कॉर्पोरेट कथा- मिटिंग

Submitted by मोहन की मीरा on 13 January, 2017 - 01:00

कोर्पोरेट कथा- मिटींग

तेच ते आणि ते वाचून खरेतर अनु ला कंटाळा आला होता. पण काय आहे कि ही सगळी अ‍ॅग्रीमेंट वाचून काढणे आवश्यक होते. आज हे काम करायलाच हवे होते. त्या सगळ्याचा रिपोर्ट तिला आज बनवायला हवा होता. उद्या क्लायेंटशी मीटिंग होती संध्याकाळी. त्या आधी रिपोर्ट बनवून बॉस कडे द्यायला पाहिजे म्हणजे मग तो काय ते मुद्दे बोलेल मीटिंग मध्ये... अनु च्या मनात विचार आला.
ती आळस झटकून कामाकडे वळली. सहा वाजून गेल्या मुळे कोणीच नव्हतं ऑफिस मध्ये. म्हणजे पहिला मजला रिकामा होता. पण खाली बेसमेंट मध्ये ( म्हणजे खड्ड्यात!!! सगळे गमतीने बेसमेंट ला खड्डा म्हणत.) अकौंटंट बसलेले असणार. नवी सिस्टीम आल्या पासून ते लोक हल्ली खूप वेळ खाली बसलेले असतात. अजून सगळा डेटा नीट झाला नव्हता.

आत्ता मस्त चहा मिळायला हवा.....

अनुने खाली कँटीन ला फोन लावला. “ विजयभाय एक चाय तो आपो ने...”

“अनु बेन .... अरे चाय तो पती गयो. माणस पण नथी बनावू माटे....उकाळो मोकलावू?”

“चालसे... पण गरम आपो हां...”

“हां मोकलावू....”

अनु ला गंमत वाटली.... पाच वर्षांपूर्वी धुळ्याहून मुंबई मध्ये आल्यावर कानावर सर्रास गुजराथी पडत होतं. परत तिच्या लॉयर च्या प्रोफेशन मध्ये अनेक गुजताथ्यांशी संपर्क येत होता. पहिले पहिले बिचकायला होत असे. पण नंतर ऐकून ऐकून सवय झाली. बोरीवलीला रहायला लागल्या पासून तर सततच ते कानावर पडत होते. मग हळू हळू बोलायला सुरुवात केली. आणि जमायला लागलं.....

परत तिने लॅपटॉप च्या स्क्रीन वर लक्ष केंद्रित केलं. तेवढ्यात राव समोर आला. अनुच्या कपाळावर आठी पडली.

“ हे काय... अजून इथेच.... अप्रयझल झालं आता... गेलीस तरी चालेल...”
राव ने खोचक रिमार्क दिला.

“ ते काय आहे... आम्हाला अप्रायझल ची चिंता नसते. ती तुमच्या सारखी माणसं करतात... आम्ही काम करतो... तेच आमचं अप्रायझल....”

राव मोठ्ठ्याने हसला... “ अरे अनु.... रागावलीस.... अरे तसं नाही... आज साडेसहा झाले तरी तू इथेच म्हणून म्हंटल... अगं उशीरा पर्यंत थांबून काम करायची सवय चांगली नाही... आपल्याला आणि बॉसेस ना सुध्धा!!! उगाच सवय लागते.”

“ राव साहेब साडेसहा म्हणजे उशीर समजत नाहीत मुंबई मध्ये.... आणि माझं नाव अनुपमा आहे”

“ हा हा हा ... अनुपमा....हो पण आपल्या ऑफिस मध्ये साडेसहा म्हणजे उशीर समजतात.... चल कॉफी पिऊन येवू.... नाहीतर समोर सी.सी.डी. मध्ये जाउया का..? आपल्याच लीजवर आहे... कन्सेशन देतो मला.... चल”

“ नको सर.... आत्ता हे संपवायचं आहे... आणि मी चहा सांगितला आहे खाली.... सी.सी.डी. मधली कान्सेशनल कॉफी पचायची नाही मला.... तुम्ही जा हवे तर.”

“ बरं बाई.... काम कर हां....” राव जायला वळला....

राव च्या बोलण्याने लिंक तुटली.... अनु ला हा राव अजिबात आवडत नसे....कायम दुसऱ्याच्या कामात लक्ष. सतत नाक खुपसणे.... अगदी कोणीही कुठेही जात असेल तर हा विचारणार “ कुठे चालला?” काय गरज आहे ह्याला?

