मुहूर्तांचे प्रस्थ

Submitted by कुमार१ on 19 March, 2017 - 21:15

सुमारे १५ वर्षांपूर्वीची घटना. भारताचे राष्ट्रपती म्हणून श्री. अब्दुल कलाम यांची निवड झाली होती. भारतीयांच्या दृष्टीने ही आनंदाची व अभिमानाची गोष्ट होती. कलाम यांनी ते पदग्रहण करताना एक अतिशय चांगला पायंडा पाडला तो म्हणजे, आपल्या पदाची कारकीर्द सुरू करण्यासाठी ते मुहूर्त बघण्याच्या अजिबात फंदात पडले नाहीत. त्यांना नेमणूकीचे पत्र मिळाल्यानंतरचा पहिला शासकीय कामाचा दिवस हाच त्यांच्या दृष्टीने ‘मुहूर्त’ होता. त्या प्रसंगी त्यांनी हा मुद्दा स्पष्ट करताना पुढील उद्गार काढले होते, ‘’पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी मारायला जो कालखंड लागतो, त्याला एक वर्ष म्हणतात आणि त्या वर्षाचे ३६५ दिवस हे सर्व समान हिस्से असतात. त्यामुळे कोणताच दिवस हा शुभ किंवा अशुभ नसतो.’’
त्यांचे हे उद्गार खरे तर आपल्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे होते. परंतु, आपल्यातील बहुसंख्य लोकांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असणार यात शंका नाही. मला स्वतःला तर ते उद्गार वाचून खूप समाधान वाटले होते. एखाद्या रूढ समजुतीला ‘थोतांड’ म्हणून फटकारण्याऐवजी ती कशी अनावश्यक आहे याचे त्यांनी वैज्ञानिक स्पष्टीकरण किती छान केले होते.

माणूस हा मुलुखाचा आळशी असतो. कुठलेही नवे काम सुरू करण्याबाबत त्याची चालढकल करण्याची प्रवृत्ती असते. बरीच कामे ही ‘उद्या बघू’ म्हणून कायम ‘उद्यावरच’ ढकलली जात असतात आणि तो ‘उद्या’ कधी उगवतच नाही ! म्हणून, कुठल्याही कामास सुरवात कधी करावी या प्रश्नाचे साधे सरळ उत्तर असे असते की, ‘उद्याचे काम आज व आजचे काम आता लगेच’. एवढे साधे तत्व जरी आपण आचरणात आणले तरी असंख्य महत्वाची कामे ही वेळच्यावेळी होत राहतील. पण, वास्तव मात्र तसे नाही.

कुठलेही नवे काम करायचे म्हटले की बहुसंख्य लोक हे ज्योतीषावर आधारित मुहूर्त बघतात. मग त्यातूनच शुभ व अशुभ दिवस या खुळचट कल्पनेला जन्म दिला जातो. काम सुरू करण्यासाठी जर ‘मुहूर्त’ उपलब्ध नसेल तर ते कितीही पुढे ढकलायची आपली तयारी असते. नमुन्यादाखल काही कामांची उदाहरणे देतो. इमारतीच्या बांधकामाची सुरवात, प्रकल्पाचे उद्घाटन, मोठी खरेदी, कामाचा पदभार स्वीकारणे, नाटकाचा पहिला प्रयोग, चित्रपटाच्या चित्रीकरणाचा प्रारंभ वगैरे. अशा कितीतरी प्रसंगी मुहूर्त बघून नक्की काय साध्य होते? कोणत्याही कामाचे यशापयश हे त्याच्या दर्जावरच ठरणार असते हे सत्य आपण का नाकारतो? अमुक एका दिवशी कामास प्रारंभ केल्याने त्यात यश मिळेल ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. त्याऐवजी एखाद्या कामात स्वतःला झोकून देउन त्याचा दर्जा वाढवण्यासाठी कठोर मेहनत घेणे अधिक महत्वाचे नाही का?

