितलं जातं की, रागवू नकोस, ओरडू नकोस; मस्ती करू नकोस इ. इ. त्यामुळे आपण ती ती‌ गोष्ट थांबवत जातो. पण जेव्हा आपण कोणतीही गोष्ट करत असतो; तेव्हा त्यामध्ये ऊर्जा इन्व्हॉल्व्ह असते. जर राग आला तरी त्यात ऊर्जा असते. पण आपल्याला सांगितलं जातं की, राग करू नको. मग आपण राग दाबतो. पण ती ऊर्जा जाईल कुठे? ती मग जबड्यांमध्ये ब्लॉक होते. त्यामुळेच म्हण आहे की, रागाने 'दात ओठ चावले'! कारण राग आला की तिथली ऊर्जा मोकळी होत असते. असे असंख्य ब्लॉकेजेस तयार होतात. त्याचे ताण शरीरावर साचत जातात. खरं तर शरीरात व मनात जे काही होत असतं ते नैसर्गिक प्रकारे मोकळंसुद्धा होत असतं. जेव्हा मनात राग येतो आणि तो मनात मावत नाही; मनातून बाहेर पडतो; तेव्हा शरीर दात ओठ चावतं; मुठ आवळली जाते. त्यातून खरं तर ऊर्जा मोकळी होत असते. कारण निसर्गामध्ये प्रत्येक गोष्टीचे नियम आहेत. पाणी उताराकडेच जातं. वाफ वरच जाते. तसा रागही ठरलेल्या मार्गाने बाहेर पडत असतो. किंबहुना राग व्यक्त होणं ही प्रक्रियासुद्धा त्यापासून बरं होण्याचा भागच आहे. पण आपल्याला सांगितलं जातं की, राग अजिबात नाही! त्यामुळे मग सर्व ब्लॉकेजेस बनतात.

साधं तापाचं उदाहरण घेऊ. आपल्याला अनेक वेळा सर्दी- ताप होतो- खोकला होतो. खरं तर ही शरीरात होणारी ऑटो रिकव्हरी प्रक्रिया आहे. ताप येतो कारण शरीरात कुठे तरी त्रास असल्यामुळे शरीराला जास्त रक्त पुरवठा लागतो; त्यामुळे शरीर जास्त काम करतं; शरीर त्यामुळे गरम होतं. किंवा सर्दी होते कारण नाकात मळ साठला असतो. शरीर त्यावर लगेच काम सुरू करतं. पण आपण तर सर्दी- ताप ह्यांना आजार मानतो. आणि आजचे व्यापारी डॉक्टरही लगेच सांगतात- ही गोळी घे, एका तासात ताप थांबेल! ताप थांबतो, पण आणखी ब्लॉकेजेस तयार होतात. कारण शरीर आपलं असलं तरी त्यात असलेला निसर्ग विराटच आहे. निसर्ग त्याच्या नियमांनुसार त्यावर आपल्या नकळत लगेचच उपाय करत असतो. नाक मोकळं झालं की, आपोआप सर्दी जाते. शरीराची ऑटो रिकव्हरी प्रोसेस पूर्ण झाली की तापही जातो. पण आपण ती प्रक्रिया सुरू ठेवण्यापेक्षा त्यामध्ये हस्तक्षेप करतो व त्याचा फटका आपल्याला बसतो. किंवा कधी कधी आपला पाय- पाठ खूप दुखत असते. त्यावेळीही तिथे काम सुरू असतं. त्यावेळी आपण खरं तर त्या प्रक्रियेसोबत कॉऑपरेट करायला पाहिजे. पण आपण पेन किलर घेतो! त्यामुळे तर अजून उलट होतं. पेन असणं ह्याचा अर्थ शरीर आपल्याला मॅसेज देत असतं की, आता पाय जास्त हलवू नकोस; पण पेन किलर घेतलं की पेन राहात नाही; आपण अजून जास्त पाय हलवतो! अशा ह्या सगळ्या गोष्टी खोलवर असतात.

आणि जी गोष्ट आपल्या शरीराची- मनाची; तीच गोष्ट आपल्या रिलेशन्सची असते. शरीरात- मनात जसे वेगवेगळे ताण येतात तसेच दोन व्यक्तींमध्येही येतात. ते अतिशय स्वाभाविक असतात. पण आपण जसं शरीराला मोकळेपणाने त्याचं काम करू देत नाही, तसं आपण आपल्या एक्स्प्रेशन्सलाही त्यांचं काम करू देत नाही. राग आला तर तो व्यक्त करत नाही. किंवा मनामध्ये ज्या भावना- जे काही आहे- ते मोकळेपणाने व्यक्त होऊ देत नाही. त्यामुळे तिथेही ब्लॉकेजेस तयार होत जातात. शरीर- मन ह्यामध्ये छोटे मोठे ताण होणं स्वाभाविक आहे. तेच रिलेशन्सबद्दल- interactions बद्दलही आहे. कारण जर आपण स्वत:शी प्रामाणिक असू तर दिवसभरात आपलं स्वत:शीसुद्धा कॉन्फ्लिक्ट होतं. होणारच. कारण एका व्यक्तीमध्येच इतके परम्युटेशन्स- काँबीनेशन्स असतात. आपण जर स्वत:कडे प्रामाणिकपणे बघत असू तर आपण स्वत:लाच दिवसभरात किती वेळेस दोष देतो; स्वत:वर चिडचिड करतो हे दिसतं. त्यामुळे दोन जणांमध्ये किंवा चार जणांच्या कुटुंबात असंख्य परम्युटेशन्स- काँबीनेशन्स असणार आणि तितके ताण अगदी स्वाभाविक प्रकारे होणार हे उघड आहे. पण इथेही ते ब्लॉक केले जातात.

