मुहूर्तांचे प्रस्थ

Submitted by कुमार१ on 19 March, 2017 - 21:15

सुमारे १५ वर्षांपूर्वीची घटना. भारताचे राष्ट्रपती म्हणून श्री. अब्दुल कलाम यांची निवड झाली होती. भारतीयांच्या दृष्टीने ही आनंदाची व अभिमानाची गोष्ट होती. कलाम यांनी ते पदग्रहण करताना एक अतिशय चांगला पायंडा पाडला तो म्हणजे, आपल्या पदाची कारकीर्द सुरू करण्यासाठी ते मुहूर्त बघण्याच्या अजिबात फंदात पडले नाहीत. त्यांना नेमणूकीचे पत्र मिळाल्यानंतरचा पहिला शासकीय कामाचा दिवस हाच त्यांच्या दृष्टीने ‘मुहूर्त’ होता. त्या प्रसंगी त्यांनी हा मुद्दा स्पष्ट करताना पुढील उद्गार काढले होते, ‘’पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी मारायला जो कालखंड लागतो, त्याला एक वर्ष म्हणतात आणि त्या वर्षाचे ३६५ दिवस हे सर्व समान हिस्से असतात. त्यामुळे कोणताच दिवस हा शुभ किंवा अशुभ नसतो.’’
त्यांचे हे उद्गार खरे तर आपल्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे होते. परंतु, आपल्यातील बहुसंख्य लोकांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असणार यात शंका नाही. मला स्वतःला तर ते उद्गार वाचून खूप समाधान वाटले होते. एखाद्या रूढ समजुतीला ‘थोतांड’ म्हणून फटकारण्याऐवजी ती कशी अनावश्यक आहे याचे त्यांनी वैज्ञानिक स्पष्टीकरण किती छान केले होते.

माणूस हा मुलुखाचा आळशी असतो. कुठलेही नवे काम सुरू करण्याबाबत त्याची चालढकल करण्याची प्रवृत्ती असते. बरीच कामे ही ‘उद्या बघू’ म्हणून कायम ‘उद्यावरच’ ढकलली जात असतात आणि तो ‘उद्या’ कधी उगवतच नाही ! म्हणून, कुठल्याही कामास सुरवात कधी करावी या प्रश्नाचे साधे सरळ उत्तर असे असते की, ‘उद्याचे काम आज व आजचे काम आता लगेच’. एवढे साधे तत्व जरी आपण आचरणात आणले तरी असंख्य महत्वाची कामे ही वेळच्यावेळी होत राहतील. पण, वास्तव मात्र तसे नाही.

कुठलेही नवे काम करायचे म्हटले की बहुसंख्य लोक हे ज्योतीषावर आधारित मुहूर्त बघतात. मग त्यातूनच शुभ व अशुभ दिवस या खुळचट कल्पनेला जन्म दिला जातो. काम सुरू करण्यासाठी जर ‘मुहूर्त’ उपलब्ध नसेल तर ते कितीही पुढे ढकलायची आपली तयारी असते. नमुन्यादाखल काही कामांची उदाहरणे देतो. इमारतीच्या बांधकामाची सुरवात, प्रकल्पाचे उद्घाटन, मोठी खरेदी, कामाचा पदभार स्वीकारणे, नाटकाचा पहिला प्रयोग, चित्रपटाच्या चित्रीकरणाचा प्रारंभ वगैरे. अशा कितीतरी प्रसंगी मुहूर्त बघून नक्की काय साध्य होते? कोणत्याही कामाचे यशापयश हे त्याच्या दर्जावरच ठरणार असते हे सत्य आपण का नाकारतो? अमुक एका दिवशी कामास प्रारंभ केल्याने त्यात यश मिळेल ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. त्याऐवजी एखाद्या कामात स्वतःला झोकून देउन त्याचा दर्जा वाढवण्यासाठी कठोर मेहनत घेणे अधिक महत्वाचे नाही का?

