क्रीडाक्षेत्राबाबत दोन प्रश्न

Submitted by बेफ़िकीर on 21 August, 2016 - 05:51

विविध खेळांबाबत मनात नेहमी एक संभ्रम निर्माण होतो. आपल्या देशात क्रिकेटचे वेड आहे. हळूहळू इतर खेळही लोकप्रिय होऊ लागलेले आहेत. हॉकीमध्ये आपण दिग्गज होतो / आहोत वगैरे!

रिओ ऑलिंपिकमध्ये दीपा - साक्षी - सिंधू ह्यांनी यशाची चढती कमान दाखवली. सगळा देश भावनिक झाला वगैरे! मग अचानक चर्चा सुरू झाली की ह्या खेळाडूंना शासनाकडून आधी कुठे काय मिळाले वगैरे! म्हणजे प्रोत्साहन, भत्ते, ह्याबाबत एकंदर उदासीनताच होती असे म्हंटले जाते. त्याही परिस्थितीत ह्या खेळाडूंनी अशक्यप्राय कामगिरी करून दाखवल्यामुळे ते हिरोही ठरतात आणि ते रास्तही आहेच. त्या कामगिरीनंतर त्यांना शक्य ते उच्च पुरस्कार देऊन गौरवले जाते. त्यांचे उत्पन्न बेसुमार वाढू लागते. ते अनेक नवीन खेळाडूंसाठी आदर्श ठरतात.

पण मला असा प्रश्न पडतो की एकुणच खेळ आणि देशभावना हे एकमेकांत इतके गुंफलेले असल्याप्रमाणे का वागावे? खेळाकडे खेळ म्हणून का पाहिले जाऊ नये? अर्थात, जो व्यावसायिक खेळाडू आहे त्याला शासनाने सर्व ते सहाय्य करावे, जनतेने शक्य तितके प्रोत्साहन द्यावे, प्रत्यक्ष स्पर्धेदरम्यान चीअर करावे, विजयाचा जल्लोष मानावा, पराभवाचे वैषम्य मानावे, जय व पराजय दोन्हीचे अ‍ॅनॅलिसीस व्हावे हे सगळे मान्य! पण कुठेतरी हे मान्य होईल का की देशासमोर देशाच्या जन्मापासूनच अनंत महत्वाचे प्रश्न उभे ठाकलेले आहेत. नवीन समस्या निर्माण होत आहेत. अशा अवस्थेत प्रशासनाचे पहिले प्राधान्य नेहमीच महत्वाच्या समस्या सोडवण्याला असणार. कुठेतरी क्रीडा हा विषय मागे पडणार. (हे कोणत्याही पक्षाच्या सरकारचे होणार).

हे मान्य असेल तर खेळाडूंच्या कामगिरीचा भरभरून गौरव करताना सरकारचे वाभाडे काढले जायलाच पाहिजेत ही वृत्ती टाळता येईल का? दहशतवाद, भ्रष्टाचार, सीमाप्रश्न, अंतर्गत कलह, मर्यादीत संसाधने असे कैक प्रश्न जळत आहेत. खेळण्यासाठी अधिकाधिक तरतुदी करणे हे काही प्रमाणात लक्झरीचे लक्षण नाही का? ही लक्झरी आपल्याला परवडते का? आज ऑलिंपिकमध्ये सर्वाधिक पदके मिळवणारे पहिले चार, पाच देश भारतापेक्षा सामर्थ्यवान व श्रीमंत देश आहेत. असेही देश असतील जे गरीब असूनही पदके मिळवत असतील, पण मग असेही देश असतात जेथील लोक जेनेटिकलीच एखाद्या क्रीडाप्रकारासाठी आवश्यक असे शरीर बाळगून असतात. अधिक तपशीलात जाण्यापेक्षा मोटामोटी मुद्दा इतकाच की खेळाडूंना सहाय्यभूत ठरतील अश्या तरतुदी करण्यात सरकार कमी पडले ह्याचा उल्लेख तीव्रपणे केला जायलाच पाहिजे का?

