ब्रह्मपुत्रा : आसामी स्वातंत्र्ययुद्धाची स्फूर्तिगाथा

Submitted by झंप्या दामले on 21 February, 2017 - 10:28

स्वातंत्र्यदेवतेचा जयघोष ही अशी मात्रा आहे की जी चाटवल्यामुळे ग्लानी आलेला समाजात चैतन्य फुंकले जाते. स्वाभिमानी मन हे कायमच कुठलेही दास्य पत्करायला तयार होत नसते. ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले' हे सत्य जाणणारे अनेक पराक्रमी योद्धे या भारतभूमीवर होऊन गेले. परकीयांच्या ताटाखालचे मांजर होण्यापेक्षा स्वराज्याचा एल्गार करणारे शिवाजी महाराज आपले दैवत आहेत. अकबराचे दास्य पत्करणे मान्य नाही म्हणून हल्दीघाटीचा संग्राम मांडणारे राणा प्रताप आपल्याला स्फूर्ती देतात. परंतु यांच्याइतकाच एक पराक्रमी योद्धा आपल्या पूर्वांचलात होऊन गेला याची माहिती फार थोडक्या मंडळींना असते. आसामचे स्वातंत्र्य अक्षुण्ण राखण्यासाठी अभूतपूर्व पराक्रम गाजवणारा तो वीर म्हणजे ‘लचित बरफुकन'.

brahmaputracover.jpg

मध्ययुगीन भारतात मातृभूमीविषयी प्रेमाचा अभाव, दुफळी, फितूरी अशा अनेक कारणांनी आपली बरीचशी भूमी परकीयांच्या ताब्यात गेली. काही प्रांतातल्या राजांनी तर स्वतःची कातडी वाचावी म्हणून खुशाल आपल्या घरांतल्या स्त्रिया आक्रमकांना देऊ केल्या आणि मांडलिकत्व पत्करून ऐषोआरामात जीवन जगले. या सगळ्यातून सर्वात प्रबळ कुणी झाले असेल तर ते म्हणजे मुघल ! औरंगजेबाच्या काळात हिंदुस्थानच्या दोन-तृतीयांशपेक्षा जास्त भूभागावर त्यांचा कब्जा होता. अनेक राज्ये गिळंकृत केली होती. शिवाजी महाराजांनी त्याच्याशी उभा दावा मांडला असल्यामुळे औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकता आला नसला तरी त्याचे सावट महाराष्ट्रावर होतेच. या अशा शक्तिशाली कालखंडात मुघल पंजापासून बचावलेला एकमेव भाग होता तो पूर्वोत्तर राज्यांकडील आसाम व पलीकडचा प्रांत. आसाममध्ये राज्य होते अहोम घराण्याचे. भारतभर एवढ्या बादशाह्या फोफावलेल्या असूनही हा प्रांत अजूनही स्वातंत्र्याची चव चाखत होता. हळूहळू औरंगजेबाची वक्रदृष्टी तिकडे वळलीच. आसामला लागून असलेला बंगाल प्रांत मुघलांच्याच ताब्यात असल्याने स्वाभाविकच तिथून आसामच्या दिशेने आक्रमण झाले. मीर जुमला याने केलेल्या आक्रमणाने प्रथमच अहोमांच्या राज्याला सुरुंग लागला. मुघल आणि अहोम यांच्यामधल्या तुंबळ रणसंग्रामात गुवाहाटी मुघलांच्या हातात पडले. या घनघोर लढाईच्या वर्णनानेच या पुस्तकाची सुरुवात होते. अहोमांची राजधानी गरगाव ही गुवाहाटीच्या पूर्वेला. ‘आपल्या अंगणात मुघल फौजा येऊन थांबल्या आहेत, त्यांनी राज्य गिळंकृत न करता तह केला असला तरी त्यांचा या भागावर पूर्ण वचक असणार आहे, एवढेच नाही तर त्यांच्याविरुद्ध काहीही हालचाली करणेही अशक्य आहे’ या विचारांनी राजा जयध्वजसिंह याच्यावर प्रचंड ताण आला. इतकी वर्षं अहोम राजवटीचा झेंडा डौलाने फडकत असलेल्या सर्वस्वी स्वतंत्र राज्यावर पारतंत्र्याचे गडद सावट पसरताना पाहून तो कणाकणाने झिजत गेला आणि त्यातच त्याचा अंत झाला. मृत्यूपूर्वी त्याने आपल्या चुलत भावाला सिंहासनारूढ होण्याची इच्छा वर्तवली. चुलतभाऊ चक्रध्वजसिंह राज्यपदी आरूढ झाला, तेव्हा तो मुघलांनी आपल्या पवित्र भूमीचा केलेला अपमान विसरला नव्हता. कामाख्या देवीचे मंदिर, पूर्वजांची समाधीस्थळे यांची नासधूस त्याच्या स्मरणात होती. आपले पूर्वज व पुण्यात्मे यांचे स्मरण करून त्याने एकच निर्धार केला - आपल्या भूमीवरचे दास्याचे सावट दूर करून मोकळा श्वास घेण्याचा आपल्या प्रजाजनांचा हक्क अबाधित ठेवण्याचा !

