मेळघाट मैत्री - आनंद मेळावा २०१६

Submitted by हर्पेन on 17 December, 2016 - 05:59

मेळघाट मैत्री - आनंदमेळावा २०१६

मला गेले तीन वर्षे मेळघाटात जायला जमवता आले नव्हते. त्यामुळे मी यावर्षी अगदी ठरवलेच होते की आपण जाउन यायचे आणि अखेर तसे जमवलेच. Happy मेळघाटातल्या ज्या शाळांमध्ये आपले काम चालते त्या सर्व मुलांकरता गेली ३-४ वर्षे दिवाळीनंतर एक आनंद मेळावा भरवला जातो. यावर्षी मला त्यात सहभागी होण्याचा योग होता.

मेळावा सोमवार ७ नोव्हेंबर पासून चालू होणार होता पण इतर स्वयंसेवक पूर्व तयारी करता म्हणून रेल्वेने शुक्रवारी ४ तारखेच्या रात्रीच पुण्याहून प्रस्थान करते झाले. आयत्या वेळेस ठरल्याने रेल्वेचे तिकीट मला मिळाले नाही. मग मी शनिवारी ५ तारखेच्या रात्रीची बस घेउन निघालो आणि ६ तारखेला पोचलो. मी बसने अमरावतीला गेलो. निघालो. रेल्वेने जातो तर बडनेरा येथे उतरून अमरावतीस यावे लागले असते. बसने आल्याने डायरेक्ट अमरावतीस पोचलो. नागपूरची बस असल्याने हायवे वर उतरवले मग एसटी स्थानका पर्यंत रिक्षा आणि पुढचा परतवाड्याला आणि तिथून चिलाटीला जायचा प्रवास बसने केला.

शिबिराच्या आदल्या दिवशी सर्व स्वयंसेवक आणि गावामित्र/मैत्रिणी एकत्र बसून शिबिरातील सर्व कृती समजून घेतल्या आणि प्रत्येकाने एकेक नमुना करून पण पाहिला. एकूण मुलांची संख्या पाहता (यंदा अकरा गावातली मिळून १६० मुले-मुली होती) हा मेळावा दोन ठिकाणी घेतला जातो. तो यावेळेस चिलाटी व सुमिता अशा दोन जागी झाला. ह्याच कारणामुळे सर्व शैक्षणिक साधने, अन्य साधने, स्वयंपाकाची भांडीकुंडी व शिधा अशा सर्व गोष्टी विभागणी कर ण्याचे कामही आदल्या दिवस्शीच पार पाडले. रोज सकाळी सुमिताच्या स्वयंसेवकांना मोटरसायकलने चिलाटी ते सुमिता असा प्रवास करावा लागे. तसेच मुलांना आणण्यासाठी जीपची व्यवस्था केलेली होती.

पांढरे कार्डशीट चांदणीच्या आकारात कापून त्याला रंगीत रिबिनी लावून २०० बिल्ले (badges) तयार केले होते. एकेका गटाला एका रंगाच्या रिबीनीचे बिल्ले दिल्यामुळे गट ओळखणे आणि मुलांना पटकन गोळा करणे हे सगळ्यांनाच सोपे झाले.

सकाळी ९ वाजल्यापासून मुले जमायला सुरुवात होई. दूरच्या गावातून जीपने येणारी जरा उशीरा पोहोचत. मेळाव्याची सुरुवात कवायत, प्रार्थना, ओंकार यांनी होता असे. त्यानंतर मग आधी मुलांना आणि नंतर आम्हाला न्याहारी मिळत असे. आमची चांगलाच होती म्हणा ना! पोहे, डाळ-तांदुळाची खिचडी, हुलग्यांची उसळ, उपमा असा बेत होता. त्यानंतर मग मुले आपापल्या गातात विभागली जायची आणि शिबीर सुरु व्हायचे.
यावेळी दररोज चित्रवाचन व गोष्ट वाचून दाखवणे या कृती आम्ही नव्याने घेतल्या. मोठे चित्र गटासमोर ठेवायचे, त्यात काय काय दिसते आहे हे मुले सांगायची आणि स्वयंसेवक मग त्यावर आधारित आणखी माहिती द्यायचे. जरा मोठ्या वयाच्या मुलांच्या गटात हे जास्त परिणामकारक झाले. पुण्यातील अक्षरनंदन या शाळेतील एका पालकांनी खास मोठ्या कागदावर चित्रे काढून दिली होती.

