मन कशात लागत नाही

Submitted by सई केसकर on 5 January, 2017 - 10:56

बरेच दिवस, "तू खंबीर आहेस. तुला कुठल्याही मदतीची गरज नाही. ही एक फेज आहे, जाईल." अशी स्वतःची समजूत घालून कंटाळल्यावर एक दिवस मी तो निर्णय घेतला. युनिव्हरसिटीच्या वेबसाईटवर प्रत्येक कर्मचाऱ्याला मानसिक समुपदेशनाचे काही तास होते. त्यातून मी अपॉइंटमेंट घेतली. २०११ चा हिवाळा होता. तो देखील मिशिगन मधला. सकाळी उठल्यावर खिडकीबाहेर रात्रभर हळुवार पडलेल्या बर्फाची पाऊलखुणारहित गादी दिसायची. कौन्सिलरला कामाच्या वेळेच्या आधी भेटायचं म्हणून मी सहा वाजताची बस पकडायचे. त्यामुळे त्या गादीवर सगळ्यात आधी पाऊलखुणा बनवण्याचा मान मलाच मिळायचा. पहिल्या दिवशी मला तिथे जाताना अगदी रडू येत होतं. आपल्या इथपर्यंतच्या आयुष्याचा काहीच उपयोग नाही आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी कुठलीच दिशा नाही ही मनाशी ठामपणे ठरवलेली गोष्ट नक्की त्या माणसाला कशी सांगायची या विचारानेच रडू येत होतं. त्यात तो बर्फ, सभोवताली पसरलेला, कुठे कुठे काळामिट्ट झालेला तर कुठे कुठे थरावर थर बसून अक्राळविक्राळ झालेला. बसने गेल्यामुळे मी अर्धा तास आधीच पोहोचले, म्हणून मग तिथेच असलेल्या स्टारबक्समध्ये माझी आवडती कॉफी घेऊन पुन्हा खिडकीतून बाहेर बघू लागले.
"खरंतर असं कौन्सेलरकडे वगैरे जाण्यासारखं काहीच नाहीये. आपल्याला अशा काय जबाबदाऱ्या आहेत. मिळालेला पैसा आपण भारी भारी स्नो बूट्स नाहीतर जीन्स घेण्यात उडवतो. इथे अशी हवी तशी कॉफी घेऊन कुठल्यातरी दुःखाचं पोस्ट मॉर्टम करायची वाट बघतोय. रिडिक्यूल्स!"

पुन्हा तेच विचारचक्र सुरु झाले. मोठ्या माणसांकडून कित्येक वेळा ऐकलं होतं. "काही जबाबदाऱ्या नाहीत ना म्हणून येतं हे असं डिप्रेशन."
"तुमच्या पेक्षा कितीतरी खडतर आयुष्य जगणारे लोक आहेत. त्यांच्याकडे बघा"
हे सगळे आवाज हळू हळू माझाच आतला आवाज बनून गेले होते. एक क्षण वाटलं नकोच ते. असंच परत जावं. पण आपण कुणालातरी सकाळी सात वाजता या अशा थंडीत आपल्यासाठी बोलावलं आहे. त्यामुळे असं पळून नाही जायचं, असा विचार करून मी त्या बिल्डिंगमध्ये गेले.

जॉनथन च्या ऑफिस बाहेर लांबच लांब कॉरिडॉर होता. ठोकळ्यासारख्या बिल्डिंगमध्ये तो करडा चौकोनी कॉरिडॉर अजूनच खच्ची करत होता. मधेच आपल्याला जे वाटतंय तो या गावाचा तर परिणाम नाही ना, असाही विचार डोकावून गेला मनात. तेवढ्यात त्या लांबलचक कॉरिडॉर च्या दुसऱ्या टोकाला एक उंच माणूस खांद्यावर सायकल लटकवून येताना दिसला. जशी जशी त्याची आकृती जवळ आली तशी मी त्याला कधीही पाहिलेलं नसताना देखील हा तोच आहे अशी मला खात्री पटली. त्यानीदेखील मला ओळखलं असावं, कारण माझ्याशी हस्तांदोलन करायच्या खूप आधीच, लांबूनच माझ्याकडे बघून तो हसला. त्या निर्मळ आणि खुल्या हास्याच्या आठवणीचा देखील मला खूप आधार वाटतो.

पुढचे सात आठवडे येणाऱ्या प्रत्येक गुरुवारची मी अतिशय आतुरतेने वाट बघू लागले. जॉनाथन चूक बरोबर अशा पठडीतून माझ्याशी कधीच बोलला नाही. त्याच्या बरोबर बोलून नेहमीच हलकं वाटायचं आणि त्यानी दिलेले होमवर्क करण्यात प्रचंड मजा यायची. थोडेच दिवसांत नुसतं त्याला भेटण्याबद्दल नाही, तर त्या सकाळच्या बर्फात पाऊलखुणा उमटवण्यापासून ते अर्धा तास आधी पोचून, कॉफी पिण्याबद्दलदेखील मला प्रेम वाटू लागलं. आणि ज्या गोष्टीमुळे मला जॉनाथनकडे जावं लागत होतं, त्या आयुष्यात घडल्याबद्दल कुठेतरी थोडीशी कृतज्ञतादेखील वाटू लागली. हा योग्य शब्द आहे नाही माहिती नाही, पण आपण इंग्रजीमध्ये ज्याला 'बीइंग ग्रेटफूल' असं म्हणतो तसं काहीसं.

