'रुस्तम'बद्दल आवर्जून सांगावं असं खरं तर काहीच नाही. कारण तो 'नानावटी केस' वर आधारलेला आहे, हे पहिल्यापासूनच सर्वांना माहित आहे आणि 'नानावटी केस'ही सर्वांना माहित आहे. ज्यांना ती माहित नाही, त्यांच्यासाठी त्या केसची पुरेशी माहिती आंतरजालावर अगदी सहज उपलब्ध आहे. पण तरीही हा एक प्रचंड जाहिरात केलेला आणि (कदाचित म्हणूनच) पाहण्याची उत्कंठा वाटलेला चित्रपट आहे/ होता म्हणून लिहितो आहे. ह्या लिहिण्यालाही जरासा उशीरच झाला आहे, तरी.. !
१९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुढची जवळजवळ १३ वर्षं म्हणजे १९६० पर्यंत महाराष्ट्र व गुजरात मिळून एकच राज्य अस्तित्वात होतं, ज्याला 'बॉम्बे स्टेट' म्हटलं जायचं. 'रुस्तम'चं कथानक त्या काळातलं आहे. भारतीय नौदलात एका मोठ्या हुद्द्यावर असलेला रुस्तम पावरी (अक्षय कुमार) एका मोहिमेवरून परत घरी येतो. पत्नीवर जीवापाड प्रेम असलेला रुस्तम जेव्हा तिला भेटण्यासाठी उतावीळ होऊन घरी येतो, तेव्हा त्याला हादरवून टाकणारं सत्य त्याला उमगतं. त्याच्या पत्नीचं विक्रम मखीजा (अर्जन बाजवा) ह्या एका चांगल्या ओळखीच्या व्यक्तीशीच प्रेम प्रकरण चालू असतं. विक्रमशी ह्याबाबत बोलायला गेलेला रुस्तम त्याला गोळ्या घालून ठार मारतो आणि त्याच्यावर खूनाचा खटला भरला जातो.
बहुतांश सिनेमा हा ह्या खटल्यावर आधारित आहे. आपण ह्याला 'कोर्टरूम ड्रामा' किंबहुना 'कोर्टरूम मेलोड्रामा' म्हणू शकतो.
रुस्तम आवडला की नाही आवडला, ह्याचा निर्णय चटकन होत नाही. ह्याचा अर्थ ह्यात काही चांगल्या गोष्टी आहेत पण काही तितक्याश्या चांगल्या नसलेल्या नावडलेल्या गोष्टीही आहेत आणि दोन्हींना दुर्लक्षित करता येत नाही.

चांगले -
१. अक्षय कुमार
'अक्षय कुमार डोक्यात जातो' असं म्हणणारा मनुष्य मला तरी आजतागायत भेटलेला नाही. तो काही लोकांना विशेष दखलपात्र नसेल वाटत, पण 'तो पडद्यावर आल्यावर असह्य होतं', असं कुणी म्हणत असेल, हे वाटत तरी नाही. शाहरुखपासून रणवीरपर्यंत प्रत्येक जण असह्य होत असतो. पण अ.कु. नाही. अ.कु.चे फॅनसुद्धा भरपूर आहेत. (मी त्यांतला एक !) तर ज्यांना तो आवडतो आणि ज्यांना तो विशेष आवडत नाही, अश्या दोघांसाठीही 'रुस्तम' हा एक 'बघणीय' सिनेमा आहे. अ.कु.च्या हालचालींत नेहमीचा उत्साह जरासुद्धा कमी होत नाही आणि प्रचंड आत्मविश्वास असलेला एक नौदल कमांडर त्याने सहज साकारला आहे. वर्दीत असलेला मनुष्य असाही ऐटबाज दिसतोच, पण अ.कु.ची बातच काही और आहे.