गोष्ट वाचनासाठी सोप्या आणि चित्रे मोठी व मजकूर कमी अशी पुस्तके आम्ही निवडली होती. काही इंग्रजी पुस्तकाना मराठी subtitles लिहून देण्याचे काम पुण्यातील काही मित्रमैत्रिणीनी केले होते. आधी गोष्ट कशाबद्दल आहे हे सांगून मग वाचून दाखवायची असे ठरले होते.

‘आला रे आला, आला आला फेरीवाला’, ‘लंबी दाढीवाले बाबा’, ‘माझ्या बोटात जादू आहे’, ‘गाडी आली धक्का मारा रे’’ ही यावेळची नवीन शिकवलेली गाणी ‘हीट’ ठरली. शिवाय गतसालची ‘चिमणा चिमणीचं लगीन’, ‘अट्टू आणि गट्टू फिरायला चालले’ ही खास मुलांच्या फर्माईशी साठी परत घेतली. ‘निले आकाशमे’, ‘म्हातारीची शेती होती’, ‘रेलमे छना नना’ ही सदाहरित प्रकारातली. मुलांना गाणी म्हणायला फार आवडते. त्यामुळे मुलांना एका जागी बसून आलेला कंटाळा घालवायला ही अभिनयासकट म्हटलेली गाणी खूपच कामास येतात.

फेरीवाल्याच्या गाण्यामध्ये फेरीवाला, भाजीवाली आणि फळवाला होता. मुलांना त्यामधील चित्रे काढायला सांगितली. खूप जणांनी खेळणी आणि फळे फार सुंदर काढली. यातल्या काही चित्रांची आम्ही शेवटच्या दिवशी पपेटस् बनवली.

कागदी पुंगळ्यापासून बनवलेला ट्रे म्हणजे रद्दी कागदांचा अतिशय कलात्मक वापर. पहिल्याच दिवशी एकेका गटासाठी असा एकेक ट्रे बनवला त्यामुळे पुढील सर्व गटकामाचे साहित्य ठेवायला सोपे झाले. दोन्ही हातांचा वापर करून बारीक घडी घालून गुंडाळत घट्ट पुंगळी/ सुरनळी बनवायची. प्रत्येकाने एक - दोन बनवल्या आणि मग पुठ्ठ्यावर त्या चिकटवल्या. त्याला जरा सजावट केली की झाला तयार झकास ट्रे.

ओरिगामी मध्ये टोपी, डोंगा (होडी), कुत्रा, मासा, पंखा, घर अशा विविध वस्तू आम्ही शिकवल्या. त्यावर तिथल्या मुलांनी आम्हाला त्यांना त्यांच्या शाळेत शिकवलेल्या साप, चोकोनी भांडे आणि कॅमेरा ई. गोष्टी शिकवल्या. मुलांना ओरिगामी हा प्रकार खूपच आवडला.

यावेळी एका मित्राने प्राण्यांची मोठ्या आकाराची ‘स्टेनसिल’ दिली होती. ‘स्टेनसिल’ वापरून चित्र काढणे ही सर्वात लोकप्रिय कृती ठरली. ‘स्टेनसिल’ एका हाताने घट्ट धरायचे, पेन्सिलीने चित्र काढायचे, मग बाह्यरेखा स्केचपेनाने रंगवायची आणि मग चित्र खडूने रंगवायचे. एकेका गटाला चारच स्टेन्सील्स मिळाल्या होत्या. पण मुलांनी अगदी समजूतदारपणे एकमेकांचे होईपर्यंत वाट पाहून सगळे प्राणी काढले आणि रंगवले.

