रिटायर झाल्यावर आपण दोघं मज्जा करू!!!

Submitted by सचिन काळे on 11 December, 2016 - 00:21

दरवर्षी नोव्हेंबर-डिसेम्बर मध्ये मी माझ्या कुटुंबाला घेऊन भारतातील रमणीय स्थळी सात-आठ दिवस पर्यटनाला जात असतो. पण ह्यावर्षी काही अपरिहार्य कारणामुळे आमचा पर्यटनाला जाण्याचा बेत रद्द करावा लागला.
काल संध्याकाळी मी आणि सौ. अशाच घरगुती गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा आमच्या ह्यावर्षी रद्द झालेल्या पर्यटनाचा विषय निघाला. तेव्हा मी पर्यटन रद्द केल्याने फार वाईट वाटतंय असं म्हणालो. त्यावर सौ. लगेच म्हणाली. "का वाईट वाटून घेताय? त्यात काय एवढं? आता नाही जमलं तर नंतर जाऊ. अजून काही वर्षांनी तुम्ही रिटायर झालात ना, कि आपण दोघं मस्त मज्जा करू. सगळीकडे हिंडू फिरू, खाऊ पिऊ, अगदी धम्माल करू."

त्यावर मी विचार करू लागलो, खरंच कि! नाहीतरी मी काही वर्षांनी रिटायर होणारच आहे. तेव्हा मस्तपैकी भारतच नाही तर अख्खं जग फिरून येऊ. सगळीकडचे स्थानिक उत्तमोत्तम पदार्थ खाऊ. जोडीने हिमालय चढू. माझे पोहणे आणि सौ.चे गायन शिकायचे राहिलंय तेही शिकू. दोघं मिळून नर्मदा परिक्रमा करू. कामाच्या रामरगाड्यात नातेवाईकांशी संबंध दुरावलेत ते पुन्हा जुळवायचा प्रयत्न करू. नाटक, सिनेमा आणि संगीतमैफिलींचा धूमधडाका लाऊन टाकू. मी निवृत्त झाल्यावर आमच्या मनात राहिलेल्या सर्व इच्छा पूर्ण करू. जोडीने अगदी मज्जा मज्जा करू.

मग पुन्हा माझ्या मनात विचार आला कि खरंच! मी निवृत्त झाल्यावर आम्ही ठरवलेल्या आमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकू का? मी निवृत्त होईल तेव्हा आमच्या दोघांचं वय चांगलंच वाढलेलं असेल. आमचे हातपाय थकलेले असतील. विविध प्रकारची आजारपणं मागे लागलेली असतील. शरीराची इंद्रिये काम करेनाशी झालेली असतील. तेव्हा विविध प्रकारची व्यंजने खाऊ शकू का? जगभर फिरायला, नर्मदा परिक्रमा करायला, हिमालय चढायला, नातेवाईकांकडे जायला हातपाय साथ देतील का?

कारण आपल्याला असे बरेच निवृत्त झालेले दिसतात. ज्यांचं निवृत्ती नंतरचं पहिलं वर्ष स्थिरस्थावर होण्यामध्ये जाते. पुढचं वर्ष उत्साहाने विविध उपक्रम अंमलात आणण्यात जाते. मग पुढील काही वर्षात हळूहळू विविध कारणांमुळे उत्साह मंदावत जाऊन, शेवटी येणारा रोजचा दिवस, पूर्ण दिवसभर घरी बसून खिडकीबाहेर शून्यात बघण्यात जात असतो.

येथे मायबोलीवरील बरेच सभासद निवृत्त झालेले असतील. किंवा काही जणांचे आईवडील किंवा त्यांचे नातेवाईक आणि ओळखीचे लोकं निवृत्त झालेले असतील. अशा सभासदांना मला काही विचारायचंय. आपणांस अशा काही निवृत्त झालेल्या व्यक्तींचे अनुभव माहित आहेत का? ज्यांनी निवृत्त व्हायच्या दोन पाच वर्षे अगोदर मनात काही इच्छा, योजना आखल्यात, कि आपण निवृत्त झाल्यावर हे करू आणि ते करू, आणि आता त्याप्रमाणे निवृत्त झाल्यावर, पूर्वी आपल्या मनात असलेल्या इच्छा, योजना विविध अडचणी येऊनही ते त्या अंमलात आणत आहेत किंवा त्यांनी त्या पूर्णत्वास नेलेल्या आहेत.

