बादलीयुद्ध २

Submitted by जव्हेरगंज on 3 August, 2016 - 02:39

बादलीयुद्ध एक
-------------------------------------------------------------------------------

होस्टेलवर मी येऊन पंधराच दिवसच झाले होते. त्यात माझा पार्टनर राजेश सोडून गेल्याने खोलीत मी एकटाच असायचो. कॉलेजसाठी फक्त एक वही विकत घेतली होती. बाकी कशाचाच पत्ता नव्हता. रात्री खाटंवर पडल्यावर वहीवर मी उगाच रेघोट्या ओढत बसायचो. चित्रं काढायचो. वरच्या रकान्यात डोंगर काढणे हा माझा आवडता खेळ. सुरुवातीला चारपाच डोंगर काढायचे. मग दोन डोंगरांच्या मध्ये अजून एक बारका डोंगर. मग मोठ्या आणि बारक्या डोंगरामध्ये अजून एक चौथा डोंगर. असे करत करत विशाल डोंगररांगांचा फिल यायचा. मग डोंगरावर झाडी. मध्येच आडवी गेलेली नदी. आभाळात कावळे. कुठल्यातरी कोपऱ्यातून उगवलेला सुर्य. मग पसरत गेलेली त्याची किरणे.
माझी कित्येक पाने या डोंगररांगानेच भरली आहेत.

एके दिवशी अशीच चित्रं काढत असताना सुनील माझ्यावर खोलीवर आला. हे एक दांडगं पोरगं होतं. मिलिटरी कलरचाच टिशर्ट कायम घालायचं. 'वाईट्ट' म्हणायची त्याची सवय जाम फेमस होती. म्हणजे एखाद्याला 'काय वाईट्ट अभ्यास करतय रे ते' असलं काहितरी बोलायचा. टेपरेकॉर्डवर अलिशाचं गाणं चालू होतं. मला म्हणाला
"अरे, त्या गोरखला जरावेळ येऊ दे का तुझ्या खोलीत?, गाणी ऐकायचं म्हणतंय रे ते"

गोरख हा एक साधासुधा माणूस आहे हे मला माहित होतं. पण खोलीत यायचं तर सरळसोट यावं ना.
"चालतंय की, येऊ दे" मी कपाळावर आठ्या पाडूनच परमीशन दिली.
दरवाज्याच्या बाजूलाच उभारलेला गोरख लागोलाग खोलीत आला.
गोरख माझ्या खोलीत पहिल्यांदाच आला होता. आणि त्यासाठी त्याने चक्क वशिला लावला होता. हे एक भन्नाट प्रकरण होते.
टेपरेकॉर्डर जवळ बसून मंत्रमुग्ध गाणी ऐकू लागला. मध्येच मला म्हणाला,
"ह्ये आलिशाचं कॅशेट कधी आणायलेस?"
"कालच आणली, तीस रुपयला दोन". त्यालाही ती स्वस्तच वाटली असावीत. पण तो काही बोलला नाही. मग तसाच चुळबुळत बसला.
जरा वेळानं त्यानं हळूच खिशातनं एक कॅसेट बाहेर काढलं आणि मला दाखवत म्हणाला
"हे लावू काय, दलेर मेहंदीचं?"
आता मी याला खोलीच्या बाहेरच काढणार की काय असे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते.

"तुझ्याकडं पण टेप हाय का?" मी विचारलं.
"नाय रे, मी असाच घेऊन ठेवतो"
च्यायला हा टेप नसतानापण कॅसेटं घेतो. हा प्रकार मला नवीनच होता. मग त्यानं बॅगंच उचलून आणली. भरपूर कॅसेटं होती. जुनी मेलडी. नवीन पॉप. लेटेस्ट रिलीज. कॅसेटं पण ब्रँडेड. टिप्सची. हे प्रकरण तर जाम पुढे गेलेलं दिसत होतं.

मग गोरख माझ्या खोलीत नेहमीच यायला लागला. एकदा बोलता बोलता त्याला मी राजेशकडून घेतलेल्या सामानाबद्दल सांगून टाकलं. "खुळं हाईस काय लेका" म्हणून त्यानं मला दाद दिली.
त्याची माझी चांगलीच गट्टी जमली.

