मन कशात लागत नाही

Submitted by सई केसकर on 5 January, 2017 - 10:56

बरेच दिवस, "तू खंबीर आहेस. तुला कुठल्याही मदतीची गरज नाही. ही एक फेज आहे, जाईल." अशी स्वतःची समजूत घालून कंटाळल्यावर एक दिवस मी तो निर्णय घेतला. युनिव्हरसिटीच्या वेबसाईटवर प्रत्येक कर्मचाऱ्याला मानसिक समुपदेशनाचे काही तास होते. त्यातून मी अपॉइंटमेंट घेतली. २०११ चा हिवाळा होता. तो देखील मिशिगन मधला. सकाळी उठल्यावर खिडकीबाहेर रात्रभर हळुवार पडलेल्या बर्फाची पाऊलखुणारहित गादी दिसायची. कौन्सिलरला कामाच्या वेळेच्या आधी भेटायचं म्हणून मी सहा वाजताची बस पकडायचे. त्यामुळे त्या गादीवर सगळ्यात आधी पाऊलखुणा बनवण्याचा मान मलाच मिळायचा. पहिल्या दिवशी मला तिथे जाताना अगदी रडू येत होतं. आपल्या इथपर्यंतच्या आयुष्याचा काहीच उपयोग नाही आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी कुठलीच दिशा नाही ही मनाशी ठामपणे ठरवलेली गोष्ट नक्की त्या माणसाला कशी सांगायची या विचारानेच रडू येत होतं. त्यात तो बर्फ, सभोवताली पसरलेला, कुठे कुठे काळामिट्ट झालेला तर कुठे कुठे थरावर थर बसून अक्राळविक्राळ झालेला. बसने गेल्यामुळे मी अर्धा तास आधीच पोहोचले, म्हणून मग तिथेच असलेल्या स्टारबक्समध्ये माझी आवडती कॉफी घेऊन पुन्हा खिडकीतून बाहेर बघू लागले.
"खरंतर असं कौन्सेलरकडे वगैरे जाण्यासारखं काहीच नाहीये. आपल्याला अशा काय जबाबदाऱ्या आहेत. मिळालेला पैसा आपण भारी भारी स्नो बूट्स नाहीतर जीन्स घेण्यात उडवतो. इथे अशी हवी तशी कॉफी घेऊन कुठल्यातरी दुःखाचं पोस्ट मॉर्टम करायची वाट बघतोय. रिडिक्यूल्स!"

पुन्हा तेच विचारचक्र सुरु झाले. मोठ्या माणसांकडून कित्येक वेळा ऐकलं होतं. "काही जबाबदाऱ्या नाहीत ना म्हणून येतं हे असं डिप्रेशन."
"तुमच्या पेक्षा कितीतरी खडतर आयुष्य जगणारे लोक आहेत. त्यांच्याकडे बघा"
हे सगळे आवाज हळू हळू माझाच आतला आवाज बनून गेले होते. एक क्षण वाटलं नकोच ते. असंच परत जावं. पण आपण कुणालातरी सकाळी सात वाजता या अशा थंडीत आपल्यासाठी बोलावलं आहे. त्यामुळे असं पळून नाही जायचं, असा विचार करून मी त्या बिल्डिंगमध्ये गेले.

जॉनथन च्या ऑफिस बाहेर लांबच लांब कॉरिडॉर होता. ठोकळ्यासारख्या बिल्डिंगमध्ये तो करडा चौकोनी कॉरिडॉर अजूनच खच्ची करत होता. मधेच आपल्याला जे वाटतंय तो या गावाचा तर परिणाम नाही ना, असाही विचार डोकावून गेला मनात. तेवढ्यात त्या लांबलचक कॉरिडॉर च्या दुसऱ्या टोकाला एक उंच माणूस खांद्यावर सायकल लटकवून येताना दिसला. जशी जशी त्याची आकृती जवळ आली तशी मी त्याला कधीही पाहिलेलं नसताना देखील हा तोच आहे अशी मला खात्री पटली. त्यानीदेखील मला ओळखलं असावं, कारण माझ्याशी हस्तांदोलन करायच्या खूप आधीच, लांबूनच माझ्याकडे बघून तो हसला. त्या निर्मळ आणि खुल्या हास्याच्या आठवणीचा देखील मला खूप आधार वाटतो.

