३) गुप्तहेर बबन बोंडे - मेरा बटू

Submitted by सखा on 30 December, 2016 - 10:32

>>>दोनच मिनिटात विमानाचा स्फोट झाला आणि त्याची वेताळ पंचविशीत कवटीची असतात तशी  पंचवीस हजार शकले होवून आभाळाच्या पायाशी लोळू लागली<<<

(चार दिवस आधी - दिल्ली)

आता जरा आपण चार दिवस मागे जावून घटनाक्रम बघूया.
दिल्ली शहरात नुकतेच बांधण्यात आलेले एक अत्याधुनिक सायन्स म्युझिअम. आज मात्र इथे VIP लोक काही केवळ जुन्या चुली आणि मोटारी पाहायला जमले नव्हते ते आले होते अणुबॉम्ब बघण्या साठी. आता कोणी म्हणेल कि त्यात काय बघायचे? पण लोकहो हा काही साधासुधा बॉम्ब नव्हे हा भारताने बनवलेला पहिला आणि जगातला सर्वात छोटा अणु बॉम्ब . छोटा? पण किती छोटा? मित्रहो अंड्याच्या आकाराचा हो हो कोंबडीच्या अंड्या एव्हढा. लांबून पाहिल्यास चमकदार हिरा वाटावा असा पण शंभर मैलावरून रिमोट ने उडवता येईल इतका अत्याधुनिक. अत्यंत शक्तिशाली. त्याचे नाव होते "मेरा बटू".     
"मेरा बटू" अणुबॉम्ब ची लोकांना जवळून माहिती मिळावी व पाहता यावा म्हणून मुद्दाम खास सात दिवसा साठी सरकारने केवळ खासदार आणि त्यांच्या नातेवाइका साठी म्युझिअम मध्ये उपलब्ध करून दिला होता. सरकारने म्युझिअमच्या दालना मध्ये अर्थातच अत्यंत कडक सुरक्षिततेची व्यवस्था केली होती. एका वेळी फक्त चार व्यक्ती त्या महाकाय दालनात प्रवेश करू शकत. दालनाच्या मधोमध सहा फुट परिघाच्या काचेच्या गोलाकार बरणीत चमकदार "मेरा बटू" विराजमान होता.  दालनाच्या भिंतीपाशी प्रत्येकी एक मशीनगनधारी सैनिक तैनात होता.  पुढचे व्हिझिटर्स जे चार लोक होते ते सारे बिचारे साधू होते. बहुदा हिमालयातील असावेत.
सर्वांनी मनोभावे बॉम्ब वंदन केले. एकाने हळद कुंकू लावून काचेवर स्वस्तिक काढले. तो पर्यंत दुसर्याने आपल्या झोळीतून मोबाईल वर आरती लावली तर एकाने नारळ काढला. सुरक्षा सैनिक अस्वस्थ झाले त्यामुळे मग एकाने त्यांच्या हातात प्रसाद म्हणून खडीसाखर व बदाम दिले. आता धार्मिक बाब असल्याने आणि आधीच इकोनोमी वाईट असल्याने आणि धार्मिक भावना दुखावल्या जाण्याच्या भीतीने सैनिकांना नेमके काय करावे हे कळेना. तेवढ्यात त्यांना अतिशय मधुर असा उदबत्तीचा वास आला आणि सारेच सैनिक जणू काही ब्रम्हानंदी टाळी लागल्या सारखे नाचू लागले. साधूनी मात्र नाकपुड्यात gas filters घातले असल्याने  त्यांना टाळी लागण्याची शक्यताच नव्हती.
आता मात्र पुढच्या घटना अतिशय वेगात घडल्या. सैनिक ट्रान्स मध्ये जाताच एका साधुनी नारळ जोरात काचेवर फेकून मारला तसा मोठा स्फोट होवून काच फुटली आणि काचेला भलेमोठे भगदाड पडले धूर झाला. साधुनी त्वरित मास्क आणि गोगल चढवले. एकाने चटकन आत शिरून बॉम्ब आपल्या झोळीत टाकला न  टाकला तोच  काय आश्चर्य एक मोठा स्फोट होवून दालनाच्या छताला एक चार फुटी भगदाड पडले आणि त्यातून दोन दोरखंड खाली आले चारीही साधू हुप्प्या माकडा सारखे सपासप दोर चढून गेले वरून  दोरखंड फेकणार्या हेलिकॉप्टर मधून क्षणात पसार झाले.   
त्या दिवशी सगळ्या TV चानेल वर एकाच बातमी:
"मेरा बटू घेवून भामटे पळाले. कौन हैं वो आदमी?"