मला असं वाटतं की 'अफलातून' नंतर त्याला त्याच्या आवाजाचा वापर करण्याचं एक विशिष्ट तंत्रही मिळालं आहे आणि प्रत्येक सिनेमागणिक ते मला तरी प्रकर्षाने जाणवत असतं. अगदी पूर्वीच्या (खिलाडी वगैरे) काळातला त्याचा आवाज आणि आजचा त्याचा आवाज ह्यांत फारसा फरक नसला, तरी त्याच्या वापरात मात्र बराच फरक पडला आहे. एक सामान्य चित्रपटही एखादा असा संस्कार अभिनेत्यावर करतो की त्याचं पुढच्या प्रवासाची दिशाच बदलावी, असं काहीसं हे एक उदाहरण आहे. त्याच्या 'रुस्तम'मध्ये फक्त स्टाईल आणि आत्मविश्वासच नसून अत्यंत समंजसपणे त्याने ती व्यक्तिरेखा साकारली आहे. मुळात 'रुस्तम' हा एक सैनिक आहे. तो इतर सामान्य माणसांप्रमाणे भावनिक असू शकत नाही, हे लक्षात ठेवून त्याने त्याचा आनंद, दु:ख, वैषम्य, संताप वगैरे दाखवला आहे. हे नुसतं अंडरप्ले करणं नसून तोलून मापून केलेलं सादरीकरण आहे, असं मला वाटलं.
२. नीरज पांडे
दिग्दर्शक 'टिनू सुरेश देसाई' असले तरी त्यांवर 'नीरज पांडे'चा प्रभाव जाणवतो. बहुतेक. काही चित्रपटांत त्यांनी पांडेंना सहाय्यक म्हणून काम केलंही असावं. नीरज पांडे निर्माते आहेत आणि पांडेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवाद, देशभक्ती वगैरेची किनार असलेलं कथानक आपल्यासमोर मांडलं आहे. 'स्पेशल छब्बीस'चा अपवाद वगळता त्यांच्या आत्तापर्यंतच्या सर्वच सिनेमांत हे जाणवलं आहे. पांडेंचा हातखंडा थरार चित्रित करण्यात आहे. त्यांच्या सिनेमातली पात्र शांतपणे, पॉजेस वगैरे घेत संवाद फेकत नाहीत. लांबलचक मोनोलॉग्ससुद्धा त्यांच्या समीकरणांत बसत नाहीत. त्यांच्या सिनेमातली पात्रं ताडताड पाउलं टाकत चालतात, चटपटीत असतात. त्यांच्या हालचाली जलद असतात. कॅमेरा उगाच गरागरा फिरत नाही किंवा कुठल्या तरी विचित्र कोनांतून तो पाहत नाही किंवा अगदीच एखाद्या कोपऱ्यात टाकून दिल्यासारखा पडूनही राहत नाही. तो जेव्हढ्यास तेव्हढा फिरतो आणि बुचकळ्यात वगैरे पाडत नाही. ह्या सगळ्यामुळे कथानक कुठल्याही गतीने पुढे सरकत असलं तरी खिळवून नक्कीच ठेवतं. 'टिनू देसाई' ह्या सगळ्याला अपवाद नाहीत आणि 'रुस्तम'सुद्धा ! काय होणार आहे, हे आपल्याला आधीच माहित असलं तरीही त्याची उत्सुकता मात्र वाटत राहतेच.
३. जुनी मुंबई
जुन्या मुंबईचं फार काही दर्शन घडतं अश्यातला भाग नाही. पण जे काही घडतं, ते पाहताना एखादा मुंबईकर नक्कीच सुखावतो. खरं तर तो काळ असा होता की मुंबईत मुख्यत्वे दोनच प्रकारचे लोक होते. अतिश्रीमंत आणि अतिगरीब. ही तफावत भयंकर होती. मध्यमवर्ग हळूहळू करत आपलं अस्तित्व दाखवू लागला आणि आता तर ह्या मध्यमवर्गातही निम्न, उच्च असे गट पाडता येतील इतक्या पायऱ्या तयार झाल्या आहेत. पण तो काळ होता जेव्हा एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी बहुतेक दोनच पायऱ्या होत्या. गरीब आणि श्रीमंत. मात्र, ह्या भयंकर तफावतीचे दर्शन इथे होत नाही. इथे दिसणारी मुंबई म्हणजे उच्चभ्रू, सुखवस्तू लोकांचीच मुंबई. स्वच्छ रस्ते, देखण्या गाड्या आणि टापटीप ब्रिटीश पद्धतीची घरं व इमारती ह्यांचं ओझरतं दर्शन होत राहतं. I know, हे दर्शन अपूर्ण आहे आणि ब्लफमास्टर व टॅक्सी नं. ९२११ मध्ये दिसलेल्या मुंबईने मला जास्त मोहवलं होतं आणि 'रमन राघव' मध्ये दिसलेली मुंबई जास्त भिडली होती, पण तरी... !!
