..आणि एक दिवस रफीचा आवाज कानावर आला...! - श्री. इर्शाद बागवान

Posted
4 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago

'आंदोलन' मासिकाच्या गणतंत्र विशेषांकाच्या 'किस से चाहिये आझादी' या विशेष विभागाचं संपादन श्री. श्रीरंजन आवटे यांनी केलं. त्या विभागात त्यांनी समाविष्ट केलेलं श्री. इर्शाद बागवान यांचं हे अनुभवकथन.

***

बंधनं अडवणूक करतात. वाढीचा मार्ग रोखून संकुचित विश्वात बंदिस्त करतात. मग हळूहळू आपल्यालाही त्या बंधनांची सवय होऊन जाते. इतकी की, आपण त्या भिंतींपलीकडे असणाऱ्या अमर्याद जगाची कवाडं स्वतःच्या हातांनी कुलुपबंद करतो आणि मग एका क्षणी असं होतं की, नजर उचलून त्या भिंतींपलीकडे पाहण्याएवढंही धैर्य आपल्यांत उरलेलं नसतं.

कुणी म्हणेल मग स्वातंत्र्य देऊन स्वतःच्या हातांनी बिघडवलेलं आयुष्य पाहत बसावं का? तर हेही माणूस म्हणून कळतंच की प्रत्येकाला. फक्त स्वातंत्र्य अन् स्वैराचार यांतला फरक कळला की बस्स! तर माणूस हे रसायनच असं आहे की त्याला जेवढं अधिक बंधनात जखडू तेवढ्या जास्त प्रमाणात तो त्यातून निसटण्याच्या वाटा शोधत राहतो. कारण ही निसटण्याची, बाहेर पडण्याची, नवीन जग पाहण्या-अनुभवण्याची प्रक्रिया, पर्यायानं बदलाची प्रक्रियाच त्याला जिवंत ठेवते, उन्नत करते.

माझ्या जीवनातही असाच एक काळ आला, ज्यात मी स्वतःवर अतर्क्य बंधनं लादून घेतली. हा माझ्या आयुष्यातला भर उमेदीचा काळ होता. ज्या काळात मुलं मस्ती, जोश, धाडस यांच्या बरोबरीनं मुक्त आणि स्वैर जीवनाची मजा लुटतात, भावी आयुष्याच्या इमारतीचा पाया रचत असतात, त्या काळात मी मात्र स्वतःला धर्मबंधनात बंदिस्त केलं होतं.

या काळात मशिदीशी संबंध आल्यानंतर माझे कुरआन हदीसचं वाचन वाढत गेलं. अन् हदीस नुसतं वाचायचं नाही, तर प्रत्यक्ष जीवनात ते जिवंत करायचं, या शिकवणुकीनं प्रभावित झालेल्या मी अल्लाला खूश करायचं, त्याचा परमभक्त व्हायचं, या एक आणि एकच ध्यासानं पछाडून जात, वर्तमान आयुष्याकडे पूर्ण पाठ फिरवून एका अद्भूतरम्य जगात वावरू लागलो. मग ‘गाना - बजाना हराम' हे वाचून संगीत, जे प्रत्येक युवा-मनात रक्ताबरोबर वाहत असतं, जे माझ्यासाठी जीव की प्राण होतं, ते ऐकणं - गाणं अजिबात बंद केलं. चित्रपट पाहण्यासाठी मित्रांबरोबर थिएटरला जाणं तर सोडाच, घरातल्या टिव्हीकडेही मी ढुंकूनसुद्धा पाहायचो नाही. अशाप्रकारे माझ्यात असलेली नाममात्र हराम कामं मी बंद केलीच, शिवाय अनावश्यक गरजाही कमी केल्या. आणि दिवसभरात करण्याच्या भक्तीचं काटेकोर नियोजन करत, या कृतीद्वारे अल्लाहच्या अधिक जवळ जायचा प्रयत्न करू लागलो. असा माझा अख्खा दिवस नमाज, कुरआन, हदीस, तस्बीह यांतच संपू लागला. घरातले लोकही म्हणत, 'इतकं का कुणी वेडं होतं यांत? तेवढ्यापुरती नमाज पढली की बस; दिवसरात्र फक्त तेच! दुसरं काही सुचत नाही अशानं, वगैरे वगैरे. पण मी एकाच ध्यासानं पेटलो होतो, अल्लाह का कुर्ब. म्हणजेच देवाच्या अधिक जवळची जागा.

अशातच चार महिने जमातीत जाण्यासाठी मला राजी करण्यात आलं. मला माझं दिवसभराचं रूटीन तोडून जमातीत जाणं अजिबात रुचलं नव्हतं. काहीतरी चुकतंय, अशी हुरहुर लागून राहिली होती. तरीही लोकांना अल्लाहशी जोडणं, हे खचितच सर्वांत मोठं काम, असा विचार करून मी जमातीत गेलो.

जमातीत माझं दिवसभराचं रूटीन तुटत सकाळ - दुपार हदीस-पढन, संध्याकाळी - रात्री लोकांशी बातचीत वगैरे असं नवीन रूटीन बनत गेलं. यांत मला असं वाटू लागलं की, मी अल्लाहपासून दूर तर होत नाहीये ना? कारण भरपूर प्रयत्न करूनही माझ्या नियोजनात्मक भक्तीचा अन् तब्लीग जमातीच्या रूटीनचा मेळ बसेना. यांत माझं भरपूर काही मिस्स् होत्साते जाणवून मला ते खटकू लागलं.

