महेंद्र सिंग धोनी - द अन’टोल्ड लवस्टोरी :)

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 October, 2016 - 16:50

फायनली फायनली फायनली ...
या विकांताला धोनीला रुपेरी पडद्यावर बघायचा योग आला. पिच्चर बघायचाच होता म्हणून मुद्दाम कुठलेच परीक्षण वाचले नव्हते किंवा कोणालाच पिक्चरमध्ये काय दाखवलेय हे विचारले नव्हते. तरी क्लायमॅक्स काय असणार याचा माझ्या चाणाक्ष बुद्धीने अंदाज लावलेला.

.... आणि तोच खरा ठरवत सुरुवातही त्याच द्रुश्याने झाली.

येस्स!!

वन ऑफ द बिगेस्ट मोमेंट ईन ईंडियन क्रिकेट हिस्टरी. डोळ्यात साठवून ठेवावा, आणि तरीही पुन्हा पुन्हा बघत राहावे असे वाटणारा तो क्षण जेव्हा धोनीने श्रीलंकेला स्टेडीयमच्या पार भिरकावून दिले आणि तब्बल अठ्ठावीस वर्षांनी भारताने विश्वचषक जिंकला!

चित्रपटाची सुरुवातच होते ती त्या ऐतिहासिक सामन्याने. मुरली आणि श्रीलंकेची खतरनाक फिरकी गोलंदाजी पाहता धोनी स्वत: फॉर्ममधील युवराजच्या पुढे यायचा निर्णय घेतो. कोच गॅरी कर्स्टनला तो निर्णय कळवतो. आणि सामना भारतासाठी किंचित अवघड झालेल्या स्थितीत स्वत: फलंदाजीला मैदानात उतरतो. सारे स्टेडियम ‘धोनी, धोनी’ नावाने ओरडत असते. चित्रपट आणि खरोखर घडलेला सामना या दोन्ही द्रुश्यांची बेमालूम मिसळ अशी काही जमलीय. जी थिएटरलाही स्टेडीयम बनवत आपल्याला त्या वातावरणात घेऊन जाते. पुढे काय घडले आहे हा ईतिहास आपल्याला ठाऊक आहेच, पण तरीही ते पुन्हा मोठ्या पडद्यावर आपल्याला अनुभवायचे आहे या कल्पनेनेच अंगावर शहारा येतो..... आणि दुसर्‍याच क्षणाला चित्रपट आपल्याला धोनीच्या भूतकाळात घेऊन जातो. अगदी त्याच्या जन्माच्या वेळी. आणि तिथून सुरू होतो, आपल्या ओळखीच्या या हिरोचा, आपल्यासाठी अनोळखी असलेला स्ट्रगल! - महेंद्रसिंग धोनी - ‘द अन’टोल्ड स्टोरी!’ -

_ _ _ _ _ _ _ _ _

माहीच्या त्या जन्माच्या प्रसंगात, हॉस्पिटलमध्ये मूल बदली झालेय की काय? अशी शंका यावी असा सीन घेतला आहे. तो का घेतला आहे हे अनाकलनीय आहे. कदाचित खरेच तसे काही घडलेही असावे. पण तरीही त्याला चित्रपटात दाखवायची काही गरज नव्हती. अगदी विनोदनिर्मिती हा हेतू असलाच, तर ते ही जमलेलं नाहीये. असो, त्यानंतर सुरुवातीचे एकदोन प्रसंग धोनीची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे हे दाखवायला खर्ची घातलेत. पण त्यात आणि एकंदरीतच पुर्ण चित्रपटातही उगाचचा मेलोड्रामा टाळला आहे.

एखाद्या खेळाडूचा जीवनपट उलगडताना तो नेमका या खेळाकडे कसा वळला हे जाणून घ्यायची उत्सुकता सर्वांनाच असते. एखादा सचिन जेव्हा वयाच्या सोळाव्या वर्षी भारतातर्फे क्रिकेट खेळतो तेव्हा साहजिकच त्याने स्वत:च्या हाताने पॅंट घालणे आणि पॅड घालणे, या गोष्टी एकाच वयात शिकल्या असाव्यात हे समजू शकतो. पण धोनीबाबत अगदी तसे नव्हते. क्रिकेटपासून चार हात लांब राहत फूटबॉल हे पहिले प्रेम असलेला धोनी, जेव्हा त्याला त्याच्या शाळेचा क्रिकेट कोच त्याचे गोलकिपींगचे कौशल्य बघत शाळेच्या क्रिकेट टीममध्ये विकेटकीपींग करशील का म्हणून विचारतो, तेव्हा त्याचे उत्तर ऐकण्यासारखे असते.. "ह्यॅं, छोटा बॉलसे कौन खेलेगा ..

