यह दिल है कन्फ्युज्ड ! (Ae Dil Hain Mushkil - Movie Review)

Submitted by रसप on 29 October, 2016 - 03:27

'मला काय हवं आहे' ह्याचा थांग बहुतेकांना मर्यादित स्वरुपातच लागत असतो. ह्या 'बहुतेकां'पैकीही बहुतेकांची मजल व्यावसायिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या काय हवं आहे, अश्या विशिष्ट क्षेत्रांपुरतीच मर्यादित असते. स्वत:ची भावनिक गरज नेमकी काय आहे, हे समजून येण्यात उभं आयुष्य निघून जातं. अनेकदा अगदी शेवटपर्यंतसुद्धा हे समजून नाही तर नाहीच येत.
संपले आयुष्य पण ना समजले माझे मला
धावलो होतो कुणाच्या जन्मभर मागावरी ?
असा हा जटील प्रश्न फार कमी लोकांना सुटत असतो. त्यामुळे साहजिकच आपण सगळेच कमी अधिक प्रमाणात एक गोंधळलेले - कन्फ्युज्ड - आयुष्य जगत असतो. भारतीय चित्रपट वास्तववादाकडे जसजसा अधिकाधिक सरकत चालला आहे, तसतश्या चित्रपटाच्या कथानकात अश्या 'गोंधळलेल्या' व्यक्तिरेखा वारंवार येत आहेत. इम्तियाझ अली तर अजूनही हा एकच विषय स्वत:चं पूर्णपणे समाधान होईल इतपत मांडून मोकळा होऊ शकलेला नाहीय बहुतेक. 'जब वी मेट', 'रॉकस्टार', 'तमाशा' असे त्याने विविध प्रयोग ह्या एका शोधाला सादर करण्यासाठी केलेले आहेत. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि 'दिल धडकने दो' मधून झोया अख्तरनीही अश्याच व्यक्तिरेखांना सादर केलं आहे आणि तनू वेड्स मनू, कट्टी-बट्टीसुद्धा ह्याच पंगतीत बसवता येतील.
सुरुवातीला बाष्कळ प्रेम कहाण्या दाखवणाऱ्या करण जोहरने नंतर हळूहळू जरासे परिपक्व भावनिक द्वंद्व 'कभी अलविदा ना कहना' आणि 'बॉम्बे टॉकीज' मधून दाखवले होते, पैकी 'बॉम्बे टॉकीज' तर खूपच धाडसी आणि चांगला प्रयोग होता. 'ऐ दिल हैं मुश्कील' द्वारे जोहरने 'आपली भावनिक गरज काय आहे', हे समजण्या, न समजण्यामधल्या द्वंद्वात गुंतलेल्या काही मनांचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रयत्न जमला की फसला, हा पुढचा भाग. तो प्रामाणिक होता का, हा पहिला. तर हो. प्रयत्न प्रामाणिक आहे. पण 'मुल्ला की दौड मस्जिद तक़' ह्याचाही प्रत्यय दिला आहेच !

ह्या कथानकातल्या सपशेल कन्फ्युज्ड व्यक्तिरेखा आहेत, अयान (रणबीर कपूर) आणि सबा (ऐश्वर्या राय बच्चन). पैकी बच्चनसूनेला सहाय्यक विभागात मोडेल अशी, दुय्यम किंवा तिय्यम भूमिका असल्याने ती काही महत्वाची नाही. मुख्य भूमिका रणबीर आणि अनुष्का शर्माच्याच आहेत. अनुष्काने साकारलेली 'अलीझेह' त्यातल्या त्यात 'सुज्ञ' वगैरे म्हणता येईल अशी आणि अयान मात्र अगदीच सुदूरबुदूर ! ह्या सगळ्या ओढाताणीच्या धाग्याचं एक टोक 'अली' (फवाद खान) च्या हातीही आहे. मात्र त्याला जराही पकड वगैरे घेण्यासाठी वावच ठेवलेला नाहीय.

