बादलीयुद्ध ५ (अंतीम)

Submitted by जव्हेरगंज on 12 August, 2016 - 11:10

बादलीयुद्ध एक , दोन , तीन
, चार
-------------------------------------------------------------------------------

हार्ट अॅटॅकने कुदळे सर वारल्याची बातमी संध्याकाळी साडे सहाला आली आणि आम्ही हळहळ व्यक्त केली. त्यांच्या आठवणी वगैरे जाग्या करुन आम्हाला कोणी सांगतं की काय असं वाटलं. पण तसं काही झालं नाही. कोणी काही बोललं नाही. फक्त डोके हलवत एकेकजण तिथून निघून गेला.
मग आम्हीही रुमवर आलो.

रात्री ऊशिरा दिलीप होस्टेलवर आला आणि त्याने दणक्यात सेलिब्रेशन सुरु केलं.
"खुदा कसम आज मुझे बहोत अच्छा लग रहा है"
"जिंदगीके सबसे खराब दस मिनीट" असे त्याने बरेच डायलॉग वगैरे मारले.
हे बरं नाही असं आम्ही त्याला सांगून बघितलं.
येताना त्याने बियरची बाटली आणली होती आणि प्रत्येकाला घोट घोट प्यायला लावली. दारुचा पहिला घोट मी अश्या विचित्र प्रसंगात रिचवला. लोकं उगाच कडूकडू म्हणतात. मला काय तशी ती वाटली नाही. भरपूर नशा वगैरे चढेल असं वाटलं होतं. पण तसंही काही झालं नाही. मग मी भरपूर पाणी वगैरे पिलो आणि झोपलो.
त्यादिवशी दिलीपच्या रुमवर स्पीकरवर गाणी लावून बराच वेळ गोंधळ चालला.

गेल्यावर्षी दिलीप दिवाळीच्या सुट्टीला गावाकडे गेला नव्हता. तो होस्टेलवरच राहीलेला. यावर्षी मात्र तो गेला.
मला मात्र कुतूहल होतं. बंद पडलेलं कॉलेज, रिकामं होस्टेल वगैरे कसं असतं मला बघायचं होतं. म्हणून मग मी त्यावर्षी घरी गेलोच नाही.
"अभ्भी एक दो दिन मे जायेगा" असं मी सगळ्यांना सांगून होस्टेलवरच राहीलो. हळूहळू होस्टेल ओकंबोकं होत गेलं.

होस्टेलवर आता कुणीच नव्हतं. वरच्या मजल्यावर काही बिहारी मात्र होते. नंतर मला आजूबाजूच्या खोल्यांत एकदोघे दिसले खरे, पण ते असून नसल्यासारखे होते.
तसा मी धडधाकट वगैरे आहे. धाडसी वगैरे म्हणता येणार नाही. पण भुतांना घाबरतो एवढे मात्र खरे.

एक दोन दिवसांतच मला एखाद्या जुन्या पडक्या वाड्यात येऊन पडल्यासारखे वाटायला लागले. कॉलेज ही एक प्रशस्त हवेली आणि आमचं होस्टेल म्हणजे भुतबंगला.
रात्री जेवण करुन आल्यावर जिन्यातून वर जाताना मला प्रचंड भिती वाटायला लागली. मी धावतच वर जायचो. कधी एकदा कुलूप काढून दरवाजा उघडतोय असं व्हायचं. रात्री मी लाईट चालूच ठेऊन झोपायला सुरु केलं. कुतुहल म्हणून थांबलो होतो खरा पण फारच बोअर वगैरे व्हायला लागला. कशातच मन लागेना.
गाणी बंद. वही पेन्सिल पुस्तके बंद. खिकडीतून बाहेर बघायचीही भीती. त्यात झोपही लवकर लागत नसायची.
दिवस असो वा रात्र एकूणच कंटाळा अगदी ओतप्रोत भरुन राहीला. भटकून भटकून तरी किती भटकणार.
पैसे जास्त झाले म्हणून उडपीत 'ऑम्लेट ऊताप्पा' नावाचा प्रकार खाल्ला. मला वाटलं नॉनव्हेज असेल. पण त्यानं साधाच उत्ताप्पा कांदा कोथींबीर लावून दिला. इथेही गंडलो.
उडपीच्या बाहेर एक मुलगी दिसली. बराच वेळ ऊभी होती. वाटेत मला अडवत म्हणाली, "अहो विशाखा शिंदेला तुम्ही ओळखता का?"
मी म्हटलं, "हो".
विशाखा शिंदेलातर आख्खं कॉलेज ओळखतं. बरेचजण तिच्यामागे हात धुवून लागलेत.
" कुठे राहते तुम्हाला माहीत आहे का?"
तिची रुम मात्र मलाही माहीत नव्हती.
मी म्हटलं नाही.
मग म्हणाली, " इंजीनीयरींग कॉलेज हेच का?"
मी म्हटलं, "हेच, तुम्ही नवीनच दिसताय"
"मी गावात राहते, इकडे कधी आलीच नाही ना"
मुलगी फारच बोलकी होती. छान.
"विशाखाशी काही काम होतं का?" म्हटलं हिचं काम करता करता विशाखाचीही तेवढीच ओळख होऊन जाईल.
"काम म्हणजे, इथल्या लायब्ररीमध्ये मला अभ्यासाला यायचं होतं, सुट्टीत उघडीच असते ना ती?"
हे मलाही नवीन होतं. मग तिला घेऊन मी लायब्ररीकडे गेलो तर ती खरंच उघडी होती. म्हणजे लायब्ररी बंद होती पण स्टडीरुम उघडी होती. तिच्यात खुर्च्या आणि टेबलं सोडली तर बाकी काही नव्हतं.
मग मी तीला कोण कुठली वगैरे विचारलं.
गावातच एक मेडीकल कॉलेज आहे. आणि ती तिथेच शिकते.
पण गावातून अभ्यासाला इथे येणं हे म्हणजे खूपच अचाट झालं.
मला म्हणाली ती वॉचमनला घाबरली होती. आत यावं की नको या स्थितीत ती उडपीजवळच ऊभी राहीलेली.
मी म्हटलं, बिंधास या. वॉचमन आपलाच माणूस आहे. पाहिजेल तर त्याला सांगून ठेवतो.