मला स्वतःला अशी दोन चार उदाहरणं माहित आहेत. त्यांच्या विषयी सांगतो. माझ्या ऑफिसमध्ये एक डिसुझा नावाचे सहकारी होते. त्यांना धार्मिक गोष्टींची आवड होती. पण नोकरीमुळे ते त्या गोष्टीला जास्त वेळ देऊ शकत नव्हते. आता निवृत्तीनंतर गेले काही वर्षे ते पूर्णवेळ धर्म प्रसारकाचे काम करत असतात. दुसऱ्या एका सहकाऱ्यांना कामगार कायद्यात रस होता. निवृत्तीनंतर ते आता अन्याय झालेल्या कामगारांना मोफत कायदे विषयक सल्ला देण्याचे काम करीत असतात. दुसरे एक माझे नातेवाईक होते. त्यांना पूर्वीपासून शेतीत रस होता. पण नोकरीमुळे शेती करणेे शक्यच नव्हते. पुढे निवृत्तीनंतर जमीन विकत घेऊन ते बरीच वर्षे शेती करीत होते.

आपणांसहि अशा लोकांची उदाहरणे माहित असतीलच, ज्यांनी निवृत्तीनंतर नुसतं घरी बसून न राहता, आलेले दिवस ढकलत न राहता, आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य, त्यांनी नोकरी करत असताना पाहिलेल्या स्वप्नांची, इच्छांची पूर्तता करण्यात खर्च केले. अशी उदाहरणे आपण येथे दिलीत तर जे यापुढे निवृत्त होणार असतील, त्यांना त्यातून काही बोध घेता येईल. अशां उदाहरणांतून त्यांना काही प्रमाणात दिलासा, नवीन कल्पना, हुरूप आणि स्फूर्ती मिळेल.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिटायरमेंट नंतर सुरुवातीला उत्साह असतो नंतर तो विविध कारणांनी रहात नाही हा स्वेच्छानिवृत्ती नंतर स्वानुभव आहे. पण सगळ्यांना सगळ मिळत नसते हे मान्य केले की झाल. जमेल तो आनंद पदारात पाडून घेणे मग हे रिटायमेंट पुर्वी वा नंतर सगळ्याला लागू आहे. दात आहेत तर चणे नाहीत चणे आहेत तर दात नाहीत हे होत रहाते

माझे सासू-सासरे आणि वडील असे तीन लोक माझ्या बघण्यात आहेत. प्रचंड बिझी असतात. चार दिवस आमच्याकडे यायचे तर १७६० arrangements कराव्या लागतात. काम खोळंबतात. सासरे अत्यंत सोशल आहेत. शेत, देऊळ, विवेकानंद केंद्र हे त्यांची मुख्य बिझी राहण्याची कारण. देवळाच्या management खूप आधीपासून आहे. शेत आणि विवेकानंद केंद्र हे आत्ता रिटायर झाल्यावर लावून घेतलेले व्याप आहेत. तसेच त्यांनी सार्वजनिक वाचनालय काढले आहे. शिवाय अंधांसाठी वाचनालय काढलेले आहे. मला नीट लिहिता येत नाहीये. मी समाजाचे देणे लागतो आणि त्यासाठी मला काहीतरी करायला पाहिजे हा विचार सतत त्यांच्या मनांत असतो. ह्या विचारामुळे त्यांना सतत नवनवीन आयडिया येत असतात बिझी राहायच्या. मध्ये एक गाय विकत घेतली होत, अडचणीतल्या शेतकऱ्याकडून, मग त्या गायीच्या मागे वेळ गेला. मग त्या गायीचं बाळंतपण वैगेरे, नव वासरू ह्यात वेळ जातो. आठवड्या चा एक दिवस शेतात जातो. रोज सकाळी शेताचा अपडेट, मजुरांना काम देणं, पाणी आलाय का बघणं, केंद्राची काम, देवळाच्या मिटिंग, कार्यक्रम आखणी, वाचनालायाचे काम, रोज सकाळी ते दोन तास योगा-प्राणयायम करतात. पोहायला जातात. बाकी मूड आला की असेच भारतदर्शनाला किंवा जग पर्यटनाला निघतात. ते प्लानिग सासूबाईचे department आहे. त्यांच्याबद्दल नंतर कधीतरी.

