रिटायर झाल्यावर आपण दोघं मज्जा करू!!!

Submitted by सचिन काळे on 11 December, 2016 - 00:21

दरवर्षी नोव्हेंबर-डिसेम्बर मध्ये मी माझ्या कुटुंबाला घेऊन भारतातील रमणीय स्थळी सात-आठ दिवस पर्यटनाला जात असतो. पण ह्यावर्षी काही अपरिहार्य कारणामुळे आमचा पर्यटनाला जाण्याचा बेत रद्द करावा लागला.
काल संध्याकाळी मी आणि सौ. अशाच घरगुती गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा आमच्या ह्यावर्षी रद्द झालेल्या पर्यटनाचा विषय निघाला. तेव्हा मी पर्यटन रद्द केल्याने फार वाईट वाटतंय असं म्हणालो. त्यावर सौ. लगेच म्हणाली. "का वाईट वाटून घेताय? त्यात काय एवढं? आता नाही जमलं तर नंतर जाऊ. अजून काही वर्षांनी तुम्ही रिटायर झालात ना, कि आपण दोघं मस्त मज्जा करू. सगळीकडे हिंडू फिरू, खाऊ पिऊ, अगदी धम्माल करू."

त्यावर मी विचार करू लागलो, खरंच कि! नाहीतरी मी काही वर्षांनी रिटायर होणारच आहे. तेव्हा मस्तपैकी भारतच नाही तर अख्खं जग फिरून येऊ. सगळीकडचे स्थानिक उत्तमोत्तम पदार्थ खाऊ. जोडीने हिमालय चढू. माझे पोहणे आणि सौ.चे गायन शिकायचे राहिलंय तेही शिकू. दोघं मिळून नर्मदा परिक्रमा करू. कामाच्या रामरगाड्यात नातेवाईकांशी संबंध दुरावलेत ते पुन्हा जुळवायचा प्रयत्न करू. नाटक, सिनेमा आणि संगीतमैफिलींचा धूमधडाका लाऊन टाकू. मी निवृत्त झाल्यावर आमच्या मनात राहिलेल्या सर्व इच्छा पूर्ण करू. जोडीने अगदी मज्जा मज्जा करू.

मग पुन्हा माझ्या मनात विचार आला कि खरंच! मी निवृत्त झाल्यावर आम्ही ठरवलेल्या आमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकू का? मी निवृत्त होईल तेव्हा आमच्या दोघांचं वय चांगलंच वाढलेलं असेल. आमचे हातपाय थकलेले असतील. विविध प्रकारची आजारपणं मागे लागलेली असतील. शरीराची इंद्रिये काम करेनाशी झालेली असतील. तेव्हा विविध प्रकारची व्यंजने खाऊ शकू का? जगभर फिरायला, नर्मदा परिक्रमा करायला, हिमालय चढायला, नातेवाईकांकडे जायला हातपाय साथ देतील का?

कारण आपल्याला असे बरेच निवृत्त झालेले दिसतात. ज्यांचं निवृत्ती नंतरचं पहिलं वर्ष स्थिरस्थावर होण्यामध्ये जाते. पुढचं वर्ष उत्साहाने विविध उपक्रम अंमलात आणण्यात जाते. मग पुढील काही वर्षात हळूहळू विविध कारणांमुळे उत्साह मंदावत जाऊन, शेवटी येणारा रोजचा दिवस, पूर्ण दिवसभर घरी बसून खिडकीबाहेर शून्यात बघण्यात जात असतो.

येथे मायबोलीवरील बरेच सभासद निवृत्त झालेले असतील. किंवा काही जणांचे आईवडील किंवा त्यांचे नातेवाईक आणि ओळखीचे लोकं निवृत्त झालेले असतील. अशा सभासदांना मला काही विचारायचंय. आपणांस अशा काही निवृत्त झालेल्या व्यक्तींचे अनुभव माहित आहेत का? ज्यांनी निवृत्त व्हायच्या दोन पाच वर्षे अगोदर मनात काही इच्छा, योजना आखल्यात, कि आपण निवृत्त झाल्यावर हे करू आणि ते करू, आणि आता त्याप्रमाणे निवृत्त झाल्यावर, पूर्वी आपल्या मनात असलेल्या इच्छा, योजना विविध अडचणी येऊनही ते त्या अंमलात आणत आहेत किंवा त्यांनी त्या पूर्णत्वास नेलेल्या आहेत.