४. पवन मल्होत्रा
हा एक अत्यंत गुणी अभिनेता आहे. खूप आव्हानात्मक भूमिका गेल्या काही वर्षांत त्याच्या वाट्याला आलेल्या नाहीत. पवन मल्होत्रा म्हटल्यावर आपल्याला सहसा आठवतात 'सलीम लंगडे पे मत रो' आणि 'ब्लॅक फ्रायडे' मधला 'टायगर मेमन'. नक्कीच, ही दोन त्याची जबरदस्त कामं होती, मात्र 'जब वुई मेट' मधला सरदार 'चाचाजी' असो की 'डॉन' मधला 'नारंग किंवा 'भाग मिल्खा भाग' मधला प्रशिक्षक, त्याने प्रत्येक वेळी ती ती छोटीशी व्यक्तिरेखासुद्धा जिवंत केलेली आहे. कमांडर रुस्तमबद्दल अतिशय आदर असलेला आणि त्याच वेळी आपल्या कर्तव्याचीही पूर्ण जाणीव असलेला 'रुस्तम' मधला त्याचा पोलीस अधिकारी 'व्हिन्सेंट लोबो'ही असाच. अगदी छोटीशी भूमिका आहे असंही नाही, पण फार मोठीही नाही. मात्र तरीही लक्षणीय. अ.कु. आणि त्याचे दोन प्रसंग तर मस्तच जमून आले आहेत. दोन्हींत बुद्धिबळ आहे. एकात तो खेळतो, दुसऱ्यात खेळ टाळतो. एकात दोघांना समसमान स्कोप आहे तर दुसऱ्यात अ.कु.ला जास्त स्कोप आहे.
५. काही किरकोळ (Miscellaneous)
# जेलमध्ये रुस्तम आणि लोबो एक बुद्धिबळाचा डाव खेळतात. असा प्रसंग अनेक सिनेमांत चित्रित झालेला आहे. पण बहुतेक वेळेस ते चित्रण अर्धवट किंवा बाष्कळपणे दाखवलं आहे. इथे एक पूर्ण डाव अगदी व्यवस्थित दाखवला गेला आहे. हा प्रसंग, तेव्हाचे संवाद सगळं मस्त जुळून आलं आहे.
# काही जागांवर उत्तम व सजग संकलन (Editing) जाणवतं.
फार चांगले नाही -
१. इलियाना डी क्रुज
ही 'बर्फी'मध्ये मला आवडली होती. पण इथे खूपच कमी पडल्यासारखी वाटली. अक्षरश: एकाही प्रसंगात ती आश्वासक वाटत नाही. तिचं रडणं, हसणं सगळं नकलीच वाटत राहतं. ह्या कहाणीत 'रुस्तम' पत्नी 'सिंथिया' म्हणून तिचं पात्र महत्वाचं आहे. भले तिची भूमिका केंद्रस्थानी नसली तरीही महत्वाची आहे कारण तिच्यामुळेच तर सगळं घडलेलं आहे. पण तीच परिणामकारक नसल्यामुळे इतर सगळं अपुरंच वाटत राहतं. पुरेसं कूलिंग नसलेल्या वातानुकूलित केबिनमध्ये बसल्यासारखं वाटतं. अगदी जीव गुदमरतही नाही आणि अगदी निवांतही वाटत नाही.
२. संगीत
नसतंच तरी चाललं असतंच की. पण जर आहे, तर चांगलं तरी असायला हवं होतं. 'तेरे संग यारा' ऐकायला ठीक वाटतं, पण तिथल्या तिथे फिरत राहणारी चाल असल्याने लगेच पुरे वाटतं. ही चालही अगदी टिपिकल असल्याने नवीन काही ऐकतो आहे, असंही वाटत नाही. शीर्षक गीत 'रुस्तम वही' म्हणजे तर अमानवी अत्याचार आहे. संगीत म्हणून हे जे काही केलं आहे तो नुसता असह्य गोंगाट आहे. 'तय हैं' हे गाणंही तसं चांगलं आहे, but again काही नवीन ऐकल्यासारखं नाहीच वाटत.
खरं तर आजच्या सिनेमात 'संगीत वाईट असणं' ही बाब गृहीतच धरायला हवी. सिनेमा पाहायला जातेवेळीच ह्यासाठीची मानसिक तयारी असली पाहिजे. पण माझी तरी अजूनही तशी तयारी होतच नाही. जे सुश्राव्य व अर्थपूर्ण असतं तेच संगीत असतं, ह्याहून काही वेगळं जर कानांवर पडलं तर ते पचतही नाही आणि पटतही नाही ! कदाचित हा माझाच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे हा मुद्दा दुर्लक्षित केला तरी चालतोय !