पुढचे सात आठवडे येणाऱ्या प्रत्येक गुरुवारची मी अतिशय आतुरतेने वाट बघू लागले. जॉनाथन चूक बरोबर अशा पठडीतून माझ्याशी कधीच बोलला नाही. त्याच्या बरोबर बोलून नेहमीच हलकं वाटायचं आणि त्यानी दिलेले होमवर्क करण्यात प्रचंड मजा यायची. थोडेच दिवसांत नुसतं त्याला भेटण्याबद्दल नाही, तर त्या सकाळच्या बर्फात पाऊलखुणा उमटवण्यापासून ते अर्धा तास आधी पोचून, कॉफी पिण्याबद्दलदेखील मला प्रेम वाटू लागलं. आणि ज्या गोष्टीमुळे मला जॉनाथनकडे जावं लागत होतं, त्या आयुष्यात घडल्याबद्दल कुठेतरी थोडीशी कृतज्ञतादेखील वाटू लागली. हा योग्य शब्द आहे नाही माहिती नाही, पण आपण इंग्रजीमध्ये ज्याला 'बीइंग ग्रेटफूल' असं म्हणतो तसं काहीसं.

हे सगळे प्रसंग मी "डिअर जिंदगी" हा सिनेमा बघताना (रडत रडतच) पुन्हा जगले. सिनेमा बघताना रडण्यात माझा आधीपासूनच हातखंडा आहे. आणि यावर्षी पिंक, डिअर जिंदगी, दंगल असल्या सिनेमांनी माझ्या या स्वभावाला खच्चून प्रोत्साहन दिले आहे. हा काही डिअर जिंदगीचा रिव्यू नाही. पण ज्या सिनेमानी एका दर्शकाला आपला अनुभव लिहायला असं प्रोत्साहित केलं त्याचा रिव्यू वगैरे लिहायची काहीच गरज नाही.

आयुष्यात कधीही भरकटल्यासारखं वाटलं की आपली पहिली धाव मित्र मैत्रिणींकडे असते. पण मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक कितीही जवळचे असले तरी ते जवळचे आहेत हाच यातला मोठा अडथळा असतो. आणि आपल्या अडचणीच्या काळात, आपल्या अडचणीच्या पलीकडे बघणे फारसे जमत नाही. त्यामुळे जवळच्या माणसांना आपल्याला सावरण्याची आणि त्यांचं स्वतःचं मन प्रसन्न ठेवण्याची कसरत करावी लागते. अशा वेळी कधी कधी मैत्रीदेखील धोक्यात येते. कारण आपल्या जवळच्या व्यक्तीकडून काही सत्य ऐकण्याची आपली तयारी नसते, आणि कधी कधी त्यांची मतं त्यांच्या आपल्या बरोबर आलेल्या संपर्कातून आणि त्यांच्या बायस मधून तयार झालेली असतात. अशावेळी गरज असते ती कुणीतरी आपलं ऐकून घेण्याची आणि अगदी अलगदपणे आपल्याला आपल्या निर्णयापर्यंत नेण्याची. मग ते निर्णय अतिशय सोपे किंवा प्रचंड अवघड असू शकतात. पण तिथपर्यंत भीती बाजूला ठेऊन पोचायला कौन्सेलरची नक्कीच मदत होते.