आपल्याला अनेक चुकीच्या गोष्टी शिकवल्या जातात. समाजामध्ये एक व्यवस्था असावी; एक डिसिप्लिन असावी म्हणून त्या काही प्रमाणात आवश्यक आहेत; पण त्यांचे अनेक विपरित परिणामही होतात. आणि लोकेश, ह्या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जाऊन बघितलं तर तुमचा आवडता विषय- पॉवर डायनॅमिक्स समोर येतो! समाजाला व्यक्ती आनंदी, सुखी, तृप्त असावी असं कधीच वाटत नाही. कारण जर व्यक्ती जर आनंदी, समाधानी झाली तर पॉलिटिशन्सचं दुकान कसं चालणार? पुजा-यांचं दुकान कसं चालणार? म्हणून सतत व्यक्तीला निर्बंधामध्ये ठेवलं जातं. म्हणून सांगितलं जातं की, राग आवर, चिडचिड नको करू, संयम ठेव, पॉजिटिव्ह थिंकिंग ठेव! पण ह्या सगळ्या गोष्टी विषासारख्या ठरतात आणि ब्लॉकेजेस तयार करतात. कारण जर त्या परिस्थितीमध्ये- त्या क्षणामध्ये जर माझ्या मनामध्ये निगेटिव्ह फीलिंगच जर असेल तर मी का पॉजिटिव्ह थिंकिंगचं ढोंग करायचं? डुप्लिकेट मुखवटा का घ्यायचा? पण आपल्याला नेहमी हेच सांगितलं जातं. त्यामुळे आपण स्वत:सोबत प्रामाणिक तर राहात नाहीच; उलट त्यातून नसलेली भानगड होते! जर मनामध्ये निगेटिव्ह फीलिंग असेल तर किमान त्यामध्ये एक तरी गुण हा आहे की तो त्या क्षणी मनात असलेला खरा- सच्चा भाव आहे! आणि ही गोष्टही मोलाची ठरते. तो आपला खरा चेहरा असतो. पण आपण म्हणतो निगेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह थिंकिंग. पण मग ते खोटं होतं, निव्वळ झूल पांघरल्यासारखं होतं. समाजाला हेच हवं असतं. कारण प्रामाणिकता कोणालाच नको असते; सगळ्यांना एक गूडी- गूडी चालणारी व्यवस्था हवी असते. 'सगळं ठीक आहे' असं चित्र पाहिजे असतं. मग ते खोटं असलं तरी चालेल.

लोकेश- वहिनी, त्यामुळे होतं काय की, ब्लॉकेजेस तर तयार होतातच; पण आपण इतके त्यात हरवून जातो की, आपल्या मनात प्रामाणिक भाव कोणता, हेच आपल्याला कळत नाही! इतके आपण करप्ट होऊन जातो! आपल्यावर धुळीची पुटं चढून जातात. आणि निसर्गामध्ये कोणतीच गोष्ट एकेरी नसते. प्रत्येक ठिकाणी विपरित वाटत असलेल्या दोन बाजू असतातच. जिथे प्रेम असतं, तिथे दुरावा असतो; जिथे आनंद असतो तिथे दु:ख असतं, जिथे आपुलकी असते; तिथे तिरस्कार असतो; जिथे नि:स्वार्थीपणा असतो; तिथेच स्वार्थीपणाही असतोच. पण समाज आपल्याला फक्त त्यातल्या गोड गोड गोष्टी निवडायला सांगतो- प्रेम, आनंद, सुख, नि:स्वार्थीपणा इ. इ. पण आपल्या शरीरात- मनात जो निसर्ग आहे; त्यात तर नाण्याच्या ह्या सगळ्या दुस-या बाजूही असतातच. त्यामुळे त्या समोर येतातच. हे अतिशय स्वाभाविक आहे. जिथे पाऊस आहे; तिथे ऊन आहेच. जिथे दिवस आहे तिथे रात्र आहेच. फक्त दिवसच हवा; फक्त ऊनच हवं असं नसतं. तो निसर्गाचा नियमच नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींना आपण दाबून टाकतो आणि मग त्याचे असंख्य ब्लॉकेजेस निर्माण होतात.

लोकेश- वहिनी, रिलेशन्समध्ये जे तणाव असतात; जे प्रॉब्लेम्स असतात; त्यातून पुढे जाण्याचा मार्ग खरा तर अतिशय सोपा असतो. निसर्गत: आपल्याला तो मिळतच असतो. पण आपल्याला जी शिकवण दिलेली असते; ती‌ अडथळा बनते. रिलेशनमध्ये सांगितलं जातं की, राग करू नका. पेशन्स ठेवा. दुस-याला आदर द्या. भले ह्या गोष्टी मनात नसतील, तरी चालेल; त्या बाहेर दाखवा. असं सांगितलं जातं. पण त्यामुळे गुंतागुंती असंख्य वाढत जातात. आता काही आधुनिक मानसशास्त्रज्ञ वेगळा सल्ला देत आहेत. ते सांगतात राग आला तर मनापासून पोटभर रागवा. सगळी भडास काढा. शिव्या द्यायच्या असतील तर पूर्ण शिव्यांची बाराखडी वापरा. स्वत:ला अजिबात अडवू नका. भांडायचं असेल तर पूर्ण भांडा. मग अर्ध अर्ध भांडू नका. भांडताना लाजू नका. आणि त्याचा आश्चर्यकारक परिणाम होतो. तुम्ही पेंडुलमचं घड्याळ बघितलं असेल. ते डावीकडे जातं आणि मग उजवीकडे जातं. डावीकडे जात असतानाच उजवीकडे जाण्याची एनर्जी त्यात कलेक्ट होत जाते. आणि उजवीकडे जातानाच डावीकडे जाण्याची एनर्जी मिळते. राग- लोभ, आनंद- दु:ख, भांडण- प्रेम हे सगळं तसंच तर आहे. त्यामुळे भांडण हे फक्त भांडण नाही; त्यात प्रेमाची other side of the coin सुद्धा आहे. आणि प्रेम हेही नुसतं प्रेम नाहीय; त्यातही भांडणाची छुपी बाजू आहेच. पण जर आपण कोणत्याही प्रकारे तत्त्वज्ञान/ शिकवण मध्ये न आणता मनाशी प्रामाणिक राहिलो; तरी दोन दिवसामध्येच आपण हलके होऊन जातो. आजवर जितका एकत्र केलेला राग आहे; तो सगळा ओकला तर कधी तरी संपेलच ना. ज्या शिव्या द्यायच्या असतील त्या देऊन झाल्यानंतर रिक्तपणा येईलच ना. म्हणून आजचे मानसशास्त्रज्ञ हेच म्हणतात की राग येतोय ना, मग पूर्ण रागवा. आर या पार होऊन जाऊ द्या. आणि तिथेच गंमत होते! जर निसर्ग सांगतो तसं केलं तर बघता बघता राग निघून जातो. आणि त्यानंतर मिळतो तो ताजेपणा अहा हा!