परवा तर मीनू मॅडम ने सगळ्या समोर इज्जत काढली.
नेहेमी प्रमाणे मिनू मॅडम wash रुम कडे निघाली तर हा तिला म्हणतो “ कुठे चाललीस”. सगळे ऐकत होते आता मीनू मॅडम काय उत्तर देते.
ती डिपार्ट्मेंट मध्ये सगळ्यात सिनियर आणि वरच्या पोस्ट ला....
मीनू मॅडम पण फटकन उत्तरली “ टॉयलेट मधे जाते आहे.... येतोस?”
सगळे स्फोट व्हावा तसे हसले. सगळ्या बायका खुश झाल्या.... मनापासून हसल्या. राव तरीही निर्लज्जा सारखा हसत राहिला... काही लाजच नाही...

प्रसंग आठवून अनुच्या चेहेऱ्यावर हसू उमटले.... तिने परत लक्ष स्क्रीन कडे दिले.... तेवढ्यात विजय भाई स्वत: उकाळा घेवून आले....

“ अरे विजय भाई तमे....”

“ तो सु करू.... कोण पण नथी कॅन्टीन मा.... मनेच आऊ पडसे ना.... वांदा नथी. तमे काम करो...”

अनु ने उकाळ्याचा घोट घेतला.... बरं वाटलं.... पहिले पहिले हा उकाळा काय प्रकार आहे ते काळतच नव्हत तिला. मग समजल की चहा घालायच्या आधी दुध,पाणी, साखर, वेलची ह्याच जे मिश्रण चहावाले तयार ठेवतात त्याला उकाळा म्हणतात.... पहिले पांचट वाटलं.... मग सवय झाली...

नाही म्हणता म्हणता मुंबई मध्ये पाच वर्ष झाली. धुळ्यामध्ये असताना वकील ह्या नावा भवती खूप वलय होत.... पण नुसतं वकील बनून काय होणार? तिकडे छोट्या शहरात काय वकिली करणार? म्हणून मग मास्टर्स करायचं ठरवलं. पुण जवळच वाटलं. वडिलांना पटवून चक्क सिम्बोयसीस मध्ये प्रवेश घेतला.... खरेतर वडिलांनी प्रथम विरोधच केला. ते बागायतदार, परत घराचं हार्डवेअर च दुकान. शेती... भाऊ पण शेतकीची पदवी घेवून घरचाच पसारा पहात होता. हिच अभ्यासाचं खूळ (?) त्यांना पटत नव्हत. पण आई मागे उभी राहिली...

हॉस्टेल च्या दिवसात खूप मैत्रिणी मिळाल्या... हळू हळू “गाव्वाली” हे बिरूद मागे पडलं.... नोकरी मात्र मुंबईत मिळाली. पहिले एक छोटीशी कंपनी होती.. पण नंतर मात्र ही मोठ्ठी कोर्पोरेट कंपनी मिळाली. इकडचं कल्चर ही चांगल होत. अनु ला इकडे एक वर्ष झाल होत.... सध्या तिच्याकडे लीजिंग चे वर्क दिलेले होते. खूप काम असायचं... पण मजा यायची. बॉस एकदम फोकस होता. त्यामुळे कामाशी काम. अनुला मजा यायची. नवं शिकायला मिळत होत. ग्रोथ चांगली होती.

फक्त मुंबईत एकट्याने रहाताना जरा कसरत होत होती. तिने दोन मुलींबरोबर शेअरिंग मध्ये घर भाड्याने घेतलं होत. त्यातली एक तिच्याच ऑफिस मध्ये फायनान्स मध्ये होती. तर दुसरी एअर होस्टेस होती. ती तर सारखी बाहेरच असायची. तरी त्या दोघींशी पटत असल्याने त्या आघाडीवर शांती होती.

अरे!!! आठ वाजले... आता निघायलाच लागेल. अनुने पटकन आवरलं.... झालेला रिपोर्ट ची प्रिंट काढून ठेवली. आणि पळाली. गाडी पकडायला धावताना तिच्या मनात हाच विचार आला की तिचा रिपोर्ट बॉस ला पटू दे!! त्यात काही खेंगटी नकोत. बॉस बाकी ठीक असला तरी खूप चिकित्सक होता..... ठीक आहे होवून जाईल....

त्याचं विचारात ती बोरीवली ला आली. तिला लक्षात आले की घरी खायला काही नाहीये. जवळच्याच फरसाण हाउस मधून तिने तिच्या आवडीची “चाम्पाकली” घेतली. ह्या गुजराथ्यांच आश्चर्य वाटायचं तिला फरसाणाचं नाव “चाम्पाकली??”

