थंडीसाठी गरम गरम सूप रेसिपी - ४ ('रसम' सूप)

Submitted by विद्या भुतकर on 14 December, 2016 - 19:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गेले तीन दिवसांत थोडे 'अंग्रेजी' वाटणारे सूप दिले होते. आज माझे एक आवडते आणि एकदम भारतीय सूपची माहिती देतेय. हे म्हणजे 'डंप इट ऑल' सूप म्हणता येईल किंवा 'रसम' सूप म्हणता येईल. मला कधी तिखट झणझणीत सूप प्यायचे असेल तेव्हा मी हे बनवते.

३ टोमॅटो
१ छोटा कांदा
१ छोटा बटाटा
२ मोठे गाजर
३-४ पाकळ्या लसूण
१ इंच आले
फोडणीसाठी तूप, जिरे, मोहरी, कढीपत्ता, हळद, हिंग, ४-५ सुक्या लाल मिरच्या
चवीनुसार मीठ, मिरेपूड
MTR ब्रँडची रसम पावडर
आणि वरून ठेवण्यासाठी कोथिंबीर.
हवे असल्यास ग्रीन बीन्स, थोडा पालक, सिमला मिर्च किंवा फ्लॉवर सुद्धा वापरता येतो. पण या भाज्यांची चव थोडी उग्र लागते. त्यामुळे हव्या असतील तरी या सर्व भाज्या थोड्याच प्रमाणात घ्यायच्या.

क्रमवार पाककृती: 

कुकरमध्ये कांदा(साल काढून), बटाटा(साल काढून), टोमॅटो, गाजर सर्व आख्खे घालून(बाकी कुठल्या भाज्या असतील तर त्याही ), साधारण दोन तीन कप पाणी आणि थोडेसे मीठ घालून उकडायला ठेवायच्या. दोनच शिट्ट्या झाल्यावर कुकर बंद करून थोडा वेळ थंड होऊ द्यावा.

भाज्या लवकर शिजतात. कुकर थंड झाल्यावर टोमॅटोचे साल काढून टाकावे. आता सर्व भाज्या कुकरमधीलच थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये प्युरी करून घ्याव्यात.

गॅसवर एक भांडे ठेवून थोडे गरम होऊ द्यावे.

त्यात तूप (किंवा तेल) घालून गरम होऊ द्यावे.

फोडणी घालतो त्याप्रमाणे आधी जिरे मोहरी उडू द्यावी.

४-५ लाल मिरच्या, कढीपत्ता, बारीक केलेलं आलं लसूण पटापट फोडणीत टाकावे.

फोडणी जळत असेल तर गॅस बंद करून हे सर्व घालावे. लसूण आणि आले खरपूस झाल्यावर त्यात हळद, थोडे लाल तिखट आणि १ चमचा रसम पावडर घालावी.

लगेचच प्युरी भांड्यात घालावी. त्यात उरलेले कुकरमधले पाणी घालून, हवे असल्यास अजून पाणी घालावे. हे सूप रसमसारखे पातळ छान लागते. त्यामुळे पाणी थोडे जास्त चालते. सूप उकळी येऊ लागल्यावर त्यात चवीनुसार मीठ आणि मिरेपूड घालावी. मला थोडे आंबट आवडते हे सार सारखे. त्यामुळे थोडा चिंचेचा कोळही घालते. साखर शक्यतो घालत नाही. पण हवी असल्यास दोन चिमट घालू शकता.

उकळी आल्यानंतर त्यावर कोथिंबीर घालून सूप सर्व्ह करावे. यात ब्रेड क्रम्स मस्त लागतात. खरेतर मी हे सर्दी झाल्यावर करते. भरपूर मिरेपूड टाकून गरम गरम प्यायचे. सर्दीत मस्त वाटते. हे भारतीय पद्धतीने केल्याने कुठल्याही रोजच्या जेवणासोबत हे बनवू शकतो.या सूपच्या स्टेप्सचे फोटो नाहीयेत त्यामुळे एक फायनल फोटो टाकत आहे फक्त. त्यातही सोबतीला सलाड आणि ब्रेड आहे. पण एरवी भातासोबतही मस्त लागते.

आज हे चौथे सूप आणि उद्या सूप-सिरीज संपेल. Happy एन्जॉय !

आजच्या फोटोमध्ये जो ब्रेड आहे आणि सलाड त्याबद्दल पुन्हा कधीतरी. Happy
IMG_0475.JPG

विद्या भुतकर.

वाढणी/प्रमाण: 
४ जण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो. तुमच्या फोटोतलं सॅलड मला ऑलिव गार्डनच्या सॅलडची आठवण करून देतंय.
मी साधारण सिमिलर सूप करते पण ह्यापेक्षा हेल्दी. बेल पेपर्स्+झुकिनी+गाजर्+टोमॅटो+कांदा+दुधी+ भोपळा अशा भाज्या कुकरला शिजवून घेऊन मग मिक्सरला फिरवून घेऊन उकळी काढायची. वरून मीठ आणि चमचाभर तूप, मिरपूड वगैरे

सायो, तुम्चे सूप खरच जास्त हेल्दी वाटते आहे.:)
मी वेगवेगळे सूप करत असल्याने यात फक्त तुमच्या यादीतील फक्त दुधी यात वापरु शकते. बाकी सर्व वेगवेगळ्या सूपमधे माझे घातले जाते. तुम्ही या आधीच्या तीन रेसिपी पाहिल्या की नाहि आठवत नाहिये, पण नसेल तर जरूर पहा आणि काही बदल असतील तर सान्गा. Happy

सलाड साधारण तिथल्या सारखेच आहे पण वेगवेगळे द्रेसिन्ग वापरते. सध्या पनेरा ब्रेड मधले 'फुजि अ‍ॅपल' आणि 'पॉपी सीड' ड्रेसिन्ग विकत मिळाले आहेत. ते वापरत आहे. नसेल तर, "रान्च, ओलिव्ह ऑइल आणि लिम्बू " हे टिपिकल आहे आमचे. Happy मध, लिम्बू आणि ऑलिव्ह ऑईल हेही आवडते. त्यात मिरपूड, मीठ आणि बेसिल घालते. Happy
सलाड आणि गार्लिक ब्रेड बद्दल वेगळी पोस्ट लिहिते. Happy

विद्या.

मी बाकी सूपच्या रेसिपी पाहिल्या आणि आवडल्याही पण तसं सांगायचा आळस केला जरा.
पनेराचं समरमध्ये मिळणारं वॉटरमेलन, अरुगुला सॅलड घरीही मस्त होतं. इनफॅक्ट त्यांच्यापेक्षाही भारी. ट्राय करा नक्की.

विद्या, गार्लिक ब्रेडची रेसिपी नक्की टाक. सूप करायचा कंटाळा केला जातो आवडत असून Sad

म्हणजे यात डाळ नाही टाकायची?>> डाळीचे पाणी घालू शकतो उकळून, पण डाळ नाही.
Thank you all. Happy

विद्या, गार्लिक ब्रेडची रेसिपी नक्की टाक. सूप करायचा कंटाळा केला जातो आवडत असून >> nakki. Happy