आयुष्यातील वैयक्तिक व कौटुंबिक गोष्टी करण्यासाठी तर आपले मुहूर्ताविना पान हलत नाही. याबाबतीत विवाहाचे मुहूर्त हा तर एक कोड्यात टाकणारा विषय आहे.
आपल्या देशात संपूर्ण वर्षात एप्रिल व मे मध्ये लग्नाचे भरपूर मुहूर्त असतात. वास्तविक या काळात पाण्याचे दुर्भिक्ष असते. तसेच गंभीर संसर्गजन्य आजारांच्या साथी फैलावत असतात. लग्नाच्या मांडवातील मंडळीना भाजून काढण्याचे काम उष्णता चोखपणे बजावत असते. बाकी या वातावरणात वधूवर तर त्यांच्या भरजरी पोशाखात किती उबून निघत असतील याची कल्पनाच केलेली बरी. याच्या जोडीला अजून एक त्रास असतो तो परगावहून उन्हाचा त्रास सोसत येणाऱ्या पाहुण्यांना. अशा बेसुमार वाढलेल्या प्रवाशांमुळे वाहतूक यंत्रणांवरील ताणही वाढतो, हा अजून एक मुद्दा.
तरीसुद्धा याच काळात हौसेने विवाह करण्याचा सामाजिक अट्टहास का असतो हा प्रश्न मला नेहेमी पडतो. आपण ‘मुहूर्त’ याचा अर्थ ‘सर्वाना सुखकारक वेळ’ असा का नाही घेत? बऱ्याचदा वर्षातील इतर काही महिने ‘मुहूर्त नाहीत’ या कारणांसाठी भाकड जात असतात. त्याऐवजी जर आपण एप्रिल-मे यांना ‘मुहूर्तबाद’ करून टाकले व इतर सर्व महिन्यांमध्ये समारंभ ठेवले तर ते योग्य आणि सर्वाना सुखकारक ठरेल.

माझ्या काही मित्रांनी त्यांची लग्ने ही ठरवून १५ ऑगस्ट वा २६ जानेवारीला केली आहेत. मला त्यांचा याबद्दल अभिमान वाटतो.
विवाह-मुहूर्ता बाबत अजून एक मुद्दा. पारंपारिक मुहूर्तावर केलेली सगळेच लग्ने पुढे यशस्वी होतात का? नीट विचार करून बघा, याचे उत्तर काहीसे नकारार्थी आहे. म्हणजेच, वैवाहिक जीवनाचे यशापयश हे त्या दोन व्यक्तींच्या सामंजस्यावर अवलंबून असते, लग्नमुहूर्तावर नक्कीच नाही !

समाजव्यवहारातील इतर अनेक प्रसंगीही मुहूर्तांचे प्रस्थ जाणवते. विज्ञान शाखेतील अभ्यासक्रमासाठी ‘शुभ दिवशी’ प्रवेश अर्ज भरणारा विद्यार्थी किंवा निवडणुकीसाठी अर्ज भरणारा उमेदवार, निरनिराळे करारनामे करणारे नागरिक, एखाद्या संस्थेची स्थापना, अंतराळात यान पाठवण्यासाठी मुहूर्त बघणारे शास्त्रज्ञ अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. आपण कुठलेही कार्य हाती घेताना आपला स्वतःच्या क्षमतेपेक्षा दैवावर अधिक विश्वास असतो हेच यांतून ध्वनित होते. खुद्द आपल्या देशाचा स्वातन्त्र्यदिन हा मध्यरात्री का जाहीर करण्यात आला? तर म्हणे की १५ ऑगस्ट १९४७ ची सकाळ ही ‘शुभ’ नव्हती ! ( हे विधान वृत्तपत्रातील माहितीवर आधारित).

अनेक सार्वजनिक लोकहिताची कामे व योजना मुहूर्तावर सुरू होतात. त्यांच्या उद्घाटनाचा झगमगाट जरा जास्तच असतो. नंतर मात्र त्यांचे काम अतिशय संथ गतीने होते. ठरलेल्या कालावधीत त्या पूर्ण कराव्यात याबाबत आपण बिलकूल आग्रही नसतो. अखेर कसेबसे ते काम पूर्ण केले जाते आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना मिळण्यासाठी पुन्हा एकदा मुहूर्ताची प्रतिक्षा करावी लागते !

