स्वप्नातलं भविष्य (भाग १ ला )

Submitted by मिरिंडा on 5 October, 2016 - 05:45

सकाळचे अकरा वाजत होते. उघड्या दरवाजावर जोरजोरात कुणीतरी थाप मारीत होते. रेखा, नैनाला लहानशा बाऊल मधून चहात बुडवलेला पाव खायला घाळीत होती. दारावरच्या थापा चालूच होत्या. म्हणून तिने पार्टिशनच्या बाहेर आपले डोके तिरके करून पाहिले. तर काय ? घरमालक शितोळे दरवाजा वाजवीत होते. डोक्यावर पांढरी टोपी , अंगात जुन्या पद्धतीचा सदरा आणि धोतर असा त्यांचा पेहराव होता. रेखा, हातातला बाऊल बाजूला ठेवून पदराला हात पुशीत , शक्यतोवर आवाजात मार्दव आणीत म्हणाली, " काय झालं काका ? " असं विचारल्यावर शितोळ्यांचा पारा अधिकच चढला. आधीच लाल गोरा असलेला म्हातारा, रागाने पिवळा होत म्हणाला, "काय झालं ?.... मसणात गेला तुझा काका. अगं , काही शरम वगैरे काही आहे की नाही ? सहा महिने झाले. भाड्याची एक कपर्दिकही दिली नाहीस आणि विचारतेस काय झालं.?.... आं ?..... तुला काय वाटलं.? हा शितोळे जगाच्या अंतापर्यंत वाट पाहील? आं ?...... का गं ? बोल ना. "रेखाने मान खाली घातली. काकांची बडबड चालूच होती. पाव खाऊन झालेली दोन वर्षांची नैना अंगातल्या बुजरट फ्रॉकला हात पुशीत आई जवळ येऊन उभी राहिली.

"आत्ताच्या आत्ता मला मला भाड्याचे तीनशे रुपये तरी पाहिजेत.. आहेत का ? नाही तर , हो बाहेर , त्या पोरीला घेऊन . केवळ भावे अण्णाकडे पाहून मी इतके दिवस गप्प बसलो. तुला, काय वाटलं? मी काय विधवा आश्रम उघडलाय ?. नवरा गेला म्हणून मी काही बोललो नाही. , चल , चल बाहेर हो त्या पोरीला घेऊन. " शितोळे परत परत तेच तेच बडबडत होते. बाई माणूस म्हणून त्यांना तिला शिव्याही देता येत नव्हत्या. त्यांचा राग तिला समजत होता. अविनाश असतांना म्हातारा अगदी चहा वगैरे घेऊन जायचा. पण तेव्हा कधी भाडं थकलं नव्हतं. माणसं एकदम कशी सगळं विसरतात ? तिच्या मनात आलं. घाबरून नैना आईला बिलगली. रेखा म्हणाली, " काका, दोन दिवसात अण्णा येतील . मी त्यांना सांगून करते पैशाची व्यवस्था. " कपाळावर आलेला घाम पुशीत ती अजिजीने म्हणाली. पण शितोळे कसला ऐकतोय ? त्याला चेव आला. " ते काही नाही. त्या पोरीला घे आणि बाहेर हो. ... हो बाहेर. चाळीत माझा कायदा चालतो. काय समजलीस ."दाराबाहेर बघ्यांची गर्दी जमली. पण कोणी मध्ये पडलं नाही. चाळ रस्त्यावरच होती. रेखाने पाहिलं आज काही खरं नाही. म्हणून तिने वळून कपाटातले कपडे काढण्यास सुरुवात केली. तशी म्हातारा तिरसटासारखा पुढे होत ओरडला, " ए, सामानाला अजिबात हात लावायचा नाही. भाड्याच्या बदल्यात मी ते ठेवून घेणार आहे. चल , नीघ इथून . "त्यांनी रेखाला हातानी धरूनच बाहेर काढायचे बाकी होते. हातातले कपडे दीनवाणेपणाने खाली टाकून नैनाचा हात धरून घरातून रस्त्यावर आली. शितोळेने ताबडतोब खोलीला कुलूप घातले. न जाणो ती परत आत आली तर ? खिशात किल्ली टाकून तो निघून गेला. चाळ बैठीच होती. शेजारच्या अण्णांच्या दाराला कुलूप होतं.