मग ती निघून गेली.

दुसऱ्या दिवशी दोन मैत्रीणी घेऊन ती लायब्ररीत अभ्यास करायला आली. मेडीकलच्या परिक्षांची काय भानगड असते हे माझ्या माहीतीत नव्हते. म्हटलं असेल त्यांच काहीतरी.
मग उगाच मी लायब्ररीकडे दोन चकरा मारुन आलो. दोन्ही वेळेला त्यांची नुसती बडबडच चालू होती. मग आलो रुमवर.
कुलूप काढताना मला शेवटच्या कोपऱ्यात जब्बारही कुलूप काढताना दिसला. तिथूनच तो ओरडला,
"अब्बे तू गया नही अबतक"
मी अर्थातच काही बोललो नाही. दोन महिन्यापुर्वीच त्याने माझी बादली पळवली होती. पळवली होती म्हणजे मीच त्याला दिली होती. घे बाबा आणि काळं कर एकदाचं. तेव्हा कुठे तो रुममधून बाहेर पडाला होता.
नंतर गोरखनंही मला समजावलं की बादलीसारख्या फालतू गोष्टीसाठी काय भांडत बसतंय. मुळात मला जब्बारची दादागिरी खपलीच नव्हती. त्याने मला 'मामू' बनवले होते.
एकतर तो गेले दिडेक वर्ष होस्टेलवर नव्हताच. हुबेहूब माझ्याबादलीसारखी त्याची बादली कशी? एवढ्या दिवस त्याची बादली नक्की कोण वापरत होतं. ही खरंच त्याची बादली असेल तर मग माझी बादली कुठेय?
प्रश्न अनेक होते. शेवटी बराच विचार केल्यावर मला वाटलं की गोरखने बोलता बोलता त्याला माझ्या राजेश सामान खरेदीबद्दल सांगितलं असावं. आणि याचाच फायदा घेत त्याने माझी बादली लांबवली. हे असंच घडलं असावं याची माझी खात्री पटली. कारण दुसरा काही चान्सच नव्हता.
जब्बार म्हणजे डोमकावळाच निघाला. रात्री मी त्याला भरपूर बडवतोय आणि दगडं फेकून घालतोय असली भयानक स्वप्न बघत मी झोपी गेलो.

दुसऱ्या दिवशी मला उडपीमध्ये ती मेडीकलवाली मुलगी चहा पिताना दिसली. माझ्याकडे बघून तिने स्माईल केले. मला छान वाटले. पण बोललो मात्र काहिच नाही. कशाला उगाच काहीतरी म्हणून लांबच्या टेबलावर नाष्टा करत बसलो. तिच्या मैत्रिणी मात्र तिनं पगारावर ठेवल्यासारख्या वाटत होत्या.
नंतर दुपारी मी वॉचमनशी गप्पा मारत असताना तिथे ती पाणी प्यायला आली. यावेळी तिनं अजिबात स्माईल दिलं नाही. पाण्याची बाटली भरुन माझ्याकडे न बघताच निघून गेली.
मग मी उठून लायब्ररीकडं चक्कर टाकली. तिथला वॉटर कूलर नक्की चालू आहे की बंद याची खात्री करुन घेतली. मग ग्लासातनं पाणी पिऊन मी परत आलो.
संध्याकाळी ती निघायच्या अगोदरच मी टेकडीवर जाऊन बसलो.

दुसऱ्या दिवशी वीरप्पनला संशय आला असावा. कारण तो म्हणाला "छोकरी अच्छी है"
मी म्हटलं, फ्रेंड आहे.
आता तिच्याशी काहीही करुन बोलायचंच म्हणून मी लायब्ररीकडे चक्कर टाकली. तर तिथे ती एकटीच बसलेली आढळली.
मी भीत भीतच विचारलं "आज एकटीच?"
"अरे येना, अरे बसना" म्हणून तिने मला बसायलाच लावलं.
मग तिने मला कुठल्या वर्षाला आहे वगैरे विचारलं. मग मीही तिला कुठल्या वर्षाला आहे वगैरे विचारलं. ती तर माझ्याहून एक वर्षाने मोठी होती. मला वाटलं आता हे काय जमायचं वगैरे नाही.
पण ती खूपच बोलत होती. तिनं मला सतरा प्रश्न विचारले. मी 'हा हू' करुन उत्तरं दिली.
शेवटी तिनं मला नाव विचारलं.
मी म्हटलं, "सतीश".

