श्री संतराम (भाग सातवा )

Submitted by मिरिंडा on 2 November, 2016 - 08:02

महाराजांच्या खास दासींमध्ये नेमणूक झाल्याने स्वेच्छेला , आपल्याला काहीतरी करायला मिळणार याची खात्री झाली. स्वकक्षात आल्याबरोबर तिने प्रथम हाताची जखम पाहिली. तिथे आता रक्त थांबून सूज आली होती. तो भाग आता कमालीचा दुखत होता. तिला आश्चर्य वाटले की माणूस स्वतःच्या सुरक्षिततेबाबत अस्वस्थ असला की शारीरिक जखमांची सुद्धा जाणीव थांबते. पण जरा जरी स्वस्थता मिळाली की ती लागेचच होऊ लागते. आता मात्र तिला वेदनांनी चांगलेच पछाडले होते. तिला हळूहळू ज्वरासारखी भावना होऊ लागली होती. पण तिला हे सगळे सांगता येण्यासारखे नव्हते. आणि पिंगलाक्षाला सांगायला तिला दासीचा आधार नको होता. दरबारी रितीप्रमाणे तिला एक दासी मिळाली होती. तिचं नाव सुस्मिता. ती वयाने लहान असावी. एखादी कन्यका जी वयात जेमतेमच आली होती. दिसण्यातही ती सुंदर होती. आणि अननुभवीही. महालात तीही नवीन होती. पिंगलाक्षाचा कक्ष जितका तिला नवीन होता तितकाच स्वेच्छेलाही. अर्थात, स्वेच्छा एकदा पाहिलेला मार्ग विसरत नसे. शेवटी ती दुसऱ्या देशाच्या गुप्तयंत्रणेत कार्यरत होती. अचानक तिच्या कक्षाच्या दरवाज्यावर हस्त नाद झाल्याने तिने बाहेरील व्यक्तीस प्रवेश करण्यास सांगितले. त्याबरोबर सुस्मिता प्रवेश करती झाली. मंद पावले टाकीत ती स्वेच्छेच्या बिछान्याजवळ आली. तिचा हस्त आपल्या हस्तात धरून , नम्रपणे तिने पृच्छा केली. " आपण इतक्या अस्वस्थ का दिसता आहात " स्वेच्छेने थोडा विचार केला आणि तिने सुस्मिताला सांगितले, " हे बघ, मला ज्वराची भावना होत आहे तू पिंगलाक्षांच्या कक्षात जाऊन त्यांना याची वार्ता दे. " मग तिने सुस्मितेकडे पाहिले ती घाबरून म्हणाली, " मला तर त्यांचे भय वाटते, आणि त्यांचा कक्ष कुठे आहे तेही मला ठाऊक नाही. त्यावर स्वेच्छेने तिला पिंगलाक्षांच्या कक्षाकडे कसे जायचे तेही सांगितले . आणि आपण त्यांच्या त्वरित भेटीची अपेक्षा करीत आहोत , असे निवेदन करण्यास सांगितले. सुस्मिताची चर्या थोडी काळवंडली. ते पाहून स्वेच्छा म्हणाली, " अगं असं भय बाळगून कसे चालेल ? महाराजांच्या महालातली दासी आहेस तू . कर बरं, सांगितल्याप्रमाणे. " मग सुस्मिता गेली. ........ आता स्वेच्छेचा ज्वर तीव्र झाला होता. राजवैद्यांची प्रतीक्षा करण्याशिवाय तिच्या हातात काहीच नव्हते.

