आज सूप आठवड्याची शेवटची पोस्ट. आजचे सूप आहे 'वरण' ! कुणाला वाटेल मी उगाच काहीतरी लिहायचे म्हणून हि पोस्ट टाकत आहे. आणि तसे वाटत असेल तर हीच मानसिकता आपल्याला 'वरण' ची किमंत जाणवू देत नाही. मी थोड्य वर्षांपूर्वी वजन कमी करण्यासाठी वेगवेगळॆ प्रकारचे मेनू ट्राय करत होते ज्या मध्ये जास्त प्रोटीन आणि कमी carb हवे होते. चिकन, अंडी हे सर्व मी खाते पण तरीही ते इतके पुरेसे नसते कारण रोजच्या रोज ते खाण्याची सवय नाहीये. मग उसळी, डाळीचे डोसे हेही करून झालं आणि अजूनही करते. त्यानंतर नंबर होता वरण/आमटी/ सांबर यांचा. त्या डाएटच्या काळात एक गोष्ट चांगली झाली, वरण खायची/प्यायची सवय लागली. आणि ती इतकी चांगली सवय होती की आजही आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा तरी रात्री वरण बनवले जाते. आपल्या रोजच्या जेवणात हे 'सूप' म्हणून इतके छान 'फिट' होते, विशेषतः पंजाबी डाळ तडक्यापेक्षा पातळसर असलेले गरम गरम वरण प्यायची मजा थंडीत जास्त येते.
आज वेगळी रेसिपी अशी देणार नाहीये, फक्त मी कोणत्या वेगवेगळ्या प्रकारे वरण बनवते ते पर्याय देणार आहे. केवळ एखादा पदार्थ कमी किंवा जास्त घालून त्याच डाळीची चव किती वेगळी होते आणि प्रत्येकवेळी त्या वेगळ्या चवीचा आनंद घ्यायला मला आवडते. मुलांनाही थोडे कमी तिखट असल्यावर ते प्यायला आवडते. केवळ नुसता तूप-मीठ-भात आणि साईडला वरण नुसते प्यायला असा केवळ मुलाना आवडणारा मेनूही कधीतरी होतो.
साहित्य: तूर डाळीचा त्रास होतो त्यामुळे मी मूग आणि तूर डाळ निम्मी निम्मी घेते. शिवाय मूग डाळीमुळे थोडे एकसारखेही होते. साधारण एक वाटी डाळीत ४ लोकांचे वरण होते. डाळ कुकरला शिजवून घेतल्यावर फक्त फोडणीमध्ये वेगवेगळे पर्याय करून बघते.
पर्याय:
१. एकदम साधे, मुलांना आवडणारे: तुपात हळद, हिंग मीठ आणि चिमूटभर साखर घालून डाळ आणि पाणी घालणे. आजारी असताना खास करून मुलांना हे नक्की देते. कारण यात मसाले अजिबात नाहीत, कसलेही उग्र वास नाहीत.
२. फोडणीसाठी तूप घालून ते तापल्यावर, जिरे मोहरी, आले, लसूण, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीचे तुकडे, हळद, हिंग घालावे. फोडणीत हे सर्व घालून, डाळ घालून जितके पातळ हवे त्याप्रमाणे पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालावे. वरून कोथिंबीर.
३. फोडणीसाठी तूप घालून ते तापल्यानंतर त्यात लाल सुक्या मिरच्या, जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता घालावा. लसूण भाजल्यानंतर त्यात एक टोमॅटो घालून तो थोडा शिजू द्यावा. टोमॅटो शिजल्यावर छोटा चमचा लाल तिखट घालावे. त्यात डाळ घालून, हवे तितके पाणी आणि चवीनुसार मीठ घालावे. उकळी आल्यावर गॅस बंद करावा. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
४. डाळ-पालक : डाळ शिजवतानाच त्यात मूठभर आक्खे शेंगदाणे घालावेत. फोडणीत तूप, लाल सुक्या मिरच्या, जिरे, भरपूर लसूण घालावा. लसूण भाजल्यानंतर त्यात दोन टोमॅटो घालावे आणि शिजू द्यावे. टोमॅटो शिजल्यावर
त्यात हळद आणि काळा मसाला (किंवा लाल तिखट ) घालून मिक्स करावे. डाळ घालून गरजेप्रमाणे पाणी घालावे. मीठ चवीनुसार. उकळी आल्यावर भात किंवा भाकरीसोबत सर्व्ह करावे.