तशीच ती घरात पोहोचली. आज तिची रुममेट सायलीची पाळी होती स्वयंपाकाची. लॅच उघडून घरात गेली तर घरातून मस्त फोडणीचा वास येत होता.
“ सायली काय केलयस आज.....? मस्त वास येतो आहे...”

“ कटाची आमटी आणि पुरणपोळी....”

“ हां....!!!.”

“ ए खानदेशी ..... अगं काही नाही ग.... साधी आमटीला फोडणी दिली. पण बरोबर भरली वांगी केली आहेत.”

“ वा...वा.... चल जेवूया...”

सायली ची वेळ आली की ती रोज नवे नवे पदार्थ करून बघत असे. तिचं लग्न ठरलं होत.... त्याची रंगीत तालीम ती अनुवर करत असे....अनु सुध्धा चवीने त्याचा आस्वाद घेत असे. तिच्या हाताला चव होती. अनुला मात्र स्वयंपाकाचा कंटाळा होता. तरीही ती सायलीच्या नादाने वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असे. तिसरी पार्टनर अमृता मात्र ह्या स्वयंपाकाच्या भानगडीत पडत नसे. ती एअर हॉस्टेस असल्याने तिच्या येण्या जाण्याच्या वेळा भलत्याच असत. त्यामुळे ती इकडे असली की सरळ एक डबा ऑर्डर करत असे. आर्थात सगळे पदार्थ एकत्र करून त्यांची अंगत पंगत होत असे.

तसे त्या तिघींचे मुंबई मधले जीवन सुरळीत चालू होते. थोडे थोडे प्रॉब्लेम्स प्रत्येकाला येतातच. पण वेगळे काही नव्हते. एकमेकांच्या भानगडीत जास्त नाक खुपसायचे नाही हे तत्व तिघींनी पाळले होते. दोन बेडरूम्स असल्याने जागेची कमी नव्हती. त्यातही सायली आणि अनु मास्टर बेडरूम शेअर करत होत्या. आणि अमृता छोट्या बेड रुम मध्ये झोपत असे. कधी कोणाचे पालक आले, तर adjustment करत असत. पण ती वेळ अगदी क्वचित यायची.

मस्तपैकी भरल्या वांग्यावर ताव मारून अनु जेंव्हा झोपायला गेली तेंव्हा १० वाजून गेले होते. सायली टीव्ही पहात होती. अनु मात्र पुस्तकं वाचत पडली होती. मधेच उद्याच्या मिटिंग चा विचार करता करता कधी झोप लागली ते कळलच नाही.

दुसरा दिवस उगवला तो गडबडीतच. सक्काळी सक्काळी पाण्याने दांडी मारली. सायली आणि अनु दोघी वैतागल्या. होत्या त्या पाण्यात डुबक्या मारून दोघी ऑफिस ला पळाल्या. एक चांगल होत की दोघींचे ऑफिस एकच होते. त्यामुळे एकत्र जाण्यात फायदा होता.

ऑफिस मधेही बॉस चा एकंदर मूड पाहून अनु ने कालचा रिपोर्ट त्याला दाखवला. फारसे काही खेंगटे न निघता त्याने तो पास केला आणि संध्याकाळच्या मीटिंग च्या फायलीत ठेवला. इतर काम डिस्कस करून अनु समाधानाने आपल्या जागेवर येवून बसली. आता पाच वाजता चान्दिवालीला पोच असे बॉस ने सांगितले होते. चांदिवली साठी तिने मेरू बुक केली. आणि इतर कामे ओढून ती बसली.

तेवढ्यात बॉस ची सेक्रेटरी मरियम धावत तिच्याकडे आली.” अनु डार्लिंग, बॉस इज कॉलींग यु. व्हेरी डिस्टर्ब.?”

अनु चक्रावली. “व्हाय व्हॉट हॅपन्ड?”

“ नो आयडीया डिअर... बट दॅट बगर इज देअर इन साईड...गो.. गो फर्स्ट"

राव? तो काय करतो आहे तिकडे? शी !!! काय भानगड उपटली आता.

अनु धावतच केबीन मध्ये पोहोचली. तिला पहाताच तिचा बॉस सुरु झाला.

“ मिस जोशी, व्हॉट इस धिस? यु हॅव नोट रेड द अ‍ॅग्रीमेंट प्रोपरली !!!”

“विच अ‍ॅग्रीमेंट सर?” अनु धास्तावली.

