थोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)

Submitted by रसप on 16 August, 2016 - 02:24

'रुस्तम'बद्दल आवर्जून सांगावं असं खरं तर काहीच नाही. कारण तो 'नानावटी केस' वर आधारलेला आहे, हे पहिल्यापासूनच सर्वांना माहित आहे आणि 'नानावटी केस'ही सर्वांना माहित आहे. ज्यांना ती माहित नाही, त्यांच्यासाठी त्या केसची पुरेशी माहिती आंतरजालावर अगदी सहज उपलब्ध आहे. पण तरीही हा एक प्रचंड जाहिरात केलेला आणि (कदाचित म्हणूनच) पाहण्याची उत्कंठा वाटलेला चित्रपट आहे/ होता म्हणून लिहितो आहे. ह्या लिहिण्यालाही जरासा उशीरच झाला आहे, तरी.. !

१९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुढची जवळजवळ १३ वर्षं म्हणजे १९६० पर्यंत महाराष्ट्र व गुजरात मिळून एकच राज्य अस्तित्वात होतं, ज्याला 'बॉम्बे स्टेट' म्हटलं जायचं. 'रुस्तम'चं कथानक त्या काळातलं आहे. भारतीय नौदलात एका मोठ्या हुद्द्यावर असलेला रुस्तम पावरी (अक्षय कुमार) एका मोहिमेवरून परत घरी येतो. पत्नीवर जीवापाड प्रेम असलेला रुस्तम जेव्हा तिला भेटण्यासाठी उतावीळ होऊन घरी येतो, तेव्हा त्याला हादरवून टाकणारं सत्य त्याला उमगतं. त्याच्या पत्नीचं विक्रम मखीजा (अर्जन बाजवा) ह्या एका चांगल्या ओळखीच्या व्यक्तीशीच प्रेम प्रकरण चालू असतं. विक्रमशी ह्याबाबत बोलायला गेलेला रुस्तम त्याला गोळ्या घालून ठार मारतो आणि त्याच्यावर खूनाचा खटला भरला जातो.
बहुतांश सिनेमा हा ह्या खटल्यावर आधारित आहे. आपण ह्याला 'कोर्टरूम ड्रामा' किंबहुना 'कोर्टरूम मेलोड्रामा' म्हणू शकतो.

रुस्तम आवडला की नाही आवडला, ह्याचा निर्णय चटकन होत नाही. ह्याचा अर्थ ह्यात काही चांगल्या गोष्टी आहेत पण काही तितक्याश्या चांगल्या नसलेल्या नावडलेल्या गोष्टीही आहेत आणि दोन्हींना दुर्लक्षित करता येत नाही.

Akshay_Kumar's-Rustom_poster.jpg

चांगले -

१. अक्षय कुमार

'अक्षय कुमार डोक्यात जातो' असं म्हणणारा मनुष्य मला तरी आजतागायत भेटलेला नाही. तो काही लोकांना विशेष दखलपात्र नसेल वाटत, पण 'तो पडद्यावर आल्यावर असह्य होतं', असं कुणी म्हणत असेल, हे वाटत तरी नाही. शाहरुखपासून रणवीरपर्यंत प्रत्येक जण असह्य होत असतो. पण अ.कु. नाही. अ.कु.चे फॅनसुद्धा भरपूर आहेत. (मी त्यांतला एक !) तर ज्यांना तो आवडतो आणि ज्यांना तो विशेष आवडत नाही, अश्या दोघांसाठीही 'रुस्तम' हा एक 'बघणीय' सिनेमा आहे. अ.कु.च्या हालचालींत नेहमीचा उत्साह जरासुद्धा कमी होत नाही आणि प्रचंड आत्मविश्वास असलेला एक नौदल कमांडर त्याने सहज साकारला आहे. वर्दीत असलेला मनुष्य असाही ऐटबाज दिसतोच, पण अ.कु.ची बातच काही और आहे.
मला असं वाटतं की 'अफलातून' नंतर त्याला त्याच्या आवाजाचा वापर करण्याचं एक विशिष्ट तंत्रही मिळालं आहे आणि प्रत्येक सिनेमागणिक ते मला तरी प्रकर्षाने जाणवत असतं. अगदी पूर्वीच्या (खिलाडी वगैरे) काळातला त्याचा आवाज आणि आजचा त्याचा आवाज ह्यांत फारसा फरक नसला, तरी त्याच्या वापरात मात्र बराच फरक पडला आहे. एक सामान्य चित्रपटही एखादा असा संस्कार अभिनेत्यावर करतो की त्याचं पुढच्या प्रवासाची दिशाच बदलावी, असं काहीसं हे एक उदाहरण आहे. त्याच्या 'रुस्तम'मध्ये फक्त स्टाईल आणि आत्मविश्वासच नसून अत्यंत समंजसपणे त्याने ती व्यक्तिरेखा साकारली आहे. मुळात 'रुस्तम' हा एक सैनिक आहे. तो इतर सामान्य माणसांप्रमाणे भावनिक असू शकत नाही, हे लक्षात ठेवून त्याने त्याचा आनंद, दु:ख, वैषम्य, संताप वगैरे दाखवला आहे. हे नुसतं अंडरप्ले करणं नसून तोलून मापून केलेलं सादरीकरण आहे, असं मला वाटलं.