आयुष्यातील वैयक्तिक व कौटुंबिक गोष्टी करण्यासाठी तर आपले मुहूर्ताविना पान हलत नाही. याबाबतीत विवाहाचे मुहूर्त हा तर एक कोड्यात टाकणारा विषय आहे.
आपल्या देशात संपूर्ण वर्षात एप्रिल व मे मध्ये लग्नाचे भरपूर मुहूर्त असतात. वास्तविक या काळात पाण्याचे दुर्भिक्ष असते. तसेच गंभीर संसर्गजन्य आजारांच्या साथी फैलावत असतात. लग्नाच्या मांडवातील मंडळीना भाजून काढण्याचे काम उष्णता चोखपणे बजावत असते. बाकी या वातावरणात वधूवर तर त्यांच्या भरजरी पोशाखात किती उबून निघत असतील याची कल्पनाच केलेली बरी. याच्या जोडीला अजून एक त्रास असतो तो परगावहून उन्हाचा त्रास सोसत येणाऱ्या पाहुण्यांना. अशा बेसुमार वाढलेल्या प्रवाशांमुळे वाहतूक यंत्रणांवरील ताणही वाढतो, हा अजून एक मुद्दा.
तरीसुद्धा याच काळात हौसेने विवाह करण्याचा सामाजिक अट्टहास का असतो हा प्रश्न मला नेहेमी पडतो. आपण ‘मुहूर्त’ याचा अर्थ ‘सर्वाना सुखकारक वेळ’ असा का नाही घेत? बऱ्याचदा वर्षातील इतर काही महिने ‘मुहूर्त नाहीत’ या कारणांसाठी भाकड जात असतात. त्याऐवजी जर आपण एप्रिल-मे यांना ‘मुहूर्तबाद’ करून टाकले व इतर सर्व महिन्यांमध्ये समारंभ ठेवले तर ते योग्य आणि सर्वाना सुखकारक ठरेल.

माझ्या काही मित्रांनी त्यांची लग्ने ही ठरवून १५ ऑगस्ट वा २६ जानेवारीला केली आहेत. मला त्यांचा याबद्दल अभिमान वाटतो.
विवाह-मुहूर्ता बाबत अजून एक मुद्दा. पारंपारिक मुहूर्तावर केलेली सगळेच लग्ने पुढे यशस्वी होतात का? नीट विचार करून बघा, याचे उत्तर काहीसे नकारार्थी आहे. म्हणजेच, वैवाहिक जीवनाचे यशापयश हे त्या दोन व्यक्तींच्या सामंजस्यावर अवलंबून असते, लग्नमुहूर्तावर नक्कीच नाही !

समाजव्यवहारातील इतर अनेक प्रसंगीही मुहूर्तांचे प्रस्थ जाणवते. विज्ञान शाखेतील अभ्यासक्रमासाठी ‘शुभ दिवशी’ प्रवेश अर्ज भरणारा विद्यार्थी किंवा निवडणुकीसाठी अर्ज भरणारा उमेदवार, निरनिराळे करारनामे करणारे नागरिक, एखाद्या संस्थेची स्थापना, अंतराळात यान पाठवण्यासाठी मुहूर्त बघणारे शास्त्रज्ञ अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. आपण कुठलेही कार्य हाती घेताना आपला स्वतःच्या क्षमतेपेक्षा दैवावर अधिक विश्वास असतो हेच यांतून ध्वनित होते. खुद्द आपल्या देशाचा स्वातन्त्र्यदिन हा मध्यरात्री का जाहीर करण्यात आला? तर म्हणे की १५ ऑगस्ट १९४७ ची सकाळ ही ‘शुभ’ नव्हती ! ( हे विधान वृत्तपत्रातील माहितीवर आधारित).

अनेक सार्वजनिक लोकहिताची कामे व योजना मुहूर्तावर सुरू होतात. त्यांच्या उद्घाटनाचा झगमगाट जरा जास्तच असतो. नंतर मात्र त्यांचे काम अतिशय संथ गतीने होते. ठरलेल्या कालावधीत त्या पूर्ण कराव्यात याबाबत आपण बिलकूल आग्रही नसतो. अखेर कसेबसे ते काम पूर्ण केले जाते आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना मिळण्यासाठी पुन्हा एकदा मुहूर्ताची प्रतिक्षा करावी लागते !

एकंदरीत पाहता समाजमनावरील पारंपरिक ज्योतिषवादी भूमिकेचा पगडा अद्यापही जबरदस्त असल्याचे जाणवते. त्यामुळेच मुहूर्तांचे प्रस्थ आजही कायम आहे. जगभरातील काही मोजक्या विचारवंतांनी अशा रूढींना नाकारून आपापली कारकीर्द यशस्वी करून दाखवली आहे.त्यांच्यापैकी काहींनी तर दैदिप्यमान यश मिळवून दाखवले आहे. परंतु, त्यांच्या पाउलवाटेने जाण्यास समाज अजूनही कचरतो. लोकांच्या मनातील कुठली तरी अनामिक भीती त्यांना अंधश्रद्धांमध्ये जखडून ठेवते हेच खरे. त्यातील फोलपणा समजून घेऊन कालानुरूप वास्तववादी भूमिका घेण्याची आज नितांत गरज आहे. असे जेव्हा केव्हा घडेल तो सुदिन.
***************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परीक्षा म्हटली कि अगदी भल्याभल्यांची भंबेरी उडते आणि अनेकदा उत्तर माहीत असून, भरपूर अभ्यास केला असूनसुद्धा अपेक्षित मार्क मिळत नाहीत. म्हणजेच पेपर लिहिताना चित्त, बुद्धी स्थिर राखणे आवश्यक असते जे फक्त खंबीर मन साध्य करू शकते. ह्यावरून असे वाटते कि बहुदा "बेस्ट ऑफ लक" असे बोलण्यामागे समोरच्याचे मॉरल वाढवणे असा मानसशास्त्रीय उद्देश असू शकतो.

