मुहूर्तांचे प्रस्थ

Submitted by कुमार१ on 19 March, 2017 - 21:15

सुमारे १५ वर्षांपूर्वीची घटना. भारताचे राष्ट्रपती म्हणून श्री. अब्दुल कलाम यांची निवड झाली होती. भारतीयांच्या दृष्टीने ही आनंदाची व अभिमानाची गोष्ट होती. कलाम यांनी ते पदग्रहण करताना एक अतिशय चांगला पायंडा पाडला तो म्हणजे, आपल्या पदाची कारकीर्द सुरू करण्यासाठी ते मुहूर्त बघण्याच्या अजिबात फंदात पडले नाहीत. त्यांना नेमणूकीचे पत्र मिळाल्यानंतरचा पहिला शासकीय कामाचा दिवस हाच त्यांच्या दृष्टीने ‘मुहूर्त’ होता. त्या प्रसंगी त्यांनी हा मुद्दा स्पष्ट करताना पुढील उद्गार काढले होते, ‘’पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी मारायला जो कालखंड लागतो, त्याला एक वर्ष म्हणतात आणि त्या वर्षाचे ३६५ दिवस हे सर्व समान हिस्से असतात. त्यामुळे कोणताच दिवस हा शुभ किंवा अशुभ नसतो.’’
त्यांचे हे उद्गार खरे तर आपल्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे होते. परंतु, आपल्यातील बहुसंख्य लोकांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असणार यात शंका नाही. मला स्वतःला तर ते उद्गार वाचून खूप समाधान वाटले होते. एखाद्या रूढ समजुतीला ‘थोतांड’ म्हणून फटकारण्याऐवजी ती कशी अनावश्यक आहे याचे त्यांनी वैज्ञानिक स्पष्टीकरण किती छान केले होते.

माणूस हा मुलुखाचा आळशी असतो. कुठलेही नवे काम सुरू करण्याबाबत त्याची चालढकल करण्याची प्रवृत्ती असते. बरीच कामे ही ‘उद्या बघू’ म्हणून कायम ‘उद्यावरच’ ढकलली जात असतात आणि तो ‘उद्या’ कधी उगवतच नाही ! म्हणून, कुठल्याही कामास सुरवात कधी करावी या प्रश्नाचे साधे सरळ उत्तर असे असते की, ‘उद्याचे काम आज व आजचे काम आता लगेच’. एवढे साधे तत्व जरी आपण आचरणात आणले तरी असंख्य महत्वाची कामे ही वेळच्यावेळी होत राहतील. पण, वास्तव मात्र तसे नाही.

कुठलेही नवे काम करायचे म्हटले की बहुसंख्य लोक हे ज्योतीषावर आधारित मुहूर्त बघतात. मग त्यातूनच शुभ व अशुभ दिवस या खुळचट कल्पनेला जन्म दिला जातो. काम सुरू करण्यासाठी जर ‘मुहूर्त’ उपलब्ध नसेल तर ते कितीही पुढे ढकलायची आपली तयारी असते. नमुन्यादाखल काही कामांची उदाहरणे देतो. इमारतीच्या बांधकामाची सुरवात, प्रकल्पाचे उद्घाटन, मोठी खरेदी, कामाचा पदभार स्वीकारणे, नाटकाचा पहिला प्रयोग, चित्रपटाच्या चित्रीकरणाचा प्रारंभ वगैरे. अशा कितीतरी प्रसंगी मुहूर्त बघून नक्की काय साध्य होते? कोणत्याही कामाचे यशापयश हे त्याच्या दर्जावरच ठरणार असते हे सत्य आपण का नाकारतो? अमुक एका दिवशी कामास प्रारंभ केल्याने त्यात यश मिळेल ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. त्याऐवजी एखाद्या कामात स्वतःला झोकून देउन त्याचा दर्जा वाढवण्यासाठी कठोर मेहनत घेणे अधिक महत्वाचे नाही का?