२. नीरज पांडे

दिग्दर्शक 'टिनू सुरेश देसाई' असले तरी त्यांवर 'नीरज पांडे'चा प्रभाव जाणवतो. बहुतेक. काही चित्रपटांत त्यांनी पांडेंना सहाय्यक म्हणून काम केलंही असावं. नीरज पांडे निर्माते आहेत आणि पांडेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवाद, देशभक्ती वगैरेची किनार असलेलं कथानक आपल्यासमोर मांडलं आहे. 'स्पेशल छब्बीस'चा अपवाद वगळता त्यांच्या आत्तापर्यंतच्या सर्वच सिनेमांत हे जाणवलं आहे. पांडेंचा हातखंडा थरार चित्रित करण्यात आहे. त्यांच्या सिनेमातली पात्र शांतपणे, पॉजेस वगैरे घेत संवाद फेकत नाहीत. लांबलचक मोनोलॉग्ससुद्धा त्यांच्या समीकरणांत बसत नाहीत. त्यांच्या सिनेमातली पात्रं ताडताड पाउलं टाकत चालतात, चटपटीत असतात. त्यांच्या हालचाली जलद असतात. कॅमेरा उगाच गरागरा फिरत नाही किंवा कुठल्या तरी विचित्र कोनांतून तो पाहत नाही किंवा अगदीच एखाद्या कोपऱ्यात टाकून दिल्यासारखा पडूनही राहत नाही. तो जेव्हढ्यास तेव्हढा फिरतो आणि बुचकळ्यात वगैरे पाडत नाही. ह्या सगळ्यामुळे कथानक कुठल्याही गतीने पुढे सरकत असलं तरी खिळवून नक्कीच ठेवतं. 'टिनू देसाई' ह्या सगळ्याला अपवाद नाहीत आणि 'रुस्तम'सुद्धा ! काय होणार आहे, हे आपल्याला आधीच माहित असलं तरीही त्याची उत्सुकता मात्र वाटत राहतेच.

३. जुनी मुंबई

जुन्या मुंबईचं फार काही दर्शन घडतं अश्यातला भाग नाही. पण जे काही घडतं, ते पाहताना एखादा मुंबईकर नक्कीच सुखावतो. खरं तर तो काळ असा होता की मुंबईत मुख्यत्वे दोनच प्रकारचे लोक होते. अतिश्रीमंत आणि अतिगरीब. ही तफावत भयंकर होती. मध्यमवर्ग हळूहळू करत आपलं अस्तित्व दाखवू लागला आणि आता तर ह्या मध्यमवर्गातही निम्न, उच्च असे गट पाडता येतील इतक्या पायऱ्या तयार झाल्या आहेत. पण तो काळ होता जेव्हा एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी बहुतेक दोनच पायऱ्या होत्या. गरीब आणि श्रीमंत. मात्र, ह्या भयंकर तफावतीचे दर्शन इथे होत नाही. इथे दिसणारी मुंबई म्हणजे उच्चभ्रू, सुखवस्तू लोकांचीच मुंबई. स्वच्छ रस्ते, देखण्या गाड्या आणि टापटीप ब्रिटीश पद्धतीची घरं व इमारती ह्यांचं ओझरतं दर्शन होत राहतं. I know, हे दर्शन अपूर्ण आहे आणि ब्लफमास्टर व टॅक्सी नं. ९२११ मध्ये दिसलेल्या मुंबईने मला जास्त मोहवलं होतं आणि 'रमन राघव' मध्ये दिसलेली मुंबई जास्त भिडली होती, पण तरी... !!

४. पवन मल्होत्रा

हा एक अत्यंत गुणी अभिनेता आहे. खूप आव्हानात्मक भूमिका गेल्या काही वर्षांत त्याच्या वाट्याला आलेल्या नाहीत. पवन मल्होत्रा म्हटल्यावर आपल्याला सहसा आठवतात 'सलीम लंगडे पे मत रो' आणि 'ब्लॅक फ्रायडे' मधला 'टायगर मेमन'. नक्कीच, ही दोन त्याची जबरदस्त कामं होती, मात्र 'जब वुई मेट' मधला सरदार 'चाचाजी' असो की 'डॉन' मधला 'नारंग किंवा 'भाग मिल्खा भाग' मधला प्रशिक्षक, त्याने प्रत्येक वेळी ती ती छोटीशी व्यक्तिरेखासुद्धा जिवंत केलेली आहे. कमांडर रुस्तमबद्दल अतिशय आदर असलेला आणि त्याच वेळी आपल्या कर्तव्याचीही पूर्ण जाणीव असलेला 'रुस्तम' मधला त्याचा पोलीस अधिकारी 'व्हिन्सेंट लोबो'ही असाच. अगदी छोटीशी भूमिका आहे असंही नाही, पण फार मोठीही नाही. मात्र तरीही लक्षणीय. अ.कु. आणि त्याचे दोन प्रसंग तर मस्तच जमून आले आहेत. दोन्हींत बुद्धिबळ आहे. एकात तो खेळतो, दुसऱ्यात खेळ टाळतो. एकात दोघांना समसमान स्कोप आहे तर दुसऱ्यात अ.कु.ला जास्त स्कोप आहे.

५. काही किरकोळ (Miscellaneous)

# जेलमध्ये रुस्तम आणि लोबो एक बुद्धिबळाचा डाव खेळतात. असा प्रसंग अनेक सिनेमांत चित्रित झालेला आहे. पण बहुतेक वेळेस ते चित्रण अर्धवट किंवा बाष्कळपणे दाखवलं आहे. इथे एक पूर्ण डाव अगदी व्यवस्थित दाखवला गेला आहे. हा प्रसंग, तेव्हाचे संवाद सगळं मस्त जुळून आलं आहे.
# काही जागांवर उत्तम व सजग संकलन (Editing) जाणवतं.