त्यामुळे रिलेशनमध्ये भांडण- तणाव- राग- संताप- अविश्वास असणं हे अजिबात काळजीचं कारण नाहीय. कारण ते सगळे जोडलेले आहेत. भांडण आहे हे जीवंत नात्याचंच सूचक आहे. ते नातं सगळ्यात मृत असतं ज्यामध्ये भांडणही होत नाही. ताणही होत नाही. काहीच तिथे होत नाही. भले तिथे एक अंतयात्रेची शांतता असेल; पण तिथे जीवंतपणा अजिबात नसतो. तिथे मग खरा घटस्फोट- तिथे खरा दुरावा असतो. पण भांडण- शिव्याशाप- ताण हे सगळे अतिशय हेल्दी नात्याचे इंडीकेटर्स आहेत. जिथे आजार असतो; तिथेच निरोगी अवस्थाही येऊ शकते. पण जिथे काहीच नाही- आजारही नाही- तिथे शरीर मेल्यासारखं असतं. त्याला मग काहीच करता येऊ शकत नाही.

आणि जे लोक प्रामाणिकपणे भांडतात; सगळी भडास मोकळी करतात; तेच तितक्याच उत्स्फूर्तपणे प्रेमही करू शकतात. कारण पेंडुलम बदलतं. जर रात्र नको म्हंटलं, रात्र अडवून धरली, तर दिवसही येत नाही. लोकेश बघा ना, आपण शरीराच्या पातळीवर नाण्याच्या दोन्ही बाजू सहजपणे मान्य करतोच ना. भूक लागली की खातो आणि जेव्हा सकाळ होते तेव्हा मोकळे होतो! असं नाही म्हणत की, मी फक्त खाणारच खाणार. बाहेर टाकणार नाही. तिथे आपण सहजपणे दुसरी बाजू मान्य करतोच. तेच शरीराच्या इतर गोष्टींबद्दल व मनाबद्दलही केलं तर ताण निर्माण होऊच शकत नाही. तेव्हा मग एक स्थितप्रज्ञा येते, एक दृष्टी येते.‌ जेव्हा हळु हळु आपल्याला ह्या सगळ्या वरवर विरोधी दिसणा-या बाजू एकच आहेत हे कळतं तेव्हा हळु हळु आपल्याला एक निरपेक्ष दृष्टी मिळते. कारण जर सुख: हे दु:खाचाच एक भाग असेल तर सुखाचा इतका हव्यास कशाला असं भान येतं. किंवा जर प्रेम हे सतत राहणारं नाही; प्रेम हेच भांडणाचं दुसरं रूप आहे; तेव्हा त्यात असलेली मनाची सर्व अशांती निघून जाते. मन अगदी शांत शांत होतं. आणि सुख किंवा आनंद बाहेरच्या गोष्टीमध्ये नसून तो आपल्या दृष्टीमध्ये आहे, हे कळू लागतं. असो.

******

लोकेश- वहिनी, तुमच्या तब्येतीबद्दल मी इतकंच म्हणेन की मन हलकं होणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण शरीर मनाची छाया असतं. त्यामुळे जर मन मोकळं झालं तर अर्धे त्रास लगेच कमी होऊ शकतात. काही डॉक्टर तर म्हणतात की, शरीराचे ९०% आजार मुळात मनाचे असतात. मनावरच्या ताणाचे असतात. आणि शरीर हे आपल्या नियंत्रणात नसतंच. ते निसर्गच चालवत असतो; त्याचं प्रोग्रामिंग निसर्गच बघतो. पण आपलं मन त्यात इंटरफेअर करतं. उदा., भूक ही शरीराची असते. पण खाण्याची सवय मन ठरवतं. झोप हवी हे शरीर ठरवतं पण आपण कमी झोपतो किंवा उशीरा झोपतो. त्यामुळे खरं तर आपण आपल्या शरीराची भाषाच विसरून जातो. नाही तर शरीर आपल्याला सतत मॅसेजेस देत असतं. स्टेटस अपडेट देत असतं. जांभई येणं हाही एक मॅसेज आहे. शरीराला जास्त मोठ्या श्वासाची व ऑक्सीजनची गरज आहे, हे शरीर सांगतं. पण आपण लगेच 'एक्स्युझ मी' म्हणतो! आपल्या शरीराची भाषा ओळखली व त्यामध्ये आपलं मन आणलं नाही, तर हळु हळु शरीराच्या आरोग्याचं संतुलन वाढतं.