Aedilhaimushkilsynopsis.jpg

हे कथानक लंडन, पॅरीस, व्हिएन्ना अश्या परदेशी लोकेशन्सना घडतं. का, ते विचारायचं नसतं, कारण चोप्रा, जोहर वगैरेंकडे अमाप पैसा आहे. हा पैसा सिनेमात ओतताना त्याचा विनियोग तांत्रिक बाजू सुधारणे, पटकथेला धार आणणे, चांगलं संगीत बनवणे वगैरे फुटकळ गोष्टींसाठी खर्च करणे, अजून तरी पूर्णपणे आपल्या मुख्य धारेतल्या सिनेमाकर्त्यांना पटत नसावेच. नाही म्हणायला, काही काळासाठी कथानक थोडंसं लखनऊमध्ये सांडतं. पण पुन्हा एकदा 'तिथेच का' ह्या प्रश्नाला काहीही उत्तर नाही. म्हणजे अमुक कथानक अमुक शहरातच का घडावे किंवा कथानकाचा विशिष्ट भाग तमुक ठिकाणीच का घडावा, ह्याचा तर्कसंगत विचार करणे हा वेळेचा अपव्यय आहे, हे समजून घ्यायला हवं !

'अयान'च्या भूमिकेत रणबीरने पुन्हा एकदा जबरदस्त काम केलं आहे. पण गोंधळलेल्या प्रेमिकाची व्यक्तिरेखा साकारून आता त्याला कंटाळा येण्यास हरकत नसावी. ऋषी कपूर स्वत:च्या एका विशिष्ट छबीत अडकल्याने त्याच्यातल्या सक्षम अभिनेत्याला फार क्वचित बाहेर येता आलं आहे. बापासारखं पोराचं होऊ नये. यह जवानी है दिवानी, तमाशा, रॉकस्टार, बचना ऐ हसीनो ह्या सगळ्यातून रणबीरने आधीच कन्फ्युज्ड तरुण साकार केला आहे. 'ऐदिहैंमु' त्याच सगळ्याला उजाळा मिळत जातो.
एकेका सिनेमागणिक अनुष्का शर्मा मला अधिकाधिक आवडायला लागली आहे. तिची 'अलीझेह' इतकी मस्त झाली आहे की तिच्या प्रेमात का पडू नये', हाच प्रश्न पडावा ! अगदी सहज वावर, बोलके डोळे व चेहरा आणि जबरदस्त आत्मविश्वास, ह्याचं एक परफेक्ट मिश्रण मला अनुष्कात जाणवतं. 'आत्मविश्वासाने वावरणारी स्त्री' ही सौंदर्याची सर्वश्रेष्ठ मूर्ती असावी. ती झलक अनुष्कात ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन नेहमीच दिसत असते. तिची 'अलीझेह' इतकी सुंदर दिसते की एका प्रसंगात जेव्हा ती 'सबा'च्या (ऐश्वर्याच्या) सौंदर्याची भरभरून स्तुती करत असते, तेव्हा 'हा उपरोध आहे की काय' असा संशय येतो !
ऐश्वर्या आजपर्यंत जितकी चांगली दिसत आली आहे, तशीच दिसते. ना जास्त, ना कमी. खरं तर, तिच्या भूमिकेच्या दृष्टीने पाहिलं, तर तिने मध्यमवयीन दिसणं अपेक्षित होतं, पण ती पुरेशी वयस्कर दिसत नाही. तिची एन्ट्री झाल्यावर सिनेमाच्या गाडीचा ट्रॅक काही वेळासाठी बदलतोच. तेव्हाचे बोजड डायलॉग्स तिच्यासोबतच्या अयानला करतात, त्यापेक्षा जास्त आपल्याला बोअर करतात. 'सबा' कवयित्री का दाखवली आहे, ह्यालाही काही सबळ कारणमीमांसा नाहीय. किंबहुना, ती कवयित्री नसती दाखवली, तर जे कमाल पकाऊ डायलॉग इच्छा नसतानाही पाहाव्या लागणाऱ्या जाहिरातींप्रमाणे आपल्यावर आदळत राहतात, ते तरी टळले असते.