मझ्या आई-वडलांची गोष्ट.आई,आम्हा दोघांत अजून गुरफटली.तिचा वाचनाचा छंद होताच.त्यामुळे विशेष काही जाणवले नाही. माझ्या वडलांचीच काळजी होती. पण त्यांनी रिटायरमेंटनंतर देऊळ पकडले.अर्थात देवभक्ती नव्हे,तर इतर रिटायर्ड म्हातारे भेटायचे.गप्पा मारायचे म्हणून.मग झालेल्या ओळखींतून बरेचजणांना पैशाच्याबाबत मार्गदर्शन करणे किंवा बाकी मदत करणे इ.इ.त्याचवेळी घरी नातवंडही अवतरलं होतेच.तिला घेऊन फेरी मारणे वगैरेंमधे बरेच व्यस्त होते.शेवटी माझे काका एकदा वैतागून पुटपुटले होते की दारुड्याला गुत्ता तसं ह्याला देऊळ झालंय.त्यावेळी गेलं नाही तर बेचैन होतो वगैरे वगैरे. अगदी खरं होते मात्र.कारण आयुष्यात पूजाकेली नाही की गणपतीच्यावेळी कधी आरती म्हटली नाही.पण रिटायरमेंटनंतर देऊळ चुकवायचे नाहीत.

एक गृहस्थ ( ? देशपांडे ) सरकारी नोकरीची २० व. झाल्याझाल्या निवृत्त झाले. वय जेमतेम ४४.
आता त्यांनी आपले आयुष्य Shakespeare ची सर्व नाटके मराठीत अनुवादित करण्यासाठी राखून ठेवले आहे.
किती चांगला उपक्रम.

बाकी खाजगी क्षेत्रातून लवकर निवृत्त होउन आता फक्त लेखन करणारेही काही आहेत पण, ते त्यांच्या श्रीमंतीचा बडेजाव सतत मिरवत असतात.
त्यामुळे देशपांडे अधिक भावतात.

शेवटी येणारा रोजचा दिवस, पूर्ण दिवसभर घरी बसून खिडकीबाहेर शून्यात बघण्यात जात असतो.>> आजकाल असं नाहीये बर का.मागच्या जमान्यात पण नव्हतं खरं तर . आणि रिटायर झाल्यावर तुम्ही पण फिरू शकता . विविध पर्यटन स्थळांना भेटी देऊ शकता

तुम्हाला फिरायची आवड आहे तर केसरीने फक्त सिनियर सिटिझन्स करता विविध प्याकेज उपलब्ध करून दिली आहेत . त्याचा तुम्ही पण लाभ घेऊ शकता ( रिटायर झाल्यावर ). किती तरी सिनियर सिटिझन्स घेतही आहेत त्यांची आजारपण /गोळ्या सगळं सांभाळून. निगेटिव्ह का विचार करता ? पॉझिटिव्ह रहा . आनंदी रहा