या शिबिरासाठी भरपूर कार्डशीट एका मित्राने दिली होती. ती आम्ही भेटकार्ड च्या आकारात कापून नेली होती. रंगीत कागदाची फुले, गवत, पाने, फुलपाखरे असे कापलेले आकार चिकटवून मुलांनी भेटकार्ड तयार केली. उरलेल्या तुकड्यांना मुलांकडून रंगवून घेतल्या आणि साखळ्या बनवल्या.

काही कृती दुपारच्या जेवणाआधी तर काही जेवणानंतर घेतल्या जात.

शोभाताईनी सर्जनशील कृती व्यतिरिक्त अजून दोन अभ्यासखेळ मुद्दाम तयार करून दिले होते.

(१) चिठ्ठी वाचून कृती करणे – काही सोप्या क्रिया (उदा. – सशाची उडी मार, टाळी वाजव, अंघोळ कर इ.) एकेका चिठ्ठीवर लिहिल्या. पिशवीत/ टोपलीत/ डब्यात सर्व चिठ्ठ्या ठेवायच्या. एकेकाने एक चिठ्ठी उचलायची, वाचायची आणि तशी कृती करायची. बाकीच्यांनी ती ओळखायची असा मूळ खेळ. मुलांच्या वयानुसार आणि आकलनानुसार थोडा थोडा बदल करून घ्यावा लागला. जिथे मुलाना वाचता येत नव्हते तिथे स्वयंसेवक मुलाला ती वाचून समजावून सांगायचे. मग सर्वानीच ती कृती करायची. काही स्वयंसेवक स्वत: करायचे कृती आणि ओळखायला लावायचे. जास्त मजा येण्याकरता चिठ्ठ्यांचा डबा फिरवून ‘passing the parcel’ सारखे पण काहींनी घेतले.

पुढे हा खेळ गावामित्र घेऊ शकतील. थोडी कल्पकता दाखवली तर अभ्यास करण्यासाठी पण याचा उपयोग होईल.

(२) आरोग्य सापशिडी – नेहेमीचे सापशिडीचे पट नेले होते. आयत्यावेळी या खेळाकरता उरलेल्या जाड कागदामधून मोठे फासे बनवले. सुरुवातीला सापशिडी नुसतीच खेळायला दिली. तिथे थोड्याच मुलांना सापशिडी माहीत होती. मोठा फासा हातात घेउन हलवून टाकणे ही अत्यंत आवडीची गोष्ट होती मुलांसाठी. नेहेमीचा खेळ थोडा वेळा झाल्यावर मग वळलो आरोग्यखेळाकडे. आरोग्यासाठी चांगल्या आणि वाईट सवयी एकेका चिठ्ठीवर लिहिल्या होत्या. (उदा. रोज अंघोळ करणे, जेवण्याच्या आधी हात धुणे, वाढलेली नखे कापली नाहीत इ.). फासा टाकला की एक चिठ्ठी उचलायची. त्यात असलेली आरोग्यसवय चांगली असेल तर पुढे जायचे नाहीतर नाही. यातून चांगल्या वाईट सवयी मुलांना कळतील.

सापशिडीचा खेळ अभ्यासासाठी खूप प्रकाराने वापरता येईल. म्हणजे गणिताच्या चिठ्ठ्या बनवायच्या (२+३ = ?, ९–२ = ? इ.). बरोबर उत्तर दिले तर फाशाचे दान घ्यायचे नाहीतर नाही. भाषेसाठी पण वापरता येईल उदा. शब्द/ वाक्य लिहायचे चिठ्ठीत. बरोबर वाचता आले तर फाशाचे दान मिळेल नाहीतर नाही.

हे अभ्यासखेळ परिणामकारक होण्यासाठी मुलांची आणि घेणा-यांची पण थोडी अधिक तयारी व्हायला हवी असे वाटले. नियमितपणे खेळले तर मुलांना मजा येईल आणि अभ्यास पण होईल. गावमित्रांच्या पुढच्या बैठकीत याचा सराव घ्यायचे ठरले आहे.