इन्ग्रजीमधे एक म्हण आहे
"You have to be in right place , at the right time"
कधी कधी एखादी गोश्ट करताना अकारण विघ्ने येत रहातात. कुठलीतरी वस्तू आणायला आपण निघतो तर गाडीच पन्क्चर होते / वाटेत पाकीटच मारले जाते / ती वस्तू नेमकी त्या वेळीच दुकानात सम्पलेली असते ..... अस काहितरी ; ज्याचे कुठलेच logical reasoning करता येत नाही. आणी ते काम करायला आपण निवडलेली वेळ अनपेक्शित कारणान्मुळे "wrong time" ठरते .
हे "The right Time" predict करण्याचा प्रयत्न मुहूर्त बघण्याच्या प्रक्रियेत आहे.

"बेस्ट ऑफ लक" असे बोलण्यामागे समोरच्याचे मॉरल वाढवणे असा मानसशास्त्रीय उद्देश असू शकतो. >>>
बरोबर. या वाक्यातील 'मानसशास्त्रीय' शब्द महत्वाचा.

आता इथून पुढच्या विद्यार्थी-पिढी वर आपण "बेस्ट ऑफ लक'' ऐवजी ' लढ बेटा' असे म्हणण्याचे संस्कार करू शकतो. त्यातून तरूण अधिक प्रयत्नवादी होतील.

बिग बँग कुठल्या मुहुर्तावर झाला म्हणे ? चांगल्या की वाईट? Uhoh
बिचार्‍या डायनोसोर्स ना मुहुर्त बघता आला असता तर Sad