फार चांगले नाही -

१. इलियाना डी क्रुज

ही 'बर्फी'मध्ये मला आवडली होती. पण इथे खूपच कमी पडल्यासारखी वाटली. अक्षरश: एकाही प्रसंगात ती आश्वासक वाटत नाही. तिचं रडणं, हसणं सगळं नकलीच वाटत राहतं. ह्या कहाणीत 'रुस्तम' पत्नी 'सिंथिया' म्हणून तिचं पात्र महत्वाचं आहे. भले तिची भूमिका केंद्रस्थानी नसली तरीही महत्वाची आहे कारण तिच्यामुळेच तर सगळं घडलेलं आहे. पण तीच परिणामकारक नसल्यामुळे इतर सगळं अपुरंच वाटत राहतं. पुरेसं कूलिंग नसलेल्या वातानुकूलित केबिनमध्ये बसल्यासारखं वाटतं. अगदी जीव गुदमरतही नाही आणि अगदी निवांतही वाटत नाही.

२. संगीत

नसतंच तरी चाललं असतंच की. पण जर आहे, तर चांगलं तरी असायला हवं होतं. 'तेरे संग यारा' ऐकायला ठीक वाटतं, पण तिथल्या तिथे फिरत राहणारी चाल असल्याने लगेच पुरे वाटतं. ही चालही अगदी टिपिकल असल्याने नवीन काही ऐकतो आहे, असंही वाटत नाही. शीर्षक गीत 'रुस्तम वही' म्हणजे तर अमानवी अत्याचार आहे. संगीत म्हणून हे जे काही केलं आहे तो नुसता असह्य गोंगाट आहे. 'तय हैं' हे गाणंही तसं चांगलं आहे, but again काही नवीन ऐकल्यासारखं नाहीच वाटत.
खरं तर आजच्या सिनेमात 'संगीत वाईट असणं' ही बाब गृहीतच धरायला हवी. सिनेमा पाहायला जातेवेळीच ह्यासाठीची मानसिक तयारी असली पाहिजे. पण माझी तरी अजूनही तशी तयारी होतच नाही. जे सुश्राव्य व अर्थपूर्ण असतं तेच संगीत असतं, ह्याहून काही वेगळं जर कानांवर पडलं तर ते पचतही नाही आणि पटतही नाही ! कदाचित हा माझाच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे हा मुद्दा दुर्लक्षित केला तरी चालतोय !

३. कोर्टरूम मेलोड्रामा

'कोर्ट', 'अलिगढ' आणि काही प्रमाणात 'जॉली एल एल बी' अश्या काही सिनेमांतून दिसलेलं कोर्ट जास्त खरं वाटतं. 'रुस्तम'मध्ये दाखवलेला कारभार मात्र मेलोड्रामॅटिकच वाटतो. ज्यूरींना न्यायाधीशाने त्यांचं काम समजावून सांगणं, त्यावर ज्यूरींनी शाळेतल्या मुलाप्रमाणे माना हलवणं वगैरे तर अगदीच उथळ वाटलं. बाकी टिपिकल फिल्मी डायलॉगबाजीही इथे चालते. लोक टाळ्या वगैरे वाजवतात आणि जज 'ऑर्डर, ऑर्डर' करतो. आताशा ह्या सगळ्याने प्रेक्षकाला समाधान मिळत नाही. नको तिथे अवाजवी, अनावश्यक वास्तवदर्शनाचा अट्टाहास करणारे आजचे लेखक-दिग्दर्शक अश्या काही ठिकाणीही तितकेच आग्रही व्हायला हवे.

४. काही किरकोळ (Miscellaneous)

# 'रुस्तम' बहुतांश वेळ वर्दीत दाखवला आहे. त्याची ही वर्दी इतकी पांढरी शुभ्र आहे की दर दोन तासांनी 'टाईड'ने धुवून घेतो की काय असं वाटतं. इतना भी मत करो यार ! अगदी जेलमध्ये असतानाही तो पूर्ण वर्दीत दाखवला आहे. कोठडीही इतकी स्वच्छ असते की त्याच्या कपड्यांवर जराही धूळ वगैरे लागत नाही, हे जरा जास्त होतं. ही ड्राय क्लीन्ड शुभ्रता इतकीही आवश्यक नव्हती की डोळ्यांत खुपेल.
# एक वृत्तपत्र आधी २५ पैसे आणि नंतर त्याची लोकप्रियता वाढल्यावर एक रुपयाला विकलं जाताना दाखवलं आहे. ही कहाणी १९५७ ची असल्याचं सांगितलं आहे. त्या काळात २५ पैसे किती महाग होते, ह्याचा विचार केलेला दिसत नाही. एक आण्यालाही किंमत असणारा तो जमाना होता. एका वृत्तपत्रासाठी १ रुपया ही खूप म्हणजे खूपच जास्त किंमत आहे. १ रुपयाला तर आजही वृत्तपत्र मिळतं बहुतेक !
# मूळ कथानक माहित असलं, तरी जोड-कथानक (जे काल्पनिक आहे) मात्र कुणाला नक्कीच माहित नसावं. पण काय घडणार आहे, ह्याचा अंदाज आधीच बांधता येतो आणि ते तसंच घडतं. ही प्रेडिक्टेबलिटी मारक ठरली आहे. ह्यामुळे थरारातली हवाच निघून जाते.
# सिंथिया आणि विक्रमचा जवळ येण्याचा प्रसंग/ परिस्थिती अगदीच भंकस वाटते. तो सगळा भाग ऐंशीच्या सुमार कालखंडातील एखाद्या फडतूस सिनेमातून उचलून इथे टाकला आहे की काय, असा संशय येतो !