मी सिनेमा पाहण्याची दोन प्रमुख कारणं होती. ट्रेलरमध्ये ऐकवलेला 'एकतर्फा प्यार..' वाला डायलॉग आणि 'चन्ना मेरेया' हे गाणं. तो डायलॉग कुठल्या प्रसंगी आहे आणि ते गाणं कसं चित्रित केलं आहे, ह्या दोन गोष्टींची मला खूप उत्सुकता होती. दोन्हींनी मला निराश केलं. धक्कादायक गोष्ट अशी की, 'एकतर्फा प्यार..' वाला तो डायलॉग मुख्य व्यक्तिरेखेच्या तोंडी नाहीच ! (कुणाच्या तोंडी आहे, हे सांगणार नाही. स्वत:च जाणून घ्यावे !) आणि 'चन्ना मेरेया' हे गाणं 'क्युटीपाय' ह्या भिकार धांगडधिंग्याला लागूनच सुरु होतं. दोन्ही गाण्यांच्या मेलडीचा, पट्टीचा एकमेकांशी दुरान्वयानेही संबंध नसल्याने हा बिनडोकपणा सहनच होत नाही. मुळात, ती 'क्युटीपाय' नामक टुकारकी अकारणच घुसडलेली आहे. एकंदरीत संगीताबद्दल बोलायचं झालं तर 'चन्ना मेरेया' आवडलंच आहे. शीर्षकगीतही चांगलं जमलं आहे. पण बाकी सगळा आनंदीआनंद आहे. पार्श्वसंगीत तर निरर्थक कल्लोळ माजवतं, बाकी काहीच नाही.

व्यक्तिरेखांच्या मनांतले भावनिक गोंधळ मांडण्यात करण जोहर दोन-तीन भाग वगळले, तर बऱ्यापैकी प्रभावी ठरला आहे. सगळ्यात जास्त माती खाल्ली आहे शेवटाकडे. शेवटचा मेलोड्रामॅटिक ट्विस्ट 'सगळं मुसळ केरात'वाला आहे. त्या सगळ्या फिल्मीगिरीनंतर शेवटी सिनेमा त्याच वळणावर संपतो, जिथे तो साधारण अर्ध्या तासापूर्वी पोहोचलेला असतो. 'बॉम्बे टॉकीज'मधल्या कहाणीच्या हाताळणीतली परिपक्वता इथे असती, तर सिनेमा 'जोहरचा सर्वोत्तम' म्हणता आला असता. शेवट वगळता, इतर सादरीकरणातही 'तेच ते'पण जाणवत राहतं.
जोहरच्या सिनेमांत श्रीमंतीचं प्रदर्शन असतं. ते झोया अख्तरच्याही सिनेमांत दिसतं, पण दोन्हींत फरक आहे. जोहरच्या प्रदर्शनात क्रिएटिव्हिटी जरा कमीच वाटते. मोजकीच पात्रं असलेलं कथानक असल्याने, ते आटोपशीर असायला हवं होतं. 'तेच ते'पण आल्यामुळे ते जरासं लांबलंच आहे. बट अगेन, अडीच, पावणे तीन तासाचा पसारा मांडल्याशिवाय चोप्रा, जोहर प्रभूतींना पोटभरीचं झाल्यासारखं वाटत नसावंच बहुतेक !

कुणी काहीही म्हणो, करण जोहरचंही एक फॅन फॉलोईंग आहे. त्यांना 'ऐदिहैंमु' नक्कीच आवडेल.
रणबीरच्या चाहत्यांनाही 'ऐदिहैंमु' आनंद देईल. अनुष्कासाठी पाहायचा असेल, तर नक्कीच पाहावा.
रणबीर-अनुष्कामध्ये ती 'सिझलिंग केमिस्ट्री' का काय म्हणतात, ती पुरेपूर जाणवते.
ऐश्वर्यासाठी जर कुणी पाहणार असेल किंवा तिच्या व रणबीरच्या तथाकथित गरम दृश्यांबद्दल उत्कंठा असेल, तर नक्की निराशा होईल.
आणि सिनेमाला होणाऱ्या विरोधाचा विरोध म्हणून जर कुणी मुद्दाम पाहणार असेल, तर त्यांनाही अगदीच वेठीस धरल्यासारखं वाटणार नाही, असं मला वाटतंय. त्यांनी फक्त 'ऐ दिल, यह हैं बॉलीवूड' इतकं लक्षात ठेवावं म्हणजे झालं !

