अशा लोकांचा मोबाईल, जमिनीवर आपटून फोडावासा वाटतो

Submitted by सचिन काळे on 3 December, 2016 - 13:13

अहो! असं रोखून काय पाहताय माझ्याकडे? मी फक्त 'वाटतो' असं लिहिलंय. साधा फुगा फोडायला घाबरणारा मी, माझी काय हिंमत दुसऱ्या कोणाचा मोबाईल फोडायची. मला आपलं त्या 'अर्चना सरकार' यांच्या 'त्याच सिगारेटचा चटका द्यावासा वाटतो' ह्या शिर्षकावरून स्फुरण चढलं आणि देऊन टाकलं तसलंच डेअरिंगबाज शीर्षक माझ्या लेखाला. असो.

तर माझ्या मनात असा अतिरेकी विचार का उगवला ते सांगतो. त्याचं काय ए, कि स्टेशनपासून घराकडे चालत जाताना आमच्याकडे सहा-सात फूट रुंदी असलेला, एकूण पाच मिनिटे चालत जाण्याच्या अंतराएवढा सरळसोट, लवकर न संपणारा, 'I' (आय) आकाराचा फूट ओव्हर ब्रिज आहे. माटुंगा स्टेशनच्या वर्कशॉपवर 'Z' (झेड) आकाराचा फूट ओव्हर ब्रिज आहे ना, अगदी तस्सा!

आता होतं काय, कि त्या ब्रिजवर आपल्या पुढे किंवा मागे चालत असणारी व्यक्ती ब्रिज संपेपर्यंत पूर्ण पाच मिनिटे आपल्याबरोबरच चालत असते. आणि जरका ती व्यक्ती मोबाईलवर बोलत असेल तर आपली काही धडगत नसते. पूर्ण पाच मिनिटे त्यांचं मोबाईलवरचं संभाषण आपल्या कानावर पडत रहातं. ना तुम्ही कान बंद करू शकता, ना त्यांचं संभाषण ऐकणं टाळू शकता. गुमान त्यांचे बोलणे ऐकत चालण्याची शिक्षा भोगावी लागते.

अहाहा!! काय ते एक से एक, भारी भारी संवाद कानी पडत असतात. मोबाईलवर बोलणारी ती व्यक्ती ज्या वयाची, वर्गाची, लिंगाची, व्यवसायाची, स्वभावाची, पदाची, नात्याची आणि अशा बऱ्याच गोष्टींची असेल, त्याप्रमाणे संवादाचं स्वरूप बदलत रहातं. ऐकता ऐकता हळूहळू मी त्यांच्या संवादात अडकू लागतो. त्यांच्या बोलण्यात मनोमन भाग घेऊ लागतो. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीच्या रंगरूपाची, तिथल्या परिस्थितीची कल्पना करू लागतो. मग जसा संवाद चालू असेल तसा माझा मूड बनू लागतो.

कधी शाळकरी मुलगा मोबाईलवर आपल्या सवंगड्याशी बोलत असतो "आज शाळेतून मी कल्टी मारलेली सरांच्या लक्षातच आले नाही" तेव्हा मला त्याच्या भविष्याची चिंता वाटायला लागते. कधी एखादा कॉलेजकुमार आपल्या मित्राशी बोलत असतो "तू डरता क्यों है बे! मेरा बाप लाखों में कमाता है" हे ऐकून मला देशाचे भविष्य काळवंडताना दिसू लागतं. एखादी कॉलेजकन्यका कोणालातरी "मी नाही ज्जा! चावट कुठला!" म्हणते तेव्हा माझे कान टवकारून उभे रहातात. एखादी गृहिणी "अगं मी बाकीचं नंतर सांगते, माझं बाळ घरी वाट पहात असेल गं" म्हणते तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर आईची वाट बघून झोपी गेलेले बाळ दिसू लागते. एखादी म्हातारी बोलताना "बाळा, तू कधी येणार रे घरी?" अशी साद घालते, तेव्हा तिचा लष्करातला जवान मुलगा सीमेवर तैनात असलेला मला दिसू लागतो. एखादा यू पी वाला "भैसवाँ को बछडा भई गवां का?" विचारतो तेव्हा मला तबेल्यात रवंथ करणाऱ्या म्हशी दिसू लागतात. एखादा सुटेड बुटेड साहेब जोरात ओरडतो "I don't know anything! मुझे सुबह तक सब पेपर्स मेरे टेबलपर चाहिए, मतलब चाहिए" ते ऐकल्यावर मला हाग्यादम देणारा माझा साहेब डोळ्यापुढे नाचू लागतो. एखादा सिंधी बेपारी बोलत असतो "अरे साईं, तुम घबरता क्यो है? कितना माल चाहिए, सिर्फ बोलो नी!" कि मला made in usa चा माल बनवणारे कारखाने आणि त्यात काम करणारे कामगार दिसू लागतात. एखादा कष्टकरी बिगारी कामगार बोलत असतो " बोल माये बोल! म्या ऐकून राह्यलोय" कि मला चुलीवर भाकर थापणारी त्याची माउली दिसू लागते.