ज्या खेळाडूंनी यश मिळवले त्यांच्यासाठी भरपूर जल्लोष व्हावा. त्यांनी विपरीत परिस्थितीत यश मिळवले ह्याचा उदंड गौरव व्हावा. पण सरकारने काहीच केले नाही असे म्हणणे पटत नाही. तसेच, खेळातील यश आणि अपयश हे थेट देशभक्ती, देशभावना ह्याच्याशी जोडणेही पटत नाही. देशाच्या वतीने खेळणारा खेळाडू देशासाठीच खेळत असतो हे अगदी मान्य, पण सैनिक, समाजसुधारक, काही स्वच्छ नेते ह्यांच्या मनातील देशप्रेमाची सर त्याला असावी का? किंवा असे म्हणतो की एखादा खेळाडू हरला तर देशाचे काही थेट नुकसान होणार आहे का? जिंकला तर देशाचाही गौरव होतोच हे ठीक, पण देश त्या गौरवाशिवायही आहे त्याच परिस्थितीत राहणार असतो आणि गौरव झाला तरी आहे त्याच परिस्थितीत राहणार असतो.

खेळाडू आणि खेळाकडे खिलाडू वृत्तीने पाहणे बहुधा आपल्या लोकांना जमत तरी नाही किंवा भावना फारच गुंतवल्या जातात. त्या उलट सिंधू आणि तिची स्पॅनिश व सुपिरिअर प्रतिस्पर्धी ह्या दोघींनी अत्यंत जीवन-मरणासारख्या सामन्यातही एकमेकांप्रती आदर आणि खिलाडूवृत्ती दाखवली आणि सामनाही उत्कंठावर्धक करून दाखवला हे किती सुखद वाटते!

क्रिकेटचेही असेच आहे. ऋन्मेषच्या एका धाग्यातही हा मुद्दा आलेला आहे की पाकिस्तानने विश्वचषक सोडला तर शेकडोवेळा आपली धूळधाण केलेली आहे. अधिक चांगले खेळाडू सातत्याने निर्माण केलेले आहेत. पण पाकिस्तानशी खेळताना मनात शतृत्वाची भावना घेऊन प्रेक्षक का गुंतावेत? आपल्याला खेळाकडे पाहण्याचा निखळ दृष्टिकोन अंगी बाणणे नाहीच जमत का? अगदी तिर्‍हाईत संघाने पाकला हरवले तरी आपण आनंद मानतो हे किती विचित्र आहे.

१. सरकारपुढे असलेल्या महत्वाच्या समस्या बघता क्रीडाप्रकारांबाबत सरकारला नेहमी दोष देणे योग्य आहे का?
२. खेळामध्ये देशभावना गुंतवणे योग्य आहे का? त्याशिवाय खेळ एन्जॉय करता येणार नाही का?

असे दोन संभ्रम म्हणा किंवा प्रश्न म्हणा!

=============================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>
तेव्हा या विषयावर नव्याने लिहिण्यासारखे काही उरले नाही आहे.>>>>>>>
Guess i was wrong,
राष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंना bjpच्या rally मध्ये पाणी वाटायला लाव

http://www.tribuneindia.com/mobi/news/nation/national-level-players-serv...

जसे मी आधी म्हणत होतो, खेळांना प्रोहोत्साहन देणे हा पैशाचा कमी(पक्षी देशापुढील समस्या, त्यांचा प्राधान्यक्रम etc etc) आणि मेंटलिटी चा जास्त प्रश्न आहे. राष्ट्रीय खेळाडू आमचे नोकर (कारण देश त्यांच्यावर खर्च करतोय, देशात आमचे सरकार आहे, पर्यायाने आम्हीच खर्च करतो आहोत) त्यांना आम्ही हवे तेव्हा आणि हवे तसे वापरु अशी मेंटलिटी जोवर असेल तो पर्यंत कितीही ऑलिम्पिक चे ऍक्शन प्लॅन बनवून काहीही फायदा होणार नाही.

Pages