क्रिकेटवर आधारीत चित्रपट आहे तर तुम्ही सचिनला त्यापासून वेगळे ठेवूच शकत नाही. एका द्रुश्यात धोनी त्याच्या आईबरोबर जत्रेत फिरत असतो. एका दुकानात देवी देवतांच्या तसविरी ठेवल्या असतात. त्यातच एक फोटो या क्रिकेटच्या देवाचाही असतो. धोनी त्याच्या आईकडे तो फोटो घ्यायचा हट्ट धरतो. आणि ‘अब ये कौनसा भगवान है’ असे विचारणार्‍या त्याच्या आईला तो घ्यायलाही लावतो. पण सचिनला आदर्श मानणाला धोनी, फलंदाजीत मात्र त्याला कॉपी करायचा प्रयत्न करत नाही हे विशेष. आणि म्हणूनच आज म्हटले जाते, की सचिन हा सचिन आहे. प्रश्नच नाही. पण धोनी सुद्धा धोनीच आहे. दुसरा कोणी नाही ..

शालेय क्रिकेट सामन्यांमधून धोनी चमकायला सुरुवात करतो ते अर्थातच त्याच्या ऊत्तुंग फटकेबाजीने. "माही मार रहा है",. हे त्याच्या शाळेत परवलीचे शब्द बनतात. ते ऊच्चारताच ठणाणा शाळेची घंटा वाजते आणि दणादण पोरं उड्या मारत सामना बघायला मैदानावर जमा होतात. विद्यार्थी तर विद्यार्थी, शिक्षकांना सुद्धा हा मोह आवरत नाही. क्रिकेटवेड्यांचा हा देश. माझा स्वत:चा अनुभव आहे. कुठून रस्त्याने जात असलो आणि मैदानात खेळणारी पोरे दिसली की तेवढा एक चेंडू बघितल्याशिवाय पुढे पाऊल उचलत नाही. आणि त्या चेंडूवर नेमका कोणी जबरदस्त फटका मारला तर पावले थोडी आणखी रेंगाळतात आणि एखाद दुसरा बॉल आणखी बघितला जातो. चित्रपटातील ती द्रुश्ये पाहून एक क्षण मनात असे वाटून गेले की आपणही माहीच्या शाळेत असायला हवे होते, जे त्याची फटकेबाजी सुरू होताच आपल्यालाही तो कल्ला करायचा आनंद उचलता आला असता.

असो, पण शालेय क्रिकेट ते टीम ईंडिया. हा एक फार मोठा पल्ला आहे. तुमच्यात भले कमालीचे टॅलेंट असले, पण जर नशीबाने हुलकावणी दिली आणि योग्य वेळी संधी मिळालीच नाही, तर तुमचे लक्ष्य कधी एक अधुरे स्वप्न बनून राहते हे एखादा अमोल मुझुमदारच सांगू शकतो.

धोनीबाबतही असेच काहीसे होऊ लागले होते...

ईथे दुर्दैवाने मला थोडासा पिक्चर चुकवावा लागला. अगदी तशीच एमर्जन्सी होती. असो,

क्रिकेटचा खेळ धोनीला रेल्वेमध्ये टीसीची नोकरी करायला लावतो. दिवसभर दमूनभागून काम आणि संध्याकाळी नेट प्रॅक्टीस. त्याच्या करीअरची ट्रेन दोन स्टेशनांच्या दरम्यानच फिरत राहते. तीन वर्षे होतात. कुठे मोठी संधी मिळत नाही, तर कुठे ती जाणूनबुझून नाकारली जाते. त्याच्यासोबतचे युवराज कैफ हे खेळाडू भारतासाठी खेळत आपापल्या जागा फिक्स करतात आणि त्यांच्यापेक्षा सरस असलेला धोनी मात्र आपला नंबर लागायची वाट बघत राहतो. या फेजमधील हताश निराश धोनी सुशांत राजपूतने छान साकारला आहे. बरेच द्रुश्यात धोनीची बॉडीलॅंगवेजही व्यवस्थित साकारली आहे. त्यामुळे बरेचदा ‘कधी धोनी कधी सुशांत’ यात आपलीही गल्लत होते. दिसण्याबाबत म्हणायचे झाल्यास छोट्या केशरचनेत तो धोनीच्या बरेच जवळ जातो. मात्र लांब केसांमध्ये अखंड भारतवर्षात धोनीला तोड नाही. त्याच्या या लांब केसांचे साक्षात शत्रूराष्ट्र प्रमुखाने केलेले गुणगाणही चित्रपटातल्या एका द्रुश्यात ओरीजिनल चित्रफितीच्या स्वरुपात दाखवले आहे.