मला स्वतःला अशी दोन चार उदाहरणं माहित आहेत. त्यांच्या विषयी सांगतो. माझ्या ऑफिसमध्ये एक डिसुझा नावाचे सहकारी होते. त्यांना धार्मिक गोष्टींची आवड होती. पण नोकरीमुळे ते त्या गोष्टीला जास्त वेळ देऊ शकत नव्हते. आता निवृत्तीनंतर गेले काही वर्षे ते पूर्णवेळ धर्म प्रसारकाचे काम करत असतात. दुसऱ्या एका सहकाऱ्यांना कामगार कायद्यात रस होता. निवृत्तीनंतर ते आता अन्याय झालेल्या कामगारांना मोफत कायदे विषयक सल्ला देण्याचे काम करीत असतात. दुसरे एक माझे नातेवाईक होते. त्यांना पूर्वीपासून शेतीत रस होता. पण नोकरीमुळे शेती करणेे शक्यच नव्हते. पुढे निवृत्तीनंतर जमीन विकत घेऊन ते बरीच वर्षे शेती करीत होते.

आपणांसहि अशा लोकांची उदाहरणे माहित असतीलच, ज्यांनी निवृत्तीनंतर नुसतं घरी बसून न राहता, आलेले दिवस ढकलत न राहता, आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य, त्यांनी नोकरी करत असताना पाहिलेल्या स्वप्नांची, इच्छांची पूर्तता करण्यात खर्च केले. अशी उदाहरणे आपण येथे दिलीत तर जे यापुढे निवृत्त होणार असतील, त्यांना त्यातून काही बोध घेता येईल. अशां उदाहरणांतून त्यांना काही प्रमाणात दिलासा, नवीन कल्पना, हुरूप आणि स्फूर्ती मिळेल.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे सासरे निवृत्त झाले तेव्हां सर्व नातेवाईकांना भेटी द्यायचा तडाखा लावला होता.
पण नंतर हा उत्साह मावळला. प्रत्येक जण बिझी असतो. त्यामुळे साबुंना चांगले अनुभव आले नाहीत असे त्यांना वाटते. मग काही दिवस केरळ,हिमाचल, राजस्थान, दार्जिलिंग,थायलंड असे फिरून आले. थायलंड मधे उन्हाचा त्रास झाल्यानंतर पुढे कुठेच गेले नाहीत.
धरणाच्या जवळ शेती घेतली. तिथे एकटेच राहीले आणि आजारी पडले. तेव्हांपासून तब्येत काही सुधारायला तयार नाही. ते निवृत्त झाल्यापास्नं साबांना पण मोकळा वेळ मिळत नाही. कैदेत असल्यासारखं वाटतं. त्यामुळे त्याही सतत दडपणाखाली असतात. त्यामुळे त्यांचीही तव्येत पूर्वीसारखी राहत नाही. कुणा न कुणावर हे सगळं निघतं. बहुतेक वेळा ते आपणच असतो.. अशा वेळी त्या दोघांना स्पेस देणं गरजेचं आहे हे ओळखून आम्ही दुसरीकडे रहायला गेलो. त्या दोघांना एकमेकांसाठी वेळ देता येणं, त्यांना एकांताची गरज असणं हे महत्वाचं असतं.

>>>ती नेहमी म्हणते,अग मला वेळच मिळत नाही.इतकी ती बिझी असते.स्वतःच्या दु:खाला,एकटेपणाला तिने छान वळ्वून टाकले आहे>>>
हेच इंगित आहे