माझ्या आईने स्वतःहून रिटायर झाल्यावर " सिनियर सिटीझन" संघटनेची काम अंगावर घेतली होती. रिटायर झाल्यावर ती रुद्र शिकली. त्यांचा बायकांचा ग्रुप होता ( सगळ्या सिनियर ) पूजेला रुद्र म्हणायला जात होत्या. त्यांना ( त्यांच्या ग्रुपला )घरोघरी आमंत्रण असायची.कुठे कुठे रेल्वे /ट्याक्सीने जात होत्या उलट नोकरी पेक्षा रिटायर झाल्यावर ती जास्त बिझी झाली. म्हणजे आज घरात आहेस ना ? असं विचारूनच माहेरी जावं लागायचं. वडिलांना कशाची आवड नव्हती/ईछाही नव्हती पण त्यांनी त्यांच स्वतःच रुटीन लावून घेतलं होत. त्या प्रमाणे ते घराबाहेर पडत. ( सकाळ/संद्याकाळ दोन्ही वेळा ) .लायब्ररीत जात सकाळचा पेपर वाचत .इतर वाचन येताना मस्त नाश्ता करून घरी. संध्याकाळी पण बाहेर जात . ते स्वतः शेवटपर्यंत मजेत राहिले त्याच्या ईछेनुसार. खिडकीबाहेर शून्यात असं कधी झालं नाही Wink

२०१० मध्ये मी कार घेउन टूर काढला होता जरा लांबचा. हैद्राबात ते बंगलोर, बंडीपूर, मैसुर, उटी, मुन्नार, थेकडी.
लांब आणि घाटातला प्रवास माझ्या ड्रायव्हींग जरा कौतुक झालेच.

तिथे मुन्नारच्या राजमलई हिल्सवरील नॅशनल पार्कला जाताना वाटेत जोडपे भेटले. स्कूटची नंबर प्लेट नागपूरची. मराठी बोलत होते. आम्हाला वाटले इकडे ट्रान्सफर झाली असेल, स्कुटर आणली असेल तर म्हणाले की नाही. त्यांची भारत फिरण्याची इच्छा, स्कूटर वरुन. निवृत्ती नंतर फिरायचे ठरवले होते. नागपूर वरुन स्कुटरने निघुन ते हैद्राबाद, श्रीशैलम, भद्राचलम, बंगलोर, कोडाईकनाल, मदुरई, रामेश्वरम, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम, कोवलम अ‍ॅलेपी असे करत मुनारला आले होते. हे ऐकुन आम्ही थक्क झालो. तीन महिन्यांपूर्वी नागपूरहून निघाले होते. दक्षीण यात्रा झाली की परत जाउन मग काही महिन्यांनी कोकण गोवा करणार, मग गुजरात, राजस्थान करत उत्तर भारत करणार असा त्यांचा प्लान होता.
साक्षात दंडवत घातला त्यांना.

रिटाअरमेंटनंतर काय करायचे असेल ते चाळीशीनंतर सुरुवात करून ठेवावे. नंतर ते फक्त चालू ठेवायला सोपे जाते.

रिटाअरमेंटनंतर काय करायचे असेल ते चाळीशीनंतर सुरुवात करून ठेवावे. नंतर ते फक्त चालू ठेवायला सोपे जाते. >>>> +१
राजसीची पोस्ट आवडली. तिचे सासूसासरे भेटण्याचा योग आला. रिटायर्ड बट नॉट रिटायर्ड लाईफ मस्त एन्जॉय करताहेत...
इतर गोष्टी (एंजॉयमेंट्/फिरण) नी समधान, आनंद मिळतो तर समाजकार्यांनी साथर्कता!