अशी मदत न घेण्याची कित्येक कारणं आपल्याकडे असतात. पण अशी मदत घेऊन आपण कमकुवत आहोत किंवा छोट्या छोट्या गोष्टींना अतिमहत्त्व देत आहोत असा समज करून घेणे धोक्याचे आहे. दुसऱ्यांची आपल्यापेक्षा मोठी दुःख बघून आपल्या त्रासाला कमी लेखणे देखील योग्य नाही. एखाद्या श्रीमंत माणसाला झाला काय किंवा गरीब माणसाला झाला काय, मनःस्ताप दोघांनाही सारखाच असतो, कारण तो पैसे ओतून कधीही झटकन दूर करता येत नाही. आणि कित्येक मानसिक द्वंद्व अशी असतात जी अशी गणितासारखी सोडवता येत नाहीत.

अमेरिकेतल्या त्या काही आठवड्यांमध्ये मी आयुष्यभर पुरतील एवढ्या गोष्टी शिकले. परत येत असताना, मनात अनेक विचार होते. आणि कदाचित आपला हा सकारात्मक दृष्टिकोन फार टिकणार नाही अशीदेखील भीती होती. पण माझ्या नशिबाने (आणि थोड्याश्या प्रयत्नांनी) तो अजून टिकून आहे. आणि त्यासाठी इतर बऱ्याच लोकांबरोबर मी जॉनाथनची आभारी आहे. नुकत्याच हार्वर्ड युनिव्हर्सिटीत झालेल्या एका प्रयोगाबद्दल वाचनात आलं. १९३९ पासून हार्वर्ड मध्ये दोन गटांचा अभ्यास होतो आहे. ७५० तरुण मुलांचा हा अभ्यास होता. त्यातील कित्येक आज हयात नाहीत. आणि जे आहेत ते सगळे नव्वदच्या उंबरठ्यावर आहेत. अभ्यास होता, "आनंदी, समाधानी जीवनाचे रहस्य काय?". आणि तरुणपणी सगळ्यांनी, "मला भरपूर पैसे किंवा प्रसिद्धी मिळाली तर मी आनंदी होईन" अशी उत्तरे दिली होती. आता मात्र जे खरंच आनंदी आहेत त्यांनी आनंदी जीवनाचे (आणि दीर्घायुष्याचे) रहस्य हे त्यांची जवळची नाती असल्याचे सांगितले आहेत. आपल्या आजूबाजूचे जवळचे लोक आपल्या आनंदाचा प्राणवायू असतात. आणि तसेच आपणही त्यांच्या आनंदाचा असतो. त्यामुळे आपण आनंदी आणि समाधानी राहणे ही चैन नसून एक जबाबदारी सुद्धा आहे.
त्यामुळे जर कुणी मी पहिल्या अपॉइंटमेंटच्या आधी तळ्यात मळ्यात होते तसं असेल, तर त्यांनी आपल्या आतल्या त्या नको म्हणाऱ्या आवाजाला बंद करून जरूर झेप घ्यावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> अहो तस नाही स्वाती ताई
सईने तिला जाणवलेली लक्षणं लिहिली, स्वाती२ आणि मी आमच्या पाहण्यात आलेली लक्षणं लिहिली. त्यापलीकडे आणखी नक्की काय तुम्हाला कळायला हवं आहे हे माझ्या लक्षात येत नाही. डायग्नोसिस करायला तज्ज्ञ व्यक्तीच हवी आणि तदनुषंगिक उपचार द्यायलाही, हा मुद्दा आहे - ते आम्ही कसं करणार?

हा धागा मनोरंजनाचा नाही. जर विषय तुम्हाला अगत्याचा वाटत असेल, तर माहिती मिळवायला थोडे प्रयत्न करून पहा असं मी सुचवेन.

