भुकेले आणि माजलेले

Submitted by कुमार१ on 18 April, 2017 - 07:47

प्रसंग पहिला :

परगावचा मुक्काम संपवून मी ट्रेनने माझ्या गावी परत येतोय. प्रवास अगदी शेवटच्या टप्प्यात आलाय. आमची ट्रेन आता प्लॅटफॉर्म मिळण्याची वाट पाहत स्टेशनच्या ‘आउटर’ ला थांबली आहे. गाडी जरा जास्तच रखडल्याने प्रवासी चुळबूळ करताहेत. मी कंटाळून खिडकीतून बाहेर पाहत असताना अचानक एका दृश्याने माझे लक्ष वेधून घेतले.

पलीकडच्या रिकाम्या रुळांदरम्यान ढीगभर अन्न टाकून दिलेले होते अन ते अन्न एक माणूस खाली बसून अधाशीपणे खात होता. दोन-तीन रंगांचे भात त्यामध्ये दिसत होते. कदाचित ते रेल्वेच्या खानपान सेवेतील उरलेले वा लोकांनी टाकून दिलेले पदार्थ असू शकतील. त्या कंगाल माणसाकडे पाहताच त्याचा ‘भिकारी’ हा दर्जा लगेच लक्षात आला. त्याच्या चिवडून बकाबका खाण्याच्या पद्धतीवरून तो बराच काळ उपाशी असणार हेही जाणवले. आता तो माणूस जिथे बसला होता तिथेच आजूबाजूला जुन्या-नव्या मानवी व प्राण्यांच्या विष्ठा विखुरलेल्या असणार होत्या. परंतु, त्याची भूक एवढी तीव्र असणार की असले स्वच्छतेचे विचार करणे त्याला परवडणारे नव्हते. ते दृश्य बघून अगदी गलबलून आले.

तेवढ्यात आमच्या गाडीने मोठ्ठा हॉर्न दिला व ती पुढे सरकली. त्या दहा मिनिटांमध्ये मनात असंख्य विचारांचे काहूर माजले. ते केविलवाणे दृश्य मनातून जाता जात नव्हते. ‘‘का अशी वेळ येते एखाद्यावर’’ हा विचार माझ्या मनाला अक्षरशः कुरतडत होता.

तात्पर्य : तीव्र भुकेल्या जिवाला कुठलेही अन्न चालते – अगदी कुजलेले व घाणीत बरबटलेले देखील. भूक ही एकमेव भावना त्याला खाण्यायोग्य काहीही पोटात ढकलायला लाचार करते.

प्रसंग दुसरा :
सुमारे तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. शनिवारची रात्र होती. त्या शहरातील एक प्रथितयश डॉक्टर त्यांच्या पत्नी व दोन मुलींसह एका प्रतिष्ठीत रेस्तराँमध्ये जेवायला आले होते. त्यांच्या आठवडाभरातील कामाच्या व्यापानंतरचे हे विरंगुळ्याचे क्षण होते. रेस्तराँमध्ये मंद प्रकाश पसरला होता. चित्तवृत्ती फुलवणारे संगीत चालू होते आणि झकपक गणवेशातील कर्मचाऱ्यांची लगबग दिसत होती. डॉक्टर नुकतीच वयाची चाळीशी ओलांडलेले, तर त्यांच्या मुली या शालेय वयातील. आता हे कुटुंब एका टेबलावर स्थिरावले. तेथे वेटर येताच त्यांनी सूप व ‘स्टार्टर’ ची ऑर्डर दिली.

‘स्टार्टर’ हे मुख्य जेवणाआधीचे अल्पखाद्य असते याची जाणीव अद्याप त्या खादाड मुलींना नसावी. त्यामुळे, आई-वडिलांचा विरोध असतानाही त्या नावाखाली तब्बल चार प्लेट्सची ऑर्डर दिली जाते. ते पदार्थ येतात. खाणे सुरू झाल्यावर थोड्याच वेळांत त्यांच्या टेबलावर नजर टाकता हे स्पष्ट होते की त्या पदार्थांपैकी निम्मा भाग तरी खाऊन संपणार नाही. त्यावर मुलींचे आईवडील त्यांना रागावतात. पण, त्याचा फारसा परिणाम होत नाही. आता मुख्य जेवणाची ऑर्डर दिली जाते. पुन्हा एकदा मुलींचा हावरेपणा आवरणे आईवडिलांना जड जाते. वेटर जेवण आणून ठेवतो. थोड्या वेळातच अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा निम्मे पदार्थ पानात शिल्लक राहणार हे दिसू लागते.

डॉक्टर व त्यांच्या पत्नीने मागवलेल्या अन्नाला यथाशक्ती न्याय दिलेला असतो; पण केवळ मुलींच्या हट्टामुळे मागवलेले गरजेपेक्षाचे जास्त अन्न आता उरत होते. ते बघून हे दांपत्य खरोखर अस्वस्थ झाले. त्या दोघांना अन्न टाकणे ही कल्पनाही सहन होणारी नव्हती. मुली मात्र त्याबाबत बेफिकीर होत्या. एव्हाना ताटातले अन्न संपत नसतानाही त्या दोघी यानंतर ‘ज्यूस का आईसक्रिम’ मागवायचे याची चर्चा करू लागल्या. किंबहुना अशा उच्चभ्रू रेस्तराँमध्ये असेच वागायचे असते, ‘अन्न टाकले तर त्यात काय एवढे’ असे भाव त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

रेस्तराँमधील इतर टेबलांवरसुद्धा थोड्याफार फरकाने अशीच स्थिती होती. काहीतरी अन्न टाकल्याशिवाय ‘पार्टी’ साजरी झालेली नव्हती. अशा टाकलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे हा तेथील कर्मचाऱ्यांच्या रोजच्या कामातील अप्रिय पण अटळ भाग होता. तेव्हा आता हे कुटुंब उठेल व आपल्याला ते टेबल स्वच्छ करायचेय या प्रतिक्षेत तिथले नोकर होते. परंतु, आता त्या टेबलावर एक अनपेक्षित प्रकार घडला.