सुस्मितेला कसातरी कक्ष तर सापडला. पण पिंगलाक्ष कक्षात नव्हते. त्यांच्या रक्षकाला तिने विचारले, पण तो , ते कोणत्या समयी कक्षात येतील हे ठाऊक नसल्याचे म्हणाल्याने सुस्मिता विचारात पडली. पण तिने मुद्दामच त्याला आपल्या येण्याचे कारण सांगितले नाही. तेवढा तिला पोच होता. ती वळली आणि समोरून पिंगलाक्ष येताना दिसले. ती काही अंतरावर खाली मान घालून उभी राहिली. ते आत येताच तिला त्यांनी पाचारण केले. तिचे वृत्त ऐकून त्यांनी प्रथम राजवैद्यांना एका खास दासाकरवी निरोप धाडला. स्वेच्छेशी इथल्या कर्मचाऱ्यांचा जेवढा संबंध कमी येईल ; तेवढे बरे असा विचार करून त्यांनी काळजी घेतली. त्या खास कामावर नियुक्त झाल्याने त्यांचा संपर्क उगाचच सगळ्याच व्यक्तींशी आल्यास असुरक्षितता निर्माण होईल आणि दूरान्वये तेही अडचणीत येतील , हा त्याच्या मागे विचार होता. असो. सुस्मिता त्यांना अभिवादन करून परत आली. मग मात्र ती स्वेच्छेच्या संनिध बसून जमेल तेवढी तिची सेवा करू लागली. ....... अचानक स्वेच्छेच्या मनात सुदेश पंडिताबद्दल विचार आले. आणि तिचे मन थोडे ढगाळले. तिच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून सुस्मिता म्हणाली, " आपण सध्या थोडासुद्धा विचार करू नये. सगळ्याच गोष्टी त्याच्या इच्छेनेच घडतात. " तिचा भोळसटपणा पाहून स्वेच्छेला त्याही अवस्थेत हसू आले. जणू काही तिला असे सुचवावयाचे असावे की बाई गं, बहुतेक गोष्टी आपल्या योग्य निर्णयानेच घडतात. पण ती काहीच बोलली नाही. दोघी बोलण्यात गुंतल्याने त्यांना कक्षाच्या प्रवेशद्वारावर होणारा नाद ऐकू आला नाही. परंतु पुन्हा पुन्हा नाद झाल्याने सुस्मिता आश्चर्याने तिकडे पाहू लागली. स्वतःशी पुटपुटत तिने कक्षाचे प्रवेशद्वार उघडले. राजवैद्य आत येत म्हणाले, " इतक्या तातडीने संदेश धाडणे का बरे झाले ? कुणी खास व्यक्ती पीडित आहे का ?. " त्यावर सुस्मितेने खालच्या मानेने मंचकावर अर्धवट ग्लानीमध्ये असलेल्या स्वेच्छेकडे निर्देश केला. वैद्य पदरव न करता मंचका निकट पोहोचल्यावर म्हणाले, " आपण आपला वामहस्त पुढे कराल तर नाडी परीक्षा करता येईल आणि निदान ठरवता येईल. " असे म्हटल्यावर सुस्मितेने त्यांना बसण्याचे आसन पुढे केले आणि स्वेच्छेने आपला वामहस्त पुढे केला. राजवैद्य एक वयस्क गृहस्थ होते. विशाल ललाट आणि त्यावर केशर चंदनाच्या मिलापाने रेखलेले शिवगंध आणि त्याखाली असलेले शीतल डोळे पाहून पाहणाऱ्याला आपले अनारोग्य तात्काळ नाहीसे झाल्याचे अनुभवाला येत असे. स्वेच्छेच्या वाम हस्तावर आपल्या तीन अंगुली ठेवीत राजवैद्यांनी काही क्षणाकरिता डोळे मिटले. जणू काही ते ध्यानमग्न झाले. अचानक त्यांच्या मुखावर चिंतेची छाया पसरली. ते पाहून स्वेच्छेचा चेहरा छायांकित झाला. हातावरील जखम पाहून राजवैद्य म्हणाले, " विषबाधेची चिन्हे दिसतात. कुणा पशूशी सामना तर झाला नाही ? पशू फार प्राचीन असावा. कारण असे पशू आता विरळ झाले आहेत. आपणास याचा सामना कुठे करावा लागला ? " त्यावर स्वेच्छेने काहीच उत्तर दिले नाही. तिच्या लक्षात आले की अधिक संवाद तिच्यासाठी संकटाला आमंत्रण ठरू शकेल. तरीही राजवैद्य म्हणाले, " आपणास खरे तर वैद्यकीय निरीक्षणासाठी महालातल्या रुग्णालयात न्यावे लागेल. " ठीक त्याच समयाला पुन्हा एकदा कक्षाचे प्रवेशद्वाराव नाद झाल्याने सुस्मितेने उठून ते उघडले. पिंगलाक्ष आत प्रवेश करीत राजवैद्यांना म्हणाले, " त्यांच्यावर नक्की कशाचा असर झाला आहे ? " मग वैद्यांनी विषबाधेची आपली शंका बोलून दाखवली आणि रुग्णालयातील सोयींची आवश्यकताही उपचारांकरिता विशद केली. त्यावर विचार करून पिंगलाक्ष म्हणाले, "त्यांना महालातल्या रुग्णालयात दाखल करण्याने त्यांच्यावरील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पुऱ्या होऊ शकणार नाहीत. आणि त्यांची कार्ये त्याच करू शकतात. तेव्हा आपण औषध योजना इथेच करावी हे बरे. " पिंगलाक्षांची आज्ञा प्रमाण मानीत राजवैद्यांनी स्वत; च्या झोळीतून काही गुटिका आणि चूर्णे काढली. सुस्मितेला त्या गुटिका आणि चूर्णे एकत्र उगाळून लेप देण्याची कृती त्यांनी समजावून सांगितली. मग ते पिंगलाक्षाकडे वळून म्हणाले, " तीन रात्रीत जर विष उतरले नाही , तर मात्र नाइलाजाने यांना रुंग्णालयात दाखल करणे आबश्यक होईल, कारण जिवाला धोका संभवतो. हे अनारोग्य आपण गंभीरपणे घ्यावे , अन्यथा प्रकरण महाराज्यांपर्यंत जाऊन योग्य दखल न घेतली गेल्याचा प्रमाद माझ्याविरोधात नोंदला जाईल. " पिंगलाक्षाला हे म्हणणे पटले. त्याने अर्थातच रुकार दिला. राजवैद्यांनी निरोप घेतला आणि ते गमन करते झाले. आता सुस्मिता आणि पिंगलाक्ष तेवढे उरले. पिंगलाक्षाने सुस्मितेला शीतल जलाची व्यवस्था करायला सांगितली . ती कक्षाबाहेर गेल्यावर त्याने स्वेच्छेच्या ललाटावर आपला हस्त ठेवून पाहिला. ते ज्वराने तप्त झाले होते. मग त्यांची नजर तिच्या हातांवर आणि शरीराच्या इतर भागांवरून फिरली. एखाद्या नववधूची वस्त्रे अंगावर पाहून ते संभ्रमात पडले . पण काही बोलले नाहीत . आणलेले शीतल जल स्वेच्छेला उठवून ग्रहण करण्यास सांगितले. सुस्मितेच्या सहकार्याने हे शक्य झाले. आता जलग्रहणामुळे स्वेच्छेला तात्पुरती हुषारी वाटली.