एकंदरीत पाहता समाजमनावरील पारंपरिक ज्योतिषवादी भूमिकेचा पगडा अद्यापही जबरदस्त असल्याचे जाणवते. त्यामुळेच मुहूर्तांचे प्रस्थ आजही कायम आहे. जगभरातील काही मोजक्या विचारवंतांनी अशा रूढींना नाकारून आपापली कारकीर्द यशस्वी करून दाखवली आहे.त्यांच्यापैकी काहींनी तर दैदिप्यमान यश मिळवून दाखवले आहे. परंतु, त्यांच्या पाउलवाटेने जाण्यास समाज अजूनही कचरतो. लोकांच्या मनातील कुठली तरी अनामिक भीती त्यांना अंधश्रद्धांमध्ये जखडून ठेवते हेच खरे. त्यातील फोलपणा समजून घेऊन कालानुरूप वास्तववादी भूमिका घेण्याची आज नितांत गरज आहे. असे जेव्हा केव्हा घडेल तो सुदिन.
***************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हल्लीच्या समाजव्यवस्थेवर व एकूणच कामांच्या दिरंगाईबद्दल महत्वाच्या कारणावर खुपच छान लिहिलय. "उद्धरेत आत्मानां " प्रमाणे योग्य वेळेत योग्य कष्ट केले तर प्रगती निश्चित असते हे कित्येक मान्यवरांच्या जीवनशैलीवरून सिद्ध झालेच आहे... तरीही ती गोष्ट प्रत्यक्ष स्वतः करायला समाजातील प्रत्येक घटक पुढाकार घेईल तोच खऱ्या प्रगतीचा मुहूर्त

मी तरी मुहूर्तावर विश्वास ठेवावा कि नाही, त्याचा काही फायदा तोटा होतो की नाही, ह्या दृष्टीने कधी विचारच केला नाही. ना मला कधी त्याबद्दल उत्सुकता वाटते.

तरीसुद्धा याच काळात हौसेने विवाह करण्याचा सामाजिक अट्टहास का असतो हा प्रश्न मला नेहेमी पडतो. >>> माझी माहिती अशी आहे, की त्याकाळात मुलाबाळांच्या शाळेला सुट्ट्या असतात. सर्व गावी एकत्र जमलेले असतात. म्हणून लग्ने उरकण्याचा हाच योग्य काळ असतो.

लग्नाच्या मुहर्ताविषयी - साधारण तुळशीच्या लग्नानंतर लग्नाचे मुहुर्त असतात त्याला कारण कृषीप्रधानता त्यामुळेच चातुर्मासात लग्ने होत नाहीत. दिवाळीनंतर शेताची कामे कमी झालेली असतात व खरीपाचे पीक निघाली असल्यामुळे धनधान्य व रोकड जमलेली असते..... हे कारण असावे. बाकी मुहुर्तावर...... प्रत्येकाची श्रध्दा !