आपल्या मुलींवर क्रुद्ध झालेल्या डॉक्टरांनी ‘डेझर्ट’ ची ऑर्डर निक्षून थांबवली. एवढेच नाही, तर पानात उरलेले सर्व अन्न अजिबात टाकता येणार नाही असे मुलींना खडसावून सांगितले. मग डॉक्टरांनी वेटरला बोलावले व ते उरलेले सर्व अन्न ‘पार्सल’ करून देण्यास सांगितले. वेटर त्यांच्या या पवित्र्याने अवाक झाला. त्याने त्यांच्या आज्ञेचे पालन करायचे ठरवले. खरे तर आतापर्यंत त्या रेस्तराँमध्ये असा प्रकार घडला नव्हता. त्याकाळी (म्हणजे सुमारे ३० वर्षांपूर्वी) अशा उरलेल्या अन्नाचे पार्सल करायची पद्धत रुळलेली नव्हती. अखेर कशाबशा प्लास्टिकच्या पिशव्या जमवून वेटरने ते पार्सल केले. आता डॉक्टरांचे कुटुंब ते पार्सल घेऊन निघाले. ते बाहेर पडत असताना तेथील सर्व कर्मचारी डॉक्टरांकडे कौतुकाने व आश्चर्याने बघत राहिले.

तात्पर्य : अन्न टाकण्याचा माज हा उतरवलाच पाहिजे आणि त्याची सुरवात ही आपल्या घरापासूनच हवी.

प्रसंग तिसरा
:

संध्याकाळची वेळ. छान वारे सुटलेले. एका शहरातील उपनगराचा भाग. छोट्या-मोठ्या दुकानांच्या गर्दीत रस्त्यावर एक वडापावची गाडी उभी आहे. या तळणीतल्या वड्यांचा खमंग वास दरवळतो आहे. तिथेच एक बसण्यासाठी कट्टा आहे. त्यावर बसून काही ज्येष्ठ नागरिक निवांत गप्पा मारताहेत. एवढ्यात आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधून घेतले जाते एका माणसाकडून. तो माणूस कळकट कपड्यांमध्ये आहे आणि चालता चालता काकुळतीने म्हणतोय, ‘’ओ दादा, ओ भाऊ, गावाकडून आलोय, दोन दिस उपाशी हाये, पोटात अन्नाचा कण नाही. लई भूक लागलीय हो. द्या कुणीतरी धा रुपये तरी.” त्याचे लक्ष तिथल्या वडापावच्या गाडीवर आहे आणि ‘’वडापाव दहा रुपये” ही त्या वडेवाल्याची आरोळी त्याने ऐकलेली आहे. त्याच्या चेहऱ्यावरून तो खूप भुकेला वाटतोय. तो जीवाच्या आकांताने भीक मागतोय – फक्त दहा रुपयांची. एकीकडे त्या गाडीच्या बाजूने त्याच्या येरझाऱ्या चालू आहेत.

ते दृश्य पाहून कट्ट्यावरच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये जरा अस्वस्थता आली. त्यांच्या गप्पा जरा बाजूला ठेवून ते त्या माणसाबद्दल चर्चा करू लागले. त्यांच्यात थोडेफार संवाद झडले ते असे :
‘’जाऊ द्या हो, नका लक्ष देऊ त्याच्याकडे. जाईल निघून जरा वेळाने’’,
‘’आता भीक मागायची म्हटली की दोन दिवसांच्या उपाशीपणाची कथा सांगणारच की हो तो’’,
‘’अहो, कष्ट नाही केले की हे वेळ येते माणसावर. मग भीक मागणे हा सगळ्यात सोपा धंदा.’’

त्या माणसाच्या येरझाऱ्या आणि आर्त स्वरातले भीक मागणे सुरूच आहे. अखेर, त्या ज्येष्ठांपैकी एकांना राहवत नाही. भीक देणे हे त्यांना तत्वतः मान्य नाहीये. पण, आता ते जागेवरून उठतात. झपाटल्यासारखे त्या भिकाऱ्याजवळ जातात. थोड्याशा चढ्या आवाजात ते त्याला हाक मारतात आणि वडापावच्या गाडीजवळ बोलावतात. आता ते खिशातून दहाची नोट काढतात व ती त्या गाडीवाल्याला देउन त्याला त्या भिकाऱ्याला एक वडापाव द्यायला सांगतात. त्यानुसार कृती होते. मग तो भिकारी वडापाववर अक्षरशः तुटून पडतो व दोन मिनिटात तो फस्त करतो. त्या गृहस्थांना समाधान वाटते. ते भिकाऱ्याकडे अधिक लक्ष न देता शांतपणे चालू लागतात.