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2016/10/ae-dil-hain-mushkil-movie-review....

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> ह्या सगळ्या ओढाताणीच्या धाग्याचं एक टोक 'अली' (फवाद खान) च्या हातीही आहे. मात्र त्याला जराही पकड वगैरे घेण्यासाठी वावच ठेवलेला नाहीय.<<

ह्याहून जास्त उल्लेख करावा, इतकं कामच नाहीय त्याला.

Agree with rsp. Fwad Khan does not have much of a role. Aishwarya peel marte. Shah rush looks horrible. Anushka gets on your nerves everyone speaks like they are in zindagI channel serials. Songs are boringly fake sufi.

हे कथानक लंडन, पॅरीस, व्हिएन्ना अश्या परदेशी लोकेशन्सना घडतं. का, ते विचारायचं नसतं, कारण चोप्रा, जोहर वगैरेंकडे अमाप पैसा आहे. हा पैसा सिनेमात ओतताना त्याचा विनियोग तांत्रिक बाजू सुधारणे, पटकथेला धार आणणे, चांगलं संगीत बनवणे वगैरे फुटकळ गोष्टींसाठी खर्च करणे, >>> चोप्रा, जोहर च्या चित्रपटान्चे संगीत चांगलंच असत की.

ऋषी कपूर स्वत:च्या एका विशिष्ट छबीत अडकल्याने त्याच्यातल्या सक्षम अभिनेत्याला फार क्वचित बाहेर येता आलं आहे. >>> सध्या त्याला वेगवेगळया भुमिका मिळू लागल्या आहेत. Happy

वरील दोन मुद्द्यांबाबत सुलू शी सहमत. ऋ हल्ली विविध भुमिका करू लागलाय आणि पेलूही लागलाय. तसेच चोप्रा जोहर यांच्या चित्रपटातील संगीत अपवाद वगळता चांगले असते. मेलोडीयस असते.

करण जोहरने शाहरूखला घेत कुछ्कुछ् होता है, कल हो ना हो, कभी खुशी कभी गम सारखे जे चित्रपट बनवलेत ती जादू आतांच्या पोरांना घेत तो नाही करू शकत. शाहरूखला टाईम मशीनमध्ये घालत मागे नाही नेऊ शकत, ना दुसरा तसा शोधू शकत, त्यामुळे त्याने याचा विचार करून आपली दिग्दर्शनाची शैली बदलत चित्रपट बनवायला हवेत.

"चांगलं संगीत बनवणे वगैरे फुटकळ गोष्टींसाठी खर्च करणे" - दोन्ही बॅनर्स खाली तयार झालेल्या सिनेमांचं संगीत श्रवणीय आहे.

रसप, तुमची परिक्षणं चांगली असतात. शैली च्या आहारी जाऊन कंटेंट शी तडजोड करू नका हा प्रेमाचा सल्ला.

आजच पाहीला. तुमचं परीक्षण पटलं. अनुष्का शर्मा: फार सुंदर काम केलं आहे तिने. एक नंबर! रणबीर कपूर: काम छान पण एकसुरी वाटतो थोडा. फवाद खान आणि ऐश्वर्या राय हे छान दिसण्याचं काम उत्तम करतात. सगळ्यात वाईट काम कोणी केलं असेल तर ते ह्या सिनेमाच्या संकलकाने! त्याला बहुधा कात्री चालवता येत नसावी. ब्रेकअप साँग, क्यूटी पाय आणि बुलेया ह्या तीनही गाण्यांना संपूर्णपणे कात्री लावली असती तरी चाललं असतं.
काही प्रसंग, संवाद फार छान जमून आले आहेत! आपके आँसू कितने वफादार है, अनुष्का रणबीर चे फिल्मी संवाद मस्त जमून आले आहेत. हा सिनेमा चांगला होता होता बऱ्यावरच अडकला आहे.