<< माणूस हा मुलुखाचा आळशी असतो. कुठलेही नवे काम सुरू करण्याबाबत त्याची चालढकल करण्याची प्रवृत्ती असते.>>>प्रत्येक मुहूर्त पहाणारा मणूस असाच अस्तो हे सोयिस्करपणे ग्रुहित धरताय. तसेच ; राष्ट्रपती पुढे पाच वर्षे काम करणार असतो. मुहूर्तासाठी एक दोन दिवस इकडे तिकडे होवू शकते. त्यासाठी १-२ महिने घालवले तर ते नि श्चित चुकिचेच आहे. आणि मुहूर्त ऑफिस मधे प्रवेश करण्याचा असतो , त्यासाठी कुणी कामाला सुरुवात करायचा थाम्बत नसतो.
वाइट हवामानात विमानाचे उड्डाण पुढे ढकलावे लागतेच ना. ईथे वाइट हवा डोळ्याला दिसते , तिकडे ती वेगळ्या (तुम्हाला न पटणार्या) शास्त्राला दिसते इतकाच फरक.
खरे तर सर्व शास्त्रीय शोध हे पुढचा शोध लागेपर्ञन्त "शास्त्रीय सत्य असतात" आणी नन्तर ते "अ शास्त्रीय" ठरतात , याला न्युटन्चे गतीचे नियनही अपवाद नाहीत , आइनस्टाइन च्या सापेक्शता वादाने तेही वेगळ्या सन्दर्भात चुकीचे ठरवले !!!!!! आइनस्टाइन चे कित्येक शोध हे त्याला इन्टुशनने कळले होते जे पुढे इतर शास्त्रद्यान्नी सिद्ध केले. ( प्रकाश किरण्ही गुरुत्वाकर्नाणाने वाकतात). Astrophysicist Neil DeGrasse Tyson च्या Cosmos: A Spacetime Odyssey मधे एक सन्कल्पना मान्डली आहे की सुरुवातीचे बरेचसे शोध हे "lucky guess" होते.
शास्त्र सर्व गोष्टी "कशा" घडतात याचे विवेचन करतात , त्या "का" घडतात हे नाही सान्गू शकत. प्रुथ्वीची निर्मिती कशी झाली ते शास्त्रज्ञ शोधून काढ्तात पण का झाली हे नाही !!
ते जाणण्याचा प्रयास इतर शास्त्रे करायचा प्रयत्न करतात. त्यान्चे मार्ग तुमच्या विचारशकतीला अशास्त्रीय वाटतील पण वाद घालण्यापेक्षा यामुळे कोणतेही अनन्यसाधारण नुकसान होत नाही ना इतके पहाणे आवश्यक आहे. मुहूर्त पाहिल्याने झाला तर उपयोगच होइल, निदान त्या मागचा हेतू चान्गले चिन्तणे हाच आहे.

<<कामात स्वतःला झोकून देउन त्याचा दर्जा वाढवण्यासाठी कठोर मेहनत घेणे अधिक महत्वाचे नाही का?>> परत सोयिस्करपणे अस ग्रुहित धरताय कि मुहूर्त पहाणारे कामात लक्षच घालत नाहित , मेहेनेत घेतच नाहीत !
परिश्रम , कष्ट , प्रयत्न करायला पाहिजेतच ! पण बर्याच वेळा हे सगळे करूनही सफलता पाठ फिरवते,ज्याची कारणे तुमच्या आमच्या कुणाच्याच हातात नसतात. ज्याला कुठलेहि अधुनिक शास्त्र उपाय सान्गू शकत नाही. अशा वेळेला आपले मनो धैर्य वाढवण्यासाठी अशा गोष्टीन्मधे काही लोकाना विश्वास वाटतो. असे केल्याने कुणालाही इजा पोहोचत नसेल तर या गोष्टी करायला काय हरकत आहे? प्रकाश आमटे यान्चे प्रकाशवाटा वाचा. आउषध तिथे पोहोचे पर्यन्त / ओउषध दिल्यानन्तर जेव्हा आणखी काहिही करणे शक्य नसायचे तेव्हा रुग्णाचे मनो धैर्य वाढवण्यासाठी ते चक्क मन्त्र म्हणत असत.
श्रद्धा आणी अन्ध्श्रद्धा यातली सीमारेषा धूसर असते. ती काही वेळा सापेक्ष होते.

<<माझ्या काही मित्रांनी त्यांची लग्ने ही ठरवून १५ ऑगस्ट वा २६ जानेवारीला केली आहेत.>> असे केल्याने नेमके काय साध्य झाले ?