माझे वय ६५ व सौ ६०. मी ५ वर्षांपूर्वी निवृत्त झालो. आम्हा उभयतांचे पर्यटन, शिकवणे आणि भाषांवर नितांत प्रेम आहे परंतु प्रापंचिक आणि व्यावसायिक व्यस्ततेमुळे त्या वर फारसा वेळ देता आला नाही.
त्या मुळे निवृत्ती नंतर आम्ही वर्षातून दोनदा आवर्जून, प्रत्येकी एक देशात व एक विदेशात अशा दोन सहली करतो. आजवर आम्ही केरळ, राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश,गुजरात अशा देशातील आणि पूर्व युरोप, चीन, बाली, अमेरिका,नेपाळ अशा सहली केल्या आहेत, निवृत्तीच्या आधी मी व हिने कंप्युटर व इंटरनेट वापरण्याची सवय केल्या मुळे देशातील सर्व आणि विदेशातील २ अशा सहली स्वत: ऒन लाईन बुकिंग व स्थळांचे एक्स्प्लोरेशन करून केल्या. त्या मुळे खूप मजा आली. आज सर्वसामान्य असणारे इंटरनेट आमच्या पन्नाशी नंतरच्या “युवकांसाठी” २००० सालात प्रचलित नव्हते व ते आम्ही तेव्हा आत्मसात केले – दोघांनी मिळून याचा अभिमान वाटतो.
या पर्यट्नात खूप हिंडावे व पायी चालावे लागते त्या मुळे आम्ही रोज कमीत कमी ५० मिनिटे वॉकिंग वा शारिरिक व्यायाम , आठवड्यातून ४ ते ५ दिवस तरी करतो. त्या मुळे आम्हाला बीपी शुगर असा कोणताही त्रास नाही.
वाचन लेखनाचा छंद आम्ही विकसित केला साठी नंतर. मी अर्ध वेळ व्यावसायिक रीत्या पुस्तके भाषांतरित करतो तसेच प्रवास वर्णने व स्फुटे, काही स्वांत सुखाय तर काही प्रकाशनासाठी करतो.नुकतेच माझे ३१२ पानांचे जॉन मेडिना या आंतर्राष्ट्रीय ख्याति प्राप्त न्युरोसायंटिस्टचे न्यू यॉर्क बेस्ट सेलर, “ब्रेन रूल्स” हे साकेत प्रकाशना कडून मराठी भाषांतर प्रकाशित झाले आहे.
या व्यतिरिक्त सौ. घरी गरीब मुलांच्या शिकवण्या करते व अंधांना शिकवते. तिचे दोन विद्यार्थी बी ए झाले व नोकरीत आहेत.
हे सर्व निवृत्ती आधी साध्य झाले नव्हते पण आम्हाला आमच्यातील या आसक्तीची ( पॅशन) ची जाणिव होती.
या शिवाय सृजनशील विरंगुळा म्हणून आम्ही येथील फिल्म क्लबचे सदस्य आहोत व महिन्यात आंतर्राष्टीय दर्जेदार विविध भाषातील २ चित्रपट पाहतो व त्या वर इतर मित्र-सदस्यांबरोबर चर्चा करतो.
मी कामगारांसाठी व्यक्तिमत्त्व विकास व निवृत्ती आयोजनाचे वर्ग चालवतो.
मला शास्त्रीय संगीत खूप आवडते पण आमच्या काळात सी डी परवडत नसल्याने मी संग्रह करू शकलो नव्हतो परंतु आता यू ट्यूब वरून जवळ जवळ सर्व गायक व वादकांचे उत्तमोत्तम राग मी डाऊनलोड केले आहेत व पेन ड्राईव्ह वरून रोज कमीत कमी १ तास तरी ऐकतो.
आमची मुले आपापल्या घरी सुखात आहेत.
आम्हाला वाटेल तेव्हा कधी मधी इतर पध्दतीचे जेवण ... पिझ्झा, थाय , मेक्सिकन इ. बाहेर खातो व अनेकदा घरी सुध्दा बनवतो.
कुटुंबातील सर्व मंगल कार्यांना, तसेच दु:खद प्रसंगी उपस्थित राहतो... आवर्जून !!!!
हे सर्व विषय निघाला म्हणून लिहिले आहे.

निवृत्ती नंतर अशी आमची मज्जा चालू आहे
Happy Happy

@ रेव्यु, निवृत्ती नंतर अशी आमची मज्जा चालू आहे>>> निवृत्तीनंतर आपण करीत असलेली मज्जा आवडली.

आपण आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य, आपण नोकरी करत असताना पाहिलेल्या स्वप्नांची, इच्छांची पूर्तता करण्यात खर्च करीत आहात, हे जाणून आनंद वाटला. आपल्या उदाहरणांतून निवृत्ती जवळ आलेले आमच्यासारखे दिलासा, नवीन कल्पना, हुरूप आणि स्फूर्ती नक्कीच घेतील. आपल्या पुढील मज्जेकरिता शुभेच्छा!!!