“ अरे फायर वॉल कोर्पोरेशन का. वो पढो जरा ठीक से.... उसमे आपने लीज का पिरीयेड जो लिखा है वो एल.ओ.आय से मिलता नही है. उपरसे हर साल इंक्रीमेंटल रेंट भी आपने कन्सीडर नही किया. कैसे बनाया ये रिपोर्ट ? आज शाम को मेरी नाक कट जाती. अच्छा हुवा के राव ने देख लिया. अदरवाईज गडबड थी”

अनु एकदम रीलॅक्स झाली. उत्तर तिच्या आवाक्यातल होत.....

“ सर देअर इज सम मिस अंडर्स्टँडिंग. मी. राव मस्ट हॅव रेफेर्ड द ओल्ड अ‍ॅग्रीमेंट. देअर इज न्यू अ‍ॅग्रीमेंट ऑफ फायर वॉल. वि कॅन्सल्ड द ओल्ड एल.ओ.आय अँड मेड न्यू वन. अ‍ॅग्रीमेंट इज अल्सो रीवाइज्ड. द कॉपिज आर विथ मी. धिस न्यु चेंज हॅज बीन मेल्ड टु ऑल, थ्री मन्थ्स बॅक. द सी.सी. इज मार्क्ड टु यु अ‍ॅन्ड मि. राव. प्लीज सी इन युवर मेल. द क्न्फर्मेशन फ्रॉम एम.डी. इज अल्सो देअर."

बॉस चक्रावला. त्याने लगेच मेल उघडली. अनु ने त्याला मेल बघायला मदत केली. योग्य ती मेल त्याला दाखवली. आपल्या ड्रॉवर मधले अ‍ॅग्रीमेंट घेवून आली. ते ही दाखवले. त्यांचे समाधान झाले.

“ येस येस यु आर राईट मिस.जोशी. आय वॉज व्हेरी वरीड. अरे यार राव... पहिले चेक किया कर यार... समझता नही ही तो हात क्यू डालता है.?”

“ सर,,,,, आय वॉज ट्रायींग टु हेल्प यु पीपल ओन्ली.”

“ ओके... ओके.... मिस जोशी कम टु द क्लायेंट्स ऑफिस अ‍ॅट फाय पी.एम. ओके....आय अ‍ॅम गोइंग आउट मीट यु देअर ओन्ली.”

“ ओके सर....”

अनु बाहेर पडली. पाठोपाठ राव पण पडलेल्या चेहेर्‍याने बाहेर आला. अनु गरकन त्याच्याकडे वळली.

“ राव सर, तुमच्याशी बोलायचं आहे....”

राव मुकाट्याने तिच्या मागून तिच्या क्युबिकल मध्ये आला.

“सर. तुम्ही मला सिनियर आहात. हे असे चोरून माझे रिपोर्ट वगैरे पहाणे बरे. नाही. तुमच्यापेक्षा मी वयाने आणि पोस्ट ने दोन्हीने लहान आहे. माझ काही चुकत असेल तर मला सांगा. पण अशी बॉस समोर चुगली नको. आज ही बाब खूप शुल्लक होती म्हणून त्याने मिटवली, पण उगाचच काहीतरी उकरून काढायला आपल्या सगळ्यांना वेळ कुठे आहे. प्लीज आज जे झालं ते नको परत व्हायला. “

“ हे बघ अनु... एक व्हि.पी. म्हणून कुठे काय चालते ते कळणे माझे काम आहे... तू खूप लहान आहेस ह्या जगात. तुला माहित नाही की काय काय चालते.”

“ सर ह्या जगात आणि खेळात मी लहान असेन पण अजाण नक्कीच नाही. या पुढे तुम्हाला काहीही हवे असेल तर हक्काने मागा, मी स्वत: तुम्हाला ते देईन. मला कल्पना आहे की हा सगळा डेटा आपल्या सगळ्यांचा आहे, फक्त तो कोण कसा वापरतो ते महत्वाचे....”

शेवटच वाक्य राव च्या वर्मी लागलं. तो काहीही न बोलता तिकडून निघाला. आजूबाजूचे सगळे क्युबिकल शांत होते, पण त्या शांततेच कारण ह्या दोघांचे संभाषण निट ऐकता यावे हेच होते. अनुच्या चेहेर्‍यावर हसू उमटले. आज राव ची जिरली म्हणून समस्त क्युबिकल्स आनंदात असतील. पण हाच राव ज्या ज्या कुरघोड्या सगळ्यां वर करत असतो ते पाहून कोणीही दुसऱ्याच्या मदतीला येत नसे. इकडे सगळे आपले आपण.... एकांडे शिलेदार... जो तो आपला आपला..... पहिले पहिले अनु ला खूप त्रास होत असे... पण नंतर नंतर ती ही ह्या खेळात मुरत गेली.. आपलं कोण परक कोण ते कळायला लागलं....