कशीतरी रात्र तर सरली. औषधांच्या तीव्रतेने ब्राह्ममुहुर्ती स्वेच्छेचा ज्वर उतरला. सुस्मिता तो पर्यंत जागीच होती. बाईसाहेबांचा ज्वर उतरलेला पाहून तिने प्रथम उष्ण दुधाची व्यवस्था करवली. त्यांना बसत्या करून तिने दुग्धप्राशन करवले. आता स्वेच्छेला प्रसन्नता वाटू लागली . पण ती उठण्याचा प्रयत्न करताना पाहून सुस्मिता पुढे येऊन तिला धरून म्हणाली, " आपण सध्यातरी उठण्याचा बिलकूल प्रयत्न करू नये , न जाणो ज्वर उलटला तर ? " असे म्हणत स्वेच्छेला तिने परत मंचकावर शयन करण्यास भाग पाडले.

*******************************

देवींची अस्वस्थता सारखी वाढत चालली होती. अजूनही संतराम त्यांच्या हातात त्यांना पाहिजे होते तसे येत नव्हते . नवीन काय योजना करावी याचा विचार त्यांना मंचकावर स्वस्थ बसू देत नव्हता. खरंतर देवींचं दैनंदिन जीवन अगदी आखीव होतं. प्रातःकाळी लवकरच उठून त्यांच्या अंगाला मर्दन करणाऱ्या दासीला त्या पाचारण करीत. मग किमान एखाद घटिका तरी मर्दन प्रक्रिया चाले.
त्यात देवी चक्क निर्वस्त्र होऊन हा सगळा उपचार करून घेत असत. घाटदार आणि बाकदार देहाचे त्यांचे हे रहस्य तर होतेच. पण त्यांचा आहारही अगदी मोजका आणि ठरवलेला असे. त्यांना हे ज्ञान विवाहापूर्वीपासूनच होते. त्यांच्या प्रभावी देहाचे आकर्षण वाटूनच तर महाराजांनी त्यांच्यापुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता . जो त्यांनी विचारपूर्वक स्वीकारला होता. देवी सहसा अविचारी कृती करीत नसत. जे करायचे ते अगदी योजनाबद्ध करायचे हा त्यांचा पिंडच होता जणू. फक्त त्या कुकर्मामध्ये त्यांची बुद्धी वापरित असत. म्हणून तर त्या विवाहबाह्य संबंधामध्ये न अडकता आणि पाहिजे तितके दैहिक सुख भोगून सहीसलामत सुटल्या होत्या. परंतू सध्या मात्र देवीची मनः स्थिती वेगळी होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांना मर्दनामध्ये जणू संतराम त्यांच्या शरिरास स्पर्श करीत असल्याचा भास होई. आणि त्यांची कामुक भावना मर्यादेपलिकडे गेल्याने त्या उपचार करणाऱ्या दासीला शेलके शब्द वापरून काहीबाही बोलत. आता त्यांच्या दृष्टीने त्यांच्या आजाराचे औषध फक्त संतराम होते. त्यांचा तेजः पुंज चेहरा रसरसलेले ओष्ठ त्यांच्या नजरेसमोरून जात नव्हते. त्यामुळे त्या दिवसाचा बराचसा काळ स्वप्न रंजनात घालवीत. रात्रीच्या समयीसुद्धा इच्छा असूनही आणि संदेश पाठवूनही महाराज त्यांच्या कक्षात येत नसत. आता त्यांच्या घायाळ म्हणण्यापेक्षा वासनेने बरबटलेल्या मनाने एक जबरदस्त योजना तयार केली होती. प्रत्यक्ष महाराजांचाच वापर करण्याचे त्यांनी ठरवले होते. त्यांनी आपण