मस्त पोस्ट रेव्यू.

ते आपण दोघे तले दोघे असतानाच शकयतो जमेल ती मजा करून घ्यावी. पर्यटन खादाडी, सिनेमे इत्यादि. नाहीतर सर्वत्र एकटे फिरण्याची मानसिक तयारी हवी. ऑफिशिअली निवृत्त होण्याआधी किमान
पाच सात वर्शे तरी तेव्हा जीवन कसे होणार आहे त्या बद्दल विचार करून तशी तजवीज करावी व मेंटल मेकप बनवून रूटिन बदलत आणावे. मीऑल विमेन गॄप बरोबर फिरते. आणि जनरली कॉलेज मधून बाहेर पडल्यावर नव्या नोकरीत जसे प्लॅन होते तशी वागते. लंच टाइम मध्ये मजा करणे शॉपिन्ग करणे खादाडी, वाचन गाणी ऐकणे. लगता है मेरे बचपनके दिन फिरसे आ गये.

वा रेव्यू मस्त ! एंजॉय Happy

मला अस वाटते की वयाच्या त्या टप्प्यावर पैश्यापेक्षाही जास्त महत्वाचे असते ते आयुष्याचा जोडीदार. मला तर आजही कुठे फिरायला जाणार यापेक्षा कोणाबरोबर फिरायला जाणार हे जास्त मॅटर करते. त्यामुळे तसा जोडीदार आजच शोधायला घ्या. पण त्याचबरोबर तेव्हा कोणीतरी एक पुढे जाणार आणि एक मागे राहणार याचा स्विकारही केला पाहिजे आणि त्या स्थितीवर मात करायला म्हणून आपल्याला एकटेपणातही आनंद देऊ शकणारे छंदही तेव्हा कसे जोपासता येतील त्याची तरतूद करायला हवी. म्हणजे त्यासाठी गरजेचा पुरेसा पैसा आणि पुरेसे स्वास्थ्य हे त्या वयात कसे जपता येईल हे बघायला हवे.

@ ऋन्मेष, त्या स्थितीवर मात करायला म्हणून आपल्याला एकटेपणातही आनंद देऊ शकणारे छंदही तेव्हा कसे जोपासता येतील त्याची तरतूद करायला हवी.>>> व्वा:, नेहमीप्रमाणे 'सही पकडेंं हैं' !!!!

आपल्याला मनापासून कराव्याश्या वाटणार्‍या गोष्टींसाठी निवृत्तीपर्यंत थांबणं मला फार अवघड वाटतं. तेंव्हा हात - पाय चालत नसतील तर? अशी थोडी भीतीही. जे करायचं ते शक्य होईल तितक्या लवकरात लवकर.

तब्येत उत्तम राखणे महत्वाचे. त्यासाठी आतापासूनच काळजी घ्या. ती असेल तर मग कुठलीच बंधने रहात नाहीत.
माझ्या बाबांनी रिटायर ( ३८ वर्षे एकाच कम्पनीत ) झाल्यावर आणि १६ वर्षे काम केले. अगदी गेले त्या दिवसापर्यंत. त्यानी आपले छंदही व्यवस्थित जपले होते.
माझी आई ८२ वर्षी पण कार्यरत आहे. रोजचे सर्व काम करतेच शिवाय मोदक वगैरेही हौसेने करते. अजून प्रवास करते.

तेव्हा आतापासूनच प्लानिंग करा.. आणि इतका पुढचाही विचार करू नका. जे आज, आता करणे शक्य आहे, ते आताच करा.

