घे भरारी..मन म्हणाले...

Submitted by सत्यजित... on 11 March, 2017 - 20:31

घे भरारी..मन म्हणाले,पाखरु झालो...
सोडले घरटे..नभाचे लेकरु झालो!

जाहला अंधार तेंव्हा दाटली भीती...
वाटले की..वाट चुकले कोकरु झालो!

राजरस्त्याची तमा ना आडवाटेची...
मी तुझ्या कळपात घुसलो,मेंढरु झालो!

गाव सारा गाय का म्हणतो तुला कळले...
धन्य झाला जन्म की मी वासरु झालो!

बासरीचा सूर होणे मज कुठे जमले?
राधिकेच्या पैंजणांचे घुंगरु झालो!

हुंदके दाबून सारे स्वागता गेलो...
अन तुझ्याही हुंदक्यांशी रुबरु झालो!

घेतली हाती कलम बहुधा बरे झाले...
मी मुक्या संवेदनांची आबरु झालो!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान . Happy

Chan

बासरीचा सूर होणे मज कुठे जमले?
राधिकेच्या पैंजणांचे घुंगरु झालो!
हुंदके दाबून सारे स्वागता गेलो...
अन तुझ्याही हुंदक्यांशी रुबरु झालो!
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
क्लास...

Thanks Kally...

खूप धन्यवाद ॠषभजी!