हे सगळे प्रसंग मी "डिअर जिंदगी" हा सिनेमा बघताना (रडत रडतच) पुन्हा जगले. सिनेमा बघताना रडण्यात माझा आधीपासूनच हातखंडा आहे. आणि यावर्षी पिंक, डिअर जिंदगी, दंगल असल्या सिनेमांनी माझ्या या स्वभावाला खच्चून प्रोत्साहन दिले आहे. हा काही डिअर जिंदगीचा रिव्यू नाही. पण ज्या सिनेमानी एका दर्शकाला आपला अनुभव लिहायला असं प्रोत्साहित केलं त्याचा रिव्यू वगैरे लिहायची काहीच गरज नाही.

आयुष्यात कधीही भरकटल्यासारखं वाटलं की आपली पहिली धाव मित्र मैत्रिणींकडे असते. पण मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक कितीही जवळचे असले तरी ते जवळचे आहेत हाच यातला मोठा अडथळा असतो. आणि आपल्या अडचणीच्या काळात, आपल्या अडचणीच्या पलीकडे बघणे फारसे जमत नाही. त्यामुळे जवळच्या माणसांना आपल्याला सावरण्याची आणि त्यांचं स्वतःचं मन प्रसन्न ठेवण्याची कसरत करावी लागते. अशा वेळी कधी कधी मैत्रीदेखील धोक्यात येते. कारण आपल्या जवळच्या व्यक्तीकडून काही सत्य ऐकण्याची आपली तयारी नसते, आणि कधी कधी त्यांची मतं त्यांच्या आपल्या बरोबर आलेल्या संपर्कातून आणि त्यांच्या बायस मधून तयार झालेली असतात. अशावेळी गरज असते ती कुणीतरी आपलं ऐकून घेण्याची आणि अगदी अलगदपणे आपल्याला आपल्या निर्णयापर्यंत नेण्याची. मग ते निर्णय अतिशय सोपे किंवा प्रचंड अवघड असू शकतात. पण तिथपर्यंत भीती बाजूला ठेऊन पोचायला कौन्सेलरची नक्कीच मदत होते.

अशी मदत न घेण्याची कित्येक कारणं आपल्याकडे असतात. पण अशी मदत घेऊन आपण कमकुवत आहोत किंवा छोट्या छोट्या गोष्टींना अतिमहत्त्व देत आहोत असा समज करून घेणे धोक्याचे आहे. दुसऱ्यांची आपल्यापेक्षा मोठी दुःख बघून आपल्या त्रासाला कमी लेखणे देखील योग्य नाही. एखाद्या श्रीमंत माणसाला झाला काय किंवा गरीब माणसाला झाला काय, मनःस्ताप दोघांनाही सारखाच असतो, कारण तो पैसे ओतून कधीही झटकन दूर करता येत नाही. आणि कित्येक मानसिक द्वंद्व अशी असतात जी अशी गणितासारखी सोडवता येत नाहीत.

अमेरिकेतल्या त्या काही आठवड्यांमध्ये मी आयुष्यभर पुरतील एवढ्या गोष्टी शिकले. परत येत असताना, मनात अनेक विचार होते. आणि कदाचित आपला हा सकारात्मक दृष्टिकोन फार टिकणार नाही अशीदेखील भीती होती. पण माझ्या नशिबाने (आणि थोड्याश्या प्रयत्नांनी) तो अजून टिकून आहे. आणि त्यासाठी इतर बऱ्याच लोकांबरोबर मी जॉनाथनची आभारी आहे. नुकत्याच हार्वर्ड युनिव्हर्सिटीत झालेल्या एका प्रयोगाबद्दल वाचनात आलं. १९३९ पासून हार्वर्ड मध्ये दोन गटांचा अभ्यास होतो आहे. ७५० तरुण मुलांचा हा अभ्यास होता. त्यातील कित्येक आज हयात नाहीत. आणि जे आहेत ते सगळे नव्वदच्या उंबरठ्यावर आहेत. अभ्यास होता, "आनंदी, समाधानी जीवनाचे रहस्य काय?". आणि तरुणपणी सगळ्यांनी, "मला भरपूर पैसे किंवा प्रसिद्धी मिळाली तर मी आनंदी होईन" अशी उत्तरे दिली होती. आता मात्र जे खरंच आनंदी आहेत त्यांनी आनंदी जीवनाचे (आणि दीर्घायुष्याचे) रहस्य हे त्यांची जवळची नाती असल्याचे सांगितले आहेत. आपल्या आजूबाजूचे जवळचे लोक आपल्या आनंदाचा प्राणवायू असतात. आणि तसेच आपणही त्यांच्या आनंदाचा असतो. त्यामुळे आपण आनंदी आणि समाधानी राहणे ही चैन नसून एक जबाबदारी सुद्धा आहे.
त्यामुळे जर कुणी मी पहिल्या अपॉइंटमेंटच्या आधी तळ्यात मळ्यात होते तसं असेल, तर त्यांनी आपल्या आतल्या त्या नको म्हणाऱ्या आवाजाला बंद करून जरूर झेप घ्यावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनाची सुस्थिती असताना नात्याच्या , प्रेमाच्या मंडळींकडे मागितलेला सल्ला आणि मन आजारी असताना घेतलेला काउंसेलरचा सल्ला यात फरक नाही का? काही वेळा नातेवाईक, मित्रमंडळी कशाचाच उपयोग होत नाही. चकव्यात अडकल्यासारखे होते. प्रेमाची माणसेही प्रयत्न करुन कोंडी फोडता येत नाही म्हणून काळजीत पडतात. अशावेळी योग्य शिक्षण घेतलेल्या काउंसेलरची मदत फार मोलाची असते.