मनीची आणि माझी फ्रेंडशीप सुरु झाली असे म्हणण्यास हरकत नाही. कारण एकदोन भेटीत तिनं मला विचारलं, "तुझं नाव खरंच सतीश आहे का" म्हणून?
मी म्हटलं, खोटं कशाला बोलू, खरंच माझं नाव सतीश आहे.
मुळात तिला असा 'आऊट ऑफ द सिलॅबस' प्रश्न पडलाच तरी कसा?
नंतर ती आलीच नाही. बंदच केलं यायचं. तिनं बहुदा दुसरीकडे कुठेतरी जागा शोधली असावी. मला फारच कंटाळा येऊ लागला.

एकदा संध्याकाळी मी गावातून परत येत असताना मेडीकल कॉलेजच्या पाठीमागच्या बाजूस गेलो. म्हटलं ही राहते तो एरियातरी बघून घ्यावा. इथंच कुठेतरी तिची रुम असणार. मला वाटलं खूपच निसर्गरम्य वगैरे ठिकाण असेल. पण इथेतर भरपूर घरे होती. जागोजागी बोळ्या होत्या. काही अंदाज लागला नाही. म्हणून मग पुन्हा परत चाललो. तर समोरुनच हि बया येताना दिसली.
मैत्रीणींशी काही खुसपुस करुन त्यांना पुढं पाठवलं. माझ्याकडे येत म्हणाली की, "तू इथे काय करतोयस?"
"माझा एक मित्र राहतो इथे, त्यालाच भेटायला आलतो" जे सुचलं ते फेकलं.
"हे बघ मी 'तसली' मुलगी नाहीये. तुझ्या डोक्यातून तो विचार आधी काढून टाक. पुन्हा इकडं फिरकू नकोस"
मी काहीच बोललो नाही. मला फार वाईट वाटलं. माझ्यातून त्राण वगैरे जे म्हणतात तेच निघून गेलं.
"जा जा जा इथून लवकर निघून जा" म्हणून तिनं मला हाकलूनच दिलं.

संपूर्ण रस्त्यानं मी मान खाली घालून गपचिप होस्टेलवर चालत आलो. तिनं ते 'तसली मुलगी' म्हटल्याचं मला फारच लागलं. प्रचंड दु:खात नैराश्यात मी वीरप्पनकडं गेलो.
म्हटलं मला गायछाप दे. या दु:खाची नशा मला अजून वाढवाचीय.
त्यानं चुना लावून विडा मळून माझ्या हातावर ओतला. मी तो चिमटीत धरुन दाढेत सोडला. जिने चढून मी माझ्या रुमवर आलो. कुलूप काढून आत गेलो आणि आपटलोच. टेबलाचा कोपराही माझ्या डोक्याला लागला. उठून जरावेळ सावरुन बसलो. मग भिंतीला धरत धरतच बेसीनकडे गेलो. सगळी तंबाखू थुकून टाकली. चुळ भरली आणि भिंतीला धरत धरतच खोलीत आलो.
कॉटवर पडलो तरी सगळी रुम माझ्याभोवती फिरत होती. याआधी मला किसननं आग्रह केला म्हणून तंबाखूचा केवळ एकच कण मी खाल्ला होता. आख्खा विडा खाण्याचीही पहिलीच वेळ. जवळजवळ तासभरतरी ती रुम माझ्याभोवती फिरत होती. आता म्हणलं आपण मरणारच.

बहुतेक त्यादिवशी मी तंबाखूच्या गुंगीत लवकरच झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी मी ऊठलो. बाजारात गेलो. भरपूर भटकलो. पेपर वगैरे विकत आणून मी रुमवर वाचत बसलो. जब्बारनेही मला एकदोनदा दर्शन दिले. दिवसाही आमचं होस्टेल ओसंच पडलं होतं. कधी एकदा ही दिवाळीची सुट्टी संपतेय याची मी वाट पाहू लागलो.

मनीला मी विसरुन गेलो. मनी हा चॅप्टर मी आयुष्यातून कटाप करुन टाकला. जे आपल्याला जमणार नाही त्याच्या मागे लागण्यात काहीच अर्थ नाही.
आपल्याला चांगले मार्क्सही पडत नाहीत. आपल्याला साधी पोरगीही पटवता येत नाही. भरदिवसा आपली बादली पळवली जाते. आणि आपण काहीच करु शकत नाही. याला जीवन म्हणणे सुद्धा किती व्यर्थ आहे.

मग मी पुन्हा एकदा टेकडीवर गेलो. तिथला नाष्टा महाग असला तरी तिथे किमान सँपलतरी मिळते. तिथली इडलीचटणी तर जिवेघेणी सुंदर असते. तिथेच मला झेरॉक्स काढताना मनी दिसली. ऊभ्या गावातले झेरॉक्स मशीन जळलेच असणार म्हणा.
मग मी तिला दिसणार नाही अशा ठिकाणी खुर्चीवर नाष्टा करत बसलो. कसं कोण जाने ती माझ्यापुढे आली आणि म्हणाली, "कसा आहेस?"