एकूणात सगळंच गंडलेलं आहे. स्टोरीचं लॉजिक शेवटपर्यंत पटतच नाही. अगदी पहिल्या सीनमध्ये रणबीरचा चटाचटा किस करणारी मुलगी नंतर त्याला इतकं का धिक्कारत राहते ते कळतच नाही. केजोच्या पिक्चरच्या प्रेमांमध्ये असला भंपकपणा कायमच असतो. दोस्ती टूट जायेगी म्हणत जिस्मानी रिश्ते नही म्हणणारी पोरगी त्याच्याच कडून सेवा मात्र जमके करवून घेते. मेडीकल रीझन्साठी सेक्स पॉसिबल नाही वगैरे आचरटपणा ठिक वाटला असता!! कॅन्सर पेशंट्सचं एकदम क्लिशेड आणि कंप्लीट चुकीचं चित्रीकरण !

मुळात तो कॅन्सरचा भाग घालायची काही आवश्यकता होती का? आणि जर तो भाग घेतला तर सबाच्या स्टोरीची काही गरज होती का? केजोला गोवारीकर सिन्ड्रोम झालाय. किती ताणायचा तो एक पिक्चर. आमच्या मुकेशभटने यात अजून तीन चार गाणी घालून शेपरेट शेपरेट तीन हिट्ट पिक्चर बनवले असते.

अ‍ॅशचं पात्र एकदम पीळ आहे. एक तर आंटीच्या रोलमध्ये अ‍ॅश. ती इतकी प्लास्टिक दिसते की वयस्कर वगैरे वाटत नाही. शिवाय त्यात तिला हेवी उर्दू डायलॉग दिलेत. तिच्या मोनोटोनस सुरात ती काय बोलते ते कळतच नाही! चेहर्‍यावर काही एक्स्प्रेशन देणे हा प्रकार रायबाईंना याही आधी कधी जमला नव्हता, याहीनंतर कधी जमणार नाही. हा रोल खरंतर केवळ आणि केवळ तब्बूचा असायला हवा होता. तिनं धमाल केली असती.

मध्यंतरी तो गदारोळ चालू अस्ताना फवाद खानचं ते क्युटीपाय गाणं कंप्लीट काढून "आम्ही त्याच्या भूमिकेची लांबी अमुक मिनिटांनी कमी केली" असा पवित्रा केजोने घेतला अस्ता तर बरं झालं असतं. कारण, गाणं एकदम फालतू आहे. लखनऊच्या मुस्लमान लग्नामध्ये पंजाबी गाणं का वाजतं?? बॉलीवूडच्या गाण्याचं पंजाबीएकसूरीकरण फारच वैतागवाणं आहे. ते गाणं संपताना मात्र चन्ना मेरेया चालू होतं. त्या अख्ख्या सीनसाठी केजोला एक मार्क.

अनुष्का आता जरा सुसह्य दिसतेय, तरीही तिचा रबनेबनादी जोडीमधला फ्रेशनेस कायमचा गेलाच आहे. पण तिची भूमिका सुंदर आहे आणि तिने ती फार व्यवस्थित निभावली आहे. रणबीर ठिकठाक काम करतो. त्याचं पात्रच इतकं गोंधळलेलं आहे की तो काय करतो हेच कित्येकदा कळत नाही.