एक पैसाही न घेता आपल्या भल्यासाठी बोलणारे, वागणारे कुटुंबीय असतात हे मान्य केले जात नाहीये. ह्याचे कारण हे कुटुंबीय त्यांच्या भल्यासाठी आपल्याला विशिष्ट पद्धतीने वागण्यास भाग पाडूही शकत असतील असे गृहीतक असावे.>>>>>>> असंही काही नाही. ते चांगल्या हेतूनी आणि आपल्या काळजी पायी सल्ला देतील ही पण इथे मुद्दा आहे तो म्हणजे तो सल्ला योग्य असेल का? किंवा त्या विषयात त्यांची सल्ला द्यायची बौद्धिक कुवत आहे की नाही हा आहे. आपल्या इथे वाट्टेल त्या विषयावर वाट्टेल ती लोकं वाट्टेल ते सल्ले देऊ शकतात हे आपण सगळेच जाणतो. मित्र, नातेवाईक अगदी आई वडिल असले म्हणजे त्यांना आपल्या मानसिक स्थितीचा, समस्येचा पुर्ण अंदाज येऊ शकतो असं म्हणणं खुपच भाबडेपणाचं होईल. ह्यात त्या लोकांची वैचारिक मचुरिटी हा फार महत्वाचा घटक आहे.

>>>आपण कुठल्या परिस्थितीत अडकलो आहोत ते आपल्यापेक्षा जास्त कोणालाही ठाऊक नसेल
शारीरिक आजारांप्रमाणेच आपल्याला फक्त सिम्प्टम्स कळतात अनेकदा, आणि आपल्या गोतावळ्यालाही.

>>> मनाची सुस्थिती असताना नात्याच्या , प्रेमाच्या मंडळींकडे मागितलेला सल्ला आणि मन आजारी असताना घेतलेला काउंसेलरचा सल्ला यात फरक नाही का?
यू सेड इट!
हे म्हणजे स्क्रू सैल झाला तर स्क्रू ड्रायव्हरने टाइटन कराल, पण स्क्रू ड्रायव्हरच मोडला तर काय कराल?
मन हेच टूल आहे आणि त्यालाच काही कारणाने इजा पोचलेली आहे.
आजारी मनाला उभारी 'सांगून' किंवा 'ठरवून' आणता येत नाही.
'तू फक्त मनावर घे', 'स्नॅप आउट ऑफ इट ऑलरेडी!' ही वाक्य आजारी पडलेल्या मनाच्या माणसाला कधीही ऐकवायची नसतात.
आईवडील, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांचं कुशन आवश्यक असतंच, पण त्यांच्या समजुतीच्या आणि कक्षेच्या बाहेर अनेक बाबी असतात. कधीकधी त्यांनाही अशा व्यक्तीच्या आजूबाजूला कसं वातावरण ठेवावं हे शिकावं लागतं.

आपण मुळात आजारांमध्ये शारीरिक आणि मानसिक असा भेद करायचं सोडून दिलं तर हे कळायला मदत होईल.

सहसा सर्दीखोकलातापावर ओव्हर-द-काउंटर औषधं, आजीचा एखादा काढा, थोडी रेस्ट, आईच्या हातची खिचडी वगैरे वगैरे लागू पडतंच, पण ताप या सर्वांना दाद देईनासा झाला की डॉक्टरचा सल्ला घेतोच ना आपण? का घेतो? कारण ताप हा फक्त सिम्प्टम असतो. अन्डरलायिंग कारण समजून उपचार करण्यासाठी प्रोफेशनल हेल्पच लागते.

>> सहसा सर्दीखोकलातापावर ओव्हर-द-काउंटर औषधं, आजीचा एखादा काढा, थोडी रेस्ट, आईच्या हातची खिचडी वगैरे वगैरे लागू पडतंच, पण ताप या सर्वांना दाद देईनासा झाला की डॉक्टरचा सल्ला घेतोच ना आपण? का घेतो? कारण ताप हा फक्त सिम्प्टम असतो. अन्डरलायिंग कारण समजून उपचार करण्यासाठी प्रोफेशनल हेल्पच लागते.

सर्दी, ताप, खोकला इत्यादी (आपल्याला शुद्ध असते किंवा आपण केपेबल असतो) तेव्हा त्यातला सिरीयसनेस समजून आपणच जातो डॉक्टर कडे.

वरच्या लेखातून प्रॉब्लेम ची तीव्रता अधोरेखीत होत नाही. तेव्हा ती व्हायरल सर्दी पडसं इथपासून ऑपॉर्चुनिस्टीक इन्फेक्शन्स इथपर्यंत काहिही असू शकेल. तेव्हा सर्व सामान्य रीडर ला त्याची इन्टेन्सिटी कळली नाही. Happy

सर्वसामान्य वाचकाला तिच्या प्रॉब्लेमचं स्वरूप आणि इन्टेन्सिटी कशाला कळायला हवी आहे? अशी आवश्यकता तुम्हाला स्वतःसाठी किंवा जवळच्या कोणा व्यक्तीसाठी भासली तर काउन्सिलिंग/उपचार घेण्यात हयगय करू नका इतकाच मुद्दा आहे आणि तो पुरेसा आहे.
हा मुद्दा मांडणं का आवश्यक आहे हे काही प्रतिक्रियांनी दाखवून दिलंच आहे.