पशुपत, तुमच्या प्रतिसादाबाबत आदर आहे.
<<माझ्या काही मित्रांनी त्यांची लग्ने ही ठरवून १५ ऑगस्ट वा २६ जानेवारीला केली आहेत.>> असे केल्याने नेमके काय साध्य झाले ? >>>>
त्यांचा 'ज्योतिष- मुहूर्त ' यावर विश्वास नव्हता. १५ ऑगस्ट वा २६ जानेवारी हे राष्ट्रीय आनंदाचे दिवस आहेत. त्या दिवशी लग्न करून त्यांनी तो आनंद द्विगुणित केला.

लेखाशी पूर्णपणे सहमत.

(अंध) श्रद्धांमुळे कोणाचे अनन्यसाधारण नुकसान झाले नाही अशी argument नेहमीच दिली जाते. इथे आपण परम efficiency ने कामं करण्याचा प्रयत्न करतो मग या बाबतीतच 'अनन्यसाधारण नुकसान' हा मापदंड का ठेवायचा?

बरं मग आपण '(अंध) श्रद्धांमुळे कोणाचे नुकसान झाले नाही' यावर बोलू.

मुहूर्त बघून लग्न किंवा कार्य सुरु करणे याचे आपल्या अर्थव्यवस्थेवर अनेक छोटे मोठे परिणाम होतात. वर्षातून २-३ महिन्यात लग्न होत असल्यामुळे लग्नाशी संबंधीत गोष्टींच्या डिमांड-सप्लाय वर ताण पडतो. मग लग्नाचा (आधीच जास्त असलेला) खर्च वाढतो. Weekday ला लग्न झाली तर लाखो लोकांची productivity कमी होते. परत पत्रिका व मुहूर्त पाहून लग्न करण्याचा नादात बरेच लोक लग्न करणारे मुलगा-मुलगी एकदुसऱ्यासाठी योग्य आहे का हे पहाणे विसरूनच जातात.

मुहूर्त नाही म्हणून १-२ दिवस काम उशीरा सुरु केलं तर काय बिघडणार आहे? हाच प्रश्न office मध्ये पुढचा project सुरु होण्यापूर्वी boss ला विचारून बघा.

वर कोणीतरी म्हटले आहे की प्रथा या आपल्या सोयीसाठीच असतात - 'कृषीप्रधान, चातुर्मास, शाळेला सुट्ट्या, etc'. यामधील किती गोष्टी आता खरंच लागू पडतात? आपल्या गरजांप्रमाणे प्रथा बदला की आता...

आपण प्रथा चालू ठेवतो म्हणून वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे त्या placebo बनतात. मनो धैर्य वगैरे वाढवतात. पण मग आपण आपल्या मुलांना त्या सांगितल्याचं नाहीत तर त्यांना या प्रथांची गरजच पडणार नाही! त्यांचे placebo जास्त लॉजिकल गोष्टी असतील.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे (अंध) श्रद्धांमुळे होणारे छोटे-मोठे नुकसान यापलीकडे त्यांमुळे खुंटलेली आपली प्रगती याचा विचार करायला हवा. हे वाचून बरेच जण डोळे roll करतील. मुहूर्त पाहून चंद्रयान पाठवल तर काय झालं, यान तर पाठवलाय ना? (अंध) श्रद्धांमुळे होणारे नुकसान हे बऱ्याच वेळा tangible नसते. ४०० वर्षांपूर्वी लोकांनी पृथ्वीभोवती सूर्य व चंद्र फिरतात ही श्रद्धा चालू ठेवली असती तर काय झाले असते? खरी नसलेली गोष्ट पुढचे ४०० वर्ष चालू ठेवली तर काय होईल हे आज सांगता येणार नाही.