एव्हढ्या वर्षांत कोणाकोणाची संभाषणं माझ्या कानी पडलीयत ती! अजून किती किती सांगू? मी घरी जायच्या घाईत, आपल्याच विचारात ब्रिजवर चालत असतो. पोटात भूक आणि जीवाला घरची ओढ लागलेली असते. आपल्या अडचणी आपल्याला काय कमी असतात, त्यात हे वेगवेगळ्या लोकांचे मोबाईलवरचे संभाषण आपण ऐकत चालायचे? कंटाळलो हो मी ह्या सर्व संभाषणांना! (कंटाळले गं बाई मी ह्या केसांना! (प्रकाशचे माक्याचे तेल) च्या चालीवर वाचा!) काय करू? कुठे जाऊ? कोणाला सांगू? (सहन होईना आणि सांगताही येईना! च्या चालीवर वाचा!) मी तुम्हाला विचारतो. तुम्हालाही असले अनुभव आलेलेे असतीलच ना? तुम्हीसुद्धा कोणा मोबाईलवर बोलणाऱ्याच्या तावडीत सापडला असालच ना? आणि काही कारणाने सुटका न झाल्याने, तुम्हाला त्यांचं संभाषण मुकाट ऐकत बसावं लागलं असेलच ना? मग मला खात्री आहे. तेव्हा तुमच्याही मनात नक्की हाच विचार आलेला असेल, कि "अशा लोकांचा मोबाईल, जमिनीवर आपटून फोडावासा वाटतो."

( ट्रिंग ट्रिंग! हॅलो! मी बोलतोय - "वाटलं होतंं, जरा आपणही थोडं विनोदी लिहून पहावं. जमलं का मग?")

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकल ट्रेनमध्ये एखादा गुज्जु बेपारी असेल तर तो ज्या आवाजाच्या पट्टीत फोनवर बोलत असतो संपुर्ण डब्बा ते संभाषण ऐकू शकतो >>> लोकलट्रेनमध्ये तारस्वरात बोलणाऱ्या अशाच एका गुज्जू बेपारीला मी सुनावलं होतं "भाईसाहब, आपको फोन कि क्या जरुरत है? आप बगैर फोन के बात करते, तो भी सामनेवालेको सुनाई पडता" अर्थात, बरोबरचे सहप्रवासीही त्याला खुन्नसने पहात होते म्हणून मी बोलायची डेअरिंग केली. ओशाळला होता बिचारा! Biggrin

अवांतर : पण खरेच! हे गुजराती स्त्रीपुरुष एव्हढे तारस्वरात, वचावचा का संभाषण करत असतात. त्यांच्यात नक्की प्रॉब्लेम कुठे असतो? बहिरे असतात? स्वरयंत्र जन्मतः मोठे असते? कि जनाची बेपर्वाई? कि अजून काही? एवढया वर्षात मला न सुटलेले कोडे आहे.

किती थोर विचार .....!!!!!!!!!!!!!!
ऑफिसच्या लोकांची एवढी काळजी ....बापरे ! ! !
धन्य आहात सर तुम्ही आणि तुमचे विचार ...!

नविन नविन सेल फोन आले होते, ९५ मध्ये आणि साधारण ९६, ९७ मध्ये बर्‍याच व्यापार्‍यांकडे आले. तेव्हा असाच वैताग यायचा. रेस्टॉरंट मध्ये अचानक कोणी तरी मोठ्याने सेलवर ओरडून बोलु लागायचा. विमानात सुरवातीला सेल फोन बंद ठेवण्याची सक्ती नव्हती. तेव्हा बरेच महाभाग अगदी टेक ऑफ झाल्यावर सिग्नल तुटे पर्यंत बोलायचे, आणि विमान परत जमीनीला स्पर्श करते की नाही तेवढ्यात "हेलो sss हां लँड होई गयो " करत सुरु व्हायचे.

