स्वीट सिक्स्टीन - लिजंड ऑफ लिजंड्स

Submitted by फेरफटका on 14 March, 2017 - 17:42

चांगल्या किंवा खूप चांगल्या खेळाडूंच्या करियर मधे एखादा क्षण, एखादी मॅच, एखादा गेम असा येतो की तिथून पुढे ते 'लिजंड' होतात. १९९६ साली, अहमदाबाद ला द. अफ्रिकेविरुद्ध टेस्ट मॅच मधे पदार्पण केलेल्या वांगिपुरुप्पू वेंकट साई लक्ष्मण ने सुरूवातीची ४-५ वर्षं अशी काही दखलपात्र कामगिरी केली नव्हती. नाही म्हणायला 'द डेझर्ट स्टॉर्म' (https://www.youtube.com/watch?v=07BMrivOzUE) च्या वेळी सचिन ला वेळो वेळी शाबासकी देण्याचं आणी त्याला रन-आऊट न करण्याचं एक महत्वाचं काम त्याने केलं होतं. त्यानंतर सिडनी च्या टेस्ट मॅच मधे ग्लेन मॅकग्रा चा बॉल हेल्मेट वर आदळल्यावर, एखाद्या कलाकाराच्या नजाकतीनं आणी सर्जन च्या स्किल नं (आई-वडील दोघही डॉक्टर असल्याचा फायदा) मॅकग्रा, फ्लेमिंग, ली आणी वॉर्न अशा बॉलिंग अ‍ॅटॅक समोर ८४.३४ च्या स्ट्राईक रेट ने १६७ धावा काढल्या होत्या (२७ चौकार). ऑस्ट्रेलियावर पुढे येणार्या संक्रांतीची ही नांदी होती.

१९९५ साली लॉर्ड्स वर दादा गांगुली बरोबर पदार्पण केलेल्या, आणी पदार्पणातच ५ धावांनी शतक हुकलेल्या, शांत, समजूतदार, सुसंस्कृत क्रिकेटियर म्हणून लौकिकाला येत असलेल्या राहूल शरद द्रविड ने तोपर्यंत टेस्ट क्रिकेट मधे एक भरवशाचा खेळाडू म्हणून जम बसवला होता. जोहान्सबर्ग मधले १४८, न्युझिलंड मधल्या एकाच टेस्ट मधल्या दोन डावातली दोन शतकं, झिंबाब्वे, श्रीलंका, वेस्ट-ईंडिज दौर्यातली उल्लेखनीय कामगिरी आणी एक द्विशतक त्याच्या नावावर ऑलरेडी होतं. १९९९ साली ईंग्लंड ला झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा काढलेला फलंदाज हा एक वन-डे मधला सुद्ध रेकॉर्ड त्याच्या नावावर होता (८ सामने, ६५.८५ सरासरीने ४६१ धावा, ८५.५२ चा स्ट्राईक रेट, २ शतकं आणी ३ अर्धशतकं - सेहवाग ने सुद्धा शाबासकी दिली असती).

पण ह्या दोन्ही बाळांचे पाय पाळण्यात दिसत असले तरी अजून 'वंदावी पाऊले' म्हणण्यासारखी, थोडक्यात 'लिजंड' म्हणवण्यासारखी कारकीर्दीला वळण देणारी घटना घडत नव्हती. २००१ चा ऑस्ट्रेलिया दौरा आला आणी सर्व पात्रांची सिद्धता झाली. नुकताच भारतीय संघ फिक्सिंगच्या 'काल'खंडातून बाहेर येत होता. सौरव गांगुली च्या नेतृत्वाखाली नवी मोट बांधली जात होती. जुन्यातला सचिन, कुंबळे आणी श्रीनाथ तेव्हढे ह्यातून तावून-सुलाखून बाहेर पडले होते. बाकी टीम नवीनच होती. थोडक्यात म्हणजे स्टीव्ह वॉ ला त्याचं 'फायनल फ्रंटियर' जिंकण्यासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती होती. त्यातच अनिल कुंबळे ईंज्युरी मुळे खेळू शकणार नसल्याचं कळलं आणी दुष्काळात तेरावा म्हणतात तो ह्यालाच असं वाटून गेलं. सौरव गांगुली ने म्हणे हट्टाने २१ वर्षाच्या पोरसवद्या हरभजन सिंग ला जेमतेम ८ टेस्ट्स च्या अनुभवावर कुंबळे च्या जागी टीम मधे निवडायला लावलं. (बॉलर ला रिप्लेसमेंट म्हणून बॉलर च निवडल्याबद्दल - भले लेगस्पिनर च्या जागी ऑफ-स्पिनर- सचिन सद्गदित झाला म्हणे. नोएल डेव्हिड च्या जखमा अजून ताज्या होत्या). सलग १५ सामने जिंकून भारतात आलेला ऑसी संघ अक्षरशः अभेद्य वाटत होता. मुंबई ला झालेल्या पहिल्या टेस्ट मॅच मधे एका सचिन चा प्रतिकार वगळता भारतीय संघ सहज हारला.