नवीन मिशनला जाण्या आधी एकदा प्रियांका मस्काला भेटायला हवे असा सुज्ञ विचार करून बबनने तिला फोन केला. तिची आज एका प्रोड्युसर बरोबर बिकिनी शूट नंतर डिनर मिटिंग होती तेव्हा ती म्हणाली कि तू आम्हाला तिथेच जॉईन हो. बबनच्या सेक्रेटरीने सांगितले कि एक फायटर विमान मुंबई ला जाते आहे  आणि कॅप्टन बबन ची  fan आहे. बबन मग त्या एअरफोर्सच्या फायटर जेट ने उमद्या पायलट मिस के. लताशी गप्पा मारत  मुंबईला रवाना झाला.  स्त्रियांना प्रवासाची आवड असते आणि त्यांना फुले,ग्रीटिंग कार्ड्स,कपडे,पर्सेस,शूज,शॉपिंग आणि सरप्राइजेस आवडतात हे बबन आपल्या अडव्हांस ट्रेनिंग मध्ये शिकला होता. आता या ठिकाणी दुसरा मुद्दयातील शेवटचे कलम लागू असल्याने विमान लौकर पोहोचल्याने बबनने के. लताचे कॉफी इंव्हीटेशन नाकारून प्रियांकाच्या फोटोशूटच्या ठिकाणीच जाण्याचा निर्णय घेतला. तिथे त्याला ग्रीनरूम चा रस्ता दाखवण्यात आला. त्याला अचानक आरशात पाहून लाल बिकिनीतील प्रियांकाने आनंदाने किंकाळीच मारली आणि  जसे तिने अनेक चित्रपटा मध्ये आपल्या विविध हीरोंचे रसरशीत किवा उत्कट किवा तत्सम प्रकारचे चुंबन घेतले होते त्याही पेक्षा दुप्पट जोशाने बबनचे घेतले हे चतुर वाचकांना सांगायलाच हवे का? बबनलाही प्रतिसाद देण्या शिवाय पर्याय नव्हता किंबहुना न देण्यास काहीच कारण नव्हते त्या मुळे तो देखील आपल्या कार्यात मनपूर्वक मग्न झाला. या ठिकाणी आम्ही हि स्टोरी जरा इथे पॉज करत आहोत. आम्हास ठाऊक आहे की इथे ९४ टक्के वाचकांना बबन प्रियांकाच्या हॉट प्रणय दृश्याने मजा येत असेल, ४ टक्के वाचकांना हे नेमके काय चालले आहे हे अजिबात कळत नसेल आणि  उरलेल्याना २ टक्का सन्माननीय मंडळींना संस्कृती अधःपतन वगैरेची गरळ ओकण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे .या सन्माननीय मंडळींना त्यांनी बबन अथवा त्याच्या लेखकाचा जाहीर निषेध करण्या आधी आम्ही हे विनम्र पणे सांगू इच्छितो कि कुठल्याही गुप्तहेराला शृंगारा पासून बुन्गार्या पर्यंत कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यावे लागते आणि तसे त्यांना ट्रेनिग असते. आम्हाला काही मस्तराम अथवा सविता भाभी सारख्या रसभरीत कथा लिहिण्यात स्वारस्य नाही इथे आम्ही एका बाक्या भारतीय वीराचे स्फूर्तीदायक आयुष्य वर्णीत आहोत त्यामुळे त्याच्या आयुष्यात येणारे प्रसंग आम्हाला सांगणे भाग आहे. या उपर आपली मर्जी आपण सुज्ञ आहात. 
चुंबन चापटीचे काम चालू असतानाच हळूच दरवाजा करकरला आणि प्रियाच्या डोळ्यात बबन ला एक hat घातलेला दांडगा माणूस दिसला. त्याला आपण पूर्वी कुठे तरी पहिले आहे असे बबनच्या तल्लख मेंदूने त्याला सांगितले.  मांजराला जशी उंदराची चाहूल लागते तशीच गुप्तहेराला संकटाची. बबनने आपले हातातले किंबहुना तोंडचे काम न सोडताच एका पायाने गाढवाला लाजवेल अशी जबरदस्त ब्याक किक हाणली तसा तो माणूस उलटा पालटा होत खाली पडला. बबनने मग प्रियाला सोडून सरळ त्याच्यावरच झडप घातली काय होते आहे हे कळायच्या आतच त्या बलदंड माणसाला मिनिटात साठ गुद्दे लागले. मग दोन वेळा त्या व्यक्तीला आपण छता वरच्या पंख्या जवळ गेलो आहोत आणि नंतर जमिनीवर  येतो आहोत एव्हढेच कळाले. मेलो मेलो म्हणून त्याने मरणप्राय बोंब ठोकली आणि मार खावून तो थकलेल्या बेडकी सारखा तो जमिनीवर कण्हत निपचित पडला. त्याला बघून प्रियाने भीतीने किंकाळीच फोडली. बबन म्हणाला घाबरायचे कारण नाही हा आता किमान सहा महिने तरी हॉस्पिटलच्या बाहेर येणार नाही. त्यावर प्रियाने अजूनच जोराने किंकाळी फोडली आणि ती धाय मोकलून रडू लागली. किती हळव्या असतात स्त्रिया कुणाचे दुख्ख वेदना यांना पाहवत नाहीत. अगदी शत्रूचे सुध्धा!!
पंधरा मिनिटाने मागच्या दरवाजाने बबन जेव्हा तिथून घाईघाईत बाहेर पडला तेव्हा तो प्रियाच्या आकांड तांडवाचे, अश्लील शिव्याशापाचे आणि तीव्र दुख्खाचे कारण समजू शकत होता. आपल्याला करोडो रुपये देणाऱ्या, आपल्यावर लट्टू निर्मात्याची, अशी बेदम धुलाई झालेली आणि त्याचे दात पडल्याने त्याच्या बरोबर असलेली डिनर मिटिंग कॅन्सल झालेली कुठल्या करिअरीस्ट अभिनेत्रीला आवडेल? तुम्हीच सांगा?
(दुसरा दिवस दिल्ली )        
कुणीही सांगेल कि अख्ख्या दिल्ली शहरात गुलाबी रंगाची ची १९७३ सालची अल कामिनो शेवी गाडी आज फक्त एकाच माणसा कडे आहे. लांबलचक असलेली हि गाडी एके काळी एका प्रसिध्द नटाकडे होती. त्या नटाच्या लोक प्रिय काळात मुली या गाडीचे चुंबन घेत असत म्हणे. आज मात्र ती लांबून येताना पाहताच तिला ब्रेक नाहीये हे ठाऊक असल्याने लोक सैरावैरा पळू लागतात. आजही नेहमी प्रमाणे बबनने आपली गाडी झोकात बाहेर काढली.
आपल्या बबनला गाडीत धत्तिंग गाणी ऐकण्याचा फार शौक आणि अशी गाणी ऐकताना डोळे मिटून बसल्या जागी डान्स करण्याची सवय असल्याने बबनच्या पुढील प्रवासात खालील रोमांचकारक घटना घडल्या ज्याचा बबनला अजिबात पत्ता देखील लगला नाही. 
१) भाजी मार्केटच्या भरगच्च गर्दीत प्रथम दोन फळ गाड्या मधील फळांचे घड हवेत उडताना दिसले आणि फळवाले  गाडीच्या मागे बोम्ब्लत पळताना  दिसले.  
२) रस्त्याच्या मधोमध व्हील चेअर वर ढकलत नेणारे दोन वार्ड बॉय गाडीला पाहून नखशिखांत बँडेज मध्ये गुंडाळलेला पेशंट सोडून रस्त्या आड लपून बसले. पेशंट देखील उरलेला जीव वाचवायला वेडावाकडा गाडी पुढे पळू लागला पण काय आश्चर्य त्याच्या बाजूने  गाडी काय गेली त्याच्या बँडेज चे एक टोक गाडी लाच  अडकले. एखाद्या भिंगरी सारखा गरगर फिरत तो पेशंट रोग मुक्त तर नाही पण नैसर्गिक अवस्थेत बँडेज मुक्त झाला.
३) गाडीने  जसे पुढच्या  गल्लीत वळण घेतले तसे गाडीला लांबून पाहून एक ट्राफिक पोलिस जीव वाचवायला तुरुतुरु खांबावर चढला.
४) गाडी जेव्हा धुरळा उडवीत सरकारी ऑफिस समोरच्या उतारावर थांबली किंचित ब्याक घेताना मागच्या गाडीला धक्का लागला. मागची गाडी उतारा वर असल्याने गिअर तुटून उतारावर बेछुट सुटली . तिचा लठ्ठ मालक तिच्या मागे ओरडत पळाला. 
५) दावण तुटलेल्या म्हशी सारख्या उतारा वर उधळलेल्या गाडीने जावून तो एक जो एक मस्तवाल दिसणारा माणूस नाल्यापाशी मजेत शू करत उभा होता  त्यास मागून ढुशी दिली तो माणूस कोलांटी घेवून नाल्यात गडप झाला.