शेवटच्या दिवशी खास बालाग्रहास्तव ‘चिमणा चिमणीचं लगीन’ हा पपेट शो पुन्हा घेतला. तसेच सर्व मुलांना सहभागी करून घेत ‘फेरीवाला’ गाण्याचे सादरीकरण केले. तिथे उपलब्ध असलेल्या साधनांमधून भाज्यांची टोपली, फळवाल्याची पेटी, खेळण्यांची पेटी तयार केली. प्रत्येक मुलाला त्याने काढलेले चित्र हातात दिले. मग काय? झाले झकास सादरीकरण !

खास चिलाटीतल्या मुलांची एक सहल संस्थेच्या आवाराजवळच असलेल्या एका तळ्यावर नेली होती. तिकडे नेऊन मुलांना परिसराची आणि परिसंस्थेची ओळख करून देण्यात आली.

रोज संध्याकाळी थोडे खेळ घेऊन मुलांना खाऊ दिला की घरी जायची मुले आणि आम्ही आमच्या ठिकाणी. लगेच आजचा आढावा आणि दुस-या दिवाशीची तयारी. थंडीने गारठलो की शेकोटीपाशी बसून गप्पा. चार दिवस कसे संपले कळले नाही.

यावेळचा शिबिरासाठीचा गट

आनंद मेळावा आखणी : शोभा केळकर आणि अश्विनी धर्माधिकारी

स्वयंसेवक: अक्षरनंदन शाळेतील इयत्ता नववीचे विद्यार्थी (आर्य हरताळकर, मानस टेकाळे), हर्षा हरताळकर (अक्षरनंदन पालक), अपर्णा भागवत, विद्या ढोरे, उमा घोळे, अश्विनी धर्माधिकारी आणि मी हर्षद पेंडसे.

मेळघाटातील ‘मैत्री’ चे कार्यकर्ते – रामेश्वर फड, अशोक धिकार, रमेश मावस्कर, दिलीप, कुंजीलाल, बाबुलाल, मोतीलाल, काळू बेठेकर, दिलीप

गावमित्र व मैत्रिणी – रत्ना (सिमोरी), कविता (चिलाटी), सोमजी (कुही), निलेश (रुईपठार), सोनाजी (सुमिता), गेंदालाल (सलिता), परशराम (भांडूम), किशोर (मारिता), लक्ष्मी (कारंजखेडा)

सहाय्यक: राहुल, लीनता वैद्य, तुषार, कुलकर्णी काका, ‘मैत्री’ विश्वस्त, इतर ‘मैत्री’ सहकारी आणि सर्व देणगीदार व हितचिंतक

या आनंद मेळाव्या करता प्रत्यक्ष जरी आम्ही ८ स्वयंसेवक गेलो असलो तरी अनेकांचे हात त्या मागे होते. आर्थिक मदत देणारे, साहित्य, धान्य देणारे, शिबिराच्या कृतींसाठी पूर्वतयारी करणारे असे खूप मित्र मैत्रिणी आहेत. (सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की ह्यामधे काही मायबोलीकर देखिल आहेत) तसेच स्थानिक कार्यकर्ते व गावमित्र हे पण आमच्याबरोबर होते. मेळावा व्यवस्थित पार पाडण्यामागे या सर्वांचाच हातभार लागलेला आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद !

मेळावा संपल्यावर ज्या गावात मैत्रीच उपक्रम चालत आहेत अशांपैकी एका गावाला भेट दिली. ह्या गावभेटी दरम्यान पुस्तकपेटी, सुचना फलक असे काही उपक्रम कसे चालवले जातात ते दिसले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद विनिता,
जबाबदारीतून तात्कालिक सुटका करून घ्यायला जमायला हवं. अर्थात मला कल्पना आहे ते किती अवघड असते