पुढची मॅच कोलकता (तेव्हाचे कलकत्ता) च्या ईडन गार्डन मधे होती (नको मना त्या अभद्र आठवणी - १९९६ च्या वर्ल्ड कप ची सेमी-फायनल, नंतर भारत पाकिस्तान टेस्ट मधले शोएब चे ते दोन यॉर्कर्स). 'सालाबादप्रमाणे यंदाही' असं म्हणत ऑसीज ने पहिल्या डावात धावांचा रतीब घालायला सुरूवात केली. 'तुका म्हणे त्यातल्या त्यात' असं म्हणत हरभजन ने हॅट-ट्रीक (भारतातर्फे पहिली टेस्ट हॅट-ट्रीक) घेऊन ऑसीज च्या रन-मशिन ला ब्रेक लावला. तरिही ४४५ रन्स काही कमी नव्हते. आणी असं वाटेपर्यंत भारताचा पहिला डाव १७१ धावांत आटोपला सुद्धा. त्यातही लक्ष्मण ५९ आणी द्रविड २५. ऑस्ट्रेलियाने अपेक्षेप्रमाणे फॉलो-ऑन लादला आणी पहिल्यांदा भारतातर्फे थोडासा प्रतिकार दिसला. १६ ओव्हर्स मधे ५२ धावांची ओपनिंग झाली आणी सदगोपन रमेश आऊट झाला. पहिल्या इनिंग मधल्या ५९ धावांच्या बळावर आणी नागपूर मधे १६२ रन्स केल्यावर सुद्धा नंतर च्या तीन डावात ९, ३९ आणी २५ रन्स केल्याने आऊट ऑफ फॉर्म असलेल्या(?) द्रविड च्या जागी लक्ष्मण बॅटींग ला आला. (आऊट ऑफ फॉर्म चे ईतके कडक नियम आज असते, तर बर्याचशा रोहित शर्मांची आणी रविंद्र जडेजांची कारकीर्द कधीच संपली असती. - असो, हे जरा पर्सनल होतय). तिसर्या दिवस अखेर भारताची अवस्था बिकट होती (२५४/४; २० रन्स चा डेफिसीट, ईफेक्टीव्हली -२०/४). ऑसीज नी म्हणे शँपेन सुद्धा ऑर्डर करून ठेवली होती.