आज ज्या स्फोटक फलंदाजीसाठी आणि त्याच्या हेलिकॉप्टर शॉटसाठी वगैरे धोनी ओळखला जातो तीच फलंदाजीची शैली एकप्रकारे त्याच्या निवडीच्या आड येत होती. घरगुती क्रिकेट आणि ईंडिया ’ए’ संघातर्फे चमकल्यानंतर जेव्हा त्याचा नावाचा विचार भारतीय संघासाठी होऊ लागतो तेव्हा निवड समितीच्या सदस्यांचे त्याच्या तंत्राला घेऊन एकमत होत नाही. त्याचे तंत्र आंतरराष्ट्रीय लेवलला त्या दर्जाच्या गोलंदाजांसमोर टिकेल का याबाबत दुमत होते. तेव्हा बहुधा किरण मोरे की कोणाच्या तरी तोंडी एक उत्तम डायलॉग आहे - "पूअर टेकनिक एक बात होती है, और अनकन्वेन्शनल बॅटसमन एक अलग बात होती है." .. पर्रफेक्ट !

पुढे जाऊन त्याने हेच सिद्ध केले. पुस्तकी क्रिकेट खेळणार्‍या जीवांना जे जमले नाही ते रिझल्ट त्याने मिळवून दाखवले. कमालीचे कूल टेंपरामेंट, परीस्थितीनुसार खेळात केलेली अ‍ॅडजस्टमेंट, प्रेशर झेलायची पचवायची आणि त्याला पॉजिटीव्हली घेत मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावायची मानसिकता, हे सर्व गुण आणि सोबतीला मोठे फटके मारायची क्षमता, भारतीय फलंदाजांमध्ये अभावाने आढळणारे हूकपुलचे फटके खेळायचे कौशल्य, अगदी पायात पडलेल्या चेंडूलाही षटकार मारायची क्षमता, एकाचे दोन रन करणारी रनिंग बीटवीन द विकेट आणि यष्टीरक्षण असो वा फलंदाजी मैदानावरची चपळता, या एक ना दोन हजारो गुणांनी त्याला केवळ आजवरचा ईतिहासातील सर्वश्रेष्ठ फिनिशरच नाही तर भारताचा आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधारही बनवले. त्याच्या रेकॉर्डसाठी वेगळा धागा काढावा ईतके ते अफाट आहेत. तुलनेत चित्रपटात कुठेही त्याचे तितके कोडकौतुक केले नाहीये हे विशेष जाणवले.

धोनी आजवर कुठल्या गोष्टीसाठी बदनाम झाला असेल तर ते एकाच गोष्टीसाठी की त्याने सिनिअर खेळाडूंचा पत्ता कट केला. आणि हे चित्रपटात कुठेही लपवले नाहीये. किंबहुना त्यामागची त्याची स्पष्ट भुमिका मांडली आहे. तीन खेळाडू टीममध्ये फिट बसत नाहीयेत, त्यांना वगळा असे सांगताना दाखवले आहे. त्यानंतर पुढे दाखवलेल्या बातम्यांमध्ये सेहवागचे नावही घेण्यात आले आहे.

२००७ च्या विश्वचषकात धोनीला आणि पर्यायाने भारतीय संघाला आलेले अपयश देखील चित्रपटात दाखवले आहे. चढत्या काळात डोक्यावर घेणारे क्रिकेटरसिक एका चेंडूवर बाद होणे या चुकीसाठी लाथेने तुडवायलाही मागे पुढे बघत नाहीत हे धोनीच्या घरावर होणार्‍या दगडफेकीने दाखवले आहे. या अश्या काही मुर्खांकडे डोळेझाक करत आमच्यासारख्या क्रिकेटरसिकांसाठी देशासाठी खेळत राहणे या वृत्तीलाही मग सलाम करावासा वाटतो.