आईवडील (भारतातले आईवडील!) सर्वज्ञ असते तर दहावी बारावीच्या मुलांनी रिझल्ट लागण्याआधी आत्महत्या केल्या नसत्या किंवा कोणी कधी अल्कोहोल, ड्र्ग्ज इत्यादींच्या आहारी गेलं नसतं.
आता फक्त कोणीतरी 'भारतात नै बॉ कोणी तसलं काही करत!' एवढं लिहावं.

सर्वसामान्य वाचकाला तिच्या प्रॉब्लेमचं स्वरूप आणि इन्टेन्सिटी कशाला कळायला हवी आहे? अशी आवश्यकता तुम्हाला स्वतःसाठी किंवा जवळच्या कोणा व्यक्तीसाठी भासली तर काउन्सिलिंग/उपचार घेण्यात हयगय करू नका इतकाच मुद्दा आहे आणि तो पुरेसा आहे.>>>> +१

>> स्वतःसाठी किंवा जवळच्या कोणा व्यक्तीसाठी भासली तर काउन्सिलिंग/उपचार घेण्यात हयगय करू नका इतकाच मुद्दा आहे

हा मुद्दा मान्य आहे.

(अवांतरः पण अ‍ॅनॉलॉजी वापरलीच आहे तर "मला सर्दी खोकला झाला होता आणि घरगुती उपायांनीं फरक पडला नाही तेव्हा ... " हे माझ्यासारख्या सर्व सामान्य वाचकाला कळलं असतं तर माझ्याकडून फाटे फोडले गेले नसते. असो.)

मी उद्या लिंक शोधायचा प्रयत्न करतो, पण मागे कुठेतरी वाचलेले की मानसिक आजार हा श्रीमंतांचा आजार आहे. म्हणजे टक्केवारी पाहता आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत असलेल्यांना हा आजार जास्त होतो.
यात कितपत तथ्य आहे, असावे.
लहान मुलांना त्या सर्व्हेतून वगळले होते असे आठवते.

>>बरेच दिवस, "तू खंबीर आहेस. तुला कुठल्याही मदतीची गरज नाही. ही एक फेज आहे, जाईल." अशी स्वतःची समजूत घालून कंटाळल्यावर एक दिवस मी तो निर्णय घेतला.>> हे सुरवातीचे वाक्यच बरेच काही स्पष्ट करते की.

लेखातला मुख्य विचार सोडून बेफींचं मधेच भारत वि. अमेरिका स्टेशन लागलं ? का? Happy
सशल चा मुद्दा काय आहे नक्की तो नीट कळला नाही. "काउन्सेलर पेक्षा आपणच आपल्या मनाच्या अवस्थेचे बेस्ट जज असतो" असे म्हणायचेय का?

चांगला लेख आणि काही चांगल्या प्रतिक्रीया Happy

आता काही वेळात पुढील स्टेशन हट्टी-कट्टी गरिबी व्हर्सेस लुळी-पांगळी श्रीमंती Happy

मैत्रेयी, मला एव्हढंच म्हणायचं आहे की छोट्या मोठ्या प्रश्नांसाठी (जे आपल्या सगळ्यांनां सतत पडत असतात आणि त्या त्या वेळी त्याचं काही सोल्युशन नाही असं वाटत असतं) दर वेळी प्रोफेशनल काउन्सेलींग चीच गरज असेल असं नाही. असे छोटे मोठे प्रश्न शक्य असल्यास स्वतःचे स्वतः, किंवा मग नातेवाईक, मित्र मंडळी ह्यांच्याशी बोलून कदाचित काही मार्ग सुचू शकतो.

ह्यापलिकडे काही वेळा काही प्रश्न असे असू शकतात जे मूळात आपल्या परीने कितीही प्रयत्न केले तरी सुटण्याची शक्यता नाही तेव्हा प्रोफेशनल काउन्सेलींग जरूर गाठावं, त्यात कमी पणा वाटून घेऊ नये.

आता इकडे थांबते. बहुतेक लेख वाचून तुमच्या सगळ्यांपेक्षा मला थोडा निराळा अर्थ लागला. पण लेखाच्या समर्थनार्थ जी पोस्ट्स आली आहेत इकडे ती सर्व मला पटलेली आहेत.

सशल, मला नाही वाटत की कुणी बारीक सारीक प्रश्नांकरता काऊन्सेलर गाठत असेल. स्वतःच्या खिशातून पैसे जात असतात तेव्हा कुठून काहीच मदत मिळण्यासारखी नाही असं वाटत असेल तेव्हाच ही स्टेप घेतली जाते. तोवर तू म्हणतेस तेच उपाय जनरल पब्लिक वापरत असणार.

>> मला नाही वाटत की कुणी बारीक सारीक प्रश्नांकरता काऊन्सेलर गाठत असेल

इकडे अमेरिका आणि भारत इथली लाईफस्टाईल किंवा श्रीमंत्/संपन्न आणि गरीब, मॉडर्न/ऑर्थोडॉक्स थिंकींग हे फरक असू शकतात ( ;)) असं काही लोकांनां वाटू शकतं.