'रुस्तम' वाईट नसला तरी त्याच्याकडून अपेक्षा खूप होत्या. त्या पूर्ण होत नाहीत. नानावटी केसवर आधारलेला 'गुलजार'चा 'अचानक' चाळीस एक वर्षांपूर्वी आला होता. त्यात विनोद खन्ना, फरीदा जलाल आणि ओम शिवपुरी ह्यांचा अप्रतिम अभिनय होता. चाळीस वर्षांपूर्वी उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनांनी बनलेला व बनवलेला तो सिनेमाही 'रुस्तम'पेक्षा कैक पटींनी जास्त थरारक तर होताच आणि दर्ज्याची तर तुलनाही होणार नाही, इतका उजवा होता. त्या काळात, जेव्हा एकेका सिनेमात ८-१० गाणी असायची, गुलजारने गाणी पूर्णपणे टाळली होती. नीरज पांडे, टिनू देसाई व कं.नी किमान तो तरी मोह आवरायला हवा होता.
असो.
एकदा पाहावा असा नक्कीच आहे आणि नाही पहिला तरी काही चुकलं/ हुकलं नसेल, ह्याचीही खात्री बाळगावी.

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/08/movie-review-rustom.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठिकठाक परिक्षण. Happy

नानावटी केसवर आधारलेला 'गुलजार'चा 'अचानक' चाळीस एक वर्षांपूर्वी आला होता.
<<

मला वाटते त्या आधी आलेला सुनील दत्त आणि लीला नायडूचा 'ये रास्ते है प्यार के' हा चित्रपट नानावटी खटल्यावर आधारीत होता. विनोद खन्नाच्या "अचानक" मध्ये गाभा तोच असला तरी कथा वेगळी केली होती, उदाहरणार्थ त्यातला सैन्याधिकारी आपल्या पत्नीची हत्या करतो. ये रास्ते है प्यारके आणि रुस्तममध्ये नौसेना अधिकारी पत्नीच्या प्रियकराची हत्या करतो.

अचानक अगदि कंटाळवाणा आणि संथ सिनेमा होता असे माझे वयैक्तिक मत आहे.

चांगलं लिहिलं परिक्षण पण काही गोष्टींचा कणभरली उल्लेख केला नाही-
१) एक मोलकरीण म्हणून जमनाबाईच्या वेषात उषा नाडकर्णीचा अभिनय फार आवडला. इथे सिंगापुरमधे लोकांनी तिच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या आणि हशा दिल्यात.
२) विक्रम मखिजाची बहिण प्रिती मखिजा हिचा अभिनय लक्षात राहण्यासारखा आहे. तिची श्रीमंत ऐट फार भारदस्त वाटली. तिचे कपडे, चालणे, बोलणे, तोरा सगळेचं काही और होते.
३) सिनेमामधे पैशाचा तो काय भाग दाखवला तो काही नीटसा लक्षात नाही येत.
४) ह्या सिनेमात एकही मोबाईल नव्हता कारण त्या काळात मोबाईल्स नव्हते. तेवढे एक वगळले तर जुनी मुंबई आपण बघत आहोत असे फार वाटत नाही.
५) खर्‍या घटनेत, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी ह्या दोघांना एकूण तीन अपत्य होते. पण इथे त्यांना एकही अपत्य दाखवले नाही.

'आधारलेला' हा शब्द ठळक लिहायला हवा होता बहुतेक !

'यह रास्ते है प्यार के' चा उल्लेख करावासा वाटला नाही. माहित नव्हतं, असं नाही. गैरसमज नसावा. Happy

बघायचा आहे.

अचानक मधे फरीदा जलाल आहे का? विनोद खन्नाच्या बायकोचे काम वेगळ्याच नटीने केलंय. मी पहिलाय पण बरीच वएष झालीत.

अक्षय कुमार दिवसेंदिवस मस्त होत आहे..
त्याच्या इतका पॉवर् फुल ऑफिसर सध्याच्या अभिनेत्यांमधे कोणीच उभा करु शकला नसता..
एजिंग ग्रेसफुली म्हणतात ते त्याला बघुन वाटत

इतका आत्मविश्वास, सुंदर अभिनय मजा आली..

वय झाल्यावर आमिर उगाच जास्त सिरियस.. शाहरुख भरकटलेला आणि सलमान थिल्लर झाला..
बाकी बरेच जण गायब झाले आणि अक्षय त्याच काळातला म्हणुन या तिघांचा उल्लेख (फार चर्चा यावर होउ नये ही इच्छा आणि अपेक्षा)

अक्षय नीट जात आहे

सस्मित | 16 August, 2016 - 12:33 नवीन
बघायचा आहे.

अचानक मधे फरीदा जलाल आहे का? विनोद खन्नाच्या बायकोचे काम वेगळ्याच नटीने केलंय. मी पहिलाय पण बरीच वएष झालीत.

>>
विनोद खन्नाला गोळी लागल्यावर हॉस्पिटलात अ‍ॅडमीट करतात. त्याची सुश्रुषा करणारी नर्स आहे ती. खरं तर अचानक हा सिनेमाच विनोद खन्ना, फरीदा जलाल ह्यांचं नातं (भावा-बहिणीसारखं) आणि डॉक्टरचं यशापयश ह्यावर फोकस करतो. पण त्याला पार्श्वभूमी ही नानावटी केससारखी आहे. तो ह्या केसवरचा सिनेमा नसून, त्यावर आधारलेला आहे.

अचानक मध्ये फरिदा जलाल नर्स असते. असरानी आणि ओम शिवपुरी डॉक्टर असतो.... आणि विनोद खन्नाच्या बायकोचे काम लिली चक्रवर्ती ने केले आहे. ती चुपके चुपके मध्ये असरानीची बायको असय्ते.