खरेतर तेव्हा त्याच्यासमोरचे संकट तीव्र झाले होते. पश्चिमेच्या इताखु लीच्या किल्यात तळ ठोकून त्यांच्या राज्यावर बारीक नजर ठेवण्याचे काम मुघल करत होते. अशा कठीण प्रसंगी सैन्याचे नेतृत्व एका युद्धनिपुण, धाडसी व सर्वात महत्वाचे म्हणजे अत्यंत निष्ठावंत व्यक्तीकडे असावे असे वाटल्याने चक्रध्वजसिंहाने राज्याचा प्रधान अतन बुरगोहेन यांच्या सल्ल्यावरून राजाच्या अंगरक्षक दलाचा प्रमुख असणाऱ्या 'लचित'ला सैन्याचा 'बरफुकन' (सेनापती) बनवले. या पुढचा इतिहास अतिशय रोमहर्षक आहे. मुघलांचा डोळा चुकवून दूर रानावनात बोटी बांधणे, निरनिराळ्या जातीजमातींना स्वराज्यासाठी लढण्यास संघटित करणे, मुघलांच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकण्यासाठीच्या कठीण योजना आखणे अशा अनेक अंगांनी राजा चक्रध्वजसिंह, प्रधान अतन आणि सेनापती लचित यांनी सर्वांच्या मनात स्वराज्याची ठिणगी जिवंत ठेवली आणि योग्य वेळ येताच तुटून पडले, गनिमी काव्याचा वापर केला, काही भाग ताब्यात घ्यायला सुरुवात केली. परंतु मुघल म्हणजे एका मदमस्त गजराजासारखे शक्तिमान ! अनेक शूर सरदार, लाखांच्या संख्येने खडी फौज, अद्ययावत व मोठी जहाजं व त्यावर नौकानिपुण डच कप्तान आणि विरुद्ध बाजूला छोट्या नावा, कमी सैन्य आणि प्रचंड आजारी पडलेला सेनापती लचित बरफुकन.

एका बाजूला धर्मांध, युद्धपिपासू राजवट तर दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्यगीत ओठी असणारे दृढनिश्चयी नेतृत्व ! प्रसंग बाका होता पण स्वाभिमान जागा होता… सामना अतिशय असमान होता… तरीही कसे घडले हे नवल ? आपल्या प्रचंड वजनाखाली देशातल्या अनेक राजवटी, अनेक संस्कृती, अनेक संस्कार चिरडत निघालेला गाडा आसामपाशी येऊन कसा काय रुतला ? हिंदुस्थान पालथा घालणाऱ्या आलमगीराच्या सैन्याला कधीही आसामवर का विजय मिळवता आला नाही ? हे सगळे जाणून घ्यायचे असेल तर वाचायलाच हवे अनीश गोखले लिखित पुस्तक 'ब्रह्मपुत्रा'.

'ब्रह्मपुत्रा' पुस्तकाचे स्वरूप कादंबरी सारखे आहे. अनेक ऐतिहासिक घटना लेखकाने आपल्या कल्पनेने संवाद व प्रसंग यांची भर करून अधिक फुलवल्या असल्याने ते रंजक आणि प्रवाही झाले आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला असणारे पोशाख, वातावरण, हालचाली, हावभाव, परिसर यांच्यासंबंधीचे तपशील इतके बारकाईने - जणू एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखे - दिले आहेत की आपण अलगदपणे त्या ठिकाणी जाऊन पोचतो. ही या कादंबरीची जमेची बाजू म्हणायला हवी आसाम अथवा पूर्वांचलातल्या लोकांशिवाय इतरांचे या तेजस्वी इतिहासाशी जोडले जाणे सोपे व्हावे यासाठी लेखकाने शीर्षकापासूनच लचित बरफुकनच्या शिवरायांच्या समकालीन असण्याचे अनेक संदर्भ दिले आहेत. उदा. शाहिस्तेखान, दिलेरखान हे दोघेही लचितच्या कथेतही ठळकपणे उपस्थित असल्याने अनुक्रमे लालमहालातली आणि पुरंदरची अशा दोन्ही लढायांवरचे एक-एक प्रकरण या पुस्तकात समाविष्ट आहे.

औरंगजेबाचा सरदार रामसिंह दुसऱ्या टप्प्यात आसामवर हल्ला करून आख्खा प्रांत ताब्यात घेण्यासाठी होता. त्यामुळे तो या पुस्तकातला खलनायक आहे असे म्हणायला हरकत नाही. हा रामसिंह म्हणजे मिर्झाराजे जयसिंहाचा मुलगा. त्याने वडिलांच्या शब्दाखातर शिवरायांना संपूर्ण आग्रा वास्तव्यात सावलीसारखी साथ केली होती. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचे प्रकरणही या पुस्तकात रामसिंहाचा दुवा स्पष्ट करण्यासाठी समाविष्ट केले आहे. या तिन्ही प्रकरणांमुळे मराठी माणूस नक्कीच अधिक मनापासून या पुस्तकाशी जोडला जाऊ शकतो.