तात्पर्य
: भिकाऱ्याची भूक भागवणे ही प्राथमिकता. भिकारीपणावरील तात्विक चर्चा ही त्यानंतरची गोष्ट.

प्रसंग चौथा( व शेवटचा) :

शहरातील एका शानदार मंगल कार्यालयात लग्नसोहळा चालू होता. त्यात भोजनाची पंगत बसली होती. त्यामध्ये माझ्या शेजारी एक उच्चशिक्षित व्यावसायिक गृहस्थ बसलेले होते. आमच्याकडे येणारा प्रत्येक वाढपी हा ‘वाढू का’ असे विचारूनच वाढत होता. माझ्या शेजारचे ते गृहस्थ त्याला दरवेळी ‘वाढा’ असेच म्हणत होते. याउलट मी मात्र, मी जेवढे खाऊ शकणार होतो तेवढेच वाढायला लावले.

थोड्या वेळांत माझे जेवण संपत आले व माझे ताट स्वच्छ दिसू लागले. त्या गृहस्थांचे ताट मात्र अजून तुडुंब भरलेले दिसत होते. वाढलेले सर्व पदार्थ ते खाऊन संपवू शकणार नाहीत हे आता स्पष्ट होते. एकदम ते मंद स्मित करीत माझ्या ताटाकडे पाहत मला म्हणाले, ‘’तुम्ही ताट किती स्वच्छ केले आहे ते दाखविता आहात काय?’’ त्यावर मी जोरकसपणे ‘’हो’’ म्हणालो आणि नंतर माझ्या ताटातील सर्व अन्न संपवून उठलो. मी हात धुउन परत येताना पाहिले की ते गृहस्थ आता उठले होते व त्यांनी ताटात अनेक पदार्थ टाकून दिले होते. त्यामध्ये किमती गोड पदार्थही होते.

अन्न टाकणे हा प्रतिष्ठेचा एक निकष मानणारे ते महाशय बघून मला मनस्वी चीड आली. तसेच त्या क्षणी आपण याबाबत काहीही करू शकत नाही याचा विषाद वाटला. समाजातील अशा मस्तवाल लोकांचा बंदोबस्त कसा करावा याचा विचार करत मी कार्यालयाबाहेर पडलो. जेवणाची पंगत असो वा बफे पद्धत, असे अन्न टाकणारे अनेक मुजोर आपल्याला सदैव दिसतात खरे.

तात्पर्य: एकजण अन्न टाकणारा आणि दुसरा ते लवून भजून खाणारा. पहिल्याच्या दृष्टीने दुसरा हा टिंगलीचा विषय, तर दुसऱ्याच्या दृष्टीने पहिला हा चीड आणणारा विषय.

... अन्न – माणसाची जगण्यासाठीची मूलभूत गरज. ते अन्न काहीही करून मिळवलेच पाहिजे याची जाणीव करून देणारी संवेदना म्हणजे भूक.
समाजातील बहुतेक लोक कष्ट करून अन्न मिळवतात आणि आपली भूक भागवतात. त्यामुळे त्यांना अन्नाची किंमत समजलेली असते. ते नेहेमी अन्न लवून भजूनच खातात.

काही लोकांच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी असते. त्यांना अन्न मिळवण्यासाठी कष्ट नाही केले तरी चालणार असते. त्यांची भूक भागवण्याची सोय एकतर त्यांच्या पूर्वजांनी करून ठेवलेली असते किंवा, दुसऱ्याचे शोषण करून स्वतःची पोटे भरण्यात हे लोक तरबेज असतात. सुबत्तेतून आलेला माज त्यांच्यामध्ये अगदी भिनलेला असतो. अशा लोकांमधूनच मग निर्माण होतात अन्न टाकणारे मुजोर. भुकेची वेदना कधीही न जाणवलेली ही माणसे. त्यांना अन्नाची किंमत ती काय कळणार?

या दोघांशिवाय तिसरा एक वर्ग समाजात असतो. हे लोक अन्न मिळवण्यासाठी कष्ट व धडपड करण्याऐवजी भिकारी होण्याचा सोपा पर्याय निवडतात. तेव्हा या लोकांना फुकट मिळेल तेवढेच व वाट्टेल तसले अन्न खाण्याची वेळ येते. त्यांच्या सततच्या भुकेल्या अवस्थेला ते स्वतःच जबाबदार असतात. ‘ज्याचे हात काम करतात तो कधीही उपाशी राहत नाही’ या वास्तवाचा त्यांना बहुधा विसर पडलेला असतो.

विष्ठेने बरबटलेले अन्न चिवडून खाणारा भिकारी, काबाडकष्ट करुनही अर्धपोटी असलेली माणसे, मुक्तहस्ते अन्नाची नासाडी करणारी आणि ते टाकण्यात प्रतिष्ठा मानणारी माणसे यांसारखी दृश्ये आपल्या अवतीभवती वारंवार दिसतात. ही सगळीच दृश्ये व्यथित करणारी. ही दृश्ये आपल्याला ‘समाजातील आर्थिक विषमता व वाढती दरी’ यांसारख्या जडभारी विधानांचा अर्थ अगदी स्पष्ट करून सांगतात. एवढेच नाही, तर या वास्तवाची प्रखर जाणीव करून देतात.