स्वाती_आंबोळे | 10 January, 2017 - 00:31
हा धागा मनोरंजनाचा नाही. जर विषय तुम्हाला अगत्याचा वाटत असेल, तर माहिती मिळवायला थोडे प्रयत्न करून पहा असं मी सुचवेन. >>>

तुमचा मागील पानावरचा प्रतीसाद पाहीला.. काही अंशी उत्तर मिळाल.. धन्यवाद

१. हा धागा "आरोग्यम् धनसंपदा" या ग्रुपचा आहे.. मनोरंजन या ग्रुपचा नाही..
२. गुगल करुन खुप माहीती मिळते हे माहीत आहे पण ती वन वे आसते.. तिथे शंका, प्रश्न, प्रती प्रश्न नाही होउ शकत..
३. धागा सुरु करायचा मुद्देसुद चर्चा हा ही एक हेतु असतोच..

मानसशास्त्रावरील चर्चा वाचताना हे गीत आठवते

मन मनास उमगत नाही
आधार कसा शोधावा !
स्वप्‍नांतिल पदर धुक्याचा
हातास कसा लागावा ?

मन थेंबांचे आकाश
लाटांनी सावरलेले
मन नक्षत्रांचे रान
अवकाशीं अवघडलेले
मन गरगरते आवर्त
मन रानभूल, मन चकवा

मन काळोखाची गुंफा
मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात
मन देवाचे पाऊल
दुबळ्या गळक्या झोळीत
हा सूर्य कसा झेलावा ?

चेहरा-मोहरा ह्याचा
कुणि कधी पाहिला नाही
धनि अस्तित्वाचा तरीही
ह्याच्याविण दुसरा नाही
ह्या अनोळखी नात्याचा
कुणि कसा भरवसा द्यावा ?

गीत - सुधीर मोघे
संगीत - श्रीधर फडके
स्वर - श्रीधर फडके

खूप सुरेख धागा. या अश्या धाग्याची किती गरज होती हे इथे दिलेल्या प्रतिक्रियांवरून लक्ष्यात येते. काही दिवसांपूर्वी वाचले होते की हळूहळू डिप्रेशन हा प्रथम क्रमांकाचा आजार होणार आहे. पण या विषयावर न्यूट्रल राहून बोलणारे कमीच असतात उलट उडवाउडवी करायचीच वृत्ती जास्त असते. इथे मोकळेपणी चर्चा होते आहे ही खूप चांगली गोष्ट.
सई तु विषयाला वाचा फोडलीच आहेस तर त्याचा उरलेला भाग पण पूर्ण कर, कारण डिप्रेशन बऱ्याचदा चोरपावलांनी येतं; ते आलं आहे हे लक्ष्यात यायला पण बराच वेळ जातो. मग त्यातून बाहेर पडणं वैगरे सुरु होतं. या सगळ्यामध्ये आपण बराच मोठा काळ आनंदात किंवा साधं सरळ जगणंच हरवून बसतो. नंतर वाटत अरे यावेळी मी इतकं दुःख किंवा रागराग करण्याची गरज होती का? बऱ्याचदा माणसं पण दुरावतात, नको ते निर्णय घेतले जातात. समजून घेणारी जवळची जिवाभावाची माणसं आपल्यामुळे सफर होतात.
याची लक्षणं प्रत्येक व्यक्तीत वेगळी असतात त्याची तीव्रता वेगळी आणि उपचारही वेगळे. कितीतरीजण यातून जात असले तरी याबाबतीत अजून मोकळेपणा आलेला नाही. या विषयावर लोकं एकमेकांशी बोलायला लागली तर खूप जाणं याची मदत होईल,

प्रकाश घाटपांडे,
मला हे गाणे फार आवडते. जुन्या दूरदर्शनवर एक सिरीयल असायची मानसिक आजाराबाबत. त्याचे हे शीर्षक गीत होते.