३. कोर्टरूम मेलोड्रामा
'कोर्ट', 'अलिगढ' आणि काही प्रमाणात 'जॉली एल एल बी' अश्या काही सिनेमांतून दिसलेलं कोर्ट जास्त खरं वाटतं. 'रुस्तम'मध्ये दाखवलेला कारभार मात्र मेलोड्रामॅटिकच वाटतो. ज्यूरींना न्यायाधीशाने त्यांचं काम समजावून सांगणं, त्यावर ज्यूरींनी शाळेतल्या मुलाप्रमाणे माना हलवणं वगैरे तर अगदीच उथळ वाटलं. बाकी टिपिकल फिल्मी डायलॉगबाजीही इथे चालते. लोक टाळ्या वगैरे वाजवतात आणि जज 'ऑर्डर, ऑर्डर' करतो. आताशा ह्या सगळ्याने प्रेक्षकाला समाधान मिळत नाही. नको तिथे अवाजवी, अनावश्यक वास्तवदर्शनाचा अट्टाहास करणारे आजचे लेखक-दिग्दर्शक अश्या काही ठिकाणीही तितकेच आग्रही व्हायला हवे.
४. काही किरकोळ (Miscellaneous)
# 'रुस्तम' बहुतांश वेळ वर्दीत दाखवला आहे. त्याची ही वर्दी इतकी पांढरी शुभ्र आहे की दर दोन तासांनी 'टाईड'ने धुवून घेतो की काय असं वाटतं. इतना भी मत करो यार ! अगदी जेलमध्ये असतानाही तो पूर्ण वर्दीत दाखवला आहे. कोठडीही इतकी स्वच्छ असते की त्याच्या कपड्यांवर जराही धूळ वगैरे लागत नाही, हे जरा जास्त होतं. ही ड्राय क्लीन्ड शुभ्रता इतकीही आवश्यक नव्हती की डोळ्यांत खुपेल.
# एक वृत्तपत्र आधी २५ पैसे आणि नंतर त्याची लोकप्रियता वाढल्यावर एक रुपयाला विकलं जाताना दाखवलं आहे. ही कहाणी १९५७ ची असल्याचं सांगितलं आहे. त्या काळात २५ पैसे किती महाग होते, ह्याचा विचार केलेला दिसत नाही. एक आण्यालाही किंमत असणारा तो जमाना होता. एका वृत्तपत्रासाठी १ रुपया ही खूप म्हणजे खूपच जास्त किंमत आहे. १ रुपयाला तर आजही वृत्तपत्र मिळतं बहुतेक !
# मूळ कथानक माहित असलं, तरी जोड-कथानक (जे काल्पनिक आहे) मात्र कुणाला नक्कीच माहित नसावं. पण काय घडणार आहे, ह्याचा अंदाज आधीच बांधता येतो आणि ते तसंच घडतं. ही प्रेडिक्टेबलिटी मारक ठरली आहे. ह्यामुळे थरारातली हवाच निघून जाते.
# सिंथिया आणि विक्रमचा जवळ येण्याचा प्रसंग/ परिस्थिती अगदीच भंकस वाटते. तो सगळा भाग ऐंशीच्या सुमार कालखंडातील एखाद्या फडतूस सिनेमातून उचलून इथे टाकला आहे की काय, असा संशय येतो !
'रुस्तम' वाईट नसला तरी त्याच्याकडून अपेक्षा खूप होत्या. त्या पूर्ण होत नाहीत. नानावटी केसवर आधारलेला 'गुलजार'चा 'अचानक' चाळीस एक वर्षांपूर्वी आला होता. त्यात विनोद खन्ना, फरीदा जलाल आणि ओम शिवपुरी ह्यांचा अप्रतिम अभिनय होता. चाळीस वर्षांपूर्वी उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनांनी बनलेला व बनवलेला तो सिनेमाही 'रुस्तम'पेक्षा कैक पटींनी जास्त थरारक तर होताच आणि दर्ज्याची तर तुलनाही होणार नाही, इतका उजवा होता. त्या काळात, जेव्हा एकेका सिनेमात ८-१० गाणी असायची, गुलजारने गाणी पूर्णपणे टाळली होती. नीरज पांडे, टिनू देसाई व कं.नी किमान तो तरी मोह आवरायला हवा होता.
