पुस्तके मागच्या शतकातली - मर्मभेद - rmd

Submitted by rmd on 1 March, 2017 - 08:36

मर्म भेदणे म्हणजे एखाद्याच्या मर्मस्थानावर अचूक वार करून ते विदीर्ण करणे. अर्थात प्रत्येकाची मर्मस्थाने वेगळी असू शकतात. कोणाचे मर्म त्याची अत्यंत प्रिय व्यक्ती असू शकते, कोणाचे मर्म कुळाचे मोठेपण तर कोणाचे अजून काही. पण एखाद्याचा स्वतःबद्दलचा अभिमान हेच मर्मस्थान असेल तर? ते भेदल्यावर तो माणूस जिवंतपणीच मृत्यूयातना भोगेल. त्याचे मूल्य त्याच्या नजरेतही शून्य होईल. अशा माणसाला प्रत्यक्ष ठार करण्यापेक्षाही जास्त भयंकर काय असेल तर तो त्याचा मर्मभेद!

अशाच एका मर्मभेदाच्या प्रतिज्ञेपासून सुरू होणारी ही नवलकथा! हा मर्मभेद कोण, कोणाचा आणि का करतो हे या कथेच्या प्रवासात आपल्यापुढे हळुहळू अतिशय मनोरंजक पद्धतीने उलगडत जाते. या कथेच्या प्रमुख पात्रांव्यतिरिक्त यात महत्त्वाची कामगिरी बजावतात ते विविध ऐयार! हे ऐयार म्हणजे वेषांतर, रूपांतर यात अतिशय कुशल आणि स्वभावाने चलाख असे हेर आहेत. त्यांच्या ऐयारी बटव्यात अनेक करामती वस्तू आहेत ज्यांच्या सहाय्याने ते अनेक अवघड गोष्टी सहजगत्या पार पाडतात. त्याचबरोबर संमोहन, नृत्यादि कला, शस्त्रविद्या इत्यादी गोष्टींतही ते पारंगत आहेत. आपल्या मालकाशी पूर्ण इमान राखून असणारे हे हेर आपल्या धन्यासाठी जीव द्यायलाही मागेपुढे पाहात नाहीत. ही कथा अशा अनेक ऐयारांभोवती फिरते.

ही कथा घडते 'सूर्यप्रस्थ' राज्याची राजधानी 'अलकावती' या नगरीत. या राज्याचा सम्राट चंद्रकेतू अतिशय शूर पण भोगविलासी राजा आहे. त्याच्या अनेक सरदारांपैकी एक सरदार 'कृष्णान्त' हा शूर आहेच पण त्याबरोबरच तो अतिशय कपटी आणि महत्त्वाकांक्षी सुद्धा आहे. हे राज्य बळकावण्याची त्याची इच्छा आहे परंतु जनतेची निष्ठा अजूनही सम्राटांच्या बाजूने असल्याने हा धूर्त सरदार अतिशय सावधानतेने आपली खेळी खेळतो आहे. जिथे असा कपटी सरदार आहे तिथेच सम्राटांचे आणि साम्राज्याचे हित पाहाणारे काही स्वामिभक्त सरदारही आहेत. त्यातलेच एक प्रमुख नाव आहे सरदार 'रूंडकेतू'! हा सरदार असेपर्यंत कृष्णान्ताला सिंहासनाकडे साधी नजर वळवणेही शक्य नाही. तेव्हा या कपटाचरणाला सुरूवात होते ती सरदार रुंडकेतू आणि त्याच्या ऐयारांचा काटा काढण्यापासून. त्यानंतर सम्राटांना नानाविध विलासांत अडकवून ठेवून कृष्णान्त राज्याचा एक एक कारभार राजाच्या वतीने सांभाळायला लागतो. इतकेच काय, राजवैद्यांना भय घालून तो राजाला रूग्णाईत बनवतो. काही काळातच सम्राटांचे निधन होते. पण त्याच्या मार्गात अजून एक अडथळा असतो - राजपुत्राचा. राजपुत्राला काही झाले तर जनतेचा क्षोभ होणे ठरलेलेच! तेव्हा त्याबाबतीत कृष्णान्त एक वेगळीच चाल खेळतो. वयाने लहान असलेल्या राजपुत्रास धाकात ठेवून, त्याला युद्धकला इत्यादीपासून दूर ठेवून कृष्णान्त त्याला मनाने दुर्बल आणि कर्तृत्वशून्य बनवत राहतो. यासाठी अजून काही वर्षं प्रतिक्षा करण्याचीही त्याची तयारी असते. यथावकाश बावळट व्यक्तिमत्त्व असणार्‍या राजपुत्राला जनतेसमोर आणून आणि त्याला कुचकामी सिद्ध करून स्वतः सिंहासनावर बसण्याचा त्याचा मनसुबा असतो आणि त्यात तो पुष्कळसा यशस्वी होतो सुद्धा. परंतु इथे कथानकाला वेगळीच कलाटणी मिळते.