टेकडीवरच एक छोटासा बसस्टॉप आहे. मग आम्ही तिथे गेलो. ती म्हणाली, एकदोनवेळा इकडे आले होते. पण तू दिसला नाहीस.
मग मला भारी वाटले.छान.
मग ती म्हणाली, तू ग्रेटच आहेस. एकदा ओरडल्यावर तू माझ्याकडे आलाच नाही. तुझा हा गुण मला खूप आवडला.
मग मला अजून भारी वाटले. हे पण छान.
पुढे ती म्हणाली, माणसाने असंच राहिलं पाहिजे, स्वाभीमानी. अशी माणसे मला खूप आवडतात.
मग ती बडबडतच राहिली आणि मी ऐकतच गेलो.
न रहावून मी तिला म्हटलं, "मनिषा, आपण बागेत फिरायला जाऊया का? संध्याकाळी?"
मग तिचं पुन्हा सुरु झालं, अरे वेडा आहेस का तू? मुर्खासारखं काहीही बोलू नकोस. मी काय तुला पोरं फिरवणारी मुलगी वाटले की काय?
म्हटलं जावू द्या. हिचा नादच नको.
मग मी तोंड पाडून शांतच बसलो.
मग ती म्हणाली, रात्री आठ वाजताच आमचा घरमालक गेटला कुलूप लावतो, माहित्येय?
मी म्हटलं, मग सहाला भेटूयाकी.
ती म्हणाली, नकोच.
मग पुन्हा शांतता.
मग म्हणाली, सहाला नक्की येशील ना?
मी म्हणालो, शप्पथ सहालाच येईन.
जाताना ती म्हणाली, विसरु नको हा. नक्की ये. नाहितर मला हेलपाटा घालायला लावशील.

'या पुराणकाळात आभाळात उडतात पाखरे हजार' असा मी त्यादिवशी रुमवर येऊन कविता करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. एकतर सहा वाजतच नव्हते. छोटंस गिफ्ट वगैरे घेऊन जावंस वाटून गेलं. पण नकोच असलं भलतं काहितरी. धोडीशी धकधक पण झाली. पण म्हटलं चालायचंच.
साधारण पाच वाजता मी रुमवरुन प्रयान केले. संध्याकाळच्या वेळेस कितीही नाही म्हटलं तरी बागेमध्ये गर्दी ही असतेच. मग मी जरा आतल्या बाजूस रिकाम्या खुर्च्या असलेला आईस्क्रीमचा गाडा बघून ठेवला. म्हटलं हितंच ती बसणार. आणि हितचं मी बसणार.

बऱ्याच वेळानं चेहऱ्याला स्कार्फ बांधूनच मनी आली.
म्हणाली, फक्त दहाच मिनिटे भेटायचं.
मी म्हटलं, चालेल.
मग तिनं बागेकडे नजर फिरवली आणि म्हणाली, आपण मंदिरात जाऊ.

गावाच्या बाहेर कुठल्याशा मंदिराकडे आम्ही बराच वेळ चालत होतो.
मी म्हटलं रिक्षाने आलो असतो की.
ती म्हणाली, नाही.
मग म्हणाली, माझा एक मावसभाऊ इकडे येतो. त्याने बघितलं तर किती गोंधळ होईल.
मी म्हटलं, कोण मावसभाऊ?
ती म्हणाली, गावाकडेच असतो. पण एकदोनवेळा आला होता कॉलेजवर.
म्हणजे गावाकडे राहणारा भाऊ. तो इकडे येणार. ते पण एवढ्या लांबून. ते पण येश्टीने. मग म्हणे आम्हाला बघणार. आणि याची तिला भिती वाटत होती. हे म्हणजे खूपच अचाट.
मी तिला समजावण्याच्या भानगडीतच पडलो नाही.

आम्ही मंदिरात गेलो. ते एक जैन मंदिर होतं. गावात एवढं स्वच्छ मंदिर आहे याची मला कल्पनाच नव्हती. तिथे फरशीवर बरीच लोकं मांडी घालून बसली होती. एकदम शांत. दर्शन घेऊन मग आम्हीही बसलो. एकदम शांत. मग देवळाला एक प्रदक्षिणाही मारली. एकदम शांत. असं जोडीने वगैरे दर्शन घ्यायला फारंच भारी वाटलं.

परत येताना तिनं मला बऱ्याच निरर्थक गोष्टी बोलून दाखवल्या. तिच्या कॉलेजमधले कोणी तरी बघेल. अचानक तिच्या पप्पांनी इकडे चक्कर टाकलीच तर. आणि तिची एक मैत्रीण इकडेच ट्यूशनला येते.
एकतर तिने स्कार्फ गुंडाळलेला. वर अंधार पण पडला होता.
मी म्हटलं, एवढी कॉलेजची मुलं मुली जोडीनं फिरतात. त्यांना कोणी विचारत नाही. आपल्याला कोण बघणार.

