पद्मा आजींच्या गोष्टी १३ : फॅरेक्स चा तोटा पण मुलांचा फायदा

Submitted by पद्मा आजी on 15 February, 2017 - 19:11

मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.

हि माझ्या आईची गोष्ट. फार जुनी. माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी जेव्हा तीन महिन्याची होती तेव्हाची गोष्ट.

माझ्या बहिणीला डॉक्टरांनी सांगितले कि मुलीला फॅरेक्स द्या. फॅरेक्स म्हणजे तुम्ही लोकं आजकाल ज्याला baby cereal म्हणता.

तेव्हा बाजारात फॅरॅक्स तसे नवीनच होते. मला वाटते कुठून तरी बाहेरच्या देशातून मागवायचे व्यापारी.

डॉक्टरांनी सांगितल्या वर आम्ही गेलो बाजारात. आम्हाला तर माहितीही नव्हते डब्बा कसा दिसतो. पहिल्यांदाच आणणार होतो. मी पण गेले आईबरोबर. पण विचारले तर काय फॅरेक्स उपलब्धच नव्हते बाजारात. दुकानदार म्हणाले shortage आहे. आम्ही बरेच फिरलो. शेवटी एका दुकानात मिळाले.

घरी आणल्यावर मारे कुतूहलाने डब्बा उघडला तर काय -- आतमध्ये जाळी लागलेली. कोणीतरी म्हणे जाळी पण खायची असतील पण आईने तो सल्ला धूडकावून लावला.

मग काय करावे? तेव्हा आई हसली व म्हणाली आपला घरगुती उपायच बरा. ती म्हणाली मला, "पद्मा जा लाव चूल."

मग तिने जे घरगुती फॅरेक्स तयार केले त्याची रेसिपी मी तुम्हाला आज सांगते. आजकाल आपल्या जुन्या गोष्टींची महती लोकांना परत पटते आहे म्हणून मी विचार केला कि जर हि रेसिपी कोण्याच्या कामी आली तर फायदा होईल.

तिने मला एक किलो तांदूळ घ्यायला लावले आणि ते भाजायला लावले. मग पाव किलो तुरीची डाळ दिली आणि तीही भाजायला लावली.
भाजल्या ने गोष्टी पचायला सोप्या पडतात. चव हि चांगली येते.

मग मी ते गरबरीत दळून आणले. गरबरीत म्हणजे रवाळ. खूप बारीक नाही.

तिने ते पीठ घेतले दोन मोठे चमचे. त्यात तिने कप भर पाणी टाकले. आणि मग शिजविले. थोडी जिऱ्याची पावडर आणि हिंग टाकले. जिरे आणि हिंगाने पचायला मदत होते. मीठ टाकले थोडे. नंतर शिजायला आल्यावर चार चमचे साजूक तूप मिसळले.

एकदम मस्त बनले होते. लहान मुली ने तर खाल्लेच पण आम्ही पण चव घेतली.
अगदी सोपे आणि मस्त. नंतर त्यात ती काही बाकीच्या पण गोष्टी टाके बारीक paste करून -- सफरचंद म्हणा नाहीतर रताळे म्हणा.

आमच्या आईला अशा अनेक गोष्टी आणि रेसिपी माहित होत्या. नेहमी शिकवीत असे आम्हाला. पण तिचे एक होते आम्हाला करायला लावायची. त्याच्या मुळेच अजूनही गोष्टी लक्षात आहेत. पण तेव्हा वाटायचे किती काम करावे लागतेय. Happy

दोन दिवसांनी मी तो बाजूला पडलेला फॅरेक्स चा डब्बा फेकला. त्यानंतर मीही कधी फॅरेक्स विकत आणले नाही.

गोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे तांदूळ्,थोडीशी नाचणी,मूगाची डाळ धूवून सावलीत वाळव्तात्,भाजतात आणि मिक्सर्मधून रवाळ दळतात.

खरंय. मी पण माझ्या मुलांना फक्त खाण्याची सुरुवात करताना एकच डबा आणला सेरेलॅकचा. नंतर घरीच खिमटाचं मिश्रण बनवुन ठेवायचे.
तांदुळ डाळी कोरड्या भाजुन मिक्सरवर बारीक रवाळ करुन डब्यात भरुन ठेवायचं. फक्त मी एकावेळी एक किलो वैगेरेचं न करता एक - दीड आठवडा पुरेल एवढंच करायचे. मग शिजवताना त्यात तुप, मीठ, जिरं, हळद आणि भाज्या घालायचे. सेरेलॅकपेक्षा नक्कीच पओष्टिक आणि चविष्ट.

मस्तं लिहिलंयत हो पद्मा आजी.
मी पण माझ्या मुलांना एकदाही फॅरेक्स /सेरेलॅक वगैरे नाही दिले.
अशी खिमटी अगोदर आणि नंतर सरळ जे आम्ही खातो तेच.
सुरुवातीला जरा मऊ करून आणि वर्षाची झाल्यावर आमचंच संपूर्ण जेवण.

मी पण माझ्या मुलांना एकदाही फॅरेक्स /सेरेलॅक वगैरे नाही दिले.
अशी खिमटी अगोदर आणि नंतर सरळ जे आम्ही खातो तेच. >>> + 1 . khimati best...
फक्त तुरीच्या ऐवजी मुग्डाळ वापरायचो अन ८-१० दि. चेच करत होतो..
लेख छान लिहिला.

मग शिजवताना त्यात तुप, मीठ, जिरं, हळद आणि भाज्या घालायचे.>>>माझा मुलगा 8 महिन्याचा आहे. त्याला अशी खिमटी देऊ शकते का?. अजुन काय काय देऊ सांंगाल ?

फॅरेक्स हे मला वाटते भारतात आलेले पहिले बेबी फुड. मी ६/७ वर्षांची असताना आमच्या शेजारच्या मावशी त्यांच्या मुलीला देत असत तेव्हा मी पाहिलेले. डब्यावर बाळाचा गोड फोटो आणी डब्याबरोबर सेरॅमिकचा बोल फ्री मिळत असे. आणि बाळं खरंच आनंदाने खात आणि गुटगुटीत होत. मग सेरेलॅकचे फॅड आले आणि फॅरेक्स गायब झाले. मी कधी दिले नाही मुलाला. वेळ भरपुर असल्याने खिमट, सुप, पल्प्स हेच प्रकार केले.

स्नेहनिल.. 8 महिन्याच्या बाळाला मऊ भात, बारिक रव्याचा उपमा, शिरा, कणकेची खिर, भाज्यांची वेगवेगळी सुपस्, वेगवेगळ्या रंगित फळांचे तुकडे, इडली, मऊसर घावन, थालीपीठ असे सगळे देऊ शकता... हे सहज सुचलेले आणि माझ्या लेकीला त्या वयात जेजे खुप आवडायचे असे आहे..

स्नेहनिल, हो बाळाला मऊ खिमट द्या. त्यात गाजर वैगेरे बारीक कापुन शिजवतानाच घाला. म्हणजे गाजरही मऊ शिजते आणि मॅश करता येते.

मी देखिल माझ्या मुलाला असेच खिमट (आमच्याकडे याला पेज असे म्हणायचे) करुन द्यायचे. ते शिजवताना त्यात एक-दोन मोठी कडिपत्त्याची पान पण टाकायची. खायला घालताना ती काढून टाकायची, त्याचा छान वास यायचा खिमटला.