बारीक-सारीक प्रश्नासाठी कुणी कौन्सेलर गाठला तर त्यात वावगं काय? आपला पैसा, वेळ कुणी कसा वापरावा हे आपण कसं ठरवणार? एखाद्याने आपला सदरा आपण शिवावा, शिंप्याला द्यावा का आयता विकत घ्यावा ह्यात आपण ढवळाढवळ करत नाही. तसंच एखाद्याने आपले मानसिक भावनिक प्रश्न कसे सोडवले ह्यात का ओपीनीयनेटेड व्हायचं??

नातेवाईक सोडून प्रोफेशनल तज्ज्ञांकडे (पैसे देऊन) का जायचं?

छोट्या छोट्या प्रॉब्लम्स साठी नातेवाईक असतातच. खूप कमी लोक असे असतील जे २-३ दिवस वाईट वाटतंय म्हणून डॉकटर कडे जातात.
पण मोठ्या मोठ्या स्थित्यंतरांमध्ये, कधी कधी आपल्या घरातील बुजुर्गांनादेखील त्या परिस्थिती कसे वाटते याचा अनुभव नसतो कारण त्यांनी तसे आयुष्य जगलेले नसते. अशावेळेस बरं वाटण्याऐवजी कलह होण्याचा संभव असतो.

आणि दुसरा जास्त महत्वाचा मुद्दा असा की आई वडील, मित्र मैत्रिणी या नात्यात देखील बाऊंड्रीज असाव्यात. कोणी सतत आपल्याकडे या ना त्या गोष्टीची तक्रार करू लागले की थोडे दिवसांनी त्यांच्याशी बोलण्याचा ताण येतो. प्रत्येकाला त्याचं आयुष्य असतं. आणि कधी कधी आपलं ऐकून घेणाऱ्या व्यक्तीलादेखील त्यातून निगेटिव्ह वाटू शकतं.

मी सांगणाऱ्या आणि ऐकणाऱ्या दोन्हीही भूमिकेत राहून बघितलेलं आहे. आणि शेवटी आनंदी राहण्यासाठी काही रूटीन आणि काही ऍक्टिव्हिटी अशा दोन गोष्टी माझ्या पुरत्या ठरवल्या. आपल्या आयुष्यात अचानक घडलेल्या एखाद्या आघातामुळे जसं समुपदेशन लागू शकतं, तसंच, "आपण जशी कल्पना केली होती, तसं आपलं वैयक्तिक किंवा प्रोफेशनल आयुष्य झालं नाही", या गोष्टीचा देखील हळू हळू पण प्रचंड ताण येऊ शकतो. तसंच, आपल्या आजूबाजूंच्या मनानी आपण "मागे" राहिलो याचादेखील त्रास होतो. आणि या त्रासात भारतात तरी बहुतांशी आई बाबा ऐकणाऱ्याच्या भूमिकेत नसून तसे वाटण्याचे कारण असतात. माझ्या वाट्याला हे आले नाही पण मी माझ्या आजूबाजूच्या खूप लोकांमध्ये हे बघितले आहे. आघात झाल्यावर नातेवाईक मदतीला येतात. पण आपली वाट थोडीशी जरी वेगळी असेल, तर नातेवाईक नेहमीच ती समजून घेऊ शकत नाहीत.

कुणाशीही तुलना करायची नाही, हा सल्ला जरी अगदी घोकला तरी तो आचरणात आणायला कैक वर्षं लागू शकतात. आणि आपण मोठे होताना कायम जर कुणाच्या तरी तुलनेत कसे आहोत असे निकष लावले असतील तर त्यातून सुटायला खूप प्रयास घ्यावे लागतात. आणि ते करायला आधी आपली विचारांची पाटी कोरी करावी लागते.

सई लेख आवडला.
स्वाती आंबोळे , प्रतिसाद आवडले.

माझा अनुभव असा आहे की भारतात सायकिअ‍ॅट्रिस्ट्/काऊंसेलर अजूनही फार ट्रॅडिशनल विचार करतात आणि ट्रॅडिशनल पद्दतीने समजावतात.त्यातही स्त्री काऊंसेलर असेल तर बघायलाच नको.
एका विशिष्ट चौकटीतच मार्ग काढायचा त्यांचा सल्ला असतो.

बाकी सशल म्हणाली तसं शेवटी सायकीअ‍ॅट्रीस्ट /काऊंसेलरही अनेक मार्ग दाखवतात.पण निवड आपल्याला करायची असते.
शारिरीक रोगाबद्दल किंवा मनाच्याही काही आजारांबद्दल डॉक्टर देतील तो सल्ला पाळावा लागतो. फार्माकॉलॉजिकल ट्रीटमेंटमध्ये निवड करण्याइतकं ज्ञान अजूनही आपल्या पेशंटांना नाही.

मात्र मनोव्यापाराच्या प्रॉब्लेम्समध्ये काऊंसेलर फक्त पथदर्शक असतो. किंवा तुम्हाला सारासार विचार करता येईल अशा मनाच्या समतोल पातळीवर आणून ठेवायचे काम करणारा असतो. त्यानंतर काय करायचे हे आपले आपणच ठरवणे योग्य.