असो.
एकदा पाहावा असा नक्कीच आहे आणि नाही पहिला तरी काही चुकलं/ हुकलं नसेल, ह्याचीही खात्री बाळगावी.
रेटिंग - * * १/२
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/08/movie-review-rustom.html
अजय चांगली माहिती.
अजय चांगली माहिती.
अचानक चा इथे बर्याचदा
अचानक चा इथे बर्याचदा उल्लेख आलेला आहे. पण मला वातते त्यात गुलजारला जे सांगायचेय ते ते मित्राच्या खुनानंतर नायकाला शिक्षा झाल्यावर अचानकची खरी स्टोरी , थीम सुरु होते. ती विनोद खन्नाची स्टोरी नसून ओम शिवपुरी आणि त्याच्या डोक्टरी व्यवसायाची आहे आणि मूळ संघर्ष तिथे आहे. अगदी दुसर्युआ कारणामुळे शिक्षा झाली असती तरी अचानकची थीम तीच राहिली असती. त्यामुळे तो केवळ बॅक ड्रॉप आहे. नानावटी केस सादर करणे हा त्या चित्रपटाचा उद्देश नाही.
आर्मीत असलेल्या विनोद खन्नाला मित्राच्या खुनाच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेली आसते ( नानावटीशी असलेले साम्य इथेच संपते ). त्याला गंभीर आजारासाठी उपचारांसाठी ओम शिवपुरी, असरानी, हे डॉक्टर फरिदा जलाल ( नर्स) असलेल्या इस्पितळात अॅडमिट केले असते. त्याला वाच्वण्यासाठी सगळे जिवाची पराकाष्ठा करीत असतात.त्याच्या फाशीची शिक्षा ठरलेली असते. मधल्या काळात तो डॉक्टर्स , नर्सेस एक छोटी मुलगी ( बहुधा बेबी पिंकी) यांच्या भावविश्वात एकजीव होतो. त्यांची सुख्दु:खे , नाती यात तोही गुरफटून जातो एक नातेच निर्माण होते. फरिदा जलालचा प्रियकर ( तो कधीच दाखवलेलाच नाही आहे) रोज संध्याकाळी चार वाजता येऊन खिडखीखाली भेटीची खुणेची शीळ घालत असतो त्याल विनोद खन्नाने इव्हिनिंग न्यूज नाव दिलेले असते :). आ गयी तुम्हारी इव्हिनिंग न्यूज . मग फरीदाने लाजून पळून जाणे वगैरे. आनन्द मधल्या आनन्द सारखेच. तो ठणठणीत बरा झाल्यावरच त्याला फाशी द्यायचे असते. दरम्यान त्याच्या तब्येतीच्या चढ उतारानुसार हॉस्पिटलमध्ये होणारी धावपळ, डोक्टरांच्या त्याला वाचविण्यासाठी अथक प्रयत्न , ताणतणाव. एवढे करून त्याला वाचवायचे कशासाठी तर फासावर चढवण्यासाठी.
ओमशिवपुरीच्या सिगरेट ओढण्याबद्दल कोणीतरी वर लिहिले आहे त्याचे हे कारण.
शेवटी तो बरा होतो आणि त्याला फासावर चढवायला नेण्यासाठी जेलचे लोक वार्डात येतात. त्याच्या वार्डात सगळे डॉक्टर , नर्सेस, वार्ड बॉय त्याला अश्रुपूर्ण निरोप देण्यासाठी जमलेले असतात.( वास्त विक तो बरा झालेला असतो . पण हेच त्याचे फाशी जाण्याचे फिटनेस् सर्टिफिकेट असते. याला 'जबाबदार ' तिथले सगळे मेडिकल युनिट !! ) अत्यंत तणावपूर्ण शांतता वार्डात पसरलेली असते . या क्लायमॅक्सलाच नेहमीची एविनिंग न्यूजची फरीदाला साद घालणारी प्रियकराची शीळ वाजू लागते. अंगावर सर्र्कन काटा आणनारा हा प्रसंग आहे. शेवटी जेलवाले त्याला घेऊन जातात . फाशी द्यायला. त्यांनतर ओम शिवपुरीचा कोलमडून एकदम स्फोट होतो . अरे हे कधी थांबणार आहे? आंही पेशंट बरे करायचे ते फाशी देण्यासाठी? ( हे तिथले नेहमीचेच काम असते). डॉक्तरांचे काम जीवन देणे आहे . ते काढून घेण्यासाठी इलिजिबल करणे नव्हे. वगैरे वगैरे. नन्तर तो मला वाटते तो ते हॉस्पिटल सोडून जातो की काय आता आठवत नाही. त्यामुळे अचानक चित्रपट नानावटीवर आधारित आहे असे मला वाटत नाही..........