जिथे धोनीचा स्ट्रगल संपतो तिथे धोनीची लव्हस्टोरी सुरू होते. त्यात धोनी थोडासा’च फ्लर्ट दाखवलाय. खरा की खोटा माहीत नाही. पण प्रामाणिकपणा जोपर्यंत अंगी असतो तोपर्यंत हा गुण(!) चालून जातो. दोन्ही लव्हस्टोरी या लव्हस्टोरी म्हणून पाहिल्या तर बरेपैकी उत्तम जमल्या आहेत. हो दोन्ही. दोन जणी आल्या होत्या त्याच्या आयुष्यात. पहिलीला त्याच्यापासून नियती हिरावून घेते. दुसरीला आता आपण मिसेस साक्षी धोनी म्हणून ओळखतो.

हा चित्रपट सर्वप्रथम धोनीचाच आहे. मग सुशांत राजपूतचा बनला असता. मात्र ओवरऑल त्याला आपली म्हणावी तशी छाप सोडता आली नाही. काही वेळा या जागी धोनीच हवा होता, असेही वाटून जाते. दिग्दर्शकाने फार काही दर्जेदार कलाकृती बनवली आहे असे नाही, मात्र धोनीच्या स्ट्रगलला पुरेपूर न्याय देणारा चित्रपट बनवला आहे. लव्हस्टोरीचा भाग किंचित अति वाटतो. स्पेशली रोमांटिक गाणी नक्को नक्को होऊन जातात. लक्षात एकही राहत नाही. हिरोईनी दिसायला छान घेतल्या आहेत. तरी मला दुसरीपेक्षा पहिली जास्त आवडली. जर सर्वांशीच असे झाले असेल तर धोनीला त्याची बायको काही सोडणार नाही.

बाकी या लव्हस्टोरींमध्ये काही बॉलीवूडी योगायोगाही दाखवले आहे. जसे की दोन्ही हिरोईनींच्या तोंडी एकच डायलॉग आणि मग दुसरीच्या तोंडचा डायलॉग ऐकत पहिलीने कोणे एकेकाळी मारलेला तोच डायलॉग आठवत तिचीही आठवण येणे. यासारखे चरीत्रपटाची मजा घालवणारे प्रकार आहेत.

अशीच आणखी एक गंमत म्हणजे, जेव्हा सुरुवातीच्या चारपाच इनिंगमध्ये तो फेल जातो आणि आता पुढचा चान्स मिळेल की नाही अशी शाश्वती त्याला स्वत:लाच नसते तेव्हा त्याच्या आयुष्यात पहिली हिरोईन येते, आणि ती त्याला सांगते उद्या तुला नक्की खेळायला घेणार. आणि एवढेच नाही तर तू खेळणारही जबरदस्त. आणि मग अर्थातच तसे होतेही. पण आता त्याला घ्यायचे आणि ते देखील पुढच्या नंबरवर फलंदाजीला पाठवायचे याचे श्रेय दादा गांगुलीला जायला हवे. पण हिरोईन बोल्लेली ना, मग व्हायलाच पाहिजे. अश्या प्रकारे ते चित्रपटात दाखवलेय. बॉलीवूड काही बाबतीत सुधारणार नाहीत. यापैकी हे एक. तर त्यांना ते माफ करायलाच हवे.

असो, रमतगमत चित्रपट पुन्हा त्याच्या शेवटाकडे म्हणजे विश्वचषक २०११ च्या फायनलपर्यंत येतो. ते परीक्षणात सांगायची नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे. पण जेव्हा धोनी सिक्स मारत भारतातल्या तमाम क्रिकेटरसिकांना एकाच वेळी येडे करून सोडतो. तेव्हा धोनीचा सर्वात पहिला कोच छातीवर मूठ आवळत इशार्‍याने म्हणतो, हा माझा बच्चा आहे. बस्स वो दिल को छू लेने वाला मूमेंट था...