चला चट चट कामे उरकून जायला हवं....

काम करता करता एकी कडे तिच्या मनात बॉस चेच विचार होते. किती रॅशनल आहे हा!!. खरेतर तिचे जॉब प्रोफाईल म्हणजे एका प्रकारे बॅक ऑफिस च झाले. संबंध यायचा तो क्लायेंट च्या लीगल वाल्यांशीच. पहिल्यांदाच ती कोणा मोठ्ठ्या कोर्पोरेट मधल्या एम.डी. आणि सी.इ.ओ. वगैरे लोकांना भेटायला जात होती....

बघता बघता चार वाजले. तशी ती जायची तयारी करू लागली. आज तिने खास ब्लेझर सुध्धा बरोबर घेतला होता. कारण सकाळी भेटली तेंव्हा बॉस ने सुध्धा सूट घातलेला तिने पाहिला होता. मेरू पण वेळेत आली. ती निघाली आणि सगळ्या फाईल्स आणि पेपर्स घेवून पावणे पाचला त्यांच्या ऑफिस मध्ये पोहोचली. बॉस अजून आला नव्हता. तिकडे गेल्यावर तिला समजले की मीटिंग सहाला पोस्टपोन झाली आहे आणि तसे तिच्या बॉस ला कळवले होते.

अनुच्या मनात येवून गेले, “ ह्याला माहित होत तर आपल्याला का नाही कळवलं.... जाऊ दे आता इथे थांबण्यावाचून पर्याय नाही. तिने परती साठी मेरू सांगून ठेवली होती. बॉस च्या अंदाजा प्रमाणे जास्तीत जास्त साडेसात पर्यंत मीटिंग संपायला हवी.... आता एक तास लेट म्हणजे साडे आठ ची सांगावी. म्हणून तिने योग्य तो बदल करून ठेवला. हो... उगाच नंतर पंचाईत नको. ऑफिस बर्यापैकी कोपच्यात होत....

इकडचे तिकडचे मेसेज वाचत तिने सहा पर्यंत वेळ काढला. आता सगळे लोक जाताना दिसायला लागले. रिसेप्शन वरच्या बाईने तिला आत मीटिंग रुम मध्ये जायला सांगितले. ती आत जाऊन त्या आलीशान मीटिंग रुम चे निरीक्षण करू लागली. ती एका खुर्चीवर बसली. एक जण येवून पाणी चहा ठेवून गेला. त्यांच्या एम.डी. चा सेक्रेटरी येवून तिची चौकशी करून गेला. एक एक करून सगळे यायला लागले. आता फक्त तिचा बॉस आणि ते एम.डी. यायचे राहिले....

दोघेही एकदम आत आले. सगळे उठून उभे राहिले. बॉस हिच्या शेजारी बसला. व तिचा रिपोर्ट त्याने हातात धरला. मीटिंगला सुरुवात झाली. एक.एक.मुद्दा समोर यायला लागला. बॉस आत्मविश्वासाने उत्तरे देवू लागला. अनेक मुद्द्यांची चिरफाड झाली. एका लीगल पॉइंट वर समोरचे आडून बसले. बॉस ने हिच्या कडे पाहिले. हिने ठामपणे तो मुद्दा मान्य करता येणार नाही असे सांगायला तोंड उघडले, तेवढ्यात बॉस ने पायातल्या बुटाने तिच्या पायाला गप्प रहायाचा इशारा केला व पटकन म्हणाला “ वि विल डू दॅट. वी कॅन डू इट. व्होट डू यु से मिस जोशी?”

तिने फक्त मान हलवली.

खरेतर त्यांची ही मागणी मान्य करणे म्हणजे स्वत:हून मोठ्ठ्या लीगल कचाट्यात स्वत:ला अडकवणे होते. पण हे डिल साईन होण्या साठी बॉस कोणतीही रिस्क घ्यायला तयार होता. कारण हे डिल त्याच्या करीअर मधली सुवर्ण संधी होती. ते त्याला घालवायचेच नव्हते. ग्रुप मध्ये जास्तीत जास्त चमकण्याची संधी ह्या डिल ने त्याला होत होती. भारतातील सगळ्यात मोठ्ठे कोर्पोरेट जागेचे डील त्याच्या नावावर होणार होते. त्यापुढे हे क्षुद्र लीगल प्रोब्लेम काहीच नव्हते.

अनुमात्र सुन्न होवून गेली. पुढची मीटिंग तिला ऐकूच आली नाही. बॉस एक एक करत मुद्दे धाडधाड उडवत होता.

मीटिंग संपली तेंव्हा साडेनऊ झाले होते. नाराज ती आणि उत्साही तिचा बॉस दोघेही बाहेर आले.