एखाद्या माणसाच्या भिकारी होण्याला नक्की जबाबदार कोण?
फक्त तो स्वतः की आपण सगळेच? उत्तर देणे अवघड आहे. पण, काही मुद्दे अगदी स्पष्ट व स्वच्छ दिसतात :
१. माणसाने कोणतेही काम हलके न मानता वाटेल त्या कष्टांची तयारी दाखवली तर त्याची भूक भागण्याइतके अन्न त्याला जरूर मिळते.
२. ज्या लोकांना अन्न, वस्त्र, निवारा आणि कित्येक सुखसोयी या विनासायास मिळाल्या आहेत, त्यांनी निदान अन्न टाकण्याचा माज तरी करू नये ही अपेक्षा.
३. आपली भूक भागण्यामागे आपण सोडून इतर अनेकांचे कष्टही कारणीभूत असतात, ही जाणीव सर्वांना असणे हेही महत्वाचे.

ज्या दिवशी या पृथ्वीतलावरील उपलब्ध अन्न हे मानवासहित सर्वच प्राणिमात्रांची भूक भागवून सर्वांना तृप्त ठेवेल तो अर्थातच सुवर्णदिन असेल.

( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी ( 'भूक' या नावाने) : ‘अंतर्नाद’ मासिक. संबंधित संपादकांच्या परवानगीने येथे प्रकाशित.)
*************************************************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी जे माजोरडेपणे नासाडी करतात त्यांचा माज तर काही तुम्ही ईथे चर्चा करून उतरवू शकणार नाही. >>>

अगदी मान्य. तशाही खूपश्या चर्चा या वांझ असतात हे आपण सगळे जाणतोच. कधी नैराश्यातून असेही वाटते की कशाला हवंय प्रबोधन/ लेखन/ चर्चा/ भाषण/ माहितीपट वगैरे..... पण नाही, अशा वेळेस लक्षात ठेवायचे की चांगले बदल हे कासवगतीनेच होत असतात.

मलाही हा लेख लिहिताना वांझपणाची भावना स्पर्शून गेली होती.पण, या धाग्यातील खालील प्रतिसाद बघा :

पण हल्ली माझ्याकडूनसुद्धा बर्यायच वेळा नासाडी होऊ लागली आहे. तुमचा लेख वाचला आणि स्वत:मध्ये सुधारणा आणावीशी वाटतेय. (इति. सुमुक्ता)

अरे, असा एखादा प्रतिसाद देखील आपल्याला खूप चैतन्य देतो. हाच तर कुठल्याही प्रबोधनाचा हेतू असतो ना.

बस्स, ज्योतसे ज्योत लगाते चलो.. ........

बरं मग काय ठरलं?
चेहऱ्याला साय लावणे नासाडी आहे की नाही?

चर्चा वांझ असतात असे मानणाऱ्यानी चर्चेतून कोणाचे कधी मन वळवले नसेल, जे वळवू शकतात, बदल घडवू शकतात त्यांना हजार लोकांशी बोलून दोन जरी बदलले तरी चर्चा फलद्रुप झाली असे वाटते...

काही चर्चा वांझ होतात हे खरेच पण ते कोण कशाबद्दल काय बोलत आहे त्यामुळे होतात...

बेसन हळद साय असा लेप चेहर्‍याला लावुन कुणाची त्वचा तुकतुकीत, मुलायम, उजळ होत असेल तर ती नासाडी नाही होणार.
>>>>
म्हणजे त्वचा तुकतुकीत उजळ मुलायमसिंग होत नसेल तर ती अन्नाची नासाडी हे तरी कबूल.
बाकी अन्न खाल्यावर पोट भरायची ग्यारंटी असते. पण त्वचा उजळ होईलच की नाही याची ग्यारंटी नाही. थोडक्यात अन्न जुगारावर लावल्यासारखे झाले हे Happy

यात एखादा भूकेला म्हणजे कोण? मनुष्य प्राणी की मनुष्येतर प्राणी सुद्धा? अन्न उरले आणि ते मनुष्येतर प्राण्याला खायला दिले तर ती नासाडी होईल की न होइल?
>>>>>>>>>>>>>>>>
माझ्यामते ती देखील नासाडीच.
एक म्हणजे तुम्ही पाळलेल्या जनावरांसाठी खास जेवण बनवून त्यांना देत असाल तर ते ओके, पण नाईलाजाने उरलेले कचर्‍यात टाकायचे त्यापेक्षा जनावरांना द्या हे नासाडीचेच अन्न झाले. जर तुम्ही नाही दिलेत तरी ते त्यांचे पोट नेहमीसारखेच कुठूनतरी भरतील. ते तुमच्या अन्नाच्या भरवश्यावर जगत नसतात.

एक सोप्पा हिशोब सांगतो, जगातली एक लोकसंख्या आहे आणि त्यासाठी एक ठराविक अन्न पिकवले जाते. आता जे जनावर चारा खाऊन जगते त्याला तुम्ही माणसांसाठी शिजवलेले ऊरलेले अन्न द्याल तर ते अन्न ज्या माणसापर्यंत पोहोचायला हवे होते, वा ज्या माणसाच्या वाटणीचे होते तो काय चारा खाणार का?

१) अन्न म्हणजे काय?
>>>>
भूक लागल्यावर जे खाऊन ती भूक भागवू शकाल आणि पचवू शकला असा कुठलाही पदार्थ.

२) भुकेल्याची व्याख्या काय?
>>>>>
ज्याची जगण्यासाठी लागणारी किमान अन्नाची गरज भागली नाहीये असा मनुष्य.