चित्रपटामधला माझ्यासाठी हायपॉइण्ट म्हणजे अख्ख्या पिक्चरभर असलेले बॉलीवूड रेफरन्सेस. पार बिल्डिंगवरच्या लव्ह साईनपासून ते कोन्याक शराब नही होती पर्यंत!!! Happy

(जाताजता: एकाच सीनमध्ये शाहरूख खान प्रच्म्ड म्हातारा दिसतोय. वयाहीपेक्षा त्याह्च्या चेहर्यावरचा चार्म हरवलाय!!! Sad )

एकाच सीनमध्ये शाहरूख खान प्रच्म्ड म्हातारा दिसतोय. वयाहीपेक्षा त्याह्च्या चेहर्यावरचा चार्म हरवलाय!!! >> (ताहिर) त्या कॅरॅक्टरला सोडून गेली बायको आणि कारण विचारावे पण लागत नाय. Wink एकदम शोभला रोलमध्ये, चकदे पेक्षा पण जास्त Proud

त्याचं पात्रच इतकं गोंधळलेलं आहे की >> हो मला तो आता शारूकच्या पण प्रेमात पडतो का काय वाटायला लागले होते...किती वेळा ते रिश्ता रिश्ता. वेळीच अनुष्काने तो बत्ता त्याच्या टाळक्यात हाणला असता तर सगळेच सुटले असते.

नंदिनी, सी, त्या बिचार्‍या करण जोहर कडून काय अपेक्षा ठेवताय! त्याच्या मानाने बराच बरा सिनेमा बनवला आहे त्याने.
शाखाला अगदीच बघवत नाही पण.. क्या से क्या हो गया Sad

चित्रपट पहावा कि पाहू नये , याबद्दल अजून साशंक आहेच... व्हॉट्सॅप व्हर्जन पण वाचून झालंय.
इथून पुढे तुम्ही चित्रपट संगीताबद्दल नाही लिहिलंत, तर वाचक "संगीत डबडा आहे" हे समजून घेतीलच Happy अपवादांबद्दल लिहिलंत तर आवडेल...

(((एकेका सिनेमागणिक अनुष्का शर्मा मला अधिकाधिक आवडायला लागली आहे. तिची 'अलीझेह' इतकी मस्त झाली आहे की तिच्या प्रेमात का पडू नये', हाच प्रश्न पडावा !)))
पराडकर साहेब जरा जपून..... घरी पडसाद उमटू शकतात...
बाकी हा सिनेमा का बघू नये हे मला आता कळलेले आहे धन्यवाद...

आयला! बेकार मूवी.
अडीच तास फुकाची.

अलर्ट
आता मुद्दे( गुद्दे):
१) बच्चन्सून उगीच आहे. दुसरी कोणीही खपली असली. आक्खा चित्रपट हा फॅशन रँप असल्यासारखा तिचा वावर. ते पात्राचा उपयोग काहीही नाही. उगाच तिच्या लहान मुलीला व पतिला एकटे घरी ठेवून हे काम कशाला करायचे? Proud
२) रणबीर : आतावरच्या केलेल्या सर्व भुमिकांचे (वैफल्यग्रस्थ , गोंधळलेला तरुण) तेच तेच झलक दाखवणारे पात्र. कन्फुज्ड पात्र .
३) अनुष्का: अभिनयात सुधारीत आवृती. ओठांची पण बहुधा परत दुरुस्ती केल्याने डकी लिप्स लूक कमी, पण म्हातारी वाटते.
पण कायच्या काय मूवीत घातलेले पात्र. जी मुलगी कोणालाही पार्टीत उचलून सेक्स करायला तयार तिन मंगेतर पकडला जातो म्हणून रडू नये.
दुसरं म्हणजे, त्या रात्रीच अयान सेक्स मध्ये आपल्या टाईपचा नाही असे तिला पटल्याने ( तिला त्याची किस करण्यापासून, मिठी मारण्याची पद्धत आवडत नाही त्यावरून) मग त्याला मित्रच बनवणे योग्य असा विचार करून ती पुर्ण मूवीत वावरते असा संशय येत रहातो. Proud
हि नक्की पोट भरण्यासाठी काय करते ह्याचे गुपित आहे मूवीत.
४) फवादः उगीच्या उगीच. लखनौ मधील मुस्लिम होळी खेळतात का? ह्याचे उत्तर नाही मिळाले अजून.
५) शाहरुखः उगीचच घुसडलेले पात्र.

