संगीतक हे नवे - कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद

Submitted by कविन on 14 September, 2016 - 03:46

सीन:
गणपती विसर्जनाचा दिवस.... स्टाफ़ गेलाय सुट्‍टीवर..... आदमी १ टेबल ३ ..बहोत नाईंसाफी है रे भाय! पर करे क्या...नाईलाज को क्या ईलाज... काम देई दाम आणि दाम करी काम च्या चक्रात अडकलेय ही दुनिया.... त्यातुन बॉस माझा पक्का बनिया. काम तर व्हायलाच हवं, घरीही लवकर जायलाच हवं. काय बाई करु? कस्सं मी करु? काही कळेना ..मला सुचेना

मला जायचऽऽय लवकर
साऽहेब म्हणतोऽऽ काम कर
असिस्टंट गेलाऽऽय सुट्‍टीवर
शिपाई पडीकऽ व्हॉटस ऍप वर

सीन: साहेबाची इमेल आली...वाचून माझी त्रेधा उडली..केबीन मधे लगोलग फ़ाईल घेऊन स्वारी गेली.

सायबाचं एकच टुमणं..

साहेब म्हणतो काम कर
मी म्हणते कशी मी करु?

काम कर ग कविन, कर ग कविन

कशी मी करु?

वेस्टर्नचा, हार्बरचा स्टाफ़ नाही आला
मदत नाही मला, कशी मी करु?

काम कर ग कविन, कर ग कविन

कशी मी करु?

या प्रिंटरचा, त्या स्कॅनरचा
एरर येतोय मला
कशी मी करु?

काम कर ग कविन, कर ग कविन

कशी मी करु?

.
.

अशा सगळ्या अडचणींचा
हिशोब त्याला देऊन झाला
नुकत्याच झालेल्या ले ऑफ़चा
त्याने एकदा पाढा वाचला

साहेबाच्या केबीन मधून आले बाहेर
पण डोस्कं काही चालेना
काय करु कळेना
साहेब सबब ऐकेना

साहेब देतो एकच नारा
आधी काम पुर्ण करा

आलीया भोगासी असावे सादर
साहेबाला दयावाच लागतो आदर

धरा फ़ेर द्या ताल
लेऑफ़च्या लिस्टीत नैतर जाल

कामाचा वाजतोय सारखा बझर
मदतनीसही नाही हजर
लवकर जायचय म्हणून माझी
घड्याळावर सारखी नजर

(साहेबाला गेले मी विनवायला
लवकर जायचय मला घरला
संभाषण आमचं असं झाल
झालं तस्सच इथे मी दिलं)

साहेऽब! आज लवकर जाऊ का घरी, जाऊ का घरी
गणपती जायचेत गावाला, गावाला

क्लायंटला "कोट" पाठव ग कविन,पाठव ग कविन
मग जा तू घरच्या कामाला, कामाला

क्लायंटला "कोट" धाडला हो साहेब, धाडला हो साहेब
आता तरी जाऊ का मी घरला? मी घरला

क्लायंटची ऑर्डर घे ग कविन, घे ग कविन
मग जा तू घरच्या कामाला, कामाला

क्लायंटची ऑर्डर घेतली हो सोहेब, घेतली हो साहेब
आता तरी जाऊ का मी घरला? मी घरला

क्लायंटला रिसीट पाठव ग कविन, पाठव ग कविन
मग जा तू घरच्या कामाला, कामाला

रिसीट पण इमेल केली हो साहेब, केली हो साहेब
आता तरी जाऊ का मी घरला? मी घरला

ऑर्डर कुरीयर कर ग कविन, कर ग कविन
मग जा तू घरच्या कामाला, कामाला

ऑर्डर कुरीयर केली हो साहेब, केली हो साहेब
आता तरी जाऊ का मी घरला? मी घरला

क्लायंटला फ़ोन लाव ग कविन, लाव ग कविन
मग जा तू घरच्या कामाला, कामाला

क्लायंटला फ़ोन लावला हो साहेब, लावला हो साहेब
आता तरी जाऊ का मी घरला? मी घरला

आणा लीव नोट, करतो साईन
जाऊद्या घरी कविनला, कविनला

आणली लीव नोट, घेतली साईन
गेली पण घरी कविन, कविन

---------

आड बाई आडवणी
ऑफ़ीसचं काम करोनी
साहेब खातो सुपारी
कविन निघाली दुपारी

आड बाई आडवणी
ऑफ़ीसचं काम करोनी
साहेबाने कामाला जुंपलं
संगीतक आमचं संपलं

---------

आता तुम्ही म्हणाल या सगळ्यात आम्हाला काय मिळालं?
तुमचा संगीतक भोंडला रंगला पण खिरापत कुठ आहे?

मग अस्सं नाही बा विचारायचं. तुम्हीही गाण्यातच विचारायचं अस्सं...

आड बाई अडवणी
ऑफीसचं काम करोनी
ऑफीसला केलस बाय गं
खिरापतीला काय ग?

मग घ्या तुमच्या खिरापती इथून

खूष का खिरापत खाऊन? Wink
मग मला निवडा बरका वोट देऊन Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Lol