पुस्तकाच्या शेवटी येणारे ‘ताई अहोम’ संस्कृती व त्यांचा ध्वज याबद्दलचे परिशिष्ट माहितीपूर्ण. तसेच 'रामसिंहाला शिवरायांच्या स्वराज्याविषयी आस्था होती' हा दावा खोडून काढणारे परिशिष्टही महत्वाचे. आता थोडे तांत्रिक बाबींविषयी. कादंबरीतला मजकूर व मुखपृष्ठ यांची छपाई उत्तम. परंतु आतमधले अनेक फोटो अतिशय अस्पष्ट आहेत. तसेच आसामी संस्कृती, अहोम चालीरीती याबद्दल सैन्यातले हुद्दे, वस्त्र-शस्त्र, अपरिचित संकल्पना यांबद्दलचे स्थानिक भाषेतील अनेक शब्द पुस्तकात जसेच्या तसे दिले आहेत. यामुळे काही गोष्टींचे नीटसे आकलन होत नाही. काही शब्दार्थांची सूची पुस्तकात समाविष्ट आहे ती अपुरी आहे. शिवाय ती पुस्तकाच्या शेवटी असल्याचे सुरुवातीला कुठेही नमूद केलेले नाही, त्यामुळे त्यामुळे ती न वाचताच आपले वाचन सुरू राहते. ती सूची सुरुवातीला असायला हवी. हीच गोष्ट नकाशांबाबत. दुर्दैवाने पूर्वांचलाचे तपशील अन्य भारतीयांना खूप कमी माहित असतात. त्यामुळे कादंबरीत उल्लेख झालेल्या सर्व ठिकाणांचे तपशीलवार, विस्तृत नकाशे पुस्तकात असणे अत्यावश्यक आहे. पुस्तकात नकाशे आहेत ते त्रोटक आहेत, शिवाय ते पुस्तकाच्या शेवटी आहेत, तेही सुरुवातीला असल्यास वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला त्या भूप्रदेशाची पुरेशी कल्पना येईल आणि एकूण चित्र डोळ्यासमोर आणणे सोपे जाईल.

असो. या पुस्तकामुळे साध्य होणाऱ्या गोष्टी यातल्या त्रुटींपेक्षा अधिक महत्वाच्या आहेत. वाचकांचे कुतूहल जागे करून त्यांना त्या विषयाबद्दल अधिक माहिती मिळवायला उद्युक्त करण्याच्या दृष्टीने अशा कादंबऱ्यांचे खूप महत्व असते. वयाची तिशीही न गाठलेल्या युवकाने सर्वस्वी अपरिचित इतिहासाविषयी कुतूहल जागृत होऊन त्याचा अभ्यास करणे, त्या त्या ठिकाणांना भेट देणे, त्या प्रांतात जाऊन ऐतिहासिक नोंदी, तपशील यांचा अभ्यास करणे आणि परिश्रमपूर्वक अत्यंत वाचनीय असे पुस्तक लिहिणे हे कौतुकास्पद आहे. शिवाय देशाच्या दक्षिणेकडचा कुणीतरी उठून पूर्वोत्तर भागाबद्दलच्या स्फूर्तिदायी गोष्टी सर्वांना सांगायला पुढे येतो तेव्हा कळत न कळत दोन टोकांमधले धागे जुळत जात असतात, दोन धाग्यांमधले बंध अधिक मजबूत होत असतात.

(जाता जाता : आनंदाची गोष्ट ही आहे की हिंदीतील एका मोठ्या निर्मात्याने चित्रपट काढण्यासाठी या पुस्तकाचे हक्क विकत घेतले आहेत)

अनीश गोखले यांच्याबद्दल थोडेसे :

  • Sahyadris to Hindukush हे मराठ्यांच्या घोडदौडीचा इतिहास सांगणारे पुस्तक यापूर्वी प्रकाशित झाले आहे.
  • DNA या वृत्तपत्रात रविवार आवृत्तीमध्ये नियमितपणे इतिहासविषयक लिखाण करतात. ते या ठिकाणी वाचता येईल : http://46.137.241.247/authors/aneesh-gokhale
  • तसेच त्यांचा स्वतःचा ब्लॉग येथे वाचता येईल : https://aneeshbooks.wordpress.com
  • इतिहासातील विविध विषयांवर त्यांनी व्याख्यानेही दिलेली आहेत
  • त्यांचा ई-मेल पत्ता : aneeshg153@gmail.com.

Brahmaputra – The story of Lachit Barphukan - Asssamese contemporary of Chhatrapati Shivaji

लेखक : अनीश गोखले
आवृत्ती पहिली
पृष्ठे : २०३
किंमत : २५०

(पूर्वप्रसिद्धी : http://www.mumbaitarunbharat.in/)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच परिचय..
सात बहिणींबद्दल खुप कुतुहल आहे..हे पुस्तक त्यातही तिकडल्या इतिहासावर आहे म्हटल्यावर सोने पे सुहागा...
नक्की मिळवून वाचणार.. Happy