खरं तर आजच्या सिनेमात 'संगीत वाईट असणं' ही बाब गृहीतच धरायला हवी. सिनेमा पाहायला जातेवेळीच ह्यासाठीची मानसिक तयारी असली पाहिजे.>>>.
ह्या वाक्याशी प्रचंड सहमत. गाणी ऐकयचंच सोडुन दिलय... किळसवाने लिरिक्स आणि ओंगळवाणे डान्स, यथेच्छ बादल्या, डबडे बडवणे ह्यापलिकडे नविन गाण्यात मलातरी काहीही सापडलेलं नाही. सिनेमेही लॅपी वर बघत असल्यामुळे गाणी पळवता येतात. असो बहुतेक एक पिढी पुढे आल्यामुळे असेल बाकी नविन पिढीला (पक्षी: सध्या कॉलेज मध्ये असलेली जनता) तर आवडताहेत ही गाणी..

अक्षय मलाही आवडतो म्हणून बघणार.. पण या कथानकाला देशभक्तीची वगैरे जोड द्यायला नको होती ( त्याचा मनोज क्मार व्हायला नको. )

ये रास्ते है प्यार के, हा त्या काळात वादग्रस्त ठरला होता. कुणीही प्रस्थापित अभिनेत्री तो रोल करायला तयार नव्हती, म्हणून लिला नायडू ला घेतले होते. ती अनुराधा आणि नंतर त्रिकाल मधे दिसली होती. एकेकाळी तिची गणना जगातील १० सुंदर स्त्रियाम्धे होत होती.

अचानक चा विषय बराच वेगळ्या वळणाचा होता, जबरदस्त पटकथा होती ती.

बाकी पैशाचा हिशोब नक्कीच चुकलाय ( तो बॉम्बे व्हेलव्हेट मधेही चुकला होता ) १९८२ साली देखील वर्तमानपत्रे एवढी महान नव्हती. त्या साली मनिज मधे इडली सांबार ३५ पैश्याला होते. रेल्वेचे तिकिट ३० पैसे होते.

पवन मल्होत्राचा आणखी एक चित्रपट होता, त्यात तो वाघासारखा गेट अप करुन एक लोककला सादर करणारा कलाकार असतो. नाव आठवत नाही.

परिक्षण आवडलं. मस्त लिहिलंयत.

'रुस्तम'बद्दल आवर्जून सांगावं असं खरं तर काहीच नाही. ' हे आणि अक्षयकुमार बद्दल जे लिहिलंय ते ....... >>> +१००.

सचिन खेडेकरची भुमिका उगाचच विनोदी केलीये. त्यापेक्षा खरंच सिरीयस कोर्टरूम ड्रामा दाखवला असता तर अधिक परिणामकारक ठरला असता. एखादा निष्णात वकील इतका पोरकटपणा कसा करेल कोर्टात?

रसप पलिकडल्या धाग्यावर चित्रपटाबद्दल्च रसग्रहण लिहितो म्हणून बोलले तेव्हा काय लिहतील ह्या विचाराने धस्स झालं होतं.. कारण अक्षय कुमार..
अक्की माझा खुप आवडता अभिनेता आहे आण ट्रेलर मधे तो फारच छान दिसलाय.. तो सर्व रोल मधे अगदी फिट बसतो.. मग तो हेरा फेरी मधला फाटका राजु असो, एअरलिफ्ट मधला बिझनेसमॅन कि एखादा देशभक्त ..

'अक्षय कुमार डोक्यात जातो' असं म्हणणारा मनुष्य मला तरी आजतागायत भेटलेला नाही. तो काही लोकांना विशेष दखलपात्र नसेल वाटत, पण 'तो पडद्यावर आल्यावर असह्य होतं', असं कुणी म्हणत असेल, हे वाटत तरी नाही. >> तो असह्य आहे म्हणणारा मात्र आहे माझ्या पाहण्यात.. माझा BFF.. त्याला अजय देवगन जेवढा आवडतो तेवढाच अक्षय कुमारचा तो राग करतो.. Angry आश्चर्य म्हणजे त्याला सल्लु पन आवडत नाही पण तो म्हणतो कि अक्की असह्य आहे.. या एका गोष्टीसाठी मला राग राग येतो.. Angry

असो.. रसग्रहण छानच रसप..
आवडेश.. इलियाना डिक्रुझ बर्फीमधे सुद्धा तेवढी आवडली नव्हती..
इशा गुप्ता बद्दल नाही का काही सांगण्यासारख ? ती आवडत नाहीच पण मला तिच्यात कधी कधी अँजेलिना जोली चा भास होतो.. दे बोथ आर फार डिफरंट स्टील..

रच्याकने कुणी अक्कीचा चला हवा येऊ द्या वाला एपिसोड बघितला का ?
त्याच मराठी इतक छान आहे हे माहिती नव्हत मला.. विशेषतः 'ळ'चा उच्चार.. माणसात आहे Lol मस्त वाटल ऐकुन..

अक्शयकुमार व्यक्ती म्हणून आणि अभिनेताही चांगला आहे. सैफ, देवगण, अक्षय सुरुवातीला आले तेव्हा जेव्हढे डम्ब वाटत होते तेव्हढे ते नन्तर वाटले नाही. त्यांच्यातल्या अभिनेत्याचा दिग्दर्काना लवकर शोध लागला हे बरे झाले

आतापर्यंत चला हवा येऊ द्या जे झाले त्यात अक्षयकुमारचा खूपच उजवा होता, त्यात नेटके विनोद होते आणी मजा आली. अक्षय सहृदय आहे हे तर माहीत आहेच, पण खानावळीपेक्षा तो खूप सुसह्य आहे. हा सिनेमा बघणे मात्र होणार नाही. वेळच नाही.:अरेरे:

मी कालच पाहिला रुस्तम आणि आवडला मला. अक्षय कुमार तर अफलातूनच. कुठेही भावनेचे भडक प्रदर्शन न करता शांत , निर्विकार चेहरा ठेवूनही त्याने प्रत्येक प्रसंगात उचित परिणाम साधला आहे.