डिप्रेशन" म्हणजे काही तरी गुढ गुपीत असल्या सारख बोलल जातय.. मला तर आता अस वाटायला लागलय हे "डिप्रेशन" वगैरे..सगळ झुठ आहे..सगळे मनाचे खेळ ... तस नसत तर खेदाने सांगाव लागतय इथे एकाला पण ते नीट समजवता आलेला नाही...!!! >>>

सगळ्याच गोष्टी समजवता येत नाहीत हो....
I had a black dog, his name was depression अशा नावाचा एक युट्युब विडीओ आहे.
तो कृपया बघा...तरीसुद्धा तुमचं "डिप्रेशन" वगैरे..सगळ झुठ आहे..सगळे मनाचे खेळ वगैरे मत नाही बदललं तर तुमच्याइतक्या नशीबवान तुम्हीच आहे हे स्वाती ताईंचं वाक्य शंभर टक्के सत्य...त्याबद्दल आज स्वतःला एक चॉकलेट पेस्ट्री घेउन द्या Happy

मागेच कुठे तरी वाचले होते एका सर्व्हे चा निष्कर्ष होता तो "भारतातले लोक जगात सगळ्या देशांमध्ये जास्त आनंदी आहेत / असतात " Happy

स्मिता श्रीपाद | 10 January, 2017 - 18:18 नवीन
सगळ्याच गोष्टी समजवता येत नाहीत हो....
I had a black dog, his name was depression अशा नावाचा एक युट्युब विडीओ आहे.

>>>>>>>>>

परत तेच... अर्धवट पोस्ट वाचुन प्रतिसाद दिलेले पाहुन हसु येतय अस झालय आता...!!

१. अहो ते माझ वाक्य (मागील पानवर हे सांगितल आहे तेच परत आजुन एकदा) हे उपरोधाने होत.. आता उपरोध पण समजाउन सांगावा लागतोय.. डिप्रेशनचा आजार आहे हे मला मान्य आहे.. Happy

२. गुगल काय किंवा युट्युब (आता परत तिसर्‍या वेब साईट नाव नका लिहु) ... सर्वसाधारन नेट वरुन खुप माहीती मिळते हे माहीत आहे पण ती वन वे असते / Static असते तिथे चर्चेला वाव नसतो .. तिथे शंका, प्रश्न, प्रती प्रश्न नाही होउ शकत, त्या चर्चे मधुन तर आधीक माहीती मिळते, विषय नीट समजतो....

३. इथ या धाग्यावर विषय समजण्या साठी प्रश्न विचारले तर भलतेच प्रतिसाद येतायत..काय हे !!
( सई आणि स्वाती यानी नंतर काही अंशी उत्तर दिलेली आहेत..धन्यवाद), त्या मुळे माझे मागील प्रतीसाद मी काढुन टाकत आहे.

४. डिप्रेशनचा येउन गेलाय आणि तो आजार बरा झालाय या विषयी ढीग भर शंका, प्रश्न होते... ते यासाठी कि त्या माहीतिचा उपयोग जर एकदा डिप्रेस आहे पण ते तो एक्सप्रेस नाही करु शकत ( मुख्य करुन १५ ते २० वयोगटातील मुल ) तर ते आयडेन्टीफाय करायला मदत होईल व योग्य वेळी योग्य मदत्/उपाय सुचवता येईल....

५. माझ्या नशीबवान असण्याच्या काळजी बद्दल आभार.. Happy

त. टी. :
मला चॉकलेट पेस्ट्री अज्जीबात आवडत नसल्यमुळे रस मलाई खाल्ली आहे...नशिबवाने रस मलाई खाल्ली या बद्दल आपला आक्षेप नसवा हि अपेक्षा करतो..व रजा घेतो...!! Happy

मोरपंखनीस
तुमचा प्रश्न योग्य आहे. पण प्रत्येकाचे डिप्रेशन वेगवेगळे असते. आणि नुसते डिप्रेशन साठी समुपदेशन घ्यावे असे नाही. ऍडिक्शन, संतापण्याची सवय आणि ती कमी करणे, अटेन्शन डेफिसिट या सगळ्यासाठी समुपदेशनाचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे नुसतं डिप्रेशनवर भर देणं देखील योग्य नाही.
फक्त एवढं म्हणता येईल की मानसिक अस्वास्थ्य वाटत असेल, कोणत्याही प्रकारचे, तर समुपदेशनाचा उपयोग होऊ शकतो.