मला कल्पना आहे की मी स्वत: फार उशीरा पाहिला आणि परीक्षणही आता तुलनेत उशीराच आलेय. पण एकूण गोळाबेरीज करता जर तुम्ही वर्षाला मोजकेच चारपाच हिंदी चित्रपट बघत असाल तर त्यात हा बघायला हरकत नाही. क्रिकेट समजणे न समजणे, धोनी आवडणे न आवडणे (असेही असतात का?) या गोष्टी दुय्यम आहेत. पण एक यशस्वी स्ट्रगलस्टोरी म्हणून या सत्यकथेचे मूल्यांकन नक्कीच पाचात पाच आहे. परीक्षण रेटींगचे स्टार द्यायचे ठरवले तरी ते पावणेचार आहे. आणि आता वाजलेतही रात्रीचे सव्वादोन आहेत ..
तर शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज
मुश्कील वक्त, धोनी सख्त!
- आपलाच ऋन्मेष Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडला हा चित्रपट.

हा चित्रपट बघताना शाळा- कॉलेजात धोनीसोबत फुटबॉल आणि थोडे क्रिकेट खेळलेला एक मित्र सोबत होता. प्रत्येक सीनसोबत त्याची कॉमेंट्री ऐकायला मजा आली.

साक्षीसोबतचे औरंगाबादचे सीन बघताना पण गम्मत वाटली.

प्रॉडक्षन हाऊस 'इन्स्पायर्ड एंटरटेनमेंट' हे ऋती स्पोर्ट्सचंच एक बाळ आहे.
ऋती स्पोर्ट्समधे अरूण पांडे सोबत धोणी पार्टनर आहे.
म्हणजेच हा सिनेमा पार्शली धोणी नी स्वतःच प्रोड्यूस केलाय.

गेल्या काही वर्शांचा फॉर्म अन श्रीनिमामांची गच्छंती पहाता कारकीर्द संपायच्या आधी पॉप्युलॅरिटी एनकॅश करायसाठी हा सिनेमा आत्ताच रिलीझ केला असं वाटतं
आणि म्हणूनच विशेश कुठल्याही वादग्रस्त मुद्याला डायरेक्ट हात न घालता 'जय धोणी' अ‍ॅप्रोच घेऊन ही अनटोल्ड स्टोरी संपते

अँकी पण त्यात धोनी चा सहभाग, निर्माता म्हणूनही रोल होता हे कोठे लपवलेले नाही. रीडिफ वर बातम्या बघितल्याचे लक्षात आहे. त्याने लोकप्रियता एन्कॅश करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यात काही गैर वाटत नाही.

गाणी मलाही आवडली. नेहमीसारखी फॉरवर्ड करावीशी वाटली नाहीत Happy

फा,

गैर मुळीच नाही. पण वरती ज्या कॉमेंट्स होत्या की रिटायर व्हायच्या आधीच का काढला सिनेमा त्या अनुषंगानी लिहिलं होतं.
तसंच तो स्वतः प्रोड्यूसर असल्यामुळे वादग्रस्त विषय फारच थोडक्यात गुंडाळलेत, त्यात डिरेक्टर, स्टोरी रायटर वगैरेंना दोष देता येणार नाही.

स्वता प्रोड्युसर नसता तरी काही गोष्टी त्याच्या संमतीने वा त्याला विचारूनच झाल्या असत्या ना. वादग्रस्त विषय घ्यायला त्याने परवानगी नाकारली असती तर ते चित्रपटात दाखवणे शक्य असते का? ही एक जनरल शंका समजा

फारेण्ड, @ फल्लर्ट, सर्वांनाच नाही जमत फ्लर्टींग. ती एक कला असते. तसेही ते टिका करायच्या हेतूने नाही तर गंमतीने झालेच तर कौतुकानेच लिहिलेले.

@ लव्हईस्टोरी, तर ते कोणाला जास्त वाटू शकते तर कोणाला कमी.. कोण काय अपेक्षा ठेवून चित्रपट बघायला गेले असेल त्यावर हे अवलंबून आहे. बाकी जी दाखवली ती लव्हस्टोरीचे निकष लावता चांगली होती. पण मला त्याजागी, ती कमी करून काही दौर्‍यावरचे, ऑनफिल्ड ऑफ फिल्ड हलकेफुलके ईंटरेस्टींग किस्से बघायला आवडले असते. आयपीएल वगैरे दाखवले नाही हे मात्र चांगलेच केले. ते बोअर प्रकरण आहे. बेसिकली मी त्याकडे क्रिकेट म्हणून बघत नाही. मग त्यापेक्षा लव्हस्टोरी परवडली.

