स्वीट सिक्स्टीन - लिजंड ऑफ लिजंड्स

Submitted by फेरफटका on 14 March, 2017 - 17:42

चांगल्या किंवा खूप चांगल्या खेळाडूंच्या करियर मधे एखादा क्षण, एखादी मॅच, एखादा गेम असा येतो की तिथून पुढे ते 'लिजंड' होतात. १९९६ साली, अहमदाबाद ला द. अफ्रिकेविरुद्ध टेस्ट मॅच मधे पदार्पण केलेल्या वांगिपुरुप्पू वेंकट साई लक्ष्मण ने सुरूवातीची ४-५ वर्षं अशी काही दखलपात्र कामगिरी केली नव्हती. नाही म्हणायला 'द डेझर्ट स्टॉर्म' (https://www.youtube.com/watch?v=07BMrivOzUE) च्या वेळी सचिन ला वेळो वेळी शाबासकी देण्याचं आणी त्याला रन-आऊट न करण्याचं एक महत्वाचं काम त्याने केलं होतं. त्यानंतर सिडनी च्या टेस्ट मॅच मधे ग्लेन मॅकग्रा चा बॉल हेल्मेट वर आदळल्यावर, एखाद्या कलाकाराच्या नजाकतीनं आणी सर्जन च्या स्किल नं (आई-वडील दोघही डॉक्टर असल्याचा फायदा) मॅकग्रा, फ्लेमिंग, ली आणी वॉर्न अशा बॉलिंग अ‍ॅटॅक समोर ८४.३४ च्या स्ट्राईक रेट ने १६७ धावा काढल्या होत्या (२७ चौकार). ऑस्ट्रेलियावर पुढे येणार्या संक्रांतीची ही नांदी होती.

१९९५ साली लॉर्ड्स वर दादा गांगुली बरोबर पदार्पण केलेल्या, आणी पदार्पणातच ५ धावांनी शतक हुकलेल्या, शांत, समजूतदार, सुसंस्कृत क्रिकेटियर म्हणून लौकिकाला येत असलेल्या राहूल शरद द्रविड ने तोपर्यंत टेस्ट क्रिकेट मधे एक भरवशाचा खेळाडू म्हणून जम बसवला होता. जोहान्सबर्ग मधले १४८, न्युझिलंड मधल्या एकाच टेस्ट मधल्या दोन डावातली दोन शतकं, झिंबाब्वे, श्रीलंका, वेस्ट-ईंडिज दौर्यातली उल्लेखनीय कामगिरी आणी एक द्विशतक त्याच्या नावावर ऑलरेडी होतं. १९९९ साली ईंग्लंड ला झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा काढलेला फलंदाज हा एक वन-डे मधला सुद्ध रेकॉर्ड त्याच्या नावावर होता (८ सामने, ६५.८५ सरासरीने ४६१ धावा, ८५.५२ चा स्ट्राईक रेट, २ शतकं आणी ३ अर्धशतकं - सेहवाग ने सुद्धा शाबासकी दिली असती).

पण ह्या दोन्ही बाळांचे पाय पाळण्यात दिसत असले तरी अजून 'वंदावी पाऊले' म्हणण्यासारखी, थोडक्यात 'लिजंड' म्हणवण्यासारखी कारकीर्दीला वळण देणारी घटना घडत नव्हती. २००१ चा ऑस्ट्रेलिया दौरा आला आणी सर्व पात्रांची सिद्धता झाली. नुकताच भारतीय संघ फिक्सिंगच्या 'काल'खंडातून बाहेर येत होता. सौरव गांगुली च्या नेतृत्वाखाली नवी मोट बांधली जात होती. जुन्यातला सचिन, कुंबळे आणी श्रीनाथ तेव्हढे ह्यातून तावून-सुलाखून बाहेर पडले होते. बाकी टीम नवीनच होती. थोडक्यात म्हणजे स्टीव्ह वॉ ला त्याचं 'फायनल फ्रंटियर' जिंकण्यासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती होती. त्यातच अनिल कुंबळे ईंज्युरी मुळे खेळू शकणार नसल्याचं कळलं आणी दुष्काळात तेरावा म्हणतात तो ह्यालाच असं वाटून गेलं. सौरव गांगुली ने म्हणे हट्टाने २१ वर्षाच्या पोरसवद्या हरभजन सिंग ला जेमतेम ८ टेस्ट्स च्या अनुभवावर कुंबळे च्या जागी टीम मधे निवडायला लावलं. (बॉलर ला रिप्लेसमेंट म्हणून बॉलर च निवडल्याबद्दल - भले लेगस्पिनर च्या जागी ऑफ-स्पिनर- सचिन सद्गदित झाला म्हणे. नोएल डेव्हिड च्या जखमा अजून ताज्या होत्या). सलग १५ सामने जिंकून भारतात आलेला ऑसी संघ अक्षरशः अभेद्य वाटत होता. मुंबई ला झालेल्या पहिल्या टेस्ट मॅच मधे एका सचिन चा प्रतिकार वगळता भारतीय संघ सहज हारला.