५. डाळ-तडका: शिजलेली डाळ एका भांड्यात काढून गॅसवर ठेवावी. त्यात कापलेले टोमॅटो, हळद, मीठ आणि पाणी उकळू द्यावी. छोट्या भांड्यात, तेलात जिरे, मोहरी, लाल मिरच्या, हळद, हिंग, लाल तिखट, कढीपत्ता फोडणी कुरकुरीत होऊ द्यावी. आणि ती फोडणी उकळणाऱ्या डाळीत वरून घालावी. एक उकळी येऊन डाळ बंद करावी.वरून कोथिंबीर घालावी.
६. सांबार: हे खरेतर वरणच करते फक्त सांबर मसाला घालून आणि चिंचेचा कोळ घालून. त्यात तेलात जिरे,मोहरी, हळद, हिंग, भरपूर कढीपत्ता, लाल मिरच्या फोडणीत घालाव्यात. लसूण घालून खरपूस भाजू द्यावा. दोन टोमॅटो घालून शिजवून घ्यावेत. त्यात सांबर मसाला(कुठलाही ब्रँड) आणि चिंचेचा कोळ घालावा. डाळ घालून, लागेल तितके पाणी व मीठ चवीनुसार. उकळी आल्यावर भातासोबत खावे.
७. नेहमीची आमटी: फोडणीत जिरे मोहरी कढीपत्ता आणि लसूण घालावा. लसूण भाजल्यावर यात आले-लसूण-खोबरे-कोथिंबीर याची एकत्र बारीक केलेली पेस्ट घालावी. थोडे परतून खोबऱ्याचा खमंग वास येतो. त्यात काळा मसाला एक/दोन चमचे, एक टोमॅटो भाजून घ्यावा. या मिश्रणात डाळ, पाणी व चवीनुसार मीठ घालावे. उकळी आल्यावर कोथिंबीर घालून सर्व करावी.
हे सर्व प्रकार कितीही एकसारखे वाटले तरी त्यात थोडा फार फरक आहे. आणि चवीने खाणाऱ्याला तो नक्की कळतो. आणि डाळ-तडका सोडला तर बाकी सर्व प्रकार थोडेसे पातळ आणि तिखट केले तर गरम गरम पिता येतात. डायट करायचा असेल तर, जेवणात सर्वात आधी दोन वाट्या हे वरण प्यावं, म्हणजे बरेच पोट भरते आणि चपाती किंवा भात खाण्याचे प्रमाण कमी होते.
मी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे केलेले हे डाळीचे प्रकार त्यांच्या बाकी कॉम्बिनेशन सोबत देत आहे. नथिंग बीट्स 'वरण'.
विद्या भुतकर.
हे आणि इतर अजून वरणाचे प्रकार
हे आणि इतर अजून वरणाचे प्रकार इथे आहेत - http://www.maayboli.com/node/14872
मलाही आवडतं वरण सूप म्हणून
मलाही आवडतं वरण सूप म्हणून प्यायला. तसंच गरम गरम कढी, सांबारही.
आमच्याकडे तूरडाळ घोटून पाणी घालून त्यात किंचित गूळ, मीठ. वरून तूप हे म्हणजे वरण. फोडण्या घातल्या की आमटीच.