रस्त्यावर बसलेले दोन्ही महारोगी पण पाहात होते. त्यातला एकजण दुसऱ्याला म्हणाला, " च्या मायला काय थेरडा आहे. बाई माणसाला घरातून भायेर काडतोय. बघवत न्हाई गड्या. कुठं जाईल ती ? " दुसरा म्हणाला, " आपण काय करणार बाबा. आपणच भीक मागतोय. काय करणार तिच्या साठी . " पाणावलेल्या डोळ्यांनी ते हताशपणे बसून राहिले. मग त्यातल्या एकाने मिळालेली भीक मोजली. म्हणाला," जेमतेम आठ रुपये जमलेत, कर्मदरिद्री आपण . आठ रुपयात काय होतय ?. नाहितर त्या म्हाताऱ्याच्या तोंडावर पैशे फेकले असते" गेल्या सात आठ महिन्यांपासून ते दोघे त्याच रस्त्याच्या कडेला राहायचे. अविनाशच्या जाण्यापासून, रेखाच्या आयुष्यातल्या सगळ्याच घटनांचे ते साक्षिदार होते.

................. बाहेर ऊन रणरणत होते. र्रेखा नैनाला घेऊन बाहेर आली. डोक्यावरचं छप्पर तर सहा महिन्यांपूर्वीच उडालं होतं. अविनाश गेला आणि सर्वच दिशा अंधारल्या. जे काही थोडंफार सेव्हिंग होतं ते देणी भागवण्यात आणि खाण्या पिण्यात गेले होते. मध्ये अधे काही ठिकाणी कामं करून जे काही मिळत होतं. ते रोजच्या खर्चाला लागत होतं. हातात काहीच उरत नव्हतं. अविनाश एका लहानशा कारखान्यात पॅकर म्हणून कामाला होता. जेमतेम त्यांचा महिना जायचा. तीन वर्षांपूर्वी लग्न झालं. वर्षाच्या आत नैना झाली. दोघेही खूष होते. पण मुलीचं कोड कौतुक करायला पैसा कुठे होता . त्यातही ते समाधानी होते. अविनाशही जास्त पैसे देणारी नोकरी शोधण्याच्या मागे होता. पण चांगल्या नोकऱ्या अशा वाटेवर थोड्याच पडल्या होत्या.. पण दैवाला आपला जोर दाखवायला अशीच माणसं लागतात....................