चैतन्य, तुमच्या संपूर्ण प्रतिसादाशी सहमत. चांगले मुद्दे आहेत तुमचे.
कालानुरुप आपण बदलत राहावे हे केव्हाही उत्तम.
माझे काही मित्र त्यांचे समारंभ हे ठ रवून 'बिनमुहूर्ताच्या' दिवशी करतात. त्याचे त्यांना पुढील फायदे होतात :

१. सभागृह विनासायास मिळते व त्याचे भाडेही कमी असते !
२. तेव्हा रस्त्यावरील गर्दी व गोंगाट तुलनेने कमी अस्ल्याने येणार्‍या पाहुण्यांना छान वाटते.
३. आपण रुढ परंपरा नाकारल्याचे समाधान. ते इतरांना बोलून न दाखवता फक्त कृतीने दाखवायचे. नंतर आपले कुणी अनुकरण केले तर आपल्याला मनोमन आनंद होतोच.
मी जमेल तेवढा माझ्या वरील मित्रांचे अनुकरण करतो.

Submitted by पशुपत on 20 March, 2017 - 14:29 :
प्रकाश किरण्ही गुरुत्वाकर्नाणाने वाकतात.

>>>>>

हे चुकिच विधान आहे... प्रकाश किरण हा नेहमी सरळ रेषेतच प्रवास करतो हे युनीवर्सल सत्य आहे..
प्रकाश गुरुत्वाकर्षणाने वाकत वगैरे काही नाही.....

टि. प. : गुरुत्वाकर्षणाने काय वाकत तर ते स्पेसटाईम.

लेखकाने दिलेली मुहूर्त म्हणजे सर्वाना सुखकारक वेळ ही व्याख्या आवडली. मी स्वत: मुहूर्त पाळत नाही व लग्नासाठी किम्वा इतर कार्यासाठी मुहूर्त मागणार्याना सान्गतो की कोणताही दिवस शुभ किम्वा अशुभ नसतो. तेम्व्हा कोणतेही कार्य शुभस्य शीघ्रम या नात्याने करावे जसे आपण आजारी पडल्यावर डॉक्टरकडे चटकन जातो ज्याने आपला फायदा होतो.

<<प्रकाश किरण्ही गुरुत्वाकर्नाणाने वाकतात.
>>>>>
हे चुकिच विधान आहे... प्रकाश किरण हा नेहमी सरळ रेषेतच प्रवास करतो हे युनीवर्सल सत्य आहे..
प्रकाश गुरुत्वाकर्षणाने वाकत वगैरे काही नाही.....>>

इथे वाचा
http://www.einstein-online.info/spotlights/light_deflection
https://www.math.ku.edu/~lerner/GR/EinsteinGravAndLight.pdf

<<परत पत्रिका व मुहूर्त पाहून लग्न करण्याचा नादात बरेच लोक लग्न करणारे मुलगा-मुलगी एकदुसऱ्यासाठी योग्य आहे का हे पहाणे विसरूनच जातात.>> काहिही! विनोद म्हणून सान्गत असाल तर ठीक आहे. मी या लोकान्बद्दल बोलत नहिये.
<<मुहूर्त नाही म्हणून १-२ दिवस काम उशीरा सुरु केलं तर काय बिघडणार आहे?>> मी कुठे असे म्हन्टले आहे ? मी तर म्हणतोय कि मुहूर्तासाठी कुणी काम करायचे थाम्बत नाहीत. आणी छोटी रोजची कामे करायला कोणी मुहूर्त पहात नाहीत हो! मी तरी अशा लोकान्बद्दल बोलत नाहिये.
मुहूर्त आयुष्यात एकदाच करण्याच्या अती महत्वाच्या गोष्टी साठी पहातात. जसे की विवाह ; ग्रुहप्रवेश इ.
आणी परत माझे म्हणणे आहे कि अन्धश्रद्धा वाइटच !
मी बोलतोय श्रद्धे विषयी. आधी आउषध नन्तर मग प्रार्थना (श्रद्धा असेल तर) ; आधी प्रयत्न - कष्ट नन्तर मग प्रार्थना(श्रद्धा असेल तर) असाच क्रम असायला हवा.
आधी मुलगा/ मुलगी यान्ची नीट पूर्ण माहिती मिळवा ; ती तुमच्या अपेक्शान्शी जुळते ना याची खतरजमा करा ; मग ल ग्न करायचे निश्चित ठरल्यावर , इच्छा आणि मान्यता असेल तर मुहूर्त बघा.

