'श्रीसाईसच्चरित' प्रस्तावना

Submitted by आनन्दिनी on 6 April, 2017 - 04:27

हरिः ॐ

'श्रीसाईसच्चरित' साईबाबांबद्दलचा अप्रतिम ग्रंथ. हेमाडपंत म्हणजेच कै. गोविंद रघुनाथ दाभोळकर यांच्या हातून बाबांनीच स्वतः लिहून घेतलेली ही अद्वितीय रचना. याचं विविध भाषांमध्ये भाषांतरही झालं आहे. मराठीतसुद्धा कर्नल निंबाळकरांनी श्रीसाईसच्चरिताचं अतिशय सुंदर भाषांतर केलं आहे. मग हे सर्वकाही असताना पुन्हा हे लिहिण्याचा प्रपंच कशाला असा प्रश्न जर कोणाच्या मनात आला तर त्यात वावगं काहीही नाही. या प्रश्नाचं उत्तर एकच, गुर्वाज्ञा! गुरुमातेने मला जी आज्ञा केली आहे, तिचं पालन मी करते आहे एवढंच. हेमाडपंतांनी विरचित  ग्रंथावर माझं भाष्य म्हणजे राजा भोज आणि गंगू तेली हीच अवस्था हे मीसुद्धा पूर्ण जाणते. पण हेमाडपंतानीच म्हटलं आहे के पेटी कशी वाजेल, सूर कसा लागेल ही चिंता पेटीला कधी असते का ? हा खटाटोप तर वाजवणार्याला असतो. गुरुआज्ञापालन करणारी मी ही त्या पेटीसारखी आहे. माझ्याकडून काय करून घ्यायचं याची काळजी, जबाबदारी आणि श्रेय सारं काही त्या गुरुमाऊलीचं!

मी अनेकांकडून ऐकलं की 'श्रीसाईसच्चरित' वाचण्याचा प्रयत्न केला पण भाषा समजत नाही. जुन्या वळणाची प्राकृत भाषा आणि ओवीबद्ध रचना ही आजच्या काळात समजायला थोडी अवघड आहे खरी. परंतु केवळ त्यामुळे आपण या सुंदर ग्रंथाच्या आनंदाला मुकता कामा नये असं मला अगदी मनापासून वाटतं. म्हणून साधारण दहा दहा ओव्या घेऊन त्यांचं निरूपण द्यावं असा विचार मी करते आहे. ही पद्धत सोयीची आहे की नाही याचा अधून मधून आढावा घेत जाईन.

'श्रीसाईसच्चरित' हा माझ्यासाठी माझा स्वतःचा प्रवास आहे. मी मेडिकल कॉलेजला असताना, सुमारे सतरा अठरा वर्षांपूर्वी श्रीसाईसच्चरित प्रथम वाचायला घेतलं. रोज एक अध्याय वाचायचा असा माझा नेम होता. अध्यायाच्या शेवटच्या पानावर मी माझं बोट ठेऊन देत असे. आणि वाचताना दर पाच मिनिटांनी अजून किती पानं राहिली आहेत ते बघत असे. असं वाचन उरकणारी मी, आता जेव्हा श्रीसाईसच्चरित वाचते तेव्हा काय अनुभते ते मला शब्दांत कधीच पूर्णपणे सांगता येणार नाही. अजून किती राहिलंय हे बघणं आता संपलं, आता असतो तो निखळ आनंद..... जो आनंद मी अनुभवतेय तो इतरांनाही मिळावा अशी माझी खरंच, अगदी मनापासून इच्छा आहे. आणि त्याकरिताच हा लेखन प्रपंच!

साईबाबा आणि माझे सद्यगुरु हे दोन वेगळे आहेत असं मी कधी मानलंच नाही. कोणावर माझी जास्त भक्ती आहे हे म्हणजे मला माझा मुलगा एक वर्षाचा असताना अधिक आवडायचा की दोन वर्षांचा असताना असं झालं. या सद्गुरुतत्वाला माझं लोटांगण. आईवडलांचं प्रत्येकावर न फ़िटणारं ऋण असतं. त्या माझ्या आईवडलांना आणि माझ्या संततुल्य आजोबांना नमस्कार करून या लिखाणाला आरंभ करते.