आयुष्यातील वैयक्तिक व कौटुंबिक गोष्टी करण्यासाठी तर आपले मुहूर्ताविना पान हलत नाही. याबाबतीत विवाहाचे मुहूर्त हा तर एक कोड्यात टाकणारा विषय आहे.
आपल्या देशात संपूर्ण वर्षात एप्रिल व मे मध्ये लग्नाचे भरपूर मुहूर्त असतात. वास्तविक या काळात पाण्याचे दुर्भिक्ष असते. तसेच गंभीर संसर्गजन्य आजारांच्या साथी फैलावत असतात. लग्नाच्या मांडवातील मंडळीना भाजून काढण्याचे काम उष्णता चोखपणे बजावत असते. बाकी या वातावरणात वधूवर तर त्यांच्या भरजरी पोशाखात किती उबून निघत असतील याची कल्पनाच केलेली बरी. याच्या जोडीला अजून एक त्रास असतो तो परगावहून उन्हाचा त्रास सोसत येणाऱ्या पाहुण्यांना. अशा बेसुमार वाढलेल्या प्रवाशांमुळे वाहतूक यंत्रणांवरील ताणही वाढतो, हा अजून एक मुद्दा.
तरीसुद्धा याच काळात हौसेने विवाह करण्याचा सामाजिक अट्टहास का असतो हा प्रश्न मला नेहेमी पडतो. आपण ‘मुहूर्त’ याचा अर्थ ‘सर्वाना सुखकारक वेळ’ असा का नाही घेत? बऱ्याचदा वर्षातील इतर काही महिने ‘मुहूर्त नाहीत’ या कारणांसाठी भाकड जात असतात. त्याऐवजी जर आपण एप्रिल-मे यांना ‘मुहूर्तबाद’ करून टाकले व इतर सर्व महिन्यांमध्ये समारंभ ठेवले तर ते योग्य आणि सर्वाना सुखकारक ठरेल.

माझ्या काही मित्रांनी त्यांची लग्ने ही ठरवून १५ ऑगस्ट वा २६ जानेवारीला केली आहेत. मला त्यांचा याबद्दल अभिमान वाटतो.
विवाह-मुहूर्ता बाबत अजून एक मुद्दा. पारंपारिक मुहूर्तावर केलेली सगळेच लग्ने पुढे यशस्वी होतात का? नीट विचार करून बघा, याचे उत्तर काहीसे नकारार्थी आहे. म्हणजेच, वैवाहिक जीवनाचे यशापयश हे त्या दोन व्यक्तींच्या सामंजस्यावर अवलंबून असते, लग्नमुहूर्तावर नक्कीच नाही !

समाजव्यवहारातील इतर अनेक प्रसंगीही मुहूर्तांचे प्रस्थ जाणवते. विज्ञान शाखेतील अभ्यासक्रमासाठी ‘शुभ दिवशी’ प्रवेश अर्ज भरणारा विद्यार्थी किंवा निवडणुकीसाठी अर्ज भरणारा उमेदवार, निरनिराळे करारनामे करणारे नागरिक, एखाद्या संस्थेची स्थापना, अंतराळात यान पाठवण्यासाठी मुहूर्त बघणारे शास्त्रज्ञ अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. आपण कुठलेही कार्य हाती घेताना आपला स्वतःच्या क्षमतेपेक्षा दैवावर अधिक विश्वास असतो हेच यांतून ध्वनित होते. खुद्द आपल्या देशाचा स्वातन्त्र्यदिन हा मध्यरात्री का जाहीर करण्यात आला? तर म्हणे की १५ ऑगस्ट १९४७ ची सकाळ ही ‘शुभ’ नव्हती ! ( हे विधान वृत्तपत्रातील माहितीवर आधारित).

अनेक सार्वजनिक लोकहिताची कामे व योजना मुहूर्तावर सुरू होतात. त्यांच्या उद्घाटनाचा झगमगाट जरा जास्तच असतो. नंतर मात्र त्यांचे काम अतिशय संथ गतीने होते. ठरलेल्या कालावधीत त्या पूर्ण कराव्यात याबाबत आपण बिलकूल आग्रही नसतो. अखेर कसेबसे ते काम पूर्ण केले जाते आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना मिळण्यासाठी पुन्हा एकदा मुहूर्ताची प्रतिक्षा करावी लागते !

एकंदरीत पाहता समाजमनावरील पारंपरिक ज्योतिषवादी भूमिकेचा पगडा अद्यापही जबरदस्त असल्याचे जाणवते. त्यामुळेच मुहूर्तांचे प्रस्थ आजही कायम आहे. जगभरातील काही मोजक्या विचारवंतांनी अशा रूढींना नाकारून आपापली कारकीर्द यशस्वी करून दाखवली आहे.त्यांच्यापैकी काहींनी तर दैदिप्यमान यश मिळवून दाखवले आहे. परंतु, त्यांच्या पाउलवाटेने जाण्यास समाज अजूनही कचरतो. लोकांच्या मनातील कुठली तरी अनामिक भीती त्यांना अंधश्रद्धांमध्ये जखडून ठेवते हेच खरे. त्यातील फोलपणा समजून घेऊन कालानुरूप वास्तववादी भूमिका घेण्याची आज नितांत गरज आहे. असे जेव्हा केव्हा घडेल तो सुदिन.
***************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> गणेश चतुर्थी ते गणेश चतुर्दशी या काळात जर कालनिर्णय ने एखादा दिवस शुभ असे लिहीले असेल तर त्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केली तर चालते का?<<
बिन्धास करा. पण सत्यनारायण हा वसा आहे. एकदा सत्यनारायण घातला कि आयुष्यभर खरे बोलावे लागेल. तयारी असेल तर जरुरु घाला. पण घेतला वसा टाकुन दिला तर चित्रगुप्ताला हिशोब द्यावा लागेल Biggrin