एका भिक्षुला एकाने विचारलं की, तुम्ही रोज काय करता? त्याने सांगितलं की, मी लाकूड तोडतो, भूक लागली की खातो आणि झोप आली की झोपतो. त्या माणसाने विचारलं आणि बुद्धत्व मिळण्याच्या आधी तुम्ही काय करत होता? तो म्हणाला मी लाकूड तोडत होतो. त्या माणसाला आश्चर्य वाटलं, त्याने विचारलं, काहीच फरक कसा नाही? त्यावर तो भिक्षु म्हणाला, फरक असा आहे की, पूर्वी जेव्हा मी लाकूड तोडायचो, तेव्हा मन भटकायचं, लाकूड तोडताना इतरही गोष्टी करायचो. पण आता लाकूड तोडताना मी पूर्णपणे फक्त लाकूडच तोडतो. त्यावेळी दुसरं काही करत नाही. आणि लाकूड तोडताना मी पूर्ण सजग असतो की मी काय करतोय. माझं अटेन्शन त्यावर पूर्ण असतं. आणि जेव्हा भूक लागते, तेव्हा खातो. खाताना दुसरं काही करत नाही. झोप आली की झोपतो. अशी स्थिती म्हंटली तर खूप सोपी आहे, पण म्हंटली तर अतिशय अवघड. कारण आपलं मन अतिशय गुंतागुंतीचं रसायन आहे. त्यात अनेक गोष्टी सतत सुरू असतात. शरीर जास्त नैसर्गिक आहे; ते एकाच जागी असतं, निसर्गाच्या नियमांनी बांधलेलं असतं. त्याउलट मन ही पूर्णत: समाजाची निर्मिती असते. मन म्हणजे आपल्यावर झालेलं कंडिशनिंग. बाकी काही नाही. जन्मलेल्या बाळाला मनच नसतं. किंबहुना त्याला स्वत:चीही जाणीव नसते- अहंकारसुद्धा नसतो. अहंकार आणि मन ह्या गोष्टी समाजाने दिलेल्या असतात.

आणखी एक गोष्ट. मी जेव्हा माझ्या स्वत:च्या संदर्भात बघतो आणि इतरही अनेकांच्या संदर्भात बघतो तेव्हा स्पष्ट दिसतं की, पती- पत्नीमध्ये तणाव होतोच. हा एक प्रकारे निसर्गाच्या नियमाचाच भाग आहे. आणि त्याचं कारणही आहे. जो माणूस नेहमी समुद्राच्या किना-यावर राहतो; त्याला समुद्राची इतकी सवय होते की हळु हळु तो समुद्र चक्क विसरतो! तो समुद्र बघणंच बंद करतो. जे आपल्या अतिशय जवळ आणि नेहमी सोबत असतात; हळु हळु आपण त्यांनाही विसरू लागतो; take for granted होतं. आणि ह्याला कोणीही अपवाद नाही. नेहमी सोबत असल्यामुळेच हळु हळु आपले आई- वडील, सख्खे भाऊ- बहिण ही नाती औपचारिक होतात. कृत्रिम होतात. त्याउलट मित्र- मैत्रीण ही नाती जीवंत राहतात. पती- पत्नी हेही नातं असं कृत्रिम होतं. किंवा लोकेश, तुम्ही संतोषसोबत इतकी वर्षं सोबत आहात- रोज भेटता. तुम्हांला संतोषला भेटल्यावर वेगळा आनंद कसा होणार? पण तेच तुम्ही मला भेटलात किंवा रवीला भेटलात तर? इतकी ही साधी गोष्ट आहे. सतत सोबत असल्यामुळे एक प्रकारे संवादामध्ये अडसर येतो. एक प्रकारचा दुरावा येतो. जीवंत नातं जाऊन फक्त देवाण- घेवाण सुरू राहते. हे अतिशय स्वाभाविक आहे. हे मी अनुभवलंय. त्यामुळे मला वाटतं की, ह्या गोष्टीला मान्य करून जोडीदारांनी एकमेकांना थोडी कन्सेशन दिली पाहिजे आणि स्वत:लाही कन्सेशन दिली पाहिजे. म्हणजे सततच्या जवळ असल्यामुळे मला माझ्या जोडीदाराचे गुण कमी आणि दोष जास्त दिसतात; तितके जास्त दोष तिच्यात नाहीत आणि तिला/ त्याला जितके दोष माझ्यामध्ये दिसतात; तितके खरे नाहीत, असं दोन्ही बाजूंनी मान्य करायला हवं. जो ताण आहे; तो बराचसा त्या स्थितीमुळे आहे. आपल्याला जे अगदी जवळ असतं; ते हळु हळु दिसेनासं होतं. त्याची व्हॅल्यू कमी होत जाते. म्हणून आपण हे स्वत:ला सांगायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे कोणीच परफेक्ट नसतं. आणि कितीही जरी गुणवान; योग्य; अशी व्यक्ती जर सतत आपल्या जवळ राहायला लागली तर लवकरच तिथेही तेच होतं. त्यामुळे अशा ताणामुळे किंवा असं अंतर येत असल्यामुळे चिडचिड करण्यासारखं काही नसतं.