ऋन्मेऽऽष >>> मलाही बर्याचदा चालु बाईकला लाथ मारुन पाडावे असे वाटते पण होणारी हानी लक्शात घेता मी तो मोह अजुन तरी टाळलाय

आता मोबाईलमुळे होणार्या त्रासाबद्दल बोलायचे आतापर्यंत तर मला कधीच असा त्रास झाला नाही कारण ...
१ - जास्तकरुन मी स्वःतातच गुंग असते की आजुबाजुला काय चाललेय याचा काही फरकच पडत नाही

२ - खरेच एखादी व्यक्ती मोठ्याने बोलत असेल / स्पीकरवर गाणी एकत असेल जे त्रासीक असेल तर मी स्पष्ट्पणे त्यांना आवाज कमी करायला सांगते

खरतर माझा मोठ्ठा प्रोब्लेम असा आहे की बर्याचदा माझी तंद्री लागते अन त्यावेळी मी हायवे सुद्धा आजुबाजुला न पहाता क्रॉस केलेत तर मला आजुबाजुवाल्यांचा काय त्रास होणार

चालु बाईकला लाथ मारुन पाडावे असे वाटते>>>>>>> टु मच. किती भयंकर विचार आहे हा.
आणि एकुणातच कुणी ब्रिजवर, रस्त्याने मोबाइलवर बोलतोय तर त्यामुळे एवढा काय त्रास होणारे की त्याचा मोबाईल फोडावा? ऑफिसात मोठ्याने वाजणारी रींग्टोन असली की त्रास होतो मान्य. पण मोबाईल आपटुन फोड्ण्याचे विचार म्हणजे कहरच.

मी तर अशिहि लोक पाहिलित कि जर त्यान्च्या ५ फूट जवळ असाल तरि काय बोलत आहेत कळत नाहि. समोरच्या काय कळत असेल माहित नाही...

टु मच. किती भयंकर विचार आहे हा. >>> असा विचार येतो, कधी करणार नाही ती गोष्ट वेगळी पण मला चीड येते. कारण अश्या हिरोगिरीच्या नादात कधीतरी एखाद्या निरपराधाला उडवतील ते. ट्राफिकचे नियम असे सर्रास धाब्यावर बसवणे ही चूक नाही तर गुन्हा आहे, अपराध आहे. एखाद्याच्या जीवाशी खेळ असतो तो. तुम्ही आपल्या जीवाशी खुशाल खेळा, ईतरांच्या जीवाशी खेळायचा हक्क तुम्हाला नाही. जर सलमान खानने दारू पिऊन गाडी चालवत लोकांना चिरडले म्हणून त्याला तुम्ही शिव्या घालत असाल तर दारू पिऊन गाडी चालवणारे सारेच माझ्यामते त्याच पातळीचे गुन्हेगार आहेत. त्यासाठी तुम्ही कोणालातरी चिरडायची वाट बघणे गरजेचे नाही.

टु मच. किती भयंकर विचार आहे हा. >>> असा विचार येतो, कधी करणार नाही ती गोष्ट वेगळी पण मला चीड येते. >>> + १००० ऋ .
मलाही कितीदा वाटतं असं . चारचाकीवालेही असेच असतात .
त्यान्च्या गाडीला लाथ मारता येत नाही , पण हेडलाईट्स फोडावे असे नेहमी वाटते.

सकाळच्या भयंकर गर्दीच्या वेळी मोबाईल कानाला लावून आपल्या गॉसिपिन्ग मध्ये जराही खंड पडणार नाही याची काळजी घेत चढणार्या बायका/मुली जाम डोक्यात जातात.
प्रोब्लेम हा नसतो की त्या फोनवर बोलत असतात , प्रोब्लेम हा आहे की त्यावेळी आपल्या मागूनही कोणीतरी चढतयं , ओरडतयं , आपण रस्ता अडवतोय , याच भान या लोकाना नसतं .

गार्डनमध्ये मुलांना बिनधास्त सोडून फोनवर गप्पा मारणार्या बायकांचा एक प्रकार असतो.
मुलं , कोणाच्या डोळ्यात माती उडवतयं कोणा दूसर्या मुलाशी मारामारी करतयं , घसरगुंडीवर धडपडतयं , यांच बोलणं चालूच .