कृत्रिम रित्या आनंदी राहणे अवघड (खरं तर अशक्य) आहे. आपण आनंदी आहोत की नाही हे फक्त आपण सांगू शकतो. कृत्रिम रित्या आनंदी आपण "दिसू" शकतो पण "असू" नाही शकत. त्यामुळे अगदी शॅम्पेनच्या कारंज्यासारखं आनंदी राहता येणं शक्य नाही हे गृहीत धरून, सामान्य आयुष्य, दुःखी न होता, उत्साहाने जगणे याला मी आनंदी आयुष्य म्हणते. यात मतभेद, तंटे होणारच नाहीत किंवा ते करून द्यायचे नाहीत हा गोल नसून, जर मतभेद झाले तर ते ज्या त्या वेळी मनाला लावून न आले पाहिजेत. कटकटी झाल्या तरी "याचसाठी केला होता अट्टाहास" असं म्हणायला दिवसभरात काहीतरी असलं पाहिजे. मग ती गोष्ट खूप मोठी असो अथवा अगदी साधी असो (जसे रोज ठराविक वेळेस झाडांना पाणी घालणे).

या लेखाचा पुढचा भागात काय अपेक्षित आहे ते स्पष्ट झाले तर चांगले लिहिता येईल.

>>>>कृत्रिम रित्या आनंदी राहणे अवघड (खरं तर अशक्य) आहे. आपण आनंदी आहोत की नाही हे फक्त आपण सांगू शकतो. कृत्रिम रित्या आनंदी आपण "दिसू" शकतो पण "असू" नाही शकत. त्यामुळे अगदी शॅम्पेनच्या कारंज्यासारखं आनंदी राहता येणं शक्य नाही हे गृहीत धरून, सामान्य आयुष्य, दुःखी न होता, उत्साहाने जगणे याला मी आनंदी आयुष्य म्हणते. यात मतभेद, तंटे होणारच नाहीत किंवा ते करून द्यायचे नाहीत हा गोल नसून, जर मतभेद झाले तर ते ज्या त्या वेळी मनाला लावून न आले पाहिजेत. कटकटी झाल्या तरी "याचसाठी केला होता अट्टाहास" असं म्हणायला दिवसभरात काहीतरी असलं पाहिजे. मग ती गोष्ट खूप मोठी असो अथवा अगदी साधी असो (जसे रोज ठराविक वेळेस झाडांना पाणी घालणे). <<<<

ह्यातील हे वाक्यः

>>>>जर मतभेद झाले तर ते ज्या त्या वेळी मनाला लावून (घेता) न आले पाहिजेत. <<<<

हेच तर म्हणत होतो. कंसातला (घेता) हा शब्द मी पेरला.

बाकी हे खालील मुद्देही

>>>>कृत्रिम रित्या आनंदी राहणे अवघड (खरं तर अशक्य) आहे. आपण आनंदी आहोत की नाही हे फक्त आपण सांगू शकतो. कृत्रिम रित्या आनंदी आपण "दिसू" शकतो पण "असू" नाही शकत. त्यामुळे अगदी शॅम्पेनच्या कारंज्यासारखं आनंदी राहता येणं शक्य नाही <<<<

ही गृहीतकेच मीही मांडत होतो. असो.