तिच्या चेहेर्या कडे पाहून बॉस तिला म्हणाला.” येस मिस जोशी... थॅन्क्स ... द डील इज आवर्स....”

“कॉन्ग्रॅट्स सर...”

“व्हाय व्हॉट हॅपन्ड ? यु आर नॉट हॅपी....”

“ सर पर वो जो मांग राहे है लिगली वो पॉसीबल नही है. उससे अपना नुकसान होगा. हम फस सकते है. अपने एम.डी. सर कभी नही मानेंगे. हमे मेहेन्गा पड सकता है. वो कभी साईन नही करेंगे.”

तिच्या शब्दागणिक बॉसचा चेहेरा रागाने फुलत गेला....

“ मिस जोशी.... डू यु नो हुम यु आर टॉकिंग टू? आय एम द सिनियर व्हाईस प्रेसिडेंट....मुझे क्या करना है और मै क्या कर सकता हुं ये आपको मुझे बताने की जरुरत नही. आप यहां डील करने नही तो मुझे असिस्ट करने आई थी.”

“सर लेकीन मुझे जो फील हुवा ...मै....”

“ डोंट क्रॉस युअर लिमिट.... बी इन युअर लाईन.... आय विल हँडल धिस... यु कीप आउट ऑफ धिस...बाय अ‍ॅन्ड गुडनाईट....” बॉस ताडताड निघून गेला. तिच्याकडे न बघता...

एवढ्या मोठ्ठ्या रिसेप्शन वर ती एकटीच उरली. डोक्याचा जाळ झाला होता. काय करावे ते सुचत नव्हते. कोण समजतो कोण स्वत:ला? काय वाट्टेल ते करणार का ?

त्याच विचारात ती बाहेर आली. बाहेर आल्यावर तिला भान आले की किती रात्र झाली आहे ती. तेंव्हा तिला आठवलं की तिने मेरू सांगितली होती. तिने गडबडीने पर्स मधून फोन काढला. बापरे!!! दहा मिस कॉल ? कोणाचे? तिने पाहिलं तर सगळे अननोन नंबर्सं. बापरे !!! मग तिच्या ध्यानात आलं की मेरू चा ड्रायव्हर तिला फोन करत असणार!!! तिने त्यातल्या मोबाईल नंबर वर फोन केला. रिंग वाजली तरी कोणीच उचलला नाही. ती हताशपणे पहात राहिली. आजूबाजूला एकदम अंधार!!! कोणीच नाही रस्त्यावर... तसेही चांदिवली मधला हा भाग कमी गर्दीचा. फारशी वर्दळ नसणारा. त्यात रात्रीचे दहा वाजलेले.... बापरे.... आता काय करू?....

तेवढ्यात तिचा फोन वाजला...

“मॅडम.... किधर थी आप...? मै आधा घन्टा रुका था. हमारे रूल के हिसाब से जादा नही रुक सकते. इसलिये दुसरा भाडा लेके चला गया...”

“ ठीक है भैय्या... अब आप कहां है? आ सकते है यहां?”

“ नही बेहेनजी.... मै तो भाडा लेके बोरीवली आ गया हुं और दुसरा भाडा वसई का है.... अभी नही आ सकता. “

“ बापरे!! भाई साब यहां कोई भी नही है... मै अब क्या करू?” अनु आता चांगलीच घाबरली...

“ अरे आप मेन ऑफिस फोन करके दुसरी गाडी मंगवा लीजिये...मिल जायेगी”

ड्रायव्हर ने फोन कट केला. तिने घाईने मेरू च्या मेन नंबर वर कॉल केला....

“ येस अनुपमा जोशी जी... मै आपकी क्या सहायता कर सकता हुं. आपने आजका सफर निश्चित नही किया. क्या उसकी वजह मै जान सकता हुं?”

“देखिये मेरी मीटिंग बोहोत लंबी चली इसलिये मै वो गाडी नही ले पायी. क्या आप मेरे लिये दुसरी गाडी भेज सकते है.”

“ जरूर. लेकीन उसके लिये एक घंटा लगेगा... अभी दस बजकर दस मिनिट हुवे है अगली गाडी ग्यारा बजकर पंधरा मिनिट पे मिलेगी. क्या मै बुक करू?”

“ हां हां बुक किजीये.... प्लीज”

“ जरूर मॅडम. मैने बुक कर दी है. आपको एस.एम.एस. आ जायेगा...”

बापरे अजून तासभर काय करायचे!! त्या ऑफिस मधून बाहेर आलो आहे पण असं इकडे गेट वर कसे काय उभे राहू? वॉचमन च्या केबीन जवळ उभे रहायचा विचार करून अनु तिकडे गेली.