पुढची मॅच कोलकता (तेव्हाचे कलकत्ता) च्या ईडन गार्डन मधे होती (नको मना त्या अभद्र आठवणी - १९९६ च्या वर्ल्ड कप ची सेमी-फायनल, नंतर भारत पाकिस्तान टेस्ट मधले शोएब चे ते दोन यॉर्कर्स). 'सालाबादप्रमाणे यंदाही' असं म्हणत ऑसीज ने पहिल्या डावात धावांचा रतीब घालायला सुरूवात केली. 'तुका म्हणे त्यातल्या त्यात' असं म्हणत हरभजन ने हॅट-ट्रीक (भारतातर्फे पहिली टेस्ट हॅट-ट्रीक) घेऊन ऑसीज च्या रन-मशिन ला ब्रेक लावला. तरिही ४४५ रन्स काही कमी नव्हते. आणी असं वाटेपर्यंत भारताचा पहिला डाव १७१ धावांत आटोपला सुद्धा. त्यातही लक्ष्मण ५९ आणी द्रविड २५. ऑस्ट्रेलियाने अपेक्षेप्रमाणे फॉलो-ऑन लादला आणी पहिल्यांदा भारतातर्फे थोडासा प्रतिकार दिसला. १६ ओव्हर्स मधे ५२ धावांची ओपनिंग झाली आणी सदगोपन रमेश आऊट झाला. पहिल्या इनिंग मधल्या ५९ धावांच्या बळावर आणी नागपूर मधे १६२ रन्स केल्यावर सुद्धा नंतर च्या तीन डावात ९, ३९ आणी २५ रन्स केल्याने आऊट ऑफ फॉर्म असलेल्या(?) द्रविड च्या जागी लक्ष्मण बॅटींग ला आला. (आऊट ऑफ फॉर्म चे ईतके कडक नियम आज असते, तर बर्याचशा रोहित शर्मांची आणी रविंद्र जडेजांची कारकीर्द कधीच संपली असती. - असो, हे जरा पर्सनल होतय). तिसर्या दिवस अखेर भारताची अवस्था बिकट होती (२५४/४; २० रन्स चा डेफिसीट, ईफेक्टीव्हली -२०/४). ऑसीज नी म्हणे शँपेन सुद्धा ऑर्डर करून ठेवली होती.