३) नासाडी म्हण्जे काय ते वर दिलेच आहे... पण ती फक्त मनुष्य प्राण्याच्या दृष्टिने बघायची का .............
>>>>
वर उत्तर दिलेय. माणसांनी फक्त माणसांचेच बघायचे. हे भूतदया वगैरे काही नसते. आपण पटकन चिरडून मुंगी मारतो, गाय मारली की दंगे घालतो, बोकड दाबून खातो, आणि निष्पाप जनावरांना खाणारा वाघ कमी झाला म्हणत आरडाओरडा करत त्याला वाचवायला बघतो. सगळे आपणच आपल्या सोयी आणि स्वार्थानुसार बनवलेले नियम असतात.

४) ही भूकेची बाब - तत्वे, फक्त अन्नाबाबतच बघायची की बाकीच्या इच्छा आकांक्षा मनोराज्ये स्वप्ने यांचेबाबतीतही लावायची?
>>>>
माझ्या पहिल्याच प्रतिसादात मी हे म्हटलेले की नासाडी हजारो वस्तूंची आपल्या आसपास चालत असते, मात्र अन्न ही सर्वात मूलभूत गरज असल्याने आपण त्या नासाडीबाबत जास्त जागरूक आणि भावनिक असतो. म्हणून तुर्तास अन्नावरच लक्ष केंद्रीत करूया. तरी ईतर कुठल्या नासाडीबद्दल कोणाला चर्चा हवी असल्यास मला विपुत कळवा मी त्यानुसार दर आठवड्याला एकेक नासाडीचा विषय घेत स्वतंत्र धागा काढत जाईन. उगाच याची नासाडी त्याच्यात नको जायला.

५) जसे वर लिहिलय की रंगपंचमीमध्ये पाण्याची नासाडी होते, तर मग काही अब्ज माणसे रोजच्या रोज आंघोळ करुन पाण्याची नासाडी करतात, त्याचे काय करायचे? कारण नैसर्गिकदृष्ट्या माणूस हा "प्राणी" आहे, व जगातील कोणताही प्राणी "स्वतंत्ररित्या आंघोळीचे चोचले" वगैरे करत नाही, अन केलेच तर फक्त पाणी वापरित नाही, जसे की हत्ती/गेंडे चिखल/धुळ अंगावर उडवुन घेऊन आंघोळ करतात.
>>>>>
आपण आंघोळ सुंदर दिसण्यासाठी वा मनोरंजनासाठी करत नसून स्वच्छतेसाठी आणि आरोग्यासाठी केली जाते. ती न केल्यास गजकर्ण, खजूर, नायटा, बवासीर, दाग, खाज, खुजली असे घाणेरड्या नावाचे रोग होऊ शकतात. त्यामुळे आंघोळीला नासाडी म्हणता येणार नाही.

एक यावरून आठवले - लहानपणी म्हणजे वयात येताना मी आंघोळ करताना तोंडाला दोन वेळा साबण लावायचो आणि धुवायचो. मला वाटायचे त्याने माझा चेहरा जास्त सुंदर दिसेल. ती मात्र एक अजाणतेपणी अज्ञानातून केलेली नासाडी होती

६) स्वःच्छतेच्या अतिरेकी कल्पनांमुळे पाण्याची जी नासाडी होते तिचे काय करायचे? (पाण्याचे उदाहरण अन्नपदार्थातील महत्वाचा घटक म्हणून घेतोय) जसे की, टॉयलेट मधे गेल्यावर दरवेळेस अडिच तिन लिटर पाणी फ्लश केले जाते.... साबण/डिटर्जंट/सोडीयम सिलिकेट/शांपु वगैरे घटकांमुळे कपडे/अंग धुताना गरजेपेक्षा कितीतरी अधिक पाणी वापरले जाते. याचे काय करायचे?
बाकी कुणालाही अशा नासाडीबद्दलच्या बाबी आठवत असतील तर कृपयाच इथे मांडाव्या ही विनंति.
>>>>>>
हे मुद्दे कमीअधिक प्रमाणात योग्य आहेत. हे या साठी म्हणतोय की प्रत्येकाच्या टॉयलेटचा वास कमी अधिक प्रमाणात वेगवेगळा असतो आणि त्यानुसार पाणी लागते. त्यामुळे माझे एक लीटरमध्ये काम होते तर तू देखील तेवढ्यातच आटप असे आपण म्हणू शकत नाही.

बाकी जे माजोरडेपणे नासाडी करतात त्यांचा माज तर काही तुम्ही ईथे चर्चा करून उतरवू शकणार नाही. >>>
अगदी मान्य. तशाही खूपश्या चर्चा या वांझ असतात हे आपण सगळे जाणतोच.
>>>>>>

मी कुठे चर्चांना वांझोट्या म्हणालोय. उलट मी स्वताच चर्चप्रिय माणूस आहे.
आधीचा संदर्भ वाचा. ज्यात कोणीतरी धागा फक्त माजोरड्या नासाडीबद्दल आहे असे म्हटलेले. त्याल असहमती दर्शवताना मी म्हणालो की माजोरडे तुमची तुमची चर्चा वाचून ना सुधारणार ना त्यांचा माज उतरणार. म्हणून चर्चा त्यांच्यावर फोकस ठेवून व्हावी जे कळत नकळत, अजाणतेपणी, वा अज्ञानातून नासाडी करतात त्यांच्या लक्षात यावे आणि त्यांनी आपल्या सवयी बदलाव्यात यासाठी व्हायला हवी. न की माजोरड्यांसाठी.
आणि तुम्ही सुमुक्ता यांची कोट केलेली पोस्ट हेच दर्शवते.

