अशा लोकांचा मोबाईल, जमिनीवर आपटून फोडावासा वाटतो

Submitted by सचिन काळे on 3 December, 2016 - 13:13

अहो! असं रोखून काय पाहताय माझ्याकडे? मी फक्त 'वाटतो' असं लिहिलंय. साधा फुगा फोडायला घाबरणारा मी, माझी काय हिंमत दुसऱ्या कोणाचा मोबाईल फोडायची. मला आपलं त्या 'अर्चना सरकार' यांच्या 'त्याच सिगारेटचा चटका द्यावासा वाटतो' ह्या शिर्षकावरून स्फुरण चढलं आणि देऊन टाकलं तसलंच डेअरिंगबाज शीर्षक माझ्या लेखाला. असो.

तर माझ्या मनात असा अतिरेकी विचार का उगवला ते सांगतो. त्याचं काय ए, कि स्टेशनपासून घराकडे चालत जाताना आमच्याकडे सहा-सात फूट रुंदी असलेला, एकूण पाच मिनिटे चालत जाण्याच्या अंतराएवढा सरळसोट, लवकर न संपणारा, 'I' (आय) आकाराचा फूट ओव्हर ब्रिज आहे. माटुंगा स्टेशनच्या वर्कशॉपवर 'Z' (झेड) आकाराचा फूट ओव्हर ब्रिज आहे ना, अगदी तस्सा!

आता होतं काय, कि त्या ब्रिजवर आपल्या पुढे किंवा मागे चालत असणारी व्यक्ती ब्रिज संपेपर्यंत पूर्ण पाच मिनिटे आपल्याबरोबरच चालत असते. आणि जरका ती व्यक्ती मोबाईलवर बोलत असेल तर आपली काही धडगत नसते. पूर्ण पाच मिनिटे त्यांचं मोबाईलवरचं संभाषण आपल्या कानावर पडत रहातं. ना तुम्ही कान बंद करू शकता, ना त्यांचं संभाषण ऐकणं टाळू शकता. गुमान त्यांचे बोलणे ऐकत चालण्याची शिक्षा भोगावी लागते.

अहाहा!! काय ते एक से एक, भारी भारी संवाद कानी पडत असतात. मोबाईलवर बोलणारी ती व्यक्ती ज्या वयाची, वर्गाची, लिंगाची, व्यवसायाची, स्वभावाची, पदाची, नात्याची आणि अशा बऱ्याच गोष्टींची असेल, त्याप्रमाणे संवादाचं स्वरूप बदलत रहातं. ऐकता ऐकता हळूहळू मी त्यांच्या संवादात अडकू लागतो. त्यांच्या बोलण्यात मनोमन भाग घेऊ लागतो. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीच्या रंगरूपाची, तिथल्या परिस्थितीची कल्पना करू लागतो. मग जसा संवाद चालू असेल तसा माझा मूड बनू लागतो.

कधी शाळकरी मुलगा मोबाईलवर आपल्या सवंगड्याशी बोलत असतो "आज शाळेतून मी कल्टी मारलेली सरांच्या लक्षातच आले नाही" तेव्हा मला त्याच्या भविष्याची चिंता वाटायला लागते. कधी एखादा कॉलेजकुमार आपल्या मित्राशी बोलत असतो "तू डरता क्यों है बे! मेरा बाप लाखों में कमाता है" हे ऐकून मला देशाचे भविष्य काळवंडताना दिसू लागतं. एखादी कॉलेजकन्यका कोणालातरी "मी नाही ज्जा! चावट कुठला!" म्हणते तेव्हा माझे कान टवकारून उभे रहातात. एखादी गृहिणी "अगं मी बाकीचं नंतर सांगते, माझं बाळ घरी वाट पहात असेल गं" म्हणते तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर आईची वाट बघून झोपी गेलेले बाळ दिसू लागते. एखादी म्हातारी बोलताना "बाळा, तू कधी येणार रे घरी?" अशी साद घालते, तेव्हा तिचा लष्करातला जवान मुलगा सीमेवर तैनात असलेला मला दिसू लागतो. एखादा यू पी वाला "भैसवाँ को बछडा भई गवां का?" विचारतो तेव्हा मला तबेल्यात रवंथ करणाऱ्या म्हशी दिसू लागतात. एखादा सुटेड बुटेड साहेब जोरात ओरडतो "I don't know anything! मुझे सुबह तक सब पेपर्स मेरे टेबलपर चाहिए, मतलब चाहिए" ते ऐकल्यावर मला हाग्यादम देणारा माझा साहेब डोळ्यापुढे नाचू लागतो. एखादा सिंधी बेपारी बोलत असतो "अरे साईं, तुम घबरता क्यो है? कितना माल चाहिए, सिर्फ बोलो नी!" कि मला made in usa चा माल बनवणारे कारखाने आणि त्यात काम करणारे कामगार दिसू लागतात. एखादा कष्टकरी बिगारी कामगार बोलत असतो " बोल माये बोल! म्या ऐकून राह्यलोय" कि मला चुलीवर भाकर थापणारी त्याची माउली दिसू लागते.