१४ मार्च २००१. मॅच चा चौथा दिवस उजाडला (हे लगान मधल्या 'और उस ऐतिहासिक दिन की सुबह हुई' टोन मधे वाचावे). लक्ष्मण १०९*, द्रविड ७*. पुढच्या ९० ओव्हर्स मॅकग्रा आणी कंपनी (ही कंपनी म्हणजे एक LLC. च होती, कारण ह्यात प्रमुख आणी बदली असे मिळून ८ बॉलर्स होते) आयुष्यभर विसरणार नाहीत. दोन्ही देशातले क्रिकेट रसिक आयुष्यभर विसरणार नाहीत आणी लक्ष्मण-द्रविड आयुष्यभर विसरणार नाहीत. कलकत्त्याच्या त्या उष्ण आणी दमट हवेत हे दोन वेडे, मानेवर आईस ट्यूब्स बांधून अक्षरशः ऑसी बॉलिंग ची अब्रू वेशीवर टांगत होते. ही कत्तल ईतकी अदाकारीनं आणी कलाकृतीनं नटलेली होती की एखादं शिल्प घडताना बघतोय असच वाटत होतं. ३७६ धावांची जबरदस्त अनपेक्षित भागीदारी!!! अनबिलीव्हेबल!!! त्या भागीदारीला रन-मशिन म्हणण्यापेक्षा रन-बंदिश म्हणावं ईतकी कलाकारी त्यात होती. त्यातले काही नजरेसमोरून आजही पुसट न झालेले क्षण म्हणजे शेन वॉर्न ने लेग स्टंप च्या बाहेर टाकलेल्या बॉल ला लक्ष्मण ने पुढे येत, एक्स्ट्रा कव्हर मधून इनसाईड आऊट चौकार मारला. तिथे उभा असलेला फिल्डर प्लॅटफॉर्म वर उभं राहून समोरून न थांबता जाणारी एखादी एक्स्प्रेस पहावी तसा बघत राहिला. मग वॉर्न आणी वॉ ने खलबत वगैरे करून तिथे आणखी एक फिल्डर ठेवला. पुन्हा तसाच लेग स्टंप च्या बराच बाहेर फ्लायटेड बॉल टाकला, पुन्हा लक्ष्मण तसाच बॅले करत क्रीझ मधून पुढे सरसावला आणी वॉर्न ची नजर अपेक्षेने ऑफ साईड ला वळेपर्यंत मनगटात बसवलेल्या स्टील च्या मसल्स च्या ताकदीवर, हैद्राबादी नवाबी नजाकतीत तो बॉल मिडविकेट बाऊंड्रीबाहेर तडकावला. वॉर्न हताशपणे कमरेवर हात ठेवून पिच च्या मधे येऊन उभा राहिला होता. दुसरी एक आठवण म्हणजे शतक पूर्ण झाल्यावर राहुल द्रविड सारख्या एरव्ही ईतका शांत असलेल्या खेळाडूने ड्रेसिंग रूम कडे पाहून आवेशाने बॅट हवेत वर करून मानवंदना स्विकारली होती. हे डिमोशन (३ र्या क्रमांकावरून ६ व्या क्रमांकावर) त्याला भलतच लागलं होतं. ह्या इनिंग नंतर त्याला कुणी त्याचा तिसरा क्रमांक बदलायला सांगितला नाही (अपवादात्मक परिस्थितीत तोच पाकिस्तान मधे ओपनिंग ला आला होता आणी तिथेही सेहवाग बरोबर ४००+ ची ओपनिंग दिली होती. वह कहानी फिर सही). आणी तिसरं असच नजरेसमोरून न हटणारं दृश्य म्हणजे दिवसभर बॅटींग करून ऑसीज ना हताश केलेल्या लक्ष्मण ने स्क्वेअर लेग बाऊंड्री कडे एक बॉल मारला. बाऊंड्री जाणार हे निश्चित होतं. पण बॉल चा जीव तोडून पाठलाग करणार्या रिकी पाँटींग ने शेवटच्या क्षणी डाईव्ह करत बॉल अडवायचा प्रयत्न केला आणी बाऊंड्री गेल्यावर वैतागून हात जमिनीवर आपटला. त्याही परिस्थितीत त्याची कमिटमेंट वाखाणण्यासारखी होती. म्हणूनच ऑस्ट्रेलिया चा संघ सहजा-सहजी हारत नाही आणी म्हणूनच त्यांना हारवताना प्रतिस्पर्धी संघाला सर्वोत्तम खेळ करावा लागतो.

चौथ्या दिवशीचा खेळ संपल्यावर द्रविड-लक्ष्मण ला सलाईन लावावे लागले होते. पाचव्या दिवशी २८१ धावा करून लक्ष्मण बाद झाला. त्यावेळचा भारताकडून तो सर्वोच्च स्कोअर होता. द्रविड १८० धावांवर बाद झाला. भारताने ६५७ धावांचा डोंगर रचला आणी ऑस्ट्रेलिया ला चौथ्या डावात २१२ धावांत गुंडाळून १७१ धावांनी सामना जिंकला. पुढचा चेन्नई चा सामना जिंकून भारताने सिरीज जिंकली.