वर खूप छान सूचना आहेत. माझ्या अनुभवाची भर -
निवृत्तीची तारीख आपलं आयुष्य विभागणारी रेषा समजूं नये. परिस्थितीत फरक पडला तरी माणूस म्हणून आपण सलग तसेच असतो व त्यांत निवृत्तीमुळे अचानक फरक पडत नाहीं. जे बदल आपल्याला स्वतः त घडवायचे असतील , त्याची सुरवात करण्यासाठी निवृत्तीची वाट पाहूं नये. निवृत्तीनंतर
रेवयूंसारखं आदर्शवत जगणं याचं मूळच निवृत्तीपूर्व आयुष्यात असतं, हें नक्की.
आपल्याला नेमकं काय अगदीं आंतून आवडतं त्याचा शोध घेवूनच तसे छंद जोपासावे, काम निवडावं. केवळ 'बिझी रहावं' हा उद्देश न ठेवतां, आपलं मन कशात रमेल, आनंदी राहील त्यात स्वताला झोकून द्यावं.
तसं खूप लिहीण्यासारखं आहे, विशेषतः मीं केलेल्या चूका, पण आतां नको. स्वताचा खराखुरा कल पाहूनच निवृत्तीनंतरचं जगणं तसं केंद्रीत करावं, हें अगत्यपूर्वक सांगावसं वाटलं.

निवृत्तीपश्चात आयुष्याचे नियोजन केले तर नंतरचा काळ सुखाचा ठरेल.

पण रिटायर झाल्यावरच मज्जा करू असं मात्र करू नये.

एका जवळच्या नातेवाईक जोडप्यात सौ गृहिणी होत्या, त्यांना नेहमी सांगितलं जायचं की रिटायरमेंटनंतर मज्जा करू. दुर्दैवाने निवृत्तीपूर्वीच श्रींचं आकस्मिक निधन झालं.

जीवनातले छोटे छोटे आनंद घेण्यासाठी निवृत्तीची वाट पाहू नका.

जीवनातले छोटे छोटे आनंद घेण्यासाठी निवृत्तीची वाट पाहू नका.>>>>> +१.

वर भाऊंनी म्हटलेले आहेच.

>>>केवळ 'बिझी रहावं' हा उद्देश न ठेवतां, आपलं मन कशात रमेल, आनंदी राहील त्यात स्वताला झोकून द्यावं.>>> हे इंगित आहे नाही तर तुम्ही सार्वजनिक वाचनालयात वर्तमानपत्र वाचायला सवयीने जाणे म्हणजे वेळ मारण्यासाठी वा बिझी राहण्यासाठी आणि मग नको त्या न आवडणार्^या समाजसेवेत अडकून घेणे काही कामाचे नाही.
स्वांत सुखाय महत्त्वाचे म्हणूनच आपल्याला काय आवडते हे जाणणे महत्त्वाचे... एम एस इ बी मधील एक निवृत्त अभियंते सध्या इंटरनेट रेडियो चालवाता आणि आनंद घेतात... श्रीपाद रेडियो हे त्यांचे स्टेशन ... आणि श्रीपाद कुलकर्णी हे त्यांचे नाम आहे.

आयुष्याचा आनंद घेण्यासाठी रिटायर होण्याचा संबंध जोडणे इथेच वैचारिक लोचा आहे...
जेव्हा जसा वेळ मिळेल , जशा संधी येतील तशा , तेव्हा , तिथेच हव्या त्या गोष्टी आनंदाने करणे ....

ह्या गृही तकात एक मेजर लोच्या आहे तो म्हणजे दोघांचे उत्तम आरोग्य गृहित धरले आहे. चाळीस पंचे चा ळीस पन्नास पंचावन्न साठ ह्या काल खंडात मेजर रोग तुमच्या शरीरात प्रकट होउन त्यांच्या ट्रीटमेंट वर बर्‍यापैकी खर्च होउ शकतो. इन्सुअरन्स असला तरीही रिकव्हरी वर व सपोर्ट सर्विसेस वर खर्च होउ शकतो. ह्याच्या साठी प्रोव्हिजन नक्की करा व मधील वेळात गुड क्वालिटी ऑफ लाइफ. फिरणे वगैरे एंजॉय करा. शुभेच्छा

*हया गृहीतकात एक मेजर लोच्या आहे तो म्हणजे दोघांचे उत्तम आरोग्य गृहित धरले आहे* - आरोग्य, आर्थिक व इतर अडचणी निर्विवाद असणारच. पण जगण्याचा केंद्रबिंदू जर 'आनंद ' हाच असला, तर या अडचणी सुसह्य होतात व त्यांवर मात करण्याचा हुरूपही येतो , हेंही आहेच.

Pages