अनारोग्याने पछाडलेले असल्याचे पसरवायला सुरुवात केली.

प्रथम त्यांनी किस्त्रीवर त्याचा प्रयोग केला. आपल्या लोचनांच्या अधोभागी त्यांनी कसल्याश्या वनस्पतीचा रस लावून तो थोडाफार काळसर केला. हातावर सुरकुत्या , अर्थातच कमी प्रमाणात येतील अशा रितीने कसलातरी अदृष्य लेप लावून ते साध्य केले. अंगावरील वस्त्रे अगदी फिकट रंगांची वापरायला सुरुवात केली. दोन तीन दिवस असे केल्यानंतर त्यांनी किस्त्रीला पाचारण केले. किस्त्री एक आज्ञाधारक दासी असल्याने लागलीच त्यांच्या कक्षात प्रवेश करती झाली. तिने पाहिले की देवी अगदी केविलवाणे मुख करून अधोमुख होऊन मंचकावर पडल्या आहेत. तिने जवळ जाऊन पाहिल्यावर तिला एकूणच देवींच्या देहावरील लक्षणे अगदी असामान्य अशा अनारोग्याची वाटली. कसे तरी पुटपुटल्यासारखे करून देवी म्हणाल्या, " किस्त्री महाराजांना त्वरेने आमच्या कक्षात येण्याची गळ घालता आली तर आम्ही तुजवर फार प्रसन्न होऊ. " किस्त्री सारखी त्यांना ओळखणारी दासीही यावेळी फसली. तिने खरोखरीच महाराजांकडे जाण्याचे ठरवले. तिने देवींना तसे आश्वासनही दिले ,पण निश्चित समयाची कोणतीही खात्री दिली नाही. मग तिने त्यांना कसल्या उपायाने बरे वाटेल ते विचारले. त्यावर अर्थातच त्यांनी मौन पाळणे पसंत केले. काही वेळ कक्षातली आवरा आवर करून किस्त्री बाहेर गेली. महाराजांपर्यंत संदेश पोहोचवणे तसे कठीण होते. त्यातून असा वैयक्तिक स्वरूपाचा संदेश . असे संदेश पाहण्यासाठी महाराजांकडे बिलकुल समय नव्हता. एक गोष्ट नक्की होती की किस्त्री जेव्हा त्यांच्या भेटीची इच्छा प्रगट करीत असे तेव्हा ते तिला टाळीत नसत. तिच्याकडे असलेली माहिती नक्कीच महत्त्वाची आणि किमती असणार हे त्यांना माहिती होतं. ती सहसा वैयक्तिक स्वरूपाचे संदेश घेऊन येत नसे. पण तिला योग्य तो मान ते देत असत. असो. किस्त्रीने आधी स्वकक्षात जाऊन या सगळ्यावर विचार केला. इतकी आवश्यकता आहे का , असला संदेश महाराज्यांकडे पोहोचवण्याची , तिने स्वतःला विचारले. मग तिने परत एकदा देवीच्या कक्षात घडलेला प्रसंग डोळ्यासमोर आणला. तिला प्रथमदर्शनी योग्य वाटत असले तरी देवींचा काहीतरी त्यात डाव असावा अशी तिची कल्पना होऊ लागली. महाराज नक्कीच स्वतः न येता राजवैद्यांना पाचारण करतील . असं वाटल्याने तिला धीर होईना. आणि देवींना नाराज करणं म्हणजे संकटाला निमंत्रण हेही तितकंच खरं होतं. म्हणून तिने प्रथम महाराजांकडे भेट मिळण्यासंबंधी संदेश पाठवला. वेळ दोन प्रहरची असल्याने महाराज तेव्हा भोजनानंतरची विश्रांती घेत होते. पण त्यांनी किस्त्रीचा संदेश ऐकून तिला पाठवण्याची परवानगी दिली.

