निसर्गाचा चमत्कार....... दुहेरी ( डबल ) इंद्रधनुष्य

Submitted by मनीमोहोर on 6 November, 2016 - 10:46

ह्या ऑक्टोबर महिन्यात लंडनला गेले होते. उन्हाळा संपुन फॉल सुरु झाला होता. दिवस आक्रसले होते . झाडांची पान गळण्याच्या तयारीला लागली होती. तपमापकातला पारा ही हळु हळु खाली खाली यायला लागला होता. संध्याकाळी बाहेर खेळणारी मुलं ही आता दिसेनाशी झाली होती. भर दुपारीच सावल्या लांबल्या होत्या. थंडी दिसामासानी वाढायला लागली होती. उन्हाळ्यात कधी तरी निळं भोर दिसणाऱ्या लंडनच्या आकाशाने आता त्याचा करडा रंग परत घेतला होता. आकाशात बहुदा ढगांचीच गर्दी असे आणि त्या बरोबर कधी ही पडणारा तो पाऊस ही असेच .

असं दिसत असे कायम मळभटलेलं

IMG_20161008_223357310-001.jpg

त्या दिवशी असाच सकाळ पासुन पाऊस पडत होता. पावसामुळे थंडी ही वाढली होती. दिवस भर सुर्य दर्शन झाले नव्हते. दुपारी जेवण झाल्यावर माडीवर मस्त गोधडी घेऊन वाचत पडले होते. वाचता वाचता खिडकीबाहेर पाउस थांबल्याचं आणि उन्हं पडल्याचं जाणवलं. दोन तीन दिवसात सूर्य दर्शन नव्हतं झालं म्हणून उठून खिडकीत गेले आणि बाहेरच दृश्य बघुन अक्षरशः आवाक झाले. पाउस होताच त्यातच ऊन पण पडल होत आणि त्यामुळे पूर्वेकडे इन्द्रधनुष्य उमटलं होत . ते पाहुन माझ्या मरगळलेल्या मनाला चांगलाच हुरुप आला. इन्द्रधनुष्य पाहुन आनंद होत नाही असा माणूस विरळाच . अगदी स्पष्ट आणि खूप रुंद असा इंद्रधनुचा स्वर्ग आणि धरेला जोडणारा तो पूल मी पहातच राहिले. आणि नीट पाहिल्यावर तर आणखीनच भारावुन गेले कारण आकाशात एकाच वेळी एक नव्हे तर दोन दोन कमानी दिसत होत्या.

IMG_20161001_214207064-001.jpg

तिरपी सुर्याची किरण जेव्हा पाण्याच्या थेंबातुन परावर्तित होतात तेव्हा सूर्यप्रकाशाचे पृथःकरण होऊन सुर्याच्या विरुद्ध दिशेला सात रंगी इन्द्र धनुष्य दिसते हे शाळेत शिकलेलं पण जेव्हा ती किरण दोन वेळा परावार्तित होतात तेव्हा एकाच वेळी आकाशात दोन इंद्रधनुष्याच्या कमानी दिसतात. पहिलं अधिक स्पष्ट दिसत ते मुख्य आणि दुसरं त्या मानाने कमी स्पष्ट दिसते ते दुय्यम. प्रमुखाच्या रंगांचा क्रम नेहमी प्रमाणे ता ना पि हि नि पा जा असा असतो तर दुय्यमचा मात्र त्या विरुद्ध असतो . तिथे तांबडा रंग शेवट दिसतो. तसेच मुख्य इंद्रधनुष्याच्या खालचं आकाश अधिक फिकट दिसतं.

चीनी संकल्पने नुसार दुहेरी इन्द्रधनुष्य हे शुभ शकुनाचं लक्षण मानल गेलं आहे. कारण त्यांच्यामते लाल रंग हा पावलाचं आणि जांभळा रंग हा मस्तकाचं प्रतीक आहे. त्यामुळे एकेरी इन्द्रधनुष्य हे मानवाच्या स्वर्गातुन पृथ्वीवर येण्याच्या क्रियेच प्रतिक आहे पण दुहेरी इन्द्रधनुष्याच्या विरुद्ध रंगरचने मुळे ते मानवाच्या स्वर्गाकडे जाण्याच्या क्रियेच प्रतीक आहे आणि म्हणूनच ते शुभशकुनी मानलं गेलं आहे.

माडीवरच्या खिडकीतुन पाहुन माझं समाधान होईना. खालती अंगणामधुन अधिक सुंदर दिसेल म्हणून मी धावत धावत अंगणात आले . पण तोपर्यंत तो वरचा पट्टा अगदीच अंधुक झाला होता . नेहमी एक पाहुन ही मन भरुन जातं पण आता ते एक आकाशात असुन सुद्धा आकाश रिकामं रिकामं वाटत होत. आणखी दोन मिनटातच ते जे एक दिसत होत ते ही नाहीसं झालं कारण पाऊस थांबला होता आणि सूर्य ही परत ढगाआड गेला होता. त्या विस्मय कारक दृश्याने भारावुन जाऊन मी किती तरी वेळ अंगणातच उभी होते.

फोनच्या मेसेज बेलने मी भानावर आले. मुलांचे मेसेज आले होते " आई लवकर बघ , आकाशात दुहेरी इंद्रधनुष्य दिसतय ! " खरं म्हणजे तो ऑफिसचा दिवस असल्याने घरातील सगळी जण चार दिशेला होती पण तरी ही प्रत्येकाला तो अदभुत नजारा बघण्याचे भाग्य लाभले होते.

