करणार का मला मदत, थोडीशी?

Submitted by pkarandikar50 on 25 November, 2016 - 05:48

करणार का मला मदत, थोडीशी?
पण, मी कोण ते आधी
सांगायला हवं, नाही का?
तर, जे जे या जगी जगते, तयामधी
असतात माझे भाई बंद किंवा मी.
आमची संख्या किती?
अमिबा पासून ते माणसापर्यंत आणि हरीत पेशी पासून वृक्षांपर्यंत
संख्या येईल का मोजता तुम्हाला ? नाही ना?
दगड-धोंडे, नद्या-नाले, वाळवंटं-पठारं, वनं, शेतजमिनी ......
द्या राव सोडून. त्याला महत्व देणार तरी किती?

तर, मी कोण?
मी आहे, नकारांची न संपणारी साक्षात मालीका.
(वाहिनी कोणती असला खुळचट प्रश्न विचारू नका.)
आता, नकार कोणकोणते?
म्हणजे बघा,
मला रंग नाही, रूप नाही, आकार नाही,
वजन नाही, लांबी,रुंदी, खोली नाही...
हे नाही आणि ते नाही ..... असं बरंच काही बाही .
आहे काय ते सांगणं कठीणच जरा.
तरीही मी आहेच, यावर गाढा विश्वास
यच्चयावत धर्म आणि संस्कृतींचा.
मला लावतात अनादीअनंत वगैरे अनेक विशेषणं.
मी अवध्य म्हणे, माझं काही वाकडं करू शकत नाही
अग्नी, पाणी, वायू वगैरे.

अश्वत्थामाही अमर आहे म्हणतात.
त्याचं जीवन एक शाप, एक यातना, न संपणारी.
पण आमच्यात एका मोठ्ठा फरक आहे.
त्याला लाभला आहे जीवन नावाचा एक पदार्थ
कारण त्याचा झाला होता जन्म, द्रोणाच्या घरी.
माझा जन्म कुठे, केंव्हा, कसा झाला? सांगेल का कोणी?
माझ्याकडे आधार कार्ड नाही, आय.डी. नाही,
पॅन कार्ड, रेशन कार्ड, काही म्हणता काही पुरावा नाही.
पण तरीही मी आहेच की.

मी जन्मलोच नाही म्हणून मला मरण नाही? असंच ना?
भळभळा रक्त वाहणार्‍या जखमा, क्लेश, यातना, वेदना
यातलं काही सुद्धा नाही माझ्या कमनशिबी.
पण तोही अमर, मीही अमर......आनंद आहे, सगळा.
त्याला काय हवंय म्हणे? तर मरण. एक सुटका.
मी आहेच की, त्याच्याही आत. माझं काय?
तो मेला की तो सुटला.
पण माझी कुठेय सुटका?
ते जीर्ण वस्त्र मी टाकायचं म्हणे
नवीन नेसायचं, आणि वाट पहायची,
ते जीर्ण व्हायची.

मग मला काय हवंय?
बरोबर. आता आलात की नाही मुद्द्यावर?
तर मंडळी, मला आहे एक प्रचंड कुतुहूल.
ज्याला अनंत म्हणतात ना,
त्याच्या पुढे, पल्याड जायचंय मला,
नुसतं डोकवायला मिळालं तरी चालेल.
पण जाणार कसं तिथपर्यंत? त्यासाठी,
करणार का मला मदत, थोडीशी?

-प्रभाकर (बापू) करंदीकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users