३२) मुहूर्त पहाणे योग्य का अयोग्य?
मुहूर्त म्हटले की भास्कराचार्य-लीलावतीची गोष्ट हमखास सांगितली जाते. लीलावती ही भास्कराचार्यांची लाडकी लेक. तिच्या कुंडलीत वैधव्ययोग होता. पण भास्कराचार्यांनी असा विवाहाचा मुहूर्त शोधून काढला की तिचा वैधव्ययोग टळेल. पण विवाहाचे वेळी अक्षतेचा दाणा का मणी घटिकापात्रात पडलेने तो तळाशी जावून भोकात अडकला व मुहूर्त चुकला व शेवटी व्हायचे तेच झाले. या दंतकथेच्या छटा बदलतात पण आशय तोच. मुहुर्ताची महती. थोडा इकडेतिकडे झाला की काय उलथापालथ?
मे महिना म्हणजे सुट्टी,लग्नसराईचे दिवस. आता या काळात लग्नाचा मुहूर्त नाही म्हणजे गैरसोयच नाही का? कार्यालयाची उपलब्धता हा पण हल्ली एक महत्वाचा मुद्दा झाला आहे. मुहूर्त असलेल्या तारखांना कार्यालय मिळणे हे देखील भाग्यच मानायची वेळ आली आहे. पंचांगात रेडीमेड मुहूर्त दिलेले असतात. पण हे रेडिमेड मुहूर्त सुद्धा 'लाभतात` की नाही हे बघावे लागते. जसे रेडिमेड कपडे सर्वांनाच 'फिट` होतील असे नसतात कधी कधी ते 'अल्टर` करावे लागतात तसेच मुहूर्ताचे आहे. एखादी वेळ ही कुणासाठी आनंदाची असते तर कुणासाठी दु:खाची असते, कुणासाठी कसोटीची असते तर कुणासाठी निवांतपणाची असते, कुणासाठी जोडायची असते तर कुणासाठी तोडायची असते, कुणाची जन्माची असेल तर कुणाची मृत्यूची असेल. कुणाची कशीही असो ती ग्रहांच्या सोयीची असते म्हणून तिला मुहूर्त म्हणायचे. एकदा पेपरमध्ये बातमी आली होती की इ.स. २००० मे,जून मध्ये मुहूर्त नाहीत म्हणून. कारण त्या काळात गुरु,शुक्राचा अस्त होणार होता. विवाहासारख्या महत्वाच्या संस्काराचे वेळी गुरु शुक्रासारख्या शुभ ग्रहांची उपस्थिती नाही म्हणजे त्यांचे आशिर्वाद, नैतिक बळ नाही. मग मंगळ शनी सारख्या दुष्ट ग्रहांचे चांगलेच फावले की? कुणाला वैधव्य दे, कुणाचे सासू-सासरे मार, कुणाला अपघात कर, कुणाला सासुरवास कर असा धुडगूूस ते घालतील. मग काही नडलंय का मुहूर्त नसताना लग्न करायला ? मुहूर्त म्हणजे खरं तर कार्याच्या सोयीची पूर्वनियोजित वेळ. पण तिला शुभाशुभत्वाची कल्पना एवढी घट्ट चिकटली आहे की बोलता सोय नाही. पंचांगात दिलेले रेडिमेड मुहूर्त खरं तर अंदाजपंचे असतात. पण गुरुजींनी स्वत: काढून दिलेला मुहूर्त केवळ पंचांगात दिसत नाही म्हणून लग्नाची ठरलेली तारीख बदलण्याचा प्रसंग मी पाहिलेला आहे. तारीख ठरली, कार्यालय ठरलं, पण मुलाच्या ज्योतिष-शिक्षित भावजयीच्या लक्षात आलं की ठरवलेला मुहूर्त पंचांगात दिलेला नाही. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना हेही सांगितलं की गुरुजींनी वधूवरांच्या पत्रिका पाहून मुहूर्त काढलाय्. तो पंचांगात नसेना का? पण नाही. मग काय? तारीख बदला. आता आली का पंचाईत? दुसऱ्या तारखेला हॉल बुक करा. नशीबानं म्हणजे योगायोगानं ती तारीख त्याच हॉलसाठी उपलब्ध झाली म्हणून ठीक नाहीतर मुलीकडच्यांचे पैसे पाण्यात !
आता, पंचांगात लग्नाचे मुहूर्त नाहीत म्हणून लग्न व्हायची थोडीच रहाणार आहेत! ज्यांना कसंही करून लग्न करायचचं आहे ते कशाला कशाला मुहूर्तासाठी अडून बसतील ? ज्यांना मुहूर्त न पहाता लग्न केल्याची रुखरुख वाटणार असेल त्यांच्या सोयीसाठी कुठला तरी 'शास्त्राधार` देउन मुहूर्त दिले जातात. एखादे धर्म-संकट कोसळले की शास्त्राधार शोधले जातात व ते मिळतातही. या फलज्योतिषाचं अगदी कायद्यासारखं आहे. वाटा तेवढया पळवाटा. पण एवढा द्राविडी प्राणायम करीत बसण्यापेक्षा आपल्या सोयीची तारीख-वेळ घेतली तर काय वाईट?
समजा एवढं सगळं करून मुहूर्तावर लग्न केलं आणि संसार विसकटला तर मग ? त्यालाही उत्तर आहे. जर तुमच्या जन्मकुंडलीतच विवाहसौख्य नाही तर कितीही चांगला मुहूर्त पाहिला तरी काय उपयोग ? जे आडातच नाही ते पोहऱ्यात कुठून येणार? एका ज्योतिषाला एकदा मी विचारल, '' काहो, आता डॉक्टरी शास्त्रामुळे प्रसूतीची वेळ पुढे मागे करता येते. म्हणून चांगल्या मुहूर्तावर मूल जन्माला घालणे डॉक्टरांना सहज शक्य आहे. म्हणजे भविष्य ठरवणं त्यांच्या हातात आलं की नाही ? `` त्यावर त्यांनी शांतपणे सांगितलं की, '' अस जन्माला येणे हे निसर्गाला धरून नसल्यानं जन्मकुंडलीचे नियम तिथे लागू होत नाहीत.`` मुहूर्ताची महती काय सांगावी. निवडणुकीचे फॉर्म सुद्धा मुहूर्तावर भरणे जरूरीचे मानतात. उगाच पनौती नको. प्रचाराचा प्रारंभसुद्धा मुहूर्तावरच होतो. कुणीतरी एकच उमेदवार निवडून येणार हे सर्वांना जरी माहीत असले तरी आपण आपल्या बाजूने काळजी घ्यावी. त्यातूनही अपयश आलंच तर नशीब, प्राक्तन आहेच.
वरील विवेचनावरून आपल्या लक्षात आले असेल की मुहूर्ताना महत्व देणं - न देणं हे आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे.

( प्रकाश घाटपांडे लिखित (म्हणजे आम्ही स्वतःच) ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद पुस्तकातून साभार)

मुहूर्त पाहून काम केल्याने काय नुकसान होते? ज्यांना पाहायचाय त्यांना पाहू द्या कि. बाकि सरकारी कामे तशीही रेंगाळतात, पूर्ण झालेली कामे फित कापायला मंत्र्याला वेळ नाही म्हणूनही रेंगाळतात.