एकदा रात्री मी गावातून परत येत असताना मला तो वॉचमनच्या केबीन मध्ये बसलेला आढळला. रात्र रात्र यांच्या गप्पा चालायच्या. जे त्याने मला आधीच सांगितले होते. मग मी पण त्या केबीनमध्ये गेलो. वॉचमन त्याला बॉर्डरवर केलेल्या पराक्रमांबद्दल सांगत होता. हा वॉचमन म्हणे पूर्वी भारतीय सैन्यामध्ये होता. रिटायर झाल्यावर इकडे वॉचमनगिरी करत बसला. सगळेजण त्याला 'मामू' म्हणायचे. कारण ओएसवाले तसे म्हणायचे.
तर या मामूने म्हणे बॉर्डरवर एक बाई ठेवली होती. त्याचेच किस्से तो गोरखला रंगवून सांगत होता.
मी म्हटलं, "खरंच?"
"हर एक कुत्ते का अपना अपना नसीब होता है बेटा" असे मामू म्हणाला. अर्थात नाईटशीपला तो 'लावूनच' कामावर यायचा. मला तर त्याची स्टोरी कायमच बोगस वाटायची. हे सगळे टाईमपासचे धंदे. तसंही त्याला रात्रभर जागावंच लागायचं. आणि सोबतीला कोणीतरी बकरा पाहिजेच होता.

या वॉचमनला जाडजूड मिश्या होत्या. आणि पुढे हा होस्टेलमध्ये 'वीरप्पन' नावाने प्रसिद्ध पावला.
नंतर नंतर तर हा वॉचमन रात्री दहा अकराला गोरखच्या रुमवर यायचा. आणि त्याला बळेबळे केबीनमध्ये घेऊन जायचा. खास गप्पा मारण्यासाठी. शेवटी शेवटी गोरखही कंटाळला. पण माणूस पापभिरु. नाही म्हणणे त्याला जमायचेच नाही. वीरप्पनची त्याच्यावर दहशतच बसली. गोरख पुरता अडकला.

रात्रभर जागल्याने गोरखनं कॉलेजला जायचं जवळ जवळ बंदच केलं. पहिल्या सेमीस्टरला त्याचे तीन विषय उडाले. अर्थात त्याची कारणे भरपूर होती. वीरप्पन हे केवळ निम्मित होतं. मुळात चोपन्न टक्केवाला माणूस इंजिनीयरींगला आला हेच त्याच्यासाठी खूप होतं.

पहिल्या सेमीस्टरला मी सगळ्याच विषयात पास झाल्याने गावाकडे पाचशे एकर जमीन असलेला दिलीप माझ्यावर जाम खूश झाला. पाचशे एकर जमीन असे तो सरळ सांगायचा. पण नक्की किती आहे हे बघायला कोण जाणार?
हे सगळं कसं हँडल करता असे मी त्याला खोदून खोदून विचारले. मग तो म्हणाला की सगळी जमीन खडकाळ आहे. केवळ दोन तीन एकरात ऊस आहे तेवढंच. विदर्भात म्हणे असंच असतं.

तर याने एकदा गंमतच केली.
मशीन ड्रॉईंगवाले कुदळे सर आम्हाला ड्रॉईंग शिकवायचे. अगदी किरकोळ शरीरयष्टी. काडी पैलवान हे नाव शोभुन दिसलं असतं. अंगात जीव नसल्यावर माणूस जसा बोलतो तसे बोलायचे. पण दरारा काय. अगदी कडक. शिस्तप्रिय. पहिल्यांदाच वर्गावर आल्यावर त्यांना पाहून सगळे हसले. एकदोघांनी तर टिंगलपण उडवली. मग मात्र हा माणूस नंतर लेक्चरला आलाच नाही. बहिष्कारच टाकला आमच्या वर्गावर. वर्कशॉपला आमच्या वर्गाची एंट्री बंद केली. जवळ जवळ महिनाभर त्यानं आम्हाला तंगवलं. शेवटी आम्ही सगळ्यांनी जाऊन लेखी माफीनामा वगैरे मागितला. तरीही बधला नाही. मग आम्ही प्रिन्सीपलकडे गेलो तेव्हा कुठे प्रकरण मिटले.
पण कुदळे सर तेव्हा जो डोक्यात गेला तो गेलाच.