१४ मार्च २००१. मॅच चा चौथा दिवस उजाडला (हे लगान मधल्या 'और उस ऐतिहासिक दिन की सुबह हुई' टोन मधे वाचावे). लक्ष्मण १०९*, द्रविड ७*. पुढच्या ९० ओव्हर्स मॅकग्रा आणी कंपनी (ही कंपनी म्हणजे एक LLC. च होती, कारण ह्यात प्रमुख आणी बदली असे मिळून ८ बॉलर्स होते) आयुष्यभर विसरणार नाहीत. दोन्ही देशातले क्रिकेट रसिक आयुष्यभर विसरणार नाहीत आणी लक्ष्मण-द्रविड आयुष्यभर विसरणार नाहीत. कलकत्त्याच्या त्या उष्ण आणी दमट हवेत हे दोन वेडे, मानेवर आईस ट्यूब्स बांधून अक्षरशः ऑसी बॉलिंग ची अब्रू वेशीवर टांगत होते. ही कत्तल ईतकी अदाकारीनं आणी कलाकृतीनं नटलेली होती की एखादं शिल्प घडताना बघतोय असच वाटत होतं. ३७६ धावांची जबरदस्त अनपेक्षित भागीदारी!!! अनबिलीव्हेबल!!! त्या भागीदारीला रन-मशिन म्हणण्यापेक्षा रन-बंदिश म्हणावं ईतकी कलाकारी त्यात होती. त्यातले काही नजरेसमोरून आजही पुसट न झालेले क्षण म्हणजे शेन वॉर्न ने लेग स्टंप च्या बाहेर टाकलेल्या बॉल ला लक्ष्मण ने पुढे येत, एक्स्ट्रा कव्हर मधून इनसाईड आऊट चौकार मारला. तिथे उभा असलेला फिल्डर प्लॅटफॉर्म वर उभं राहून समोरून न थांबता जाणारी एखादी एक्स्प्रेस पहावी तसा बघत राहिला. मग वॉर्न आणी वॉ ने खलबत वगैरे करून तिथे आणखी एक फिल्डर ठेवला. पुन्हा तसाच लेग स्टंप च्या बराच बाहेर फ्लायटेड बॉल टाकला, पुन्हा लक्ष्मण तसाच बॅले करत क्रीझ मधून पुढे सरसावला आणी वॉर्न ची नजर अपेक्षेने ऑफ साईड ला वळेपर्यंत मनगटात बसवलेल्या स्टील च्या मसल्स च्या ताकदीवर, हैद्राबादी नवाबी नजाकतीत तो बॉल मिडविकेट बाऊंड्रीबाहेर तडकावला. वॉर्न हताशपणे कमरेवर हात ठेवून पिच च्या मधे येऊन उभा राहिला होता. दुसरी एक आठवण म्हणजे शतक पूर्ण झाल्यावर राहुल द्रविड सारख्या एरव्ही ईतका शांत असलेल्या खेळाडूने ड्रेसिंग रूम कडे पाहून आवेशाने बॅट हवेत वर करून मानवंदना स्विकारली होती. हे डिमोशन (३ र्या क्रमांकावरून ६ व्या क्रमांकावर) त्याला भलतच लागलं होतं. ह्या इनिंग नंतर त्याला कुणी त्याचा तिसरा क्रमांक बदलायला सांगितला नाही (अपवादात्मक परिस्थितीत तोच पाकिस्तान मधे ओपनिंग ला आला होता आणी तिथेही सेहवाग बरोबर ४००+ ची ओपनिंग दिली होती. वह कहानी फिर सही). आणी तिसरं असच नजरेसमोरून न हटणारं दृश्य म्हणजे दिवसभर बॅटींग करून ऑसीज ना हताश केलेल्या लक्ष्मण ने स्क्वेअर लेग बाऊंड्री कडे एक बॉल मारला. बाऊंड्री जाणार हे निश्चित होतं. पण बॉल चा जीव तोडून पाठलाग करणार्या रिकी पाँटींग ने शेवटच्या क्षणी डाईव्ह करत बॉल अडवायचा प्रयत्न केला आणी बाऊंड्री गेल्यावर वैतागून हात जमिनीवर आपटला. त्याही परिस्थितीत त्याची कमिटमेंट वाखाणण्यासारखी होती. म्हणूनच ऑस्ट्रेलिया चा संघ सहजा-सहजी हारत नाही आणी म्हणूनच त्यांना हारवताना प्रतिस्पर्धी संघाला सर्वोत्तम खेळ करावा लागतो.

चौथ्या दिवशीचा खेळ संपल्यावर द्रविड-लक्ष्मण ला सलाईन लावावे लागले होते. पाचव्या दिवशी २८१ धावा करून लक्ष्मण बाद झाला. त्यावेळचा भारताकडून तो सर्वोच्च स्कोअर होता. द्रविड १८० धावांवर बाद झाला. भारताने ६५७ धावांचा डोंगर रचला आणी ऑस्ट्रेलिया ला चौथ्या डावात २१२ धावांत गुंडाळून १७१ धावांनी सामना जिंकला. पुढचा चेन्नई चा सामना जिंकून भारताने सिरीज जिंकली.

आज त्या ऐतिहासिक भागीदारीला १६ वर्षं पूर्ण झाली. केवळ एक सामना फॉलो-ऑन मिळून, पिछाडीवरून जिंकला ईतकच ह्या सामन्याचं महत्व नव्हतं. भारताच्या 'दादा'गिरी ची ती खर्या अर्थानं सुरूवात होती. अ‍ॅशेस ची परंपरा नसलेली, पण तितक्याच चुरशीनं खेळल्या जाणार्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यांची ती सुरूवात होती. आजच्या विराट कोहली जनरेशन च्या 'अरे' ला 'का रे' करण्याची ती गंगोत्री होती. आक्रमकपणा हा फक्त शिवराळ भाषेतून, उद्दाम हावभावातून किंवा क्रिकेट बॉल ला रागाने तडकावूनच दाखवता न येता, अत्यंत सुसंस्कृत पणे, नजाकतीनं सुद्धा तितक्याच प्रभावीपणे दाखवता येतो हे द्रविड-लक्ष्मण जोडीनं सगळ्यांना दाखवून दिलं. 'फॅब-फोर' चा जन्म झाला होता आणी सचिन तेंडुलकर ह्या क्रिकेट च्या देवाबरोबर त्याच्याच टीम मधून खेळणार्या दोन लिजंड्स चा जन्म झाला होता.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त! मस्त! जबरी आठवण. १६ वर्षे झाली असे अजिबात वाटत नाही. २००३ च्या सचिनच्या त्या डावप्रमाणेच हे सुद्धा काल-परवाच झाल्यासारखे लक्षात आहे, आणि अनेकदा पुन्हा पाहिलेले आहे.

द्रविडचा तो आवेश बहुधा प्रेस कडे बघून होता. कारण प्रेस ने ऑसीज विरूद्ध चालत नाही टाइप लिहीले होते आधी.

फेफ - बहुधा १५ आधी जिंकले होते. मुंबईची १६ वी. २००८ मधे पुन्हा हीच अवस्था होती. सिडने च्या २००८ च्या गेम पर्यंत १६ सलग जिंकले होते. मग पर्थ ला हरले. पुन्हा भारताकडून.

http://beta1.esakal.com/krida-cricket/vvs-laxman-and-rahul-dravid-conque...

सकाळने पण आठवण काढली आहे त्या खेळीची...☺

पण फेफा तुमचा लेख सरस !!!!

एखाद्या स्पोर्ट मॅगझीन साठी लिहायचे मनावर घ्याच ..... Happy

त्यातले काही नजरेसमोरून आजही पुसट न झालेले क्षण >>> हो अजूनही आठवतात ते, माझ्याकडे त्या दौर्‍याची DVD आहे Happy वॉर्न ला लेगच्या बाहेर जात पिचच्या दोन्ही बाजूंना मारायची सुरूवात नि त्यावर वॉर्नची reaction ह्यावर त सचिन नि लक्ष्मण ने कॉपीराईट घेऊन ठेवला पाहिजे.

लक्ष्मण ने ऑसीजची पीसे काढायची सुरूवात त्या आधीच्या डाऊन अंडर दौर्‍याच्या शेवटच्या सिडनीमधल्या सामन्याने झाली. बहुधा मी ओपन करणार नाही असा स्टान्स घेऊन लक्ष्मण खेळला होता त्यात. १६७ होते बहुतेक. त्याची तुलना थेट सचिनच्या पर्थवाल्या शतकाशी केलेली चॅपेलने म्हणून आठवतेय.

धन्यवाद फा, अतरंगी, असामी. काही काही मॅचेस अगदी काल परवा बघितल्यासारख्या आठवणीत कोरल्या गेल्या आहेत.

फा, १५ बरोबर आहे. की-स्ट्रोक एरर होती. बदल़ केलाय.

फेफ भारी लिहीलंय ...
त्या मॅचला पाँटिंग आणि हेडन यांनीही बोलिंग केली.