मनाने खचलेल्या राजपुत्राची जनतेसमोर फजिती घडवून जनतेचा कौल आपल्या बाजूने खेचत असतानाच एक रहस्यमय, सर्वांगावर कवच धारण केलेला एक योद्धा कृष्णान्ताला आव्हान देतो आणि सर्वांसमोर त्याच्या मर्मभेदाची प्रतिज्ञा करतो. कृष्णान्ताचे कपटी रूप जाणून असलेले आणि साम्राज्याचे हितचिंतक असलेले अजून काहीजण असतात जे मनोमन या योद्ध्याची साथ देण्यास तयार होतात. महाराजांच्या मृत्युनंतर सुमारे पंधरा वर्षांनंतर अचानक प्रकट होणारा हा योद्धा कोण असतो? त्याला खरेच साम्राज्याची चिंता असते की तो ही एखादा स्वार्थी, सत्तालोलुप माणूस असतो? सरदार रूंडकेतू खरंच मृत्यु पावलेले असतात का? साम्राज्याचे इतर हितचिंतक कोण असतात आणि ते इतकी वर्षं काहीच न करता स्वस्थ का बसलेले असतात? या आव्हानानंतर नेमके काय घडते? कृष्णान्ताचा मर्मभेद होतो का? निर्बल राजपुत्राचा घात करण्यात कृष्णान्ताला यश मिळते का? कथेची नायिका कोण आहे आणि तिचा या सगळ्याशी काय संबंध आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या कादंबरीत होते.

शशी भागवतांची केवळ तीन पुस्तके प्रकाशित झाली - मर्मभेद, रत्नप्रतिमा आणि रक्तरेखा. त्यापुढचे पुस्तक लिहून पूर्ण होण्याआधीच या गुणी लेखकाचे अकाली निधन झाले. मर्मभेद ही भागवतांची पहिली कादंबरी. अवजड पण क्लिष्ट नसलेल्या सुंदर अलंकारिक भाषेत ही कादंबरी लिहीली आहे. या भाषेमुळे नाथमाधवांच्या वीरधवल सारख्या गाजलेल्या कादंबरीची हमखास आठवण होते. राजेरजवाडे, त्यांचे किल्ले/प्रासाद, कथेतील पात्रांमधे घडणारे प्रसंग हे सगळं इतक्या सुरेख शैलीत आणि बारक्यासारक्या तपशीलासहित लिहीले आहे की वाचताना एखादा चित्रपट पाहात असल्यासारखे सारे काही तंतोतंत डोळ्यांसमोर उभे राहते. तीच गोष्ट यातल्या प्रत्येक व्यक्तिची. प्रत्येक पात्राचे वर्णन इतके तपशीलवार केले आहे की ती व्यक्ती तिच्या रूपरंगासह, गुणदोषांसह जिवंत साकार होते. कथानक एका गतीने पण कुठेही कंटाळवाणे न होता अशी काही उत्कंठा वाढवत नेते की पुस्तक वाचायला सुरूवात केल्यावर ते पूर्ण करूनच खाली ठेवावे असे वाटावे.