आणि एक अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वत:ला आहे तसं स्वीकारणं. भले समोरचा माणूस न स्वीकारो, आपण स्वत: तरी स्वत:ला आहे तसं स्वीकारलं पाहिजे. सगळ्याच बाजूंनी. नाही, काही गोष्टींमध्ये आपल्यावर फुली मारलेली आहे. आपण नाहीत तसे. काय हरकत आहे? कारण खूप मोठा ताण सतत स्वत:ला किंवा दुस-याला बदलण्याचा/ सुधारण्याचा असतो. कॉलेजच्या वयात २०- २५ वर्षांपर्यंत स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करणं ठीक आहे. पण त्यानंतर स्वत:ला बदलण्याऐवजी‌ स्वत:ला एक्सेप्ट करणं हेच जास्त महत्त्वाचं. नाही तर आपण सतत तणावाखाली राहतो. ह्या बाबतीत निसर्गाचा नियम बघितला तर निसर्गात कोणीच कोणासारखं नसतं. गुलाबाचा वेल छोटा असतो आणि वडाचं झाड मोठं असतं. पण दोघेही सारखेच प्रसन्न असतात. आनंदात असतात. त्यांना दुस-या कोणासारखं व्हायचं नसतं. एकदा आपलं शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास पूर्ण झाल्यानंतर तरी आपण स्वत:ला बदलण्याचा/ सुधारण्याचा विचार थांबवावा. कारण त्यामुळे होतं काय की, आपलं सगळं लक्ष उद्याकडे जातं. उद्या मी हे हे साध्य करेन, उद्या मी हे मिळवेन. आणि प्रत्यक्ष जगणंच राहून जातो. २०१० मध्ये असताना २०१६ ची स्वप्नं आणि २०१६ मध्ये परत २०२२ ची स्वप्नं. किंवा २०१० चा पश्चात्ताप. उद्या जेव्हा २०२२ येईल तेव्हाही हेच. त्यामुळे एका टप्प्यानंतर भविष्यात जगण्यापेक्षा वर्तमानात जगावं.

आणि आपल्याकडे असतं तो फक्त वर्तमानच. जाणारा एक क्षण फक्त हातात असतो. आणि आनंदी राहण्यासाठी तो पुरेसा असतो. पण त्यासाठी तो जगला पाहिजे. आणि मनाचा स्वभाव एक तर भूतकाळात जाण्याचा असतो किंवा त्या आठवणींनुसार स्वप्न बघितलेला भविष्यकाळ शोधून त्यात रममाण होण्याचा असतो. वर त्या भिक्षुचा संदर्भ होता त्यात तो भिक्षु म्हणतो की, मी लाकूड तोडतो आणि भूक लागली की जेवतो आणि हे करताना दुसरं काहीच करत नाही. ही गोष्ट वाटते सोपी पण अतिशय अवघड आहे. कारण आपण एक गोष्ट करत असलो तरी आपलं मन सदैव उड्य़ा मारत असतं. आत्ता मी हे लिहितोय, पण माझं मन मध्येच विचलित होतं आहे. मध्येच मोबाईल बघ. इकडे तिकडे बघ. असं. पण जर मन वर्तमान काळात स्थिर झालं- ह्या क्षणामध्ये "आजमध्ये" स्थिर झालं तर खूप मोठ्या प्रमाणात ताण आणि चिंता कमी होतात. कारण ९९% ताण- चिंता ह्या भविष्यकाळाच्या असतात किंवा झालेल्या गोष्टींबद्दल विचार करण्यातून येणा-या असतात. जर फक्त आत्ता- आज बघितलं तर काहीच चिंता करण्यासारखं नसतं.

आणि त्यासाठी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण पूर्वी अमुक अमुक परिस्थितीतून पुढे आलो आणि आज इथे आहोत. जीवनाने आपल्याला आधी जसा मार्ग दिला तसा ते पुढेही देत राहील. किंबहुना सगळं जीवनच आपल्याला दिशा देत आहे. माणूस सोडून निसर्गात कोणालाच उद्याची चिंता नसते. झाडाला किती फुलं‌ येतील, पानगळीनंतर पानं कधी येतील हा प्रश्न कधीच पडत नाही. मग आपल्याला हा प्रश्न का पडावा? आपल्याला प्रश्न पडतो कारण आपलं मन अतिशय अस्थिर असतं. आणि ते कधीच समाधानी होत नाही. प्रामाणिकपणे बघितलं तर आपल्याला आजवरच्या आयुष्यात अशी एक तरी गोष्ट दिसते का जी मिळाल्यानंतर आपण खरोखर आनंदी झालो आणि आपल्याला अजून काही पाहिजे, अशी इच्छा उरलीच नाही? नाही ना. मग जर अजून अशी गोष्ट सापडली नाही तर ती पुढे तरी कशी सापडू शकते? अर्थातच नाही. आपल्याला आनंद आपल्या मनाच्या फोकसनुसार होतो. जर आपलं मन म्हणालं की, मला पिकनिकला जाऊन आनंद मिळेल, तर पिकनिकला जाऊन आनंद मिळतो. पण पिकनिकला गेल्यावर मन पिकनिकला थांबत नाही. ते पुढेच पळतं. त्यामुळे आनंद हा मनाच्या फोकसवर असतो आणि आनंदी होण्याच्या इच्छेवर असतो. असो.

लोकेश, तुम्हांला आधी बुद्धीझमबद्दल बोललो होतो. थोडं परत बोलतो. आपण समजतो की, बुद्धीझम, हिंदुईझम, जैन, इस्लाम, ख्रिश्चन हे वेगवेगळे धर्म आहेत. किंवा त्यापैकी एकच खरा आहे आणि इतर चुकीचे आहेत. थोडं खोलात जाऊन बघितलं‌ तर कळतं की, "धर्म" वेगवेगळे असू शकत नाहीत. निसर्गामध्ये; जीवनामध्ये नियम सगळ्यांना सारखेच असतात. उताराकडे वाहणं हा पाण्याचा नियम आणि जाळणं हा आगीचा नियम आहे. गुणधर्म आहे! धर्म शब्दाचा खरा अर्थ "निसर्गाचा गुणधर्म" आहे. चंचलता हा मनाचा गुणधर्म आहे. नाश होणे हा शरीराचा गुणधर्म आहे. त्यामुळे निसर्गाचा नियम ह्या अर्थाने धर्म = गुणधर्म एकच असतो. रक्त लाल असतं. शरीरात वेदना होतात. हा शुद्ध गुणधर्म. आणि मग बुद्धीझम, हिंदुईझम, जैन हे सगळे त्या गुणधर्माच्या दिशेने गेलेल्या लोकांची नावं किंवा लेबल्स. किंवा फक्त भाषा. रक्ताचा एक गुणधर्म असतो. कोणी तो इंग्लिशमध्ये सांगेल, कोणी मराठीत सांगेल, कोणी अरबीमध्ये सांगेल. ते सांगण्याचे मार्ग आहेत. धर्म म्हणजे असं शिखर ज्याकडे जाण्याचे अनेक मार्ग असू शकतात. हे तथा कथित रिलिजन्स म्हणजे लेबल आहेत; रूटस आहेत.