६) शेवटी जो काय मेलोड्रामा करायचा तो केलाच उगाच तो अलिझेला मारून वगैरे.

६) लिसा: फुकटचे वातावरण

आपल्याला तर फुल्ल आवडला. अनुश्का आणि ऐश खास दिसतात. ऐश तर एकदम झकास ! अगदी १५ मिनीटांमध्ये पण ती कमाल वावरते.
रसप नी म्हटल्याप्रमाणे रणबीर अगदी कन्फ्युज्ड पात्र दाखवलाय त्यामुळे मुळ अनुश्का आणि ऐश्वर्याची भुमिका अजुनच जास्ती आवडते. एकदम खंबीर, नो-नॉन्सेन्स, आणि आपल्याला रिलेशन्शिप मध्ये नक्की काय हवंय याची बरोबर जाणीव असणार्‍या डीवाज केजो नी मस्त उभ्या केल्यात आणि त्या दोघींनी त्याला बरोबर अभिनय करून साथ दिलेली आहे.
फवादला काय फार काम नाही.
क्युटी पाय गाणं खरंच त्या पिक्चर मध्ये नसतं तर चाललं असतं. ब्रेकप साँग आणि बुल्लेया मात्र झकास झालेत. त्यांच्याबरोबरच ए दिल है मुश्कील पण चांगलं जमलंय. पण परत एकदा म्हणतो की अर्जीत चा अता अजीर्ण झालंय. त्याच्याशिवाय इतर गायक नाहीत का सध्या. कोणी तरी दुसर्‍यांकडून गाणी म्हणून घ्या रे आता.

सर्वांत आवडलेला भाग म्हणजे रणाबीर आणि अनुश्का जी पॅरिस मधे धमाल करतात ती. अगदी कल्ला आहे आणि सध्याच्या पिढीचे टीपी करणे अगदी बरोबर पकडले आहे. आपल्याला तर एक एंटरटेनर म्हणून आवडला !

हुश्श !! पुन्हा एकदा पैका आणि वेळ वाचविल्याबद्दल त्रिवार धन्यवाद रसप Wink

>> ह्या सगळ्या ओढाताणीच्या धाग्याचं एक टोक 'अली' (फवाद खान) च्या हातीही आहे. मात्र त्याला जराही पकड वगैरे घेण्यासाठी वावच ठेवलेला नाहीय.<<

ह्याहून जास्त उल्लेख करावा, इतकं कामच नाहीय त्याला. आय शप्पथ !! ह्यालाच अनुल्लेखाने मारणे असे म्हणतात नाही का रसप... Lol

कन्फ्यूज्ड सिरीजमध्ये रॉय चांगला वाटलं होता. त्याचं समीक्षण इथे मायबोलीवर कुणी केलंय का?

सहज एक निरिक्षण.. मी फारसे हिंदी चित्रपट बघू शकत नाही तरीही...
करण जोहरच्याच नव्हे तर आताश्या बहुतेक चित्रपटात गोंधळलेले नायक नायिका का दिसतात ? लग्न ठरवून मग आपल्याच निर्णयाबाबत शंका घेणे, आयत्यावेळेस लग्न करण्यास नकार देणे, असेच सतत दिसते( दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे, जब वी मेट, बचना ए हसीनो, जवानी दीवानी.... )

त्यामानाने ठाम निर्णय घेणार्‍या नायिका जून्या चित्रपटात खुपदा असत ( बंदीनी, गाईड, मदर इंडीया... )

हा ट्रेंड नेमका कधीपासून सुरु झालाय आणि तो लोकप्रिय का होत आहे ? आजचे तरुण तरुणी काही इतके गोंधळलेले
मला वाटत नाहीत. मग चित्रपटात असे सातत्यने का दाखवतात ?

दिनेशदा, जास्ती स्वातंत्र्य + जास्त पर्याय = जास्त गोंधळ
यात चांगलं किंवा वाईट असं काही नाही. आहे हे असं आहे.

Pages