प्रत्येक गोष्टीत मतभिन्नता असतेच, जे आपल्याला पटते तेच बरोबर हा आग्रह का? तुमच्या आयुष्यात तुम्हाला जसे हवे तसे करायचे स्वातंत्र्य आहे की, हेच स्वातंत्र्य इतरांनाही आहे हे मान्य करण्यात काय अडचण आहे. मुहूर्त काढून कामे करणारे लोक ती कामे दैवावर सोडून देत नाहीत, मुहूर्त न काढणार्याइतकीच मेहनत तेही घेतात, मग केवळ काम सुरु करण्यासाठी त्यांनी योग्य मुहूर्त पहिला तर ते मूर्ख कसे?

मुहूर्त काढणे हा इथल्या संस्कृतीचा भाग आहे. ही संस्कृती नाकारण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण ज्यांना ती नाकारायची नाहीय त्यांचा उपमर्द इतरांनी का करावा?

{{{ खुद्द आपल्या देशाचा स्वातन्त्र्यदिन हा मध्यरात्री का जाहीर करण्यात आला? तर म्हणे की १५ ऑगस्ट १९४७ ची सकाळ ही ‘शुभ’ नव्हती ! ( हे विधान वृत्तपत्रातील माहितीवर आधारित). }}}

माझ्या माहितीनुसार असे घडलेले नाही. मी जे वाचले / ऐकले त्यानुसार दोन्ही देशांना १४ ऑगस्टचे कार्यालयीन कामकाज संपण्याच्या सुमारास स्वातंत्र्य मिळाले होते. जन्मापासूनच हट्टी बाळ असलेल्या 'धाकट्या'ला कागदोपत्री मोठा व्हायचे होते म्हणून त्याने आपला जन्मदिवस १४ ऑगस्ट ठरवून घेतला. त्याचप्रमाणे हा दिवस 'थोरल्या'ला मिळू नये असा आग्रह धरला. समजुतदारपणाचा अर्क असलेल्या थोरल्याने रात्र होईपर्यंत कळ काढली आणि रात्री १२ वाजता तारीख बदलली असता एका दिवसाने लहान होत १५ ऑगस्ट हा वाढदिवस स्वीकारला. भाषण करताना मोठ्या उत्साहात गुलबचाचांनी "मध्यरात्री सारे जग झोपले असतना भारत जागा होत आहे" असे महान ऐतिहासिक उद्गार काढले. खरे तर भारतात मध्यरात्र असताना अमेरिकादी देशांत दिवस असतो हे सामान्यज्ञान या असामान्य महोदयांना नसल्याने अनवधानाने ही गफलत झाली असावी. मात्र "१५ ऑगस्ट १९४७ ची सकाळ ही ‘शुभ’ नव्हती" असे मानत त्यानुसार स्वातंत्र्याची वेळ ठरविण्याचा आरोप एखाद्या निधर्मी, पुरोगामी आणि उदारमतवादी पक्षाच्या नेत्यांवर केला जाऊ शकत नाही.

मुहुर्तावर प्रतिसाद देतानाही गुलाबचाचाना हाणायचे सोडले नाही, हे संघी संस्कार पाहून डोळे पाणावले.. दिवस रात्र हे आपल्या आपल्या संदर्भानुसार वापरायचे असतात .... एखाद्याची बायको ही दुसर्‍या कुणाची तरी बहीण असू शकते. पण म्हणून ती त्याची कोण ? याचे उत्तर बायको असेच द्यावे लागते.

मुहूर्त म्हणजे खरं तर कार्याच्या सोयीची पूर्वनियोजित वेळ. पण तिला शुभाशुभत्वाची कल्पना एवढी घट्ट चिकटली आहे की बोलता सोय नाही.
पण एवढा द्राविडी प्राणायम करीत बसण्यापेक्षा आपल्या सोयीची तारीख-वेळ घेतली तर काय वाईट? >>>

अगदी बरोबर. म्हणूनच असे वाटते की जेव्हा हवामान भयानक गैरसोयीचे असते ( ४५ अंश सेल्सिअस किंवा त्याही वर) तेव्हा हट्टाने समारंभ करण्यात काय हशील? यजमान व निमंत्रित अशा सर्वांनाच सुखकारक मोसम केव्हाही चांगला.
एकदा एका हवामान - शास्त्रज्ञांशी याबाबत चर्चा केली होती. त्यांच्यामते दर १५०- २ ०० वर्शांनी ऋतुचक्र बदलत असते. तेव्हा असे असू शकते की काही हजार वर्शांपूर्वी एप्रिल-मे मध्ये एवढे उच्च तापमान नसू शकेल व म्हणून तेव्हा मुहूर्त ठेवले असतील.
आता कालानुरूप बदलायला हरकत नसावी.