एव्हढ्या वर्षांत कोणाकोणाची संभाषणं माझ्या कानी पडलीयत ती! अजून किती किती सांगू? मी घरी जायच्या घाईत, आपल्याच विचारात ब्रिजवर चालत असतो. पोटात भूक आणि जीवाला घरची ओढ लागलेली असते. आपल्या अडचणी आपल्याला काय कमी असतात, त्यात हे वेगवेगळ्या लोकांचे मोबाईलवरचे संभाषण आपण ऐकत चालायचे? कंटाळलो हो मी ह्या सर्व संभाषणांना! (कंटाळले गं बाई मी ह्या केसांना! (प्रकाशचे माक्याचे तेल) च्या चालीवर वाचा!) काय करू? कुठे जाऊ? कोणाला सांगू? (सहन होईना आणि सांगताही येईना! च्या चालीवर वाचा!) मी तुम्हाला विचारतो. तुम्हालाही असले अनुभव आलेलेे असतीलच ना? तुम्हीसुद्धा कोणा मोबाईलवर बोलणाऱ्याच्या तावडीत सापडला असालच ना? आणि काही कारणाने सुटका न झाल्याने, तुम्हाला त्यांचं संभाषण मुकाट ऐकत बसावं लागलं असेलच ना? मग मला खात्री आहे. तेव्हा तुमच्याही मनात नक्की हाच विचार आलेला असेल, कि "अशा लोकांचा मोबाईल, जमिनीवर आपटून फोडावासा वाटतो."

( ट्रिंग ट्रिंग! हॅलो! मी बोलतोय - "वाटलं होतंं, जरा आपणही थोडं विनोदी लिहून पहावं. जमलं का मग?")

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संभाषण हिंदी, मराठी किंवा इंग्रजी असेल तरी एक्वेळ ठीक पण अगम्य भाषेतील (बहुतेक वेळा द. भारतीय जिलेबी सदृष्य भाषा) असेल तर अजुन वैताग.

@ महागुरू, द. भारतीय जिलेबी सदृष्य भाषा असेल तर अजुन वैताग.>>> अगदी खरंय! आपल्याला त्यातलं ओ कि ठो कळत नाही. जिलेबी सदृश्य शब्द आवडला. Rofl

लोकांचं बोलणं असं ऐकु नये ! ( कुणास ठाऊक, गूगल त्याचीही नोंद ठेवत असेल. म्हणजे एखादा फोन चालू असताना, आजूबाजूला कुठले फोन चालू होते वगैरे Happy )

वाटलं होतंं, जरा आपणही थोडं विनोदी लिहून पहावं. जमलं का मग?>>>
मस्त जमलय...!!!!!!! आणि विषय पण आवडला......

आणि अजून एक म्हणाल तर ऑफिस सुटल्यावर घरी जायची घाई झालेली असते,दिवसभर जॅम वैताग आलेला असतो,कोणाशीही काहीही बोलायची मनस्तीती नसते आणि अश्या वेळी जर बरोबर असणारी व्यक्ती पकावत असेल (आपल्याला काडीचाही इंटरेस्ट नसताना) असं वाटत सरळ तीच तोंड बंद करावं नाहीतर दोन ठेऊन द्याव्या,पण नाईलाज असतो..... मग
उपाय म्हणून ,अश्यावेळेस आपण सरळ आपल्या विश्वात रममाण व्हायचं