सहमत.
डॉ.कलामांचं वाक्य आवडलं.
मुहूर्त, शुभ/अशुभ वेळ हे सगळे मनाचे खेळ...

बरं Proud

डॉ.कलामांचं वाक्य आवडलं. >>> एवढे सुंदर स्पष्टीकरण मी त्यापूर्वी कधी ऐकले नव्हते. त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे असेच ते व्यक्तीमत्व होते.

नवीन Submitted by पशुपत ::

<<प्रकाश किरण्ही गुरुत्वाकर्नाणाने वाकतात.
>>>>>
हे चुकिच विधान आहे... प्रकाश किरण हा नेहमी सरळ रेषेतच प्रवास करतो हे युनीवर्सल सत्य आहे..
प्रकाश गुरुत्वाकर्षणाने वाकत वगैरे काही नाही.....>>
इथे वाचा
http://www.einstein-online.info/spotlights/light_deflection
https://www.math.ku.edu/~lerner/GR/EinsteinGravAndLight.pdf

>>>
आजुन परत तेच... आहो थिअरी ऑफ रिलेटीव्हीटी प्रमाणे गुरुत्वाकर्षणाने प्रकाश वाकत नाही हो..
गुरुत्वाकर्षणाने काय वाकत तर ते स्पेसटाईम (spacetime curvature)
प्रकाशाला कधीच वाकतवता येत नाही... गुरुत्वाकर्षणाने जे वाकत ते प्रकाश ज्या मधुन प्रवास करतो ते माध्यम (स्पेसटाईम)... हे कळतय अस मी समजतोय....

मला वाटत थिअरी ऑफ रिलेटीव्हीटी याचा नीट अभ्यास केल्यास याच उत्तर मिळेल...!!!

मुहूर्त पाहून चंद्रयान पाठवल तर काय झालं, यान तर पाठवलाय ना?
<<
अवांतर : चंद्रयानाला वेगळा मूहूर्त काढावाच लागतो. केव्हाही मनात येईल तेव्हा उडवून चालत नाही. मात्र हा मूहूर्त पंचांग/शकुन पाहून नव्हे, तर पृथ्वी, चंद्र यांच्या दरम्यान कमीत कमी अंतर येईल, याच्या वैज्ञानिक हिशोबाने ही वेळ शोधावी लागते.
(आता आद्य कटकटाचार्य येऊन पंचांग पाहून हे अंतर शोधणे कसे शक्य आहे ते सांगतील, त्याला फाटा.)

प्रकाशाला कधीच वाकतवता येत नाही... गुरुत्वाकर्षणाने जे वाकत ते प्रकाश ज्या मधुन प्रवास करतो ते माध्यम (स्पेसटाईम)... हे कळतय अस मी समजतोय....
<<
करेक्ट. वाकड्यातिकड्या फायबर ऑप्टिक केबल मधून प्रकाश सरळ रेषेतच प्रवास करतो. फक्त आपल्याला वाकडा झालेला दिसतो Wink
किंवा शाळेतल्या फिजिक्सच्या प्रयोगात नैका? काचेच्या क्यूबमधून जाणारे किरण, भिंगानी फोकस केलेले किरण. सगळं अ‍ॅक्चुअली सरळ रेषेतच असतं बाकी सब वहम हय.

आईनस्टाईनच्या आईने लहानपणी एक सुंदर वाक्य म्हटलेले, प्रकाश आणि बुद्धीबळातला हत्ती नेहमी सरळ रेषेतच चालतो. ते या निमित्ताने आठवले Happy

हो, आई-ने-आईनस्टाईन ह्या पुस्तकात ह्या वाक्याचा संदर्भ सापडतो. हे पुस्तक पुन्हा एकदा वाचण्यासाठी केव्हा मुहुर्त सापडतोय कोणास ठाऊक !