नंतर तो वर्गावर आल्यावर दिलीपने त्याची एकदोन लेक्चर्स अटेंड केली. मग तो दिलीपच्याही डोक्यात गेला. एवढा मरतुकडा मास्तर आपल्याला शिकवायला कसा याचेच त्याला आश्चर्य वाटायचे. मुळात शिकवण्याची एवढी रटाळ पद्धत त्याने आयुष्यात पहिल्यांदाच बघितली असावी. मग त्यानेच कुदळे सरांच्या लेक्चरवर बहिष्कार टाकला.

एकदा अनवधानाने तो कुदळे सराच्या लेक्चरला बसला. आणि रोजच्या अबसेंटीमुळे कुदळे सरानं त्याला झाड झाड झाडला. मग नेहमीप्रमाणेच सरांच रटाळ लेक्चर सुरु झालं. दिलीपनं दहा मिनिटं कशीबशी काढली. आणि सरळ हात वर करुन उभारत म्हणाला,
"सर, मे आय गो आऊट?"
"व्हाय?" मास्तरनं अगदी थंडपणे विचारलं.
"आय एम गेटींग बोअरड्" दिलीप त्याची नोटबुक हातात घेऊन तयार होता.
"ऑफकोर्स यू कॅन.."
दिलीप त्यावेळी वर्गातून जो बाहेर पडला, तो पुन्हा कधीच कुदळेच्या लेक्चरला न बसण्यासाठी.

तर असा हा दिलीप मला विचारत होता की, तुझे सगळेच्या सगळे विषय कसे आले? नक्की तू कसा अभ्यास केला.
मी खाटंवर मांडी घालून बसलो आणि म्हणालो, जुन्या प्रश्नपत्रिका अजिबात सोडवायच्या नाहीत. सरळ पुस्तक वाचायचं. सगळंच्या सगळं. कन्सेप्ट समजून घ्यायच्या.
बहुदा माझंही तत्वज्ञान त्याला रटाळ वाटलं असावं. कारण त्याने लगेचच विषय बदलला. गावात पिच्चर कुठला लागलाय याची चौकशी करुन तो निघून गेला.

गणितात मी मास्टर आहे हे आता सगळ्या जगाला कळले होते. गोरख माझ्या रुमवर प्रॉब्लेम घेऊन यायचा आणि गाणी ऐकत बसायचा. अभ्यास त्याने कधी केलाच नाही. सरळसोट पुस्तकात जे लिहीलय तेच वहिवर खरडून काढायचा. त्याची आख्खी वही ही एक पुस्तक म्हणून पण वापरता आली असती. मी मात्र याच्या उलट करायचो. अगदी गणिताचे पुस्तकसुद्धा वाचूनच काढायचो. ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत होती. आणि त्याबद्दल ते मला विशेष आदर द्यायचे.

बऱ्याच जणांनी मला खोली बदलून त्यांच्या रुममध्ये राहायला येण्याची ऑफर दिली. जी मी झिटकारुन टाकली. मला माझीच खोली सगळ्यात जास्त आवडली होती. कारण रोज सकाळी उठल्यावर मला खिडकीतून शाबुद्दीनचा गाडा दिसत असे. तसेच थोडं वाकून बघितलं तर सायकल स्टँडही दिसायचं. उडपी हॉटेल तर बसल्या बसल्याही समोरच बघता यायचं. विशेष म्हणजे मला मौल्यवान एकांत भेटायचा. रात्री माझे बरेच उद्योग चालू असायचे. प्रयोगशाळेत कसल्यातरी केमिकलमध्ये भिजलेला माझ्या वहीचा कोपरा मी रोज थोडा थोडा तोंडात टाकायचो. कारण एकच. जीभ चुरचुरायची. बहुतेक ते नायट्रीक अॅसीड असावे.

एकंदरीत दिवस मजेत चालले होते. दुपारच्या वेळेस आमच्या होस्टेलला आळस येतो. सगळे गुडूप झोपतात. अगदी सीडी प्लेयरचासुद्धा आवाज नाही. ऐन दुपारी मी उठतो. दोन खोल्या ओलांडून बाथरुमकडे जातो. शेवटचं बाथरुम खूप मोठं आहे. त्याला साधारण तीन खिडक्या आहेत. दरवाज्यापाशीच एक नळ आहे. नळाला पाणी आहे. पाण्याखालीच एक बादली आहे. अरे ही तर माझीच बादली. मी सरळ उचलली. आणि माझ्या कॉटखाली आणून ठेवली.
-------------------------------------------------------------------------------
क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान