मायबोली मास्टरशेफ - adm- व्हेजिटेबल एम्पनाडा (Empanada)

Submitted by Adm on 11 September, 2016 - 10:22

इथल्या टेकोबेल नावाच्या मेक्सिकन फास्टफूड चेनमध्ये अ‍ॅपल एम्पनाडा मिळतात. मध्यंतरी त्याबद्दल वाचताना कळलं होतं की त्याचा बीफ असलेला प्रकारही मेक्सिको आणि इतर लॅटीन अमेरिकन देशांमध्ये केला जातो. घरच्या गणपतीसमोर बरीच सफरचंद आली. ते संपवण्यासाठी एम्पनाडा करावा का असा विचार केला पण आधीच घरत खूप गोड आहे, त्यामुळे तो बेत रद्द केला. पण मग त्यावरून नियमांत बसणारा तिखटामिठाचा एम्पनाडा करायचं सुचलं.

साहित्यः
१. १ कप मैदा
२. १ मोठा (इथे अमेरिकेत मिळातो तेव्हडा मोठा) टाटा. (उकडून)
३. ४ पाकळ्या सूण
४. ऑलिव्ह ऑइल.
५. १-२ हिरव्या मिरच्या
६. १ मोठा चमचा दही.
७. अर्धा टीस्पून बेकिंग पावडर
८. लिंबाच रस किंवा आमचूर पावडर.
९. हवी असेल तर हळद.
१०. चवीप्रमाणे मिठ
११. चिमुटभर साखर.
१२. ३/४ कप पाणी.

कृती:
आवरणासाठी:
१. मैदा, पाणी, बेकींग पावडर, दही, मिठ आणि साखर एकत्र मळून घ्यावं आणि त्याचा पुर्‍यांसाठी असतो तश्या जाडीचा गोळा करावा.
२. गोळा ओल्याफडक्याने अर्धा तास झाकून ठेवावा. मूळ कृतीत अंडं होतं पण त्या ऐवजी मी दही घातलं.

सारणासाठी:
१. तव्यावर किंवा भाजीच्या भांड्यात दोन चमचे ऑलिव्ह ऑईल गरम करावं.
२. त्यात लसूण एकदम बारीक चिरून घालावा.
३. लसूण डार्क ब्राऊन झाला की त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावे. लसूण हा मुख्य घटक असल्याने त्याची चव यायला हवी. त्यामुळे बाकी कुठलेही हिरवे मसाले (आलं, पुदीना वगैरे) घालणं टाळलं आहे.
४. वरून उकडलेल्या बटाट्याचे तुकडे घालावे.
५. लिंबाचा रस घालून खरपूस पेक्षा थोडं कमी परतून घ्यावं.

१. मैद्याच्या गोळ्याच्या पुरीसारख्या लाट्या करून घेऊन त्या लाटाव्या.
२. अर्ध्या भागात सारण भरून दुसरी बाजू बंद करावी.
३. करंज्यासारख कातून घ्यावं किंवा फोर्कने टोचावं.
४. तेलात दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर तळून घ्यावं.
५. केचप, हिरवी चटणी, लालचटणी कश्याही बरोबर खायला घ्यावं.

गरमागरम, स्वादिष्ट, चविष्ट, खुसखुशीत* एम्पनाडे तयार !!!

तळटीपा:
१. अजून थोडा 'म,य,ब,ल' पणा करायचा असेल तर सारणात याम घालावा. टर वर शॅलो फ्राय करावं किंवा बेक करावं.
२. * ह्या विशेषणांमध्ये 'पारितोषिकप्राप्त' असं लिहायची फारफार इच्छा आहे. तेव्हा भरभरून मतं द्या!
३. सारणाच्या घटकांमध्ये कुठल्याही भाज्या, चिकन, खिमा, आपलं ते हे काहीही वापरू शकता.
४. घरच्या सदस्यांनी 'ह्यॅ ! ह्यातर साध्या बटाट्याची भाजी भरलेलया करंज्या!! " असं म्हणून तुक टाकले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना एम्पनाडाबद्दल अधिक माहिती देत रहावं!

फोटो:
तळण्याआधी
Empanada_Before.jpgEmpanada_Fried.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्यॅ ! ह्यातर साध्या बटाट्याची भाजी भरलेलया करंज्या!! >>
म्हणणं तुमचे रास्तं हाय, पण बटाटा वडा नायतर समोसेच खाल्लेत असे, एम्पनाडे ऐकले पण नाय कदी. त्यात म, ब, ल हायत.. त्यामुळे बेस्टंच! आल द बेष्टं.

सुबक दिसत आहेत Happy एखादा मध्ये फोडून , कापून सारणाचा फोटो असलेला नाही का?

पारंपारीक रेसिपीत बाहेरच्या सारणात भरपूर बटर/लार्ड घालून एकदम खुसखुशीत करतात. हे अगदी हेल्दी व्हर्जन दिसत आहे.