{{ खुद्द आपल्या देशाचा स्वातन्त्र्यदिन हा मध्यरात्री का जाहीर करण्यात आला? तर म्हणे की १५ ऑगस्ट १९४७ ची सकाळ ही ‘शुभ’ नव्हती ! ( हे विधान वृत्तपत्रातील माहितीवर आधारित). }}}
माझ्या माहितीनुसार असे घडलेले नाही. >>>

जर कोणी १५/८/१९४७ चा दिवस प्रत्यक्ष पाहिलेली व्यक्ती आज हयात असेल व माबोवर असेल तर तिच्याकडून त्यातले सत्य वा त्या मजकूरातील तथ्य जाणून घ्यायला मला आवडेल. Bw
साधारण भारतीय संस्कृतीनुसार आपण सूर्योदय ही दिवसाची सुरवात मानतो. मध्यरात्री १२ ही कल्पना मुख्यत। वाहतूक वेळापत्रकासाठी स्वीकारण्यात आली असावी (चूभूदेघे)

{{{मुहुर्तावर प्रतिसाद देतानाही गुलाबचाचाना हाणायचे सोडले नाही, हे संघी संस्कार पाहून डोळे पाणावले }}}

अच्छा, मग "मध्यरात्री सारे जग झोपले असतना भारत जागा होत आहे" या विधानातून आपला विकास होतोय हे सांगताना इतर लोक झोपलेले आहेत म्हणजे त्यांचा विकास थांबलाय असे म्हणणे हे कुठले संस्कार? ब्रिटीश का?

आणि {{{ तुमची बायको ही कुणाची तरी बहीण असू शकते. }}} अशा प्रकारे माझ्या बायकोचा इथे प्रतिसादात उल्लेख करायचा हे कुठले संस्कार? मुघल का? इथे माझ्या बायकोविषयी तुम्ही काही लिहिण्याचे कारण आहे काय? उलट तुमच्या अनेक जुन्या आयडींपैकी काहींचा वापर करुन तुम्ही इथे मायबोलीवर तुमच्या बायको आणि सासूरवाडीच्या लोकांविषयी काही नकारात्मक मजकूर लिहिला आहे त्याचीच चर्चा केली तर कसे वाटेल?

झोपलेले आहेत म्हणजे विकास थांबला असा अर्थ का ? वा वा ! धन्य झालो .... रात्र दिवस हे प्रतिकात्मक शब्द आहेत... रात्री बारा वाजता इतर लोक झोपले आहेत .. पण भारतासाठी हा नवा दिवस असल्याने भारतीय त्या वेळी जागे राहुन जल्लोष करत आहेत असा अर्थ आहे.

तुमच्या हिंदू गीतेतही आहे ... यस्यां जागर्ति संयमि की काहीतरी बघा बरं वाचून .... इतर लोक झोपलेले असतात तेंव्हा स्थितप्रज्ञ जागे असतात !!! म्हणजे तुमच्या थेअरीनुसार दिवस रात्र हे प्रतिकात्मक न घेता प्रत्यक्ष वापरले तर भारतीय झोपतात तेंव्हा अमेरिकन जागे असतात , म्हणजे ते स्थितप्रज्ञ मानायचे का?

की इकडे रात्र असताना तिकडे दिवस असतो व तिथले लोक जागे असतात , हे सामान्यज्ञान भगवंताना ठावुक नव्हते म्हणायचे ? Proud

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥६९॥
सब प्राणियोंके लिए जो रात्रिके समान है, उसमें स्थितप्रज्ञ संयमी जागृत होता है; और जिन विषयोंमें सब प्राणी जागृत होते हैं, वह मुनिके लिए रात्रिके समान है । ६९

http://susanskrit.org/gita-chapter-two/54-2010-05-24-09-19-44.html

बायदिवे, तात्यारावाना मुहुर्त कल्पना मान्य होती का?

बायको हे उदाहरण वापरले. तो प्रतिसाद एडिट करत आहे.

माझी बायको ही माझ्या सासूची मुलगी आहे , पण ती माझी कोण ? या प्रश्नाचे उत्तर बायको असेच द्यावे लागते... हे उदाहरण घ्या हवे तर

आपल्या नातेवाईकांचे निव्वळ उल्लेख जसे जाचतात , तसे गांधी नेहरू यांच्याबद्दल विनाकारण गरळीय उल्लेखही कुणाला तरी जाचू शकतात , ही जाण आता या मूहूर्तावर लाभली असेल , अशी अपेक्षा करायला हरकत नसावी.