अनेक रोमांचक घटनांची वळणे घेत, विविध ऐयारांच्या कसबाची मदत घेत कथानक संपन्न होते. ऐयारांच्या करामती तर केवळ वाखाणण्याजोग्या! या कथेत केवळ शूर लढवय्ये आणि ऐयारच नव्हे तर गूढ, अमानवी अस्तित्वेसुद्धा मोठ्या कौशल्याने गुंफली आहेत. इतकेच नव्हे तर यातले दुर्गही प्रमुख पात्रांसारखे समोर येतात. मूळ कथेसोबतच परचक्राचे, युद्धाचे, गूढ आणि प्रसंगी भयावह अशा अनेक उपकथानकांचे धागे या पटात उत्तमरित्या विणले आहेत. नवनवीन पात्रांचे कथानकात आगमन होताना आधीच्या पात्रांवरची, घटनांवरची आणि मुख्यत्वे वाचकावरची पकड अजिबात सुटू न देता कथा पुढे जात राहते हे लेखकाचे निर्विवाद यश आहे. वाचकाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारी पाच-सहाशे पानांची ही सफर अतिशय अद्भुतरम्य आहे हे निश्चित.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

rmd, छान लिहिलंयस Happy

लेखनाच्या आधी किंवा शेवटी पुस्तकाबद्द्लची माहीती बुलेट पॉईट्स मध्ये देता येईल का? (शक्य असेल तर खरेदीची लिंक?)

उदा -
पुस्तकाचे नाव- मर्मभेद
लेखक - ...
जॉनर - ...
इ.

सुंदर परिचय! मर्मभेद अनेक वर्षांपूर्वी वाचली होती. पुलंची प्रस्तावना आहे ती सध्याच्या आवृत्तीला ही आहे का? सहज उचलले होते लायब्ररीतून तेव्हा काहीच माहिती नसलेले हे पुस्तक. जरा अलंकारिक भाषा वाटली पण नेटाने वाचत राहिलो आणि पुढचे काही दिवस एका वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखे वाटत होते - असे लक्षात आहे.

त्या पुढच्या दोन्ही अजून वाचलेल्या नाहीत. त्याही इतक्याच चांगल्या असतील तर नक्कीच वाचायला हव्यात.

सर्वांना धन्यवाद.

योकु, ती माहिती रसग्रहणातच आल्यामुळे मी वेगळी दिली नाही खरंतर. आणि खरेदीची लिंक माझ्याकडेच नाही. आमच्याकडे हे पुस्तक माझ्या बहिणीने १९८० साली विकत आणलं. ते ओरिजिनल. त्यानंतर बराच काळ हे पुस्तक out of print होतं. त्याची नवीन आवृत्ती २ वर्षांपूर्वी पुन्हा मार्केटमधे आलेली मी एका पुस्तक प्रदर्शनात पाहिली. ऑनलाइन हे पुस्तक मिळतंय की नाही हे मलाही नेमकं ठाऊक नाही.

रसग्रहण आवडले. ऐयार, जादू वगैरे खुप लहानपणापासून आवडणारे विषय असल्याने नक्कीच वाचण्यात येईल Wink

ग्रेट, rmd!! हे पुस्तक खूप वर्षांपूर्वी वाचलं होतं आणि त्या वयात ह्या पुस्तकाने वेड लावलं होतं. खतर्नाक पुस्तक आहे. चांगल्या अर्थाने. पुस्तक परिचय छान लिहिलाय.

छान ओळख करून दिलीये. उल्लेख केलेली तिन्ही पुस्तके वाचलेली आहेत. या धाग्यामुळे परत वाचावी वाटतायेत. Happy लेखकाचे निधन झाल्याचे माहित नव्हते. वाईट वाटले.:(
एका पुस्तक प्रदर्शनात मी पण पाहिल्या नव्या कोऱ्या आवृत्या. त्या मिळवून वाचते आता.

मर्मभेद माझे सर्वात आवडते पुस्तक. १२-१४ वर्षापुर्वी खुप कष्टाने शोध घेऊन पुस्तक विकत घेतले होते.

डायरेक्ट १९९० मधे गेलोय मी. आमच्या शाळेत डांगे बाई भूगोल आणि हिंदी शिकवायच्या.. ज्या विद्यार्थ्यांना त्या शिकवायला होता त्या सगळ्यांना मर्मभेद ही कादंबरी तेव्हा पाठ होती.. तासाची शेवटची ५ मिनिटे त्या ह्या कादंबरीतल्या एका प्रकरणाने व्हायची.