बागेजवळ आल्यावर मी म्हणालो, एकतरी आईस्क्रीम जरुर खाऊया.
ती म्हणाली, आता झालं की तुझ्या मनासारखं. जाऊ दे मला.
दहा मिनिटं म्हणता म्हणता तिला तासभर तरी तिथेच थांबवली.
शेवटी तिला स्कार्फ काढायलाच लावला, म्हटलं, अशीच किती सुंदर दिसते बघ.
आईसक्रीम घेतलं आणि जिथे गर्द अंधार आहे तिथल्या पायऱ्यांवर आम्ही जाऊन बसलो.
आमची लवशीप सुरु झाली याला मात्र आता कुणी आक्षेप घेऊ नये. कारण हातात हात घेऊन आम्ही बराच वेळ बोलत बसलो होतो.

जाताना मात्र ती कहर घाई करुन निघून गेली.

त्या रात्री मी वीरप्पनकडे जाऊन भयानक गप्पा मारल्या. त्याला म्हटलं, दारु आहे का दारु. हा आनंद मला सोसवणार नाही.
अर्थात पिलो वगैरे काहीच नाही. पण गायछापचा बार जरुर भरला. पुन्हा एकदा चक्कर वगैरे आली. पण ती तंद्रीच वेगळी.
त्या रात्री मी तीन वाजेपर्यंत जागाच होतो.
मी बराच विचार केला. बरेच संकल्पही करुन टाकले. मनी ही चांगली मुलगी आहे. आपलं प्रेम हे पवित्र वगैरे असलं पाहिजे. तिचा अजिबात गैरफायदा घ्यायचा नाही. हातात हात उगाच घेतले असं मला वाटून गेलं. पण तिलाच ते आवडलं असावं तर काय घ्या.

चोवीस तास आमच्या डोक्यात आता मनीच खेळू लागली. सकाळी उठल्यावर मनीची आठवण आली की ताजतवानं वाटायचं. दिवस ऊत्साहात जायचा. असला अजब ऊत्साह मी यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता. माझा एक सीनीयर म्हणतो ते खरेच आहे. आयुष्यात एकप्रकारची जिद्द येते.
दुपारी रस्यावर मला जब्बार दिसला. मला त्याचा मुळीच राग आला नाही. कुणी सांगितलं असतं तर दहा बारा बादल्या मी त्याला फुकटात आणून दिल्या असत्या.

मनीने मला तिच्या मैत्रीणीचा नंबर दिला होता. अर्थात मोबाईल तिच्याकडे नव्हताच. माझ्याकडे असण्याचा तर प्रश्नच नाही.
खूप कंट्रोल केलं आणि शेवटी दोन दिवसांनी मनीला फोन लावलाच. अर्थात तिच्या मैत्रीणीनं उचलला. मग मनी फोनवर आली. मी तिला म्हटलं, असंच आपलं सहज म्हणून भेटूया.
मन पुन्हा एकदा मनी तिचा आवडता खेळ खेळून झाल्यावर म्हणली, हे शेवटचंच. यानंतर पुन्हा कधीच भेटायचं नाही.
मग आम्ही पुन्हा दोनतीन वेळा भेटलो. खूप भटकलो. मी म्हटलं तिला आपण सिनेमा बघू. पण ती आलीच नाही.
मनीच्या भेटी घेणं खूप अवघड गोष्ट आहे. एकतर तिला फोन करुन खूप मनवावे लागते. त्यात माझी बरीच चिल्लर वाया जाते. बोलताना आजूबाजूला लक्ष ठेवणं हे आलंच.
दुसरं म्हणजे ती नेहमीच दोन चार दिवसांनतरची एखादी डेट फिक्स करते. म्हणजे मी फोन केला आणि ती लगेच भेटली असं कधीच होत नाही. मात्र तिच्या भेटी सुवर्णअक्षरात लिहून ठेवाव्या अश्याच होत्या.

मी एक डायरी केली. आणि त्यात मनी मला कधी भेटली. कुठे भेटली. किती वाजता भेटली. आम्ही काय काय खाल्लं. वगैरे नोंदी ठेवायला सुरु केलं.
मनी कोकणातली आहे हे समजल्यावर मला कोकणाविषयी भयानक आकर्षण निर्माण झालं. तिथला निसर्ग, समुद्र, पोफळीच्या बागा, पाऊस वगैरे सगळंच कसं अगदी गूढ वाटायला लागलं. मी ठरवलं, आता नाही किमान नंतर कधीही पैसा वगैरे कमवून कोकणातल्या जंगलात टुमदार घर बांधून राहायचं. मी मनीला म्हटलं, मला तुझं गाव बघायचंय. ती म्हणाली, कधीही ये. गाव तुझंच आहे.
मग मी तिला म्हटलं, मला तुझी रुमतरी दाखंव. मला बघायचीय. आतून.
खट्याळपणे हसत मनी म्हणाली, मुलींची खोली बघण्यात एवढं काय विशेष. पण चल, दाखवतेच तुला.
ती एक बिल्डींग होती. पाठीमागच्या बाजूस तिला एक गेट होते. तिथं मुली राहतात असं कुणालाही वाटलं नसतं. तिनं गेट उघडलं आणि म्हणाली, आवाज न करता हळूहळू ये.
अर्थात तो एक हाय सिक्युअर एरिया होता. मुलींच्या रुम्स म्हणजे खायची गोष्ट नसते.
तिनं कुलूप उघडलं आणि आम्ही खोलीत आलो. मग तिनं दारही आतून बंद केलं.