चला हवा येऊ द्या मध्ये त्याने या सिनेमाचं प्रमोशन केलं होतं तेव्हाच ठरवलं होतं की बघायचा हा सिनेमा.

परीक्षण छान. आवडले.

अक्षय कुमार माझ्याही आवडीचा. त्याचे व्यक्तीमत्व, संयत अभिनय, डायलॉग डिलीव्हरी आणि विनोदाची स्टाईल आवडते.
नाच, एक्शन आणि रोमान्स मात्र आवडत नाही. आधी तो यात जास्त रमायचा म्हणून फ्लॉप जायचा.
आता मात्र त्याला सूर गवसलाय. अक्षय कुमार या नावावर आपण चित्रपट बघायला जाऊ शकतो. त्याचा फ्यानक्लब वाढतोय.
मात्र तरीही तीन खानांच्या तुलनेत त्याचे फॅन फॉलोईंग चौथेच आहे.
रसप म्हणतात तसे अक्षय असह्य वाटावा असे चित्रपटप्रेमी नसावेतच. मात्र त्याची फार क्रेझ आहे अश्यांची संख्याही फार कमीच असावी हे त्यामागचे कारण.
त्यामुळे त्याने हिट सुपरहिट चित्रपट दिले तरी सुपरस्टार या पदापासून तो नेहमी एक घर मागेच राहणार.
त्याला याचा फरक पडतो की नाही माहीत नाही, पण मला पडत नाही. रुस्तम बघणे झालेच तर तो अक्षयकुमारसाठीच होणार. जसे स्पेशल छब्बीस, हॉलिडे, बेबी, एअरलिफ्ट त्यासाठीच बघणे झाले.

ज्यूरींना न्यायाधीशाने त्यांचं काम समजावून सांगणं, त्यावर ज्यूरींनी शाळेतल्या मुलाप्रमाणे माना हलवणं वगैरे तर अगदीच उथळ वाटलं.
>>

माझ्या माहितीप्रमाणे ज्युरी बसलेला हा भारतातला शेवटचा खटला. यानंतरच ज्युरी पद्धतीचे भारतातून उच्चाटन झाले. ज्युरी सर्वसामान्य माणसातून रँडमली निवडले जातात (जावेत अशी अपेक्षा असते). कामकाज सुरू होण्याआशी ज्युरींना न्यायाधीश सर्व प्रक्रिया समजावून सांगतात, शाळेतल्या मुलांना शिक्षकांनी समजवावे तसेच. कारण निवडलेले ज्युरी हे कायदेपंडित सोडाच, पण कधी कोर्टाची पायरीदेखील चढले नाहीत असे असू शकतात.
तेव्हा तुम्ही ज्याप्रमाणे लिहिएल आहे त्यानुसार हा प्रसंग मला तरी हास्यास्पद/अयोग्य वाटत नाही. अर्थात मी सिनेमा पाहिलेला नाही तेव्हा ही कमेंट तुम्ही ज्या प्रकारे इथे मांडले आहे त्यावर आधारित आहे.

टण्या,
चित्रपटात न्यायाधीश ज्यूरींना प्रक्रिया समजवून सांगतात, तो प्रसंग व्यवस्थित आहे. तू लिहिलंस त्याप्रमानेच तो प्रसंग घडतो. नंतरचे ज्यूरींचे आपापसांतले किंवा ज्यूरी आणि डिफेन्स लॉयर यांचे प्रसंग विनोदी आहेत.

माझ्यातर नेहमीच डोक्यात जातो अक्षय कुमार.

टण्या, एक रुपयाला जसा त्या काळाचा संबध आहे
तसा 'ज्युरी'ला या काळचा संबध लावला तर कुठे बिघडले? Wink

बरचसं सेम ओपिनिअन झालं सिनेमा बघून... दीड तासात चित्रपट संपवता आला असता... उगाच खिचडी, १२ अँग्री मेन, स्पेशल २६ चे सीन्स घुसवले. बराचसा बेअक्कल भाग, अगदी अपेक्षित जुने-पुराणे संवाद, आणि संगीत खरंच त्रासदायक होतं.
इशा गुप्ता, एखाद्या सिरीअल मधली खाष्ट नणंद असल्यासारखी वागलीये, श्रीमंतीचा माज आणि बाज वाटण्यापेक्षा त्यात "डायरेक्टरने असं सांगितलंय ना, मग घ्या..." असं वाटलं अभिनय पाहून.

अक्षय कुमार मध्यांतरानंतर लयीत येतो, आधीच्या सीन्समध्ये तर केवळ डायरेक्टरला संधी द्यावी म्हणून त्यानेही उथळ संवादफेक, राग-चिडचिड, रोझी सेक्रेटरीची तारीफ वगैरे सोपस्कार उरकलेय. आणि मग ती त्याची प्लॅनिंग होती म्हणे. असो.

अचानक वीसेक वर्षांपूर्वी पाहिला तेव्हा आवडला पण आता पुन्हा पाहिला तर कंटाळवाणा वाटला, विशेषतः ओम शिवपुरी आणि त्याचं ते डॉक्टर असुनही हॉस्पीटलमध्ये सतत स्मोक करणं पण विनोद खन्ना आणि इफ्तिखार या दोघांनी अतिशय जीव ओतून काम केल्याचं मात्र आजही जाणवतं.
साधारण अशाच कथानकावर आधारित राईट अ‍ॅण्ड राँगचा कोर्टरुम ड्रामा अतिशय उत्तम होता. इरफान खान, सनी देओल, कंकणा सेनशर्मा आणि गोविंद नामदेव छाप पाडून जातात.
रुस्तम आजच्या काळात बनविण्याचं (पैसा कमावणं सोडून) प्रयोजन काय? असा प्रश्न पडतो.