स्वाती आंबोळे, अतिशय सुंदर मांडलं!
याचा पॅराफ्रेज म्हणून एक म्हणता येईल, जे मला लेखातच म्हणायचं होतं पण राहून गेलं, की 'आनंदी राहणं' हे एफर्टलेस दिसलं, तरी (जसं वय वाढतं) तसं आनंदी राहायला प्रचंड मानसिक परिश्रम घ्यावे लागतात. एखादी पट्टीची गायिका सहज ताना घेते, किंवा नर्तिका गिरक्या घेते, त्या ऐकायला आणि बघायला कितीही आल्हाददायक आणि हलक्या वाटल्या तरी त्यामागे प्रचंड रियाज असतो. तसेच एखादा माणूस कायम आनंदी असतो असं दिसलं की नेहमी पाहिलं कन्क्लुजन हे "तो किती नशीबवान आहे" असं निघतं. पण आनंदी राहणारे लोक सतत एक वेगळ्या प्रकारचा रियाजच करत असतात. त्यांच्या आयुष्यात डोकावून बघितलं की हळू हळू दिसायला लागतं.

आनंदी राहणं सोपं नाही. हा देखील एक प्रकारचा व्यायाम आहे.

सुंदर लेख, सई!! इथल्या काही प्रतिक्रिया वाचून समुपदेशनाबद्दल अजूनही लोकांच्या मनात किती आकस आहे हेच दिसून येतं....वास्तविक नातेवाईक, मित्र-मंडळाला आप ल्याबद्दल बरीच माहिती असल्याने ते नीट सल्ला देऊ शकतील हे खरं असलं तरी एखाद्या प्रसंगी जेव्हा तटस्थ मताची गरज असते तेव्हा समुपदेशक उपयोगी पडू शकतो. स्वतःचे biases मध्ये न येऊ देता जवळच्या कोणाला सल्ला देणं कठीण काम आहे.

चांगले लिहिलय, पण अपुरे वाटले.

वरील जे वाचले त्यावरुन सुचले:
>>>> आता मात्र जे खरंच आनंदी आहेत त्यांनी आनंदी जीवनाचे (आणि दीर्घायुष्याचे) रहस्य हे त्यांची जवळची नाती असल्याचे सांगितले आहेत. <<<<
"जवळची नाती" म्हणजे तरी काय? अशी गरज नाही की ती "रक्ताचीच" नाती असावित.
अन अशी कोणतीही नाती जपणे म्हणजे तरी काय? त्यांचेकडून मी व माझे कडून त्यांनी काही अपेक्षा बाळगणे, व एकमेकांनी त्या सर्वतोपरी पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे... निदान प्रयत्न करीत असल्याचे एकाचे दुसर्‍यापर्यंत पोहोचणे.....
या अपेक्षांमधे काय येऊ शकते? तर केवळ शाब्दिक प्रोत्साहन/कौतुक्/शाबासकीची थाप इथपासुन ते जीवघेण्या संकटात शारिरीक्/आर्थिकदृष्ट्या मदतीस उभे रहाणे.
देणे/घेणे केवळ पैशाचे/संपत्तीचे/वस्तुंचेच असते असे नाही, ते शब्दांचेही असू शकते.
अशा देण्याघेण्याचे सुयोग्यरित्या निरपेक्षपणे जोडलेले संबंध ती नाती...
निरपेक्षपणे म्हणायचे कारण असे की, मी अमक्याकरता काही केले म्हणजे त्यानेही परतफेड केलीच्च पाहिजे अशी अपेक्षा नसणे.... मगच ते नाते परिपूर्ण बनते असे माझे मत.
इथवर जर पटत असेल, तर दुसर्‍याकरता काहीही करणे, शाब्दिक आधार असेल, सदिच्छा / आशिर्वाद असतील किंवा प्रत्यक्ष वस्तु/पैसा /श्रमरुपाने केले गेले असेल, तर मग हाच तर तो पुराणप्रसिद्ध "त्याग" नव्हे का?
खूप लहानपणी सत्तरच्या दशकातील मराठी पुस्तकात एक धडा होता, नंतरच्या पुस्तकातुन असे धडे वगळले जाऊ लागले तो भाग निराळा. पण त्या धड्यात दोन मेणबत्तींच्या रुपकातुन (एक मेणबत्ती न वापरली गेल्याने सडलेली, तर दुसरी वापरातली जळत झिजत चाललेली) जीवनाचे सार मांडले होते, की जो स्वतःकरता/स्वतःपुरता जगला तो संपला, जो दुसर्‍याकरता जगला तो जगला - अमर झाला.

असो. आजवरच्या आयुष्यात मी दुसर्‍यांकरता किती जगलो, अन स्वतःकरताच किती जगलो याचा हिशोब लावु पाहिला तर अंगावर काटा येतोय. आई म्हणायची, स्वतःकरता तर काय, कीडामुंगीही जगतातच. माणुस म्हणून तुझे वेगळेपण काय आहे? येव्हडा परमेश्वराने दिलेला धडधाकट देह, त्याच्याच गरजांपोटी जगत/श्रमत राहिलास, तर त्यात विशेष काय? तुझ्या असण्याचा आजवर या जगाला - दुसर्‍यांना किती उपयोग झाला?
माझा आत्तापर्यंतचा आकडा तरी निगेटीव्ह आहे.... अन तो पॉझिटीव्ह करण्याच्या प्रयत्नात आहे. Happy

चार माणसे...