हेल्दी आणि पोटभरीचं हवं असेल तर हिरवी सालासकट मूगडाळ भिजवून एखाद शिट्टी काढून शिजवून घ्या. वर ज्या फोडण्या दिल्या आहेत त्यातली कोणतीही फोडणी देऊन उकळी काढा आणि गरम गरम प्या.
ही मायबोलीवरची रेसिपी माझी अतिशय आवडती आहे. ह्यात मी पास्त्याचे ५,६ तुकडेच घालते. बाकी डाळ्/आमटी. हवंतर किन्वा पास्ता घालू शकता नॉर्मल्/होल व्हिटऐवजी.
http://www.maayboli.com/node/10484
विद्या, खूप मस्त लिहीता
विद्या, खूप मस्त लिहीता तुम्ही आणी डिशमधले पदार्थ बघुनच खात्री पटते की तुम्हाला चवीचे आवडते.:स्मित: दोन डिशमध्ये भाज्या आहेत त्याची पण रेसेपी तुमच्या पद्धतीची लिहा. आधीच्या डिशमध्ये बहुतेक मसाला भेंडी आहे.
वरण आणी सुपाच्या चविष्ट कृतीबद्दल धन्यवाद.
आम्ही विदर्भातले, आमच्याकडे
आम्ही विदर्भातले, आमच्याकडे तूर मूग सगळेच छप्परफाड होते, पण महामुर म्हणता येईल अशी फक्त तुरच, तुरीच्या डाळीचे प्रस्थ इकडे अन तेलंगणा मध्ये जबरदस्त जास्त. साधारणतः साधे तुरीचे वरण हे इतर जागी मग मरणाला नाहीतर तोरणाला नैवेद्याला वगैरे असते पण आमच्याकडे प्लेन वरण रोजच्या जेवणात असते, तुरीचे वरण पाणी घालून एकत्र करून गॅस वर चढवले की मग त्यात एक बारीक खडा गुळाचा घातला जातो, त्याने वरण गुळचट होते. कमीत कमीत पाण्यात डाळ शिजवली का अश्या 'डाळीचा घट पेंड, त्याच्यात बारीक चिरलेला कांदा, तिखट मीठ, काळा मसाला' अन सोबत ज्वारीची भाकर म्हणले की आमच्याकडे पूर्ण जेवण होऊन जाते. बाकी तुरीच्या वरणाला तुपाच्या फोडण्या इमॅजिन सुद्धा होत नाहीत.
रश्मी, धन्यवाद. पहिल्या
रश्मी, धन्यवाद.
पहिल्या फोटोत, वालाची शेन्ग आहे. बाकी रेसिपी पुन्हा कधीतरी नक्की. ही सिरिज आज्च सम्पवत आहे.
सायो, मलाही कढी खूप अवडते. पाच्च पोस्ट करणार होते त्यामुळे शेवटची पोस्ट फक्त वरनासाठी ठेवली होती.
सो.बा. : मीही आधी तूप वापरत नव्हते. मुलानसाठी सुरु केले. तूप आणि तेल आलटुन-पालटुन वापरते. पण तुपाच्या फोडणीचे वरण खास होते. मला तेच आव्डते. बाकी प्रत्येकाची आव्ड वेगळी असतेच.
सर्वान्चे आभार, रोज या पोस्ट वाचल्याबद्द्ल आणि कमेन्ट्साठीही.
विद्या.
मला ही तो डाळींचा बाफ आठवला.
मला ही तो डाळींचा बाफ आठवला. बीचा पण एक बाफ होता. माझी एक नांदेडची हैद्राबादी मैत्रीण फर्मास ताकातले वरण देखील करते. आम्ही शुद्ध पुणेरी त्यामुळे साधं वरण व भात. आणि आमटी चिंचगुळाची.
A1
A1
अमा, पण तुम्हाला ताकातले
अमा, पण तुम्हाला ताकातले वरण चालणार नाही आता...!