महाराजांचा विश्राम कक्ष म्हणजे एक मोठा दिवाणखाना होता. जिथे वेगवेगळ्या प्रकारचे मंचक ठेवले होते. ते सर्वच कोरीव काम केलेले आणि आकर्षक अश्या गाद्या गिर्द्यांनी सजवलेले होते. किस्री आल्याची वर्दी द्वारपालाने त्यांना दिली. किस्त्री आत प्रवेश करती झाली. महाराज तिच्याकडे पाहून प्रसन्न हसले. मग त्यांनी तिने सांगितलेले सगळे तपशील नीट ऐकून घेतले. किस्त्री आज्ञेसाठी खाली मान घालून उभी राहिली. तिला निरोप देत महाराज म्हणाले, " देवी आणि त्यांची दासी प्रज्ञा यांवर बारिक लक्ष ठेव आणि सुलक्षेची काय वार्ता आहे तेही शोधून काढ. कारण ती तिच्या पुत्रास अनारोग्य असल्याने स्वगृही गेल्याचे चर्चेत आहे. ज्यावर आमचा तिळमात्रही विश्वास नाही. " महाराजांनी यावर विचार करण्याचे ठरवले आणि देवींना त्यांच्याच डावात कसे फसवायचे यावर ते विचार करू लागले. ......... ठीक त्याचवेळी देवींची दासी प्रज्ञा , जी किस्त्रीच्या मागावर देवींनी पाठवली होती, ती जवळ जवळ पळतच देवींच्या कक्षात आली. त्यांच्या कानाशी लागून तिने आपले अंदाज सांगितले. ते ऐकून देवी म्हणाल्या, " हे केवळ तुझे अंदाज आहेत, सत्य वेगळं असू शकतं. आता तू नीघ म्हणजे किस्त्रीने तुला पाहायला नको. " पण तिला ऐकू आलेले सुलक्षेचे नाव ऐकून त्या सावध झाल्या. किस्त्रीने तर सुलक्षेचा उल्लेख केला नसेल? असे त्यांच्या मनात आल्याबरोबर त्यांना महाराज कोणाकडून तरी सुलक्षेची माहिती काढतील असे जाणवून त्यांनी सुलक्षेच्या एकुलत्या एक पुत्राची विल्हेवाट कशी लावता येईल यावर विचार करण्यास सुरुवात केली. तिकडे महाराजांनीही किस्त्रीची काय वार्ता येते ते जाणून देवींवरच उलटेल अशी कृती करण्याचे ठरवले. तेही लवकरात लवकर , कारण सध्या बाजूच्याच राज्यापासून असलेला धोका त्यांना सोमूने जाणवून दिला होता. आणि ते जास्त महत्त्वाचे होते.