हयातीत असावीत जोडलेली चार माणसे
मयतिला काय करायचीत हजारो माणसे

सुखात असावी सहभागी चार माणसे
दुःखांत काय करायचीत मुखवट्याची माणसे

माहेर सोडून येते जेव्हा मायेची चार माणसे
पाठीशी असावीत घरातील चार माणसे

सद्वर्तनं असावे तर नावाजतील चार माणसे
अथवा बोलतील माघारी चार माणसे

राजेंद्र देवी

मस्त लेख सई, खूप रिलेट झाले. सगळ्यांच्याच प्रतिक्रिया खूपच आवडल्या.
"जवळची नाती" म्हणजे तरी काय? अशी गरज नाही की ती "रक्ताचीच" नाती असावित.
अन अशी कोणतीही नाती जपणे म्हणजे तरी काय? त्यांचेकडून मी व माझे कडून त्यांनी काही अपेक्षा बाळगणे, व एकमेकांनी त्या सर्वतोपरी पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे... निदान प्रयत्न करीत असल्याचे एकाचे दुसर्‍यापर्यंत पोहोचणे.....
या अपेक्षांमधे काय येऊ शकते? तर केवळ शाब्दिक प्रोत्साहन/कौतुक्/शाबासकीची थाप इथपासुन ते जीवघेण्या संकटात शारिरीक्/आर्थिकदृष्ट्या मदतीस उभे रहाणे.
देणे/घेणे केवळ पैशाचे/संपत्तीचे/वस्तुंचेच असते असे नाही, ते शब्दांचेही असू शकते.
अशा देण्याघेण्याचे सुयोग्यरित्या निरपेक्षपणे जोडलेले संबंध ती नाती...
निरपेक्षपणे म्हणायचे कारण असे की, मी अमक्याकरता काही केले म्हणजे त्यानेही परतफेड केलीच्च पाहिजे अशी अपेक्षा नसणे.... मगच ते नाते परिपूर्ण बनते असे माझे मत. >>>> + १

मला स्वतःला therapy चा उप्योग झला आहे.

जवलचे मित्र मैत्रिणी हा उपाय १ month वापरुन situation बदलत नवती.

therapist helped me out.

अड्ड्यावरिल माझ्या पोस्टी, वरील विषयाशी सुसंगत वाटल्या म्हणून इथे पुनरुधृत केल्या आहेतः

>>> आपोआप आनंदी राहता येतच नाही, असे होऊ नये, म्हणून मुद्दामून आनंदी राहायचा प्रयत्न करत जावा. <<<
आपोआप आनंदी राहता येतच नाही, असे नाही...
जोवर (म्हणजे न कळत्या लहान वयात) आनंद/दु:ख/राग वगैरे भावभावना निव्वळ शरिराच्या अनुभुतिंवर अवलंबुन असतात, तोवर जास्तीत जास्त काळ आनंदातच जातो, पण जेव्हा बुद्धी/विचार्/मन वगैरे बाबी कार्यरत होतात, तेव्हा भावभावनांचा, खास करुन आनंदाचा ट्रिगर या "बुद्धिवादात" अडकुन आनंदाची वाट लागते, अन मग वरील सारखे प्रश्न पडतात की आनंद मानुन घ्यायचा की कसे. Happy असो. इथे जास्त लिहुन उपयोग नाही, वाहुन जाणार (धागाही अन पालथे घडेही Proud )

>>>> मानसिक आरोग्यासारख्या महत्वाच्या मुद्द्याचे ट्रिव्हिअलायझेशन करणार्‍यांचा निषेध <<<
British English: trivialize VERB. If you say that someone trivializes something important, you disapprove of them because they make it seem less important, serious, and complex than it is.It never ceases to amaze me how the business world continues to trivialize the world's environmental problems.

च्यामारि, उगाचच शेंडाबुडखा नसलेले विन्ग्रजी शब्द वापरायचे.... काही संबंध तरी आहे का? ट्रीव्हीलाईज का फ्रिव्हीलाईज करण्याचा?
सिंपल तत्त्व मांडलय, निरागसतेचे, मानसिकतेचाच संबंध ठेवुन, की जोवर बुद्धी कार्यरत नसते, केवळ शरिराशी संबंधित ज्ञानेंद्रिये कार्य करत असतात, त्यावेळेस "आनंदी " रहाणे केवळ शारिरीक वेदना/भुक इत्यादी प्रतिकुल घटनांमुळेच व्यत्यय पावते - अन्यथा स्वतःचे अस्तित्व, सृष्टीचे अस्तित्व केवळ अन केवळ आनंददायीच असते.

पण जेव्हा बुद्धी कार्यरत होते, तेव्हा "अधिक काहीतरी" हवे, इतरांपेक्षा जास्त हवे, वेगळे हवे, फक्त मलाच हवे, मग भिती/क्रोध/स्वार्थ, इत्यादी अनेकानेक विचारप्रणालीतुन असलेला आनंद उपभोगण्याचे राहुदेच, समजुन घेण्याची क्षमताही माणूस गमावुन बसतो.
लहानपणीची निरागसता घालवुन बसतो. Happy

सई खूप छान लिहिलंयस.
स्वाती अंबोळे आणि स्वाती २ तुमचे प्रतिसाद आवडले.

लेखात मांडलेले आणि प्रतिसादात आलेले सर्व मुद्दे छान आहेत (काही सोडल्यास)
मला स्वतःला समुपदेशनाचा प्रचंड् उपयोग झालेला आहे. लोक विचारतात समुपदेशन म्हणजे नक्की काय? मग लेमन लॅन्ग्वेज मध्ये त्यांना काय उत्तर द्यायचं? असा प्रश्न मला बर्‍याच वेळेला पडतो.