अपघाताला कंपनी जबाबदार नसल्याने , अविनाशला कंपनी कडून काहीच पैसे मिळाले नव्हते. केवळ सौजन्य म्हणून सह कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढून पैसे दिले होते. ते हजार दीड हजार रुपये भरले असतील. त्यातून तिचा दैनंदिन खर्च निदान काही दिवस तरी भागला होता.तशी ती फार मोठ्या गावात राहात नव्हती. पायांना चटके बसत होते. नैनाचं बोट धरून ती दिशाहीन पणे चालली होती. आता ती दमली होती. घरापासून एका लांबच्या वळणावर असलेल्या कडुनिंबाच्या झाडाखाली ती विश्रांतीसाठी बसली. तिच्या डोळ्यांतून आसवं ओघळू लागली . पदर तोंडाला लावून मुठीत नाक पकडून ती मुसमुसू लागली. एका हातामे नैनाला तिने अधीरपणे कवटाळले. आणि तिचा बांध फुटला. आता मात्र तिच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. काही मिनिटे अशीच बसून ती सुन्न होऊन राहिली. पहिला प्रश्न तिला कुठे जायचं हा होता. अविनाशचे किंवा तिचे या गावात कोणीच नातेवाईक नव्हते. नाही म्हणायला तिची आत्या होती. पण आत्या दोन वर्षांपूर्वीच गेली होती. आत्याचं नाव मनात येताच तिला मागचं सर्वच आठवू लागलं. मनाचा वेग एवढा असतो की काही वर्षसुद्धा काही मिनिटात डोळ्यासमोरून जातात. तिचं तसच झालं.......अविनाश बरोबर तिचा प्रेमविवाह झाला होता. त्यावेळी आत्या म्हणाली होती., "रेखा अगं तू इतकी चांगली दिसतेस , तो काय आहे सांग बरं. पुरुषाचं सौंदर्य पाहायचं नसतं तरी त्याची कर्तबगारी पाहायला नको का ? असे काय पैसे मिळतात गं त्याला ? कसलं ग तुमचं प्रेम , विचार तरी करता कां गं ? " पण त्यावेळेला जग आपल्याला अगदी तुच्छ वाटत होतं. तिला त्यांची पहिली भेट आठवली. त्याने तिला रस्ता ओलांडताना एका ट्रकने उडवण्यापूर्वी बाजूला खेचलं होतं. आणि ती त्याच्या मिठीत अडकली होती. नंतर होणाऱ्या त्यांच्या गाठी भेटी जादूने मंतरल्या सारख्या होत. दोघांनाही एकमेकांना भेटल्याशिवाय चैन पडत नसे. ती त्यावेळेला मॅट्रिकला होती. तस तिला डोक चांगलं होतं. पण तिचं या सगळ्यामुळे अभ्यासातलं लक्षच उडालं. परिणामी तिला कसातरी सेकंड क्लास मिळाला. तरी आत्याला संशय आलाच होता.ती म्हणाली होती, "रेखे , तुझं लक्ष हल्ली कस कावरं बावरं आहे. काही 'चाललयं ' वाटतं. नाहीतर आजपर्यंत मार्क अगदी चांगले पडत होते. " मग मात्र तिने आत्याला लाजत बुजत सगळं सांगितलं होतं.वडील लहानपणीच वारले होते आणि आई ती पाचवीत असतांनाच वारली. तिचा सांभाळ आत्यानेच केला होता. आत्याला मागेपुढे कोणीच नसल्याने तिने भाचीला सांभाळायचं ठरवलं होतं. अविनाशबद्दल ऐकल्यावर आत्या म्हणाली होती " अगं स्व्तःच्या पायावर उभी राहायला शीक, रेखे. हा समाज मोठा वाईट आहे बघ. मी बघ कशी रंडकी आहे . चार लोकांची कामं करीत जगत आले. नेहेमीच दुसऱ्याचा आधार घेऊन जगणं वाईट आहे. निदान पुढे शिकून घे , मग तरी लग्न कर. " तिचं म्हणणं खरं होतं. आपण काही चांगल्या शिकलेल्या नव्हतो की कमावत्याही नव्हतो. पण अविनाशचं आकर्षण एवढं होतं की आपल्याला कोणाचंही ऐकायची इच्छा नव्हती. आणि आपलं स्वतःचं घर होणार ही कल्पनाच रम्य होती. दोन वर्षांपूर्वी आत्याही सोडून गेली होती. " आई कुठे जायचं आपण ? " नैनाने तिला गदागदा हालवीत विचारले. आणि ती भूतकाळाच्या विळख्यातून बाहेर आली. नैनाच्या निरागस चेहऱ्यावर हात फिरवीत तिला जवळ घेत म्हणाली, "मी आहे ना ?.... मी करीन बरं काहीतरी. " पण ती काय करणार होती ? नैना तिला बिलगली. तिच्या मनात आलं. नैना एवढी छोटी , पण तिलाही काय झालय याचा अंदाज आला असावा. नाहीतर तिने पण घरी जायचय म्हंटलं असतं.