रसप, घर आजा घिर आये मधे अमिता
रसप, घर आजा घिर आये मधे अमिता आहे पण नाचलीय ती शीला वाझ.. ती सहसा हेलन टाईप नाच करायची पण फक्त त्याच चित्रपटात ती मुजरा करताना दिसलीय.
अचानकमधला नायक पत्नीचाही खून
अचानकमधला नायक पत्नीचाही खून करतो. तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला तिचे मंगळसूत्र नदीत सोडायचे असते.
flashbacks मधून उलगडलेली कथा.
येस भरत. खून केल्यावर तो ते
येस भरत. खून केल्यावर तो ते मं सू नदीत टाकायला पळत असतो. मग त्याला पोलीस की सैनिक पकडतात. त्यांना चकवण्यासाठी तो पाठलाग करणाऋयांच्या दिशाभूल करणार्या आर्मीत शिकलेल्या युक्त्या वापरत असतो. गुलजारने फ्लॅश बअॅक तंत्राचा अप्रतिम वापर केला आहे. सारखे फ्लॅश बॅक - वर्तमान -फ्लॅशबॅक चालू असते. पण त्याने कुठेही चित्रपटाची लय बिघडलेली नाही.
अचानक हा एक अतिशय सुरेख
अचानक हा एक अतिशय सुरेख चित्रपट आहे. फ्लशबॅक मध्ये फ्लॅशबॅक करत संपुर्ण स्टोरी उलगडते. त्यातले फ्लॅशबॅक खुप गंमतीशीर आहेत. करंट टाईमलाईनमध्ये एक प्रसंग चालु अस्ताना हिरोला ते पाहुन काहीतरी आठवते आणि त्या आठवणीतही त्याला काहीतरी परत आठवलेलेच असते. पत्नी आणि मित्राचा खुन हे केवळ निमित्त आहे. मुळ विषय तो नाहीय तर वर लिहिलाय तो आहे. विनोद खन्नाने अतिशय सुरेख काम केलेय. फरिदा जलाल आणि ओम शिवपुरीची कामेही सुरेख आहेत.
तो आजारी नाही पडत तर स्वतःला पोलिसांच्या हवाली केल्यानंतर काही काळाने त्याला बायकोने कधीतरी सहजच ती जर मेली तर तिचे मंसु गंगेत टाकण्याविषयी बोलल्याचे त्याला आठवते. पोलिस अर्थात त्याला सोडणार नव्हतेच म्हणुन तो त्यांच्या हातावर तुरी देऊन पळुन जातो. त्यांना चकवत तो शेवटी मंसु गंगेत टाकण्यात यशस्वी होतो पण पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी होतो.
हॉस्पिटलमध्ये ट्रेनचा आवाज
हॉस्पिटलमध्ये ट्रेनचा आवाज ऐकून ट्रेनमधल्या लिपस्टिक लावणार्या मुलीचा flashback तिथे बायको आणि लिपस्टिकचा flashback
मी पाहिलेला खूप वर्षे झाली.
मी पाहिलेला खूप वर्षे झाली. नीट आठवत नाही. पिंकी हॉस्पिटलमध्ये नाही तर रेल्वेत भेटते. ती आपल्या आईची लीप स्टिक लावून तोंड बरबटीत असते . तिच्याकडे पाहून फ्लॅश बॅकमध्ये बायकोचा प्रसंग आठवतो.लिपस्टिल्क लावत असलेल्या बायकोला तो म्हणतो .किती ती लिप्स्टिक ! निम्मी तर पोटात गेली असेल. त्यावर ती चावटपणाने म्हनते 'त्यातली निम्मी तर तुझ्याही पोटात गेली असेल !
.......