गुणधर्म हे नेहमीच सार्वत्रिक असतात. विज्ञानाच्या नियमांप्रमाणे. पाण्याला १०० अंशांपर्यंत गरम केलं की त्याची वाफ होते. मग ती अमेरिकेतही होते; समुद्रावरही होते; कुठेही होते. किंवा गुरुत्वाकर्षण हा एक नियम आहे. आपण जर त्या नियमाशी कन्सिस्टंट राहिलो; त्यानुसार चाललो तर आपण व्यवस्थित चालू शकतो किंवा पळू शकतो. पण जर आपण त्या नियमाला झुगारून दिलं आणि सरळ गच्चीमधून उडी मारली तर आपल्याला त्रास होतो. हा त्रास आपल्यामुळे होतो. कारण आपण त्या नियमाचं पालन केलं नाही. त्यानुसार स्वत:ला ठेवलं नाही. धर्म म्हणजे अशा निसर्गाच्या नियमांचा बेस. शरीराच्या पचन शक्तीचा एक नियम असतो. आपण जर व्यवस्थित जेवण केलं तर व्यवस्थित पचन होतं. पण आपण गडबड केली तर त्याचा त्रास होतो.

लोकेश, त्यामुळे मला वाटतं की, तुम्ही रूटस/ लेबल्स/ सांगण्याची पद्धत ह्याचा विचार करण्याऐवजी तो रूट जिथे नेतो तिथे जा. तुम्हांला बुद्धीझम हा रूट पटत असेल तर त्यावर पुढे जा. हा रूट तसा आणि तो रूट तसा ह्यामुळे कन्फ्युज होण्याची गरज नाही. भगवान बुद्धांनी स्वत: म्हंटलं होतं की, मी पहिला बुद्ध नाही आणि शेवटचाही नाही. बुद्ध नेहमीच अस्तित्वात असतात. कारण बुद्धत्व म्हणजे ह्या जीवनामधलं सर्वोच्च शिखर. जीवन किंवा निसर्ग इतका दरिद्री नाही की हे शिखर कधी रिकामं राहील. अशा वेगवेगळ्या बुद्धपुरुषांनी बनवलेले हे रूटस. आपल्याला जो ठीक वाटतो तो रूट घ्यायचा आणि चालू लागायचं. गंमत म्हणजे थोडंसं पुढे गेलं की स्पष्ट दिसतं की, आपण इथूनही तिथेच पोचतोय आणि दुसरा माणूस दुस-या रूटवरून येऊनही इथेच पोचतोय. तुम्ही पृथ्वीवर कुठेही असाल पण तुम्ही जर उत्तरेच्या दिशेने जात राहिलात तर एक दिवस बरोबर उत्तर ध्रुवावर पोहचतात. हे तसंच आहे.

पण अडचण कुठे होते, अडचण अशी होते की, बुद्धांनी उपदेश देऊन अडीच हजार वर्षं झाली. आत्ता आपण बघतोय की, इतकं विज्ञान- तंत्रज्ञान असूनही वस्तुस्थितीचा किती विपर्यास केला जातो. बोलताना एक जण एक बोलतो; ऐकणारा वेगळंच ऐकतो आणि लिहिणारा लिहितो वेगळंच. त्यामुळे हे अडीच हजार वर्षांचं अंतर त्रासदायक ठरतं. म्हणूनच प्रत्येक काळात नवीन बुद्धपुरुष होतात जे आधीच्या बुद्धांच्या वचनांवर प्रकाश टाकतात. नवीन काळात त्याचं स्पष्टीकरण देतात. त्यावर जमलेली धूळ पुसतात. भगवान बुद्ध बोलले तेव्हा त्यांचे प्रवचन कोणी लिहिले नाहीत. पहिलं संकलन झालं ते त्यांच्यानंतर ५०० वर्षांनी हिनयान व महायान असे पंथ निर्माण झाले तेव्हा. नंतर त्यात इतर लोकांनी आपल्या टिका- टिप्पण्या जोडल्या. त्यामुळे as a theory ते आपल्याला समजायला कठिण जातं. म्हणून आजच्या काळातला त्यावर बोलणारा/ ते सोपं करणारा बुद्धपुरुष आपल्या मदतीला येतो. जसे जपान- चीनमध्ये अनेक बुद्धपुरुष झाले. असे आजच्या काळातले बुद्धपुरुष आपल्या साधनेला दिशा देऊ शकतात.