बरं मग काय ठरलं?
चेहऱ्याला साय लावणे नासाडी आहे की नाही?

>>>>>
हे ज्याचे त्याने स्वत: ठरवायचे आहे प्रामाणिकपणे. ज्याला ती नासाडी वाटेल त्याने ती लाऊ नये, आणि ज्याला वाटत नाही त्याने बिनधास्त लावावी साय तोंडाला, मनात कसलेही किल्मिष न ठेवता.
हेच बर्थडे केकलाही लागू.
लग्नात रुखवतीत खाद्यपदार्थांपासून बनवलेल्या शोभेच्या वस्तूनांही लागू.
आणि डोळ्यावरच्या त्या काकड्यांनाही लागू...
एका चित्रपटात बहुधा गोविंदाने अशीच हिरोईनच्या डोळ्यावर ठेवलेली काकडी खाल्ली होती. मीठ न लावता काकडी कशी खातात देव जाणे, पण ते बघून छान वाटलेले. कारण हिरोईनने तर काही ती खाल्ली नसती. नासाडीच होणार होती.

एक म्हणजे तुम्ही पाळलेल्या जनावरांसाठी खास जेवण बनवून त्यांना देत असाल तर ते ओके, पण नाईलाजाने उरलेले कचर्‍यात टाकायचे त्यापेक्षा जनावरांना द्या हे नासाडीचेच अन्न झाले. जर तुम्ही नाही दिलेत तरी ते त्यांचे पोट नेहमीसारखेच कुठूनतरी भरतील. ते तुमच्या अन्नाच्या भरवश्यावर जगत नसतात.
एक सोप्पा हिशोब सांगतो, जगातली एक लोकसंख्या आहे आणि त्यासाठी एक ठराविक अन्न पिकवले जाते. आता जे जनावर चारा खाऊन जगते त्याला तुम्ही माणसांसाठी शिजवलेले ऊरलेले अन्न द्याल तर ते अन्न ज्या माणसापर्यंत पोहोचायला हवे होते, वा ज्या माणसाच्या वाटणीचे होते तो काय चारा खाणार का?>>>>>+१
गोग्रास देणं पटत नाही. त्याऐवजी हे ताजं अन्न भुकेलेल्या माणसाला द्यावे. संत तुकडोजी महाराज ही असेच म्हणतात...

बरं मग काय ठरलं?
चेहऱ्याला साय लावणे नासाडी आहे की नाही? >
>>>

काही प्रश्नांची उत्तरे ‘होय’ व ‘नाही’ या दोन पर्यायांच्या दरम्यान मध्ये कुठेतरी असतात. तसा हा प्रश्न आहे.
ठीक आहे, पण आता एक ठाम भूमिका घेतो.
होय, ही नासाडी आहे. कारण?
सजीवाचे भुकेले पोट सोडून अन्नाचा इतर कुठेही केलेला वापर ही नासाडी समजावी.
त्याच न्यायाने केक फासणे आणि वर आलेले इतर प्रकार सुद्धा नासाडीच.

साय विरुद्ध केक या द्वंद्वात परंपरा विरुद्ध नवता असा वाद डोकावताना दिसतोय. Bw

आपण आंघोळ सुंदर दिसण्यासाठी वा मनोरंजनासाठी करत नसून स्वच्छतेसाठी आणि आरोग्यासाठी केली जाते. ती न केल्यास गजकर्ण, खजूर, नायटा, बवासीर, दाग, खाज, खुजली असे घाणेरड्या नावाचे रोग होऊ शकतात. त्यामुळे आंघोळीला नासाडी म्हणता येणार नाही. >>> + १००००.

एकदम सही ! पण, ती अंघोळ एक बादलीभर पाण्यातच व्हावी.
टब / शॉवर प्रकारातली अंघोळ ही नासाडी आहे.

आता निसर्गाकडून आले निसर्गाकडे गेले त्यात कसली आलीये नासाडी असे म्हणून जगात एनर्जी निर्माण होत नाही वा नाश पावत नाही अशा सिद्धांतावर शेवट व्हावा.

{{{ मी कुठे चर्चांना वांझोट्या म्हणालोय. उलट मी स्वताच चर्चप्रिय माणूस आहे. }}}

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 April, 2017 - 03:10

मग आज सण्डे प्रेयरला गेला की नाहीत?

{{{ ती अंघोळ एक बादलीभर पाण्यातच व्हावी.
टब / शॉवर प्रकारातली अंघोळ ही नासाडी आहे.
Submitted by कुमार१ on 30 April, 2017 - 08:03}}}

जर तुम्ही व्यवस्थित कौशल्य प्राप्त केलंत तर शॉवरच्या साहाय्याने देखील बादलीपेक्षाही कमी पाण्यात अगदी स्वच्छ आंघोळ करता येते.