>>>>सामान्य आयुष्य, दुःखी न होता, उत्साहाने जगणे याला मी आनंदी आयुष्य म्हणते<<<<

होय, सहमत आहे. हे बहुतांशी लोक करतच असतात. Happy

डिप्रेशन बद्दल हा विडिओ पाहण्यात आला,
AIB नि नेहमीचा आचरटपणा टाळून केलाय,
या धाग्याशी संबंधित वाटला म्हणून इकडे टाकत आहे,
धाग्यामध्ये चर्चिलेले बहुतेक मुद्दे एका एका वाक्यात कव्हर केले आहेत.
https://youtu.be/tc-ya4x1y8c
अस्थानी वाटल्यास सांगा, उडवून टाकेन

लेखामध्ये काउंन्सिलिंग अर्थात समुपदेशनाच्या गरजेबद्दल अगदी बरोबर लिहीले आहे. एक मात्र नमूद करावसं वाटतं ते म्हणजे - डिप्रेशन हे मेंदूतील रासायनिक बदलही दर्शविते आणि ज्याकरता समुपदेशनाबरोबरच औषधांची 'नितांत' आवश्यकता असते. हे दुखणे अंगावर काढू नये. लोक काय म्हणतील ला गोळी मारुन, आपले आरोग्य व निरामयता या दृष्टीकोनामधून , वैद्यकिय सल्ला घ्यावाच.

गेल्या 7-8 महिन्यापासून माझी depression, anxiety n migraine चीtreatment चालू आहे. कधी कधी खूप निराश वाटत. कशानेही फायदा होत नाही. असं वाटत की आपण यातून कधीही निघू शकणार नाही. माझे सासर माहेरचे लोक खूप सांभाळून घेतात मला. Depression मध्ये mood खूप change होत असतो. कधी कधी तर खूप useless feel होत.

या धाग्यावर कोणीतरी प्रतिसाद दिलेला की नक्की डिप्रेशन कस असतं? यावर मी माझा अनुभव सांगते किंवा सध्या मी ज्यातून जातेय ते सांगते.
माझं लग्न 3 वर्षांपूर्वी झालंय. लग्नाआधी मी b. Tech. In food tech. केलय. माझ्या सासरच्या गावात फारश्या food industries नाहीयेत. थोडक्यात माझ्या करियर ला तिथे scope नाहीये. माझे मिस्टर डेंटिस्ट आहेत. त्यामुळे मीपण त्याच field मध्ये शिकायचं ठरवलं आणि admission घेतलं. पण घर आणि संसार यात मला नीट collage आणि practice करणं जमेना. बरोबर असलेली मुलं पुढे जात होती आणि मी मागे राहत होते. त्यावेळेला मला प्रचंड tension यायचं. माझं कस होईल याची चिंता सतावत असायची. छोट्या छोट्या गोष्टींचं tension यायचं,जस की बस पकडणं. मी updown करायचे. बऱ्याचदा मी दिवसभर झोपून असायचे. मला कशातच उत्साह वाटत नसायचा. सारख रडू यायचं. बाकीच्यांची प्रगती पाहून useless feel व्हायचं. मी दिवसभर छताकडे पाहत बेडवर पडून रहायचे. Collage ला जायची इच्छा व्हायची नाही. मरणाचे विचार डोक्यात यायचे. मधेच चांगलं पण वाटायचं पण हे फक्त 5 - 6 दिवस पुन्हा परिस्थिती जैसे थे. 2019 च्या August महिन्यात परिस्थिती फार बिघडली. डॉक्टरकडे गेल्यावर कळलं की मला migraine आहे आणि मला जे panic attacks येत होते ते migraine मुळे येत होते. Migraine अश्या level ला पोहोचला होता की मला प्रकाश आणि आवाज जरा सुद्धा सहन होत नव्हते. जराजरी आवाज आला की मी कानावर हात ठेऊन मोठ्यामोठ्याने रडायचे. गोळ्याचाही फायदा होत नव्हता म्हणून डॉक्टरांनी मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याचा सल्ला दिला.ती treatment चालू केल्यावर कळलं की माझ्या मेंदूवर stress इतका झाला होता की मेंदूने तो stress body वर काढणं चालू केलं होतं आणि त्यामुळे अंग दुखणं, हातपाय सुजणे असे प्रकार व्हायचे.