सॉरी विषय रुस्तम चा चाल्लाय
सॉरी विषय रुस्तम चा चाल्लाय अणि हे मध्येच अचानकचं रीळ सुरू झालं::फिदी:
तेच तर लिहिलंय मी. One third
तेच तर लिहिलंय मी. One third summary
त्यालाच flash back म्हणतात
त्यालाच flash back म्हणतात
आता इतकं अवांतर सुरूच आहे
आता इतकं अवांतर सुरूच आहे तर माझेही २ पैसे :
Everybody Loves Raymond मधली डेब्रा साकारणारी Patricia Heaton थोडीशी लीला नायडूसारखी दिसते.
अजय धन्यवाद. तुमच्यामुळे
अजय धन्यवाद. तुमच्यामुळे नानावटी केस समजली. रसप यांनी सुरुवातीलाच लिहिलेले की सर्वांनाच माहीत असेल आणि मला माहीत नव्हती त्यामुळे फार्रफार लाज वाटत होती
बाकी नानावटी हॉस्पिटलशी याचा काही संबंध नाही हे सुद्धा क्लीअर झाले एकदाचे..
नानावटी केस ही नेहमीची
नानावटी केस ही नेहमीची त्रिकोणी विवाहबाह्य संबंधातून होणार्या हत्येची रुटीन केस आहे. त्याचे ऐतिहासिक महत्व तिच्यामुळे ज्युरी सिस्टीम बंद झाली यात आहे. बाकी हे ऐतिहासिक महत्व चित्रपट निर्मात्याला काय करायचे आहे म्हणा. पण मला कळले नाही की कित्येक दशकानन्तर ही केस उकरून काढण्यात त्याला काय स्वारस्य होते? तेही या आधी त्यावर काही चित्रपट येउन गेलेले असताना. मूळ घटनात काही नाट्य आता राहिलेले नव्हते. खरे नाट्य कोर्ट केसचा निकाल लागल्यानन्तर सुरू झाले ते चित्रपटाच्या दृष्टीने निरुपयोगी आहे.
खरे नाट्य कोर्ट केसचा निकाल
खरे नाट्य कोर्ट केसचा निकाल लागल्यानन्तर सुरू झाले ते चित्रपटाच्या दृष्टीने निरुपयोगी आहे.
>>>>
हे तुम्हा काही लोकांनाच ठाऊक असते. आम जनतेला नाही. योग्य मार्केटींग केल्यास सनसनीखेज सत्यघटनेवर आधारीत म्हणत पब्लिक खेचता येते.
नाही .. नानावटी केसचा ढाचा
नाही .. नानावटी केसचा ढाचा उचलला आहे.. आणि त्यावरुन कथा रचली आहे..
नानावटी ची कथा नाही ही..
>> नाही कसे ? स्वतः रसपच पहिल्या वाक्यातच म्हणताहेत की चित्रपट नानावटी प्रकरणावर आधारित आहे म्हणून.रुस्तम'बद्दल आवर्जून सांगावं असं खरं तर काहीच नाही. कारण तो 'नानावटी केस' वर आधारलेला आहे, हे पहिल्यापासूनच सर्वांना माहित आहे आणि 'नानावटी केस'ही सर्वांना माहित आहे. इति रसप
आणि आता तेच म्हणाहेत ..
ह्या सगळ्याचा सिनेमाशी आणि ह्या लेखाशी काय संबंध आहे ? इति रसप.
'ह्या सगळ्याचा ' म्हणजे मी लिहिलेल्या नानावटी प्रकरणाच्या माहितीचा.
गंमत आहे की नाही?
असो मी लिहिण्याचे खरे कारण म्हनजे टण्या यांचे ते वाक्य. त्यामुळे जाता जाता ज्युरी सिस्टीम काय होती , तिची गरज , आणि ती का गेली याचा इतिहास सांगण्यासाठी ते लिहिले होते.
हे तुम्हा काही लोकांनाच ठाऊक
हे तुम्हा काही लोकांनाच ठाऊक असते. आम जनतेला नाही
>>
असे कसे . काही लोकांनाच ठाउक कसे असेल. रसप यांच्या म्हणण्यानुसार कारण तो 'नानावटी केस' वर आधारलेला आहे, हे पहिल्यापासूनच सर्वांना माहित आहे आणि 'नानावटी केस'ही सर्वांना माहित आहे. इति रसप
त्यामुळे आम जनतेलाही माहीत असणे अपेक्षित आहेच::फिदी:
Hudaa, uttam maahiti milaali
Hudaa, uttam maahiti milaali dhanyavaad
सध्या माझी १३ वर्षांची मुलगी
सध्या माझी १३ वर्षांची मुलगी अकुची फारच पंखा झालिये... तिने तर दोन त्याचे स्केच पण काढ्लेत ...