आता ह्यावर वाटेल की, भगवान बुद्ध तर एकच होते. मग हे नंतरचे कसे काय झाले? जेव्हा भगवान बुद्ध 'बुद्ध' झाले; त्यांना बोध झाला; सत्याचं ज्ञान झालं, तेव्हा त्यांनी म्हंटलं की, सगळी सृष्टीच बुद्ध आहे! जन्मताना प्रत्येक बाळ बुद्धासारखंच जन्मतं. कोणतेही विकार नाहीत; अहंकार नाही; मन नाही. पण समाजामुळे ती स्थिती काळवंडते. अनेक विकार निर्माण होतात. त्याला undo करत जावं लागतं, unlearn करत जावं लागतं. जेव्हा संत कबीरांसारखे बुद्ध होतात तेव्हा ते म्हणतात 'निसर्गाने मला दिलेली चादर मी परत स्वच्छ करून दिली.' तुम्ही जर अशा सगळ्या संतांचं- आधुनिक बुद्धपुरुषांचं साहित्य वाचलं, ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की ते एकाच शिखराबद्दल सांगत आहेत. पण प्रत्येक जण वेगवेगळ्या कालखंडात बोलतोय; वेगवेगळ्या भाषेत आणि वेगवेगळ्या क्षमतेच्या व वेगळी समज असलेल्या लोकांसमोर बोलतोय. त्यामुळे रूटचे फरक पडतात. पण शिखर एकच राहतं.

आता तुमचा स्वभाव वैचारिक आहे- विश्लेषणाचा आहे- त्यामुळे तुम्हांला विपश्यना पद्धत चांगली ठरू शकते. ज्याचा स्वभाव खूप इमोशनल असेल; खूप भावनाप्रधान असेल; त्यांच्यासाठी भक्तीसारखे दुसरे मार्ग असतात. दुसरे रूटस असतात. काही रूटसचा परिचय केल्यानंतरच आपल्याला कळतं की, माझ्यासाठी रूट कोणता योग्य असेल. बुद्धांनी अनेक ठिकाणी म्हंटलं आहे की, बुद्धत्व हा प्रत्येकाचा स्वभाव आहे. त्यांनी एका वेळेस भिक्षुंना म्हंटलं, हे पाहा हे दोन रुमाल आहेत. भिक्षुंनी बघितलं की एक रुमाल अगदी सरळ स्वच्छ होता. आणि एक अस्वच्छ आणि अनेक गाठी घातलेला होता. त्यांनी भिक्षुंना विचारलं, दोन्हीमध्ये काही फरक आहे का? भिक्षु म्हणाले आहे पण थोडाच आहे. बुद्ध म्हणाले "बरोबर, हाच फरक तुमच्यात आणि बुद्धामध्ये आहे. तुमच्या रुमालाच्या गाठी पडल्या आहेत; रुमाल अस्वच्छ झाला आहे आणि बुद्धाने त्याचा रुमाल स्वच्छ केला आहे व गाठी मोकळ्या केल्या आहेत, बस्स.” एका ठिकाणी बुद्ध म्हणतात की सामान्य माणूस आणि बुद्धामध्ये फरक अतिशय छोटा आहे- सामान्य माणूस झोपलेला आहे आणि बुद्धपुरुष जागे झालेले आहेत. म्हंटलं तर छोटा पण म्हंटलं तर अतिशय फंडामेंटल फरक आहे. त्यांनी हेही‌ म्हंटलंय की, बुद्धत्व ही काही अचिव्हमेंट नाहीय, ती सेल्फ डिस्कव्हरी आहे. सूर्यप्रकाश सगळीकडे पसरलेला असतो; पण जर आपण आपल्या खिडक्या- दारं बंद ठेवून बसलो तर अंधारात राहतो. गरज फक्त खिडकी उघडण्याची असते. बुद्धांनी एका ठिकाणी असंही म्हंटलंय की, जे लोक हे समजू शकतात, त्यांना मी फक्त इतकी समज देतो आणि ज्यांना हे समजत नाही; त्यांना मी अनेक साधना- पद्धती देतो. त्यामुळे अशीही उदाहरणं आहेत की, केवळ बुद्धांच्या संपर्कात येऊन भिक्षुही नसलेले लोक बुद्धत्वाला प्राप्त झाले. तितकी प्रखर प्रज्ञा आणि दॄष्टी असेल तर हे आजही शक्य आहे. माझं तुम्हांला इतकंच म्हणणं आहे की, ह्या दिशेने आणखी पुढे जा. वेगवेगळे रूटस नजरेसमोरून घाला. जो बौद्ध आहे तो बुद्धांच्याच रूटने जाईल असं काही नाही किंवा जो हिंदु आहे तो कृष्णाच्याच मार्गाने जाईल असं काही नाही. आज अनेक मार्ग उपलब्ध आहेत. काही मार्गांशी परिचय करून घेतल्यावर आपल्याला कळू शकतं की आपला मार्ग कोणता. असो. . .

लोकेश- वहिनी, सुरुवातीला जे बोललो, तोच संदर्भ परत इथे येतो. आज मानवाने स्वत:च्या आयुष्यात कितीही ताण निर्माण केला असला तरी नवीन असंख्य संधीही निर्माण केलेल्या आहेतच. आज सर्व मानवी प्रगतीचं ज्ञान आपल्याला एका सेकंदात उपलब्ध होतं. ज्याला शिकायचं आहे आणि पुढे जायचं आहे, त्याच्यासाठी आज असंख्य संधी आहेत. भले विचलित होण्याच्याही शक्यता तितक्याच आहेत- डिस्ट्रॅक्शन्स अनंत आहेत- पण संधीही तितकीच आहे. त्यामुळे म्हंटलं तर आपण खूप लकी आहोत. आपल्याला आज सर्व बेस उपलब्ध आहे. आज मानवामध्ये कित्येक ताण असले; तरी ते दूर करण्याचे मार्गही सगळ्यांना उपलब्ध आहेत. प्रश्न येतो तो फक्त हाच की, आपली मॅच्युरिटी किती आहे; आपला फोकस कशावर आहे; आपण पुढे जातोय का एकाच जागी मागे- पुढे करतोय.