समुपदेशन ही एक साधना आहे, ती साधना आयुष्यभर केली तरी अपुरी पडू शकते कारण प्रत्येक वेळेला आपण आपल्याला नव्याने समजत असतो, उमजत असतो. प्रत्येक प्रसंगात आपले फॅमिली मेंबर्स आपल्या भोवती असतातच, पण त्यांच्या सल्ल्यात ऑब्जेक्टिव्हीटी पेक्षा कधी कधी 'मी मोठा/मोठी आहे, मला अनुभव जास्त आहे, त्यामुळे तु मी सांगतो/तेय ते ऐक असा सूर असतो. प्रोफेशनल हेल्प घेणं हे अजिबात कमीपणाचं नाही. उलट हे लोक प्रोफेशनली ट्रेन्ड असल्याने आपल्या मनातला गुंता सुटायला मदत होते. कुटुंबात बोलताना मनावर दडपण येऊ शकते, बायसेस, जज केलं जाण्याची भिती.... ही कायम मागे असतेच.

>>जे मला लेखातच म्हणायचं होतं पण राहून गेलं, की 'आनंदी राहणं' हे एफर्टलेस दिसलं, तरी (जसं वय वाढतं) तसं आनंदी राहायला प्रचंड मानसिक परिश्रम घ्यावे लागतात. एखादी पट्टीची गायिका सहज ताना घेते, किंवा नर्तिका गिरक्या घेते, त्या ऐकायला आणि बघायला कितीही आल्हाददायक आणि हलक्या वाटल्या तरी त्यामागे प्रचंड रियाज असतो. तसेच एखादा माणूस कायम आनंदी असतो असं दिसलं की नेहमी पाहिलं कन्क्लुजन हे "तो किती नशीबवान आहे" असं निघतं. पण आनंदी राहणारे लोक सतत एक वेगळ्या प्रकारचा रियाजच करत असतात. त्यांच्या आयुष्यात डोकावून बघितलं की हळू हळू दिसायला लागतं.

आनंदी राहणं सोपं नाही. हा देखील एक प्रकारचा व्यायाम आहे. >> सई हे तु कित्ती सुंदर लिहिलंयस... अगदी अगदी झालं वाचताना.

सईचा लेख आणि स्वाती आंबोळेंच्या प्रतिक्रिया दोन्ही पटलं.

मी स्वतः अतिम्हत्त्वाच्या, कठीण फेजमधून पार पडता यावं म्हणून कौन्सिलिंग घेतलंय. पहिला झटका जेव्हा इंजि.च्या इअर डाऊनमुळे बसला तेव्हा. आधीच १२वीचं नाटक, त्यात एक वायडी झालं आणि केटीज सुटल्या नाहीत तेव्हा मी डिपरेस झाले होते. कौन्सेलिंगचा खूप उपयोग झाला आणि दुसरं वायडि नाही झालं.

दुसरा धक्का खूप जास्त इंटेन्स होता. न सांगता येण्यासारखा. आणि विशेष म्हणजे दोन्ही वेळी आई-बाबा कौन्सेलिंगच्या बाजूने सकारात्मक होतेच, शिवाय तेही वेळोवेळी डॉक. शी बोलून मला समजून घेत होते.

आता यातून 'ही मनाने कमकुवतच आहे. सारखच काय आई-बाप-डोक्टरांच्या आधारावर जगायचं. दु:ख मोठं करायची सवय झालिये' हे मी ऐकून घेतलं. काही वेळा मलाही असंच वाटतंय का, मी खरंच कमकुवत आहे का असे टोकाचे विचारही करून झाले.मग यथावकाश यातून बाहेर पडले. आता मला मोजकी नाती सोडली तर जग काय म्हणेल याची पर्वा नाही. आणि प्रत्येक गोष्ट किती ताणयची, कुठल्या गोष्टिसाठी किती वेळ द्यायचा, कशाचा किती त्रास करून घ्यायचा याचा विचार माझा मी करते, आणि निर्णयासाठी कुणावरही अकारण अवलंबून रहात नाही.
याचा अर्थ असा नक्की नाही की मी बेपर्वाईने वागायला लागलेय! फक्त प्रायॉरिटिज, अपेक्षा करणं, स्वतःबद्दलची मतं या आणि अशा अनेक गोष्टि गरजेप्रमाणे नव्याने तपासायची सवय लागली आता.
पोस्ट अस्थानी वाटल्यास संपादित करीन.

सई, आनंदी राहण्याच्या पोस्टसाठी +१
लिंटी, trivialize करणे म्हणजे सोपे करणे असा अर्थ नाही जसा तुम्ही समजता आहात. To trivialize म्हणजे एखाद्या गोष्टीचं महत्त्व कमी करणे, कमी लेखणे.

>>> लिंटी, trivialize करणे म्हणजे सोपे करणे असा अर्थ नाही जसा तुम्ही समजता आहात. To trivialize म्हणजे एखाद्या गोष्टीचं महत्त्व कमी करणे, कमी लेखणे. <<<
नाही हो, मी सिम्पल्/सोपे करणे असा अर्थ घेतला नाहीये, जो अर्थ गुगल वरुन मिळाला तो जसाच्या तसा दिलाय. अन सांगु पाहिलय, की मी ट्रीव्हिलाइज केले नाहीये, तर सिम्पली (सहजगत्या) एक सूत्र मांडले आहे Happy
असो.

Pages