अरे काय आठवण करून दिलीत राव. चौथा दिवस जसाच्या तसा आठवतो. बहुतेक स्लेटरने पण बॉलिंग केली होती त्या दिवशी! आणि शेवटच्या दिवशी सचिनने टाकलेल्या गुगल्या

मस्त लिहीलंय. आजचा दिवस बनवलात.

त्या सामन्याबद्दल सर्वात प्रकर्षाने काही आठवत असेल तर ते ऑसीजचे टोटल फ्रस्ट्रेशन ! बस्स यासाठी कुठलाही भारतीय क्रिकेटप्रेमी आपली अर्धी संपत्ती समोरच्याच्या नावावर करायला तयार होईल.
पाकिस्तान तो बस नाम का दुश्मन है, असली मजा तो ऑस्ट्रेलियाकी नांगी ठेचणे मे है Happy

मस्त लिहिले आहे. लक्ष्मण - द्रविड च्या त्या इनिंगवर कितीही वाचले, तरी प्रत्येकवेळी नवीनच वाटते. Happy

खर आहे..... त्या मॅचनंतर त्या दोघांच्या कर्तबगारीला लोकप्रियतेचे कोंदण लाभले..... म्हणजे त्या आधी त्यांचे फॅन नव्हते असे नव्हे पण या कामगिरीनंतर दोघांचे फॅन फॉलॉइंग बऱ्यापैकी वाढले!
मुख्य म्हणजे "सामना वाचवणारे शिलेदार" असा एक अकारण बसलेला शिक्का पुसला जाउन मॅचविनर्सच्या यादीत त्यांचे नाव घेतले जाउ लागले (अर्थात हे सगळे सर्वसामान्य क्रिडारसिकांच्या नजरेतुन.... खऱ्या चोखंदळ नजरांनी हे टॅलेंट खूप आधीच हेरले होते आणि त्यांना अश्या शिक्कामोर्तबाची फारशी काही गरज नव्हती)

बाकी २००४ च्या पाक दौऱ्याबद्दल लिहीच.... ती सिरीज खुप क्लोजली फॉलो केली होती!

"बाकी २००४ च्या पाक दौऱ्याबद्दल लिहीच" - प्रयत्न करीन नक्की. एक किडा बरेच दिवस डोक्यात वळवळतोय तो म्हणजे २००३ च्या अ‍ॅडलेड टेस्ट विषयी. ती एक अशीच डिफायनिंग मोमेंट होती.

"खऱ्या चोखंदळ नजरांनी हे टॅलेंट खूप आधीच हेरले होते" - मी लक्ष्मण विषयी (म्हणजे माझ्या लक्ष्मण प्रेमाविषयी) ईतक्या खात्रीनं नाही म्हणू शकत, पण द्रविड अगदी पहिल्या मॅच पासून - त्या लॉर्ड्स वरच्या डेब्यू पासूनच आवडायला लागला होता. तसा रहाणे त्याच्या ईंग्लंड मधल्या डेब्यू वन-डे पासूनच आवडला होता. छान स्टान्स, क्रिस्प शॉट्स आणी अप्रतिम टायमिंग.

>> पण द्रविड अगदी पहिल्या मॅच पासून - त्या लॉर्ड्स वरच्या डेब्यू पासूनच आवडायला लागला होता.

अगदी अगदी रे!
तेंव्हापासून आवडायला लागला तो अगदी अजूनपर्यंत आवडतोच आहे!

हा लेख वाचून काल पुन्हा हायलाइट्स पाहिले. मजा आली. आता तर अनेकदा त्या त्या वेळच्या कॉमेण्टरी वाल्यांच्या कॉमेण्ट्स ही आपोआप आठवतात, गाण्याच्या एका ओळीतून दुसरी ओळ आपोआप आठवावी तशा.

सचिन या मॅच मधे बॅटिंग मधे चालला नाही तरी तो संघात आहे हे आपण कसे विसरलो असे म्हणून नंतर ऑसीज नी स्वतःला झापले असेल. कोची, ढाका वगैरेच्या आठवणी विसरले. मॅच च्या शेवटच्या सेशन मधे सचिन कल्ला करून गेला Happy

बाय द वे "बापू" ने तो हेडन चा कॅच कसला पोपट सोडला होता!