माझे उलट आहे, मी असं कोणी बोलत असेल तर त्याच्या/तिच्या बोलण्यातून मनातल्या मनात , हा/ ही कोणाशी व कशाच्या संदर्भात बोलत असेल असे तर्क लावीत असतो. उगाच आपला " टैम पास " ! ! नाहीतरी आपण चालतांना, बसमध्ये/ट्रेनमध्ये दुसरे काही करू शकत नाही ना ? म्हणून हे करावयाचे. मला तर कानाला लावलेल्या मोबाईलमध्ये निव्वळ " हं ,हं,हं, हो हो, आँ नको नको , हो ठिक आहे , नाही नाही ते तसं नाही, मी तुला नंतर सांगतो ना ! जावू दे रे / गं ,खड्डयात मरू दे, आपल्या बापाचं काय जातं, " असे म्हणणार्‍यांचा जास्त राग येतो, ( अरे म्हणजे , आम्हाला ही कळू दे कि काय म्हणतोय समोरचा/ची,) त्यांना खडसवून विचारावेसे वाटते. त्यांचा मोबाईल घेवून फोडला तर " असलं काही ऐकण्याची मज्जा नाही कां निघून जाणार ?

मला तर कानाला लावलेल्या मोबाईलमध्ये निव्वळ " हं ,हं,हं, हो हो, आँ नको नको , हो ठिक आहे , नाही नाही ते तसं नाही, मी तुला नंतर सांगतो ना ! जावू दे रे / गं ,खड्डयात मरू दे, आपल्या बापाचं काय जातं, " असे म्हणणार्‍यांचा जास्त राग येतो, ( अरे म्हणजे , आम्हाला ही कळू दे कि काय म्हणतोय समोरचा/ची,) त्यांना खडसवून विचारावेसे वाटते. >>> +१+:-)

मला कुणाचा फोन फोडावा वाटतो माहित्येय.
आपापल्या आईला/बायकोला/आज्जीला मला दाखवायला म्हणून घेऊन येतात.
पेशंटच्या स्टुलावर पेशंट बसतोय ना बसतोय तोवर खिशातला/पर्शीतला मोबाईल बाहेर काढतात,

'काय काय होतंय ते सांग आत्ताच नीट'

असं म्हणून सरळ माझ्याकडे आणि पेशंटकडे दुर्लक्ष करून मोबाईलवर चॅट करण्यात नाहीतर गेम खेळण्यात रंगून जातात.
एकदाचा प्रिस्क्रीप्शन प्रिंट करणार्‍या प्रिंटरचा आवाज आला की
'झालं सगळं? पुन्ह घरी गेल्यावर हे राहिलं ते राहिलं म्हणायचं नाही!'

असला राग येतो.
अरे, तुम्ही डॉक्टरच्या केबिनमधली पाच दहा मिनिटंही आपल्या पेशंटला एक्स्क्ल्युजिव नाही देऊ शकत?
मग घरी काय लक्ष देणार आहात?

पूर्वी लक्ष द्यायचे नाही.
आता अगदी सुरूवातीलाच फोन बंद करा असे सांगते.

(माझ्यासमोर पेशंटला बसवून फोनवर बोलणारं पब्लिक गावठी तरी असतं किंवा मॅनरलेस.
त्या दोन्ही प्रकारांचा मला राग आला तरी मी मनावर घेत नाही.)

एकदा मजाच आली. १० वर्षापूर्वी मी माझ्या नातेवाईकाना भेटायला हडपसरला चालले होते. त्याकाळी साधारण २००५-०६ साली मोबाईल तसा नवीनच होता ( शहरी पब्लिक करता नाही) आणी फेसबुक वगैरे नव्हतेच. जशी बस स्टॉप वरुन सुटली तशी एका मुलाने रनिंग कमेंट्री सुरु केली ती पण मोठ्याने. " हां रे, आता ना स्वारगेट पास झालयं, मंग थोड्या येळाने करतु तुला काल ( कॉल ) ". बस शंकरशेट रोडवरुन चालली तेव्हा मग " अरे आत्ता पूलगेटावरुन जातो ना, मंग कँपात पोचलो की दुसरा काल कर्तो तुला." परत थोड्या वेळाने बस कयानी बेकरीवरुन वळली तेव्हा." अरारारा, बेकरी पडली बग की मागे, मला खारी घ्यायची व्हती. आत्ता कुट घेऊ मी ती?"