मग तिला एकदम प्रभा मामाची आठवण झाली. गावापासून लांब एका बाजूला प्रभामामाचं घर होतं. घर कसलं प्रचंड वाडाच म्हणा ना. एवढ्या मोठ्या वाड्यात तो एकटाच भुतासारखा राहायचा. मूळचा सावकारी करणारा मामा पैसा सांभाळून होता. बाजूच्या खेडेगावांमधून अडलेल्या लोकांना वस्तू गहाण ठेऊन तो कर्ज देत असे. आणि त्यांना पैसे फेडता नाही आले की वस्तू हडप करीत असे. त्याच्या व्याजाची आकारणी अडलेल्या माणसांना कधीच कळत नसे. दुसऱ्याला फसवण्यासाठीच त्याचा जन्म झाला होता की काय कोण जाणे. गावात, तो चोरीचा मालही विकत घेतो अशी वदंता होती. एक दोन वेळा तालुक्याच्या गावाहून पोलिसांचा छापाही पडला होता पण त्यांना काहीच सापडलं नव्हतं. म्हणून त्याची सुटका झाली. मामा आता साठीला आलेला होता. आत्तापर्यंत त्याची दोन लग्न होऊन गेली होती. पण दोन्ही ही बायका जिवंत नव्हत्या. त्याला मूल बाळही नव्हतं. गावात, मामा करणी करतो, भानामती करतो असं बोललं जायचं. पणं ते काही खरं नव्हतं. हा आता त्याच्या वाड्याच्या मागे एक माळरान होतं आणि त्यावर एक न वापरलं जाणारं कब्रस्तान होतं. त्याला लागून नदीचं पात्र जात होतं. त्यामुळे वारा भन्नाट यायचा. असल्या भारल्या सारख्या जागेमुळे मामाबद्दल नाही नाही ते प्रवाद निर्माण झाले असावेत. खरं खोटं माहित नाही. मामा तसा एक्कलकोंडाच होता. कोणातही न मिसळणारा. रेखाच्या आईचा हा दूरदूरचा भाऊ. आई त्याला राखी बांधायची. तो रेखाच्या लग्नाला आला होता. इतकच नाही तर त्याने तिला एक सोन्याची साखळी ही आहेर म्हणून दिली होती. अजूनही ती साखळी तिच्या जवळच होती.

रेखाने पटकन नैनाला उचललं आणि भराभर पावलं टाकित ती अर्ध्या तासात मामाच्या वाड्याशी पोचली. वाड्याचं गंजलेलं लोखंडी गेट दोन्ही हातांनी जोर लावून तिने उघडले. ती आत शिरली. पायऱ्या चढून ती मुख्य दरवाजा पाशी आली. वाडा चांगला दुमजली होता. तळमजल्यावरचा मुख्य दरवाजा एका चार खणी दिवाणखान्यात उघडत होता. तिथे जाड सतरंजीची बैठक होती. त्यावर शिसवी( कोरीव ) उतरत्या आकाराचं बैठ टेबल होतं. टेबलावर दौत टाक व काही कोरे कागद ठेवलेले होते. बाजूच्या भिंतीला लागून एक भलं मोठं काचेचं कपाट होतं. त्यात काही पुस्तक , जुनी दफ्तरं व बऱ्याचशा गहाणवटीच्या वस्तू होत्या. वाडा दक्षिणाभिमुख असल्याने प्रवेशदाराच्या समोरच्याच भिंतीवर कोणीतरी सांगितलं म्हणून एक मारुतीची तसबीर लावली होती. त्याखाली लाल्ररंगाने "अश्वत्थामा बलिर्व्यासो....... " हा श्लोक लिहिला होता. दरवाजा उघडाच होता. आतून कसलाच आवाज येत नव्हता. ऊन जेमतेमच आत यायचं. मामा कुठेतरी आत असावा. रेखानं दार वाजवलं आणि "प्रभामामा .... " अशी हाक मारली .