आज त्या ऐतिहासिक भागीदारीला १६ वर्षं पूर्ण झाली. केवळ एक सामना फॉलो-ऑन मिळून, पिछाडीवरून जिंकला ईतकच ह्या सामन्याचं महत्व नव्हतं. भारताच्या 'दादा'गिरी ची ती खर्या अर्थानं सुरूवात होती. अ‍ॅशेस ची परंपरा नसलेली, पण तितक्याच चुरशीनं खेळल्या जाणार्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यांची ती सुरूवात होती. आजच्या विराट कोहली जनरेशन च्या 'अरे' ला 'का रे' करण्याची ती गंगोत्री होती. आक्रमकपणा हा फक्त शिवराळ भाषेतून, उद्दाम हावभावातून किंवा क्रिकेट बॉल ला रागाने तडकावूनच दाखवता न येता, अत्यंत सुसंस्कृत पणे, नजाकतीनं सुद्धा तितक्याच प्रभावीपणे दाखवता येतो हे द्रविड-लक्ष्मण जोडीनं सगळ्यांना दाखवून दिलं. 'फॅब-फोर' चा जन्म झाला होता आणी सचिन तेंडुलकर ह्या क्रिकेट च्या देवाबरोबर त्याच्याच टीम मधून खेळणार्या दोन लिजंड्स चा जन्म झाला होता.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मला वाटतं अखिल मायबोली क्रिकेट प्रेमींचे एक गटग व्हायला हवे.

आणि त्यात फक्त आणि फक्त खालील मॅचच्या चर्चा व्हाव्यात. इच्छुकांनी आपापले विषय निवडा.

Test matches
१. ही वरील मॅच.
२. मुलतानची टेस्ट मॅच
३. तेंडुलकरची कुठलिही टेस्ट इनिंग मग धावसंख्या ० ते मॅक्स कितीही. Proud
४. सचिन, दादा, द्रविड, लक्ष्मण - टेस्टमधील बॅटिंग, नजाकत आणि एक तुलनात्मक अभ्यास
५. कुंबळे, झहिर, हरभजन ष्टाईल अन योगदान

आय नो की हे सर्व १९९० नंतरचे आहेत. आणि ह्यात अझरचे / श्रीनाथचे नाव नाही. पण ते आउट ऑफ सिलॅबस क्वश्व्चन आहेत. मध्येच अचानक अझरच्या १९९ वर चर्चा होणार.

आँ? ? अरे असाम्या मुलतानची टेस्ट मॅच म्हणजे कोण? आख्खा चाप्टर सेहवागवर आहे. Proud ती मुलतानची मॅच भारतासाठी खरी गेमचेंजर आहे. अ‍ॅटॅकिंग बॅटिंगची सुरूवात. Happy

आप्पुन तैयार है. मेनलॅण्ड युएस मधे कोठेही, व भारतात जेव्हा असेन तेव्हा भारतात कोठेही यायची तयारी आहे.

चलो फिर ! होज्जाये.

चौघे तयार आहे. ( असाम्या अन मी एकाच गावात असतो, एक विकेंडला फचा वर्ग म्हणजे फेफ आणि फा येतील. निदान आपण तर भेऊच शकतो.

अगदी भेटता आलेच नाही तर आपण मभादि सारखा क्रिकेट अंक काढू. काही मॅचेस वाटून घ्यायच्या आणि आपापले पेपर इथे सादर करायचे. भाऊंना जुने पेपर म्हणजे , " विडिंज मधील सूर्य ( म्हणजे सनी गावस्कर ) " वगैरे देता येईल.

हे सर्व जेव्हा कराल तेव्हा ती चर्चा रेकॉर्ड करून युट्युब वर अपलोड करा म्हणजे आम्हाला पण त्याचा आनंद घेता येईल.☺

नाहीतर युट्युब वर लाईव्ह किंवा podcast म्हणून काहीतरी असते तसेही करता आले तर अजून उत्तम Wink

या काळातल्या आघाडीच्या जोडीबद्दल मराठी साहित्याची घसरण धर्तीवर एक संवाद झालाच पाहिजे. सदगोपन रमेश, आकाश चोप्रा, शिवसुंदर दास, वसीम जाफर यांनी अधून मधून मारलेली शतके व इतर वेळी भरवशाने बाद होणे वगैरे. वरच्या लेखात नोएल डेविडची आठवण काढून फेफंनी आरती प्रभूच्या जोडीला चंभा गोखल्यांना बसवले आहे तेव्हा त्यावर पण परिसंवाद झोडा.