आत तीन वॉचमन होते. त्यातला एक तिला पाहून बाहेर आला.

“ अरे मॅडम आप इस वक्त..?”

“ अरे भाईसाब मेरी यांहापे मीटिंग थी. लेकीन लेट हो गई. तो टॅक्सी वाला चला गया. अब क्या करू समझमें नही आ रहा. दुसरी मेरू मंगा ली है, लेकीन उसको एक घंटा लगेगा. अब कहां रुकू?”

“ देखिये मै और कूछ नही कर सकता, हां लेकीन आप यहां रुक जाईये. चाहिये तो इस कुर्सी पर बैठ जाईये. लेकीन मै आपको अंदर नही ले सकता. हमारे रूल के खिलाफ है. और यांहा सी.सी. टीव्ही भी है. एक किजीये. आप मुझे ये सब लिखके दिजीये. क्या है के हमारे रूल के हिसाब से सी.सी. टीव्ही किसीने चेक किया तो मुझे जवाब देना पडेगा. बेहेतर होगा के आप अर्जी दिजीये.”

अनु जवळ पर्याय नव्हताच. ती तिकडेच बसली. आणि त्याला हवे ते शब्द खरडून दिले. आता रात्रीची थंडी तिला जाणवू लागली. मुंबई मधे थंडी पडत नसली तरी हा डिसेंबर महिना मात्र चांगला गारवा घेवून आला होता. तिने आपला ब्लेझर अंगाभोवती गुंडाळून घेतला. तेवढ्यात दुसरा गार्ड तिकडे आला.

“हे घ्या.... चहा घ्या थोडा.... “

“ अरे... नको नको... चहा नको...”

“आहो घ्या हो... आम्हाला मशीन लावलं आहे... घ्या...थंडी पडली आहे कधी नव्हे ती... घ्या...”

चहाचा घोट घेवून अनु ला बर वाटलं. एकदम फ्रेश झाल्या सारखं वाटलं तिला.... त्या गार्डस बद्दल एकदम कृतज्ञता वाटली. तेवढाच राग बॉस बद्दल आला. सरळ एवढ्या रात्री तिला एकटीला टाकून गेला. तेही न सांगता. रागावून. एवढ्या मोठ्या पोस्ट च्या माणसाला शोभत का हे.... नसेल विचार जुळत... पण म्हणून कोणी असं वागत नाही. माजोरडा... किती घमेंडी आहे. असेल तो मोठ्ठा म्हणून काय एवढा माज.... साधं विचारायचं पण सौजन्य नाही. आता काय करू...? उद्या त्याच्याबद्दल एच.आर. मध्ये तक्रार केली पाहिजे. पण तिकडे कोण त्याला बोलणार? माझीच चूक आहे... ऑफिस ची गाडी घ्यायला हवी होती. पण ओव्हर टाईम द्यायला लागतो म्हणून लौकर पास करत नाहीत अकाउंटस मध्ये. मागे एकदा हेच झालं होत. खूप कटकट होते म्हणून मग मेरू मागवायचे सगळे. पण ह्या बॉस ला काही आहे की नाही ....

राग आणि एकटेपणाच्या भावनेने तिच्या डोळ्यातून पाणी आले. आर्धा तास होवून गेला.

तेवढ्यात एका गाडीचे दिवे गेटवर चमकले. गेट तर बंद होते. गार्ड धावतच आला. अनु पण धडपडत उभी राहिली. तिला वाटले तिची मेरू तिला घ्यायला आली. पण गाडी भलतीच होती. गार्ड ड्रायव्हरशी बोलत होता. तेवढ्यात गार्ड तिच्या दिशेने आला...

“ मॅडम क्या आप अनुपमा जोशी है? वो ड्रायव्हर पुछ रहा है?”

अनु गडबडीत पुढे झाली...” हां हां मै ही अनुपमा जोशी हुं.” ती एकदम गाडीकडे धावली. हे कोण आहे? गाडी तर ओळखीची वाटते.... मर्सिडीझ.... अरे ही तर बॉस ची गाडी.... म्हणजे...? बॉस?

तेवढ्यात गाडीची मागची काच उघडली. बाहेर बॉस चा चेहेरा डोकावला....

“ मिस जोशी... काम ...कम इनसाईड... आय विल ड्रॉप यु....”

अनु भारावल्या सारखी गाडीत बसली.