पण मला त्याजागी, ती कमी करून काही दौर्‍यावरचे, ऑनफिल्ड ऑफ फिल्ड हलकेफुलके ईंटरेस्टींग किस्से बघायला आवडले असते मलाही.. त्याचे ईतर खेळाडूंसोबत कसे संबंध होते किंवा दौर्‍यावरचे ईंटरेस्टींग किस्से हवे होते..

आयपीएल वगैरे दाखवले नाही हे मात्र चांगलेच केले. ते बोअर प्रकरण आहे. बेसिकली मी त्याकडे क्रिकेट म्हणून बघत नाही.>>> तुझा शाहरुख तिकडे आहे तरिही?

सुलू, ते क्रिकेट म्हणून बघायला बोअर आहे. पण मनोरंननाचा कार्यक्रम म्हणून दरवेळी हौसेने बघतोही. हाडामासांरक्ताने मुंबईकर असल्याने मुण्बई ईंडियनचा सपोर्टर आणि शाहरूखमुळे कलक्त्याबद्दल हळवा कॉर्नर.. धोनी आवडता क्रिकेटर असला तरी त्याचे आयपीएलमधील कामगिरीचे कधी कौतुक केले नाही. मात्र तिथेही त्याने झंडे गाढलेत हे खरेय.

आयपीएल मधे त्याने मॅचेस खेचलेल्या काही व्हेगली लक्षात आहेत पण काही स्पेसिफिक लक्षात राहण्यासारख्या असतील तर लिन्क दे. मी इंटरनॅशनल लक्षात ठेवतो तितक्या आयपीएल वाल्या लक्षात नाहीत. त्या बोअर आहेत असे नाही पण खूप एकतर्फी आहेत (बॅटिंग बद्दल) आणि सतत पाहायला बोअर होतात. कारण तेवढा ड्रामा नसतो त्यात. दोन संघांमधला किंवा दोन तुल्यबळ खेळाडूंमधला सामना बघण्यात जी मजा आहे ती नुसती धुलाई बघण्यात नाही. एखाद दुसरा अपवाद म्हणजे स्टेन ने एकदा गेल ला नाचवला होता जरा बोलिंग फ्रेण्डली पिच मिळाले तेव्हा.

एनीवे, अवांतर होईल म्हणून जाउदे. लिन्क असेल तर दे.

या पिक्चरची गाणी मात्र पुन्हा ऐकली २-३ वेळा. फिर कभी आणि ते जाने की बात ना करो दोन्ही.

फारेण्ड पटकन आठवणारी तर यावेळचीच शेवटची .. शेवटची फडफड Proud

बाकी एक चटकन आठवतेय ती शोधतो ज्यात त्याने धडाकेबाज खेळी करत अंतिम चारात पोहोचवलेले. जो चेन्नईचा कायम जाण्याचा रेकॉर्ड आहे तो अबाधित ठेवलेला..

फारेण्ड
हि लिंक वरच्या मॅचची

लास्ट ओवर धमाका.. मस्ट विन सिच्युएशन .. जिंका नाहीतर घरी जा..

https://www.youtube.com/watch?v=OxuelxelhMg

पुढे चेन्नईनेच ती आयपीएल सुद्धा मारली ... आणि त्यामुळेच चॅम्पियन ट्रॉफीत स्थान मिळवत ती सुद्धा जिंकली Happy

आणि इथे यावेळची... नक्की बघ बघितली नसल्यास.. यातच आधी एक श्रीलंकेसोबतची लास्ट ओवर बोनस आहे.. ती देखील कमाल.. लास्ट विकेटला घेऊन

https://www.youtube.com/watch?v=_3gU7lUCezQ

जर तुम्ही धोनीचे एक टक्का जरी फ्यान असाल तर हा खालचा विडिओ तुमच्या डोळ्यातून पाणी काढल्याशिवाय राहणार नाही ...

https://www.youtube.com/watch?v=XeDZCioVibM

त्या उदारतेची लिंक द्यायची गरज नाहीये फा, ती आमच्या शाळाकॉलेजच्या जमान्यपासून वर्ल्डफेमस आहे.
धोनीचा विडिओ फिल्मी वाटेल खरा, पण शेवटी ती सत्य घटना असल्याने भिडतेच..
म्हणून लिंक मुद्दाम धोनीच्या धाग्यावर न टाकता त्याच्या पिच्चरच्या धाग्यावर शेअर केली

Pages