एका संध्याकाळी मनात खूप रितेपण येऊन, घुसमट सहन न होऊन, मला अचानक रडू फुटलं. त्या रात्री मी खूप हमसून रडलो. बर्‍याच वेळानं मन शांत झालं. मोकळं वाटू लागलं. पाशमुक्त झाल्यासारखं. त्यानंतरही माझं मन बराच काळ संवेदनशील, नाजूक राहिलं. दोनतीन वेळा रडण्याचा उमाळा येऊन विरला.

एके दिवशी मी आणि अजून एक जमातीतील मुलगा रस्त्यानं जात होतो. कानावर मोहम्मद रफीचं एक गाणं पडलं. बरोबरचा मुलगा बराच वेळ गुणगुणत होता. मला अगदीच राहवलं नाही. मीही त्याच्या बरोबरीनं गाणं म्हणू लागलो. तो अतिशय आश्चर्यानं गप्प होत नुसता माझ्याकडे पाहत राहिला. मग म्हणाला, 'तुम्ही... तुम्ही गाणं म्हटलंत? अन् तेही इतकं सुंदर? माझा विश्वासच बसत नाही.'

मग दिवसभरातला मोकळा वेळ हेरून, एखादा कोपरा शोधून आम्ही भरपूर गाणी म्हटली. मन भरून. अन् मी बर्‍याच दिवसांनी, - वर्षांनी म्हणायला हवं खरंतर -, दिलखुलास जगलो.

***

हा लेख मायबोली.कॉमवर प्रकाशित करण्यास अनुमती दिल्याबद्दल 'आंदोलन', श्रीमती सुनीती. सु. र. व श्री. श्रीरंजन आवटे यांचे मनःपूर्वक आभार.

***
विषय: 
प्रकार: 

मस्त! रफीची गाणी आणी त्याचा आवाज हाच एक देवाचा अविष्कार आहे. ज्याने गाताना देव आणी अल्ला असा भेदभाव केला नाही, त्याच्या गळ्यात कायम सरस्वतीच वास करणार.

रफी साहब.... वो तो खुदा का बंदा था

त्यांच्या आवाजाने लेखकाला आपण काय गमावतोय याची जाणीव झाली
आणि त्याने परत जगायला सुरुवात केली, छान अनुभव.

लेख सुरु होता होता संपला असे वाटले. लेखकाच्या पुढील आयुष्यात काही बदल झाला का आणी असल्यास तो काय हे वाचायला आवडले असते.

लेखकाच्या पुढील आयुष्यात काही बदल झाला का आणी असल्यास तो काय हे वाचायला आवडले असते. >> +१
श्री. इर्शाद बागवान कोण आहेत?

रफीबद्दल काही वाचायला मिळेल असं शीर्षक वाचुन वाटलेलं.
खुपच थोडकं लिहिलंय.
रफि चा आवाज म्हणजे एक दैवी अविष्कारच >>>> +१

अवांतरः मुस्लिम लोकांच्या नावापुढेही श्री लिहितात का?

छानच आहे लेख.

रफी, एआर रहमान, फटाका गुड्डी सिस्टर्स, मुनव्वर खान, राहत फते अली खान.

आवडला लेख,
गणतंत्र विशेषांक वाचायला आवडेल.
कुठल्याही धर्मतत्वाचे, संस्कृती परंपरांचे सरसकटीकरण होऊन रेजिमेन्टेशन/ संघटनेद्वारे उर्वरित समाजात प्रसार करायच्या नीतीमूल्यांच्या काचणार्‍या चौकटी तयार झाल्या की हळूहळू व्यक्तीच्या आचरणात मानसिकतेत किती वैचारिक पराधीनता येऊ शकते त्याची एक छोटीशी झलक अस्वस्थ करणारी आहे. बागवान त्यातून बाहेर पडले (नाहीतर हा लेख लिहू शकले नसते) पण असे वैचारिकदृष्ट्या स्वतःची डोकी बाजूला ठेवून समाजातील इतरांनीही तसंच केलं पाहिजे असा अट्टाहास असणारे अनेको असतात... सध्या तर अशांची संख्या, त्यांची कट्टरता आणि त्याचं सोशल मीडियावरचं विखारी म्हणावं इतक्या टोकाचं प्रकटन वाढतच चाललं आहे. जाती/धर्म/देश ही लेबलं वेगवेगळी... आतली प्रवृत्ती एकच. कुणाची कमी कुणाची अधिक.
बागवानांसारखे इतरही वेळेवर जागे होऊदेत एवढीच इच्छा!

वरदा परफेक्ट! लेख वाचल्यावर मलाही साधारण असेच लिहायचे होते, पण शब्दांत पकडता येत नव्हते.

जे लोक तेथे पोहोचलेले आहेत ते त्यातून बाहेर पडणे फार अवघड आहे. पण जे त्या मार्गावर निघाले आहेत त्यांना अजूनही संधी आहे असल्या अनैसर्गिक बंधनांत स्वतःला न अडकवून घेण्याची.

लेख तसा लहानच आहे. पण योग्य वेळेवर आलेला आहे. बाय द वे यात 'रफी' केवळ योगायोगाने आलेले नाव आहे. हा रफीबद्दल आहे असे लोकांना का वाटले? Happy