आणखी एक तिडीक प्रकार मी आमच्या ऑफिसमध्ये बघितलाय म्हणजे वॉशरूममध्ये फोन घेउन जाणे .
वेळ सत्कारणी लावावा , पण ईतका ???
त्यांचा फोन कुठे पडत कसा नाही त्याचच मला आश्चर्य वाटतं .

दोन तीन वर्षांपूर्वी हॉटेलमध्ये एकटेच येऊन बसलेले काही लोक मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावून बसायचे. गाण्यांची निवडही भयाण असायची. आवाज कमी करायची विनंती केली की खुन्नसने बघायचे. मोबाईलऐवजी माणसाला आपटावे असेही काहीवेळा वाटते त्याचे एक उदाहरण लिहिले.

काही लोक मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावून बसायचे. गाण्यांची निवडही भयाण असायची.
>>>>
अश्यावेळी आपण त्यांना भयाण वाटतील अशी गाणी त्यापेक्षा मोठ्या आवाजात लावायची. जमल्यास सोबत गायचीही. झाल्यास टेबल वाजवायचा. हवे तर मग स्वतःच्या कानात कापूस टाकायचा. आणि मग ईतर कोण तुम्हाला ओरडायला आल्यास जाओ पहले उस आदमी की साईन लेके आओ म्हणून त्यांच्याकडे बोट दाखवायचे Happy

धमाल म्हणजे ट्रेनमध्ये असेही असतात की मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावतात आणि तो मोबाईल ट्रान्झिस्टरवर कॉमेंट्री ऐकल्यासारखा कानाजवळ धरतात .. बहुतेक त्यांच्या या सवयीने त्यांना बहिरेपण आले असते आणि त्या बहिरेपणाला भेदून आवाज आत पोहोचायला आणखी मोठा केलेला असतो..

>>>>अश्यावेळी आपण त्यांना भयाण वाटतील अशी गाणी त्यापेक्षा मोठ्या आवाजात लावायची. जमल्यास सोबत गायचीही. झाल्यास टेबल वाजवायचा. हवे तर मग स्वतःच्या कानात कापूस टाकायचा. आणि मग ईतर कोण तुम्हाला ओरडायला आल्यास जाओ पहले उस आदमी की साईन लेके आओ म्हणून त्यांच्याकडे बोट दाखवायचे<<<<

ऋन्मेष,

हेच तर जमत नाही. आणि माणसाला आपटणेही जमत नाही. आमचे शौर्य फक्त जालावर, युक्तिवादही जालापुरतेच!

बेफी, म्हणूनच पहिल्या वाक्यानंतर जमल्यास झाल्यास लिहिलेय. जर तो दंगा झेलायची सहनशक्ती नसेल तर तो रोखण्याच्या दृष्टीने काहीतरी जमायला हवे आपल्याला..
आपल्याला कोणाचा उपद्रव होऊ नये यासाठी तरी किमान उपद्रवमूल्य आपल्याकडेही असणे अत्यंत गरजेचे आहे आजच्या जगात..

काही लोक मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावून बसायचे. गाण्यांची निवडही भयाण असायची.

>>

एकदा पहाटे मुंबई ते पुणे असा बसने प्रवास करत होतो, तेव्हा एक आजोबा असाच फोन कानाला लावून मोठ्या आवाजात कट्यार काळजात घुसली ची गाणी ऐकत होते.

आजुबाजुचे सर्व प्रवाशी जे गाढ झोपलेले होते ते जागे झाले होते आणि त्या आजोबांकडे खाऊ की गिळु नजरेने पाहात होते पण अाजोबांना त्याची काही तमा नव्हती.

शेवटी न राहवून एकाने त्यांना आवाज कमी करायला सांगितला तर त्यांनाच ओरडायला लागले की आजकालच्या लोकांना चांगल्या संगीताची चाड नाही नी यव नी त्यव ...

पहाटे पहाटे प्रवासात लोकं झोपलेली होती, त्यांची काही पर्वा नाही आणि आपल्या शास्त्रीय संगीताची पडलेली होती. Angry

आजकालच्या लोकांना चांगल्या संगीताची चाड नाही नी यव नी त्यव ... >>> हे मात्र खरेय! आजोबांनी नवीन धाग्याचा विषय सुचवलाय.

हे मात्र खरेय! आजोबांनी नवीन धाग्याचा विषय सुचवलाय.>>>>>देर किस बातकी? निकालो नवीन धागा. हम बैठेलेच है भर डालनेकू.:फिदी:

Pages