सध्या मला neurologist n psychiatrist अशी दोन्हीची treatment चालू आहे. Migraine ला पुष्कळ आराम आहे . पण depression सोबत मी अजूनही रोज लढतेय. Depression फक्त गोळ्या घेऊनच ठीक होत असे नाहीये. त्यासाठी आपल्यालाही खूप मेहनत घ्यावी लागते. त्या गोळ्यांचे side effects खूप खराब असतात. शरीरात उष्णता वाढणे, डोक्याचे केस टक्कल पडेपर्यंत गळणे, चेहऱ्यावर किंवा शरीरावर अतिरिक्त केस येणे, मासिक पाळीत बदल होणे, सारखी झोप येणे, अंगावर पुरळ किंवा पुळ्या येणे,विसारभोळेपणा येणे, एखादी गोष्ट पटकन न समजणे, confusion होणे, वजन वाढणे(तेही प्रचंड),तोल जाणे, अचानक चक्कर येणे, झोपेत किंवा जेवताना कधी कधी तोंडातुन लाळ गळणे,डोळ्यावर सतत झापड असणे, कामात मन न लागणे. म्हणजे हे सगळे side effects मला जाणवलेले आहेत आणि अजून जाणवताय. गोळ्यांनी खूप झोप येते, कंटाळा येतो, काहीही करावसं वाटत नाही. आणि कधी कधी त्यानेच जास्त depressed वाटत. मला treatment चालू असूनही कधीकधी डोक्यात खूप विचार येतात, अप्रिय अश्या जुन्या आठवणी येतात, मी स्वतःला अश्यावेळी khup useless feel करत असते, suicidal thoughts येतात आणि कितीही प्रयत्न केला तरी हे विचार लवकर थांबत नाहीत. मग डोकं दुखायला लागत. मला स्वतःच्या अनुभवावरून वाटत की कधीही कोणाला कसलाही मानसिक आजार होऊ नये.

Mala dipress vatale ki mi maiboli var yete.... mala vachayachi khup avad ahe..saglya dhagayvar thoda pherphatka marle ki bare vatate.. lockdown mule depression aalay. N dopamine increase hoil ase food sudha milat nahi ahe lockdown mule..

सई केसकर,
खूप महत्त्वाच्या विषयावरचा धागा. तुम्ही विस्तृतपणे बऱ्याच गोष्टींची चर्चा केली आहे.
मला इथे हे जाणून घ्यायचं आहे,
1. की डिप्रेशन आलेल्या व्यक्तीला तिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींनी कसं वागावं असं वाटतं? किंबहुना कसं वागणं योग्य असत?
2. ट्रीटमेंट घेऊन बरं वाटत असणाऱ्या व्यक्तींना डिप्रेशन परत येऊ शकते का?

सई अप्रतीम लेख! अगदी relatable !
स्वाती आणि अनेकांच्या गहन अभ्यासपूर्ण आणि विचार प्रवर्तक प्रतिक्रिया .
मला आपल्या बहिणाबाईंच्या ओळी आठवल्या :-
माझं सुख माझं सुख
हंड्या झुंबर टांगलं
माझं दुःख माझं दुःख
खोल भुईले गाडलं
-----योग्य आणि अयोग्य कुणी आणि कसं ठरवावं?

>> डिप्रेशन आलेल्या व्यक्तीला तिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींनी कसं वागावं असं वाटतं? किंबहुना कसं वागणं योग्य असत?

घरातल्या व्यक्ती या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवताहेत हे त्या व्यक्तीसाठी महत्वाचं असतं. मेनली हॅलुसिनेशन पिरीयडच्यवेळी कारण तुम्ही आर्ग्यू करून मग ती व्यक्ती अबोल होऊन घुसमट वाढू शकते. डाॅ.ला आपलं काम करू द्या.

"घरातल्या व्यक्ती या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवताहेत हे त्या व्यक्तीसाठी महत्वाचं असतं. ".....धन्यवाद वेका

Pages