गाडीतळावर पोहोचेपर्यंत कमेंट्री सुरु होती, लोक जाम हसत होते आणी मोबाईल वाल्याला लय मज्जा वाटत होती.:फिदी:

हो, लोक मोबाईल वर बोलतांना, पत्ता सांगतांना हातवारे पण करतात.:फिदी: जसे पलीकडच्याला ते दिसणारच आहे.

मस्त जमलाय लेख..
मलाही हा अनुभव नेहमी येतो. कारण मी रोज बसने प्रवास करते... अरे आपल्याला आपले प्रश्न असतात, वेगळे विचार चालू असतात डोक्यात..आणि आपण मात्र यांचे एकतर्फी संवाद ऐकत बसा. शिवाय काही लोक मात्र जोरजोरात बोलतात फोनवर. ठीक आहे प्रवासात, बसच्या आवाजात ऐकू येण्यासाठी बोलत असतील जोरात पण कधी मलाही फोनवर बोलायचं असेल आणि तेव्हा च मात्र कुणी असं जोरजोरात बोलत असेल तेव्हा मात्र खूपच राग येतो.

लोकल्मध्ये कितिहि गर्दि असलि तरि कानात मायक्रोफोन घालुन आणि दोन्हि हातात मोबाइल पकडुन असणार्‍यान्च आणि त्यान्च्या फोनच काय करायच मग? एक तर या मुलि / बायका त्या फोनमध्ये अशा काहि गुन्ग असतात कि आजुबाजुला काय चाललय आपण कुठे आहोत याचा पुर्ण विसर पडलेला असतो,त्यामुले मागुन पुढून कितिहि गर्दि असलि तरि मोबाइल काहि हातातला सोडत नाहित आणि ट्रेनच्या धक्क्याबरोबर आपल्यावर कलन्डत असतात, मोबाइल्वरिल फिल्म किन्वा गाणे त्याचवेळि एकले नाहि तर अस कोणत आभाळ कोसळणार् असत देव जाणे,गर्दि आहे थोडे पूढे व्हा म्हट्लेल काही यान्चा कानात शिरत नाहि. Angry

लोक मोबाईल मध्ये गुंग असतील तर असोत बापडी (इतरांची कसली गैरसोय न करता), पण सततच्या डिस्को टिस्को रिंगटोन्स वाजणे, अ‍ॅलर्ट्सचे आवाज, अन मोठमोठ्याने बोलणे याचा त्रास होतो.

मला आपलं त्या 'अर्चना सरकार' यांच्या 'त्याच सिगारेटचा चटका द्यावासा वाटतो' ह्या शिर्षकावरून स्फुरण चढलं आणि देऊन टाकलं तसलंच डेअरिंगबाज शीर्षक माझ्या लेखाला.
>>.....
मला पाहूनच वाटलेले की काही ओळखी ओळखीचे वाटतेय Happy

कधी मित्रांचा ग्रूप आपापल्या मोबाईलामध्ये दंग पाहिला तर वाईट वाटते. मोबाईल फोडावासा नाही पण हँग करावासा वाटतो. त्यांच्याच चांगल्यासाठी ...
पण कधी कधी हे वरदानही ठरते, म्हणजे नको असलेली किंवा फारशी आवडीची नसलेली सोबत असेल तर आपल्या मोबाईलमध्ये डोके खुपसणे सोयीचे पडते..

कधी एखादे नवराबायकोचे जोडपे आपापल्या मोबाईलमध्ये मस्त असतील आणि त्यांच्या बारक्या पिलाकडे लक्ष द्यायला त्यांना सवड नसेल किंवा त्याच्याही हातात मोबाईलसदृश्य खे़ळणे देत झाली आपली जबाबदारी संपली म्हणणारे दिसले तर तेव्हा मात्र त्यांचा मोबाईल जमिनीवर नाही तर त्यांच्या डोक्यावरच आपटून फोडावस वाटत. जे पहिला फुटेल ते फुटेल.
(सचिन काळे : आपणही टायटलात जमिनीच्या जागी त्यांच्याच डोक्यावर असा बदल केला तर ते जास्त डेअरींगबाज वाटेल Happy