ती पुन्हा हाक मारणार तेवढ्यात प्रभामामा बाहेर आला.त्याच्या अंगावर फक्त धोतर आणि गळ्यात जानवं होतं. तुपकट चेहेऱ्याचा मामा त्याच्या हिरवट डोळ्यांमुळे लबाड वाटायचा. तो जेवढा गोरा होता तेवढाच बेरकी होता. कदाचित त्याच्या धंद्यात हा बेरकीपणा लागत असावा. त्याला सबंध टक्कल होतं आणि डोक्याच्या मागच्या बाजूला अर्धचंद्राकृती पांढरे केस होते. थोडक्यात त्याचा अर्धा चांद उतरला होता आणि अर्धा बाकी होता. थोडेसे दात पुढे असलेला मामा छातीवरचे केस कुरवाळित , तिला आपादमस्तक न्याहाळित म्हणाला, " अरे, रेखा तू ? ये. ये. .... अशी न कळवता आणि सामानाशिवाय कशी आलीस ?, काय भानगड आहे ? काय गं ? त्या शितोळ्यानी तुला बाहेर काढली कि काय ? हरामखोर लेकाचा. " रेखाच्या डोळ्यात पाणी तरारलं. ती मानेनेच हो म्हणाली. ...... ती जास्त बोलत नाही असं पाहून मामा म्हणाला., " मला वाटलचं. तरी मी तुला अविनाश गेल्यावर सांगत होतो , तू इथे येऊन राहा. एवढ्या मोठ्या वाड्यात माणसं नाहीत. पण तू ऐकलं नाहीस. तुझ्या आत्याचं तू ऐकलस . आता इलाज नाही तेव्हा मामाची आठवण झाली काय ?.... बरोबर आहे ना ? " रेखाला आठवलं. त्याला आत्या आणि आत्याला तो आवडत नसे. आत्या तिला म्हणायची, "रेखे, हा मामा बायकांकडे कसा बुभुक्षितासारखा बघतो बघ. " पण रेखाला ते पटलं नव्हतं. एवढया प्रेमाने ज्या मामाने मला सोन्याची साखळी दिली तो असा कसा असेल ? पण तिने आपलं मत स्वतः जवळच ठेवलं. आणि आज खरोखरीच मामाचाच आधार घ्यायची वेळ आली . "मी , मी आत येऊ का ? " रेखाने अधीरपणे विचारले. त्यावर मामा म्हणाला, " अगं हे काय तुझं बोलणं झालं ? तुझा मामा इतका काही निर्दय नाही(म्हणजे थोडातरी निर्दय होता). तू असं कर आजच्या दिवस विश्रांती घे. स्वैपाक कर. संध्याकाळी पाच वाजता तुला आणि हिला , काय नाव हिचं ? (रेखाने तिचं नाव सांगितलं. ) नैना ? शांतिलालच्या दुकानातून कपडे घेऊन ये. माझं खातच आहे तिथे. .. चल आत चल., मी अंघोळ करून घेतो. " असं म्हणून तो विहिरी जवळ बांधलेल्या न्हाणीघराकडे गेला.

तिने सर्व वस्तू शोधून स्वैपाक केला. तासाभरातच सगळ्यांची जेवणं झाली. मग सगळेच थोडे लवंडले. पाच वाजून गेल्यावर तिने चहा केला. संध्याकाळी ती शांतिलालच्या दुकानात गेली. मामांना गावात मामाच म्हणत असत. शांतिलालच्या दुकानात तिला अपेक्षेपेक्षा चांगली वागणूक मिळाली. मुळात ती दिसायलाही चांगली होती. मामांकडून आलेली आहे म्हंटल्यावर तिची जास्तच सरबराई करण्यात आली. शांतिलाल शेठचा मुलगा महेश जातीने तिच्याकडे लक्ष देत होता. तिला जरा आश्चर्य वाटलं. आज सकाळच्या प्रकारापेक्षा काही वेगळच अनुभवाला मिळेल असं तिला कोणी सांगितलं असतं तर तिने त्याला गाढवात काढलं असतं. खर्चाची खात्यावर नोंद करून ती घरी आली. तो दिवस तर चांगलाच गेला. मग दैनंदिन जीवन चालू झालं. वाड्याच्या वरच्या मजल्यावर सात आठ खोल्या होत्या. पण त्यांना सर्वांना कुलपं होती. अर्थातच रेखाला वर जाण्याची वेळ आली नाही. तिला उत्सुकता होती. पण तिने मामाला काहीही न विचारण्याचं ठरवलं. त्याला आवडेल न आवडेल.