कुणीही प्रस्थापित अभिनेत्री तो रोल करायला तयार नव्हती, म्हणून लिला नायडू ला घेतले होते. एकेकाळी तिची गणना जगातील १० सुंदर स्त्रियाम्धे होत होती. >>>> या ओळीमुळे उत्सुकता वाटुन गुगल केल्या इमेजेस. खरंच काय सुंदर स्त्री होती. त्या काळाच्या मानाने खुप वेल ड्रेस्ड आणि वेगळेच लुक्स होते. नंतर सॉल्ट & पेपर हेअर मधे पण तेवढीच सुंदर.

जुन्या कादंबर्‍यांमध्ये कोर्टाचा सीनचे वर्णन असले की त्यात 'ज्यूरीतील सभ्य गृहस्थहो ' असे एक वकीलांचे संबोधन (युअर ऑनरसारखे )हमखास असे :). ज्रूरी हा प्रकार क्रिमिनल लॉ मध्ये आहे/ होता . ( काही देशात अजूनही आहे) गुन्हेगारी खटल्यात आपण नेहमी पुराव्याच्या तांत्रिक मुद्द्यावर गुन्हेगार सुटल्याचे बर्‍याच वेळा ( खरे म्हणजे नेहमीच ) पाहतो. जेवढी शिक्षा कठोर तेवढे पुराव्याचे निकष कडक असतात. कारण क्रिनिनल जस्टिसमध्ये व्यक्तीच्या आयुष्याचा प्रश्न असतो त्यामुळे पुराव्यात जराही संदिग्धता असली तरी त्याचा फायदा आरोपीला द्यावाच लागतो ( बेनेफिट ऑफ डाऊट). म्हणून एक सर्वसाधारण विचारसरणी असलेल्या माणसाला प्राप्त पुराव्यावरून काय वाटते ( पर्सन ऑफ ऑर्डिनरी प्रुडन्स) याचे मत ज्यूरींकडून घेतले जाते . हे जुरी समाजाच्या विविध स्तरातून घेतले जातात म्हणेजे बिझिनेसमन, डोक्टर, पेन्शनर, शिक्शक , आम आदमी वगैरे. त्याना त्यांनी कसे मत बनवायचे आहे याबाबत ब्रीफिंग दिले जाते. ज्यूरींच्या मताचा निकालात व निकालपत्रातही वापर केला जातो आधार घेतला जातो त्यामुळे खटला एकदम तांत्रिक तर्ककर्कश होत नाही त्याला व्यावहरिक बाजूही येते . ( ज्यूरींचा वापर असलेला उत्तम चित्रपट म्हनजे १२ अँग्री मेन अवश्य पहा)
पण ज्यूरींचेही एखादे गोष्टीकडे पाहण्याचे पूर्वग्रह असू शकतात व या पूर्वग्रहां चे न्यायदानात सदोष प्रतिबिम्ब पडू शकते व निर्दोष माणूसही लटकावला जाऊ शकतो. उदा. हा झोपडपटीतला माणूस आहे म्हणजे याने खून/ चोरी नक्कीच केली असली पाहिजे अशी धारणा ज्युरींच्या मनातच मुळातच असू शकते. खरे तर १२ अँग्री मेन मध्ये हाच विषय आहे. सुरुवातीला जुरीतले सर्व सदस्य त्या स्लममधल्या मुलाने खून केलाच असला पाहिजे यावर ठाम असतात पण नायक डिस्कशन रूम मध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने त्याची विचारसरणी कशी फोल आहे हे पटवून देतो. शेवटी सर्व १३ ज्युरी आपले मत बदलतात अशी गोष्ट आहे. अवश्य पहा.
नानावटी केसमध्ये वृत्तपत्रातून प्रचंड कवरेज देण्यात आले होते. त्यामुळे सगळ्याच लोकाना ही केस माहीत होती. आजच्या भाषेत मिडिया ट्रायलच म्हाणा ना. नानावटी केसमध्यी ज्यूरींनी कावस नानावटी ला आय पी सी ३०२ या खुनाच्या कलमात 'नॉट गिल्टी ' अशी क्लीन चीट दिली (त्यानी गिल्टी ऑर नॉट गिल्टी एवढेच सांगायचे असते . अंतिम निर्णय डॉक्युमेन्टरी एविडन्स पाहून न्यायाधीश देतात.) .
घटना क्रम असा होता एक्स्पेडिशनहून आल्यावर नानावटीला (आहुजा , फॅमिली फ्रेंडच्या प्रेमात पडलेल्या)बायकोच्या वागण्यात फरक जाणवल्याने त्याने बायकोला विचारले . तेव्हा बायकोने मित्रावरील प्रेम कबूल केले पण त्याचेशी लग्न करण्याचा विचार त्याचा रिस्पॉन्स नसल्याने बदलल्याचे सांगितले. मग कुटुंबियाना प्रॉमिस केल्याप्रमाणे नानवटीने बायको व मुलाना सिनेमाला मेत्रो किंवा रीगलला सोडले. ऑफिसमध्ये जाऊन पिस्तुल व गोळ्या ताब्यात घेतल्या. काही काळ काम केले आणि तो आहुजाकडे गेला . तिथे त्याने आहुजाला बायकोशी मुलांसह लग्न करण्याची तयारी आहे का असे विचारले. दोघात वाद झाला . आणि गोळी बार होऊन आहुजा त्यात मेला. ( मी झोपत असलेल्या प्रत्येक बाईबरोबर मी लग्न करावे काय ? हा रोकडा सवाल ) नन्तर नानावटी स्वतःच पोलीसांकडे हजर झाला.
सेशन जज ना ज्युरीचा हा निएणय पसंत न पडल्याने त्यानी ही केस हाय कोर्टाला रेफर केली . हाय कोर्टाने स्वतःच सुनावणी घेतली आणि नानावटीला जन्मठेपेची सजा दिली.