लोकेश- वहिनी, तुमच्या तब्येतीविषयी आधी बोललो त्याप्रमाणे मला वाटतं की, सगळं आपल्या दृष्टीवर अवलंबून असतं. आपण जर ह्या गोष्टींविषयी सजग झालो; थोडे डोळस झालो; तर मन अगदी हलकं होतं. सुख- दु:ख हा आपल्या मनाचाच खेळ असतो. आपल्या मनावर ते अवलंबून असतं. एकदा मन हलकं झालं, निरोगी झालं की शरीरही निरोगी होईलच. आपल्या मनामध्ये जर घाव असतील तर बाहेरची गोष्ट आपल्याला दु:ख देते किंवा सुख देते. रस्त्यावरून दारूडा शिव्याशाप देत जातोय. आणि तिथून आपण जातोय. त्याने आपल्याला उद्देशून हातवारे केले. लगेच आपल्याला राग येतो आणि आपण त्याच्यावर ओरडतो किंवा वैतागून तिथून निघून जातो. पण जर एखादे बुद्ध तिथे असतील तर ते अजिबात रागवणार नाहीत. कारण त्यांच्या मनामध्ये काही धारणाच नाहीत की ज्यांना तो दारुडा बाहेर काढू शकेल. किंवा त्यांना कोणी आदर द्यावा, अशी त्यांची अपेक्षाच उरलेली नाहीय. त्यांच्या काही अपेक्षाच नाहीत. त्यांच्या मनामध्ये राग नाही जो बाहेर पडू शकेल. उलट त्यांची शांत स्थिती व स्थित- प्रज्ञता बघून त्या दारुड्याचा राग रिलीज होईल; तो राग ओकून मोकळा होईल. त्यामुळे शिव्या जशा दिल्या जातात; तशा घेतल्याही जातात. आणि घेणं किंवा न घेणं ही आपली निवड असते. पण आपण सवयीमुळे डोळे उघडे न ठेवता शिवी घेतो आणि त्रागा करतो. युरोपीयन संत जॉर्ज गुरजीफची एक गोष्ट आहे. जेव्हा त्याचे वडील मरणासन्न होते, तेव्हा त्यांनी त्याला एक गोष्ट सांगितली, “माझ्याकडे तुला देण्यासाठी फार संपत्ती नाही. फक्त एक गोष्ट आहे. मी तुला एक सूत्र देतो. जेव्हा कोणी तुझ्यावर रागवेल, ओरडेल, तेव्हा त्यांना एकच सांग की मी, तुम्हांला चोवीस तासांनी उत्तर देईन.” गुरजीफने हे सूत्र लक्षात ठेवलं. त्याने सांगितलं आहे की, ह्या सूत्रामुळे त्याचं जीवनच बदलून गेलं. कोणी शिव्या दिल्या, भांडण केलं की, तो सांगायचा, थांबा, मी चोवीस तासांनी येऊन तुम्हांला उत्तर देईन. चोवीस तास हा मोठा काळ झाला. त्या वेळेत मन अगदी शांत व्हायचं. कोणी जर व्यर्थ शिव्या दिल्या असतील तर राग करायचा प्रश्नच नाही, शिव्या 'घेण्याचा' प्रश्नच नाही आणि जर कोणी केलेली टीका बरोबर असेल; योग्य दोष दाखवला असेल, तरी राग यायचा प्रश्न नाही, उलट तो जाऊन धन्यवादच द्यायचा.

थोडक्यात आपण मनात ज्या अपेक्षा निर्माण करतो, त्यावर आपली प्रतिक्रिया ठरत असते. आणि मूळ आपल्या मनात काय आहे, आपल्या मनामध्ये संतुलन आहे का, आपल्याला मनामध्ये दडलेले आनंदाचे झरे सापडत आहेत का, हे महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक गोष्टीचे दोन प्रकार असतात. प्रेमाचेही दोन प्रकार आहेत. एक प्रेम ते जे देवघेवीनुसार ठरतं. समोरचा माझ्याशी चांगला वागला, तर मी चांगला वागेन. समोरच्याने चांगली वागणूक दिली तर मीही चांगली वागणूक देईन. असं प्रेम, असं सौजन्य किंवा असा चांगुलपणा निव्वळ मुखवटा आहे. ढोंगच आहे. त्याउलट बुद्धपुरुष असे असतात ज्यांचं प्रेम हे अखंड- अनकंडिशनल असतं. फुलाच्या सुगंधाप्रमाणे. समोरचा माणूस कसा आहे, ह्याचा त्यावर फरक पडत नाही. बाष्पाने भरलेले ढग जसे बरसतात तसं हे प्रेम सगळ्यांवर बरसतं. आतमध्ये जेव्हा प्रेमासोबत राग आहे, द्वेष आहे, घृणा आहे, तेव्हा केलं जातं‌ ते प्रेम उथळ, वरवरचं. पण जेव्हा आतमध्ये फक्त प्रेम असतं, तेव्हा बाहेर काहीही निमित्त असलं तर फक्त प्रेमच बाहेर येतं. असो.

बापरे! बघता बघता किती जास्त बोललो!! पण हे तुमच्याशी उद्देशून जसं बोललो तसं माझ्याशीही बोलतोय. कारण मीसुद्धा स्वत:ला हेच सांगत असतो. आपल्याला जुन्या सवयींमुळे सतत ताण होतो- राग येतो; संताप येतो; हेच हवं तेच पाहिजे असं होतं. पण थोडी सजगता ठेवली तर हळु हळु स्वत:च्या मनाचंच हसू येतं. . . . असो.

तुम्हांला खूप खूप शुभेच्छा!

-तुमचा निर

माझं इतर लेखन: www.niranjan-vichar.blogspot.in
niranjanwelankar@gmail.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!