या परिसंवादात खुद्द नोएल डेविडला पण बोलावता येइल. क्रिकइन्फोच्या बायोनुसार तो सध्या अमेरिकेतच असतो म्हणे

Happy जबरी आयडियाज आहेत सगळ्या. नोएल डेव्हिड ला बोलावलं तर तो नॉस्टॅल्जिक होईल बहुदा. मागे एकदा असच आऊट ऑफ ब्ल्यू त्याला वेस्ट ईंडिज ला बोलावलं होतं ह्याची आठवण होईल त्याला. त्यापेक्षा असामी आणी केदार च्या ओळखीनं लोकल बॉय सुशिल नाडकर्णी ला बोलावता येईल. Wink

मस्त लेख आणि प्रतिक्रिया.
काल हा लेख वाचून , मुद्दाम हायलाइट्स पाहिल्या.
एक सचिन फॅन म्हणून वाईट वाटत होतं, की दोन्ही इनिंग्स मधे १०-१० असा स्कोर ! पण शेवटच्या सेशन ला एकाच ओव्हर मधे दिग्गज फलंदाजांची त्याने जी पळापळ केली... जाम मजा आली.
हताश शेन वॉर्न , निष्प्रभ कॅस्प्रोविश आणि आता गिलख्रिस्टला पण आणावं का बॉलिंग ला असा विचार करत असल्यासारखा स्टीव्ह वॉ ! सगळ्यांना पुरुन उरलेले लक्ष्मण आणि द्रविड ! शांत, सज्जन द्रविड ने प्रेस बॉक्स कडे पहात कधी नव्हे ते अ‍ॅग्रेसिव्हली केलेले सेलिब्रेशन. हरभजनच्या ७+६ विकेट्स. काय काय लिहावं मॅच बद्दल !
त्या मॅच चं स्कोरकार्ड , कायम संग्रही ठेवावं असं :-
http://www.espncricinfo.com/ci/engine/current/match/63920.html

सोळा वर्ष झाली या मॅचला. तरी अजून आठवणीत अशी आहे जशी काल-परवाच होती. आपल्या जगजेत्या संघासह आलेला स्टीव्ह वॉ, पहिल्या टेस्टमध्ये भारताला पराभूत केल्यावर आणि दुसर्‍या टेस्टमध्ये तिसर्‍या दिवशी भारताची परिस्थीती पाहता ऑस्ट्रेलियन्सना स्वर्ग दोन बोटेच उरला होता. पण चौथ्या दिवशी आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय याची त्यांना कल्पना नव्हती. लक्ष्मण आणि द्रविडची ती भागीदारी आणि ऑसीजना हरवून ती टेस्ट जिंकल्यावर भारतीय संघातील खेळाडूंची बदललेली देहबोली बरेच काही सांगून गेली असेल वॉला की फायनल फ्रंटियर सोपे नाही. ते त्याला पुढच्या टेस्टमध्ये कळलेच म्हणा.

खुप सुंदर आठवणींना उजाळा दिल्याबद्दल फेरफटका तुमचे धन्यवाद!

अर्थातच मी ही मॅच पाहिली नाही.पण ज्या पदधतीने तुम्ही लिहल आहे.काटा आला अंगावर सरक्क्क्न्न्न..हुस्श.
त्या दोघांना मनातल्या मनात मानवंदना दिली लगेच.सहीच लिहलय Happy

(अपवादात्मक परिस्थितीत तोच पाकिस्तान मधे ओपनिंग ला आला होता आणी तिथेही सेहवाग बरोबर ४००+ ची ओपनिंग दिली होती. वह कहानी फिर सही). >>>> लवकर लिहा यावरही.

भन्नाट लिहिलय.... Happy
क्रिकेटमधिल फारसे समजत नसले तरी हे सर्व आवडले. Happy

या मॅच ची अजून एक आठवण म्हणजे चौथ्या डावात मोंगिया जखमी झाला व त्याच्याजागी द्रविड उभा राहिला कीपर म्हणून. इथेच गांगुली व राइट ला सुचले असावे पुढे वन डेज मधे त्यालाच कीपर करण्याचे Happy

या मॅच पासून द्रविड मॅचविनर झाला. नंतर वन डेज मधे कीपर म्हणून आला, आणि वन डेज मधेही मॅचविनर झाला. तो आधीही वाइट नव्हता, पण २००२ व पुढे त्याच्या बॅटिंग मधे खूप सहजता आली वन डेज मधेही. तो कीपर झाल्यामुळेही हा फायदा झाला असेल. आधी तो अत्यंत कलात्मक, परफेक्ट फटके मारून अनेकदा थेट फिल्डर कडे मारत असे व त्यामुळे जखडून पडत असे. नंतर वन डेज मधे तो सॉफ्ट हॅण्ड वापरून बॉल गॅप्स मधे टाकून खूप रन्स काढू लागला. त्याने कैफ, युवराज बरोबर खेळून 'काढून' दिलेल्या मॅचेस बर्‍याच आहेत २००३-२००६ मधे.