आमच्या कम्पनीच्या बस मध्ये अशीच एक जिलबी सदृश बोलणारी मुलगी होती. बस ड्रायव्हर च्या शेजारी दोन खुर्च्या असतात त्यातल्या सर्वात पुद्धाच्या सीटवर बसून अगम्य भाषेत बोलायची ते ही मोठ्या मोठ्याने आणि नेहमी त्याच सीटवर. ती एकमेव व्यक्ती जिचा मोबाईल मला फोडावा वाटायचा. तळवडे ते भूमकर चौक असा हा छळप्रवास चालायचा. आणि संपूर्ण वेळ आम्ही (यात ड्रायव्हर पण सामील होता) तर्क करत असू की ही नक्की कुणाशी बोलत असेल? आणि समोरचा एकाही शब्द बोलत नसेल का त्याच्चा दिल चाहता है चा सैफ झाला असेल... Proud
एकच सुवर्ण दिन असा उगवला ज्या दिवशी म्याडम गप्प होत्या.. ड्रायव्हर माझ्याकडे बघून सूचक हसला. मी म्हटलं काय आज शांत शांत वाटतंय नै? ड्रायव्हर म्हणाला रिचार्ज संपला असेल Proud

अलीकडे काही दिवस ती बस मध्ये दिसत नाहीये नोकरी सोडून दुसऱ्या लोकांचा छळ करायला गेली असेल, पण तिची आठवण अजूनही निघते.

दररोज ऑफिसमधून बसने परत येत असते तेव्हा कोणीतरी अगम्य भाषेत संभाषण करतच असते आणि तेही बसच्या आवाजाच्या वरताण आवाजात!! आणि कळत नसलेले हे संभाषण तासंतास ऐकावं लागतं Sad

लोक मोबाईल मध्ये गुंग असतील तर असोत बापडी (इतरांची कसली गैरसोय न करता), पण सततच्या डिस्को टिस्को रिंगटोन्स वाजणे, अ‍ॅलर्ट्सचे आवाज, अन मोठमोठ्याने बोलणे याचा त्रास होतो. >>>> +१

मला तर कानाला लावलेल्या मोबाईलमध्ये निव्वळ " हं ,हं,हं, हो हो, आँ नको नको , हो ठिक आहे , नाही नाही ते तसं नाही, मी तुला नंतर सांगतो ना ! जावू दे रे / गं ,खड्डयात मरू दे, आपल्या बापाचं काय जातं, " असे म्हणणार्‍यांचा जास्त राग येतो, ( अरे म्हणजे , आम्हाला ही कळू दे कि काय म्हणतोय समोरचा/ची,) त्यांना खडसवून विचारावेसे वाटते.>> Lol

>>> अरे, तुम्ही डॉक्टरच्या केबिनमधली पाच दहा मिनिटंही आपल्या पेशंटला एक्स्क्ल्युजिव नाही देऊ शकत?
मग घरी काय लक्ष देणार आहात? <<<<
अगदी अगदी..... !
मात्र आमच्या ज्योतिषविश्वात असे अनुभव विरळेच, ...... इकडे येणारे सगळे गंभिरपणे लक्ष देऊन माझी एकमेकाची बोलणि ऐकतात - ऐकवतात.... उपाय समजुन घेतात वगैरे..... Happy

बहुतेक वेळा द. भारतीय जिलेबी सदृष्य भाषा >>>>>

आपण आपल्या स्वता:च्या लिपी ला वाचवु (Preserve) शकलो नाही...
अशा वेळी दुसर्‍याच्या लिपीला नावे का म्हणुन ठेवायची ?

स्व:ताहाच्या>>???????? लिपी जाऊदे हो, तुम्ही आता जी भाषा लिहिताय ती तरी शुद्ध लिहा.

सचिन, छान खुसखुशीत लिहिलायत.

मला तर कानाला लावलेल्या मोबाईलमध्ये निव्वळ " हं ,हं,हं, हो हो, आँ नको नको , हो ठिक आहे , नाही नाही ते तसं नाही, मी तुला नंतर सांगतो ना ! जावू दे रे / गं ,खड्डयात मरू दे, आपल्या बापाचं काय जातं, " असे म्हणणार्‍यांचा जास्त राग येतो, ( अरे म्हणजे , आम्हाला ही कळू दे कि काय म्हणतोय समोरचा/ची,) त्यांना खडसवून विचारावेसे वाटते.>> +1.