गाडी चे दार उघडून  पिवळी pant आणि पांढरे बूट आणि  फंकी  शर्ट. घातलेल्या बबन जेव्हा सिक्रेट सर्व्हिसेस च्या चीफ अमृता कृष्णामुर्थी उर्फ मां यांच्या त्या भव्य अशा गुप्तहेर कार्यालयात आला तेव्हा त्याचे स्वागत करायला अपेक्षे प्रमाणे मां ची त्याची आवडती सेक्रेटरी लीला कन्नन नव्हती. मात्र समोर च्या उंच अशा फाइल्स  च्या rack वर शिडीने चढून अंमळ हेवीवेट आणि कपिल शर्माच्या पलक सारखी मुलगी पाठमोरी टेबल वर फ़ाइल काढत होती.
बबनच्या अपेक्षेप्रमाणेच तिचा तोल गेला आणि बबनने तिला अलगद catch केले. बबनचा जीव तिच्या एक क्विंटल वजनाने कळवळला पण ते त्याने चेहऱ्यावर दाखवले नाही. अर्थात हा अनेक वर्षांच्या ट्रेनिंगचा परिणाम. 
बबनला पाहून ती गबदुल मुलगी त्याच्या गळ्यात हात टाकून लाडिक पणे म्हणाली ....