बर,
सर्वांना हिंदूनववर्षदिनाच्या शुभेच्छा
साडेतिन मुहुर्तांमधिल आजचा एक मुहुर्त, सर्व चांगल्या/रास्त कामांसाठी आजचा दिवस शुभ मानला जातो. Happy

>>>> एक बेसिक शंका - लहानपणापसून डोक्यात आहे - माझ्या लग्नाच्या आधी सुटणे गरजेचे आहे.
लग्नाचा मुहुर्त म्हणजे वेळ नक्की कश्याची असते? हार एकमेकांच्या गळ्यात घालायची, मंगळसूत्र घालायची, सात फेर्‍यांची, मंगलाष्टके सुरू करायची वा संपवायची, की आणखी काही? <<<<<
"धार्मिक्/पौराणिक" पद्धतीने लग्न करताना, वधुवर एकमेकांस माळा घालतात, ती वेळ मुहुर्ताची वेळ असते,
तर "वैदिक" पद्धतीमध्ये "पाणिग्रहण" म्हणजे वराने वधुचा हात हातात घेणे/स्विकारणे ही वेळ मुहुर्ताची असते.
मात्र लग्न जरी वैदिक पद्धतीने होत असले, तरीही आमंत्रितांच्या सोईकरता, व चालू जनरितीप्रमाणे आमंत्रितांसमोर "हार घालण्याची" वेळ मुहुर्ताची मानुन , तशी ती आमंत्रणपत्रिकेत लिहुन, पण प्रत्यक्षात गुरुजी, पाणिग्रहणाकरता आधीची स्वतंत्र वेळ/मुहुर्त काढुन घेतात व तो पाळतात. Happy

>>>> गणेश चतुर्थी ते गणेश चतुर्दशी या काळात जर कालनिर्णय ने एखादा दिवस शुभ असे लिहीले असेल तर त्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केली तर चालते का?<< <<< हो.
पण सत्यनारायणाच्या पूजेबाबत मुहुर्त वा शुभाशुभत्व बघण्याची गरज नसते. तेव्हा सोयीची वेळ व दिवस बघुन करण्यास हरकत नाही.

आज गुढी सकाळी ८.२७ नंतर उभारावी असे कालनिर्णयमध्ये सांगितलेले असल्याने, (८.२७ पर्यंत अमावास्या असल्याने) आज गुढी सकाळीच साडेसातला उभारली पण पूजा ८.२७ नंतर केली. साडेआठचे पंचिंग टायमिंग असल्याने ऑफिसला जायला उशिर झाला. ते असो. पण एरवी ऑफिसला जाण्यास निघायचा कायमचा मुहुर्त ८.१० असा आहे. तो पाळला जातो.
ऑफिसमधे इनपंच ८.३० चे आत होणे आवश्यक असते, ती मुहुर्ताची वेळही रोजच्या रोज पाळतो.
तसेच ऑफिसमधुन निघण्याची मुहुर्ताची वेळ ६.४५ आहे, ती बरोब्बर पाळतो. Wink

चिंतोपंत, इथे इतका गंभिर महत्वाचा विषय असताना तुम्ही हसताय कशाबद्दल?

अमावस्या हा देखील शुभ मुहुर्त आहे. लक्ष्मीपुजन हे अश्विन अमावस्येलाच होते. दक्षिणेत काही ठिकाणी अमावस्या शुभ मानतात. अमावस्येला रविचंद्र युति असते. त्यामुळे रवि व चंद्र यांचा एकत्रित परिणाम वृद्धींगत होतो.

अमावस्या हा देखील शुभ मुहुर्त आहे. लक्ष्मीपुजन हे अश्विन अमावस्येलाच होते. दक्षिणेत काही ठिकाणी अमावस्या शुभ मानतात. >>>> मला पुन्हा एकदा वरील लेखात दिलेले कलामांचे उद्गार अधोरेखित करावेसे वाटतात :

‘’पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी मारायला जो कालखंड लागतो, त्याला एक वर्ष म्हणतात आणि त्या वर्षाचे ३६५ दिवस हे सर्व समान हिस्से असतात. त्यामुळे कोणताच दिवस हा शुभ किंवा अशुभ नसतो.’’