रेखाचे दिवस बरे चालले होते. एक दिवस मामा म्हणाले, " रेखा मी तालुक्याच्या गावी जाऊन य्तोय. सांभाळून राहा. " सकाळी दहाच्या सुमारास मामा गेले. सबंध दिवस काय करायचं म्हणून रेखाने नळमजल्यावरच्या खोल्या आवरण्याचं ठरवलं. तळमजल्यावर स्वैपाकघर , माजघर सोडून चार खोल्या दोन पडव्या होत्या. तीन खोल्यांना कुलपं होती आणि चवथ्या खोलीला नुसतीच कडी होती. दरवाजांच्या कड्या म्हणजे दोन्ही हातानी जोर लावुन सरकवाव्या लागत. आता मामा रात्री शिवाय येणार नव्हते. इतका वेळ कसा घालवणार ? तिने कुलुपांच्या किल्ल्या शोधण्याचा प्रयत्न केला पण तिला काही त्या सापडल्या नाहीत. तिने मामांचं काचेचं कपाटपाहिलं. पण तिला काही किल्ल्या सापडल्या नाहीत. ती कंटाळली. तासभर तिचा असाच गेला. नाश्ता झाल्याने नैना वाड्यासमोरील अंगणात खेळत होती. तिची नजर अचानक भिंतीतल्या फडताळाकडे गेली. ते नुसतेच लोटल्यासारखे होते. तिने उघडताच तिला त्यात वेगवेगळ्या
किल्ल्यांचे अनेक जुडगे दिसले. सर्व भयंकर गंजलेले होते. सगळं फडताळच जुडग्यांनी भरलं होतं. आता कोणती किल्ली कशाची आणि कोणती किल्ली कशाची , काय माहीत. अंदाजाने तिने एक जुडगा उचलला. पहिल्याच खोलीला किल्ल्या लावण्यात तिचा अर्धा तास गेला. ती घामाघूम झाली. आणखीनही दोन जुडगे तिने वापरून पाहिले. पण व्यर्थ. मग पहिल्याच जुडग्यातली एक किल्ली कुलुपात किर्र आवाज करीत फिरली. पण कुलुप भलतच वफादार होतं. त्याची वरची दांडी उघडेना . ती जरा वेळ बैठकीवर बसली. मग तिने पुन्हा कुलुप ओढून पाहिलं . पन ते नुसतच हालत राहिलं. तिंने न्हाणीघरातून तेलाची बाटली आणली. कुलुपात तेल घातले. दुसऱ्या दोन खोल्यांच्या कुलपांनाही तिने तेल घातले. तिने शेवटचा प्रयत्न म्हणून दोन्ही हातांनी कुलूप ओढले. खाडकन आवाज करीत ते निघाले. आणि कोयंड्याल लटकू लागले. तिने ती कुलूप किल्ली खाली ठेवून कशीतरी कडी सरकवली. तिला वाटलं आपण हे सगळं का करतोय ? वेळ जात नाही म्हणुन असं करणं बरोबर नाही. चुकून जरी मामांना समजलं , तरी ते आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत. पन तिला आपल्या कुतुहलावर ताबा ठेवता आला नाही. कुलुप उघडलच नसतं तर गोष्ट वेगली होती. दार ढकलण्या आधी तिने एकदा नैनाला हाक मारली. पन तक्रातीच्या सुरात नैनाचा आवाज आला. " अगं मी खेळत्ये ना इथे ? मी नाही येणार आत्ता. " तिने अडीच तीन इंच जाडीचा दरवाजा सर्व जोर एकवटून ढकलला. तो खडर्र र.... आवाज करीत उघडला. एखाद्या म्हाताऱ्या माणसाला झोपेतून उठवल्यावर तो कसा तक्रारवजा किरकिर करतो तसा. आत मिट्ट काळोख होता. दारातील उंच उंवरा लक्षात न आल्याने ती खोलीत जवळ जवळ पडतच होती. पण उघडणाऱ्या दरवाजाला धरत् तिने सावरले.