हे प्रकरण तेवढ्यापुरतेच मर्यादित राहिले नाही.
मुळात या प्रकरणात हा पूर्वनियोजित खून (प्रिमेडिएटे ड मर्डर) होता की प्रक्षुब्ध भावनांचा तात्कालीक आविष्कार यावरच कीस काढला गेला. ब्लिट्झ चे संपादक बी के करंजिया यानी यावर एक मोठी लेखमाला चालवून नानावटीचे केस चालू असताना उघड समर्थन केले. तो सैन्याधिकारी असल्याने आणि देशासाठी त्याने त्याग केलेला असल्याने व तो मध्यमवर्गीय मूल्याना मानणारा असल्याने व जवळच्या मित्राने फसवल्याने भावनेच्या आहारी जाऊन त्याने चूक केलेली आहे .
ज्युरीनी जी क्लीन चिट दिली होती ती खुनाच्या ( ३०२) कल्मासाठी. कल्पेबल होमि साईड ( सदोष मनुषवध नव्हे. ह्या कलमाखाली केस चाललीच नाही.)
करंजियांच्या ह्या लिखाणाने प्रभावित झालेल्या उच्च पदस्थ पारशी लोकांनी शिक्षा झाल्यावर निदर्शने केली व राज्यपालाना साकडे घातले. अखेर राज्यपालानी त्यांच्या अधिकारात नानावटीची शिक्शा रद्द केली . नानावटीने ३ वर्षे शिक्षा भोगली.
या प्रकरणी वादां ची आणि आरोपांची राळच उठली . नानावटी काही साधा माणूस नव्हता . त्याचे नेहरू कुटुंबा त वावर होता. नेहरूंचे आवडते माजी मंत्री व्ही के कृष्ण मेनन हे ब्रिटीश हायकमिशनर असताना नानावटी त्यांचेकडे डिफेन्स अ‍ॅटॅची म्हणून अधिकृत सरकारी सेवेत होता. शिवाय ज्या राज्यपालानी शिक्षा रद्द केली त्या विजयालक्श्मि पंडित या तर नेहरूच्या सख्ख्या भगिनी. आता नेहरू टार्गेट झाले . मृताच्या कुटुम्बियानी जे आरोप केले त्यात करंजियांच्या प्रचार मोहीमेने ज्युरीचे सदस्य पेपर वाचून आधीच प्रभावित झाले होते त्यामुळे त्यानी त्याला नॉट गिल्टी अशी चिट दिली. खालच्या कोर्टाने मर्डर व कल्पेबल होमिसाईडच्या तरतुदी ज्युरीना नीट सांगितल्याच नाहीत. शिवाय नेहरू कुटुंबियांशी संबंधांचा त्याला फायदा झाला वगैरे वगैरे. आता यातले सत्य काय असत्य काय हे तुम्हीच शोधा. उच्च पदस्थांच्या संबंधांचा नानावटीला फायदा झाला की नाही हे सांगता येणार नाही पण त्यावेळचे मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेल्या समाजाची व्यापक सहानूभूती नानावटीला होतीच. शिवाय पारसी पंचायत , इंदियन नेव्ही नेही नानावटीला सपोर्ट केला होता
तिकडे आहुजाचा सिंधी समाजही नानावटीला सोडण्याबद्दल संतापला होता. एकूण सरकारची गोचीच झाली होती. शेवटी एका स्वातंत्र्य लढ्यातल्या पण नन्तर एका इम्पोर्ट लायसनच्या गुन्ह्यात शिक्शा झालेल्या सिंधी माणसाला सजा माफ करून 'बॅलन्स 'साधला गेला :). प्रेम आहुजाच्या बहिणीचे मन वळवून नानावटीची शिक्षा माफ करण्यासाठी तिची संमती घेतली गेली.

या सगळ्या लफड्यात मूळ जुरी सिटीम आणखीच वादात सापडली.
शेवटी या अन्यथा उपयुक्त पण सदोष पद्धतीत काही सुधारणा करण्या ऐवजी , ज्युरीजवर माध्यमांचा अनिष्ट प्रभाव पडतो व त्यान्ची दिशाभूल केली जाऊ शकते असे लॉजिक मांडून केंद्र सरकारने अखेर ही सिस्टीम अबॉलिश केली . टण्या यांनी म्हटल्याप्रमाणे ज्य्रीचा वापर झालेली ही शेवटची केस.

कधी कधी वाटते झाले तेही बरेच झाले . हल्लीच्या हितसंबंधी माध्य्मांच्या जगात , आणि मिडिया ट्रायलच्या जमान्यात कोणीही ज्युरी नि:पक्ष मत देऊच शकला नसता. शिवाय निरनि राळ्या जाती धर्मांच्याल, राजकारणाच्या लॉबींनी हा ' ऑर्डिनरी प्रुडन्स ( Prudence) ' कितपत जिवन्त ठेवला असता कुणास ठाऊक. किंबहुना नसताच. त्यामुळे एका शुष्क , पुस्तकी, तांत्रिक न्यायव्यवस्थेचा वापर करावा लागतो आहे........

नानावटी प्रकरणात नानावटीच्या बाजूने कार्ल खंडालावाला तर सरकारच्या बाजूने चक्क राम जेठमलानी वकील होते.
मी चित्रपट पाहिलेला नाही त्यामुळे चित्रपटात स्टोरीत काय लिबर्टी घेतली आहे माहीत नाही. पण नानावटीच्या दोषाबबत संदिग्धता ठेवली आहे असे ऐकतो.

Pages