दिवसाच जाउ द्या पण मुहर्ताची वेळ ठरवली तर त्याच्या surrounding लग्नातले बाकिचे कार्य्क्रम आखता येतात ना , निमत्रित ही ति वेळ साधुन येतात, गोरज मुहुर्तावर लागणारी ल्ग्न कधिही लागतात त्यापुढे विधि मग जेवण रात्री १२:३० ला (एका ल्ग्नात ९फार पुर्वी )जेवणावळि चालु बघितल्यात.

माझ्या यंदा कर्तव्य आहे या पुस्तकातील मुहुर्त हा भाग जरुर वाचावा. मिसळपाव संकेतस्थळावर याची लेखमाला आहे. त्यातील भाग ६,७,८ मुहुर्ताशी संबंधीत आहेत.
http://www.misalpav.com/node/4415

@ प्रकाश - तुम्ही मुहूर्त, पत्रिका इत्यादी वर पुस्तक लिहिलं आहे म्हटल्यावर तुमचं मन वळवणं कठीण आहे. तरीसुद्धा माझे २ पैसे -

मुहूर्त, पत्रिका ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे म्हणणे म्हणजे पळवाट आहे. श्रद्धेच्या काही गोष्टी अशा आहेत (उदा. देव आहे की नाही, मेल्यावर माणसाचे काय होते, इत्यादी) की ज्यांच्या साठी किंवा विरुद्ध पुरावा देणे कठीण आहे. पण पत्रिका, मुहूर्त यांचे तसे नाही.

पृथ्वी किंवा ग्रह ताऱ्यांच्या फिरण्याने माणसाच्या आयुष्यावर परिणाम होतो असे या सगळ्याचे मूळ आहे. पहिली गोष्ट - याचं physical कारण आज असंख्य शोध (relativity , gravitational waves, space-time) लागून सुद्धा किंचितसुद्धा दिसलेले नाही. तुम्ही म्हणाल सायन्स अजून हवे तेवढे प्रगत झाले नाही. (BTW - कोणी काही claim केलं तर burden of proof सायन्स वर नाही, claim करणाऱ्यावर असतं).

तरीसुद्धा काही statistical tests झाल्या आहेत ज्यामध्ये हजारो लोकांचे दोन विभाग करून एकाचे ज्योतिष बघितले गेले आणि दुसऱ्याचे नाही. दोन्ही गटात काहीच फरक पडला नाही.

चैतन्य, तुमचे मुद्दे अगदी बरोबर आहेत, पण......... जाउद्यात, शेवटी पटवून पटवून आपण थकतो हे खरे !
जिथे कलामांचे स्पष्टीकरणही आपल्या लोकांनी मनावर घेतले नाही तिथे आपण कोण ?
शालेय वयातील मुलांना समजावून सांगायचा प्रयत्न करू शकतो आपण फार तर.
अशा लेखाच्या निमित्ताने आपल्यासारखे थोडे तरी समविचारी आहेत हे पाहून समाधान वाटते, बस्स.

प्रुथ्वीवर सागराची भरती आणि ओहोटी चन्द्राच्या अस्तित्वाने आणि प्रुथ्वी भोवतीच्या भ्रमणाने होते ; हा तर डोळ्याला दिसणारा परिणाम मान्य आहे ना !

मला एक सान्गा कि तुम्ही परिक्शेला निघालेल्या मुलाला "best luck" wish करता ना ! त्याचे कारण काय आहे ? त्यामागे कोणते "शास्त्रीय" कारण आहे ?
परिक्शेतल्या प्रश्नाना उत्तरे , त्याने केलेल्या अभ्यासामुळे लिहिता येतात , तुमच्या शुभेच्छान्मुळे नाही.
Luck म्हणजे नेमके काय ? ते चान्गले अथवा वाइट का होते ? आभ्यास केलेला असेल तर अपेक्शित यश मिळायलाच हवे. पण काही वेळा तसे होत नाही.

आभ्यास न केलेल्या topic वर प्रश्न आल्याने मार्क कमी मिळाले हे शास्त्रीय logic झाले पण नेमका असा प्रश्नच परिक्शेत का आला ? याचे उत्तर कोण देणार ?

Pages