(क्रमशः)
मागील भाग
पुढील भाग

Group content visibility: 
Public - accessible to all site users

३) गाडीने जसे पुढच्या गल्लीत वळण घेतले तसे गाडीला लांबून पाहून एक ट्राफिक पोलिस जीव वाचवायला तुरुतुरु खांबावर चढला.
५)दावण तुटलेल्या म्हशी सारख्या उतारा वर उधळलेल्या गाडीने जावून तो एक जो एक मस्तवाल दिसणारा माणूस नाल्यापाशी मजेत शू करत उभा होता त्यास मागून ढुशी दिली तो माणूस कोलांटी घेवून नाल्यात गडप झाला.>>>>

काय भारी लिहिलंय...मस्तच..
येउदेत अजून ...

खुर्ची वरुन खाली पडुन 'लोळुन लोळुन' डोळ्यात पाणी येइस्तोवर हसलो...!! हसून हसून गडबडा लोळण खो खो फिदीफिदी हाहा>>>>>एवढं हसलात???? बापरे ! ! !

वाचलेलं कि आधीही, प्रतिसदपन दिलाय वरती...
आज पुन्हा वाचलं Happy
बोअर झालं न की मी विनोदी लेखन वाचते,आणि बटू तर माझा जाम फेवरेट आहे ...