स्व:ताहाच्या>>???????? लिपी जाऊदे हो, तुम्ही आता जी भाषा लिहिताय ती तरी शुद्ध लिहा. >>>

शुद्ध भाषा ..हा हा.. भाषा शुद्ध/ अशुद्ध अशी पण असते का?? बर.... चालु द्या...

"स्व:ताहाच्या" हा शब्द बरोबर लिहिला आहात असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपण भाषेच्या शुद्ध - अशुद्धलेखनाविषयी न बोललेलंच योग्य.

तर आपण भाषेच्या शुद्ध - अशुद्धलेखनाविषयी न बोललेलंच योग्य. >>>>>

निधीताई.. इथे शुद्ध - अशुद्धलेखना विषयी बोलतय तरी कोण..?? (आपणच विचारताय आणि आपणच उत्तर देताय) असो....

माझा प्रश्न/ मुद्दा एवढाच की.. आपली लिपी आपल्याला वाचवता नाही आली.. तेव्हा दुसर्‍याच्या लिपीला नावे का म्हणुन ठेवायची ?? नसेल पटत तर द्या सोडुन..काय त्यात एवढ ..!!

चुक माझी पण असेल.. मला तेवढ व्यवस्थित नाही लिहता येत..

मुद्दा एवढाच की दुसर्‍याच्या भाषेला/लिपीला टोमणे मारु नये..एवढच

ऑफीसमधे कर्कश्श्य आवाजात कोकलणारे मोबाईल फोन डोक्यात जातात. Angry एवढी साधी गोष्ट लक्षात येत नाही लोकांच्या की आपल्या फोनच्या रिंगटोनमुळे इतर लोक विचलीत होतात ते. आणी वरताण म्हणजे डेस्कवर फोन कोकलतोय आणी हे आपले भटकतायत इकडेतिकडे.

लोकल ट्रेनमध्ये एखादा गुज्जु बेपारी असेल तर तो ज्या आवाजाच्या पट्टीत फोनवर बोलत असतो संपुर्ण डब्बा ते संभाषण ऐकू शकतो अशी लोकं खुप डोक्यात जातात. फुटपाथवर किंवा फुटओव्हर ब्रीज वर गर्दी असताना तुमच्या पुढे एखादा/एखादी जर चालत व्हॉट्सअपवर चॅटींग करत असेल तर त्यांचा फोन घेऊन तो फोडून टाकावासा वाटतो.

काही व्यक्ती मोबाईलमध्ये एव्हढे गुंग असतात समोरून येणारी वाहने सुध्दा त्यांना दिसत नाहीत. Angry

मला ते टू व्हीलरवाले जेव्हा मान वाकडी करत कान आणि खांद्यामध्ये मोबाईल पकडून जाताना दिसतात तेव्हा लाथ मारून त्यांची बाईकच पाडावी असा आसूरी विचार मनात येतो. बाकी काही नाही, ते मरतील आपल्या कर्माने, पण त्यांनी एखाद्याला ठोकले तर त्या व्यक्तीची चूक नसताना त्याला दुखापत ना..

आमच्या ऑफिसमध्ये मोबाईलची रिंगटोन फिल्मी गाणे नसावे आणि आवाज जास्त नसावा असा नियमच आहे.

फक्त माझे एकाचेच फिल्मी गाणे आहे, टिक टिक वाजते डोक्यात. कारण ते सर्वांना आवडते म्हणून त्यावर आक्षेप नाहीये.

कावेरि, तसे नाही, पण माझा वॉल्यूम लिमिटमध्ये असतो व त्या हलक्याश्या आवाजात ते गाणे लागल्यावर प्रत्येक जण विचलित न होता ते गुणगुणत आपले काम चालू ठेवतो, उलट मूड फ्रेश होत कामाचा उत्साह वाढतो, शेवटी संगीताची जादू तुम्ही अमान्य करू शकत नाही. ते कर्णकर्कश्य किंवा गोंगाट तेव्हाच वाटते जेव्हा ते अनवॉन्टेड असते, मात्र हे गाणे तसे कोणालाच वाटत नाही, ईतकेच Happy

Pages