कथुकल्या [नवीन उपक्रम]

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 3 April, 2017 - 14:07

प्रतिभेचा महानायक श्री विनायकाला त्रिवार वंदन करून नवीन उपक्रमाला सुरुवात करत आहे.

कथा म्हटलं की दोन प्रकार आपल्यासमोर येतात – लघुकथा आणि दीर्घकथा. साधारणतः हजार शब्दांच्या वरील कथेला लघुकथा असं म्हटलं जातं. त्यापेक्षा छोट्या कथा आजकाल अधूनमधून लिहल्या जाऊ लागल्या आहेत. ह्या कथा पटकन वाचून होतात, लिहायला कठीण असतात आणि वाचकांना विचार करायला भाग पाडतात.

हजार शब्दांच्या आतील कथांचं नामकरण मी खालीलप्रकारे केलं आहे -

i) अर्ध्या शब्दापासून ते पन्नास शब्दांपर्यंतच्या कथांना सूक्ष्मकथा म्हणायचं.

ii) ५० ते ५०० शब्दांच्या कथांना कथुकल्या म्हणायचं (यात शतशब्दकथापण आल्या)

iii) ५०० ते १००० शब्दांच्या कथांना कथिका म्हणायचं

अर्थात वाचक शब्द बघून कथा वाचत नाहीत तर कथानक बघून वाचतात आणि शब्दसंख्येच्या चौकटीत फारसं न अडकायला नको. पण कथेच्या आकाराचा अंदाज येण्यासाठी हे नामकरण.

आता उपक्रमाबद्दल सांगतो :

i) इथून पुढे मी कथुकल्या नावाची मालिका चालवणार आहे. याअंतर्गत दर शनिवारी दोन किंवा तीन कथुकल्या प्रकाशित केल्या जातील.

ii) त्यात कमीत कमी एक शतशब्दकथा असेल

iii) जवळपास सगळे कथाप्रकार हाताळण्याचा प्रयत्न केला जाईल ( सामाजिक, विज्ञानरंजन, भयगूढ, अद्भुतिका, विनोदी, रहस्य, अनुवादित, सत्यकथा, ग्रामीण इत्यादी)

अर्थात तुमचा प्रतिसाद आणि शुभेच्छा माझ्यासाठी टॉनिक आहे. सो गेट सेट गो…

--------------------------------------------------

१. ती रात्र (शशक)

तो म्हातारा अन म्हातारी आपल्या नातवाला घेऊन लगबगीने चालले होते. पाऊस धो धो कोसळत होता. मिट्ट काळोखाला चिरत विजा कडाडत होत्या, सोसाट्याच्या वाऱ्याने तांडव मांडलं होतं. पण ते थांबू शकत नव्हते, ठिकाणावर लवकरात लवकर पोहोचणं भाग होतं. हाडं जुनी असली तरी होती मजबूत. अंधार चिरत झपझप चालले होते दोघंही, आपल्याच तंद्रीत.
थोड्यावेळाने म्हातारीने मागे वळून पाहिलं… पण नातू कुठंही नव्हता. दोघं हवालदिल झाले, चारीदिशांना जंगजंग पछाडलं, समोरच्या वाड्यात जाऊन विचारपूस केली. पण काहीच फायदा झाला नाही.

अवसान गळालेला म्हातारा मटकन चिखलात बसला, म्हातारीचा हंबरडा विजांनी केव्हाच गिळून टाकला.

अन त्याचवेळी वाड्यावरच्या दगडी वाघाने आपल्या पंजांनी हळूच तोंडाला लागलेलं रक्त पुसलं.

-------------------------------------------------

२. संघर्ष

तो सैतानी आवाज पुन्हा सुरू झाला, कानांच्या भुयारातून शिरून त्याने अंतर्मनावर आघात करायला सुरुवात केली. आधीचा अनुभव असला तरी प्रत्येकवेळी अनपेक्षित वाटणारा हा हमला. माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशीने जबरदस्त विरोध केला, संकटाला भीक घालू नकोस असं ओरडून सांगितलं. मला लढायचं होतं, नेहमीसारखं जिंकायचं होतं. मी मनाचा निश्चय केला अन पोटावर घासत पुढे सरकू लागलो. शरीराच्या हालचाली वेगाने होणं शक्यच नव्हतं. हातापायांमधलं त्राण हरवलं होतं पण इच्छाशक्ती प्रबळ होती. हळूहळू रांगत क्षणाक्षणाला कणाकणाने पुढे सरकत होतो मी. अजून थोडं अंतर अन या यातनेपासून कायमची सुटका. मी लटपटणाऱ्या हातांवर जोर देऊन स्वतःला कसंबसं वर उचललं… अगदी काही इंच. अखेर महत्प्रयासाने डोळे किलकिले करून पाहिलं अन एक हात शक्य तेवढा लांबवून त्याच्या मस्तकावर जोSरात चापट मारली. आवाज क्षणात बंद झाला.

अन मी पुन्हा झोपी गेलो.

-----------------------------------------------
----------------------------------------------
चित्र: जालावरून साभार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

1 आवडली. 2 तर फारच आवडली. काही लहान मुलं ढुंगण वर करुन झोपतात ते फारच मजेशीर दिसतं :-D.

छान उपक्रम आहे. शुभेच्छा!

सामाजिक, भयगूढ, विनोदी, विज्ञानरंजन, अद्भुतिका, विचित्रकथा, रहस्य,अनुवादित इत्यादी >> याखेरीज यंगअडल्ट, न्वार, धडाडीच्या नायिका (चांगल्या, वाईट) हे प्रकारदेखील येऊद्या. मआंजावरचं लेखन पाहुन 'माझी पापडलोणची करणारी आजीपणजीचुलतसासूमावशी' याच्याबाहेर स्त्रियांबद्दल काही फारसे लिखाण होत नाही असे वाटू लागले आहे :->

धन्यवाद.. माबो आणि मिपा दोन्हीवर एकाचवेळी रिलीज करत आहे. हेतू हाच की जास्तीत जास्त वाचकांना आनंद मिळावा Happy

आवडल्या Happy

कथुकल्या :- लहान बाळागत क्युट वाटतंय ऐकायला तर कथिका:- जेष्ठ प्रौढ असल्यासारखं...

१) कृपया सध्या फक्त "गुलमोहर - कथा/कादंबरी" ग्रूप मधेच नवीन धागा काढावा. इतर ग्रूपमधे नको.
२) प्रत्येक कथुकली साठी वेगळा धागा असू दे. म्हणजे एका कथुकली साठी असलेले सगळे प्रतिसाद एकत्र राहतील आणि भविष्यात हलवणे सोपे राहील.
३) या उपक्रमाला इतरांकडून प्रतिसाद मिळाला तर त्यासाठी स्वतंत्र ग्रूप सुरु करता येईल.

सही आहेत दोन्ही कथा..
दर आठवड्याला अश्या दोन तीन कथा लिहिणार.. भारी आहात.. वाचायला उत्सुक Happy

हो