"तेंव्हापासून आवडायला लागला तो अगदी अजूनपर्यंत आवडतोच आहे!" - स्वरूप आणी फेरफटका हे एकाच माणसाचे दोन आयडीज आहेत असं वाटेल लोकांना. Happy पण खरं आहे. माझा आयपीएल चा सपोर्ट 'द्रविड च्या' टीम ला असतो. मग ते आरसीबी असो, राजस्थान रॉयल्स असो किंवा दिल्ली डेअरडेव्हिल्स. एकदा त्याच्या टीम ला आयपीएल जिंकताना पहायचं आहे.

सुरेख लिहिलेय ! लक्षात राहिलेल्या काही मॅचेसपैकी एक . द्रविड आणि लक्ष्मण ही नाव घेताच हीच मॅच आठवते .कसले भारी खेळले होते दोघेही .

तुम्ही वापरलेला रनबंदिश शब्द आवडला . मॅच पाहतोय का असं क्षणभर वाटून गेलं . Happy

एकदा त्याच्या टीम ला आयपीएल जिंकताना पहायचं आहे.>>> डिट्टो ! आयपीएल फायनल मॅच सचिन व्हर्सेस राहूल टीम्स मध्ये व्हावी असं वाटत पण त्याच बरोबर अर्धा जीव सचिनच्या टीममध्ये आणि अर्धा राहुलच्या टीम मध्ये विभागला जाईल . लेट्स सी ! होप फॉर द बेस्ट Happy

"मॅच च्या शेवटच्या सेशन मधे सचिन कल्ला करून गेला" - त्याचा गूगली जेव्हा शेन वॉर्न ला कळला नाही, तेव्हा चॅपेल (?) ने this is one man you'd expect to pick the googly अशा अर्थाचं विधान केलं होतं.

मुख्य म्हणजे "सामना वाचवणारे शिलेदार" असा एक अकारण बसलेला शिक्का पुसला जाउन मॅचविनर्सच्या यादीत त्यांचे नाव घेतले जाउ लागले (अर्थात हे सगळे सर्वसामान्य क्रिडारसिकांच्या नजरेतुन.... खऱ्या चोखंदळ नजरांनी हे टॅलेंट खूप आधीच हेरले होते >> माला त्या आधी ह्या दोघांनी वाचवलेल्या मॅचेस आठवत नाहियेत. सिडनी मधली लक्ष्मण ची इनिंग हा त्याच्या कारकिर्दीचा turning point होता. मला आठवते त्याप्रमाणे तोवर 'कोणीही ओपन करू शकतो' ह्या फिलॉसॉफीमधे तो भरडला गेला होता. सचिन कप्तान असतानाच्या त्या डाऊन अंडर दौर्‍यात त्याने ओपन न करण्याबाबत फर्म स्टान्स घेतला. तरीही त्याला पुढच्या आफ्रिकेअच्या दौर्‍यात सलामीला ढकललेच होते पण त्या १६७ च्या जीवावर त्याने गांगूली शी मांडवली केली असे काहीसे वाचलेले.

द्रविड च्या प्रेमात पडायचा क्षण अ‍ॅलन डोनाल्डला मारलेला सिक्स होता Happy

"द्रविड च्या प्रेमात पडायचा क्षण अ‍ॅलन डोनाल्डला मारलेला सिक्स होता " - खुद्द डोनाल्ड ने एका इंटरव्ह्यू मधे तो हताश झाल्याचं म्हटलय. सचिन कडून त्याने ही अपेक्षा केली होती, पण द्रविड कडून अगदीच अनपेक्षित हल्ला होता.

द्रविड फार कमी वेळा असा खुन्नस देऊन खेळलेला बघितला आहे. I think this is one of the very few instances where his emotions got better of him. I wonder why he did not let it happen more, result was spectacular Happy

BTW फे फे मॅच चा reference न देताही कोणाला कळेल ह्याची खात्री होती Happy

"BTW फे फे मॅच चा reference न देताही कोणाला कळेल ह्याची खात्री होती" - Happy Happy काय करणार रे, ही न सुटणारीच व्यसनं!

