थंडीसाठी गरम गरम सूप रेसिपी - १ (बटरनट स्क्वाश सूप)

Submitted by विद्या भुतकर on 11 December, 2016 - 23:05

डिस्क्लेमरः मला रेसिपी मोजून मापून लिहिता येत नाहीत. त्यामुळे चु.भू.द्या.घ्या. आणि सूप गोड मानून खा. Happy

मागच्या आठवड्यात 'गोष्ट' लिहायला खूप मजा आली आणि लोकांच्या कमेंट पाहून त्यांना वाचायलाही असं वाटलं. कधी खरंच वाटलं तर त्याचा पुढचाही भाग नक्की लिहीन. पण मागच्या आठवड्याच्या प्रतिसाद आणि प्रोत्साहनासाठी सर्वांचे मनापासून आभार. थँक यू ऑल !

या आठवड्यात फक्त सूपच्या पोस्ट लिहायचा विचार आहे. बाकी, विचार काय चालूच असतात डोक्यात आणि बदलतही. पण गेल्या काही दिवसांत थंडी वाढली आहेच. मागच्या आठवड्यात तर आजारीच पडले होते. त्यामुळे गरम गरम सूप बद्दल लिहितेच एकदाचं म्हणून ठरवून बसले आहे. तरीही ना, हे म्हणजे 'आम्ही सारे खवय्ये' मध्ये ऋतूनुसार, सणानुसार रेसिपी येतात तसे वाटत आहे किंवा बाकी सिरीयल मधल्या फेस्टिव्हल फॅड सारखं. असं अगदी वाटत असूनही 'सूप' हा विषय एकदा निकाली काढते म्हणजे बाकी लिहायला मोकळी.

तर गेल्या वर्षभरात जरा दोन चार सूप बनवायला लागले आहे. मुलांनाही ते आवडत आहे प्यायला. सर्दी झाली कि हमखास देते आणि तेही दोघे पितात मस्त. इथे 'पनेरा ब्रेड' नावाच्या रेस्टॉरंट मध्ये 'autumn squash soup' मिळतं. तेही फक्त सप्टेंबर पासून फेब्रुवारी-मार्च पर्यंत. मला खूप आवडलं होतं. म्हणून बराच शोध घेतला. अर्थात माझी रेसिपी त्यांच्या पेक्षा वेगळीच होते चवीला आणि त्यातले घटकही, परंतु त्या सूप पासून प्रेरणा मिळाली होती. मुलं याला 'ऑरेंज/येलो सूप' म्हणतात. हे सूप थोडं गोडसर लागतं आणि क्रीमही घालते मी थोडं त्यात. त्यामुळे मुलांना आवडतं. पण तिखट करायचं असेल तर मी त्यात मस्त लाल तिखट आणि गरम मसाला घालते. बाकी रेसिपी मला अगदी तंतोतंत देता येत नाही त्यामुळे अंदाजे घ्यालच. Happy

तर माझ्या या सूपची रेसिपी पहा:

साहित्य: butternut squash (मराठी मध्ये काशीफळ म्हणे) १/४ तुकडा. आकाराने छोटे असेल तर अर्धे ( काशीफळ नसेल तर लाल भोपळ्याचा तितकाच एक तुकडा.
१ yam ( एक रताळे)
१ छोटा बटाटा.
लसूण पाकळ्या कमी जास्त आवडीनुसार. मला आवडतो त्यामुळे मोठ्या पाकळ्या ५-६ बारीक तुकडे कापून.
इटालियन सिझनिंग (फक्त बेसिल, ओरेगनो, काली मिरीही चालेल)
ऑलिव्ह ऑईल
मीठ, मिरेपूड
आक्ख्या सुक्या लाल मिरच्या ३-४
भोपळ्याच्या भाजलेल्या खाऱ्या बिया (roasted, salted pumkin seeds)

कृती : सर्व भाज्यांचे साल काढून, धुवून घ्यायचे. काशीफळ/लाल भोपळा जे काही असेल त्याचे अर्ध्या इंच आकाराचे तुकडे, त्याच आकाराचे रताळे (yam ) चे तुकडे, बटाट्याचे थोडे छोटे तुकडे कापून घ्यावे.

सर्व भाज्या एका भांड्यात घालून त्यात २-३ चमचे ऑलिव्ह ऑइल, इटालियन सिझनिंग, मिरेपूड, मीठ आणि लसणाचे तुकडे घालावेत. सर्व एकत्र हलवून मी ते मिश्रण ओव्हन मध्ये २०० डिग्री सें. ला अर्धा तास ठेवते. माझ्या ओव्हनमध्ये ते लवकर होते. पण ते पुण्यात मायक्रोवेव्ह ओव्हनच्या convection मोड ला ४५मिनिट ठेवून पण आतून शिजले नाहीत. अशा वेळी मुळात त्याला 'बेक्ड ' किंवा बर्न्ट गार्लिक म्हणजे खरपूस लसूण आणि भाज्यांना जो खरपूस वास येणे पुरेसे आहे. ते झाले असल्यास थोडा वेळ कुकरमध्ये टाकूनही शिजवता येतात. भाज्या शिजल्या कि बाहेर काढून मिक्सर मधून त्याची प्युरी करून घेते. हवे असल्यास मिक्सरमध्ये प्युरी करताना हेव्ही क्रीम घालू शकतो.

फोडणीसाठी फक्त मी ऑलिव्ह ऑइल मध्ये थोडे इटालियन सिझनिंग, चिली फ्लेक्स (बारीक लाल कुटलेली मिरची?) मिरेपूड टाकते आणि प्युरी ओतते. हवे तितके पातळ किंवा घट्ट ठेवण्यासाठी तसे पाणी घालते.उकळी आली की गॅस बंद करते. मीठ लागले तर वरून घेते. भाज्या शिजताना ओव्हनमध्ये टाकतानाच मीठ घालते तितके पुरेसे होते.

हे सूप आम्ही सलाड आणि गार्लिक ब्रेड बरोबर खातो. सूप सर्व्ह करताना वरून भोपळ्याच्या भाजलेल्या खाऱ्या बिया घालते.

टिप्स: १. सूप हवं तसं गोड किंवा तिखट करण्यासाठी लाल तिखट किंवा गरम मसाला थोडा चालतो.

२. घट्ट किंवा पातळ कसे हवे हा आवडीचा प्रश्न आहे. मला थोडे पातळ आवडते.

३. convection ओव्हन मध्ये भाज्या शिजत नसतील पटकन तर त्यांना फक्त वरून भाजून घ्यावे आणि मग कुकरला एक शिटी काढावी. लवकर होतात आणि त्याचा खरपूस खमंग सुवास जात नाही.

मी काढलेली काही चित्रं देतेय. कुणाला सूप बनवून बघायचे असेल आणि प्रश्न असतील तर नक्की विचारा.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

12439506_1028316117242363_8153159633047030248_n.jpg12509892_1028316130575695_875623133779861448_n.jpg12987084_1093513540722620_3277845800588348471_n.jpg12936746_1082933878447253_750486572996124106_n_0.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विद्या, तुमच्या ह्या रेसिपीने काल सूप केलं. मस्त झालं चवीला. एका मोठ्या बटरनट स्क्वॉश बॅगचं केलं ते जवळजवळ संपलंच सगळं. फोनवरून फोटो टाकता येत नाहीये. नंतर लॅपटॉपवरून टाकते.