सारा मिळून जेमतेम पाच मिनटांचा खेळ. पण त्या अल्पावधीत निसर्गाने मला खूप श्रीमंत करणारा, माझ्या कायम स्मरणात राहिल असा अनुभव दिला होता......

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आलाय फोटो.
शुभशकुन वगैरे एक मनाचे भ्रम झाले पण असे द्रुश्य प्रत्यक्ष अनुभवणेच एक नशीब काढणे असते Happy

बायदवे, मी चुकत नसेल तर बहुधा आपल्या भारतातीलच समरपूर मध्ये एकाच वेळी सात ईंद्रधनुष्य दिसतात. बस्स, नशीब जरा सातवे आसमान पर लागते Happy

भारी. मी पण बघीत्ले आहे असे दुहेरी इंद्रधनुष्य!! Happy

खिडकीतुन फोटो काढण्यापेक्षा अशा वेळी पटकन घराबाहेर जाऊन फुटो काढले तर आणखी मस्त दिसले असते.

मस्तच... क्वचितच दिसते असे. मी आजपर्यंत एकदाच बघितलेय आणि ते पण पूर्ण नाहीच.. हा फोटो खुप सुंदर आलाय.

मस्त लेख, प्रचि आणि माहिती...
मी पण एकदा घोडबंदर रोडला दुहेरी इंद्रधनुष्य पाहिले होते.
फोटोही आहे बहुतेक.
मिळाला तर देतो इथे...

मस्त फोटो!! आणि मस्त आठवण! Happy

दुहेरी इंद्रधनुष्य इतके काही क्वचित नसावे... मी जितक्या वेळा इंद्रधनुष्य बघितले आहे (१० - १५ :-o) त्यातल्या ७-८ वेळा तरी दुहेरी बघितले आहे. पण ती वरची दुसरी कमान बऱ्याच वेळा खूप पुसट असते.

माझे आठवणीतले इंद्रधनुष्यसुद्धा लंडनमधलेच! Happy त्या आधी लहानपणी बघितली होती पण मुंबईतल्या घराच्या छोट्या आकाशाच्या तुकड्यावर छोटीशी कमान... लंडनमध्ये पहिल्यांदाच माळरानावर पूर्ण क्षितिज व्यापलेले आणि असेच दुहेरी इंद्रधनुष्य होते. फोटो बहुतेक काढलेला पण त्याकाळी डिजिटल कॅमेरे नसल्याने हाताशी नाहीय...

सगळ्यात शेवटी ह्या सप्टेंबरमध्ये पुणे-बंगलोर हायवेवर साताऱ्यात शिरता शिरता बघितलेले, ते ही दुहेरीच होते... फोटो मनाच्या कॅमेरात... चालत्या गाडीतून मान १६० अंशाच्या कोनात वळवून काढलेला... Happy

Happy

मस्तच फोटो! मीही ३-४ वेळा पाहिले आहे दुहेरी इंद्रधनुष्य. माझ्या मते ते दुसरे पहिल्याचे प्रतिबिंब असते. ( म्हणून रंग उलटे दिसतात)

स्विझेर्लंड वरुन निघलेलो,असाच उन-पावसाचा खेळ चालला होता. मी नेहमीप्रमाणे खिडकीची जागा पटकाउन बसलेली. आणि काही वेळाने मला गोल इंद्रधनुष्य दिसले. एकतर मला जे दिसत आहे ते खरच आहे का त्यावर माझाच विश्वास बसला नव्हता, आधी बघून घेतले नीट. नंतर अस काही असते का याचे गूगलिंग केले, तेव्हा काळाले की हे सुद्धा होऊ शकते. डोळ्याचे पारणे फिटलेले नक्कीच.

सर्वांचे प्रतिसाद किती सुंदर . हे खूप जणांनी पाहिलंय हे वाचून खूप छान वाटतंय . फोटो द्या इथे जमलं तर . मला तर असं काही असत ह्याची कल्पना ही नव्हती.

कांपो, हो , मोकळया वरून फोटो नक्कीच बेटर आला असता पण मी जाई जाई पर्यंत ते नाहीसं ही झालं . फोटो काही छान नाही आलाय पण जरा आयडीया यावी म्हणून अपलोड केलाय . नेटवर ह्याचे भारी भारी फोटो आहेत .

Vt 220, तुम्ही किती लकी आहात. तुम्हाला तर पाच सहा वेळा दिसलं आहे .

ट्युलिप , इंद्रवज्र दिसणं म्हणजे तर सुपर लकी . फोटो असला तर द्या . इंद्रवज्र बद्दल मी इथेच मायबोलीवर वाचलं होतं. कुठे ते आता आठवत नाहीये .

बायदवे, मी चुकत नसेल तर बहुधा आपल्या भारतातीलच समरपूर मध्ये एकाच वेळी सात ईंद्रधनुष्य दिसतात. बस्स, नशीब जरा सातवे आसमान पर लागते स्मित}}} Rofl ते फ़क्त दिल मांगे मोर मधे शाहिद कपूरला दिसते..

एक इंद्रधनुष्य म्हणजेच पर्वणी असते, दोन दोन म्हणजे तर खुपच दुर्मिळ अनुभव!!☺

वाह.. दुहेरी इंद्रधनु... लक्की यु ममो..

व्हिटी अन् ट्युलिप तर खुपच नशीबवान म्हणायचे...

Pages