सध्या जी पिढी १५- ते २५ वयोगटात आहे तिने तरी हा विचार आचरणात आणावा एवढेच मनोमन वाटते. (किंबहुना त्यासाठीच असे लेखन आपण करतो).
विचार घट्ट झालेल्या पिढीमध्ये ही चर्चा कितीही काळ केली तरी ती वांझ असते, याची कल्पना आहे.

बरं

लग्नाच्या बाबतीत बोलायचे तर किती लग्न अशी मुहूर्तावर लागतात . चिक्कार वेळ ते मंगलाष्टकं म्हणण्यात जातो. आधी भटजींनी म्हणायची मग घरातल्या इतर बाया-मुलींनी आपापले गळे साफ करायचे शेवटी परत भटजींना चान्स आणि मग माळ घालायच्या वेळेत वधूवरांना उचलाउचलित इतका वेळ जातो कि प्रयत्यक्षात माळ गळ्यात पडते ती मुहूर्त टळल्यावरच . पत्रिकेत लिहिलेल्या अचूक मुहूर्तावर अशी कितीशी लग्न लागतात ? Happy

"पत्रिकेत लिहिलेल्या अचूक मुहूर्तावर अशी कितीशी लग्न लागतात ? Happy"
पत्रिकेतिल मुहुर्त हे रेल्वे टाईम टेबल्/टाईम ईन्डिकेटर सारखे असतात जसे कि गाडि किती उशिराने धावत आहे? (इथे भोजनाची वेळ काय आहे? . . .)

मग माळ घालायच्या वेळेत वधूवरांना उचलाउचलित इतका वेळ जातो कि
>>>>

मी काही लग्नात हा प्रकार पाहिला आहे.
काही लग्नात नाही.
हि एखादी जुते दे दो पैसे ले लो सारखी जुनी प्रथा आहे की नवीन फ्याड?

>>> हि एखादी जुते दे दो पैसे ले लो सारखी जुनी प्रथा आहे की नवीन फ्याड? <<< Lol
जुते ले लो, पैसे दे दो.... असे आहे ते.....
अन मग नंतर जुते दे दो, पैसे ले लो..... Lol
हे अन वधुवरांना उचलणे....
दोन्हीही आचरट मूर्खपणाची फ्याडच आहेत.....

नुकताच नरेंद्र दाभोळकरांचा ४ था स्मृतीदिन झाला. त्यानिमित्तने या विषयाची पुन्हा आठवण झाली.
आधीच वैचारिक प्रबोधन करणार्‍यांचे प्रमाण समाजात अत्यल्प असते. त्यांच्यातील एक कमी होण्याने समाजाचे नुकसान होते.

मुहूर्त म्हणजे चांगली वेळ ही कल्पना मेल्यावरही पाठ सोडत नाही. माणूस मेल्यावर त्याच्या मृत्यूची वेळ पाहून, ज्योतिषाला दाखवून ती अशुभ असेल तर काही विधी करावे लागतात.

मला वाटतं, माधुरी दीक्षित निर्मित पंचक मराठी चित्रपटही याच कल्पनेवर आधारित आहे.

एवढे मुहुर्त काढून लग्न करण्याचे ठरवतात. पण हल्ली लग्नात पाश्चात्य संस्कृती, सिनेमातील सोहळे इतके करतात, वऱ्हाडी नाचत नाचत येतात आणि मुहुर्ताची वेळ टळून जाते. मग फायदा काय त्या मुहुर्ताचा.
तुम्ही म्हणता तसे आपण ‘मुहूर्त’ याचा अर्थ “सर्वाना सुखकारक वेळ” असाच घ्यायला हवा

वऱ्हाडी नाचत नाचत येतात>> हल्लीचे कुठे, हे मी लहानपणापासून पाहत आलेलो आहे. वर काही ठिकाणी स्टेज वर मान्यवर येऊन आशीर्वाद देण्याची पद्धत आहे. त्यात तर किती वेळ वाट पहावी लागते. मग लग्न लागते. मुहूर्तावर लग्न ही अगदी २०% वगैरे लागलेली असतील. बाकी खरा मुहूर्त म्हणजे पंगती कधी बसतात तोच Lol

पण हल्ली लग्नात पाश्चात्य संस्कृती, सिनेमातील सोहळे इतके करतात>>>>पाश्चात्य सस्न्कुती म्हणजे काय?पन्जाबी म्हणायचय काय??? पाश्चात्यामधे लग्नात मुहुर्त, सोहळे, मेह्नदी,सन्गित काय काय नसतय...आपल्या कडची बघुन तेही अनुकरण करायला लागली असतील तर माहिती नाही...मी तरी बघितल नाही.

Pages