रिटायरमेंट साठी तरतुद करणं, वेगवेगळे प्लॅन आखणं हे सगळं ठीक आहे, पण कितीही हेल्दी लाइफस्टाइल असली तरी ६० नंतर मजा करायला हात पाय धड रहातील याची काय खात्री? काहीही कारण असु शकतं कि ज्या मुळे तुम्ही शरीराने तेवढे स्ट्राँग राहु शकत नाही, किंवा काही कारणाने आता एवढा पैसा राहिला नाही तर? किंवा हे..... किंवा ते..... पण काय खात्री कि ६० नंतर मजा करता येइलच अशी.

आता भरपुर पैसे आहेत, शरीर स्ट्राँग आहे, मजा करण्याची इच्छा आहे तेव्हाच जगुन घ्या. वर्षातुन ६-८ दिवससुद्धा मो़कळे मिळत नाहीत असं होतच नाही आणि मज्जा म्हणजे फक्त प्रवास असं थोडे ही ना असतं. महिन्यातुन एकदा गाण्याच्या कार्यक्रमाला जाणं, एमलेस ड्राइव्ज, पब्ज मधे जावुन नाचणं, एक दिवसाचं पिकनिक, नातेवाइकांबरोबर मजेत गप्पा मारत एक संध्याकाळ किंवा प्लॅन न करताच अचानक फोन करुन आवडत्या लोकांना बोलवुन रात्री ११ वाजता कॉफी प्यायाला बाहेर पडणं...... अतरंगी आणि कलरफुल जगण्यासाठी तेव्हा जे वाटेल ते करायचं. यानेच रिटायरमेंटनंतरच आयुष्य तृप्त असेल. हे करायचं राहुन गेलं, ते केलं नाही अशी रुखरुख असणार नाही. जर मजेशीर आठवणी आणि तृप्त आयुश्य जगलं तर खिडकितुन शुन्यात बघायची वेळच येणार नाही. खिडकितुन बाहेर पहाताना चेहर्‍यावर किंचित स्माइल तरी असेल किंवा मनात घोळवायला छानशा आठवणी.
त्यातुनही फिट शरीर आणि व्यवस्थित सेविंग्ज असतील तर परत ६० नंतरसुद्धा मजा करा ना. पण तेव्हा मजा करायची म्हणुन आताचं जगण पुढे ढकलायच आणि तो कल उगवलाच नाही तर?

विषय थोडा भरकटतोय !!! जर आता करता आल नाही तर निवृत्ती कशी व्यतित करायची असा धागा कर्त्याचा उद्द्देश अभिप्रेत होता!!!

रेव्यू !!!
नोकरीवाले निवृत्तीची चर्चा फार करतात. सगळे इतरही थकत असतात. हळहळू कामातून लक्ष काढत जाणे योग्य. चाळीशीनंतर एक गोष्ट लक्षात येऊ लागते ती म्हणजे अगोदर जे हाकेला ओ देणारे मित्र मैत्रिणी असतात ते आपापल्या नवीन नातेसंबंधांत गुंतत जातात आणि 'अनवेलबल ' होत जातात. अशावेळी काही वेगळेच आतापर्यंत न केलेल्या कार्यक्रमांत हजेरी लावत जाणे सुरू करावे. नवीन ओळखी होतात. साठीनंतर फक्त ज्येष्ठांसाठी असलेले कार्यक्रम टाळावेत. कंटाळवाणे बडबड ऐकावी लागते. अर्थात हे सर्व कशाला तर आपण जी मज्जा करणार आहोत त्यासाठीची मनाची तयारी हा उद्देश.

मनिमाऊ , प्रतिसाद पटला.

जिंदगी ना मिलेगी दोबारा मधला असाच एक संवाद आठवला :

"What’s the plan in your life?"

“Thats the plan, chalis ke baad retirement and enjoyment”

"dude , तुम्हे कैसे पता की तुम चालीस साल जिंदा रहोगे ?"