जग झोपलेले असताना भारत जागा होत आहे हे विधान अनावश्यक आणि चूकीचे होते हेच माझे मत कायम आहे. जसे की, तुमच्या प्रतिसादातील बायकोचे उदाहरण अनावश्यक आणि चूकीचे होते. योग्य विधाने केली म्हणजे एडीट करायची वेळ येत नाही.

{{{ तसे गांधी नेहरू यांच्याबद्दल विनाकारण गरळीय उल्लेखही कुणाला तरी जाचू शकतात }}}

माझ्या प्रतिसादातला कुठला शब्द तुम्हाला असा वाटला? तुमच्या प्रतिसादातला जो शब्द मला तसा वाटला तो मी ठळक केला आहे.

तुमच्या दृष्टीने अनेक गोष्टी चुकीच्या असू शकतात ... त्याबद्दल पूर्ण आदर आहेच ... पण त्याना ते योग्य वाटले, ते त्यानी बोलून दाखवले, ज्याना ते आवडले ते त्याला योग्य म्हणतात .. Proud तुम्ही तुम्हाला जे योग्य भाषण वाटले, ते ऐका अन मजेत रहा

खरे तर भारतात मध्यरात्र असताना अमेरिकादी देशांत दिवस असतो हे सामान्यज्ञान या असामान्य महोदयांना नसल्याने अनवधानाने ही गफलत झाली असावी.

तुमच्या दॄष्टीने हे विधान गरळीय नसेल व सन्मानास्पद असेल तर अजून काही लिहायची इच्छा नाही.

Proud

स्वतःचे प्रतिसाद पुन्हा पुन्हा एडीट केलेत आणि माझ्या प्रतिसादातलं संपूर्ण वाक्यंच ठळक केलंत. यातला एकही शब्द सुटा घेतला तरी तो तुमच्या विधानातील "गरळीय" प्रमाणे जराही आक्षेपार्ह नसल्याने तुम्हाला पुढे काही लिहिणं शक्यच नाहीये हे कळलं. तुमच्या मर्यादा समजल्यात त्यामुळे तुमच्याशी अजुन वाद घालत तुमच्याइतक्या खालच्या पातळीवर येण्याची इच्छा नाही म्हणून इथेच थांबतो.

साधनाताई विशिष्ट मर्यादेपर्यंत लोक मुहुर्ताचाआग्रह धरतात. जेव्हा ते व्यवहार्यच नाही असे होते त्यावेळी ते बदलतात. हा बदल ह्ळूह्ळू होत आहे.म्हणूनच काढीव मुहूर्त हा प्रकार अस्तित्वात आला.

मुहूर्त जरी काढले तरी त्याच वेळी काम तरी कुठे केले जाते? जिथे लग्नाआधी मुलाच्या वरतीसमोर नाचत जायच्या पद्धती आहेत तिथे पत्रिकेत 12.30 चा मुहूर्त आणि लग्न 2.30 ला हे सर्वमान्य आहे. आणि इतका मुहूर्ताचा आग्रह धरणारे अंधश्रद्ध लोक समाजात असूनही इंडियन स्टॅंडर्ड टैम नावाची एक संकल्पना अस्तित्वात आहेच आणि ती नुसती इथेच नाही तर जगभरातही काही भारतोय कसोशीने पाळतात याचे किस्सेही इथे माबोवर वाचलेत. म्हणून इथे मुहूर्त वाईट हे वाचून आश्चर्य वाटले. मी तर म्हणेन निदान मुहूर्त निघतो म्हणून सुरवात तरी होते नाहीतर लोक तेही करायचे नाहीत. एखाद्याच्या हातून कामे होत नाहीत तेव्हा त्याला मुहूर्त मिळत नाहीये का हे विचारायची पद्धत उगीच नाही पडली.