ह्या मॅच च्या आठवणींमध्ये द्रविड, लक्ष्मण, भज्जी, सचिन आणि गांगूली ह्यांनी एवढा मेमरी स्पेस घेतला आहे की ह्या मॅच च्या हायलाईट्स बघतांना राजू आणि मोंगिया ला बघून मलाच धक्का बसला. दास चांगला खेळत असतांना दुर्दैवानी हिट विकेट आऊट झाला.
कुंबळे आणि श्रीनाथ का नव्हते म्हणे ह्या मॅच मध्ये ?

वॉ ला ईंडियन मिडियाने सॉलिड वात आणला होता, सिरिज हारल्यानंतर तो म्हणाला 'आम्ही हरलो म्हणजे काही जगबुडी नाही आली' परत जाऊन काय करणार विचारले तर 'मी आता जाऊन फिशिंग करणार आहे म्हणाला'

सर्व प्रतिस्सदांसाठी धन्यवाद! ईतक्या लोकांना ही मॅच ईतकी आठवतेय, हेच ह्या मॅच चं यश आहे.

फा, द्रविड वन-डे मधे रेग्यूलरली विकेटकिपींग करायला लागला, ते मला वाटतं २००२ च्या नॅटवेस्ट सिरीज पासून. २-२.५ वर्षं त्याने विकेटकिपींग केली. त्याच्या वन-डे मधल्या बॅटींग मधे नक्कीच खूप फरक पडला त्यानंतर (१९९९ वर्ल्डकप चा अपवाद वगळता).

कैफ युवराज बरोबर काढून दिलेल्या मॅचेस म्हटलं की मला पटकन २००३ च्या वर्ल्डकप मधली न्यूझिलंड (कैफ) आणी पाकिस्तान (युवराज) ह्या दोन मॅचेस आठवतात. पण अशा बर्याच इनिंग्ज त्या काळातल्या आहेत.

मोंगिया ची कारकीर्द संपवणारा तो २००१ चा ऑस्ट्रेलिया दौरा होता. आधी मुंबई मधे केलेली नाटकं (४ बॉल्स राहिले असताना, नाईट वॉचमन म्हणून आलेला मोंगिआ बॉल लागला म्हणून पॅव्हेलियन मधे गेला होता आणी सचिन ला बॅटींग साठी यावं लागलं होतं), मग कलकत्त्यातली ईंज्युरी आणी मॅच फिक्सिंग चा क्लाऊड ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या असाव्या असा माझा अंदाज आहे.

कुंबळे आणि श्रीनाथ का नव्हते म्हणे ह्या मॅच मध्ये ? >> कुंबळे इंजर्ड होता त्या संपूर्ण सिरीजसाठी म्हणून तर भज्जीला आणलेले गंगूने.

द्रवीड ची मुलाखत भोगले किंवा फैसल शेख ने घेतलेली त्यात त्याने त्याच्या ODI batting मधल्या बदलाबद्दल सांगिताना किपिंङ बद्दल काहि सांगितले नव्हते. ९६-९८ मधे त्याच्या strike rotate न करू शकण्याच्या ability मूळे तो लिमिटेड क्रिकेट मधून (जवळजवळ) बाहेर गेला होता ते त्याने मनावर घेऊन बॅटींग मधे बदल केला असे काहीसे होते. ९९ च्या World Cup मधे सुरु वात झाली होती वेगळा द्रवीड असण्याची. गेला बाजार २००१ च्या ODI series मधे लक्ष्मण ने ऑसी विरुद्ध ९० किंवा शतक काढलेले आठवतेय का ? त्याच सिरीजमधे सेहवाग खेळला होता.

>>आणि वन डेज मधेही मॅचविनर झाला.

खरय.... तसा तो ९९च्या वर्ल्डकपमध्ये ही भारी खेळला होता पण तू म्हणतोस तसे नंतर युवराज वगैरे मंडळी आल्यानंतर त्याने मधल्या ओव्हर्स मध्ये लावून धरलेल्या/ओढून आणलेल्या मॅचेस धक्क्याला लागल्या!

गेला बाजार २००१ च्या ODI series मधे लक्ष्मण ने ऑसी विरुद्ध ९० किंवा शतक काढलेले आठवतेय का >> ही मॅच आठवते आहे त्याचं पहिलं शतक होतं बहुधा ते आणि मॅच भारत हरला होता.

Pages