माझी आई वय वर्षे ८३.हार्ट पेशंट आहे.
वाचनाची,स्वयंपाकाची आवड होतीच.मुलांमधे डोळसपणे गुंतली होती.पण माझा भाऊ,वडील यांच्या लागोपाठ झालेल्या मृत्यूनंतर २०११पासून ती, चिंचवडला राहू लागली.आसपासच्या छोट्याश्या जागेत माळ्याच्या मदतीने वेगवेगळी झाडे लावून मुंबईत अपुरा राहिलेला बागकामाचा छंद जोपासत आहे.आधी भाजीपाला लावून झाला.जी भाजी येईल ती आसपास वाटली जयची.तिच्यापासून प्रेरणा घेऊन तिथे आधीपासून स्तायिक असलेल्या मंडळींनी घरच्यापुरता भाजीपाला लावायला सुरुवात केली.
या कामात तिने जोडलेली माणसेही तेवढीच महत्वाची आहेत.आजही स्वतः बँकेची काही काने किंवा इतर कामे ती करते.तिचा नेहमीचा रिक्क्षावाला तिच्याबरोबर असतो.मुंबईला येताना क्वचित मला न कळवता ठरलेल्या टुरिस्टगाडीने येते.
ती नेहमी म्हणते,अग मला वेळच मिळत नाही.इतकी ती बिझी असते.स्वतःच्या दु:खाला,एकटेपणाला तिने छान वळ्वून टाकले आहे.अर्थात इतके काही सहज झाले नव्हते.भावाच्या जाण्यानंतर काहीजण येऊन सहज खडा टाकायचे की घरविकणार का? विकले तर आम्हाला विका.त्यावेळी ती उदास होऊन म्हणायची की असे हे कसे विचारु शकतात? तिला सांगितले की शेवटी प्रत्येकजण आपापला स्वार्थ पहाणारच्,पण जे कोणी विचारेल त्यांना सांगायला सुरुवात कर की माझ्यानंतर माझी नातवंडे काय ते ठरवतील.त्यानंतर मात्र या विषयावर पडदा पडला आहे,
खूप अवांतर झाले.

>>>ते आपण दोघे तले दोघे असतानाच शकयतो जमेल ती मजा करून घ्यावी. -

अमा सहमत. मी नवर्याला हेच सांगायची पण त्याने कधी एकले नाही. संसाराचा व्याप वाढला की खुपच फरक पडतो आणी ईच्छाही रहात नाही. रिटायरमेंट नंतर काय होणार देव जाणे.

>>>आपल्याला मनापासून कराव्याश्या वाटणार्‍या गोष्टींसाठी निवृत्तीपर्यंत थांबणं मला फार अवघड वाटतं.--

अगदी सहमत. कल किसने देखा!

सचिन सर, मी बघितलेल्या सिनिअर सिटिझन्स मध्ये आयुष्य एंजॉय करणारे लोक नक्कीच जास्त आहेत Happy हतबल ,एकलकोंडे झालेले फार कमी आहेत. त्यामुळे मला तर असं झालंय की कधी एकदा मी निवृत्त होतेय आणि जग फिरायल निघतेय Happy
पैसे आणि तब्येत ह्या गोष्टी तुम्ही आणि मिसेस अगदी काटेकोरपणे सांभाळा. निवृत्त झालात की हास्ययोगा क्लब ला १००% नियमीतपणे जा. मन आणि शरीर दोन्ही आनंदी ठेवण्याचा सोप्पा उपाय. माझ्या आई वडिलांनी आयुष्यभर खूप hardwork केलं. टिपिकल तुमची जनरेशन. पण ते निवृत्त झाल्यापासून आम्ही त्यांना पक्कं सांगून ठेवलं की आता तुमचा एकच जॉब - स्वतःला निरोगी, आनंदी ठेवणे. हा जो जॉब तुम्ही आता परफेक्ट्ली करायचा. ते ज्या हास्ययोगा क्लबात जातात तो आम्हालाही खूप आवडतो. शक्य तेव्हा आम्हीही जातो त्या क्लबात. त्यातून छान नव्या ओळखीसुद्धा होतात. हे लोक नाटक सिनेमा जवळच्या ट्रिप सगळं करतात, जसं जमेल तसं.
खाण्यापिण्यावर थोडीफार बंधनं येतात पण ते कोणाला नसतात हो Happy

Pages