जर तुम्ही व्यवस्थित कौशल्य प्राप्त केलंत तर शॉवरच्या साहाय्याने देखील बादलीपेक्षाही कमी पाण्यात अगदी स्वच्छ आंघोळ करता येते.
>>>>
याच्याशी बरेच अंशी सहमत आहे. नेमके बादलीपेक्षा कमी की जास्त मोजले नाही पण कमीत कमी पाण्यात शॉवरखाली आंघोळ करता येते. मात्र त्यासाठी शॉवरही असा असावा की जास्तीत जास्त पाणी अंगावर येईल, गरज नसताना बाथरूम धुण्यात अर्थ नाही.

पण मुळात शॉवरने आंघोळ करणार्‍यांवर निशाणा साधणे पटत नाही. ऊच्च आर्थिक स्तरामध्ये तांब्याबादलीपेक्षा शॉवरने आंघोळ करणार्‍यांचे प्रमाण जास्त असेल. याला चैन म्हणा फॅसिलिटी म्हणा पण आर्थिक सुबत्तेशी हे निगडीत आहे. बॉलीवूडचे लोकप्रिय कलाकार, हिरोहिरोईनी तांब्याबादलीने आंघोळ करत आहेत हे चित्र डोळ्यासमोर आणले तरी किती नॉनग्लॅमरस वाटते.

{{{ हिरोईनी तांब्याबादलीने आंघोळ करत आहेत हे चित्र डोळ्यासमोर आणले तरी किती नॉनग्लॅमरस वाटते.
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 30 April, 2017 - 14:57 }}}

आंबटशौकिन आहात काय?

प्रश्न गोग्रास अथवा प्राण्यांना अन्न शिजवून खाउ घालण्याचा नव्हता.
अन्न उरलेय. त्याची विल्हेवाट कशी लावावी या बद्दल होता.

तर अशा उरलेल्या अन्नाचे काय करावे?

०. शक्य असल्यास कुणावरही जबरदस्ती न करता ते नीट ठेवुन पुढल्या भुकेला वापरावे.

१. तिकडे लोक अुपाशी मरतात आणि तुम्ही अन्न जास्त झालेय म्हणुन नको म्हणता? माजलात का? खाउन माजा टाकुन माजु नका. खा आणि संपवा! असे करुन पोट भरले असतानाही दाबून खाउन संपवावे आणि तिकडे लोक उपाशी मरताहेत हे विसरुन जावे.

२. ते इतर सजीवांना खाउ घालावे. पण सहज डोक्यात न येणाऱ्या सूक्ष्म जीवजंतुंना मात्र नको.

३. आपला अंदाज चुकतोय. आपण जास्त शिजवतोय/ ऑर्डर करतोय. उद्यापासून आपण चूक सुधारुच, तुमचे पोट भरलेय तर पुढे अेकही घास खाउ नका प्लीज. सोडून द्या जास्तीचे अन्न,
.आज उरलेले अन्न गरजुंना कसे पोचेल याचा आपण विचार करु. असे लोकांना सांगावे आणि तसा प्रयत्न करावा.

आज उरलेले अन्न गरजुंना कसे पोचेल याचा आपण विचार करु. असे लोकांना सांगावे आणि तसा प्रयत्न करावा. >>>>> अगदी बरोबर.
मानव, चर्चेचा सारांश चांगला सांगितला आहेत.
आभार!
सर्वांना महाराष्ट्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

पुलंचा ‘एक शून्य मी’ हा लेख १९७४ मध्ये प्रसिद्ध झाला होता. हा माझा अतिशय आवडता लेख असून मी तो ६ महिन्यातून एकदा तरी वाचतो. त्या लेखात ‘टाकलेल्या अन्नाची विल्हेवाट’ या बाबत एक प्रसंग दिला आहे.

पुलंच्या घराशेजारी एक हॉटेल होते. तेथे रोज रात्री १२ नंतर भिकाऱ्यांची रांग लागत असे. त्यामध्ये सर्व वयोगटातील भिकारी असत. रांगेतील प्रत्येकाच्या हातात पत्र्याची डबडी, कागदी बॉक्स असे काहीतरी असे. मध्यरात्री हॉटेलचे मुख्य दार बंद झाल्यावर मागच्या दाराने या सर्व भिकाऱ्यांना तेथील टाकलेल्या अन्नाचे वाटप चाले.

हे सांगताना पुलं लिहितात, “ मागचे दार किलकिले झाले, की त्या अंधारातल्या कोन्याकोपऱ्यातून चारपाच वर्षाच्या अर्भकापासून ते कमरेत वाकलेल्या म्हाताऱ्यापर्यंत हा शे- सव्वाशे जीवांचा घोळका त्या दारापाशी जमतो”.
........ आज हे वाचताना मला अगदी गलबलून आले. दोन बाबी जाणवल्या.
पहिली म्हणजे हा लेख १९७४ मधला आहे. तेव्हाही हॉटेलमध्ये अन्न टाकणे हे आजच्यासारखेच होते.
दुसरी बाब चांगली आहे. ती म्हणजे त्या टाकलेल्या अन्नाचे भुकेल्याना वाटप तेव्हाही होत होते.

माणसाच्या मूलभूत प्रवृत्ती या सनातन आहेत हे खरे......

लेख आवडला व पटला. 'टाकलेल्या अन्ना चे वाटप' या बाबत स्वता काम केलेले असल्याने विशेश भावला. हा खरोखर महत्वाचा विषय आहे.
माझी काही निरिक्षणे :
१. प्रसंग क्र. २ हा मी अनेक्दा अनुभवला आहे. पण, त्यातल्याप्रमाणे 'पार्सल' न्यायला लोक तयार नसतात.