हरिः ॐ, श्रीराम, अंबज्ञ
आनन्दिनी

(क्रमशः)

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

सागराचे खारट पाणी बाष्पीभवनाने ढगाच्या माध्यमातून पुन्हा वसुंधरेवर वर्षाव करते तेव्हा ते फक्त मधुर चवीचेच असते त्याचप्रमाणे श्री साईचरित्र आणि त्याद्वारे लाभणारे बाबांचे कृपाआशीर्वाद भक्तांच्या जीवनातील सर्व खारटपणा स्वत: स्वीकारून त्यांच्या जीवनात सुंदर माधुर्य पसरवतात. ह्यासाठी माझ्या जीवन नदीचा प्रवाह कुठूनही कसाही सुरु झाला तरी "त्या"च्याच नियमानुसार ह्या नदीचे "मुख" मात्र फक्त त्यालाच येवून मिळते. साईसत्चरित आम्हास नवविधा भक्तीची शिकवण देते आणि त्याच बरोबर शिर्डीतील भक्तांच्या आचरणातून आम्हास त्यातील प्रत्येक पायरीवरील प्रवास उलगडून दाखवते.

हा कृपासिंधु साईनाथ म्हणजेच हे साईचरित्र, ज्यातील कथांच्या मंथनातून श्रद्धावानास फक्त आणि फक्त अमृताची प्राप्ती होते.
तुमच्या ह्या सुंदर प्रयासास खूप खूप शुभेच्छा.

श्रीसाईसच्चरित..... जिव्हाळ्याचा विषय Happy
मला श्रीसाईसच्चरिताची गोडी श्रीसाईसच्चरित पंचशील परिक्षांमुळे लागली. Rather... परिक्षा द्यायची म्हणून साईसच्चरित्र ग्रंथ मिळवला. भक्ती कश्याशी खातात हे ही माहित नव्हते. गिरगावात लहानाची मोठी झाल्याने स्वामी समर्थांच्या मठात जाणे होई आणि जी कुणी supreme power आहे तिच्यात आणि माझ्यात जराही अंतराय नाही, मी जे काही करते ते तिला कळतंच एवढं मात्र ठामपणे समजून होते. बाकी चरित्रं आणि त्यावरच्या परिक्षा ही गोष्टच दूरची होती.

पण साईसच्चरित हाती आलं ते सद्गुरूभक्तांचे आचरित कसं असावं हे शिकवण्यासाठीच. हळूहळू त्यातील कथांचा आपल्या आयुष्याशी संबंध लावत देवयान पंथावर प्रवास सुरू झाला आणि हे चरित्र जीवी धरलं गेलं.

आनंदिनी, तुम्ही अध्याय wise जाऊन प्रत्येक कथेतील सद्गुरूतत्वाच्या लीला, शिकवण, भावार्थ ह्याबद्दल लिहिणार आहात का?

धन्यवाद. हरि ॐ. श्रीराम. अंबज्ञ.

आई चंडिकेच्या चरणी कृतज्ञ असणे म्हणजे ‘अंबज्ञ’ आहे.
जो श्रद्धावान आहे आणि परमात्म्याला मानतो, तो अम्बज्ञच असतो.

अश्विनी बरोबर म्हणालात. ओव्यांचा फक्त शब्दार्थ न देता त्यांचा भावार्थ, 'reading between the lines' आणि इतर ठिकाणाची समान उदाहरणं किंवा आपल्या नित्य व्यावहारिक जीवनातील उदाहरणं द्यावीत असा माझा विचार सद्ध्या तरी आहे. एका वेळी एक अक्खा अध्याय फार मोठा होईल. अध्यायाचा थोडा थोडा भाग घेता येईल असं वाटतं.
त्या निमित्ताने चर्चाच झाली तर अधिकच उत्तम. त्यातून सर्वानाच अधिक कळेल.

Mi anek varshapasun SriSaisatcharitrache parayan karat ahe.Pan malahi Praytek adhyaayatlya kahi owyancha arth kalat nahi.Tumchya dware Sai mazi ichcha Purna Karnar.Saileela agadh ahe hech Khare.

Tumhaala ase suchwawese watate ki pratyek adhyayat jya olincha arth samjane kathin ahe tyach olinwar charcha vhawi.Ata tumhi he dhanushya pelnyache tharavale ahe,tar Sai margdarshan kartilach.

मी सध्या वाचतेय. मला जमेल तसं पाच ओळी, दहा ओळी. तसं मी अनेक वर्ष अधूनमधून वाचते आणि प्रत्येक वेळेला नवीन अर्थ उमगतो, मग वाटतं की अरे ह्यात हा पण अर्थ दडलाय जो आपल्याला आत्ता कळला.

हे नेहेमी होतं माझ्याबाबतीत आणि मला आवडतं ते असं नव्याने उमगत जाणे. स्वतः चे स्वतःलाच अर्थ लागणं. मी साईबाबांनाच गुरुस्थानी मानते.