“ मै घुस्सेमे निकाल गया... बस घर पोहोंच ही रहा था... तभी याद आया की आपने मंगाई हुवी टॅक्सी आई या नही... या चली गई... मैने आप को कॉल भी किया. आपने उठाया ही नही? “

तिने हळूच मोबाईल पाहिला... त्याच्यावर पाच मिस कॉल होते बॉस चे....अजूनही तो सायलेंट वर होता...
तिने हळूच जीभ चावली.

बॉस अजूनही बोलतच होता..” मुझे समझ में नही आ रहा था मै क्या करू... इसलिये फीर वापस आया... अछ्छा हुवा आप मिल गयी... आपने अच्छा किया की वही रुकी रही...नही तो मै बोहोत परेशान हो जाता था... अरे कोर्पोरेट के झगडे अपनी जगह... लेकीन इंसानियत के नाते... मै अपने आप को माफ नही कर पाता.....”

“ सर.... सर.... इट्स ओके... आय एम व्हेरी थँकफुल टू यु.. थॅन्क्स... अ‍ॅन्ड सॉरी.....”

बॉस ने तिच्याकडे बघून स्वच्छ स्माईल केले....

अनु आता निर्धास्तपणे सैलावून गाडीत बसली..... पुढे बघता बघता.... तिने आत्मविश्वासाने मान वर केली... आता ती पूर्ण सुरक्षित होती. माणसाच्या चांगुलपणावर तिचा परत विश्वास बसला.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माणसाच्या चांगुलपणावर तिचा परत विश्वास बसला. >> Happy आवडली. आजकाल सत्यच इतके भयानक आहे की गोश्टी वाचायलाही भिती वाटते.
थोड्या लिखाणात चुका जाणवल्या, त्या वाचताना खटकत होत्या. त्या दुरुस्त केल्या तर अजून उत्तम इफेक्ट येईल.
For ex: अभी 'दास बाजकर दास' मिनिट हुवे है अगली गाडी ग्यारा 'बाजाकर' पंधरा मिनिट पे मिलेगी.

थोड्या लिखाणात चुका जाणवल्या, त्या वाचताना खटकत होत्या.>>>>

धन्स वि.भु..... चुका सुधारल्या आहेत बहुतेक.

धन्यवाद लोकहो...

माझी साधीशी कथा तुम्हाला आवडली.... मागे अशाच कॉर्पोरेट कथा लिहायचा प्रयत्न केला होता, तो ही बहुतेकांना आवडला होता. म्हणुनच पुन्हा एका साध्या प्रसंगा ची गोष्ट लिहिली.

तुमच्या प्रतिक्रिया खरच उत्साहवर्धक आहेत.

कॉर्पोरेट मधे काम करतानाचे अनेक किस्से आहेत. ते गुंफुन कधी कधी एखादी कथा होवुन जाते. खुप गम्मत येते लिहिताना.

मीरा, लिहीत राहा. तुझ्याकडे अशा अनुभवांची मोठी बँक आहे. हा एक मोठा प्लस-पॉईंट आहे. तुझं वाचनही दांडगं आहे. किस्से एकत्र गुंफण्याच्या पलिकडेही अधिक छान कथालेखन करू शकशील.
आमच्यासारख्यांना कितीही ठरवलं तरी बारकाव्यांसहितचं कॉर्पोरेट वातावरण असं सहजी उभं करता येणार नाही. Wink
झी मालिकावाल्यांना विशेषत: ऑफिसचे सीन्स लिहिताना अशा एखाद्या कन्सल्टन्टची नितांत आवश्यकता आहे. Proud

झी मालिकावाल्यांना विशेषत: ऑफिसचे सीन्स लिहिताना अशा एखाद्या कन्सल्टन्टची नितांत आवश्यकता आहे. :फिदी:>>>

खरे आहे.... मागे ती एक ऑफिस वरची मालिका होती ( सुयश टिळक ची) त्यात काय भयानक वातावरण दाखवले आहे....

तुम्हा सगळ्यांना आवडली ना कथा..... चला तर मग.... खुप बरं वाटलं.....

आवडली कथा.
“हे घ्या.... चहा घ्या थोडा.... “>>> या पुढे थोडी वेगळ्या मार्गाने कथा जाईल का अशी शंका आली होती.
वाहता धागा झालाय का? काल एका प्रतिक्रियेत अशीच शंका कोणीतरी उपस्थित केली होती असं वाटतंय !

“हे घ्या.... चहा घ्या थोडा.... “>>> या पुढे थोडी वेगळ्या मार्गाने कथा जाईल का अशी शंका आली होती." मलाही अशीच शंका आली. पण बॉस च्या येण्याने कथेला वेगळेच वळण मिळाले.
छान आहे कथा.