तिची रुम खरंच खूप छान होती. मेंटेन केली होती. वरती पंखा होता. खाली गादी होती. भिंतीवर कपडे. आणि कोपऱ्यातलं ते ब्रेसियर. जे मी बघायच्या आत तिने काढून पिशवीत घातलेसुद्धा.
ती म्हणाली, तू माझ्या रुमवर आलास आणि उजेड पाडलास.
मनीच्या खूप वेगळ्या कल्पना होत्या. वेगळे विचार होते. मला म्हणाली, तुझी गर्लफ्रेंड आहे का?
मी म्हणालो, मला ते आजपर्यंत जमलं नाही. आता तू माझी गर्लफ्रेंडच आहे की.
मग ती चिडली. म्हणाली, मला गर्लफ्रेंड म्हणू नकोस. मी काय तुझी गर्लफ्रेंड नाही. फार फार तू मला प्रेयसी म्हणू शकतोस.
मनीचंसुद्धा माझ्यासारखंच मराठीवर खूप जास्त प्रेम होतं. तिनं सांगितलं नसतं तर ती मला बी.ए. वगैरे करत असलेली मुलगी वाटली असती.
तिला मी विचारलं, माझ्याशी लग्न करशील का?
तर म्हणाली, लग्न करणे जमणार नाही. खूप अवघड गोष्ट आहे ती. आधीच माझ्यामागे भरपूर टेन्शन्स आहेत. तू अजून वाढवू नकोस.

हिला रोमँटीक वगैरे अजिबात बोलता येत नाही.
मी म्हटलं, खोटं खोटं तरी हो म्हण.
ती म्हणाली, आपल्या भविष्यात जे नाहीच त्याची स्वप्नं बघावीच कशाला. हे आपणंच आपल्याला फसवल्यासारखं नाही का होणार.

बराच वेळ मनी ऊभीच होती.
मी म्हटलं, बस तरी.
मग गादीवर बसत ती म्हणाली, प्रेम करायचंय तेवढं कर. पण 'तसलं काही' करण्याचा विचारसुद्धा डोक्यात आणू नकोस.

तिच्या 'तसलं काही'चा टोन विशेष होता. एकतर तिचा आवाज फारच मधूर. तिनं मला चार शिव्या घातल्या असत्या तर त्याही मला आवडल्या असत्या. नव्हे घालायचीच ती. मी तिच्यापेक्षा एक वर्षाने लहान आहे म्हणून वाटेल तसे वागवत होती.

मी म्हटलं, सचीन तेंडुलकरची बायको त्याच्याहून पाच वर्षांनी मोठी आहे.
मग पेटलीच ती. म्हणाली, याचा काय संबंध. मी अशी काय तुझ्यापेक्षा वीस पंचवीस वर्षांनी मोठी आहे. तुझी फिलॉसॉफी तुझ्याजवळच ठेव.
मी म्हटलं, तसं नाही म्हणायचं मला, मी फक्त एक उदाहरण दिलं.
मग आम्ही अशाच बिनबुडाच्या गप्पा मारल्या.
शेवटी मी खिशातून एक कागद बाहेर काढला.
अगोदरच खास तिच्यासाठी लिहीलेली कविता तिला वाचायला दिली.

"आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलताना,
मागे वळून पाहताना,
पहाटेचा सडा
बाभळीच झाडं
उजाड माळरान
पाण्याचा माठ
भरलेला.
तिथेच असेन कुठेतरी मी
तुझ्यासाठी हरवलेला... "

तिला भरुनच आलं. निशब्द झाली ती. कुठल्यातरी गहिऱ्या विचारात हरवून गेल्यासारखी वाटली.
जवळ येत मला म्हणाली, माझी बॉडी ना मेनासारखी आहे मेनासारखी.

त्यादिवशी आमचं 'मेन आयटम' सोडल्यास बाकी सगळं करुन झालं.
जाताना म्हणाली, ही आपली शेवटची भेट. आता मला विसरुन जा.
ही तिची नेहमीचीच नाटकं.

पुन्हा मी होस्टेलवर गेलो. वीरप्पन खुर्चीवर ताठ बसला होता. मिशाही पिरगळत होता. मी त्याच्याकडे तंबाखू मागितली नाही. दारुचंतर नावही काढलं नाही. एकप्रकारची बैचेनी जाणवत होती. तिथंच नळावर तोंड धुतलं. आणि रुमवर निघून गेलो.
त्यादिवशी मला विनाकारण उदासच वाटत होतं. मग मी झोपलो.
दुसऱ्या दिवशीही मला उदासच वाटत होतं. तिसऱ्या दिवशीही वाटलं. ही उदासिनता तर फारच जिवेघेणी. राहून राहून मनीचीच आठवण यायला लागली.
मग मी तिला फोन केला. तिच्या मैत्रीणीनं उचलला. तिची मैत्रीण म्हणाली, मनिषा गावाला गेलीय. तिनं फोन करु नका म्हणून सांगितलंय.
मी "ओके" म्हणून फोन ठेवला.
रुमवर आलो. आणि मला मनीचा रागच आला. सांगितलंसुद्धा नाही. बरं ते एक ठिक आहे. पण 'फोन करु नका' असं सांगायची काय गरज होती. खरंच ती गावाला गेलीय. का तिनं यावेळी खरंच ब्रेकअप वगैरे करायचंय ठरवलंय.
खरंतर मी खूप विचार केला. माझी चूक मला कुठेच सापडली नाही.