छान आहे स्केच. आवड जोपासा
छान आहे स्केच. आवड जोपासा तिची. चित्रकार जरी झाली नाही तरी स्ट्रेस बस्टर म्हणून कला उपयोगी येतात आयुष्यात. नैराश्य सहन करण्याची ताकत येते.
धन्यवाद अजय ..
धन्यवाद अजय ..
मस्त आहे स्केच. 13 वर्षांच्या
मस्त आहे स्केच. 13 वर्षांच्या मानाने तर भारीच. हॅन्डसम वाटतोय अक्षय
रुस्तमच्या युनिफॉर्मच्या
रुस्तमच्या युनिफॉर्मच्या चुका..........
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=b55RygjuITY
ही लीला नायडू.
मला परख मधली नटी लीला नायडू
मला परख मधली नटी लीला नायडू वाटायची. मग ती परख मधील कोण होती? विकिमधे तिचे नाव साधना असे दिले आहे पण साधना मला माहिती आहे. सुनिल दत्त सोबत तिचे सिनेमे गाजलेले आहेत. दोन दोन साधना आहेत का बॉलिवुडात!!!
अजय, रुस्तम हा सिनेमा फक्त खर्या कथेवर बेतलेला आहे बाकी मसाला वापरुन ही लोक नेहमीप्रमाणे मुळ कथा काय होती दाखवतच नाही. नानावटीला ३ साल जेल होते. नंतर तो कॅनडामधे जातो तिथेच स्थायिक होतो.
बी, परख मध्ये साधनाचा तो
बी, परख मध्ये साधनाचा तो फेमस साधना कट नाहीय म्हणून तुमचा गैरसमज झालाय.
You tube वर लीला नायडू सर्च करा, तिने बरेच चित्रपट केलेत.
ओह माय गॉड.. परख मधली ती खरच
ओह माय गॉड.. परख मधली ती खरच तीच साधना आहे असे मुळीचं वाटत नाही. कसली सौज्वळ दिसते ती त्यात. धन्यवाद साधना!
तुम अपना रंज और गम अपनी तनहाईना मधे पण एक सुरेख नटी आहे. किती क्यूट दिसते ती त्यात.
अजय दोन्ही पोस्टस छान.नानावटी
अजय दोन्ही पोस्टस छान.नानावटी केस कळली.
बाकीच्यां लोकांच्या अचानक वरच्या पोस्ट पाहुन मला चित्रपट पाहावासा वाटतोय.
अक्षय कुमार डोक्यात जातो' असं म्हणणारा मनुष्य मला तरी आजतागायत भेटलेला नाही>>> + १००
माझ्या (तेव्हाच्या) बाळमताने ही खुप भारीईईई गोष्ट होती.
मला आधीपासुन अक्षय कुमार आवडायचा कारण त्याने खिलाडी सिरीज मधे अंडरटेकर बरोबर फाईट केली होती.
काल रुस्तम पाहिला. अक्षय
काल रुस्तम पाहिला.
अभिनय चांगला केला आहे पण त्याने.
सचिन खेडेकर ने एवढी ओव्हरअॅक्टिंग का केली आहे?
ऊषा नाडकर्णी ओकेओके. विनाकारण विनोदांची पेरणी कोर्ट्सीन्सचे गांभीर्य घालवले आहे.
अक्षय कुमार म्हातारा दिसतो फार. समोर इलियाना असल्यावर तर खूपच
अक्षय कुमार आणि पवन मल्होत्रा सोडल्यास बाकीच्यांचे अभिनय सुमार दर्ज्याचे वाटले. पवन मल्होत्राचा चेहरा बोलतो. संयत अभिनय.
अनंग देसाई कधीही उठून सचिन खेडेकरला 'प्रफुल... गधे...' म्हणतील असे वाटत होते.
सिनेमा भीडत नाही मनाला. नानावटी केस, देशभक्त नेव्हल ऑफिसर आणि भ्रष्टाचार या सगळ्यांना एकत्र गुंफायच्या नादात केवळ गुंता झाला आहे. असे मला वाटले.
Sachin khedekar ni KayDya ch
Sachin khedekar ni KayDya ch bola madhe ekdum changlya padhatine sarkari vakilachi bhumika vathavli hoti
Pages