२.ज्याचे हात काम करतात तो कधीही उपाशी राहत नाही’ या वास्तवाचा त्यांना बहुधा विसर पडलेला असतो. >> +१. जवळपास संपूर्ण भारतात शीख माणूस भीक मागताना दिसत नाही.

३. एकदा एका जर्मन हॉटेलात एका भारतीयाने अन्न टाकले होते. तेव्हा तेथील वेटरने त्याला सुनावले होते, " हे शिजवायला जी उर्जा लागते ती तुम्ही वाया घालवलीत''.

३. पुण्यातल्या 'दुर्वांकूर' मध्ये 'अन्न न टाकल्यास बिलातले २० रु. परत' अशी जोरदार जाहिरात असते. पण, असे दिसून आले आहे की गिर्‍हाइक दुरावू नये म्हणून अन्न टाकणार्यांसकट सर्वांनाच बिलात सवलत देतात. ठीक आहे, जाहिरातीने निदान प्रबोधन होते असे समजूयात

४. एखाद्या माणसाच्या भिकारी होण्याला नक्की जबाबदार कोण? >> ८०% तो मा णूस स्वता आणि २०% समाज.

खाण्यावरून निघालाच आहे विषय म्हणून लिहितो. टाटा मोटर्स मध्ये प्रत्येक आठवड्याला एकदा तरी (सध्या दर मंगळवारी) बटाटवडा असतो.(हो! बटाटवडाच. हा शब्द असाच लिहायचा असतो. बटाटेवडा नाही. काही शब्द आपण उगाच चुकीचे वापरत असतो. म्हणींचे पण तसेच. ‘पुराणातली वांगी पुराणात...’ अशी म्हण सरसकट सगळे जण वापरतात, पण प्रत्यक्षात ती ‘पुराणातली वानगी पुराणात...’ अशी आहे. वानगी म्हणजे उदाहरण आणि वांगे हि फळ भाजी आहे...असो) मेंन कॅन्टीनला जनरल शिफ्ट चे लोक येऊन नाश्ता घ्यायला रांगेत उभे राहतात. गरम गरम वडे समोर पातेल्यात ओतले जातात. बऱ्याचदा यंत्रणेवर ताण पडतो, लोकांना रांगेत तिष्ठत उभे राहावे लागते, लवकर नाश्ता संपवून कामावर जायचे असल्याने बरेच जण कटकट करतात. तरीही सगळ्यांना वडे मिळतात, अगदी भरपूर, १-२ नाही, पोटभर, मनसोक्त.( ह्या दिवशी टाटा मोटर्स मध्ये १लाखाच्या आसपास वडे बनतात असे आम्हाला ट्रेनिंग मध्ये सांगितले होते) पण बरेच लोक काय करतात, वड्यावरचे फक्त बेसनाचे आवरण खाऊन, आतल्या बटाट्याच्या भाजीचे गोळे उस्तावालीच्या टोपलीत फेकतात. त्यांना छेडले तर भाजीत मिठच नाही, बटाटे कच्चेच आहेत. उकडलेले अख्खेच्या अख्खे बटाटे आहेत, असली कारणं निर्लज्जपणे सांगतात. ह्यात सगळे जण येतात हां. फक्त साहेबलोक नाही, सुपरवायझर, मनेजर, कामगार ते अगदी टेम्पररी कामगार पोरं देखिल. कामगारांना काही बोलले तर उलट देखिल बोलतात. आपण काही पाप करतोय, लाजिरवाणे वागतोय असे ह्यापैकी कुणाला ही वाटत नाही. खरकट्या अन्नाकरता ठेवलेले बिन्स बटाट्याच्या भाजीने भरून जातात.तेवढ्या बटाट्याच्या भाजीत १०००-१२०० लोक सहज जेवतील.
तीच गोष्ट इतर नाश्त्याच्या पदार्थांची आणि जेवणाची. ८-१० पोळ्यांची चळत घेतात आणि कडा काढून फेकतात. कडक लागतात म्हणे, लगेच पोटशूळ उठत असावा. घरी करा बर असे, कशी बायको किंवा आई हाणेल! अन्नब्रह्म म्हणायचे आणि ही अशी त्याची उपेक्षा.
बरं ह्यापैकी अनेक जण अत्यंत गरिब घरातून आलेले असतात. ह्यांचे ओळखीचे, भाऊबंदकीतले अनेक जण गावाकडे दोन वेळच्या अन्नाला मोताद असतील. पण ह्यांचा हा असा माज, हे खरे बकासुर.(खरे तर असे म्हणणे बकासुराचा देखिल अपमानच आहे. तो गाडाभर अन्न खायचा पण टाकायचा नाही.)

फुकटाचा माज म्हणून बटाटेवड्यातील बटाटे फेकून नुसते पीठ खाणे हे काही झेपले नाही. बटाटेवड्याची मजा त्या कॉम्बिनेशनमध्येच असते. नुसते पीठ फार बोर लागेल.. नक्कीच बटाट्यांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असावा. फुकटात देताना क्वालिटी जपली जात नसेल तर त्या अन्नाचे वाटप करणाराही जबाबदार.

जसं इंग्रजीत टोमॅटो सॉस म्हणतात, टोमॅटोज सॉस नाही. पोटॅटो चिप्स म्हणतात पोटॅटोज चिप्स नाही, तसं.

Pages