एका दुपारी बेसीनकडं तोंड धुवायला गेलो. तेव्हा बाथरुममध्ये कोणीतरी आंघोळ करत असल्याचा आवाज आला. तो गाणेही गुणगुणत होता. मी आवाज लगेच ओळखला. तो जब्बार होता. कुणाकुणाचा राग मी त्याच्यावर काढला माहीत नाही. पण मी त्याच्या बाथरुमला बाहेरुन कडी घातली. म्हटलं बसू दे बोंबलत. नंतर कोणीतरी उघडेलच.
मग मी खोलीवर आलो आणि कशी कोण जाने मला ठार झोप लागली.

किलकील्या डोळ्यांनी मी जागा झालो. बाहेर बरीच धावपळ चालली होती. आणि माझं दारसुद्धा कोणीतरी ठोठावत होतं.
मी दार उघडलं. बाहेर वाघमारे नावाचा वॉचमन ऊभा होता. मला म्हणाला, बाथरुमला कडी तुम्हीच घातली काय?

त्यादिवशी अभुतपूर्व गोंधळ झाला. जवळच राहणारे एक शिक्षकही होस्टेलवर आले होते. त्यांनी माझी जबर कानउघडणी केली.
मी मात्र, मी कडी घातलीच नाही यावर ठाम राहीलो.
रात्री संतोष नावाचा मुलगा माझ्या रुमवर आला. त्याला म्हटलं, जब्बार कुठेय.
तो म्हणाला, हॉस्पिटलमध्ये.
आता मात्र माझी खरंच टरकली. हे आपण काय करुन बसलो.
मघाचा तो शिक्षक पुन्हा माझ्या रुमवर आला. त्याच्या हातात मोबाईल होता. मला म्हणाला, बोल.
मी फोन घेतला. पलिकडून कुठलातरी हेडकॉन्स्टेबल बोलत होता. मला म्हणाला, इंजीनीयरला शोभतं का हे. देशाची भावी पिढी अशी वागायला लागली तर कसं व्हायचं. वगैरे.
मी सॉरी सर वगैरे म्हणून फोन ठेवला.

नंतर जब्बारच्या वडलांनीही फोन केला. त्यांनीही बराच वेळ लेक्चर झाडलं. एकूणच तो दिवस फार वाईट गेला.
नंतर कळालं, जब्बारला साधं खरचटलं होतं. केवळ मलमपट्टी करायला तो हॉस्पिटलमध्ये गेलता. पण बाथरुममध्ये अर्धाएक तास कोंडून राहिल्याने तो भयानक घाबरला होता. त्याला म्हणे कुठलातरी मानसिक आजार आहे.

एक दोन दिवसांनी त्याच्या रुमवर गेलो. म्हटलं, सॉरी जब्बारभाय. गलती हो गयी आपुण से.
तो म्हणाला, अरे मजाक की भी कोई हद होती है रे, लेकीन कोई बात नही. अगली बार सोच समझके मजाक कियो.
मग मी म्हटलं, जब्बारभाय, शेवटी आपण जिरवलीच तुझी.
मग तो हसला.
त्यादिवशी नको नको म्हणून सुद्धा त्यानं मला बादली परत केलीच.

दिवाळीची सुट्टीही संपत आली होती. पुन्हा एकदा होस्टेल भरगच्च होणार होतं. दिवाळीच्या सुट्टीत मी फारच भयानक उद्योग केले. मी ते कुणालाही सांगणार नाही. जब्बारचा किस्सा मात्र आपोआपच पसरणार आहे. नव्हे मीच तो पसरवणार आहे. बाकीची काशी मात्र बंद पाकिटात सीलड असणार आहे. तो एक गुप्त करार होता. आणि गुप्तच राहिल. हे मी स्वत:च स्वत:ला दिलेलं एक वचन आहे.

हळूहळू मुलं येत गेली. होस्टेलवर फराळाचे सामान वगैरे भरपूर आले. गोरखनं आल्या आल्या माझी भेट घेतली. त्याला वाटलं मी ही बरंच काही आणलं असेल. मी म्हटलं, मी गावाकडे गेलोच नाही.
तो म्हणाला, मला पण सांगायचस की येड्या. मी पण थांबलो असतो.
दिलीप जरा उशिराच आला. तो इतक्यात येईल वाटलंही नव्हतं. पण त्यानं नेहमीप्रमानंच फराळाच सामान आजिबात आणलं नव्हतं.
कॉलेजही दणक्यात सुरु झालं. गेला महिनाभर आपण इथे रहात होतो यावर विश्वासच बसेना. गेल्या महिनाभर हे कॉलेज माझ्या एकट्याचं होतं. आता साला त्याचा एक तुकडासुद्धा वाटणीला येणार नाही.