जरा वेळाने डोळे आतील अंधाराला सरावले. खोलीतून एक प्रकारचा उबट हवेचा वास आला. बरोबर वातावरणातली घोडी धूळही उडली. खोलीच्या अंधूक प्रकाशात हाताच्या पंजाएवढ्या लांबीची पाल समोरील भिंतीवरून सरकत गेल्याचे दिसले. तिच्या अंगावर सर्रकन काटा आला. खोलीत पाय ठेवला पण पायाखाली धुळिचे जणू जाजम पसरलं होतं. आत दोन जुन्या पद्धतीचे लाकडी पेटारे होते. त्यांना कुलपं होती. पण आता कुलपं उघडण्याचा तिचा "पेशन्स " आता संपला होता. पेटाऱ्यांवर एक दोन गुंडाळलेली आणी लक्तरं झालेली जाजमं ठेवली होती . ती किती मोठी होती याचा तिला अंधारामुळे अंदाज आला नाही. तिच्या डाव्या हाताच्या भिंतीवर एक खिडकीवजा भाग दिसला. पण तो वर्षानुवर्षे बंद होता. खोलीच्या कोपऱ्यात काही काठ्या पडल्या होत्या. पण ते नक्कीकाय होतं कळेना. नाकावर पदर धरून ती बाहेर आली. पुन्हा सगळा जोर एकवटून तीन ए दरवाजा लावून घेतला. कशीतरी कडी सरकवून कुलुप लावले आणि हाताला लागलेला गंज आणि धूळ पुशीत ती दिवाणखान्याच्या बैठकीवर बसली. तिच्या मनात आलं कशाला दुसरी खोली उघडायला जायचं ? ..............मग तिने जेवण केलं. नैना आणि ती जेऊन अंथरूणा वर लवंडली. तिला झोप येत नव्हती. एक प्रकारची पोकळी तिच्या मनात निर्माण झाली. मामांकडे येऊन आपण काय करतोय ? आपल्याला निदान काम तरी शोधायला पाहिजे. पुढच्या आयुष्यात आपण काय करणार आहोत ? धेय्यहीन आयुष्य जगणं तिला अस्वस्थ करू लागलं . त्या विचारातच तिला डुलकी लागली.

"पो स्ट म न " या आवाजाने तिला खडबडून जाग आली. पुढच्या दाराशी उभ्या असलेल्या पोस्टमनने तिला एक बंद पाकीत दिले. तो निघून गेल्यावर ते पाकीट फोडावं की नाही या संभ्रमात ती थोडावेळ विचार करीत राहिली. अखेर तिने ते फोडण्याचे ठरवून मामांची माफी मागण्याचे ठरवले. पाकिटातून एक चिठ्ठीवजा पत्र निघाले. कोणीतरी सुहास नावाच्या मुलाने ते लिहिले होते. ते वाचल्यावर तिला कळलं की सुहास मामांचा सख्खा भाचा होता. आणि त्याला दुबईला नोकरी लागली होती. पण जाण्याआधी तो मामांना भेटाय्ला येणार होता. तिला कळेना काय कराव ? कोणीतरी येतय. आपण , आपली काय ओळख करून देणार आहोत ? कोण जाणे . तिने ते पाकीट लिहिण्याच्या टेबलावर ठेवून दिले. नंतार तिच्या लक्षात आलं की नैना अजून झोपलीच आहे. मग तिच्या मनात आलं की आपण आता कुलुप न लावलेली खोली उघडून पाहावी. तिने आधी तोंड धुऊन घेतलं. दुपारचे साडेतीन होत होते. उन्हाची धाप तशी वाड्यात लागत नव्हती. पण बाहेर दिसणाऱ्या लख्ख उजेडावरून तिने अंदाज बांधला. वाऱ्याचं नावही नव्हतं. एवढा मोठा वाडा पण वाड्यात वीज नव्हति. किंबहुना ती गावात अगदी मोजक्याच ठिकाणी होती. तिने घटाघट पाणी प्यायलं.

