ओल्या हरभऱ्याची भाजी

Submitted by विद्या भुतकर on 3 April, 2017 - 22:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ओले हरभऱ्याचे दाणे साधारण २ वाट्या ,

जिरे, मोहरी, तेल, हळद, हिंग

लसूण पाकळ्या ३-४,

एक कांदा,

कांदा-लसूण मसाला २-३ चमचे( मसाला नसेल तर लाल तिखट, धने जिरे पूड आणि गरम मसाला)

शेंगदाण्याचा भरडलेला कूट(एकदम बारीक पेस्ट नको)

मीठ, साखर चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

हरभऱ्याचे दाणे एका पॅनमध्ये मध्यम आचेवर भाजून घेतले. त्यात थोडा जास्त वेळ गेलामाझ्या इंडक्शन स्टोव्हमुळे. सहसा १०-१५ मिनिट भाजावे. दाण्यांवर काळपट डाग दिसू लागतात. माझे फ्रोजन दाणे मुळातच काळे होते त्यामुळे ते अजून काळपट दिसू लागले. दोन्ही दाण्यांचे फोटो दिले आहेत खाली.

भाजलेले हरभरे थोडे थंड करून खलबत्त्यात ठेचून घ्यावेत. माझ्याकडे खलबत्ता वापरात नसल्याने मी मिक्सरमध्येच २-३ पल्समध्ये फिरवून बंद केले.

गसवर पॅनमध्ये तेल तापल्यावर जिरे, मोहरी हिंग घातले. त्यात लसूण खरपूस भाजून घ्यायचा.

मग कांदा परतून तो भाजल्यावर त्यात हळद, धनेजिरे पूड, तिखट किंवा कांदा-लसूण मसाला घालायचा.

तिखट परतल्यावर लगेच त्यात भरडलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा. आमच्याकडे कूट जरा सढळ हातानेच पडतो.

कूट परतताना तो जळू नये याची काळजी घ्यावी.

त्यात ४ काप पाणी घालून उकळावे. पाणी उकळत असतानाच त्यात मीठ साखर घालून हलवावे.

भाजीतले पाणी उकळले की शेवटी भरडलेले हरभऱ्याचे दाणे घालावे.

भाजी झाकण बंद करून थोडा वेळ आणि पाणी जास्त झाले असल्यास उघडून शिजू द्यावी.

मी भाकरी, पीठ-कूट घातलेली मेथीची भाजी आणि भाकरी केली होती. एकदम मस्त झाली. Happy तुम्हीही करून बघा. क्रमवार फोटो काढले आहेत. तशी भाजी बनवायला सोपी तरीही चवीष्ट आहे.

IMG_0095(1).JPGIMG_0094(1).JPG

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

दाणे हिरवे असल्यावर शिवाय आधी भाजून घेतल्याने भाजी लवकर शिजते. फोडणी ते भाजी साधारण २०-२५ मिनिटात होते.
भाजीत थोडे पाणी राहू द्यावे, एकदम पातळही नको. रसरशीत भाजी चांगली लागते.
थोडे तेल जास्त असेल तर अजून छान कट येतो. पण तो नसला तरी चवीत फरक पडत नाही.

विद्या भुतकर.

माहितीचा स्रोत: 
मेरी मां :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतेय. जेव्हा कधी पुण्याला हरभर्‍याच्या सीझनमधे जाणं होईल तेव्हा करून बघेन Happy
आम्ही ओल्या हरभर्‍याला सोलाणे म्हणतो.

छान रेसीपी मी ही माहेरी खाल्ली आहे. आव्डते. आता करीन एकदा. सोलाणे ताज्या नव्या तांदळाच्या गरम गरम भातात घालून दही घालून त्याचा नैवेद्य दाखवतात एक नव्याची पुनव असते तेव्हा. तो ही एकदा करून बघ. मस्त चव.

छान आहे कृती.
हे पाकिटातले खरेच ओले सोलाणे असतात कि भिजवलेले कडधान्य असते. ( मी टीनमधल्या तुरीच्या बाबतीत असा फसलोय, म्हणून विचारतोय. )

सर्वांचे आभार. Happy दिनेश, मला तरी ते ओले दाणे वाटले. थोडे कडक होते पण कडधान्य वाटले नाही. चव चांगली होती. अर्थात ताज्या दाण्यांची सर त्याला येणार नाही.

हे काय.. खास विद्या इश्टाईल ची प्रस्तावना वगैरे कै नै?? चुकल्या चुकल्या सार्खं वाटलं ना.. Happy पण रेस्पी आणी फोटू झक्कास ..
मलाही त्या हरबर्‍यांबद्द्ल शंका आली.. ओले असतील तर नशीबच.. पण भिजवून घेतले तरी छान लागेल असं वाटतंय

झंपी, बरोबर मीही ते केले.
वर्षू सध्या टेन्शन चालु आहे कॉन्ट्रॅक्ट संपलय. पुन्हा नवीन नोकरी शोधाशोध चालूय त्यामुळे डोकं जागेवर नाहिये. Happy But thanks for noticing. Happy

Hang in there Vidya. It will all work out nicely for you. Sending Big hug Nd strength .