किती दिवस गेले माहीत नाही. मनी काय माझ्या डोक्यातून जाईल असं वाटत नव्हतं. तिला मी मनातल्या मनात भरपूर शिव्या दिल्या आणि आता हा शेवटचाच ट्राय म्हणून फोन लावला.

फोनवर मनी आली आणि म्हणाली, "एवढ्या दिवस तू फोन का नाही केलास. तू जिवंत आहे मला कसं कळणार."
मला आता रडायलाच येतंय की काय असं वाटून गेलं.
मी म्हटलं, "वेळ असेल तर भेट. पायजेल तर हे शेवटचंच. यानंतर कधीच भेटू नको."
मग ती म्हणाली, "शेवटचं वगैरे कशाला म्हणतोस. मी येते."

-------------------------------------------------------------------------------
इतिबादलीसीमा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी होतं हो बादलीयुद्धं!
मनी एकदम टिपीकल मन्या असतात तशीच रंगवली आहे.
Wink
आणि जब्बारला क्लॉस्ट्रोफोबिया होता वाटतं.

मस्त!

क्युट आहे गोष्ट.
पण मनी आणि मन्याचं पुढे काय झालं ही चुटपूट लागली ना..
मनीचं पात्र मस्त आहे.५ पॉईंट समवन मधली नेहा आठवली.

जबरी लिहिले आहेत सगळेच भाग. शेवट मात्र अकस्मात झाला. पहिलं वर्ष तरी पूर्ण होउ द्यायचं होतं Happy

बाकी वातावारण, पात्र आमच्याच कॉलेजची असल्यासारखी वाटली Happy

साहेब पाय कूठे आहेत तुमचे ? माझंच कॉलेज आणि दोस्त उभे केलेत असे वाटून राहिले. गेल्या १० वर्षात मायबोलीवर वाचलेलं हे सगळ्यात भारी लिखाण आहे.

त्या मनीच्या रुमवर भेटीच प्रसंग तर म हा न.

>>
तिची रुम खरंच खूप छान होती. मेंटेन केली होती. वरती पंखा होता. खाली गादी होती. भिंतीवर कपडे. आणि कोपऱ्यातलं ते ब्रेसियर. जे मी बघायच्या आत तिने काढून पिशवीत घातलेसुद्धा.
>>>
चार शब्दात त्या मुलीच्या खोलीचे आणि मुलांचे हॉस्टेल यामधला कॉन्ट्रास्ट जो उभा केलास आहेस तो खल्लास. कोपर्‍यातले ब्रेसिअर Biggrin भाऊ तू माझ्याबरोबर माझा आल्टरइगो म्हणुन हास्टेलात राहात होतास की काय?
सुट्टीतली बंद लायब्री, उघडी असणारी स्टडी रूम, तिथे असलेला कूलर, वॉचमन आणि तंबाखू, बार भरल्यावर बसलेली पहिली किक, बिहारी, उगाचच हिंदी बोलणे, रेल्वे लाइनजवळ राहणारा ख्रिस्चन मित्र. डिटेलिंग का काय ते.

मजा आया, मजा आया. एक आपट्यांचा सुर्श्या होता आणि एक तुमचा गोरख. उडप्याकडे बरोबर डोसा खाणारी पांडूची एक ती होती, आणि तुमची एक मनी!!

वाचली आणि आवडली सुध्दा...पण पुढे कथा सुरु ठेवावी अशी नम्र विनंती... >>> +१

ही सिरीज वाचताना मला सारखा कोसलाचा हिरो आठवत राहिला. >>>> येस्स... +१

त्यादिवशी आमचं 'मेन आयटम' सोडल्यास बाकी सगळं करुन झालं.>>>>>> +१११११११ "एकदम झक्कास"... 'एक तीर मे दो निशाण'......!!!

प्रचंड दु:खात नैराश्यात मी वीरप्पनकडं गेलो.
म्हटलं मला गायछाप दे. या दु:खाची नशा मला अजून वाढवाचीय.

ठ्ठो ठ्ठो ठ्ठो!!!! महालोललोळगोळा!!! जव्हेरगंज भाऊ, हा प्रकार लैच आवडल्या गेला आहे !! त्यात तुमची शैली.

संपल बादलीयुध्द...
अजुन वाचायच होत खरं..हॉस्टेलची लाईफ,मित्र,आनि बाकीचे उद्योग्,आनि हो परीक्षा आनि प्रकरण पन.

जबरी लिहिले आहेत सगळेच भाग. शेवट मात्र अकस्मात झाला. पहिलं वर्ष तरी पूर्ण होउ द्यायचं होतं
>>>
+१११११

एकदम सगळं सोळ्यासमोर जसंच्य अतसं उभं राहिलं.
ग्रेट!

तुम्हाला होस्टेलवर राहून किती काळ लोटलाय माहीत नाही पण होस्टेल लाईफ अजूनही तसेच आहे आणि मी त्याचा रोज अनुभव घेतोय.

कथा मस्त आहे.

पांडुरंग सांगवीकराशी साधर्म्य सांगणारा नायक आहे हे अनेकदा वाटत राहिले.

Pages