आता ती कुलुप नसलेल्या दाराकडे गेली. तेही तितकच जाड होतं. बराच जोर लावल्यावर गंजलेली कडी एकदाची सरकली. हाताला पडलेल्या वळांची कळ सहन करीत ती काही सेकंद थांबली. तिने परत बाहेर्रील मुख्य दरवाजाचा कानोसा घेतला. बाहेरून कोणताच आवाज येत नव्हता. दरवाजा आणि गेट उघडं असलं तरी कोणिही येण्याची शक्यता नव्हती. मामांचा वाडा भुताटकीचा वाडा म्हणून गावात प्रसिद्ध होता. तरिही तिने मुख्य दरवाजा जरालोटून घेतला. मग तिने खोलीचा दरवाजा जोर लावून रेटला. यावेळी मात्र ती पडली नाही , तर सावधपणे बाहेर उभी राहिली. ही खोली पण मघाच्याच खोली एवढी मोठी होती. थोडी लांबोडकी होती इतकेच. खोलित एवढं अंधूक दिसत होतं. की आत जायल कोणालाही भीती वाटली असती. तरीही तिने उंबऱ्यावरून आतल्या धुळित पाय टाकला. आणि डोळे विस्फारून पाहू लागली.... काय होतं तिथे ? ... कोपऱ्यात एक उंच स्टूल होतं. त्यावर एक सिमेंटचं घमेलं होतं. बाजूला कुदळ , फावडी, विटा , वगैरे पडलेलं होतं. एक प्रकारचा चुन्या सारखा तीव्र वास येत होता. खोलीला खिडकी नव्हती. पण थंड हवा येत होती. " कुठून ? " तिने स्वतःशीच शब्द उच्चारला . मानवी शब्द बहुतेक बऱ्याच वर्षात प्रथमच उमटला असावा. तिचे डोळे आता अंधाराला सरावले . त्यात तिने तिच्या पासून दोन तीन हात दूर असलेल्या भिंतीकडे पाहीले. भिंतीला केव्हातरी ऑइल पेंट दिला असावा. त्याचे ओघळकाळाच्या ओघात करपटले होते. मूळ रंग काय असावा याचा अंदाज येत नव्हता. आपण मेणबत्ती तरी आणायला हवी होती. तिला जाणवून अस्वस्थ वाटले. गम्मत म्हणजे भिंतीतच एक दरवाजा होता. आता आणखीन एक खोली आहे की काय ? सरावलेल्या प्रश्नानंतर अचांनक कठीण प्रश्न समोर यावा तसे. तिने जवळ जाऊन दरवाजाला हात लाव न पाहिले. आश्चर्य म्हणजे त्याच्यावरची कडी हालली आणि तो आपसूकच बाहेरच्या बाजूला उघडू लागला. अडखळणारा आवाज करीत तो निर्जिव माणसासारखा सताड उघडला. .... बाहेरील प्रकाश तिच्या डोळ्यावर अचानक आल्याने , प्रथम तिने डोळे मिटले आणि काही सेकंदातच उघडले.

तिच्या तोंडावर थंड गार वारा येऊ लागला. आस्ते आस्ते वाऱ्याचा वेग वाढला. मग ती थोडी भानावर आली. तिने आता त्या प्रकाशात मागे वळून पाहिले तर तिच्या डाव्या हाताच्या भिंतीतून वर जाणारा तोंड उघडलेल्या माणसासारखा एक जिना तिला दिसला.मघाशी खोलीत आलेला वारा जिन्यावरून येत होता तर. ती स्वतःशीच पुटपुटली. तिने आता नवीन दाराच्या बाहेत डोके काढून समोर वाकून पाहिले. ........ ‍खडकाळ माळरानासारखा भाग तिला दिसला. अर्धवट सुकलेले पिवळे गवत आणि लहान ल्हान वड पिंपळाची झाडे याखेरीज तिला तिथे काही दिसले नाही. पण तोपरिसर आपण कुठेतरी पूर्वी पाहिला असल्याचे जाणवले. मग तिने परत फिरण्यासाठी मान वळवली. आणि तिला खोलीच्या पहिल्या दारात मामांची आकृती दिसली. तिच्या अंगाला घाम फुटला .

(क्र म शः )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद.....नविन कथा सुरुकेल्याबद्द्ल...!!! तुमच्या कथान्ची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो....!!!