मर्मभेद माझे सर्वात आवडते पुस्तक. १२-१४ वर्षापुर्वी खुप कष्टाने शोध घेऊन पुस्तक विकत घेतले होते. >>>> गिरी, तुझ्याकडुन ते पुस्तक मिळवायला मला सुद्धा तेवढेच कष्ट पडले होते. Proud
र्म्ड, छान लिहिलं आहेस. आठवणीतुन विसरलेली पुस्तकं होती ही, आता परत एकदा वाचायची प्रचंड इच्छा होते आहे.

टीनएज मधे वाचल, तेव्हा एकदम वॉव वाटलं होतं. जसं हल्लीच्या मुलांना हॅरी पॉटर वाचुन अद्भुत विश्वात हरवायला होतं, तसंच दोन दिवस हरवल्या हरवल्यासारखं झालं होतं. पण आता दुसर्यंदा मोठ्या वयात वाचलं तेव्हा 'ह्म्म चांगलं आहे हे पुस्तक' एवढ्च वाटलं. तेव्हाचं भारवलेपण लक्शात होतं त्यामुळे खुप काही तरी प्रचंड अपेक्षेने वाचलं, तसं परत नाही वाटलं. मोठ्या वयात वाचलं कि रहस्य कथेतली लुप होल्स लगेच दिसतात आणि निरागस वयातलं वॉव फिलिंग हरवुन जातं, तोच प्रकार.
मला वाटतं शशी भागवतांच्या त्या त्रयीमधलं 'रक्तरेखा' सगळ्यात चांगलं होतं. पण आता वाचुन अनेको वर्ष झाली, त्यामुळे नीटसं आठवत नाही. पण एक नक्की त्या पुस्तकाच्या आगेमागे ब्लडलाइनही वाचलं होतं आणि नावासकट दोन्ही पुस्तकांची स्टोरी एकच आहे हे तेव्हाच कळालं होतं. सिडनी शेल्डनच्या ब्लडलाइनचं १००% भारतीयकरण म्हणजे रक्तरेखा. सॅम रॉफचं बिझिनेस एम्पायर आणि रक्तरेखामधला भारतीय सम्राट. इकडे बिझिनेसन टायकुनची स्विस स्कुलमधे शिकणारी मुलगी आणि तिथे सम्राटाची राजकुमारी. इकडे बिझिनेसमनचा विश्वासु मॅनेजर आणि तिथे सम्राटांचा विश्वासु ऐयार........... परत नक्की वाचणार रक्तरेखा.
आता रक्तरेखा आणि रक्तप्रतिमा परत वाचायची चांगलीच इच्छा झाली आहे. कोणाला कुठे ऑनलाइन किंवा दुकानात दिसलं तर इथे एकमेकांना कळवुयात. Happy

छान लिहिलं आहेस.
सॅडली, मला वाचायची संधी मिळालेली नाही. कारण हेच- आऊट ऑफ प्रिन्ट! पण अथक प्रयत्न केल्यावर 'रक्तरेखा' मिळालं होतं. तेही मस्तच आहे. भरपूर विशेषणयुक्त प्रासादिक शब्द, वातावरणनिर्मिती, रहस्य आणि कोणत्याही क्षणी कसलीही कलाटणी मिळू शकेल अशी गोष्ट. मजा आली होती वाचायला.

मनिमाऊ, ब्लडलाईनबद्दल वाचून गंमत वाटली Happy शशी भागवतांची तिन्ही पुस्तकं मिळत आहेत बाजारात. पण मर्मभेदाला आजही प्रचंड मागणी आहे, त्यामुळे गेलं दुकानात आणि मिळालं असं माझ्याबाबतीत तरी झालं नाहीये. तू प्रयत्न करून बघ Happy
मलाही आता परत एकदा मर्मभेद मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

मस्त लिहीलं आहे.... वाचलं पाहिजे!
मनिमाऊंचा प्रतिसादही मस्त! रक्तरेखा हे ब्लडलाईनवर रेखले आहे? ब्लडलाईन फार आवडते पुस्तक! रक्तरेखा वाचलं नाहीये!