तळलेल्या करंज्या छान तोपासू दिसत आहेत. तळायच्या आधीचे बैलाच्या पोटासारखे दिसत आहेत.
शीर्षकातही करंज्या उर्फ ... असे नाव द्यायचे होते. क अक्षरावरून सुरू होणारे हिट जाते आपल्याकडे Happy

मस्त दिसतायत.
अरे पण किसलेलं चीज घातलं नाही का एम्पनाड्यात Happy घरचे लोक करंज्या म्हणतील नाय तं काय Proud
यातच हि. मिर्च्यांऐवजी हालापिनो + किसलेलं मेक्सिकन चीज, हवं तर टॅको सीझनिंग चवीला- असेही काँबो मस्त लागेल !!

मस्त दिसत आहेत करंज्या! Wink

त्या करंज्या फोडून फोटो दाखव की पग्या. त्याशिवाय त्यात बटाटा-लसूण भरलाय की गूळाचुनाचं सारण हे कसं कळणार? Wink

मूळ अ‍ॅपल एम्पेनाडाची कृती/ लिंक दे, उत्सुकता आहे त्या पदार्थाबद्दल.

छान पाकृ.

बैलाच्या पोटासारख्या>> काय काय सुचतं रे तुला!! वाचल्यावर खरंच तश्या दिसायला लागल्या >>>>>>>> Lol

भारीच की आदमा. अव्वा खुश झाली का? Wink

असो. तर मटाराच्या करंज्याऐवजी बटाटा घातलेले सारण घातल्यावर एम्पनाडा बनतोय व्हय. घरी सांगतो.

चांगल्या दिसतायेत करंज्या. 'ब' मुळे बटाटा घालावा लागलाय वाट्ट. नाहीतर बरंच काही घालता येईल.

त्या सफरचंदांचं काय केलं मग? Proud

मस्त दिसत आहेत करंज्या. पिकनिकला न्यायला अजून एक पदार्थ. पुरी आणि बटाटा भाजीसाठी वेगवेगळा डबा नको. कुणाचं काय तर कुणाचं काय! Proud

सफरचंदाचे एंपनादे वेगळेच लागत असणार. सफरचंदाचा हलवा करून भरायचा का?

सगळ्यांना धन्यवाद! Happy

बैलाच्या पोटासारख्या >>>> काहीही.. Lol

त्या करंज्या फोडून फोटो दाखव की पग्या >>>>> सशल आणि मंजूडी, झाकलेली मुठ आपली करंजी राहू देत की तशीच.. Wink
रच्याकने, तसे फोटो काढलेले नाहीत. आता ह्या आठवड्यात पुन्हा करणं शक्य नाही. त्यामुळे तुम्हीच करा आणि पोटफोडे फोटो काढून इथे टाका. मी बक्षिस मिळाल्यावर तुमच्याबरोबर शेअर करेन. Proud

कुणाचं काय तर कुणाचं काय! >>>> Proud

सफरचंदाचा हलवा करून भरायचा का? >>>> हो, सफरचंद, बटर , सारख आणि सफरचंद अगदी मिट्ट गोड असतील तर थोडा लिंबाचा रस ह्यांचा लगदा करायचा आणि भरायचं. सफरचंद अगदी पूर्णा शिजवायची नाहीत. किंचित करकरीत रहातील असं बघायचं. लवंग, दालचिनी ह्यांचा स्वादही चांगला लागेल.

मै, चीज संपलं होतं नव्हतं नेमकं. अ‍ॅलॅपिनोजची आयड्या छान आहे. पुढच्या वेळी.

त्या सफरचंदांचं काय केलं मग? >>>> ती सफरचंद कोणाकोणाला वाटली. थोड्यांच कस्टर्ड केली. थोडीफार खाल्ली. थोडी अजून आहेत.. Happy

'ब' मुळे बटाटा घालावा लागलाय वाट्ट.>>>> हो.. नियमांत बसवण्यासाठी. तळटीपेत लिहिलं आहे ना.

इकडे गुंगला होतास त्यामुळेच यंदा यूएस ओपनचा धागा काढला नाहीस ना!! >>>>> धागे बंद केलेत रे सध्या.. ते जागते ठेवायला वेळ मिळत नाहीये.

छान आहे पदार्थ. हालापिनो + किसलेलं मेक्सिकन चीज घालून करुन पाहाणार. मैद्याच्या आवरणाचा खटाटोप करण्याऐवजी पफ पेस्ट्रीजचे करुन बेक करणार. (चीज+लसूण चे पॅटीस )

पराग, घरी जर वॉफल आवडत असतील तर, उरलेल्या सफरचंदाचं टॉपिंग करता येईल.

सफरचंद (सालं काढून, बारीक तुकडे करुन ) किंचित तुपावर परतायची . त्यात ब्राऊन शुगर घालून सुट्लेलं पाणी बर्‍यापैकी आटवायचं. गॅस बंद करुन सिनॅमन पावडर टाकायची. वॉफलवर टाकून खायचं. चिल्लर पार्टीचा आवडता ब्रे फा आहे.

Pages