वर फा ने एका ठिकाणी म्हटलय ना, 'एका गाण्याच्या ओळीतून, दुसरी ओळ आठवते' तसं होतं क्रिकेट वर बोलायला लागलं की.

खूप छान आठवण, धन्यवाद.
ऑस्ट्रेलिया ला हरवणे हे नेहमीच खूप आनंददायी वाटत आलेले आहे
त्यांची टीम निर्विवादपणे सातत्याने खूप उच्च दर्जा चा खेळ करत असते
आणि त्यांचा तो माज .....

त्यांचा माज जेव्हा केव्हा भारतीय खेळाडू उतरवतात आहाहा ........
सुख !!!

>>स्वरूप आणी फेरफटका हे एकाच माणसाचे दोन आयडीज आहेत असं वाटेल लोकांना. Happy

लोकांच सोड..... तुझ्या बऱ्याचश्या कॉमेंट्स वाचताना मलासुद्धा कधीकधी अस वाटून जातं! Wink
मिलना मंगता है एक दिन Happy

तेव्हा प्रेम पणिक्कर रीडिफ वर मॅच रिपोर्ट लिहीत असे. अत्यंत वाचनीय असत ते. या मॅच च्या तिसर्‍या दिवसअखेर सहज लिहीले होते की इथून भारत अजून पुढे खेळून ऑसीज ना २५० चा लीड देउ शकतो. एक शक्यता म्हणून.

"India are still 20 short, with the last recognised pair at the crease between the Aussies and the Indian tail. It is possible for India to wipe out that deficit, then put another 250 on the board, and really push the Aussies against the wall, in the fourth innings. It is also possible for me to walk on water, and then convert a jugful of that same water into sparkling champagne."

आणि ते खरेच झाले (खरे तर त्याहीपेक्षा मोठा लीड दिला). पण त्याची त्यावेळची वर्णने फार सुरेख असत. या लिन्क्स - त्याचे रिपोर्ट्स रिपोर्ट्स.
http://www.rediff.com/cricket/2001/mar/13india.htm
http://www.rediff.com/cricket/2001/mar/14india.htm
http://www.rediff.com/cricket/2001/mar/15india.htm

तो म्हणजे २००३ च्या अ‍ॅडलेड टेस्ट विषयी
>>>>>>
अरे वाट कसली बघताय मग... लिहा की..
मला तर हे दोन्ही सामने एकत्रच आठवतात.
आणि आठवतो तो द्रविडचा विनिंग शॉट आणि डोक्यावरची कॅप काढून घेतलेले चुंबन .. आपण ती मालिका ऑस्ट्रेलियावर ऑस्ट्रेलियात वाचवायची वेळ आणलेली. या दोन्ही मालिका त्यांच्या बेस्ट संघाशी झालेल्या आणि खेळपट्टी वगैरे नाही तर त्यांच्यापेक्षा सरस खेळ करत आपण त्यांच्यावर कुरघोडी केलेली हे विशेष आणि त्या देखील अश्या नाट्यमय टेस्ट !

>>प्रेम पणिक्कर

विस्मृतीत गेलेले हे नाव..... मी पण फार आवडीने वाचायचो त्याचे मॅच रिपोर्टस!

फा, प्रेम पनिक्कर चे रिपोर्ट्स रेडिफ वर वाचायचो. पाकिस्तान मधे द्रविड ने २०० केले तेव्हाचे त्याचे रिपोर्ट्स अक्षरशः जिवंत वाटले होते.

स्वरूप, "लोकांच सोड..... तुझ्या बऱ्याचश्या कॉमेंट्स वाचताना मलासुद्धा कधीकधी अस वाटून जातं! Wink
मिलना मंगता है एक दिन' - Happy

"अरे वाट कसली बघताय मग... लिहा की..' - लिहीणार. एक दिवस नक्की. मला तुझा लिहायचा उत्साह उसना दे एक दिवस. Happy

"त्यांचा माज जेव्हा केव्हा भारतीय खेळाडू उतरवतात आहाहा ." - खरय. मला तर हल्ली पाकिस्तान ला हरवण्याईतकच ईंग्लंड आणी ऑस्ट्रेलिया ला हरवण्यात आनंद मिळतो.

Pages