तुळशीचे लग्न झाले की माणसांची सुरु व्हावीत यामागे शेतकी
प्रधान समाजाची सोय आहे. आता इथे मुंबई पुण्यात नोव्हेंबरात लग्न मुहूर्त सुरु होऊन ते जून मध्यापर्यंत असले तरी गावी आधीची पिके कापून त्यांची नीट व्यवस्था लागून हाती दोन पैसे येतात तेव्हाच लग्नखर्च जमतो. शेतकी कुटुंबातली 4 लग्ने मी पाहिलीत, 4 रही एप्रिल,मे मध्ये. पहिल्या लग्नात नाशिकच्या उन्हात आम्ही भाजून निघाल्यावर जेव्हा डिसेंम्बरात का नाही लग्न ठेवले म्हणून विचारले तेव्हा हेच वेळेचे आणि पैशांचे उत्तर मिळाले. तिथे दिवाळी पासून लग्न जमवायचा उद्योग सुरु होतो तो साधारण फेब्रुवारी पर्यंत चालतो. पुढे मार्च ते मे लग्न. जून मध्ये पहिला पाऊस पडायच्या आधी आणि पडल्यानंतर शेतात भरपूर कामे असतात. एकदा पाऊस पडायला सुरुवात झाली की कुठली लग्ने आणि कुठले काय. ही घाई साधारण दिवाळी पर्यंत संपते. आता शहरात येऊन स्थायिक झालेले लोक ज्यांचे आयुष्य शेतीला बांधलेले नाही तेसुद्धा असेच करत असतील तर त्यांनी स्वतःला बदलायला हवे. शहरात काढी मुहूर्त चालतात. मी सप्टेंबरातले एक लग्न अटेंड केलेय, नवरा नवरीला लगेच अमेरिकेत जायचे होते त्यामुळे काढी मुहूर्तावर लग्न झाले. म्हणजेच लोक एक पद्धत म्हणून मुहूर्त काढत असले तरी ती वेळ काटेकोर पणे पाळण्याबाबत अजिबात आग्रह नाहीये, म्हणजेच मुहूर्त हि एक सोय आहे, जे काम करायचेच आहे ते शुभमुहूर्त आहे म्हणत कसेही करून करण्याची आणि जे टाळायचेच आहे ते मुहूर्तच नाही म्हणून टाळायची. त्यांमुळे तुम्ही मुहूर्त न पाहता काही केलेत तर काहीही नुकसान होणार नाही किंवा होणारे नुकसान टाळताही येणार नाही.

आता शहरात येऊन स्थायिक झालेले लोक ज्यांचे आयुष्य शेतीला बांधलेले नाही तेसुद्धा असेच करत असतील तर त्यांनी स्वतःला बदलायला हवे >>>> अगदी बरोबर ! अन तरीही ते तसेच करत राहतील तर त्याला अंध श्रद्धाच म्हणावे लागेल.

त्यांमुळे तुम्ही मुहूर्त न पाहता काही केलेत तर काहीही नुकसान होणार नाही किंवा होणारे नुकसान टाळताही येणार नाही.>> यालाच विवेक म्हणायचे जो बहुसंख्य लोकांमध्ये नसतो.

एक बेसिक शंका - लहानपणापसून डोक्यात आहे - माझ्या लग्नाच्या आधी सुटणे गरजेचे आहे.

लग्नाचा मुहुर्त म्हणजे वेळ नक्की कश्याची असते? हार एकमेकांच्या गळ्यात घालायची, मंगळसूत्र घालायची, सात फेर्‍यांची, मंगलाष्टके सुरू करायची वा संपवायची, की आणखी काही?

लग्नाचा मुहुर्त म्हणजे वेळ नक्की कश्याची असते? हार एकमेकांच्या गळ्यात घालायची, मंगळसूत्र घालायची, सात फेर्‍यांची, मंगलाष्टके सुरू करायची वा संपवायची, की आणखी काही? >>>
चांगला आणि समयोचित प्रश्न ! हा एक संशोधनाचा विषय आहे !!
.......असे म्हणता येइल की मुहूर्त म्हणजे केवळ मनाचे समाधान करण्याची व प्रत्यक्षात अजिबात न पाळण्याची वेळ. Bw

मुहूर्त काढणे हा इथल्या संस्कृतीचा भाग आहे. ही संस्कृती नाकारण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण ज्यांना ती नाकारायची नाहीय त्यांचा उपमर्द इतरांनी का करावा?
१०० टक्के अनुमोदन.
मला जे काय धार्मिक करायचे (फारसे काही नाही, पण जे करायचे ) ते सर्व नीट करावे असे वाटते. त्यामुळे मला एक महत्वाचा प्रश्न आहे - गणेश चतुर्थी ते गणेश चतुर्दशी या काळात जर कालनिर्णय ने एखादा दिवस शुभ असे लिहीले असेल तर त्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केली तर चालते का? आमच्या घरी गणपति नसतो, माझ्या मोठ्या भावाच्या घरी असतो.

कुमार१ आपण व चर्चेतील इतर सहभागी लोकांसाठी
अंधश्रद्धा व मेंदुविज्ञान हे मेंदुच्या मनात या सुबोध जावडेकरांच्या पुस्तकातील प्रकरण वाचावे. मायबोलीवर या व अशा प्रकारच्या विषयांवर अनेक चर्चा आतापर्यंत झालेल्या आहेत. मायबोलीवरिल नव्या लोकांना उत्खानन शक्य होत नाही व जुन्या लोकांना तेच तेच लिहायचा किंवा कॉपी पेस्ट करायचा कंटाळा येतो.

Pages