***************************************************

पंडिताने स्वेच्छेच्या कक्षात प्रवेश केल्यावर त्याला तिचे पलायन झालेले सहन न झाल्याने त्याने कक्षातील सर्वच रक्षक आणि दास दासींविरुद्ध फार मोठा गहजब केला. सगळ्यांनाच त्याने एकत्र जमवून त्यांना स्वेच्छेच्या पलायनास सहकार्य केल्याबद्दल त्याने बांधवून घेतलेल्या कच्च्या कारागृहात टाकण्यास त्याच्या खास रक्षकांना सांगितले. त्यावेळी त्याने कोणाचेच निवेदन ऐकले नाही . त्याच्य कच्च्या कारागृहात कैद्यांना उपाशी ठेवले जात असे, म्हणजे त्यांच्याकडून गुन्हा कबूल करून घेऊन मग तो त्यांची शिक्षा ठरवीत असे. असो. पंडित इतका क्रोधाने उतावळा झाला होता की त्याने उत्कंठेच्या सहकारी दासींवर आरोप पक्का केला. पण शिक्षेची अंमलबजावणी केली नाही. मग तो परत विवाहवेदीपाशी आला तेव्हा श्रिपाल आणि त्याचे सहकारी जाण्याच्या बेतात असतानाच त्यांना सुरक्षा रक्षकांनी ताव्यात घेतले. त्याबरोबर मुख्य सुरक्षा रक्षकापुढे घायकुतीला येऊन श्रीपाल रडकुंडीला येऊन म्हणाला, " महाराज , आपण आमचे असे कोणते अनुचित कृत्य पाहिले की आम्हांस धरून ठेवीत आहात. एकच उपकार करा मी लवकरच माझ्या निवासस्थानी जाऊन येतो आणि पंडीतजीनी दिलेली महादक्षिणा माझ्या अर्धांगिनीला अर्पण करून येतो. फारतर आपला एखाद रक्षक बरोबर पाठवावा. " पण मुख्य सुरक्षा रक्षाकावर त्याचा परिणाम झालेला दिसला नाही. त्या बरोबर श्रीपालाने काढण्या घातलेल्या अवस्थेतच फतकल मारून रुदन करण्यास प्रारंभ केला. आता त्याला प्राप्त झालेली सुवर्ण पेटिका वस्त्रात सांभाळणे कठीण झाले होते. निदान ती तरी आपल्या स्त्रीकडे सुपूर्त केली की दिलेली शिक्षा भोगण्यास तो मुक्त होता. इतका त्यास लोभ होता. त्याच्या रुदनाकडे आणि विनवण्यांकडे दुर्लक्ष करून त्याला रक्षकांनी ओढण्यास सुरुवात केली. अचानक आलेल्या पंडिताला पाहून श्रीपालाने रुदनाचा स्वर वाढवीत म्हंटले, " पंडितराज पाहा तरी मजकडून कोणताही अपराध झाला नाही तरी मजला हे रक्षक कारागृहात ओढून नेत आहेत. " पंडित म्हणाला, " ठीक आहे आपली सुटका तर केली जाईल , पण एका अटीवर. आपणास नग्न होऊन , आपणाकडे काहीही नसल्याचे सिद्ध करावे लागेल. आपणास ही अट मान्य असल्यास आपण जाऊ शकता. " असली उफराटी अट घातल्याबरोबर श्रीपालने एकदा भोवतालचे वातावरण पाहिले . एवढ्या मोठ मोठ्या मातबर राजकारणींसमोर नग्न होणे आपल्याला शोभा देणार नाही आणि यापुढे नगरातला भिक्षुकाचा मानही नष्ट होईल. त्याचप्रमाणे हे सर्व आपल्या अंगवस्त्रास विदित झाले तर ? या विचारासरशी तो शहारला. आणि म्हणाला, " छे छे पंडितराज , हे अशक्य आहे. " मग मात्र पंडिताने रक्षकांना श्रीपालासहित त्या ब्रह्मवृंदाला घेऊन जाण्यास सांगितले. अधोवदन होऊन श्रीपाल मौनपणे निघाला . पंडिताला पाहून धुरंधरजी आणि इतर राजकारणी म्हणाले, " पंडितजी, वधूला तरी घेऊन या म्हणजे नजराणे तरी देऊन वधुमुखाचे आम्हांस दर्शन तरी होईल. " बाकीच्या सरदार दरकदार आणि मोठमोठ्या अधिकाऱ्यानीही या गोष्टीसाठी आग्रह धरला. पंडिताकडे होकार देण्याशिवाय मार्ग नव्हता. आता त्याला स्वेच्छेचा माग काढण्यासाठी आपल्या अघोरदेवतेचे साहाय्य घेण्याची आवश्यकता भासू लागली. तो लगेचच निघाला स्वतः च्या महालात येऊन त्याने तळघराचे प्रवेशद्वार उघडले. ..............

(क्र म शः )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान चाललीय कथा!

बाकी सगळ्या संस्कृतप्रचुर शब्दरचनेत 'असर' हा म्लेंच्छ शब्द जरा खटकला.

बाकी- दिवाणखाना, गाद्यागिर्द्या, कच्च्या , पक्का.